<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<bible translation="Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))" status="Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र Copyright © 2018 by The Bible Society of India Used by permission. All rights reserved worldwide." link="https://www.bible.com/bible/2143/MAT.17.MACLBSI">
	<testament name="New">
		<book number="40">
			<chapter number="1">
				<verse number="1">अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी:</verse>
				<verse number="2">अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.</verse>
				<verse number="3"></verse>
				<verse number="4"></verse>
				<verse number="5"></verse>
				<verse number="6">दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्‍लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ.</verse>
				<verse number="7"></verse>
				<verse number="8"></verse>
				<verse number="9"></verse>
				<verse number="10"></verse>
				<verse number="11"></verse>
				<verse number="12">बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती.</verse>
				<verse number="13"></verse>
				<verse number="14"></verse>
				<verse number="15"></verse>
				<verse number="16"></verse>
				<verse number="17">अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दावीदपासून इस्राएली लोकांचे बाबेलला देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलला देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.</verse>
				<verse number="18">येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्‌निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.</verse>
				<verse number="19">तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला.</verse>
				<verse number="20">असा विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, “दावीदपुत्र योसेफ, तू मरियेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारण्यास घाबरू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे.</verse>
				<verse number="21">तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”</verse>
				<verse number="22">हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याद्वारे जे भाकीत केले होते ते पूर्ण व्हावे. ते असे:</verse>
				<verse number="23">पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे.</verse>
				<verse number="24">झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आदेश दिल्याप्रमाणे त्याच्या पत्नीचा स्वीकार केला.</verse>
				<verse number="25">मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">हेरोद राजाच्या अमदानीत यहुदियातील बेथलेहेम नगरात येशूच्या जन्मानंतर, पूर्वेकडून काही ज्ञानी पुरुष यरुशलेम येथे येऊन विचारपूस करू लागले,</verse>
				<verse number="2">“यहुदी लोकांचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही पूर्वेकडे त्याचा तारा पाहिला आणि आम्ही त्याची उपासना करायला आलो आहोत.”</verse>
				<verse number="3">हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले.</verse>
				<verse number="4">त्याने सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे?”</verse>
				<verse number="5">ते त्याला म्हणाले, “यहुदियातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याद्वारे असे लिहिले आहे:</verse>
				<verse number="6">हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस, असे मुळीच नाही. माझ्या इस्राएली लोकांचे नेतृत्व करील असा सरदार तुझ्यातून उदयास येईल.”</verse>
				<verse number="7">हेरोदने पूर्वेकडील ज्ञानी लोकांना गुप्तपणे बोलावून, तारा दिसू लागल्याची निश्चित वेळ त्यांच्याकडून काळजीपूर्वक विचारून घेतली.</verse>
				<verse number="8">नंतर त्याने त्यांना बेथलेहेमला पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बाळाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याची उपासना करीन.”</verse>
				<verse number="9">राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि जो तारा त्यांनी पूर्वेकडे पाहिला होता, तो बाळ होते, त्या जागेवर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे मार्गक्रमण करत राहिला.</verse>
				<verse number="10">तो तारा त्यांना दिसला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.</verse>
				<verse number="11">त्या घरात गेल्यावर ते बाळ त्याची आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पाया पडून त्याची आराधना केली. त्यांच्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ह्या भेटवस्तू त्यांनी त्याला अर्पण केल्या.</verse>
				<verse number="12">मात्र ‘हेरोदकडे परत जाऊ नका’, अशी सूचना त्यांना स्वप्नात मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या देशास निघून गेले.</verse>
				<verse number="13">ते गेल्यावर प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, मुलाला व त्याच्या आईला घेऊन मिसर देशास पळून जा. मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे.”</verse>
				<verse number="14">योसेफ उठला आणि बाळ व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला.</verse>
				<verse number="15">हेरोदच्या मृत्यूपर्यंत तो तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे”, हे भाकीत पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.</verse>
				<verse number="16">ज्ञानी लोकांनी आपल्याला फसवले, हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ज्ञानी पुरुषांकडून काळजीपूर्वक विचारून घेतलेल्या वेळेनुसार त्याने बेथलेहेममध्ये व आसपासच्या परिसरात माणसे पाठवली व त्यांच्याकडून जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे मुलगे होते त्या सर्वांना ठार मारले.</verse>
				<verse number="17">यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे:</verse>
				<verse number="18">राम्हा येथे रडणे व मोठा आकांत ऐकण्यात आला; राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून काही केल्या तिचे सांत्वन होईना.</verse>
				<verse number="19">हेरोद मरण पावल्यावर, प्रभूचा दूत मिसर देशात गेलेल्या योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला,</verse>
				<verse number="20">“ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.”</verse>
				<verse number="21">तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला.</verse>
				<verse number="22">परंतु अर्खेलाव त्याचे वडील हेरोद ह्याच्या जागी यहुदियात राज्य करत आहे, असे कळल्यावर योसेफ तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना मिळाल्याप्रमाणे तो गालील प्रांतात निघून गेला.</verse>
				<verse number="23">‘त्याला नासरेथकर म्हणतील’, हे जे ख्रिस्ताविषयी संदेष्ट्याद्वारे भाकीत करण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून तेथे तो नासरेथ नावाच्या नगरात जाऊन राहिला.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">त्या वेळी बाप्तिस्मा देणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करूलागला,</verse>
				<verse number="2">“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”</verse>
				<verse number="3">त्याच्याविषयी यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते: अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’</verse>
				<verse number="4">योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे. त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे आणि टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते.</verse>
				<verse number="5">यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देन नदीच्या आसपासच्या परिसरातील लोक योहानकडे येऊलागले होते.</verse>
				<verse number="6">त्यांनी स्वतःची पापे कबूल करून त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.</verse>
				<verse number="7">परुशी व सदूकी ह्यांच्यापैकी अनेकांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून दूर पळायला तुम्हांला कोणी सावध केले?</verse>
				<verse number="8">पश्‍चात्तापाला अनुरूप असे वर्तन करा.</verse>
				<verse number="9">‘अब्राहाम आमचा पूर्वज आहे’, असे म्हणून तुम्हांला स्वतःचे समर्थन करता येईल, असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो, देव ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे.</verse>
				<verse number="10">आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड रोवलेली आहे. जे चांगले फळ देत नाही, असे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल.</verse>
				<verse number="11">तुम्ही पश्चात्ताप केला, हे दर्शवण्यासाठी मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, तो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे. त्याची पादत्राणे उचलायचीदेखील माझी पात्रता नाही. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल.</verse>
				<verse number="12">त्याच्या हातात त्याचे सूप आहे. त्याने तो त्याच्या खळ्यातील धान्य पाखडून गहू कोठारात साठवील पण भूस मात्र कधीही न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”</verse>
				<verse number="13">तेव्हा योहानकडून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलहून यार्देन नदीवर आला.</verse>
				<verse number="14">परंतु योहान त्याला नकार देत म्हणाला, “आपणाकडून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता?”</verse>
				<verse number="15">येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे, कारण अशा प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे उचित आहे.” तेव्हा येशूने त्याला तसे करू दिले.</verse>
				<verse number="16">बाप्तिस्मा घेतल्यावर लगेच येशू पाण्यातून वर येत असताना, पाहा, स्वर्ग उघडला आणि त्याला दिसले की, परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरत आहे</verse>
				<verse number="17">आणि काय आश्चर्य! आकाशातून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्यावर मी प्रसन्न आहे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले.</verse>
				<verse number="2">तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली.</verse>
				<verse number="3">सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”</verse>
				<verse number="4">परंतु त्याने उत्तर दिले, “असे लिहिले आहे, “मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगतो.’”</verse>
				<verse number="5">नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले</verse>
				<verse number="6">आणि त्याला म्हटले, ‘तू देवाचा पुत्र असशील तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, “तो त्याच्या दूतांना तुझ्याविषयी आदेश देईल आणि तुझे पाय धोंड्यांवर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.’”</verse>
				<verse number="7">येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’”</verse>
				<verse number="8">पुन्हा सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये त्यांच्या वैभवासह त्याला दाखवली</verse>
				<verse number="9">आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून माझी आराधना करशील, तर मी हे सर्व तुला देईन.”</verse>
				<verse number="10">येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’”</verse>
				<verse number="11">नंतर सैतान येशूला सोडून गेला आणि पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.</verse>
				<verse number="12">योहानला अटक झाली आहे, हे ऐकून येशू गालीलमध्ये निघून गेला</verse>
				<verse number="13">आणि नासरेथ सोडून जबलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला.</verse>
				<verse number="14">हे अशासाठी झाले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे:</verse>
				<verse number="15">जबलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनाऱ्यावरचा, यार्देनच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील!</verse>
				<verse number="16">अंधकारात बसलेल्यांनी महान प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत वस्ती करणाऱ्या लोकांवर प्रकाश उदय पावला आहे.</verse>
				<verse number="17">तेव्हापासून येशू त्याच्या संदेशाची घोषणा करू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”</verse>
				<verse number="18">येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते.</verse>
				<verse number="19">त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”</verse>
				<verse number="20">ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले.</verse>
				<verse number="21">तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना त्यांच्या वडिलांबरोबर तारवात त्यांची जाळी नीट करताना पाहिले. येशूने त्यांनाही बोलावले.</verse>
				<verse number="22">त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.</verse>
				<verse number="23">येशू यहुदी लोकांच्या सभास्थानांत प्रबोधन करीत, राज्याचे शुभवर्तमान जाहीर करत गालीलभर फिरला आणि त्याने लोकांचे सर्व प्रकारचे रोग व आजार बरे केले.</verse>
				<verse number="24">त्याची कीर्ती सर्व सूरियात पसरली. नाना प्रकारचे आजार व व्यथा असलेल्या रोग्यांना, तसेच भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती माणसांना त्याच्याकडे आणण्यात आले आणि त्याने त्यांना बरे केले.</verse>
				<verse number="25">गालील, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांच्या झुंडी त्याच्यामागे जाऊ लागल्या.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.</verse>
				<verse number="2">तेव्हा तो त्यांना शिकवू लागला.</verse>
				<verse number="3">“जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.</verse>
				<verse number="4">जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल.</verse>
				<verse number="5">जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.</verse>
				<verse number="6">ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.</verse>
				<verse number="7">जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल.</verse>
				<verse number="8">जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.</verse>
				<verse number="9">जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.</verse>
				<verse number="10">नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.</verse>
				<verse number="11">माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य.</verse>
				<verse number="12">आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.</verse>
				<verse number="13">तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? ते मीठ बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.</verse>
				<verse number="14">तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.</verse>
				<verse number="15">दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.</verse>
				<verse number="16">त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.</verse>
				<verse number="17">नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ नष्ट करायला मी आलो आहे, असे समजू नका; मी नष्ट करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे.</verse>
				<verse number="18">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत व सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा नाहीशी होणार नाही.</verse>
				<verse number="19">म्हणून जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी मोडील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.</verse>
				<verse number="20">मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही.</verse>
				<verse number="21">प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे, “खून करू नकोस आणि जो कोणी खून करील, त्याचा न्याय केला जाईल.’</verse>
				<verse number="22">मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याच्या भावावर विनाकारण रागावेल, त्याचा न्याय केला जाईल. जो कोणी त्याच्या भावाला, “अरे मूर्खा’, असे म्हणेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र ठरेल. तसेच जो कोणी त्याला ‘अरे महामूर्खा’, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.</verse>
				<verse number="23">तर मग तू आपले दान अर्पण करण्याकरता वेदीजवळ आणत असता तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे, असे तुला आठवले,</verse>
				<verse number="24">तर तेथे वेदीपुढे तुझे दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम तुझ्या भावाबरोबर समेट कर व नंतर येऊन तुझे दान अर्पण कर.</verse>
				<verse number="25">वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत त्याच्याशी समेट कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील.</verse>
				<verse number="26">मी तुला खातरीपूर्वक सांगतो, पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तू त्यातून सुटणार नाहीस.</verse>
				<verse number="27">‘व्यभिचार करू नकोस’, असे प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.</verse>
				<verse number="28">परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे.</verse>
				<verse number="29">तुझा उजवा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="30">तुझा उजवा हात जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="31">असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’,</verse>
				<verse number="32">परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.</verse>
				<verse number="33">तसेच ‘खोटी शपथ वाहू नकोस आणि प्रभूपुढे घेतलेल्या तुझ्या शपथा पूर्ण कर’, असे प्राचीन लोकांना सांगितलेले तुम्ही ऐकले आहे.</verse>
				<verse number="34">मात्र मी आता तुम्हांला सांगतो, शपथ मुळीच वाहू नकोस, स्वर्गाची नको कारण ते देवाचे राजासन आहे;</verse>
				<verse number="35">पृथ्वीचीही नको कारण ती त्याचे पादासन आहे आणि यरुशलेमची नको कारण ती थोर राजाची नगरी आहे.</verse>
				<verse number="36">तुझ्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस कारण तू तुझा एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.</verse>
				<verse number="37">उलट तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, असे असावे. ह्यापेक्षा जे अधिक, ते वाइटाकडून येत असते.</verse>
				<verse number="38">‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.</verse>
				<verse number="39">परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर.</verse>
				<verse number="40">जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे.</verse>
				<verse number="41">जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा.</verse>
				<verse number="42">जो तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझ्याकडून उसने घेऊ पाहतो, त्याला टाळू नकोस.</verse>
				<verse number="43">‘तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर व तुझ्या शत्रूचा द्वेष कर’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.</verse>
				<verse number="44">परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.</verse>
				<verse number="45">अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याची मुले व्हावेत; कारण तो दुर्जनांवर व सज्जनांवर सूर्य उदयास आणतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.</verse>
				<verse number="46">जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना?</verse>
				<verse number="47">तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना?</verse>
				<verse number="48">म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">माणसांना दिसावे म्हणून त्यांच्यापुढे तुमचे धर्माचरण न करण्याची तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला पारितोषिक मिळणार नाही.</verse>
				<verse number="2">जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे प्रार्थनामंदिरात व रस्त्यांवर लोकांपुढे स्तोम माजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे.</verse>
				<verse number="3">उलट, तू जेव्हा दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस.</verse>
				<verse number="4">तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.</verse>
				<verse number="5">तसेच जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा ढोंग्यांसारखा वागू नकोस. लोकांनी त्यांना पाहावे म्हणून सभास्थानांत व चव्हाट्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे.</verse>
				<verse number="6">उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.</verse>
				<verse number="7">तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले ऐकले जाईल, असे त्यांना वाटते.</verse>
				<verse number="8">तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणतो.</verse>
				<verse number="9">तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.</verse>
				<verse number="10">तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.</verse>
				<verse number="11">आमची रोजची भाकर आज आम्हांला दे</verse>
				<verse number="12">आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर</verse>
				<verse number="13">आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेनर्.]</verse>
				<verse number="14">जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील.</verse>
				<verse number="15">परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.</verse>
				<verse number="16">तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखा तुमचा चेहरा खिन्न करू नका, कारण आपण उपवास करत आहोत, असे लोकांना दिसावे म्हणून ते मलूल चेहऱ्याने वावरतात. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे.</verse>
				<verse number="17">उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू.</verse>
				<verse number="18">अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.</verse>
				<verse number="19">पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील.</verse>
				<verse number="20">तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत.</verse>
				<verse number="21">अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.</verse>
				<verse number="22">डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल;</verse>
				<verse number="23">पण तुझी दृष्टी सदोष असेल तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातील प्रकाश जर अंधकारमय झाला तर तो अंधार किती भयंकर असेल!</verse>
				<verse number="24">कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकणार नाही.</verse>
				<verse number="25">म्हणूनच मी तुम्हांला सांगतो, तुमच्या जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही काय खावे व काय प्यावे आणि तुमच्या शरीराविषयी, म्हणजे तुम्ही काय परिधान करावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीवन आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक मौल्यवान आहे किंवा नाही?</verse>
				<verse number="26">आकाशातील पक्ष्यांकडे पाहा; ते पेरणी करत नाहीत; कापणी करत नाहीत की कोठारांत धान्य साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाहीत?</verse>
				<verse number="27">चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?</verse>
				<verse number="28">तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत.</verse>
				<verse number="29">तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता!</verse>
				<verse number="30">जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो तर तुम्ही अल्पविश्‍वासी लोकहो, तो तुम्हांला अधिक कपडे पुरवणार नाही काय?</verse>
				<verse number="31">म्हणून काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका.</verse>
				<verse number="32">ह्या सर्व गोष्टी मिळवायची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गातील पिता जाणून आहे.</verse>
				<verse number="33">तर मग तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या सर्व गोष्टीदेखील तुम्हांला मिळतील.</verse>
				<verse number="34">म्हणून उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्या. आजचे दुःख आजच्यासाठी पुरे!</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका.</verse>
				<verse number="2">ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल.</verse>
				<verse number="3">तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?</verse>
				<verse number="4">अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.</verse>
				<verse number="5">अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.</verse>
				<verse number="6">जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित त्यांच्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुमच्या अंगावर धावून येतील.</verse>
				<verse number="7">मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.</verse>
				<verse number="8">जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते.</verse>
				<verse number="9">आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा</verse>
				<verse number="10">आणि मासा मागितल्यावर त्याला साप देणारा असा कोणी तुमच्यामध्ये आहे का?</verse>
				<verse number="11">मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात, त्यांना तो किती मोठ्या प्रमाणात चांगल्या देणग्या देईल!</verse>
				<verse number="12">लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच शिकवतात.</verse>
				<verse number="13">अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.</verse>
				<verse number="14">परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो.</verse>
				<verse number="15">खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात.</verse>
				<verse number="16">त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय?</verse>
				<verse number="17">त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.</verse>
				<verse number="18">चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही.</verse>
				<verse number="19">चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.</verse>
				<verse number="20">अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.</verse>
				<verse number="21">‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील.</verse>
				<verse number="22">न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’</verse>
				<verse number="23">तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’</verse>
				<verse number="24">म्हणून जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो खडकावर घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे;</verse>
				<verse number="25">पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता.</verse>
				<verse number="26">उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो.</verse>
				<verse number="27">पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.”</verse>
				<verse number="28">येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या ह्या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला;</verse>
				<verse number="29">कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या.</verse>
				<verse number="2">त्या वेळी एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभो, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”</verse>
				<verse number="3">येशूने त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला.</verse>
				<verse number="4">नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”</verse>
				<verse number="5">येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली,</verse>
				<verse number="6">“प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.”</verse>
				<verse number="7">येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”</verse>
				<verse number="8">त्या रोमन अधिकाऱ्याने उत्तर दिले, “प्रभो, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आपण शब्द मात्र बोला आणि माझा नोकर बरा होईल.</verse>
				<verse number="9">मीही जबाबदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली सैनिक असून मी एकाला जा म्हटले की, तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की, तो येतो, माझ्या नोकराला अमुक कर म्हटले की, तो तसे करतो.”</verse>
				<verse number="10">हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही.</verse>
				<verse number="11">मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या बरोबर बसतील;</verse>
				<verse number="12">परंतु स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.”</verse>
				<verse number="13">नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.</verse>
				<verse number="14">येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले.</verse>
				<verse number="15">त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. ती उठून त्याची सेवा करू लागली.</verse>
				<verse number="16">त्या संध्याकाळी पुष्कळ भूतग्रस्तांना लोकांनी त्याच्याकडे आणले असता त्याने त्याच्या शब्दानेच भुते घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले.</verse>
				<verse number="17">‘त्याने स्वतः आमचे आजार घेतले आणि आमचे रोग वाहिले’, असे जे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.</verse>
				<verse number="18">आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे, असे पाहून येशूने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला.</verse>
				<verse number="19">तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”</verse>
				<verse number="20">येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”</verse>
				<verse number="21">त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभो, मला आधी माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.”</verse>
				<verse number="22">परंतु येशूने त्याला म्हटले, “तू माझ्या मागे ये आणि जे मेलेले आहेत, त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”</verse>
				<verse number="23">येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले.</verse>
				<verse number="24">एकाएकी त्या सरोवरात इतके प्रचंड वादळ उठले की, तारू लाटांखाली बुडू लागले. येशू मात्र झोपला होता.</verse>
				<verse number="25">ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभो, आम्ही बुडत आहोत, आम्हांला वाचवा.”</verse>
				<verse number="26">तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले.</verse>
				<verse number="27">हे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”</verse>
				<verse number="28">तो सरोवराच्या पलीकडे गदराच्या हद्दीत आल्यावर दोन भूतग्रस्त कबरींतून निघून त्याच्याकडे आले. ते इतके भयंकर होते की, त्या वाटेने कुणीही जाऊ शकत नसे.</verse>
				<verse number="29">अचानक ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला छळायला येथे आला आहेस काय?”</verse>
				<verse number="30">तेथून थोड्याशा अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.</verse>
				<verse number="31">ती भुते त्याला विनंती करू लागली, “तू जर आम्हांला बाहेर काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.”</verse>
				<verse number="32">त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली आणि पाहा, तो कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात बुडून मेला.</verse>
				<verse number="33">तेव्हा कळप चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांचे सर्व वृत्त लोकांना सांगितले.</verse>
				<verse number="34">हे ऐकून सर्व नगर येशूला पाहायला आले व त्याला पाहिल्यावर त्यांनी येशूला त्यांच्या नगराबाहेर जाण्याची विनंती केली.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">येशू तारवात बसून सरोवराच्या पलीकडे गेला व आपल्या नगराला जाऊन पोहोचला.</verse>
				<verse number="2">त्याच वेळी तेथे खाटेवर पडून असलेल्या एका पक्षाघाती माणसाला काही लोकांनी त्याच्याकडे आणले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”</verse>
				<verse number="3">त्या वेळी कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करीत आहे.”</verse>
				<verse number="4">येशू त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का आणता?</verse>
				<verse number="5">कारण ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’, असे म्हणणे, ह्यांतील अधिक सोपे कोणते?</verse>
				<verse number="6">पण मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करायचा अधिकार पृथ्वीवर आहे, हे तुम्हांला समजावे.” मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, तुझी खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.”</verse>
				<verse number="7">तेव्हा तो उठून त्याच्या घरी गेला.</verse>
				<verse number="8">हे पाहून लोक भयभीत झाले आणि माणसांना एवढा अधिकार देणाऱ्या देवाचा त्यांनी गौरव केला.</verse>
				<verse number="9">तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकात नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला.</verse>
				<verse number="10">एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्‍तीस बसले होते.</verse>
				<verse number="11">हे पाहून परुशी येशूच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू अशा जकातदार व पापी लोकांबरोबर का जेवतो?”</verse>
				<verse number="12">परंतु हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर आजाऱ्यांना असते.</verse>
				<verse number="13">‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”</verse>
				<verse number="14">त्या वेळी योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परुशी उपवास करतो परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”</verse>
				<verse number="15">येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना शोक करणे कसे शक्य आहे? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील.</verse>
				<verse number="16">नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही; कारण नीट करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते.</verse>
				<verse number="17">तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत भरत नाही. भरला तर बुधले फुटून द्राक्षारस वाया जातो आणि बुधले निकामी होतात. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरतात म्हणजे दोन्ही टिकतात.”</verse>
				<verse number="18">तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, एक यहुदी अधिकारी येऊन त्याला नमन करून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. तरी आपण येऊन तिच्यावर आपले हात ठेवावेत म्हणजे ती जिवंत होईल.”</verse>
				<verse number="19">येशू उठला व आपल्या शिष्यांसह त्याच्यामागे निघाला.</verse>
				<verse number="20">तेव्हा बारा वर्षे रक्‍तस्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागून आली व तिने त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला.</verse>
				<verse number="21">ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तरी मी बरी होईन.”</verse>
				<verse number="22">येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली.</verse>
				<verse number="23">नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला,</verse>
				<verse number="24">“वाट सोडा, मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.” ते त्याला हसू लागले.</verse>
				<verse number="25">परंतु त्यांना बाजूला सारून आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले, तेव्हा ती उठली!</verse>
				<verse number="26">हे वर्तमान त्या विभागात सर्वत्र पसरले.</verse>
				<verse number="27">येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे आले आणि ओरडत विनवू लागले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”</verse>
				<verse number="28">तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. येशूने त्यांना विचारले, “हे करायला मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभो.”</verse>
				<verse number="29">त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो”</verse>
				<verse number="30">आणि त्यांना दिसू लागले. येशूने त्यांना निक्षून सांगितले, “पाहा, हे कोणाला सांगू नका.”</verse>
				<verse number="31">परंतु ते तेथून निघून गेल्यावर त्यांनी त्याच्याविषयीचे वृत्त त्या विभागात सर्वत्र पसरवले.</verse>
				<verse number="32">ते निघून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणण्यात आले.</verse>
				<verse number="33">त्याचे भूत काढल्यावर मुका बोलू लागला, तेव्हा लोक आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलमध्ये असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”</verse>
				<verse number="34">परंतु परुशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”</verse>
				<verse number="35">येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, स्वर्गाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करत आणि सर्व रोग व दुखणी बरी करत नगरांतून व गावांतून फिरत होता.</verse>
				<verse number="36">लोकसमुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक गांजलेले व पांगलेले होते.</verse>
				<verse number="37">नंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत,</verse>
				<verse number="38">म्हणून पिकाच्या धन्याने कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत ह्याकरिता त्याच्याकडे प्रार्थना करा.”</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व रोग व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला.</verse>
				<verse number="2">त्या बारा प्रेषितांची नावे अशी: पहिला पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान,</verse>
				<verse number="3">फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय,</verse>
				<verse number="4">शिमोन कनानी व येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत.</verse>
				<verse number="5">ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.</verse>
				<verse number="6">तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेढरांकडे जा.</verse>
				<verse number="7">जात असताना अशी घोषणा करा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.</verse>
				<verse number="8">रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना बरे करा, भुते काढा, तुम्हांला मोफत मिळाले, मोफत द्या.</verse>
				<verse number="9">सोने, रुपे किंवा तांबे आपल्या खिशात घेऊ नका.</verse>
				<verse number="10">वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण कामगार त्याच्या वेतनाला पात्र आहे.</verse>
				<verse number="11">ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, त्या त्या ठिकाणी उचित व्यक्तीचा शोध घ्या आणि तुम्ही तेथून निघून जाईपर्यंत तेथेच राहा.</verse>
				<verse number="12">घरात प्रवेश करताना नमस्कार करा.</verse>
				<verse number="13">ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.</verse>
				<verse number="14">जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा त्या नगरातून निघताना तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.</verse>
				<verse number="15">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरातील लोकांपेक्षा सदोम व गमोरा ह्या नगरांतील लोकांना परमेश्वर अधिक दया दाखवील.</verse>
				<verse number="16">लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो. तुम्ही सापांसारखे चाणाक्ष व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.</verse>
				<verse number="17">माणसांच्या बाबतीत जपून राहा. ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. त्यांच्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील.</verse>
				<verse number="18">तुम्हांला माझ्यामुळे सत्ताधिकारी व राजे ह्यांच्यापुढे खटल्यासाठी नेण्यात येईल, तेव्हा तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष देऊ शकाल.</verse>
				<verse number="19">जेव्हा तुम्हांला त्यांच्यापुढे नेतील, तेव्हा कसे बोलावे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका. ते तुम्हांला त्याच वेळी सुचवले जाईल.</verse>
				<verse number="20">कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलणारा आहे.</verse>
				<verse number="21">भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील.</verse>
				<verse number="22">माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल.</verse>
				<verse number="23">जर एका नगरात तुमचा छळ झाला तर दुसऱ्या नगरात तुम्ही आश्रय घ्या. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सगळ्या नगरांत तुमचे कार्य पूर्ण झालेले नसेल.</verse>
				<verse number="24">गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास महान नाही.</verse>
				<verse number="25">शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, एवढे पुरे. कुटुंबप्रमुखाला बाल्जबूल म्हणतात तर कुटुंबातील सदस्यांना कितीतरी अधिक वाईट नावे ठेवतील!</verse>
				<verse number="26">तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल.</verse>
				<verse number="27">जे मी तुम्हांला अंधारात सांगतो त्याची उजेडात पुनरुक्ती करा आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता, ते छपरावरून घोषित करा.</verse>
				<verse number="28">जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा.</verse>
				<verse number="29">दोन चिमण्यांची किंमत ती काय? पण तुमच्या पित्याच्या संमतीशिवाय त्यांतून एकही जमिनीवर पडत नाही.</verse>
				<verse number="30">तसेच तुमच्या डोक्यावरचे सर्व केसदेखील मोजलेले आहेत.</verse>
				<verse number="31">म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे!</verse>
				<verse number="32">जो कोणी इतरांसमोर मला पत्करील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन.</verse>
				<verse number="33">परंतु जो कोणी इतरांसमोर मला नाकारील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.</verse>
				<verse number="34">मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे.</verse>
				<verse number="35">मुलगा व वडील, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यांत फूट पाडायला मी आलो आहे.</verse>
				<verse number="36">मनुष्याचे कुटुंबीयच त्याचे वैरी होतील.</verse>
				<verse number="37">जो माझ्यापेक्षा वडिलांवर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तोही माझ्यासाठी योग्य नाही.</verse>
				<verse number="38">जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही.</verse>
				<verse number="39">जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल.</verse>
				<verse number="40">जो तुमचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो.</verse>
				<verse number="41">जो कोणी संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्याचे पारितोषिक मिळेल. जो कोणी नीतिमान माणसाचा नीतिमान माणूस म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान माणसाचे पारितोषिक मिळेल.</verse>
				<verse number="42">ह्या लहानांतल्या एकाला तो माझा शिष्य आहे म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो त्याला त्याचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हांला निक्षून सांगतो.”</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">एकदा असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आदेश देण्याचे काम पुरे केले आणि तो तेथून त्यांच्या नगरांत प्रबोधन करायला व शुभवर्तमानाची घोषणा करायला निघाला.</verse>
				<verse number="2">योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या काही शिष्यांना पाठवून त्याला विचारले,</verse>
				<verse number="3">“जो येणार आहे, तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”</verse>
				<verse number="4">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानला जाऊन सांगा:</verse>
				<verse number="5">आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते.</verse>
				<verse number="6">जो कोणी माझ्यासंबंधी शंका बाळगत नाही, तो धन्य.”</verse>
				<verse number="7">योहानचे शिष्य परत गेल्यावर येशू लोकसमुदायाबरोबर योहानविषयी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालविलेला बोरू काय?</verse>
				<verse number="8">काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात.</verse>
				<verse number="9">तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, खरेच संदेष्ट्याला. परंतु तुम्ही संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला पाहिले.</verse>
				<verse number="10">‘पाहा, मी माझ्या निरोप्याला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तो हाच आहे.</verse>
				<verse number="11">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी झाला नाही. मात्र स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहूनही श्रेष्ठ आहे.</verse>
				<verse number="12">बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्या दिवसांपासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत.</verse>
				<verse number="13">योहान येईपर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी हा संदेश दिला</verse>
				<verse number="14">आणि त्यांचा संदेश स्वीकारण्याची तुमची इच्छा असेल, तर जो एलिया येणार, तो हाच आहे.</verse>
				<verse number="15">ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!</verse>
				<verse number="16">ह्या पिढीची तुलना मी कशाशी करू? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात,</verse>
				<verse number="17">‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही शोकगीते गायिली तरी तुम्ही रडला नाहीत.’</verse>
				<verse number="18">कारण योहान उपवास करत असे व मद्य पीत नसे, तेव्हा ‘त्याला भूत लागले आहे’, असे लोक म्हणत असत.</verse>
				<verse number="19">मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी लोक म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य. जकातदारांचा व पापी लोकांचा मित्र!’ परंतु परमेश्वराची सुज्ञता त्याच्या कृत्यांवरून सिद्ध होते.”</verse>
				<verse number="20">ज्या ज्या नगरांमध्ये येशूने पुष्कळ चमत्कार केले होते, तेथील लोकांनी पश्‍चात्ताप केला नाही म्हणून त्याने त्यांना दोष दिला.</verse>
				<verse number="21">“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही जे चमत्कार घडलेले पाहिले ते सोर व सिदोन यांनी पाहिले असते, तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता.</verse>
				<verse number="22">परंतु मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा आधिक दया दाखवली जाईल</verse>
				<verse number="23">आणि हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत चढवले जाईल काय? तुला नरकात फेकले जाईल! तू जे चमत्कार पाहिले ते सिदोनात घडले असते, तर ते नगर आजपर्यंत राहिले असते.</verse>
				<verse number="24">मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सिदोन नगरातील लोकांना तुमच्यापेक्षा अधिक सुसह्य होईल!”</verse>
				<verse number="25">एकदा येशूने अशी प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना उघड करून दाखवल्या आहेत.</verse>
				<verse number="26">होय, पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.</verse>
				<verse number="27">माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.</verse>
				<verse number="28">अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.</verse>
				<verse number="29">मी मनाचा सौम्य व लीन आहे. माझे जू आपल्यावर घ्या व माझ्याकडून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल;</verse>
				<verse number="30">कारण माझे जू सोपे व माझे ओझे हलके आहे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात होता, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली, म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.</verse>
				<verse number="2">हे पाहून परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे मना केलेले आहे ते आपले शिष्य करत आहेत.”</verse>
				<verse number="3">त्याने त्यांना म्हटले, “दावीदला व त्याच्याबरोबरच्या माणसांना जेव्हा भूक लागली, तेव्हा त्यांनी काय केले?</verse>
				<verse number="4">म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर फक्त याजकांनी खाव्यात अशा समर्पित भाकरी त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय?</verse>
				<verse number="5">किंवा याजक मंदिरात साबाथ दिवशी साबाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय?</verse>
				<verse number="6">मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असे काहीतरी येथे आहे.</verse>
				<verse number="7">‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता, तर तुम्ही निर्दोष लोकांना दोष लावला नसता;</verse>
				<verse number="8">कारण मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.”</verse>
				<verse number="9">नंतर येशू तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला.</verse>
				<verse number="10">तेथे पक्षाघात झालेला एक मनुष्य होता. काही लोकांनी येशूला दोष लावता यावा म्हणून विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”</verse>
				<verse number="11">तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, ज्याचे एकच मेंढरू असेल आणि साबाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही?</verse>
				<verse number="12">मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती जास्त आहे! म्हणून साबाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.”</verse>
				<verse number="13">त्यानंतर येशूने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा होऊन अगदी दुसऱ्या हातासारखा झाला.</verse>
				<verse number="14">परुश्यांनी मात्र बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.</verse>
				<verse number="15">पण हे ओळखून येशू तेथून निघून गेला. बरेच लोक त्याच्यामागे गेले. त्यांतील सर्व आजारी लोकांना त्याने बरे केले.</verse>
				<verse number="16">“मला प्रकट करू नका”, असे त्याने त्यांना बजावून सांगितले.</verse>
				<verse number="17">हे त्याने अशाकरता केले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे. ते असे:</verse>
				<verse number="18">पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी प्रसन्न आहे, त्याच्यावर मी माझा आत्मा पाठवीन व तो परराष्ट्रीयांना माझा न्याय कळवील.</verse>
				<verse number="19">तो वाद घालणार नाही, ओरडणार नाही, त्याचा आवाज रस्त्यावर कोणाला ऐकू येणार नाही,</verse>
				<verse number="20">चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही, न्यायनिवाड्याचा विजय होईपर्यंत तो असे करत राहील</verse>
				<verse number="21">आणि परराष्ट्रीय त्याच्याकडे आशेने पाहतील.</verse>
				<verse number="22">एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला.</verse>
				<verse number="23">तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?”</verse>
				<verse number="24">परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.”</verse>
				<verse number="25">त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही.</verse>
				<verse number="26">सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार?</verse>
				<verse number="27">मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील!</verse>
				<verse number="28">मात्र मी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे, त्याअर्थी देवाचे राज्य तुमच्यासाठी आले आहे.</verse>
				<verse number="29">किंवा बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.</verse>
				<verse number="30">जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो.</verse>
				<verse number="31">म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही.</verse>
				<verse number="32">मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही.</verse>
				<verse number="33">झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते.</verse>
				<verse number="34">अहो सापांच्या पिल्‍लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार.</verse>
				<verse number="35">चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो.</verse>
				<verse number="36">मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक निरर्थक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी सर्वांना द्यावा लागेल;</verse>
				<verse number="37">कारण तुझ्या शब्दांवरून तुला दोषी किंवा निर्दोष घोषित केले जाईल.”</verse>
				<verse number="38">तेव्हा शास्त्री व परुशी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, “गुरुवर्य, तुमच्याकडून चिन्ह पाहावे, अशी आमची इच्छा आहे.”</verse>
				<verse number="39">येशूने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तुम्हांला दुसरे चिन्ह मिळणार नाही.</verse>
				<verse number="40">कारण जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.</verse>
				<verse number="41">निनवेचे लोक ह्या पिढीबरोबर न्यायकाळी उठून तुम्हांला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.</verse>
				<verse number="42">दक्षिणेची राणी न्यायाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उठून तुम्हांला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला तिच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कोणी येथे आहे.</verse>
				<verse number="43">अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. परंतु तशी जागा त्याला मिळाली नाही</verse>
				<verse number="44">तर तो म्हणतो, “ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे, स्वच्छ व व्यवस्थित असे आढळते.</verse>
				<verse number="45">नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे वस्ती करतात. अर्थात, त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा अधिक वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.”</verse>
				<verse number="46">येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते.</verse>
				<verse number="47">[तेव्हा कोणा एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले आहेत.”]</verse>
				<verse number="48">परंतु त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”</verse>
				<verse number="49">आणि त्याच्या शिष्यांकडे हात करत तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!</verse>
				<verse number="50">जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">त्याच दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या काठावर जाऊन बसला.</verse>
				<verse number="2">लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ इतकी गर्दी करू लागल्या की, तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक काठावर उभे राहिले.</verse>
				<verse number="3">त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला.</verse>
				<verse number="4">तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले.</verse>
				<verse number="5">काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले.</verse>
				<verse number="6">परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले.</verse>
				<verse number="7">काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले.</verse>
				<verse number="8">काही सुपीक जमिनीत पडले. त्याला शंभरपट, साठपट, तर तीसपट असे पीक आले.</verse>
				<verse number="9">ज्याला ऐकण्यासाठी कान असतील त्याने ऐकावे!”</verse>
				<verse number="10">तेव्हा शिष्यांनी जवळ येऊन त्याला विचारले, “आपण लोकांना उपदेश करताना दाखले का देता?”</verse>
				<verse number="11">त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हांला दिलेले आहे परंतु त्यांना ते ज्ञान दिलेले नाही.</verse>
				<verse number="12">कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल व त्याची भरभराट होईल; परंतु ज्या कोणाजवळ काहीच नाही त्याचे थोडेफार जे असेल तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल.</verse>
				<verse number="13">ते बघतात पण त्यांना दिसत नाही; ते ऐकतात पण त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांना समजतही नाही. म्हणून त्यांना प्रबोधन करताना मी दाखले देतो.</verse>
				<verse number="14">यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे. तो असा, “तुम्ही ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल पण तुम्हांला कळणार नाही’,</verse>
				<verse number="15">ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. नाही तर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, कानांनी ऐकतील, त्यांच्या अंतःकरणांना समजेल, ते माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.</verse>
				<verse number="16">परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत.</verse>
				<verse number="17">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही जे पाहात आहात ते पाहायला पुष्कळ संदेष्टे व नीतिमान उत्कंठित झाले होते तरीसुद्धा त्यांना ते पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकत आहात ते ऐकायला ते उत्कंठित झाले होते पण त्यांना ते ऐकायला मिळाले नाही.</verse>
				<verse number="18">तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.</verse>
				<verse number="19">जो स्वर्गाच्या राज्याचे वचन ऐकतो पण त्याला ते समजत नाही तो वाटेवर पडलेल्या बीप्रमाणे आहे. त्याच्या अंतःकरणात जे पेरले होते ते सैतान येऊन हिरावून घेतो.</verse>
				<verse number="20">जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे.</verse>
				<verse number="21">परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो.</verse>
				<verse number="22">जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे.</verse>
				<verse number="23">जो वचन ऐकून ते समजून घेतो, तो चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. त्याचे पीक मिळते - कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर अन्यत्र तीसपट.”</verse>
				<verse number="24">त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले.</verse>
				<verse number="25">परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला.</verse>
				<verse number="26">जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले.</verse>
				<verse number="27">तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’</verse>
				<verse number="28">तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’</verse>
				<verse number="29">परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल.</verse>
				<verse number="30">कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, प्रथम निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि नंतर गहू गोळा करून माझ्या कोठारात साठवा.’”</verse>
				<verse number="31">येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला.</verse>
				<verse number="32">तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.”</verse>
				<verse number="33">येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.”</verse>
				<verse number="34">दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे.</verse>
				<verse number="35">‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले.</verse>
				<verse number="36">लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.”</verse>
				<verse number="37">त्याने उत्तर दिले, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.</verse>
				<verse number="38">शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत.</verse>
				<verse number="39">निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत.</verse>
				<verse number="40">जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल.</verse>
				<verse number="41">मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून</verse>
				<verse number="42">अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल.</verse>
				<verse number="43">त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!</verse>
				<verse number="44">स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. तो एका मनुष्याला सापडतो. तो मनुष्य खजिना पुन्हा लपवून ठेवतो. नंतर तो आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.</verse>
				<verse number="45">तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे.</verse>
				<verse number="46">त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.</verse>
				<verse number="47">स्वर्गाचे राज्य हे सरोवरात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. त्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र पकडले जातात.</verse>
				<verse number="48">जाळे भरल्यावर कोळी लोक ते काठावर ओढतात आणि चांगले मासे भांड्यांत जमा करतात, पण खराब ते फेकून देतात.</verse>
				<verse number="49">तसे युगाच्या शेवटी होईल, देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील व</verse>
				<verse number="50">त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल.</verse>
				<verse number="51">तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.”</verse>
				<verse number="52">तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”</verse>
				<verse number="53">हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला.</verse>
				<verse number="54">स्वतःच्या गावी आल्यावर त्याने तेथील लोकांना सभास्थानात अशी शिकवण दिली की, ते आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून प्राप्त झाले?</verse>
				<verse number="55">हा सुताराचा मुलगा ना? मरिया ह्याची आई ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना?</verse>
				<verse number="56">ह्याच्या सर्व बहिणी येथेच राहतात ना? मग हे सर्व ह्याला कोठून मिळाले?”</verse>
				<verse number="57">आणि त्यांनी येशूचा अव्हेर केला. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला त्याच्या देशात व स्वतःच्या घरी सन्मान मिळत नाही.”</verse>
				<verse number="58">तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत.</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">त्या वेळी हेरोद राजाने येशूची कीर्ती ऐकली</verse>
				<verse number="2">आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. तो मेलेल्यांतून उठला आहे आणि म्हणून ही सामर्थ्यशाली कृत्ये करत आहे.”</verse>
				<verse number="3">हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते;</verse>
				<verse number="4">कारण योहानने त्याला म्हटले होते, “तू तिला ठेवावेस हे योग्य नाही.”</verse>
				<verse number="5">तेव्हापासून तो त्याला ठार मारायला पाहात होता, पण तो यहुदी लोकांना भीत होता कारण ते योहानला संदेष्टा मानत असत.</verse>
				<verse number="6">पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले.</verse>
				<verse number="7">त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले, “तू जे काही मागशील, ते मी तुला देईन.”</verse>
				<verse number="8">तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून मला आत्ता येथे आणून द्या.”</verse>
				<verse number="9">राजाला वाईट वाटले, परंतु सर्व पाहुण्यांच्या देखत वाहिलेल्या शपथेमुळे त्याने ते द्यायचा आदेश दिला</verse>
				<verse number="10">आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करविला.</verse>
				<verse number="11">त्याचे शिर तबकात घालून मुलीला देण्यात आले आणि तिने ते आपल्या आईला दिले.</verse>
				<verse number="12">नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली.</verse>
				<verse number="13">योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले.</verse>
				<verse number="14">तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले.</verse>
				<verse number="15">दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”</verse>
				<verse number="16">येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.”</verse>
				<verse number="17">ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”</verse>
				<verse number="18">तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.”</verse>
				<verse number="19">त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या.</verse>
				<verse number="20">जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.</verse>
				<verse number="21">जेवणाऱ्यांमध्ये सुमारे पाच हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले होती, ती निराळीच.</verse>
				<verse number="22">“मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले.</verse>
				<verse number="23">लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता.</verse>
				<verse number="24">काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता.</verse>
				<verse number="25">पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान तो पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला.</verse>
				<verse number="26">शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.”</verse>
				<verse number="27">परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.”</verse>
				<verse number="28">पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.”</verse>
				<verse number="29">त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला.</verse>
				<verse number="30">परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.”</verse>
				<verse number="31">येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”</verse>
				<verse number="32">ते दोघे तारवात चढल्यावर वारा पडला.</verse>
				<verse number="33">जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”</verse>
				<verse number="34">ते सरोवराच्या पलीकडे जाऊन गनेसरेतच्या भागात किनाऱ्यावर उतरले.</verse>
				<verse number="35">तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या परिसरात माणसे पाठवून सर्व आजारी लोकांना त्याच्याकडे आणले.</verse>
				<verse number="36">“केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले.</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले,</verse>
				<verse number="2">“तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.”</verse>
				<verse number="3">त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही स्वतःची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा का मोडता?</verse>
				<verse number="4">देवाने असे म्हटले आहे, “तू तुझे वडील व तुझी आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’</verse>
				<verse number="5">परंतु तुम्ही म्हणता, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मी तुम्हांला जे काही द्यायला हवे होते, ते मी देवाला अर्पण केले आहे’,</verse>
				<verse number="6">अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता.</verse>
				<verse number="7">अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला,</verse>
				<verse number="8">हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.</verse>
				<verse number="9">धर्मशास्त्र म्हणून ते माझी व्यर्थ उपासना करतात कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.”</verse>
				<verse number="10">नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या.</verse>
				<verse number="11">जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”</verse>
				<verse number="12">नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परुश्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे आपल्याला कळले काय?”</verse>
				<verse number="13">त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही, असे प्रत्येक रोपटे उपटले जाईल.</verse>
				<verse number="14">त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”</verse>
				<verse number="15">परंतु पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.”</verse>
				<verse number="16">तेव्हा तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय?</verse>
				<verse number="17">जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय?</verse>
				<verse number="18">मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते.</verse>
				<verse number="19">अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.</verse>
				<verse number="20">ह्या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे माणसाला अशुद्ध करत नाही.”</verse>
				<verse number="21">येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला.</verse>
				<verse number="22">त्या भागातील एक कनानी बाई येऊन ओरडू लागली, “हे प्रभो, दावीदपुत्रा, माझ्यावर दया करा. माझ्या मुलीला एक भूत फारच त्रास देत आहे.”</verse>
				<verse number="23">तरी येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागून ओरडत येत आहे.”</verse>
				<verse number="24">त्याने उत्तर दिले, “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठीच मला पाठवलेले आहे.”</verse>
				<verse number="25">ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभो, मला साहाय्य करा.”</verse>
				<verse number="26">त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.”</verse>
				<verse number="27">तिने म्हटले, “खरे आहे, प्रभो, तरीही कुत्रीदेखील आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.”</verse>
				<verse number="28">नंतर येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो!” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली!</verse>
				<verse number="29">येशू तेथून निघून गालील सरोवराजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला.</verse>
				<verse number="30">लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे आल्या, त्यांच्याबरोबर लुळेपांगळे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे पुष्कळ आजारी लोक होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि येशूने त्यांना बरे केले.</verse>
				<verse number="31">मुके बोलतात, लुळेपांगळे धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे बघून लोकसमुदायाने आश्‍चर्य व्यक्त केले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला.</verse>
				<verse number="32">नंतर येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेवर मूर्च्छित होतील.”</verse>
				<verse number="33">शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी येथे अरण्यात आम्ही कुठून आणणार?”</verse>
				<verse number="34">येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.”</verse>
				<verse number="35">त्याने लोकसमुदायाला जमिनीवर बसायला सांगितले.</verse>
				<verse number="36">त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने परमेश्वराचे आभार मानले व त्यांचे तुकडे करून ते शिष्यांना दिले आणि शिष्यांनी ते लोकसमुदायाला वाटले.</verse>
				<verse number="37">ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या शिष्यांनी भरून घेतल्या.</verse>
				<verse number="38">जेवणारे चार हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होती ती निराळीच.</verse>
				<verse number="39">त्यानंतर लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो मचव्यात बसून मगदानाच्या हद्दीत गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">एकदा काही परुशी व सदूकी लोक येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले.</verse>
				<verse number="2">येशूने त्यांना उत्तर दिले, [“तुम्ही संध्याकाळी म्हणता, “उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे’</verse>
				<verse number="3">आणि पहाटेस म्हणता, “आज पाऊस पडेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ आकाशाचे रूप तुम्हांला ओळखता येते परंतु काळाची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत!]</verse>
				<verse number="4">ही दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय तिला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर तो त्यांना सोडून निघून गेला.</verse>
				<verse number="5">शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.</verse>
				<verse number="6">येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा, परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा.”</verse>
				<verse number="7">ते आपसात चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून येशू असे म्हणतो.”</verse>
				<verse number="8">येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याविषयी चर्चा का करता?</verse>
				<verse number="9">तुम्हांला अजून समजत नाही काय? पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या?</verse>
				<verse number="10">तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर किती टोपल्या भरून घेतल्या, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?</verse>
				<verse number="11">मी भाकरींविषयी बोललो नाही, हे तुम्हांला का समजत नाही? परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.”</verse>
				<verse number="12">तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नव्हे तर परुशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.</verse>
				<verse number="13">फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील भागात आल्यावर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून ओळखतात?”</verse>
				<verse number="14">ते म्हणाले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात.”</verse>
				<verse number="15">तो त्यांना म्हणाला, “पण मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”</verse>
				<verse number="16">शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचा पुत्र.”</verse>
				<verse number="17">येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.</verse>
				<verse number="18">आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही.</verse>
				<verse number="19">मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”</verse>
				<verse number="20">नंतर त्याने शिष्यांना निक्षून सांगितले, “मी ख्रिस्त आहे, हे कोणालाही सांगू नका.”</verse>
				<verse number="21">तेव्हापासून येशू त्याच्या शिष्यांना उघडपणे सांगू लागला, “मी यरुशलेम येथे जाऊन वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावीत, ठार मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”</verse>
				<verse number="22">पेत्र त्याला बाजूला घेऊन निषेधाच्या स्वरात म्हणाला, “प्रभो, नाही. मुळीच नाही. असे आपल्या बाबतीत घडू नये.”</verse>
				<verse number="23">परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण होतोस. तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”</verse>
				<verse number="24">त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला क्रुस उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे.</verse>
				<verse number="25">जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील.</verse>
				<verse number="26">कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?</verse>
				<verse number="27">मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.</verse>
				<verse number="28">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="17">
				<verse number="1">सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले.</verse>
				<verse number="2">तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.</verse>
				<verse number="3">तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="4">पेत्र म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आपली इच्छा असल्यास मी येथे तीन मंडप उभारतो - आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”</verse>
				<verse number="5">तो बोलत असताना प्रकाशमान मेघाने त्यांच्यावर छाया धरली आणि मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याच्याविषयी मी प्रसन्न आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”</verse>
				<verse number="6">हे ऐकून शिष्य इतके भयभीत झाले की, ते पालथे पडले.</verse>
				<verse number="7">येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.”</verse>
				<verse number="8">त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही.</verse>
				<verse number="9">ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आदेश दिला, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”</verse>
				<verse number="10">त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?”</verse>
				<verse number="11">त्याने उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो, हे खरे आहे,</verse>
				<verse number="12">पण मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आला आहे आणि लोकांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्याचे केले. त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे.”</verse>
				<verse number="13">तेव्हा हा आपल्याला बाप्तिस्मा देणाऱ्या योहानविषयी सांगतो, हे शिष्यांच्या ध्यानात आले.</verse>
				<verse number="14">ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य येशूकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला,</verse>
				<verse number="15">“प्रभो, माझ्या मुलावर दया करा. तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात व पाण्यात पडतो.</verse>
				<verse number="16">मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.”</verse>
				<verse number="17">येशूने उत्तर दिले, “अहो विश्वासहीन व चुकलेल्या लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कुठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”</verse>
				<verse number="18">येशूने भुताला निघून जाण्याचा हुकूम सोडताच ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.</verse>
				<verse number="19">त्यानंतर ते एकटे असताना शिष्यांनी येशूला विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”</verse>
				<verse number="20">तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे जा’, असे म्हटल्यास तो जाईल. तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.</verse>
				<verse number="21">[तरी पण प्रार्थना व उपवास ह्यांवाचून असल्या प्रकारचे भूत निघत नाहीर्.]”</verse>
				<verse number="22">त्याचे शिष्य गालीलमध्ये एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे.”</verse>
				<verse number="23">ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले.</verse>
				<verse number="24">येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमात आल्यावर मंदिराचा कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू मंदिराचा कर भरतात का?”</verse>
				<verse number="25">त्याने म्हटले, “हो भरतात.” मग पेत्र घरात आल्यावर तो काही बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात? स्वतःच्या मुलांकडून की परक्यांकडून?”</verse>
				<verse number="26">“परक्यांकडून”, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत.</verse>
				<verse number="27">तरी पण आपण त्यांना अडखळण होऊ नये म्हणून तू जाऊन सरोवरात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड. तुला जे नाणे सापडेल, ते नाणे माझ्यातर्फे व तुझ्यातर्फे कर म्हणून दे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="18">
				<verse number="1">एकदा शिष्य येशूकडे येऊन विचारू लागले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?”</verse>
				<verse number="2">तेव्हा त्याने एका लहान मुलाला घेऊन त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले,</verse>
				<verse number="3">“मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमचे परिवर्तन होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही.</verse>
				<verse number="4">म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय.</verse>
				<verse number="5">तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.</verse>
				<verse number="6">माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, हे त्याच्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="7">अडखळण होणे ही जगासाठी किती भयानक गोष्ट आहे! अशी अडखळणे अवश्य घडणार. परंतु ज्याच्याकडून ती अडखळणे घडतील त्याची केवढी दुर्दशा होणार!</verse>
				<verse number="8">तुझा हात किंवा तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून फेकून दे, दोन हात किंवा दोन पाय असून न विझणाऱ्या अग्नीत पडण्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="9">तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळे असून नरकाग्नीत पडण्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="10">सांभाळा, ह्या लहानांतील एकालाही तुच्छ मानू नका. मी तुम्हांला सांगतो, त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्यापुढे नित्य उपस्थित असतात.</verse>
				<verse number="11">[जे हरवलेले आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मनुष्याचा पुत्र आला आहेर्.]</verse>
				<verse number="12">तुम्हांला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर टेकडीवर चरत असलेल्या नव्याण्णव मेंढरांना सोडून जे एक भटकले आहे त्याला शोधायला तो जाणार नाही काय?</verse>
				<verse number="13">आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो सापडलेल्या मेंढराबद्दल अधिक आनंद व्यक्त करणार नाही का?</verse>
				<verse number="14">त्याप्रमाणे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.</verse>
				<verse number="15">तुझा भाऊ तुझा अपराधी असेल तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध काय ते त्याला सांग. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल.</verse>
				<verse number="16">परंतु त्याने जर ऐकले नाही, तर तू आणखी एका दोघांना आपणाबरोबर घे. अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा</verse>
				<verse number="17">आणि जर त्याने त्यांचेही ऐकले नाही तर मंडळीला कळव. जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही, तर तो तुला निधर्मी किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.</verse>
				<verse number="18">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल.</verse>
				<verse number="19">मी आणखी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल;</verse>
				<verse number="20">कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.”</verse>
				<verse number="21">त्या वेळी पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?”</verse>
				<verse number="22">येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला सांगत नाही, तर सात गुणिले सत्तर वेळा.</verse>
				<verse number="23">कारण स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्या राजाला त्याच्या दासांकडून हिशोब घ्यावा असे वाटले.</verse>
				<verse number="24">तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्यापुढे आणण्यात आले.</verse>
				<verse number="25">त्या कर्जदाराकडे फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम सोडला की, तो, त्याची बायको व मुले आणि त्यांचे जे काही असेल, ते विकून फेड करून घ्यावी.</verse>
				<verse number="26">त्या दासाने त्याच्या पाया पडून विनंती केली, “मला समजून घ्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडेन.’</verse>
				<verse number="27">त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने दासाचे कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले.</verse>
				<verse number="28">तोच दास बाहेर गेल्यावर त्याला त्याच्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडून त्याचे थोडे कर्ज येणे होते. तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, “तुझ्याकडून माझे येणे आहे, ते देऊन टाक.’</verse>
				<verse number="29">त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, “मला समजून घे म्हणजे मी तुझे कर्ज फेडेन.’</verse>
				<verse number="30">पण त्याचे न ऐकता त्याने सोबतीच्या दासाला कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकले.</verse>
				<verse number="31">घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे इतर दास अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी ते वृत्त त्यांच्या धन्याला सांगितले.</verse>
				<verse number="32">त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुझे सर्व कर्ज माफ केले.</verse>
				<verse number="33">मी जशी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’</verse>
				<verse number="34">आणि त्याचा धनी त्याच्यावर रागावला व त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याने त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती तुरुंगात पाठवले.</verse>
				<verse number="35">म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="19">
				<verse number="1">हे प्रबोधन केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देन नदीच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला.</verse>
				<verse number="2">लोकांचा समुदाय त्याच्यामागे गेला आणि त्याने त्यांना तेथे बरे केले.</verse>
				<verse number="3">त्यानंतर काही परुशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने विचारू लागले, “कोणत्याही कारणावरून पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?”</verse>
				<verse number="4">त्याने उत्तर दिले, “तुम्ही हे वाचले नाही काय?: त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना सुरुवातीला स्त्री व पुरुष असे निर्माण केले,</verse>
				<verse number="5">त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.</verse>
				<verse number="6">परिणामी ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.”</verse>
				<verse number="7">ते त्याला म्हणाले, “तर मग सूटपत्र देऊन तिला सोडून द्यावे, असा कायदा मोशेने कसा दिला?”</verse>
				<verse number="8">तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला तुमच्या बायका सोडून देण्याची परवानगी दिली, पण प्रारंभी तसे नव्हते.</verse>
				<verse number="9">मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”</verse>
				<verse number="10">शिष्य त्याला म्हणाले, “पत्नीच्या बाबतीत पुरुषाची जबाबदारी अशी असली तर लग्न न केलेले बरे.”</verse>
				<verse number="11">तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांच्याकरता ते देण्यात आले आहे, तेच ते स्वीकारू शकतात;</verse>
				<verse number="12">कारण लग्न न करण्याची विविध कारणे आहेतः काही जणांची जन्मतःच अशी जडणघडण झालेली असते की, ते लग्न करू शकत नाहीत; काही जणांना माणसांनी तसे बदलले म्हणून लग्न करता येत नाही आणि इतर काही जण स्वर्गाच्या राज्यासाठी लग्न करत नाहीत. ज्याला हे स्वीकारता येते, त्याने स्वीकारावे.”</verse>
				<verse number="13">येशूने लहान मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी त्या लोकांना दटावले.</verse>
				<verse number="14">येशू म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”</verse>
				<verse number="15">त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर तो तेथून निघून गेला.</verse>
				<verse number="16">एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्‍वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?”</verse>
				<verse number="17">तो त्याला म्हणाला, “चांगले म्हणजे काय ह्याविषयी मला का विचारतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”</verse>
				<verse number="18">तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस,</verse>
				<verse number="19">तुझ्या वडिलांचा व तुझ्या आईचा सन्मान कर आणि जशी स्वतःवर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”</verse>
				<verse number="20">तो युवक त्याला म्हणाला, “मी हे सर्व पाळले आहे; माझ्यात अजून काय उणे आहे?”</verse>
				<verse number="21">येशू त्याला म्हणाला, “तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा. तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझा शिष्य हो.”</verse>
				<verse number="22">पण हे ऐकून तो युवक खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याच्याकडे फार संपत्ती होती.</verse>
				<verse number="23">नंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, स्वर्गाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!</verse>
				<verse number="24">मी पुन्हा तुम्हांला सांगतो, धनवानाने देवाच्या राज्यात जाणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”</verse>
				<verse number="25">हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”</verse>
				<verse number="26">परंतु येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे. देवाला मात्र सर्व काही शक्य आहे.”</verse>
				<verse number="27">पेत्राने उत्तरादाखल त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळेल?”</verse>
				<verse number="28">येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, नव्या उत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.</verse>
				<verse number="29">तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्‍वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल.</verse>
				<verse number="30">तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.</verse>
			</chapter>
			<chapter number="20">
				<verse number="1">स्वर्गाचे राज्य त्याच्या द्राक्षमळ्यात मजूर लावण्यासाठी पहाटे बाहेर पडलेल्या घरधन्यासारखे आहे.</verse>
				<verse number="2">त्याने रोजची नेहमीची मजुरी ठरवून मजुरांना त्याच्या द्राक्षमळ्यात पाठवले.</verse>
				<verse number="3">त्यानंतर तो नऊच्या सुमारास बाहेर गेला तेव्हा त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले.</verse>
				<verse number="4">तो त्यांना म्हणाला, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ म्हणून ते गेले.</verse>
				<verse number="5">पुन्हा बाराच्या व तीनच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले.</verse>
				<verse number="6">मग पाचच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’</verse>
				<verse number="7">ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही.” त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात कामाला जा.’</verse>
				<verse number="8">संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “कामगारांना बोलाव आणि शेवटी आलेल्या कामगारापासून सुरुवात करून पहिल्यापर्यंत सर्वांना मजुरी दे.’</verse>
				<verse number="9">जे पाचच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना संपूर्ण दिवसाची मजुरी मिळाली.</verse>
				<verse number="10">जे पहिले आले होते त्यांना आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले. पण त्यांनाही तेवढीच मिळाली.</verse>
				<verse number="11">ती घेतल्यावर ते घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हणाले,</verse>
				<verse number="12">‘ह्या शेवटी आलेल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हांला व त्यांना आपण सारखीच मजुरी दिली.’</verse>
				<verse number="13">त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, “मित्रा, मी तुझ्यावर अन्याय करत नाही, तू माझ्याबरोबर मजुरीचा करार केला होतास ना?</verse>
				<verse number="14">तू आपली मजुरी घेऊन नीघ. जसे तुला तसे ह्या शेवटच्या कामगारालाही द्यावे, अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="15">जे माझे आहे, त्याचे मी माझ्या मर्जीप्रमाणे करायला स्वतंत्र नाही काय? अथवा मी उदार आहे, हे तुझ्या डोळ्यात सलते काय?’</verse>
				<verse number="16">अशा प्रकारे शेवटचे ते पहिले व पहिले ते शेवटचे होतील.”</verse>
				<verse number="17">येशू यरुशलेमकडे जायला निघाला असताना त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले,</verse>
				<verse number="18">“पाहा, आपण यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील,</verse>
				<verse number="19">निर्भर्त्सना करायला, फटके मारायला व क्रुसावर चढवायला ते त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील व तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.”</verse>
				<verse number="20">त्या वेळी जब्दीची पत्नी तिच्या मुलांसह येशूकडे येऊन त्याला नमन करून त्याच्याकडून काही मागू लागली.</verse>
				<verse number="21">त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे स्थान मिळेल, असे जाहीर करा.”</verse>
				<verse number="22">येशू म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे, तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.”</verse>
				<verse number="23">त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. तर त्या जागा ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.”</verse>
				<verse number="24">हे ऐकून इतर दहा शिष्य त्या दोघा भावांवर संतापले.</verse>
				<verse number="25">परंतु येशूने त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="26">पण तुमचे तसे नसावे. जो तुमच्यामध्ये थोर होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे</verse>
				<verse number="27">आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा दास व्हावे.</verse>
				<verse number="28">जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”</verse>
				<verse number="29">येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला.</verse>
				<verse number="30">तेव्हा येशू जवळून जात आहे, हे ऐकून रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”</verse>
				<verse number="31">त्यांनी गप्प राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले, परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”</verse>
				<verse number="32">येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?”</verse>
				<verse number="33">ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.”</verse>
				<verse number="34">येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले.</verse>
			</chapter>
			<chapter number="21">
				<verse number="1">ते यरुशलेमजवळ आले असता ऑलिव्ह डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले,</verse>
				<verse number="2">“तुम्ही समोरच्या गावात जा. तेथे लगेच तुम्हांला एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू बांधलेले आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे आणा.</verse>
				<verse number="3">तुम्हांला कोणी काही म्हटले तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे’, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.”</verse>
				<verse number="4">संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे:</verse>
				<verse number="5">सियोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’</verse>
				<verse number="6">शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले.</verse>
				<verse number="7">त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला.</verse>
				<verse number="8">लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या.</verse>
				<verse number="9">पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”</verse>
				<verse number="10">तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?”</verse>
				<verse number="11">लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.”</verse>
				<verse number="12">येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली</verse>
				<verse number="13">आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”</verse>
				<verse number="14">तेथे आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले.</verse>
				<verse number="15">त्याने केलेले चमत्कार पाहून व “दावीदपुत्राचा गौरव असो!”, असा जयघोष करणारी मुले मंदिरात पाहून मुख्य याजक व शास्त्री संतापले</verse>
				<verse number="16">आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”</verse>
				<verse number="17">नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला.</verse>
				<verse number="18">सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली,</verse>
				<verse number="19">म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले!</verse>
				<verse number="20">ते पाहून शिष्यांनी आश्‍चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”</verse>
				<verse number="21">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल.</verse>
				<verse number="22">तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल, ते सर्व तुम्हांला मिळेल.”</verse>
				<verse number="23">येशू मंदिरात शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन विचारू लागले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”</verse>
				<verse number="24">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही मला उत्तर दिले तर कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करतो, ते मीही तुम्हांला सांगेन.</verse>
				<verse number="25">योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून?” ते आपसात चर्चा करू लागले, “देवाकडून म्हणावे तर तो आपल्याला म्हणेल, “मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’</verse>
				<verse number="26">बरे, माणसाकडून म्हणावे, तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला संदेष्टा मानतात.”</verse>
				<verse number="27">तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करत आहे, ते मीही तुम्हांला सांगणार नाही.</verse>
				<verse number="28">तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाकडे जाऊन म्हणाला, “मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’</verse>
				<verse number="29">त्याने उत्तर दिले, “जातो, बाबा.’ पण तो गेला नाही.</verse>
				<verse number="30">मग धाकट्या मुलाकडे जाऊन त्या मनुष्याने तसेच म्हटले. तो म्हणाला, “मी नाही जाणार.’ तरी पण नंतर आपला विचार बदलून तो गेला.</verse>
				<verse number="31">ह्या दोघांतून कोणी त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “धाकट्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत.</verse>
				<verse number="32">कारण योहान नीतिमत्वाच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; शिवाय हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असा पश्‍चात्ताप नंतरही तुम्हांला झाला नाही.</verse>
				<verse number="33">आणखी एक दाखला ऐकून घ्या. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला. त्यानंतर तो द्राक्षमळा कुळांकडे खंडाने देऊन तो स्वतः परदेशी गेला.</verse>
				<verse number="34">फळांचा हंगाम आल्यावर त्याने त्याचे फळ घेण्याकरता आपल्या दासांना कुळांकडे पाठवले.</verse>
				<verse number="35">त्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोकले, कोणाला ठार मारले व कोणाला धोंडमार केला.</verse>
				<verse number="36">पुन्हा त्याने पहिल्यापेक्षा अधिक दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले.</verse>
				<verse number="37">‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’, असा विचार करून द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी त्याच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले.</verse>
				<verse number="38">परंतु मुलाला पाहून कुळे आपसात म्हणाली, “हा तर वारस आहे, चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ.’</verse>
				<verse number="39">त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले.</verse>
				<verse number="40">आता हे सांगा, द्राक्षमळ्याचा धनी येईल, तेव्हा तो त्या कुळांचे काय करील?”</verse>
				<verse number="41">ते येशूला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जी कुळे हंगामाच्या वेळी त्याला फळ देतील, अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल.”</verse>
				<verse number="42">येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय?</verse>
				<verse number="43">म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल.</verse>
				<verse number="44">जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. परंतु ज्या कुणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकील.”</verse>
				<verse number="45">मुख्य याजक व परुशी ह्यांनी हा दाखला ऐकला तेव्हा तो त्यांना उद्देशून सांगितला होता, हे त्यांच्या ध्यानात आले.</verse>
				<verse number="46">तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण लोक त्याला संदेष्टा मानत होते.</verse>
			</chapter>
			<chapter number="22">
				<verse number="1">येशू पुन्हा त्यांना दाखले देऊ लागला.</verse>
				<verse number="2">तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले.</verse>
				<verse number="3">लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात.</verse>
				<verse number="4">पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, आमंत्रितांना असे सांगा, “पाहा, मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.’</verse>
				<verse number="5">तरी पण हे मनावर न घेता त्यांच्यापैकी कोणी आपल्या शेतात, तर कोणी व्यापाराला गेले.</verse>
				<verse number="6">बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना ठार मारले.</verse>
				<verse number="7">हे ऐकून राजा संतापला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे शहर जाळून टाकले.</verse>
				<verse number="8">त्यानंतर तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी झाली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते.</verse>
				<verse number="9">म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’</verse>
				<verse number="10">त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरेबाईट असे जितके आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप लोकांनी भरून गेला.</verse>
				<verse number="11">परंतु राजा पाहुण्यांना भेटायला आला तेव्हा लग्नसमारंभास साजेसे कपडे न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.</verse>
				<verse number="12">तो त्याला म्हणाला, “मित्रा, लग्नाचा पोषाख न घालता तू येथे कसा आलास?’ त्याला काही उत्तर देता येईना.</verse>
				<verse number="13">नंतर राजाने नोकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’</verse>
				<verse number="14">बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडे आहेत.”</verse>
				<verse number="15">नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली.</verse>
				<verse number="16">त्यांनी त्यांच्या शिष्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवून विचारले, “गुरुजी, आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात आणि सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता. आपण कोणाची भीड बाळगत नाही आणि व्यक्तीचे तोंड पाहून बोलत नाही.</verse>
				<verse number="17">आपल्याला काय वाटते, हे आम्हांला सांगा. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही?”</verse>
				<verse number="18">येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता?</verse>
				<verse number="19">कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले.</verse>
				<verse number="20">तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?”</verse>
				<verse number="21">ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.”</verse>
				<verse number="22">हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून निघून गेले.</verse>
				<verse number="23">पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले,</verse>
				<verse number="24">“गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, जर एखादा मनुष्य मूलबाळ नसता निधन पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा.</verse>
				<verse number="25">आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली.</verse>
				<verse number="26">अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले</verse>
				<verse number="27">आणि सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली.</verse>
				<verse number="28">तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.”</verse>
				<verse number="29">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.</verse>
				<verse number="30">पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.</verse>
				<verse number="31">मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय?</verse>
				<verse number="32">‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.”</verse>
				<verse number="33">हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला.</verse>
				<verse number="34">येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले.</verse>
				<verse number="35">त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले,</verse>
				<verse number="36">“गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?”</verse>
				<verse number="37">येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’</verse>
				<verse number="38">ही महान व पहिली आज्ञा आहे.</verse>
				<verse number="39">हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’</verse>
				<verse number="40">ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”</verse>
				<verse number="41">परुशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले,</verse>
				<verse number="42">“ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा वंशज आहे?” ते त्याला म्हणाले, “दावीदचा.”</verse>
				<verse number="43">त्याने त्यांना म्हटले, “तर मग पवित्र आत्म्याने त्याला प्रभू असे म्हणण्याची प्रेरणा दावीदला कशी दिली?</verse>
				<verse number="44">दावीद म्हणाला: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’</verse>
				<verse number="45">दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?”</verse>
				<verse number="46">कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही आणि त्या दिवसापासून त्याला आणखी प्रश्न विचारायला कोणीही धजला नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="23">
				<verse number="1">नंतर येशू लोकसमुदायाला व त्याच्या शिष्यांना म्हणाला,</verse>
				<verse number="2">“शास्त्री व परुशी मोशेच्या आसनावर बसले आहेत.</verse>
				<verse number="3">म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतात, ते सर्व पाळा व करा, परंतु ते वागतात तसे तुम्ही वागू नका, कारण ते सांगतात तसे ते स्वतः करत नाहीत.</verse>
				<verse number="4">जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर लादतात परंतु ती वाहायला ते स्वतः बोटही लावत नाहीत.</verse>
				<verse number="5">ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात.</verse>
				<verse number="6">मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे,</verse>
				<verse number="7">बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून ‘गुरुजी, गुरुजी’, म्हणवून घेणे त्यांना आवडते.</verse>
				<verse number="8">तुम्ही मात्र स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व बंधू आहात.</verse>
				<verse number="9">पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे.</verse>
				<verse number="10">तसेच स्वतःला नेता म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय.</verse>
				<verse number="11">उलट, तुमच्यामध्ये जो सर्वांत थोर असेल, त्याने तुमचा सेवक व्हावे.</verse>
				<verse number="12">जो कोणी स्वतःला उच्च करील त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करील त्याला उच्च केले जाईल.</verse>
				<verse number="13">अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतः आत जात नाही व जे आत जात आहेत त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही.</verse>
				<verse number="14">[अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करता. ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]</verse>
				<verse number="15">अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही एक शिष्य मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या दुप्पट असा नरकपुत्र बनवता.</verse>
				<verse number="16">अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता की, कोणी मंदिराची शपथ घेतली, तर त्यात काही वावगे नाही. परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली, तर मात्र ती त्याला बंधनकारक ठरते.</verse>
				<verse number="17">अहो मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? ते सोने की ज्याच्यामुळे ते पवित्र झाले ते मंदिर?</verse>
				<verse number="18">तुम्ही म्हणता की, कोणी वेदीची शपथ घेतली, तर त्यात काही अयोग्य नाही. परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर ती त्याला बंधनकारक ठरते.</verse>
				<verse number="19">अहो आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? अर्पण की अर्पण पवित्र करणारी ती वेदी?</verse>
				<verse number="20">म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे, त्याची शपथ घेतो.</verse>
				<verse number="21">जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो.</verse>
				<verse number="22">जो स्वर्गाची शपथ घेतो, तो परमेश्‍वराच्या राजासनाची व त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो.</verse>
				<verse number="23">अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व श्रद्धा ह्यांकडे दुर्लक्ष करता. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्यादेखील तुम्ही करायच्या होत्या.</verse>
				<verse number="24">अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता!</verse>
				<verse number="25">अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतून ती अत्याचार व असंयम ह्यांनी भरलेली आहे.</verse>
				<verse number="26">अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल.</verse>
				<verse number="27">अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून त्या मेलेल्यांच्या हाडांनी व घाणीने भरलेल्या असतात.</verse>
				<verse number="28">तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात.</verse>
				<verse number="29">अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता</verse>
				<verse number="30">आणि दावा करता, “आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’</verse>
				<verse number="31">ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता.</verse>
				<verse number="32">तर मग, तुमच्या पूर्वजांचे कृत्य तुम्ही पूर्ण करा.</verse>
				<verse number="33">अहो सापांनो आणि सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?</verse>
				<verse number="34">पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो, तुम्ही त्यांच्यातील काही जणांना ठार माराल व क्रुसावर खिळाल आणि इतरांना तुम्ही तुमच्या सभास्थानांत फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल.</verse>
				<verse number="35">म्हणून नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर सांडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर येईल.</verse>
				<verse number="36">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या सर्व कृत्यांची शिक्षा आजच्या पिढीला भोगावी लागेल.</verse>
				<verse number="37">यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या नगरी, तुझ्याकडे पाठवलेल्यांवर धोंडमार करणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची माझी कितीदा तरी इच्छा होती. पण तू मला तसे करू दिले नाहीस.</verse>
				<verse number="38">पाहा, तुमचे घर तुम्हांला सोडून द्यावे लागेल आणि ते ओस पडेल.</verse>
				<verse number="39">कारण मी तुम्हांला सांगतो, आतापासून पुढे, “जो प्रभूच्या नावाने येत आहे, तो धन्य’ असे तुम्ही म्हणू लागाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="24">
				<verse number="1">येशू मंदिरातून बाहेर पडत असता त्याचे शिष्य मंदिराच्या इमारती दाखवायला त्याच्याजवळ आले.</verse>
				<verse number="2">येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला निक्षून सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की, जो पाडला जाणार नाही.”</verse>
				<verse number="3">तो ऑलिव्ह डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे खाजगीत येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा घडतील आणि तुमच्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.”</verse>
				<verse number="4">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध असा.”</verse>
				<verse number="5">पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’, असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील.</verse>
				<verse number="6">तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही.</verse>
				<verse number="7">राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील.</verse>
				<verse number="8">हा तर वेदनांचा प्रारंभ असेल.</verse>
				<verse number="9">तेव्हा तुमचे हाल करण्याकरता तुम्हांला धरून नेण्यात येईल व तुम्हांला ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील.</verse>
				<verse number="10">त्या वेळी पुष्कळ जण श्रद्धेपासून ढळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील.</verse>
				<verse number="11">अनेक खोटे संदेष्टे अनेकांना फसवतील.</verse>
				<verse number="12">दुष्टपणा वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.</verse>
				<verse number="13">परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचा उद्धार होईल.</verse>
				<verse number="14">सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून देवराज्याच्या ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली जाईल आणि नंतर शेवट होईल.</verse>
				<verse number="15">दानिएल संदेष्ट्याद्वारे नमूद केलेले ओसाड अमंगल दुश्‍चिन्ह पवित्र स्थानात तुम्ही पाहाल. (वाचकाने ह्याचा अर्थ समजून घ्यावा.)</verse>
				<verse number="16">जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.</verse>
				<verse number="17">जो छपरावर असेल, त्याने त्याच्या घरातून काही वस्तू बाहेर काढायला खाली उतरू नये.</verse>
				<verse number="18">जो शेतात असेल त्याने त्याचे कपडे घेण्याकरता परत जाऊ नये.</verse>
				<verse number="19">त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील व ज्या अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!</verse>
				<verse number="20">हिवाळ्यात किंवा साबाथ दिवशी तुमची धावपळ होऊ नये म्हणून प्रार्थना करा.</verse>
				<verse number="21">जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आली नाही व पुढे कधीही येणार नाही, अशी भीषण आपत्ती त्या वेळी येईल.</verse>
				<verse number="22">ते दिवस कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. परंतु निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.</verse>
				<verse number="23">त्या वेळी जर कोणी तुम्हांला म्हणेल, “पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे’,तर ते खरे मानू नका.</verse>
				<verse number="24">कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील.</verse>
				<verse number="25">सावध राहा. मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे.</verse>
				<verse number="26">कोणी तुम्हांला म्हणतील, “पाहा, तो अरण्यात आहे’, तर जाऊ नका, किंवा ‘तो एका आतील ठिकाणी लपलेला आहे’, तर ते खरे मानू नका.</verse>
				<verse number="27">जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकत जाते, तशा प्रकारे मनुष्याचा पुत्र येईल.</verse>
				<verse number="28">जेथे मढे, तेथे गिधाडे.</verse>
				<verse number="29">त्या दिवसांतील संकटांनंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल. चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातल्या शक्ती डळमळतील.</verse>
				<verse number="30">त्यानंतर मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील व ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने व महान वैभवाने येताना पाहतील.</verse>
				<verse number="31">कर्ण्याच्या नादाबरोबर तो त्याच्या दूतांना चोहीकडे पाठवील व ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करतील.</verse>
				<verse number="32">अंजिराच्या झाडापासून एक दाखला शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते.</verse>
				<verse number="33">त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल.</verse>
				<verse number="34">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.</verse>
				<verse number="35">आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.</verse>
				<verse number="36">त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ माझ्या पित्याला माहीत आहे.</verse>
				<verse number="37">नोहाच्या दिवसांत घडले होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.</verse>
				<verse number="38">जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत, नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुष लग्न करत होते व लग्न लावून देत होते</verse>
				<verse number="39">आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.</verse>
				<verse number="40">त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल.</verse>
				<verse number="41">जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैंकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.</verse>
				<verse number="42">म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही.</verse>
				<verse number="43">परंतु कोणत्या प्रहरी चोर येईल, हे घरधन्याला कळले असते, तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.</verse>
				<verse number="44">तर मग तुम्हीही जागृत राहा; कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.</verse>
				<verse number="45">असा कोण विश्वासू व सुज्ञ दास आहे की, ज्याला त्याचा धनी त्याच्या परिवाराला योग्य वेळी भोजन देण्यासाठी नेमतो?</verse>
				<verse number="46">त्याचा धनी येईल त्यावेळी जो दास, कार्यमग्न असलेला आढळेल, तो धन्य!</verse>
				<verse number="47">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्याला तो आपल्या सर्व मालमत्तेवर नेमील.</verse>
				<verse number="48">परंतु धनी यायला विलंब लागेल, असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल</verse>
				<verse number="49">व त्याच्या साथीदारांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल</verse>
				<verse number="50">तर तो अपेक्षा करत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन</verse>
				<verse number="51">धन्याची सेवा करण्याचे केवळ ढोंग करणाऱ्या दासांमध्ये त्याला हाकलून लावील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.</verse>
			</chapter>
			<chapter number="25">
				<verse number="1">स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल. त्या त्यांचे दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या.</verse>
				<verse number="2">त्यांत पाच मूर्ख व पाच शहाण्या होत्या.</verse>
				<verse number="3">मूर्ख कुमारिकांनी त्यांचे दिवे घेतले पण त्यांच्याबरोबर तेल घेतले नाही.</verse>
				<verse number="4">शहाण्यांनी त्यांचे दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले.</verse>
				<verse number="5">वराला विलंब लागला व सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली.</verse>
				<verse number="6">मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’</verse>
				<verse number="7">त्या सर्व मुली उठून आपापले दिवे नीट करू लागल्या.</verse>
				<verse number="8">मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’</verse>
				<verse number="9">शहाण्यांनी उत्तर दिले, “नाही. आम्हांला व तुम्हांला पुरेल एवढे तेल आमच्याकडे नाही. तुम्ही स्वतःकरता तेल विकत घेऊन या.’</verse>
				<verse number="10">त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.</verse>
				<verse number="11">नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’</verse>
				<verse number="12">त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’</verse>
				<verse number="13">तुम्ही जागृत राहा कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.</verse>
				<verse number="14">स्वर्गाचे राज्य असे असेल: परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलावून त्यांच्याकडे त्याची मालमत्ता सोपवून दिली.</verse>
				<verse number="15">एकाला त्याने पाच हजार सुवर्ण मोहरा, दुसऱ्याला दोन हजार मोहरा तर तिसऱ्याला एक हजार मोहरा अशा ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्या आणि तो परदेशी गेला.</verse>
				<verse number="16">ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या.</verse>
				<verse number="17">तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या,</verse>
				<verse number="18">परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला.</verse>
				<verse number="19">बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला.</verse>
				<verse number="20">ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’</verse>
				<verse number="21">त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’</verse>
				<verse number="22">त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’</verse>
				<verse number="23">त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’</verse>
				<verse number="24">ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता.</verse>
				<verse number="25">म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’</verse>
				<verse number="26">त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना?</verse>
				<verse number="27">तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’</verse>
				<verse number="28">तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या.</verse>
				<verse number="29">कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्याकडून काढून घेतले जाईल</verse>
				<verse number="30">आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’</verse>
				<verse number="31">जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल.</verse>
				<verse number="32">त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि मेंढपाळ जसे शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळी करील.</verse>
				<verse number="33">नीतिमान लोकांना तो त्याच्या उजवीकडे व इतरांना डावीकडे ठेवील.</verse>
				<verse number="34">मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या.</verse>
				<verse number="35">कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले;</verse>
				<verse number="36">उघडा होतो, तेव्हा मला वस्त्र दिले; आजारी होतो, तेव्हा माझी काळजी घेतली; तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’</verse>
				<verse number="37">त्या वेळी नीतिमान त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही कधी तुम्हांला खायला दिले? केव्हा तुम्हांला प्यायला दिले?</verse>
				<verse number="38">केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले?</verse>
				<verse number="39">तुमच्या कोणत्या आजारपणात आम्ही काळजी घेतली? आणि कोणत्या तुरुंगात आम्ही तुम्हांला भेटायला आलो?’</verse>
				<verse number="40">राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले, त्याअर्थी ते माझ्यासाठी केले.’</verse>
				<verse number="41">त्यानंतर डावीकडच्यांनाही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघून सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अनंत अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा.</verse>
				<verse number="42">कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले नाही.</verse>
				<verse number="43">परका होतो, तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही; आजारी व तुरुंगात होतो, तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.’</verse>
				<verse number="44">त्या वेळेस तेदेखील त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी, किंवा तुरुंगात पाहिले आणि तुम्हांला साहाय्य केले नाही?’</verse>
				<verse number="45">तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खरोखर सांगतो, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकाला साहाय्य करायचे तुम्ही नाकारले, त्याअर्थी तुम्ही मला साहाय्य करायचे नाकारले.’</verse>
				<verse number="46">तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.”</verse>
			</chapter>
			<chapter number="26">
				<verse number="1">येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले,</verse>
				<verse number="2">“तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी ओलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र क्रुसावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.”</verse>
				<verse number="3">त्यानंतर कयफा नावाच्या उच्च याजेकांच्या वाड्यात मुख्य याजक व वडील जन जमले.</verse>
				<verse number="4">येशूला कपटाने धरून ठार मारावे, अशी त्यांनी मसलत केली.</verse>
				<verse number="5">मात्र ते म्हणाले, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.”</verse>
				<verse number="6">येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता,</verse>
				<verse number="7">एक स्त्री फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली.</verse>
				<verse number="8">हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला?</verse>
				<verse number="9">हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.”</verse>
				<verse number="10">परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.</verse>
				<verse number="11">गरीब नेहमी तुमच्याबरोबर असतील परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.</verse>
				<verse number="12">हिने माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले, ते माझ्या उत्तरकार्यासाठी केले आहे.</verse>
				<verse number="13">मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”</verse>
				<verse number="14">नंतर बारा जणांपैकी एक, यहुदा इस्कर्योत, मुख्य याजकांकडे गेला</verse>
				<verse number="15">आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.</verse>
				<verse number="16">तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.</verse>
				<verse number="17">बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूला विचारू लागले, “आपणाकरता ओलांडण सणाचे भोजन आम्ही कोठे तयार करावे, अशी आपली इच्छा आहे?”</verse>
				<verse number="18">त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, “माझी वेळ येऊन ठेपली आहे. मी बारा जणांबरोबर तुमच्या येथे ओलांडण सण साजरा करीन.’”</verse>
				<verse number="19">म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडण सणाचे भोजन तयार केले.</verse>
				<verse number="20">संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर भोजनास बसला.</verse>
				<verse number="21">ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”</verse>
				<verse number="22">ते फार अस्वस्थ झाले. एकामागून एक अशा प्रकारे प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभो, मी तर नाही ना?”</verse>
				<verse number="23">त्याने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर वाटीत हात घालत आहे, तोच मला धरून देईल.</verse>
				<verse number="24">मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे झाले असते!”</verse>
				<verse number="25">त्याला धरून देणाऱ्या यहुदाने विचारले, “गुरुजी, तो मी आहे का?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तसेच.”</verse>
				<verse number="26">ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.”</verse>
				<verse number="27">नंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या.</verse>
				<verse number="28">हे माझे कराराचे रक्‍त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरता ओतले आहे.</verse>
				<verse number="29">मी तुम्हांला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईन तोपर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”</verse>
				<verse number="30">त्यानंतर एक गीत गाऊन ते ऑलिव्ह डोंगरावर निघून गेले.</verse>
				<verse number="31">नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्या रात्री मला सोडून पळून जाल कारण असे लिहिले आहे, “मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’</verse>
				<verse number="32">परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.”</verse>
				<verse number="33">पेत्राने त्याला उत्तर दिले, “जरी सगळे आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”</verse>
				<verse number="34">येशूने त्याला म्हटले, “मी तुला निश्चितपणे सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”</verse>
				<verse number="35">पेत्र येशूला म्हणाला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही तेच म्हटले.</verse>
				<verse number="36">नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”</verse>
				<verse number="37">त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला.</verse>
				<verse number="38">“माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून</verse>
				<verse number="39">काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”</verse>
				<verse number="40">मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय?</verse>
				<verse number="41">तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”</verse>
				<verse number="42">त्याने दुसऱ्यांदा पुढे जाऊन प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, मी प्यायल्याशिवाय हा प्याला दूर केला जाणार नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”</verse>
				<verse number="43">त्याने पुन्हा येऊन पाहिले, तर ते झोपलेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते.</verse>
				<verse number="44">त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.</verse>
				<verse number="45">त्यानंतर तो त्याच्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पाहा! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे.</verse>
				<verse number="46">उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”</verse>
				<verse number="47">येशू बोलत आहे इतक्यात, बारांमधील एक जण म्हणजे यहुदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडचा एक जमाव तलवारी व सोटे घेऊन आला होता.</verse>
				<verse number="48">येशूला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.’</verse>
				<verse number="49">यहुदाने लगेच येशूजवळ येऊन, “गुरुवर्य, नमस्कार”, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.</verse>
				<verse number="50">येशूने त्याला म्हटले, “मित्रा, ज्याकरता तू आलास ते लवकर उरक.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूला धरले व त्याला अटक केली.</verse>
				<verse number="51">येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने आपली तलवार उपसली व उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला.</verse>
				<verse number="52">तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार तिच्या जागी परत घाल; कारण तलवार हाती घेणारे सर्व जण तलवारीने मारले जातील.</verse>
				<verse number="53">तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि तो लगेच मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?</verse>
				<verse number="54">पण असे झाले, तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, असे म्हणणारे धर्मशास्त्रलेख कसे पूर्ण होतील?”</verse>
				<verse number="55">त्या घटकेस येशू लोकसमुदायाला म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरायला तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही.</verse>
				<verse number="56">मात्र संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” त्या वेळी सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.</verse>
				<verse number="57">येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते.</verse>
				<verse number="58">परंतु पेत्र त्याच्यामागे काही अंतर ठेवून उच्च याजकांच्या वाड्यापर्यंत गेला व आत जाऊन शेवट काय होतो, हे पाहायला कामगारांमध्ये जाऊन बसला.</verse>
				<verse number="59">मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती.</verse>
				<verse number="60">परंतु बरेच खोटे साक्षीदार जमले असताही तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. शेवटी दोघे जण पुढे येऊन म्हणाले,</verse>
				<verse number="61">“‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.”</verse>
				<verse number="62">उच्च याजक उठून येशूला म्हणाले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?”</verse>
				<verse number="63">तथापि येशू काही बोलला नाही. तेव्हा उच्च याजकांनी पुन्हा त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”</verse>
				<verse number="64">येशू त्यांना म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”</verse>
				<verse number="65">त्या वेळी उच्च याजकांनी त्यांचीं वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे, आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? आत्ता तुम्ही ह्याचे दुर्भाषण ऐकले आहे.</verse>
				<verse number="66">तुमचा निर्णय काय?” त्यांनी उत्तर दिले, “हा मरणदंडाला पात्र आहे.”</verse>
				<verse number="67">ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले,</verse>
				<verse number="68">“अरे ख्रिस्ता, संदेष्टा म्हणून आम्हांला सांग, तुला कोणी मारले?”</verse>
				<verse number="69">इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”</verse>
				<verse number="70">परंतु तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.”</verse>
				<verse number="71">तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.”</verse>
				<verse number="72">पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.”</verse>
				<verse number="73">काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यांच्यापैकी आहेस; कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे कळते.”</verse>
				<verse number="74">तो स्वतःला शाप देत व शपथ वाहत म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला!</verse>
				<verse number="75">‘कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील’, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर गेला व भावनाविवश होऊन रडला.</verse>
			</chapter>
			<chapter number="27">
				<verse number="1">भल्या पहाटे सर्व मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी येशूला ठार मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले.</verse>
				<verse number="2">त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले.</verse>
				<verse number="3">येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला,</verse>
				<verse number="4">“मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.”</verse>
				<verse number="5">त्याने ती नाणी मंदिरात टाकली. तो निघून गेला व त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.</verse>
				<verse number="6">परंतु मुख्य याजकांनी ती नाणी गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे धर्मशास्त्राला धरून नाही; कारण हे रक्‍ताचे मोल आहे.”</verse>
				<verse number="7">त्यांनी आपसात विचारविनिमय करून त्या नाण्यांतून परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.</verse>
				<verse number="8">त्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात.</verse>
				<verse number="9">जे वचन यिर्मया संदेष्ट्याद्वारे सांगितले होते, ते त्या वेळी पूर्ण झाले. ते असे: ज्याचे मोल इस्राएलच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले होते, त्याचे मोल म्हणजे ती तीस चांदीची नाणी त्यांनी घेतली</verse>
				<verse number="10">आणि परमेश्वराने मला निर्देश दिल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी ती वापरली.</verse>
				<verse number="11">येशूला रोमन राज्यपालांच्या पुढे उभे केले असता राज्यपालांनी त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.”</verse>
				<verse number="12">परंतु मुख्य याजक व वडीलजन हे त्याच्यावर दोषारोप करत असता तो काहीच बोलला नाही.</verse>
				<verse number="13">तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे किती गोष्टींची तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, हे तुला ऐकू येत नाही काय?”</verse>
				<verse number="14">परंतु त्याने एकाही आरोपाबद्दल काही उत्तर दिले नाही, ह्याचे राज्यपालांना फार आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="15">ओलांडण सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची राज्यपालांची प्रथा होती.</verse>
				<verse number="16">त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता.</verse>
				<verse number="17">लोक जमल्यावर पिलातने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की, ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?”</verse>
				<verse number="18">यहुदी अधिकाऱ्यांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे त्याला ठाऊक होते.</verse>
				<verse number="19">तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला, “त्या निर्दोष मनुष्याच्या बाबतीत आपण मध्ये पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.’</verse>
				<verse number="20">इकडे मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूला मरणदंड मिळावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.</verse>
				<verse number="21">परंतु राज्यपालांनी त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.”</verse>
				<verse number="22">पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”</verse>
				<verse number="23">नंतर त्याने विचारले, “का बरे? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरडा करत म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”</verse>
				<verse number="24">आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गदारोळ होत आहे, असे पाहून पिलातने पाणी घेतले व लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या मनुष्याच्या रक्‍ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”</verse>
				<verse number="25">सर्व लोकांनी उत्तर दिले, “त्याचे रक्‍त आम्हांवर व आमच्या मुलाबाळांवर असो.”</verse>
				<verse number="26">तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.</verse>
				<verse number="27">नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली.</verse>
				<verse number="28">त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याला जांभळा झगा घातला</verse>
				<verse number="29">आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून ते उपहासाने म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!”</verse>
				<verse number="30">ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले.</verse>
				<verse number="31">अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून तो झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला घेऊन गेले.</verse>
				<verse number="32">ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले.</verse>
				<verse number="33">ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले.</verse>
				<verse number="34">तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही.</verse>
				<verse number="35">त्याला क्रुसावर खिळल्यानंतर त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.</verse>
				<verse number="36">नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले.</verse>
				<verse number="37">त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे.</verse>
				<verse number="38">त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे.</verse>
				<verse number="39">जवळून जाणारे येणारे डोकी हालवत येशूची निंदा करत होते,</verse>
				<verse number="40">“अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास, तर स्वतःचा बचाव कर आणि क्रुसावरून खाली उतर.”</verse>
				<verse number="41">तसेच मुख्य याजकदेखील शास्त्री व वडीलजन ह्यांच्याबरोबर त्याचा उपहास करत म्हणाले,</verse>
				<verse number="42">“त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्राएलचा राजा आहे. त्याने आता क्रुसावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवू.</verse>
				<verse number="43">तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.”</verse>
				<verse number="44">जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली.</verse>
				<verse number="45">दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला</verse>
				<verse number="46">आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”</verse>
				<verse number="47">तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलियाला हाक मारतो.”</verse>
				<verse number="48">त्यांच्यातून एकाने त्वरित धावत जाऊन स्पंज घेतला, तो आंबेत भिजवला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला.</verse>
				<verse number="49">इतर म्हणाले, “थांब, एलिया त्याचा बचाव करायला येतो का, हे आपण पाहू.”</verse>
				<verse number="50">नंतर येशूने पुन्हा मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला!</verse>
				<verse number="51">त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली. खडक फुटले.</verse>
				<verse number="52">थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले.</verse>
				<verse number="53">ते थडग्यांतून निघून येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र शहरात गेले आणि अनेकांच्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="54">रोमन अधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.”</verse>
				<verse number="55">तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या.</verse>
				<verse number="56">त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसे ह्यांची आई मरिया व जब्दीची पत्नी ह्यांचा समावेश होता.</verse>
				<verse number="57">संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता.</verse>
				<verse number="58">त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला.</verse>
				<verse number="59">म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले.</verse>
				<verse number="60">ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.</verse>
				<verse number="61">तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या.</verse>
				<verse number="62">दुसऱ्या दिवशी म्हणजेच साबाथच्या दिवशी, मुख्य याजक व परुशी पिलातसमोर जमून म्हणाले,</verse>
				<verse number="63">“महाराज, तो लबाड जिवंत होता तेव्हा म्हणाला होता, “तीन दिवसांनंतर मी उठेन’, ह्याची आम्हांला आठवण आहे.</verse>
				<verse number="64">म्हणून आपण तिसऱ्या दिवसापर्यंत कबरीचा बंदोबस्त करायला सांगा, नाही तर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे, असे लोकांना सांगतील. मग शेवटची फसगत पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”</verse>
				<verse number="65">पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारेकऱ्यांची तुकडी आहे. जा. तुम्ही शक्य तेवढा बंदोबस्त करा.”</verse>
				<verse number="66">तेव्हा तुकडी बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी शिळा शिक्काबंद करून कबरीवर पहारा ठेवला.</verse>
			</chapter>
			<chapter number="28">
				<verse number="1">साबाथनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहायला आल्या.</verse>
				<verse number="2">त्या समयी पाहा, भयंकर भूकंप झाला. प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन शिळा एकीकडे लोटली आणि तो तिच्यावर बसला.</verse>
				<verse number="3">त्याचे रूप आकाशातील विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.</verse>
				<verse number="4">त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.</verse>
				<verse number="5">परंतु देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “भिऊ नका. तुम्ही क्रुसावर खिळलेल्या येशूचा शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="6">तो येथे नाही, त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या. त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.</verse>
				<verse number="7">तर मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, “तो मेलेल्यांतून उठला आहे, पाहा, तो तुमच्या आधी आता गालीलमध्ये जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल!’ पाहा, मी तुम्हांला सांगितले आहे.”</verse>
				<verse number="8">तेव्हा लगेच त्या स्त्रिया भीतीने परंतु अत्यंत आनंदाने कबरीजवळून निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत जात असता</verse>
				<verse number="9">येशू त्यांना वाटेत अचानक भेटून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याची आराधना केली.</verse>
				<verse number="10">येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.”</verse>
				<verse number="11">त्या स्त्रिया जात असता, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी शहरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले.</verse>
				<verse number="12">त्यांनी व वडीलजनांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले,</verse>
				<verse number="13">“‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’, असे तुम्ही म्हटले पाहिजे.</verse>
				<verse number="14">ही गोष्ट राज्यपालांच्या कानांवर गेली तर तुम्ही निर्दोष आहात, अशी आम्ही त्यांची समजूत घालू आणि तुम्हांला संरक्षण देऊ.”</verse>
				<verse number="15">त्यांनी पैसे घेतले व त्यांना शिकवल्याप्रमाणे केले. ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत प्रचलित आहे.</verse>
				<verse number="16">इकडे येशूचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूने त्यांना जायला सांगितले होते, त्यावर गेले.</verse>
				<verse number="17">त्यांनी त्याला तेथे पाहून त्याची आराधना केली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांना शंका आली.</verse>
				<verse number="18">तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.</verse>
				<verse number="19">म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.</verse>
				<verse number="20">जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="41">
			<chapter number="1">
				<verse number="1">देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ:</verse>
				<verse number="2">यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील.</verse>
				<verse number="3">अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’</verse>
				<verse number="4">त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला.</verse>
				<verse number="5">यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.</verse>
				<verse number="6">योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते.</verse>
				<verse number="7">तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.</verse>
				<verse number="8">मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.”</verse>
				<verse number="9">त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला.</verse>
				<verse number="10">लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे.</verse>
				<verse number="11">आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”</verse>
				<verse number="12">आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले.</verse>
				<verse number="13">तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते.</verse>
				<verse number="14">योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला,</verse>
				<verse number="15">“काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.”</verse>
				<verse number="16">एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते.</verse>
				<verse number="17">येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”</verse>
				<verse number="18">ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.</verse>
				<verse number="19">तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते.</verse>
				<verse number="20">त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.</verse>
				<verse number="21">येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले.</verse>
				<verse number="22">त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे.</verse>
				<verse number="23">त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य आला</verse>
				<verse number="24">आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.”</verse>
				<verse number="25">येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.”</verse>
				<verse number="26">भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले.</verse>
				<verse number="27">सर्व लोक इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? ही काय नवीन शिकवण आहे? हा भुतांनाही अधिकाराने आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात.”</verse>
				<verse number="28">ही त्याची कीर्ती गालीलच्या परिसरात सर्वत्र वेगाने पसरली.</verse>
				<verse number="29">सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले.</verse>
				<verse number="30">शिमोनची सासू तापाने खाटेवर पडली होती. तिच्याविषयी त्यांनी येशूला ताबडतोब सांगितले.</verse>
				<verse number="31">तो तिच्याजवळ गेला व त्याने तिला हात धरून उठवले. तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.</verse>
				<verse number="32">संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतग्रस्त लोकांना त्याच्याकडे आणले.</verse>
				<verse number="33">सगळे नगर दाराशी लोटले.</verse>
				<verse number="34">नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूतग्रस्तांना मुक्त केले. त्या भुतांनी येशूला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.</verse>
				<verse number="35">दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला.</verse>
				<verse number="36">परंतु शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध घेऊ लागले.</verse>
				<verse number="37">तो भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध घेत आहेत.”</verse>
				<verse number="38">परंतु तो त्यांना म्हणाला, “आपण आसपासच्या गावांत जायला हवे. मला तेथेही प्रबोधन केले पाहिजे कारण ह्याच उद्देशाने मी आलो आहे.”</verse>
				<verse number="39">म्हणूनच त्यांच्या सभास्थानांत प्रबोधन करत व भुते काढत तो सबंध गालीलमध्ये फिरला.</verse>
				<verse number="40">एकदा एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली, तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”</verse>
				<verse number="41">येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.”</verse>
				<verse number="42">लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.</verse>
				<verse number="43">येशूने त्याला बजावून सांगितल्यानंतर लगेच पाठवून दिले.</verse>
				<verse number="44">तो त्याला म्हणाला, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि तू बरा झाला आहेस ह्याचा लोकांना पुरावा म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”</verse>
				<verse number="45">परंतु त्याने तेथून जाताना ती गोष्ट इतकी पसरवली आणि तिला प्रसिद्धी दिली की, येशूला उघडपणे कोणत्याही नगरात जाता येईना, म्हणून तो बाहेर रानात एकांत ठिकाणीच राहिला आणि लोक सगळीकडून त्याच्याकडे येत राहिले.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">काही दिवसांनी येशू पुन्हा कफर्णहूममध्ये आला. तो घरी आहे, असे लोकांच्या कानी पडले.</verse>
				<verse number="2">तेथे इतके लोक जमले की, त्यांना दारातदेखील जागा होईना. तो त्यांना संदेश देत होता.</verse>
				<verse number="3">त्या वेळी एका पक्षाघाती माणसाला चौघांनी उचलून त्याच्याकडे आणले.</verse>
				<verse number="4">गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी काढले आणि जागा करून ज्या खाटेवर तो पक्षाघाती पडून होता ती त्यांनी खाली सोडली.</verse>
				<verse number="5">त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “माझ्या मुला, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”</verse>
				<verse number="6">कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनांत असा विचार आला की,</verse>
				<verse number="7">हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?</verse>
				<verse number="8">ते स्वतःशी असा विचार करत आहेत, हे येशूने लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही तुमच्या मनात असे विचार का आणता?</verse>
				<verse number="9">पक्षाघाती माणसाला ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ, तुझी खाट उचलून चालू लाग’, असे म्हणणे, अधिक सोपे आहे?</verse>
				<verse number="10">परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर केलेल्या पापांची क्षमा करायचा अधिकार आहे, हे मी तुम्हांला दाखवून देतो.” म्हणून तो पक्षाघाती माणसाला म्हणाला,</verse>
				<verse number="11">“मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.”</verse>
				<verse number="12">तो उठला व लगेच त्याची खाट उचलून सर्वांच्या समक्ष निघाला. हे पाहून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते!”</verse>
				<verse number="13">येशू तेथून निघून गालील सरोवराच्या किनाऱ्यावर गेला तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. येशूने त्यांना प्रबोधन केले.</verse>
				<verse number="14">तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकात नाक्यावर बसलेला दिसला. त्याला येशूने म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला.</verse>
				<verse number="15">नंतर येशू त्याच्या घरी जेवायला बसला असता, तेथे पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूच्या मागे आले आणि तेदेखील येशू व त्याच्या शिष्यांबरोबर पंक्‍तीस बसले.</verse>
				<verse number="16">त्याला जकातदार व पापी लोकांबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील काही शास्त्र्यांनी त्याच्या शिष्यांना विचारले, “हा अशा लोकांबरोबर का जेवतो?”</verse>
				<verse number="17">हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”</verse>
				<verse number="18">त्या वेळी योहानचे शिष्य व परुशी उपवास करत होते. तेव्हा काही लोकांनी येऊन येशूला विचारले, “योहानचे व परुश्यांचे शिष्य उपवास करतात परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, हे कसे काय?”</verse>
				<verse number="19">येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्याना उपवास करता येईल का? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.</verse>
				<verse number="20">परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून दूर नेला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपवास करतील.</verse>
				<verse number="21">नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही. तसे केले तर नीट करण्याकरता लावलेले ठिगळ जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते.</verse>
				<verse number="22">नवा द्राक्षारस कोणी जुन्या बुधल्यांत भरत नाही, भरला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस वाया जातो व बुधले निकामी होतात, म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरला पाहिजे.”</verse>
				<verse number="23">एकदा येशू साबाथ दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटेत कणसे तोडू लागले.</verse>
				<verse number="24">तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”</verse>
				<verse number="25">तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे कधी वाचले नाही का की, दावीदला जेव्हा गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले?</verse>
				<verse number="26">आणि अब्याथार उच्च याजक असता, तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व त्याच्याबरोबर जे होते त्यांनाही कशा दिल्या?”</verse>
				<verse number="27">नंतर तो त्यांना म्हणाला, “साबाथ मनुष्यासाठी केला गेला; मनुष्य साबाथसाठी नव्हे.</verse>
				<verse number="28">म्हणून मनुष्याचा पुत्र साबाथचाही प्रभू आहे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">येशू पुन्हा एकदा सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता.</verse>
				<verse number="2">येशूवर दोष ठेवावा म्हणून साबाथ दिवशी तो त्याला बरे करतो का, हे पाहायला काही लोक टपून बसले होते.</verse>
				<verse number="3">त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, समोर उभा राहा.”</verse>
				<verse number="4">नंतर त्याने लोकांना विचारले, “साबाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते धर्मशास्त्रानुसार आहे?” पण ते गप्प राहिले.</verse>
				<verse number="5">त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे खिन्न होऊन त्याने त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा झाला.</verse>
				<verse number="6">मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले.</verse>
				<verse number="7">त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला</verse>
				<verse number="8">आणि यरुशलेम, इदोम व यार्देनच्या पलीकडचा विभाग, तसेच सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा परिसर, ह्यांतून मोठा लोकसमुदाय येशूच्या महान कार्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.</verse>
				<verse number="9">गर्दीमुळे स्वतः चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवायला सांगितले.</verse>
				<verse number="10">त्याने अनेकांना बरे केले होते आणि जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करायला एकमेकांना ढकलत त्याच्याकडे जात होते.</verse>
				<verse number="11">जेव्हा भुते त्याला पाहत तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, “तू देवाचा पुत्र आहेस.”</verse>
				<verse number="12">मात्र तो भुतांना ताकीद देऊन सांगत असे, “मला प्रकट करू नका.”</verse>
				<verse number="13">येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले.</verse>
				<verse number="14">आपल्याबरोबर राहण्यासाठी व संदेश द्यायला पाठवण्यासाठी, तसेच रोग बरे करायचा व भुते काढायचा अधिकार देण्यासाठी, त्याने बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित म्हणूनही संबोधिले. त्याने पुढील बारा जणांची नेमणूक केली:शिमोन (येशूने त्याला पेत्र हे नाव दिले);</verse>
				<verse number="15"></verse>
				<verse number="16"></verse>
				<verse number="17">जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले);</verse>
				<verse number="18">अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी</verse>
				<verse number="19">व येशूचा विश्वासघात करणारा यहुदा इस्कर्योत.</verse>
				<verse number="20">नंतर येशू घरी आला, तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, येशूला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड होईना.</verse>
				<verse number="21">हे ऐकून त्याचे आप्त त्याला घेऊन जायला आले कारण त्याला वेड लागले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते.</verse>
				<verse number="22">तसेच यरुशलेमहून आलेले काही शास्त्री म्हणत होते की, त्याला बालजबूलने पछाडले आहे व त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने तो भुते काढतो.</verse>
				<verse number="23">तो त्यांना स्वतःजवळ बोलावून दाखले देऊन म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील?</verse>
				<verse number="24">आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही.</verse>
				<verse number="25">आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही.</verse>
				<verse number="26">तसेच सैतानाच्या राज्यात फूट पडली तर तेही टिकणार नाही; त्याचा शेवट होईल.</verse>
				<verse number="27">बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही, त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.</verse>
				<verse number="28">मी तुम्हांला खरोखर सांगतो, लोकांना त्यांच्या सर्व पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल.</verse>
				<verse number="29">परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.”</verse>
				<verse number="30">त्याला भुताने पछाडले आहे, असे काही लोक म्हणत होते म्हणून त्याने हे उत्तर दिले.</verse>
				<verse number="31">येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले.</verse>
				<verse number="32">त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “आपली आई व आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारपूस करत आहेत.”</verse>
				<verse number="33">त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”</verse>
				<verse number="34">जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!</verse>
				<verse number="35">जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते.</verse>
				<verse number="2">तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला,</verse>
				<verse number="3">“ऐका, एक पेरणारा पेरणी करायला निघाला.</verse>
				<verse number="4">तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते पक्ष्यांनी खाऊन टाकले.</verse>
				<verse number="5">काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले.</verse>
				<verse number="6">सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले.</verse>
				<verse number="7">काही बी काटेरी झुडपांत पडले. काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटली म्हणून त्याला पीक आले नाही.</verse>
				<verse number="8">परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.”</verse>
				<verse number="9">पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!”</verse>
				<verse number="10">येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले.</verse>
				<verse number="11">त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या राज्याचे रहस्य तुम्हांला समजावून दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते.</verse>
				<verse number="12">अशासाठी की, त्यांनी पाहावे पण त्यांना आकलन होऊ नये; ऐकून घ्यावे पण त्यांना समजू नये; म्हणजे त्यांनी देवाकडे पुन्हा वळू नये व त्यांना क्षमा मिळू नये.”</verse>
				<verse number="13">त्याने त्यांना पुढे विचारले, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग इतर दाखले तुम्हांला कसे समजतील?</verse>
				<verse number="14">पेरणारा वचन पेरतो.</verse>
				<verse number="15">काही लोक वाटेवर पडलेल्या वचनासारखे आहेत. त्यांनी वचन ऐकल्याबरोबर सैतान येतो व त्यांच्यात पेरलेले वचन हिरावून घेतो.</verse>
				<verse number="16">इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात.</verse>
				<verse number="17">पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात.</verse>
				<verse number="18">इतर काही लोक काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखे आहेत. ते वचन ऐकून घेतात.</verse>
				<verse number="19">परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.</verse>
				<verse number="20">आणखी काही लोक चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकून ते स्वीकारतात आणि कोणी तीसपट, कोणी साठपट, तर कोणी शंभरपट असे पीक देतात.”</verse>
				<verse number="21">आणखी त्याने त्यांना विचारले, “दिवा मापाखाली किंवा खाटेखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?</verse>
				<verse number="22">जे गुप्त ठेवण्यात आले आहे, ते प्रकट केले जाईल; जे झाकून ठेवण्यात आले आहे, ते उघड केले जाईल.</verse>
				<verse number="23">ज्याला ऐकण्यासाठी कान असतील, त्याने ऐकावे!”</verse>
				<verse number="24">पुढे तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हांला दिले जाईल आणि त्याहीपेक्षा अधिक दिले जाईल;</verse>
				<verse number="25">कारण ज्याच्याकडे आहे, त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही, त्याचे असेल नसेल तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल.”</verse>
				<verse number="26">आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो,</verse>
				<verse number="27">रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही.</verse>
				<verse number="28">जमीन आपोआप पीक देते - प्रथम अंकुर, मग कणीस, नंतर कणसात भरलेला दाणा.</verse>
				<verse number="29">पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.”</verse>
				<verse number="30">येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?</verse>
				<verse number="31">ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला,</verse>
				<verse number="32">तरी पेरल्यावर उगवून सर्व रोपट्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की, आकाशातील पक्ष्यांना त्याच्या सावलीत वसती करता येते.”</verse>
				<verse number="33">असे पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्‍तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे.</verse>
				<verse number="34">दाखल्याशिवाय तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तरी पण एकान्ती तो त्याच्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.</verse>
				<verse number="35">त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.”</verse>
				<verse number="36">शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते.</verse>
				<verse number="37">अचानक तेथे मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळू लागल्या की, तो पाण्याने भरू लागला.</verse>
				<verse number="38">मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?”</verse>
				<verse number="39">त्याने उठून उभे राहून वाऱ्याला हुकूम सोडला, “निवांत हो!” आणि लाटांना म्हटले, “शांत व्हा!” वारा पडला व अगदी निवांत झाले.</verse>
				<verse number="40">त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्‍वास ठेवत नाही काय?”</verse>
				<verse number="41">ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.”</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले.</verse>
				<verse number="2">तो मचव्यातून उतरताच एक भूतग्रस्त माणूस दफनभूमीतून निघून त्याला भेटला.</verse>
				<verse number="3">तो दफनभूमीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते</verse>
				<verse number="4">कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड व बेड्या तोडल्या होत्या. त्याला काबूत ठेवणे कुणालाही शक्य नव्हते.</verse>
				<verse number="5">तो नेहमी रात्रंदिवस दफनभूमीत व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी स्वतःचे अंग ठेचून घेत असे.</verse>
				<verse number="6">येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला</verse>
				<verse number="7">आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परमोच्च परमेश्वराच्या पुत्रा, माझ्याकडून तुला काय हवे आहे? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”</verse>
				<verse number="8">तो असे म्हणाला कारण येशू म्हणत होता, “अरे भुता, ह्या माणसातून नीघ.”</verse>
				<verse number="9">येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.</verse>
				<verse number="10">आम्हांला ह्या प्रदेशातून घालवू नकोस”,अशी तो येशूला कळकळीने विनंती करीत होता.</verse>
				<verse number="11">तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.</verse>
				<verse number="12">भुतांनी येशूला विनंती केली, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून आम्हांला पाठवून दे.”</verse>
				<verse number="13">त्याने त्यांना परवानगी दिली. ती भुते निघून डुकरांत शिरली. सुमारे दोन हजार डुकरांचा तो संपूर्ण कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मेला.</verse>
				<verse number="14">डुकरे राखणारे पळाले व त्यांनी नगरात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले, हे पाहायला लोक आले.</verse>
				<verse number="15">ते येशूजवळ आल्यावर ज्यात सैन्य होते तो भूतग्रस्त बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांना भीती वाटली.</verse>
				<verse number="16">घडलेला प्रकार ज्यांनी पाहिला होता, त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकिकत त्यांना सांगितली.</verse>
				<verse number="17">तेव्हा “आपण आमच्या परिसरातून निघून जावे”, असे ते येशूला विनवू लागले.</verse>
				<verse number="18">येशू मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, “मला आपल्याबरोबर राहू द्या.”</verse>
				<verse number="19">परंतु त्याने नकार देऊन त्याला म्हटले, “तू आपल्या घरी आप्तजनांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढे महान कार्य केले व तुझ्यावर कशी दया केली, हे त्यांना सांग.”</verse>
				<verse number="20">तो निघाला आणि येशूने जे महान कार्य त्याच्यासाठी केले होते, ते दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. हे पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले.</verse>
				<verse number="21">येशू मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे परत गेल्यावर त्याच्याभोवती सरोवराजवळ लोकांचा विशाल समुदाय जमला.</verse>
				<verse number="22">तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला.</verse>
				<verse number="23">त्याने येशूला कळकळीने विनंती केली, “माझी लहान मुलगी अत्यंत आजारी आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”</verse>
				<verse number="24">तो त्याच्याबरोबर निघाला. पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती चोहीकडून गर्दी करत होते.</verse>
				<verse number="25">बारा वर्षे रक्‍तस्रावाने पीडलेली एक स्त्री तेथे होती.</verse>
				<verse number="26">तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून इलाज करून घेताना स्वतःजवळ होते नव्हते, ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचा रोग बळावला होता.</verse>
				<verse number="27">तिने येशूविषयी ऐकले होते म्हणून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला तिने स्पर्श केला,</verse>
				<verse number="28">कारण ती म्हणत असे, “केवळ ह्याच्या वस्त्रांना मी स्पर्श केला तरी मी बरी होईन.”</verse>
				<verse number="29">तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला आणि लगेच तिचा रक्‍तस्राव थांबला व आपण स्वतःच्या पीडेपासून बरे झालो आहोत, अशी तिला जाणीव झाली.</verse>
				<verse number="30">स्वतःमधून शक्‍ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”</verse>
				<verse number="31">त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’”</verse>
				<verse number="32">जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले.</verse>
				<verse number="33">ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीतभीत व थरथर कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तान्त सांगितला.</verse>
				<verse number="34">तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त हो.”</verse>
				<verse number="35">तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही जण येऊन त्याला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास का देता?”</verse>
				<verse number="36">परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्‍त विश्वास ठेव.”</verse>
				<verse number="37">नंतर त्याने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही स्वतःबरोबर येऊ दिले नाही.</verse>
				<verse number="38">ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व विलाप करणारे लोक ह्यांचा गलबला चाललेला येशूने पाहिला.</verse>
				<verse number="39">तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.”</verse>
				<verse number="40">ते त्याला हसू लागले, परंतु त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. मुलीचे आईवडील व स्वतःबरोबरचे तीन शिष्य ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो गेला.</verse>
				<verse number="41">मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम”, ह्याचा अर्थ “लहान मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”</verse>
				<verse number="42">लगेच ती मुलगी उठून चालू लागली. ती बारा वर्षांची होती. घडलेला हा प्रकार पाहून ते अत्यंत आश्‍चर्यचकित झाले.</verse>
				<verse number="43">मात्र हे कोणाला कळता कामा नये, असे त्याने त्यांना निक्षून सांगितले व तिला खायला द्या, असे म्हटले.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">येशू तेथून स्वतःच्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.</verse>
				<verse number="2">साबाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला. पुष्कळ लोक त्याचे प्रबोधन ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे? आणि ह्याच्या हातून काय ही सामर्थ्यशाली कृत्ये घडतात?</verse>
				<verse number="3">मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन ह्यांचा भाऊ, तो हा सुतार ना? ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे म्हणत त्यांनी त्याचा अव्हेर केला.</verse>
				<verse number="4">येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या स्वतःच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या कुटुंबीयांत त्याचा सन्मान होत नसतो.”</verse>
				<verse number="5">काही रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. ह्याशिवाय त्याला तेथे काही करता आले नाही.</verse>
				<verse number="6">त्यांच्या अविश्वासाचे त्याला आश्‍चर्य वाटले. त्यानंतर तो प्रबोधन करीत गावोगावी फिरला.</verse>
				<verse number="7">बारा जणांना स्वतःच्या जवळ बोलावून त्यांना जोडीजोडीने पाठवताना येशूने त्यांना भुतांवर अधिकार दिला.</verse>
				<verse number="8">त्याने त्यांना आदेश दिला, “प्रवासासाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका. भाकर, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका.</verse>
				<verse number="9">चपला घालून चाला, दुसरा अंगरखा घालू नका.”</verse>
				<verse number="10">आणखी तो त्यांना म्हणाला, “जेथे तुमचे स्वागत केले जाईल, त्या घरी ते ठिकाण सोडेपर्यंत राहा.</verse>
				<verse number="11">ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना त्यांना इशारा देण्याच्या उद्देशाने आपल्या तळपायांची धूळ तेथेच झटकून टाका.”</verse>
				<verse number="12">ते तेथून निघाले व लोकांनी पापांपासून परावृत्त व्हावे, असा त्यांनी उपदेश केला.</verse>
				<verse number="13">त्यांनी अनेक भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले.</verse>
				<verse number="14">हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा देणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून तो महत्कृत्ये करत आहे.”</verse>
				<verse number="15">तर काही लोक म्हणत, “हा एलिया आहे”; आणखी काही जण म्हणत, “हा संदेष्टा, म्हणजे पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक आहे.”</verse>
				<verse number="16">हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानचा मी शिरच्छेद केला, तो मरणातून उठला आहे.”</verse>
				<verse number="17">हेरोदचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते</verse>
				<verse number="18">व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.”</verse>
				<verse number="19">ह्यासाठी हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करायला पाहत होती. परंतु तिचे काही चालेना.</verse>
				<verse number="20">योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे, हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐकायचा, तेव्हा फार अस्वस्थ व्हायचा, तरीही त्याचे म्हणणे ऐकायला त्याला आवडत असे.</verse>
				<verse number="21">शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली.</verse>
				<verse number="22">तेव्हा हेरोदियाच्या मुलीने स्वतः तेथे येऊन नृत्य करून हेरोद व त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले पाहुणे ह्यांना खूष केले. त्या वेळी राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे, ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.”</verse>
				<verse number="23">तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”</verse>
				<verse number="24">तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.”</verse>
				<verse number="25">तिने लगेच घाईघाईने राजाकडे येऊन म्हटले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे.”</verse>
				<verse number="26">राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना.</verse>
				<verse number="27">राजाने लगेच त्याच्या रक्षकांतील एका शिपायास पाठवून योहानचे शिर आणण्याचा आदेश दिला. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला.</verse>
				<verse number="28">शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले.</verse>
				<verse number="29">हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला.</verse>
				<verse number="30">प्रेषित येशूजवळ परत आले व त्यांनी जे काही केले व शिकवले, ते सर्व त्याला सांगितले.</verse>
				<verse number="31">तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवायलादेखील सवड होईना म्हणून तो त्यांना म्हणाला, “चला, आपण एकान्त ठिकाणी जाऊ या, म्हणजे तेथे तुम्हांला थोडा विसावा घेता येईल.”</verse>
				<verse number="32">तेंव्हा ते मचव्यातून एकान्त स्थळी गेले.</verse>
				<verse number="33">पुष्कळ लोकांनी त्यांना निघताना पाहिले व लगेच त्यांना ओळखले. तेथल्या सर्व नगरांतून लोक त्वरेने पायीच निघाले व त्यांच्या आधी तिकडे पोहोचले.</verse>
				<verse number="34">येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला.</verse>
				<verse number="35">दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे.</verse>
				<verse number="36">लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”</verse>
				<verse number="37">त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन चांदीच्या दोनशे नाण्यांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ?”</verse>
				<verse number="38">तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, शिवाय दोन मासे.”</verse>
				<verse number="39">त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले.</verse>
				<verse number="40">ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्‍तीपंक्‍तीने बसले,</verse>
				<verse number="41">येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले.</verse>
				<verse number="42">सर्व जण जेवून तृप्त झाले.</verse>
				<verse number="43">त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.</verse>
				<verse number="44">भोजन घेणाऱ्या पुरुषांची संख्या पाच हजार होती.</verse>
				<verse number="45">‘मी लोकसमुदायाला निरोप देतो. तुम्ही मचव्यातून सरोवरापलीकडे बेथसैदा येथे जा’, असे सांगून त्याने लगेच शिष्यांना पुढे पाठवले.</verse>
				<verse number="46">लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.</verse>
				<verse number="47">सायंकाळ झाली, तेव्हा तो मचवा सरोवरात होता व येशू एकटाच जमिनीवर होता.</verse>
				<verse number="48">शिष्य वल्ही मारतामारता हैराण झालेले त्याने पाहिले, कारण वारा विरुद्ध दिशेने वाहत होता. भल्या पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा रोख होता.</verse>
				<verse number="49">त्याला जलाशयावरून चालताना पाहून, हे भूत आहे, असे त्यांना वाटले व ते ओरडले.</verse>
				<verse number="50">त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.”</verse>
				<verse number="51">तो त्यांच्याबरोबर मचव्यात चढला आणि वारा पडला. ते मनातल्या मनात खूपच आश्‍चर्यचकित झाले;</verse>
				<verse number="52">कारण भाकरींविषयी त्यांना काही समजले नाही, अथवा खरे म्हणजे त्यांची अंतःकरणे कठीण झाली होती.</verse>
				<verse number="53">त्यानंतर ते सरोवराच्या पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहोचले व तेथे त्यांनी मचवा बांधून ठेवला.</verse>
				<verse number="54">ते मचव्यातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले.</verse>
				<verse number="55">ते आसपासच्या परिसरात धावपळ करत फिरले व जेथे कोठे येशू आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते आजाऱ्यांना खाटेवर घालून आणू लागले.</verse>
				<verse number="56">तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, ते रुग्णांना चौकात आणून ठेवत व “आपल्या वस्त्राच्या किनारीला तरी स्पर्श करू द्या”, अशी त्याला विनंती करत. जितक्यांनी त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तितके बरे झाले.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले.</verse>
				<verse number="2">त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते.</verse>
				<verse number="3">परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या रूढीला अनुसरून हात धुतल्यावाचून जेवत नसत.</verse>
				<verse number="4">बाजारातून आणलेल्या वस्तू प्रथम धुतल्याशिवाय ते खात नसत. तसेच पेले, घागरी व पितळेची भांडी धुणे, अशा बऱ्याच इतर रूढी ते पाळत असत.</verse>
				<verse number="5">म्हणूनच परुश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे ते का चालत नाहीत?”</verse>
				<verse number="6">त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने योग्य भाकीत करून ठेवले आहे. त्याचा लेख असा: हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.</verse>
				<verse number="7">ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते धर्मशास्त्र म्हणून मनुष्यांचे नियम शिकवतात.</verse>
				<verse number="8">तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.”</verse>
				<verse number="9">नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही तुमची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडता!</verse>
				<verse number="10">कारण मोशेने सांगितले आहे, ‘तू आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’</verse>
				<verse number="11">परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या वडिलांना अथवा आईला म्हणाला, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे देवाला अर्पण केले आहे’,</verse>
				<verse number="12">तर तुम्ही त्याला आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काही करण्यापासून सूट देता.</verse>
				<verse number="13">अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”</verse>
				<verse number="14">त्यानंतर येशूने लोकसमुदायाला पुन्हा जवळ बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या.</verse>
				<verse number="15">बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते, तेच त्याला अशुद्ध करते.</verse>
				<verse number="16">[ज्याला कान आहेत त्याने ऐकावे.”]</verse>
				<verse number="17">तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या विधानाचे स्पष्टीकरण विचारले.</verse>
				<verse number="18">तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते, ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय?</verse>
				<verse number="19">कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व नंतर शरीराबाहेर जाते.” [अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.]</verse>
				<verse number="20">आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते, तेच माणसाला अशुद्ध करते,</verse>
				<verse number="21">कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट कल्पना निघतात.</verse>
				<verse number="22">व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा,</verse>
				<verse number="23">ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला अशुद्ध करतात.”</verse>
				<verse number="24">येशू तेथून निघून सोर प्रदेशात गेला. तेथे तो एका घरात गेला, हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते.</verse>
				<verse number="25">उलट, जिच्या लहान मुलीला भुताने पछाडले होते, अशा एका बाईने त्याच्याविषयी ऐकले व ती लगेच येऊन त्याच्या पाया पडली.</verse>
				<verse number="26">ती बाई ग्रीक व सुरफुनीकी वंशाची होती. तिने त्याला विनंती केली, “माझ्या मुलीतून भूत काढा.”</verse>
				<verse number="27">परंतु तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.”</verse>
				<verse number="28">तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून पडलेला मेजाखालचा चुरा खातात.”</verse>
				<verse number="29">तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”</verse>
				<verse number="30">ती तिच्या घरी गेली, तेव्हा मुलगी अंथरुणावर पडलेली आहे व भूत निघून गेले आहे, असे तिला आढळून आले.</verse>
				<verse number="31">येशू सोर प्रदेशातून निघाला आणि सिदोनमधून दकापलीस प्रांतातून गालील सरोवराकडे परत आला.</verse>
				<verse number="32">लोकांनी एका बहिऱ्या व तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून त्याने त्याच्यावर हात ठेवावा, अशी त्याला विनंती केली.</verse>
				<verse number="33">येशूने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला</verse>
				<verse number="34">आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने दीर्घ उसासा टाकला व म्हटले, “इफ्फाथा”, म्हणजे “मोकळा हो.”</verse>
				<verse number="35">तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंध तत्काळ सुटून तो स्पष्ट बोलू लागला.</verse>
				<verse number="36">“हे कोणाला कळवू नका”, असे येशूने लोकांना निक्षून सांगितले परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले.</verse>
				<verse number="37">ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “तो सर्व काही कसे चांगल्या प्रकारे करतो! तो बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याचीदेखील क्षमता देतो.”</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांचा विशाल समुदाय जमला होता व लोकांजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले,</verse>
				<verse number="2">“मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही.</verse>
				<verse number="3">मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेत मूर्च्छित होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”</verse>
				<verse number="4">त्याच्या शिष्यांनी विचारले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणणार?”</verse>
				<verse number="5">त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.”</verse>
				<verse number="6">त्याने लोकांना जमिनीवर बसायला सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या व आभार मानून त्या मोडल्या व वाढण्याकरता त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. त्यांनी लोकांना त्या वाढल्या.</verse>
				<verse number="7">त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले.</verse>
				<verse number="8">सर्व जण जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या.</verse>
				<verse number="9">तेथे सुमारे चार हजार लोक होते. त्यानंतर येशूने लोकांना निरोप दिला</verse>
				<verse number="10">आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला.</verse>
				<verse number="11">एकदा काही परुशी येऊन येशूबरोबर वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले.</verse>
				<verse number="12">अंतर्यामी व्यथित होऊन तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, ह्या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.”</verse>
				<verse number="13">तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे जायला निघाला.</verse>
				<verse number="14">शिष्य भाकरी घ्यायला विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते.</verse>
				<verse number="15">येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर व हेरोदचे खमीर ह्यांच्यापासून जपून राहा.”</verse>
				<verse number="16">तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो हे सांगत आहे, अशी ते आपसात चर्चा करू लागले.</verse>
				<verse number="17">हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याची चर्चा का करता? अजून तुमच्या ध्यानात कसे येत नाही आणि अजून तुम्हांला कसे समजत नाही? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?</verse>
				<verse number="18">डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय?</verse>
				<verse number="19">मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.”</verse>
				<verse number="20">“तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते म्हणाले, “सात.”</verse>
				<verse number="21">तेव्हा त्याने विचारले, “अजून तुम्हांला समजत नाही काय?”</verse>
				<verse number="22">येशू व त्याचे शिष्य बेथसैदा येथे आले. तेथे लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणले व त्याने त्याला स्पर्श करावा, अशी विनंती केली.</verse>
				<verse number="23">त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकी लावून त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?”</verse>
				<verse number="24">तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत, असे वाटते, परंतु ती मला चालत असलेल्या झाडांसारखी दिसत आहेत”,</verse>
				<verse number="25">त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले. त्या माणसाने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले.</verse>
				<verse number="26">त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.”</verse>
				<verse number="27">येशू व त्याचे शिष्य फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील खेड्यापाड्यांत जायला निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे, असे लोक म्हणतात?”</verse>
				<verse number="28">त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, आणखी काही लोक संदेष्ट्यांपैकी एक, असे म्हणतात.”</verse>
				<verse number="29">तेव्हा त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.”</verse>
				<verse number="30">तेव्हा “माझ्याविषयी कोणाला सांगू नका”, अशी त्याने त्यांना ताकीद दिली.</verse>
				<verse number="31">नंतर येशू त्याच्या शिष्यांना अशी शिकवण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावीत, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.</verse>
				<verse number="32">येशूने उघडपणे हे सर्व सांगितले आणि पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याची निर्भर्त्सना करू लागला.</verse>
				<verse number="33">त्याने वळून त्याच्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला खडसावले, “अरे सैताना, बाजूला हो!, तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”</verse>
				<verse number="34">त्याने त्याच्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे. स्वतःचा क्रूस उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.</verse>
				<verse number="35">कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.</verse>
				<verse number="36">कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ?</verse>
				<verse number="37">किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?</verse>
				<verse number="38">ह्या विश्वासहीन व दुष्ट पिढीत ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो पवित्र देवदूतांसह त्याच्या पित्याच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.”</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">येशू त्यांना पुढे म्हणाला, “मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”</verse>
				<verse number="2">सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले.</verse>
				<verse number="3">त्याची वस्त्रे इतकी चकचकीत व पांढरी शुभ्र झाली की, तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शक्य झाले नसते.</verse>
				<verse number="4">मोशे व एलिया त्यांच्या दृष्टीस पडले. ते येशूबरोबर संभाषण करत होते.</verse>
				<verse number="5">पेत्र येशूला म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आम्ही तीन मंडप उभारतो. आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”</verse>
				<verse number="6">काय बोलावे, हे त्याला सुचले नाही कारण ते फारच भयभीत झाले होते.</verse>
				<verse number="7">तेथे एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया धरली. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”</verse>
				<verse number="8">त्यांनी अकस्मात सभोवती नजर फिरवली तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ फक्त येशूशिवाय दुसरे कोणी दिसले नाहीत.</verse>
				<verse number="9">ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना बजावले की, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”</verse>
				<verse number="10">त्याचा आदेश त्यांनी मानला परंतु मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय, ह्याविषयी ते आपसात चर्चा करू लागले.</verse>
				<verse number="11">त्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?”</verse>
				<verse number="12">त्याने त्यांना उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे, तरीदेखील मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावीत व त्याचा अव्हेर केला जावा, असे त्याच्याविषयी लिहिले आहे, त्याचा अर्थ काय?</verse>
				<verse number="13">तरी पण मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आला आहे आणि लोकांना जसे वाटले तसे त्यांनी त्याचे केले, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.”</verse>
				<verse number="14">ते इतर शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर काही शास्त्री वादविवाद करत आहेत, असे त्यांना दिसून आले.</verse>
				<verse number="15">येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्‍चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला नमन केले.</verse>
				<verse number="16">त्याने शिष्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?”</verse>
				<verse number="17">लोकसमुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो आहे. ह्याला भुताने पछाडले आहे व हा बोलू शकत नाही.</verse>
				<verse number="18">जेथे जेथे ते ह्याला धरते, तेथे तेथे ते ह्याला खाली आपटते. मग ह्याच्या तोंडाला फेस येतो आणि हा दात खातो व त्याचे सर्व अंग ताठ होते. ह्याच्यातील भुताला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना ते काढता आले नाही.”</verse>
				<verse number="19">येशू म्हणाला, “अहो विश्वासहीन लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”</verse>
				<verse number="20">त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. त्या भुताने येशूला पाहताच मुलाला पिळवटून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस येऊन लोळू लागला.</verse>
				<verse number="21">येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “ह्याला असे कधीपासून होत आहे?” ते म्हणाले, “बालपणापासून.</verse>
				<verse number="22">ह्याचा नाश करावा म्हणून भुताने ह्याला पुष्कळदा अग्नीत व पाण्यात टाकले. आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हांवर दया करा व आम्हांला साहाय्य करा.”</verse>
				<verse number="23">येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.”</verse>
				<verse number="24">लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले, “माझा विश्वास आहे, पण माझा अविश्वास दूर करण्याकरता मला साहाय्य करा.”</verse>
				<verse number="25">लोक सभोवती गर्दी करीत आहेत, असे पाहून येशू त्या भुताला म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या भुता, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”</verse>
				<verse number="26">त्या भुताने किंकाळी फोडली व मुलाला जोरदार झटका देऊन खाली फेकले व ते त्याच्यातून निघाले. तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे”, असे सर्व जण म्हणू लागले.</verse>
				<verse number="27">परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला.</verse>
				<verse number="28">येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”</verse>
				<verse number="29">तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.”</verse>
				<verse number="30">येशू व त्याचे शिष्य तेथून निघाले व ते गालीलमधून जात आहेत, हे कोणास कळू नये अशी येशूची इच्छा होती;</verse>
				<verse number="31">तो त्याच्या शिष्यांना शिकवत असे, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील आणि मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.”</verse>
				<verse number="32">परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व ते त्याला विचारण्यास धजले नाहीत.</verse>
				<verse number="33">नंतर ते कफर्णहूमला आले. घरात आल्यावर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”</verse>
				<verse number="34">ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण, ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती.</verse>
				<verse number="35">त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, “जर कोणी पहिला होऊ इच्छीत असेल, तर त्याने सर्वांत शेवटचा व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”</verse>
				<verse number="36">नंतर त्याने एका लहान मुलाला घेऊन समोर उभे केले व त्याला कवटाळून तो त्यांना म्हणाला,</verse>
				<verse number="37">“जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो व जो कोणी माझा स्वीकार करतो तो केवळ माझा नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याचादेखील स्वीकार करतो.</verse>
				<verse number="38">योहानने त्याला म्हटले, “गुरुवर्य, कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना आम्ही पाहिले. त्याला आम्ही मना केले कारण तो आपला अनुयायी नव्हता.”</verse>
				<verse number="39">येशू म्हणाला, “त्याला मना करू नका कारण माझ्या नामाने अद्भुत कृत्य करील व लगेच माझी निंदा करील असा कोणी नाही.</verse>
				<verse number="40">जो आपल्या विरूद्ध नाही तो आपल्या बाजूचा आहे.</verse>
				<verse number="41">तुम्ही माझे आहात म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी प्यायला देईल तो त्याच्या पारितोषिकाला मुकणार नाही, हे मी तुम्हांला ठामपणे सांगतो.”</verse>
				<verse number="42">विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हे त्याच्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="43">तुझा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन हात असून नरकात, म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा एका हाताविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.]</verse>
				<verse number="44"></verse>
				<verse number="45">तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा एका पायाविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.]</verse>
				<verse number="46"></verse>
				<verse number="47">तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याने देवाच्या राज्यात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.</verse>
				<verse number="48"></verse>
				<verse number="49">प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल.</verse>
				<verse number="50">मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला चव कशाने आणता येईल? तुमच्यात मीठ असू द्या व तुम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहा.”</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">येशू तेथून निघून यहुदिया प्रांतात जाऊन यार्देन नदीच्या पलीकडे पोहोचला. पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि नेहमीप्रमाणे तो त्यांना प्रबोधन करू लागला.</verse>
				<verse number="2">काही परुशी त्याच्याकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, “पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?”</verse>
				<verse number="3">उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला कोणती आज्ञा दिली आहे?”</verse>
				<verse number="4">ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”</verse>
				<verse number="5">येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहिली.</verse>
				<verse number="6">परंतु निर्मितीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले.</verse>
				<verse number="7">‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील</verse>
				<verse number="8">आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत.</verse>
				<verse number="9">म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.’”</verse>
				<verse number="10">घरी परतल्यावर त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले,</verse>
				<verse number="11">तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो,</verse>
				<verse number="12">तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.”</verse>
				<verse number="13">येशूने लहान मुलांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले.</verse>
				<verse number="14">ते पाहून येशूला राग आला. तो त्यांना म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे.</verse>
				<verse number="15">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याला तेथे मुळीच प्रवेश मिळणार नाही.”</verse>
				<verse number="16">त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.</verse>
				<verse number="17">तो बाहेर पडून रस्त्याने पुढे गेल्यावर एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! शाश्वत जीवनाचे वतन मिळवता यावे म्हणून मी काय केले पाहिजे?”</verse>
				<verse number="18">येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही.</verse>
				<verse number="19">तुला आज्ञा ठाऊक आहेत:खून करू नकोस; व्यभिचार करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; फसवू नकोस; आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख.”</verse>
				<verse number="20">त्याने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.”</verse>
				<verse number="21">येशूने त्याच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने पाहिले व त्याला म्हटले, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. नंतर येऊन माझा शिष्य हो.”</verse>
				<verse number="22">परंतु हे शब्द ऐकून त्याचा चेहरा उतरला व खिन्न होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता.</verse>
				<verse number="23">येशू सभोवार आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!”</verse>
				<verse number="24">शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. तरीही येशू त्यांना पुढे म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे!</verse>
				<verse number="25">धनवानाने देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा, उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”</verse>
				<verse number="26">ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”</verse>
				<verse number="27">येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “माणसाला हे अशक्य आहे परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे.”</verse>
				<verse number="28">तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.”</verse>
				<verse number="29">येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे,</verse>
				<verse number="30">अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल.</verse>
				<verse number="31">तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.”</verse>
				<verse number="32">येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमकडे जात असताना येशू शिष्यांच्यापुढे चालत होता. शिष्य विस्मित झाले होते आणि मागोमाग येणारे लोक घाबरले होते. तो पुन्हा त्या बारा जणांना जवळ बोलावून आपल्या बाबतीत काय होणार,ते त्यांना सांगू लागला,</verse>
				<verse number="33">“ऐका, आपण यरुशलेमला जात आहोत, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील आणि नंतर परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील.</verse>
				<verse number="34">ते त्याची अवहेलना करतील. त्याच्यावर थुंकतील. त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील परंतु तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”</verse>
				<verse number="35">जब्दीचे दोन्ही मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आम्ही आपल्याकडे जे काही मागू, ते आपण आमच्यासाठी करावे, अशी आमची इच्छा आहे.”</verse>
				<verse number="36">तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”</verse>
				<verse number="37">ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसू द्यावे.”</verse>
				<verse number="38">येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकाल का?”</verse>
				<verse number="39">ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे,</verse>
				<verse number="40">पण तुम्हांला माझ्या उजवीकडे व डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.”</verse>
				<verse number="41">हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले.</verse>
				<verse number="42">हे पाहून येशूने सर्वांना जवळ बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="43">परंतु तुमचे तसे नसावे. उलट, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे</verse>
				<verse number="44">आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.</verse>
				<verse number="45">कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला व पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”</verse>
				<verse number="46">ते यरिहो येथे आले. येशू, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.</verse>
				<verse number="47">हा नासरेथकर येशू आहे, हे ऐकून तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”</verse>
				<verse number="48">त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले, पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.”</verse>
				<verse number="49">येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर, ऊठ, येशू तुला बोलावत आहे.”</verse>
				<verse number="50">तो आपल्या अंगावरचे पांघरुण टाकून उठला व येशूकडे आला.</verse>
				<verse number="51">येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरुवर्य, मला पुन्हा दिसावे.”</verse>
				<verse number="52">येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्काळ त्याला दिसू लागले आणि तो येशूच्या मागे चालू लागला.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">मग ते यरुशलेमजवळ ऑलिव्ह डोंगराजवळ, बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. त्याने त्याच्या शिष्यांपैकी दोघांना पुढे पाठवताना असे सांगितले,</verse>
				<verse number="2">“समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच तुम्हांला ज्याच्यावर कधीच कोणी बसले नाही, असे एक शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडून आणा.</verse>
				<verse number="3">तुम्ही असे का करता, असे जर कोणी तुम्हांला विचारले, तर असे सांगा की, प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेच ते परत पाठवील.”</verse>
				<verse number="4">ते निघाले. रस्त्यावर एका घराच्या दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडायला सुरुवात केली.</verse>
				<verse number="5">तेथे उभ्या असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना विचारू लागले, “तुम्ही शिंगरू का सोडता?”</verse>
				<verse number="6">येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी त्यांना उत्तर दिले आणि लोकांनी त्यांना नेऊ दिले.</verse>
				<verse number="7">त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला.</verse>
				<verse number="8">पुष्कळ लोकांनी त्यांची वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डहाळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या.</verse>
				<verse number="9">पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य!</verse>
				<verse number="10">आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्य असो! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”</verse>
				<verse number="11">येशू यरुशलेममध्ये आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहून घेतले. परंतु दिवस मावळत आहे, हे पाहून तो बारा जणांबरोबर बेथानीस निघून गेला.</verse>
				<verse number="12">दुसऱ्या दिवशी ते बेथानी येथून निघाल्यानंतर त्याला भूक लागली.</verse>
				<verse number="13">पानांनी भरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. कदाचित झाडावर काही मिळेल, ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.</verse>
				<verse number="14">येशू त्या झाडाला म्हणाला, “कोणी ह्यापुढे तुझे फळ कधी न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.</verse>
				<verse number="15">ते यरुशलेम येथे पोहोचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना तो बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली.</verse>
				<verse number="16">त्याने कोणालाही मंदिराच्या आवारातून कसल्याही प्रकारची ने-आण करू दिली नाही.</verse>
				<verse number="17">नंतर तो त्यांना शिकवू लागला व म्हणाला, “‘माझ्या मंदिराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनागृह म्हणतील’, असा धर्मशास्त्रलेख आहे ना! पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”</verse>
				<verse number="18">मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी ते योजना आखू लागले; कारण सर्व लोक त्याच्या प्रबोधनावरून थक्क झाल्यामुळे ते त्याला भीत होते.</verse>
				<verse number="19">संध्याकाळी येशू व त्याचे शिष्य शहर सोडून गेले.</verse>
				<verse number="20">दुसऱ्या दिवशी पहाटेस वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले.</verse>
				<verse number="21">तेव्हा पेत्राला त्याची आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे!”</verse>
				<verse number="22">येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्‍वास ठेवा.</verse>
				<verse number="23">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा’, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे अवश्य घडेल, असा विश्‍वास धरील, त्याच्याकरता ते केले जाईल.</verse>
				<verse number="24">म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता, ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्‍वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.</verse>
				<verse number="25">आणखी, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्यांना क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करील.</verse>
				<verse number="26">[परंतु तुम्ही जर क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची तुम्हांला क्षमा करणार नाही.]”</verse>
				<verse number="27">ते पुन्हा यरुशलेम येथे आले. येशू मंदिरात चालत असताना मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,</verse>
				<verse number="28">“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”</verse>
				<verse number="29">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मी तुम्हांला सांगेन.</verse>
				<verse number="30">योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून? ह्याचे मला उत्तर द्या.”</verse>
				<verse number="31">ते आपसात विचार करू लागले. ‘देवाकडून म्हणावे तर तो म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’</verse>
				<verse number="32">माणसांकडून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला खरोखर संदेष्टा मानतात.”</verse>
				<verse number="33">म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मीही तुम्हांला सांगत नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">येशू दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला, “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. द्राक्षारसासाठी कुंड खणले. पहाऱ्यासाठी माळा बांधला आणि द्राक्षमळा कुळांकडे सोपवून तो परदेशात निघून गेला.</verse>
				<verse number="2">पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला कुळांकडून द्राक्षमळ्याच्या फळांतून आपला वाटा मिळावा म्हणून त्याने एका नोकराला कुळांकडे पाठवले.</verse>
				<verse number="3">त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकाम्या हातांनी परत पाठवले.</verse>
				<verse number="4">पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्याच्या डोक्यावर इजा करून त्याचा अपमान केला.</verse>
				<verse number="5">त्याने आणखी एकाला पाठवले. त्याला तर त्यांनी ठार मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यांतून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांना ठार मारले.</verse>
				<verse number="6">अजून त्याच्याजवळ एक जण उरला होता. तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाचा तरी ते मान राखतील, म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले.</verse>
				<verse number="7">परंतु ती कुळे आपसात म्हणाली, ‘हा तर वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’</verse>
				<verse number="8">त्यांनी त्याला धरून ठार मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले.</verse>
				<verse number="9">तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येऊन त्या कुळांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल.</verse>
				<verse number="10">तुम्ही नक्वीच हा धर्मशास्त्रलेख वाचला असेल, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला.’</verse>
				<verse number="11">हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे!”</verse>
				<verse number="12">तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला, हे त्यांच्या ध्यानात आले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली म्हणून ते येशूला सोडून निघून गेले.</verse>
				<verse number="13">त्यांनी येशूला बोलण्यात पकडण्याकरता काही परुश्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवले.</verse>
				<verse number="14">ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आपण खरे असून कोणाची भीड बाळगत नाही. आपण व्यक्तीनुसार नव्हे तर सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही? आम्ही तो भरावा की भरू नये?”</verse>
				<verse number="15">त्यांचा डाव ओळखून तो त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या. मला ते पाहू द्या.”</verse>
				<verse number="16">त्यांनी ते आणले, त्याने त्यांना विचारले, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसरचा.”</verse>
				<verse number="17">येशू त्यांना म्हणाला, “कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.” हे उत्तर ऐकून त्यांना त्याच्याविषयी अत्यंत आश्‍चर्य वाटले.</verse>
				<verse number="18">पुनरुत्थान नाही, असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले व त्याला विचारू लागले,</verse>
				<verse number="19">“गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी अशी आज्ञा लिहून ठेवली आहे की, कोणा एकाचा भाऊ निधन पावला आणि त्याची पत्नी मागे राहिली व त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने तिच्याबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.</verse>
				<verse number="20">कोणी सात भाऊ होते. त्यांच्यापैकी पहिल्या भावाने पत्नी केली व तो संतती न होता निधन पावला.</verse>
				<verse number="21">मग त्याची पत्नी दुसऱ्या भावाने केली. तोही संतती न होता निधन पावला. तशीच तिसऱ्याचीही गत झाली.</verse>
				<verse number="22">ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता निधन पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली.</verse>
				<verse number="23">तर मग पुनरुत्थानसमयी ते सर्व उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.”</verse>
				<verse number="24">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.</verse>
				<verse number="25">मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.</verse>
				<verse number="26">तरी पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात, ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे’?</verse>
				<verse number="27">तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”</verse>
				<verse number="28">त्यांचा वाद ऐकून व त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून शास्त्र्यांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”</verse>
				<verse number="29">येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे.</verse>
				<verse number="30">तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’</verse>
				<verse number="31">दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.”</verse>
				<verse number="32">तो शास्त्री म्हणाला, “गुरुवर्य, आपण ठीक बोललात. परमेश्वर एक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही.</verse>
				<verse number="33">तसेच संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ ह्यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.”</verse>
				<verse number="34">त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून येशूला आणखी काही विचारण्याचे धाडस कुणाला झाले नाही.</verse>
				<verse number="35">मंदिरात शिकवत असता येशूने प्रश्न विचारला, “ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात, हे कसे?</verse>
				<verse number="36">कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’</verse>
				<verse number="37">दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” आणि जनसमुदाय हे आनंदाने ऐकत होता.</verse>
				<verse number="38">पुढे तो आपल्या प्रबोधनात त्यांना म्हणाला, “शास्त्र्यांविषयी जपून राहा, त्यांना पायघोळ झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे</verse>
				<verse number="39">आणि सभास्थानांत राखीव आसने व मेजवानीत मानाच्या जागा मिळवायची आवड असते.</verse>
				<verse number="40">ते विधवांची घरे बळकावतात व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात, त्यांना जबर शिक्षा होईल.”</verse>
				<verse number="41">एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते.</verse>
				<verse number="42">एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली.</verse>
				<verse number="43">त्याने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावून म्हटले, “मी तुम्हांला सत्य सांगतो, हे जे दान टाकत आहेत, त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे.</verse>
				<verse number="44">कारण त्या सर्वांनी त्यांच्या विपुलतेतून टाकले. परंतु हिने, तिच्याकडे उपजीविकेसाठी जे होते, ते सर्व टाकले.”</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, काय हे चिरे व काय ह्या इमारती!”</verse>
				<verse number="2">येशू त्याला म्हणाला, “ह्या भव्य इमारती तू पाहतोस ना? पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा तेथे राहणार नाही.”</verse>
				<verse number="3">तो मंदिरासमोर ऑलिव्ह डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला खाजगीरीत्या विचारले,</verse>
				<verse number="4">“ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याची वेळ होईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल, हे आम्हांला सांगा.”</verse>
				<verse number="5">येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.</verse>
				<verse number="6">पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी तो आहे, असे सांगून पुष्कळांना फसवतील.</verse>
				<verse number="7">आणखी, तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका. ह्या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही.</verse>
				<verse number="8">राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ आहे.</verse>
				<verse number="9">तुम्ही स्वतःला सांभाळा. ते तुम्हांला न्यायसभांच्याा स्वाधीन करतील. सभास्थानांमध्ये तुम्हांला मारहाण केली जाईल. माझ्याकरता तुम्ही साक्ष द्यावी म्हणून राज्यपाल व राजांसमोर तुम्हांला उभे राहावे लागेल.</verse>
				<verse number="10">परंतु प्रथम सर्व राष्ट्रांत शुभवर्तमानाची घोषणा होणे आवश्यक आहे.</verse>
				<verse number="11">ते तुम्हांला धरून न्यायालयात नेतील, तेव्हा आपण काय बोलावे, ह्याविषयी अगोदर चिंता करू नका, तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर बोलणारा पवित्र आत्मा आहे.</verse>
				<verse number="12">त्या वेळी भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्याकरता धरून देतील. मुले आपल्या आईबापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील.</verse>
				<verse number="13">माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील, त्याचा उद्धार होईल.</verse>
				<verse number="14">मात्र जेथे ‘ओसाड अमंगल दुश्‍चिन्ह’ नसावे तेथे ते असलेले तुम्ही पाहालविाचकाने हे समजून घ्यार्वें तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.</verse>
				<verse number="15">जो छपरावर असेल त्याने घरातून काही घेण्याकरता खाली उतरू नये किंवा आत जाऊ नये,</verse>
				<verse number="16">जो शेतात असेल त्याने आपले कपडे घेण्याकरता घरी परत जाऊ नये.</verse>
				<verse number="17">त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!</verse>
				<verse number="18">हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा;</verse>
				<verse number="19">कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाल्या नाहीत व पुढे होणार नाहीत अशा हालअपेष्टांचे ते दिवस असतील.</verse>
				<verse number="20">मात्र ते दिवस प्रभूने कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. ज्यांना त्याने निवडले आहे, त्यांच्यासाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.</verse>
				<verse number="21">त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’, किंवा ‘पाहा, ख्रिस्त तेथे आहे’, तर ते खरे मानू नका;</verse>
				<verse number="22">कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील.</verse>
				<verse number="23">तुम्ही मात्र सावध राहा, मी अगोदरच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे.</verse>
				<verse number="24">ही अरिष्टे येऊन गेल्यावर त्या दिवसांत सूर्य अंधकारमय होईल; चंद्र आपला प्रकाश देणार नाही.</verse>
				<verse number="25">आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातील शक्ती डळमळतील.</verse>
				<verse number="26">तेव्हा मनुष्याचा पुत्र महान सामर्थ्याने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल.</verse>
				<verse number="27">त्या वेळेस तो देवदूतांना चोहीकडे पाठवून पृथ्वीच्या परिसीमेपासून स्वर्गाच्या परिसीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.</verse>
				<verse number="28">अंजिराच्या झाडापासून एक धडा शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते.</verse>
				<verse number="29">त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल.</verse>
				<verse number="30">मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, ही पिढी नाहीशी होण्यापूर्वी हे सर्व घडेल.</verse>
				<verse number="31">आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.</verse>
				<verse number="32">त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ पित्याला माहीत आहे.</verse>
				<verse number="33">सावध असा. जागृत राहा कारण तो समय केव्हा येईल, ह्याची तुम्हांला कल्पना नाही.</verse>
				<verse number="34">प्रवासाला जात असलेल्या एका माणसाने आपले घर सोडताना आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपालास जागृत राहण्याची आज्ञा करावी, तसे हे आहे,</verse>
				<verse number="35">म्हणून जागृत राहा. घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे किंवा सकाळी, हे तुम्हांला माहीत नाही.</verse>
				<verse number="36">नाही तर तो अचानक येईल व तुम्हांला झोपलेले पाहील.</verse>
				<verse number="37">जे मी तुम्हांला सांगतो, तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">ओलांडण सण व बेखमीर भाकरींच्या सणाला अजून दोन दिवसांचा अवधी होता आणि येशूला कपटाने कसे धरावे व ठार मारावे, हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते.</verse>
				<verse number="2">ते म्हणत होते, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.”</verse>
				<verse number="3">येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोनच्या घरी जेवायला बसला असता, एक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली. तिने ती फोडून त्याच्या मस्तकावर ओतली.</verse>
				<verse number="4">कित्येक जण संतप्त होऊन आपसात म्हणाले, “ह्या अत्तराचा असा अपव्यय का केला?</verse>
				<verse number="5">ते तीनशेपेक्षा अधिक चांदीच्या नाण्यांना विकून गोरगरिबांना मदत करता आली असती”, अशी ते तिच्यावर टीका करीत होते.</verse>
				<verse number="6">परंतु येशू म्हणाला, “हिला राहू द्या. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.</verse>
				<verse number="7">गरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतील व पाहिजे तेव्हा तुम्ही त्यांना साहाय्य करू शकता, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.</verse>
				<verse number="8">तिला जे काही करता आले, ते तिने केले; तिने माझ्या उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावले आहे.</verse>
				<verse number="9">मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”</verse>
				<verse number="10">बारा जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्कर्योत हा येशूला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या हेतूने त्यांच्याकडे गेला.</verse>
				<verse number="11">त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला पैसे देऊ केले म्हणून तो येशूला धरून देण्याची सोईस्कर संधी शोधू लागला.</verse>
				<verse number="12">बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी, अशी आपली इच्छा आहे?”</verse>
				<verse number="13">त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “शहरात जा म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल. त्याच्यामागून जा.</verse>
				<verse number="14">घरात गेल्यावर तेथल्या घरधन्याला असे सांगा की, गुरुजी विचारतात, ‘माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करू शकेन, अशी जागा कोठे आहे?’</verse>
				<verse number="15">सजवून तयार केलेली माडीवरची एक प्रशस्त खोली तो तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी सर्व तयारी करा.”</verse>
				<verse number="16">शिष्य निघून शहरात गेले. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.</verse>
				<verse number="17">संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले.</verse>
				<verse number="18">ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणात भाग घेत आहे.”</verse>
				<verse number="19">ते अस्वस्थ झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “तो मी आहे का?”</verse>
				<verse number="20">तो त्यांना म्हणाला, “तुम्हां बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर वाटीत भाकरीचा तुकडा बुडवत आहे तो.</verse>
				<verse number="21">मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी धर्मशास्त्रात जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे असते!”</verse>
				<verse number="22">ते भोजन करत असता, येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, हे माझे शरीर आहे.”</verse>
				<verse number="23">त्यानंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला. ते सर्व जण त्यातून प्याले.</verse>
				<verse number="24">येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे.</verse>
				<verse number="25">मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”</verse>
				<verse number="26">त्यानंतर एक स्तोत्र गाऊन ते तेथून ऑलिव्ह डोंगराकडे निघून गेले.</verse>
				<verse number="27">येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझ्यामुऴे अडखळणार आहात, कारण असे लिहिले आहे, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’</verse>
				<verse number="28">पण माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलमध्ये जाईन.”</verse>
				<verse number="29">पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”</verse>
				<verse number="30">येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, आज रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”</verse>
				<verse number="31">पेत्र आवेशाने बोलला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व जणही तेच म्हणत होते.</verse>
				<verse number="32">ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”</verse>
				<verse number="33">त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ होऊ लागला.</verse>
				<verse number="34">तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.”</verse>
				<verse number="35">काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.”</verse>
				<verse number="36">तो म्हणत होता, “पित्या, माझ्या पित्या, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”</verse>
				<verse number="37">तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय?</verse>
				<verse number="38">तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”</verse>
				<verse number="39">त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.</verse>
				<verse number="40">तो पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत, त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्याला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचेना.</verse>
				<verse number="41">तिसऱ्या वेळी येऊन तो त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पुरे झाले! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे.</verse>
				<verse number="42">उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”</verse>
				<verse number="43">येशू बोलत असताना बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली होती.</verse>
				<verse number="44">त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती, “मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा व त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा.”</verse>
				<verse number="45">यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले.</verse>
				<verse number="46">तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली.</verse>
				<verse number="47">तेथे शेजारी जे उभे होते, त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि उच्च याजकांच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.</verse>
				<verse number="48">तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय?</verse>
				<verse number="49">मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे आणि तुम्ही मला धरले नाही, परंतु धर्मशास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक आहे.”</verse>
				<verse number="50">त्यानंतर त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.</verse>
				<verse number="51">एक तरुण उघड्या अंगावर केवळ तागाचे कापड पांघरून येशूच्या मागून आला होता. त्याला त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला,</verse>
				<verse number="52">परंतु तो ते तागाचे कापड टाकून तिथून उघडाच पळून गेला.</verse>
				<verse number="53">नंतर त्यांनी येशूला उच्च याजकांच्या घरी नेले. तेथे सर्व मुख्य याजक, वडीलजन व शास्त्री एकत्र जमले.</verse>
				<verse number="54">काही अंतर ठेवून मागे येत असलेला पेत्र रक्षकांबरोबर उच्च याजकांच्या वाड्यातील शेकोटीजवळ बसला.</verse>
				<verse number="55">मुख्य याजक व न्यायसभेचे सर्व सदस्य येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु त्यांना तो मिळेना.</verse>
				<verse number="56">बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना.</verse>
				<verse number="57">काही जण उभे राहून येशूविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,</verse>
				<verse number="58">“‘हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसांत उभारीन’,असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.”</verse>
				<verse number="59">परंतु त्यांच्या ह्या साक्षींतदेखील मेळ बसेना.</verse>
				<verse number="60">उच्च याजकांनी मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?”</verse>
				<verse number="61">तरी पण येशू गप्प राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा उच्च याजकांनी त्याला विचारले, “धन्य देवाचा पुत्र जो ख्रिस्त, तो तू आहेस काय?”</verse>
				<verse number="62">येशू म्हणाला, “मी आहे. तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ परमेश्‍वराच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांवर आरूढ होऊन येत असलेला पाहाल.”</verse>
				<verse number="63">तेव्हा उच्च याजक आपले कपडे फाडून म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीदारांची काही गरज नाही!</verse>
				<verse number="64">हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुमचा निर्णय काय?” त्या वेळी तो मरणदंडाला पात्र आहे, असे सर्वांनी मिळून ठरवले.</verse>
				<verse number="65">कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे डोळे झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता संदेष्टा म्हणून सांग.” रक्षकांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले व चपराका मारल्या.</verse>
				<verse number="66">इकडे पेत्र खाली अंगणात असता उच्च याजकांच्या दासींपैकी एक तेथे आली.</verse>
				<verse number="67">पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.”</verse>
				<verse number="68">परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!]</verse>
				<verse number="69">त्या दासीने त्याला तेथेही पाहिले. जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.”</verse>
				<verse number="70">तरी त्याने पुन्हा नाकारले. काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकी आहेस कारण तू गालीली आहेस.”</verse>
				<verse number="71">परंतु तो स्वतःला शाप देऊन शपथपूर्वक म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्याला मी ओळखत नाही.”</verse>
				<verse number="72">त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील’, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले आणि तो भावनाविवश होऊन रडला.</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">पहाट होताच वडीलजन व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलातच्या स्वाधीन केले.</verse>
				<verse number="2">पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.”</verse>
				<verse number="3">मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप करीत होते.</verse>
				<verse number="4">पिलातने त्याला पुन्हा विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? पाहा, ते तुझ्यावर किती तरी आरोप करीत आहेत.”</verse>
				<verse number="5">तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्‍चर्य वाटले.</verse>
				<verse number="6">सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत, त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे.</verse>
				<verse number="7">बंडात भाग घेणाऱ्यांतील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर अटक केलेला बरब्बा नावाचा एक माणूस होता.</verse>
				<verse number="8">लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.”</verse>
				<verse number="9">त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?”</verse>
				<verse number="10">मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता.</verse>
				<verse number="11">परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला सोडा, ही मागणी करायला मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले.</verse>
				<verse number="12">पिलातने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहुदी लोकांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?”</verse>
				<verse number="13">“त्याला क्रुसावर खिळा”, अशी त्यांनी ओरड केली.</verse>
				<verse number="14">पिलातने त्यांना म्हटले, “का? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”</verse>
				<verse number="15">लोकसमुदायाला खुश करावे, ह्या हेतूने पिलातने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.</verse>
				<verse number="16">शिपायांनी त्याला राज्यपालांच्या वाड्यात नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली.</verse>
				<verse number="17">त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा चढवला आणि काटेरी डहाळ्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर घातला.</verse>
				<verse number="18">ते मुजरा करून त्याला म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!”</verse>
				<verse number="19">त्यांनी त्याच्या मस्तकावर काठीने मारले, ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले.</verse>
				<verse number="20">अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले.</verse>
				<verse number="21">गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता.</verse>
				<verse number="22">त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले.</verse>
				<verse number="23">त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही.</verse>
				<verse number="24">त्यानंतर त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणते कपडे कोणी घ्यावे ह्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.</verse>
				<verse number="25">त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.</verse>
				<verse number="26">‘यहुदी लोकांचा राजा’, अशी त्याच्यावरील दोषारोपाची पाटी क्रुसावर लावली होती.</verse>
				<verse number="27">त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले.</verse>
				<verse number="28">[‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.]</verse>
				<verse number="29">जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या,</verse>
				<verse number="30">स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली ये!”</verse>
				<verse number="31">तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही!</verse>
				<verse number="32">इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता क्रुसावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आमचा विश्वास बसेल.” येशूबरोबर क्रुसावर खिळलेलेसुद्धा त्याची निंदा करत होते.</verse>
				<verse number="33">मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला.</verse>
				<verse number="34">दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”</verse>
				<verse number="35">हे ऐकून जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जण म्हणू लागले, “पाहा, तो एलियाला हाक मारत आहे.”</verse>
				<verse number="36">त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन आंबेत भिजवलेला स्पंज एका काठीच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला आणि म्हटले, “थांबा! एलिया त्याला क्रुसावरून खाली उतरून घ्यायला येतो की काय हे पाहू!”</verse>
				<verse number="37">येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला.</verse>
				<verse number="38">त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.</verse>
				<verse number="39">येशूने अशा प्रकारे प्राण सोडला, हे पाहून क्रुसासमोर उभ्या असलेल्या सैन्याधिकाऱ्याने म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”</verse>
				<verse number="40">काही महिलादेखील दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या.</verse>
				<verse number="41">तो गालीलमध्ये असताना ह्या त्याच्याबरोबर फिरून त्याची सेवा करत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमहून आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रियादेखील होत्या.</verse>
				<verse number="42">ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे साबाथपूर्व दिवस होता.</verse>
				<verse number="43">म्हणून अरिमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तो स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.</verse>
				<verse number="44">येशू इतक्यात कसा निधन पावला, ह्याचे पिलातला आश्‍चर्य वाटले. त्याने सैन्याधिकाऱ्याला बोलावून घेऊन विचारले, “येशूला प्राण सोडून बराच वेळ झाला की काय?”</verse>
				<verse number="45">सैन्याधिकाऱ्याचा अहवाल ऐकल्यावर त्याने येशूचे शरीर योसेफच्या स्वाधीन करण्यास संमती दिली.</verse>
				<verse number="46">योसेफने तागाचे कापड आणले व शरीर खाली काढून ते तागाचे कापड त्याच्याभोवती गुंडाळले. त्यानंतर त्याने ते खडकात खोदलेल्या कबरीत ठेवले व कबरीच्या तोंडाशी शिळा सरकवून लावली.</verse>
				<verse number="47">येशूला कोठे ठेवले, हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या.</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">साबाथनंतर मग्दालिया मरिया, याकोबची आई मरिया व सलोमे ह्यांनी जाऊन येशूच्या शरीराला लावण्याकरता सुगंधी द्रव्ये विकत घेतली.</verse>
				<verse number="2">आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरीजवळ आल्या.</verse>
				<verse number="3">त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरीवरून शिळा कोण सरकवील?”</verse>
				<verse number="4">त्यांनी वर पाहिले, तेव्हा ती शिळा एकीकडे सरकवलेली आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती.</verse>
				<verse number="5">त्या कबरीच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या.</verse>
				<verse number="6">तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका, क्रुसावर खिळलेल्या नासरेथकर येशूचा तुम्ही शोध घेत आहात ना? तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते, ती ही जागा पाहा.</verse>
				<verse number="7">जा. त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलमध्ये जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते, त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”</verse>
				<verse number="8">त्या कबरीतून बाहेर येऊन धावत निघाल्या. त्या शोकमग्न व भयभीत झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही कारण त्यांचा थरकाप उडाला होता.</verse>
				<verse number="9">आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरियेला दर्शन दिले, हिच्यामधून त्याने सात भुते काढली होती.</verse>
				<verse number="10">तिने जाऊन शोक करत व रडत असलेल्या येशूच्या सोबत्यांना हे वर्तमान सांगितले.</verse>
				<verse number="11">परंतु तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="12">ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण गावाकडे जात असताना त्यांच्यासमोर तो निराळ्या प्रकारे प्रकट झाला.</verse>
				<verse number="13">त्यांनी जाऊन इतरांना सांगितले. परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="14">शेवटी अकरा जण जेवायला बसले असता त्यांच्यासमोरही तो प्रकट झाला. ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते, त्यांच्यावर ह्या अकरा जणांनी विश्वास ठेवला नाही म्हणून येशूने अविश्वास व अंतःकरणाचा कठोरपणा ह्यांविषयी त्यांची कानउघाडणी केली.</verse>
				<verse number="15">त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा.</verse>
				<verse number="16">जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल.</verse>
				<verse number="17">विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील;</verse>
				<verse number="18">सर्प उचलतील, ते कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधा होणार नाही व त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”</verse>
				<verse number="19">ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे स्थानापन्न झाला.</verse>
				<verse number="20">त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.] प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट एका प्राचीन हस्तलिखितात अशा प्रकारे केलेला आढळतो: निराळ्या प्रकारचा शेवट [त्या स्त्रियांनी जे काही पाहिले होते ते सर्व पेत्र आणि त्याचे सोबती ह्यांना सांगितले. ह्यानंतर स्वतः येशूने त्याच्या शिष्यांद्वारे तारणाचा पवित्र व शाश्वत संदेश जगभर पाठवला.]</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="42">
			<chapter number="1">
				<verse number="1">प्रिय थियफील, आपल्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतान्त लिहिण्याचे काम अनेक लोकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे.</verse>
				<verse number="2">ज्यांनी ह्या गोष्टी सुरुवातीपासून प्रत्यक्ष पाहिल्या व हा संदेश प्रसारित केला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे लिहिण्याचे काम करण्यात आले.</verse>
				<verse number="3">म्हणूनच, महाशय, ह्या सर्व माहितीचा मुळापासून काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की, त्या आपणासाठी व्यवस्थितपणे लिहून काढणे उचित ठरेल.</verse>
				<verse number="4">आपल्याला जे काही प्रबोधन मिळाले आहे, त्याची सत्यता आपणास समजावी, म्हणून मी हे लिहीत आहे.</verse>
				<verse number="5">यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या कारकीर्दीत अबिजाच्या याजकीय संघात जखऱ्या नावाचा एक याजक होता, त्याची पत्नीदेखील अहरोनाच्या याजकीय कुळातील होती. तिचे नाव अलिशिबा होते.</verse>
				<verse number="6">ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात तत्पर होती.</verse>
				<verse number="7">अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते व ती दोघे वयोवृद्ध झाली होती.</verse>
				<verse number="8">एकदा जखऱ्या आपल्या संघाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे दैनंदिन काम करण्यासाठी गेला.</verse>
				<verse number="9">याजकांच्या परिपाठाप्रमाणे वेदीवर धूप जाळण्यासाठी त्याची निवड चिट्ठ्या टाकून करण्यात आली होती. त्यानुसार तो प्रभूच्या मंदिरात गेला.</verse>
				<verse number="10">त्या वेळेस संपूर्ण जनसमुदाय बाहेर प्रार्थना करीत होता.</verse>
				<verse number="11">धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला.</verse>
				<verse number="12">त्याला पाहून जखऱ्या विस्मित व भयभीत झाला.</verse>
				<verse number="13">परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या, भिऊ नकोस! तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव.</verse>
				<verse number="14">त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील!</verse>
				<verse number="15">कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल; त्याने द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करायचे नाही; आईच्या उदरात असल्यापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.</verse>
				<verse number="16">इस्राएलच्या संतानांतील पुष्कळ लोकांना तो प्रभू त्यांचा परमेश्वर ह्याच्याकडे वळवील.</verse>
				<verse number="17">एलियाच्या मनोवृत्तीने व सामर्थ्याने तो परमेश्वरापुढे चालेल. वडील आणि मुले यांच्यामध्ये तो पुन्हा ऐक्य प्रस्थापित करील. आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची विचारसरणी नीतिमान लोकांच्या विचारसरणीसारखी बदलून तो प्रभूसाठी प्रजा तयार करील.”</verse>
				<verse number="18">जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी वयोवृद्ध आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.”</verse>
				<verse number="19">देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे. तुझ्याबरोबर बोलायला व हे सुवृत्त तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे.</verse>
				<verse number="20">पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण उचित समयी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”</verse>
				<verse number="21">इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते. त्याला पवित्र स्थानात उशीर झाल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="22">तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. त्यावरून त्याला पवित्र स्थानात दर्शन घडले आहे, असे त्यांनी ओळखले. बोलू न शकल्यामुळे तो त्यांना हातांनी खुणा करीत होता.</verse>
				<verse number="23">त्याच्या सेवाकार्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी परत गेला.</verse>
				<verse number="24">त्यानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने ती घरातून बाहेर पडली नाही.</verse>
				<verse number="25">ती म्हणत असे, “लोकांत होणारी माझी मानहानी दूर करण्यासाठी प्रभूने मला साहाय्य केले.”</verse>
				<verse number="26">अलिशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गालीलमधील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठवले.</verse>
				<verse number="27">तिचा दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वाङ्निश्‍चय झाला होता. तिचे नाव मरिया होते.</verse>
				<verse number="28">देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर आहे.”</verse>
				<verse number="29">परंतु ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल, ह्याचा ती विचार करू लागली.</verse>
				<verse number="30">देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे</verse>
				<verse number="31">आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव.</verse>
				<verse number="32">तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल.</verse>
				<verse number="33">तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”</verse>
				<verse number="34">मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’</verse>
				<verse number="35">देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया धरील. ह्यामुळे तुला होणारे मूल पवित्र असेल व त्याला देवाचा पुत्र म्हणतील.</verse>
				<verse number="36">तसेच पाहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिला म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. जिला वांझ म्हणत, तिला सहावा महिना लागला आहे.</verse>
				<verse number="37">कारण देवाला काहीच अशक्य नाही.”</verse>
				<verse number="38">तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची सेविका आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” मग देवदूत तेथून निघून गेला.</verse>
				<verse number="39">त्या दिवसांत मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका नगरात त्वरेने गेली</verse>
				<verse number="40">आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले.</verse>
				<verse number="41">अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उसळी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.</verse>
				<verse number="42">ती उच्च स्वरांत म्हणाली, “सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या उदरातील फळ धन्य!</verse>
				<verse number="43">माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, ही महान गोष्ट माझ्या बाबतीत का घडावी?</verse>
				<verse number="44">कारण तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उसळी मारली.</verse>
				<verse number="45">प्रभूने तुला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल, असा विश्वास ठेवणारी तू धन्य आहेस.”</verse>
				<verse number="46">मरिया म्हणाली, “माझे अंतःकरण प्रभूला थोर मानते</verse>
				<verse number="47">व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे,</verse>
				<verse number="48">कारण त्याने त्याच्या सेविकेच्या नम्रतेवर कृपादृष्टी वळवली आहे! ह्यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;</verse>
				<verse number="49">कारण जो सामर्थ्यशाली आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे.</verse>
				<verse number="50">जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते.</verse>
				<verse number="51">त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.</verse>
				<verse number="52">त्याने अधिपतींना राजासनांवरून ओढून काढले आहे व दीनांना उच्च स्थान दिले आहे.</verse>
				<verse number="53">त्याने भुकेल्यांना चांगल्या पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानांना रिकाम्या हातांनी पाठवून दिले आहे.</verse>
				<verse number="54">त्याच्या दयेचे स्मरण ठेवून त्याचा सेवक इस्राएल ह्याला त्याने साहाय्य केले आहे.</verse>
				<verse number="55">आपल्या पूर्वजांना म्हणजेच अब्राहाम व त्याच्या वंशजांना दिलेल्या वचनानुसार त्याने हे केले आहे.”</verse>
				<verse number="56">मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.</verse>
				<verse number="57">अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला.</verse>
				<verse number="58">प्रभूने तिच्यावर विशेष दया केली, हे ऐकून तिचे शेजारी व नातलग तिच्याबरोबर आनंदित झाले.</verse>
				<verse number="59">आठव्या दिवशी ते बालकाची सुंता करायला आले. त्याच्या वडिलांच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते,</verse>
				<verse number="60">परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.”</verse>
				<verse number="61">ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.”</verse>
				<verse number="62">म्हणून ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या वडिलांना खुणावून विचारले.</verse>
				<verse number="63">त्याने पाटी मागवून ह्याचे नाव योहान आहे, असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="64">लगेच त्याचे तोंड उघडले. त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा गौरव करीत बोलू लागला.</verse>
				<verse number="65">ह्यावरून त्याच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले. यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व घडामोडींविषयी लोक बोलू लागले.</verse>
				<verse number="66">ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या घटनांवर मनन करीत म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण खरोखर त्याच्या ठायी प्रभूचे सामर्थ्य होते.</verse>
				<verse number="67">नंतर योहानचे वडील जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा:</verse>
				<verse number="68">‘इस्राएलचा प्रभू परमेश्वर ह्याचा आपण गौरव करू या. त्याने लोकांवर कृपादृष्टी वळवली असून त्याने त्यांचे तारण केले आहे.</verse>
				<verse number="69">त्याने आपल्याला त्याचा सेवक दावीद ह्याचा वंशज सामर्थ्यशाली तारणहार म्हणून दिला आहे.</verse>
				<verse number="70">त्याने युगाच्या प्रारंभापासून त्याच्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते,</verse>
				<verse number="71">‘आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून तो आपली सुटका करील.’</verse>
				<verse number="72">अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना त्याने दया दाखवली आहे व त्याच्या पवित्र कराराचे स्मरण ठेवले आहे.</verse>
				<verse number="73">आपला पूर्वज अब्राहाम ह्याला वाहिलेल्या शपथेनुसार आपल्या शत्रूंच्या हातून आपली सुटका करण्याचे व आयुष्यभर त्याची निर्भयपणे सेवा करण्यासाठी आपल्याला सक्षम करण्याचे वचन त्याने दिले.</verse>
				<verse number="74"></verse>
				<verse number="75">म्हणजे आपण त्याच्यापुढे जीवनभर पवित्र व नीतिमान असावे</verse>
				<verse number="76">आणि हे माझ्या मुला, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील,</verse>
				<verse number="77">त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील.</verse>
				<verse number="78">अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.”</verse>
				<verse number="79"></verse>
				<verse number="80">तो बालक वाढत असता त्याचा आत्मिक विकास होत गेला आणि इस्राएली लोकांसमोर जाहीरपणे प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">सर्व रोमन साम्राज्याची जनगणना व्हावी, असे सम्राट औगुस्त ह्याने फर्मान सोडले.</verse>
				<verse number="2">क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी झाली.</verse>
				<verse number="3">सर्व लोक आपापल्या गावी नावनोंदणी करण्यासाठी गेले.</verse>
				<verse number="4">योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला,</verse>
				<verse number="5">नावनिशी लिहून देण्यासाठी जाताना त्याची वाग्दत्त वधू मरिया हिला त्याने बरोबर नेले. ती गरोदर होती.</verse>
				<verse number="6">ती तेथे असताना तिच्या बाळंतपणाची घटका आली.</verse>
				<verse number="7">तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.</verse>
				<verse number="8">त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते.</verse>
				<verse number="9">त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली.</verse>
				<verse number="10">परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो:</verse>
				<verse number="11">तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे!</verse>
				<verse number="12">तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.”</verse>
				<verse number="13">इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले,</verse>
				<verse number="14">“स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.”</verse>
				<verse number="15">देवदूत स्वर्गात गेल्यानंतर मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेम येथे जाऊ या. प्रभूने आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे, ती प्रत्यक्ष पाहू या.”</verse>
				<verse number="16">म्हणून ते त्वरेने निघाले व मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक हे त्यांच्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="17">त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे सांगण्यात आले होते, ते त्यांनी मरिया व योसेफ ह्यांना सांगितले.</verse>
				<verse number="18">मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले.</verse>
				<verse number="19">परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली.</verse>
				<verse number="20">ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व घटना प्रत्यक्ष घडलेल्या ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.</verse>
				<verse number="21">आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्या बाळाचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने दिले होते.</verse>
				<verse number="22">मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले.</verse>
				<verse number="23">म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणून गणला जावा’, असे जे नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावे,</verse>
				<verse number="24">तसेच प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कबुतरांची जोडी किंवा पारव्यांची दोन पिले ह्यांचा यज्ञदेखील त्यांनी अर्पण करावा.</verse>
				<verse number="25">त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता.</verse>
				<verse number="26">‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.</verse>
				<verse number="27">पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले,</verse>
				<verse number="28">तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा गौरव करीत म्हटले,</verse>
				<verse number="29">“हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे. आता आपल्या दासाला शांतीने जाऊ दे;</verse>
				<verse number="30">कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी तुझे तारण पाहिले आहे.</verse>
				<verse number="31">ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे.</verse>
				<verse number="32">ते परराष्ट्रीयांना तुझी इच्छा प्रकट व्हावी म्हणून प्रकाश व तुझ्या इस्राएली लोकांचे वैभव आहे.”</verse>
				<verse number="33">येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="34">शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलमध्ये अनेकांचा नाश व उद्धार व्हावा म्हणून व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह व्हावे म्हणून परमेश्वराने ह्याची नियुक्ती केली आहे.</verse>
				<verse number="35">त्यामुळे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघड होतील व तुझ्या अंतःकरणात तलवार भोसकली जाईल.”</verse>
				<verse number="36">देवाचा संदेश देणारी हन्ना नावाची एक फार वयोवृद्ध स्त्री होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलची मुलगी होती. ती सात वर्षे वैवाहिक जीवन जगली होती.</verse>
				<verse number="37">आता ती विधवा चौऱ्याऐंशी वर्षांची होती. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस आराधना करीत असे.</verse>
				<verse number="38">तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली.</verse>
				<verse number="39">प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गालीलमधील आपले गाव नासरेथ येथे परत गेले.</verse>
				<verse number="40">ते बालक वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले व त्याच्यावर देवाची कृपा होती.</verse>
				<verse number="41">त्याचे आईबाप दर वर्षी ओलांडण सणासाठी यरुशलेमला जात असत.</verse>
				<verse number="42">येशू बारा वर्षांचा झाला, तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी तेथे गेले.</verse>
				<verse number="43">सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते.</verse>
				<verse number="44">तो वाटेवरच्या सोबत्यांत असेल, असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे लोक ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध घेतला.</verse>
				<verse number="45">तो त्यांना सापडला नाही, तेव्हा ते त्याचा शोध घेत घेत यरुशलेमला परत गेले.</verse>
				<verse number="46">तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना सापडला.</verse>
				<verse number="47">त्याची बुद्धिमत्ता व उत्तरे ह्यांवरून त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व थक्क झाले.</verse>
				<verse number="48">त्याला तेथे पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझे वडील व मी चिंताक्रांत होऊन तुझा शोध घेत परत आलो.”</verse>
				<verse number="49">तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध घेत राहिलात हे कसे? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?”</verse>
				<verse number="50">परंतु त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही.</verse>
				<verse number="51">नंतर तो त्यांच्याबरोबर नासरेथ येथे गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवल्या.</verse>
				<verse number="52">येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">सम्राट तिबिर्य ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहुदियाचा राज्यपाल होता. हेरोद गालीलचा राज्यकर्ता, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनीती ह्या प्रांतांचा राज्यकर्ता व लूसनिय अबिलेनेचा राज्यकर्ता होता.</verse>
				<verse number="2">हन्नास व कयफा हे उच्च याजक असताना जखऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.</verse>
				<verse number="3">तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले, ते असे:</verse>
				<verse number="4">अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू आली, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.</verse>
				<verse number="5">प्रत्येक दरी भरली जाईल. प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील. खडबडीत वाटा समतल केल्या जातील</verse>
				<verse number="6">आणि सर्व लोक देवाने केलेले तारण पाहतील.</verse>
				<verse number="7">जे लोक बाप्तिस्मा घ्यायला त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो, सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले?</verse>
				<verse number="8">तुमचा पश्चात्ताप दिसून येईल अशी सत्कृत्ये करा आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे आपल्या मनात म्हणू नका कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करायला देव समर्थ आहे!</verse>
				<verse number="9">आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड उचललेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”</verse>
				<verse number="10">लोकसमुदाय त्याला विचारीत असे, “तर मग आम्ही काय करावे?”</verse>
				<verse number="11">तो त्यांना उत्तर देत असे, “ज्याच्याजवळ दोन सदरे आहेत, त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्याने त्यात दुसऱ्यांना सहभागी करावे.”</verse>
				<verse number="12">जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला त्यांनी विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”</verse>
				<verse number="13">त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.”</verse>
				<verse number="14">सैनिकांनी त्याला विचारले, “आम्ही काय करावे?” त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड रचू नका, तर आपल्या पगारात समाधानी असा.”</verse>
				<verse number="15">त्या वेळी लोक प्रतीक्षा करत होते व हाच ख्रिस्त असेल काय, असा सर्व जण योहानविषयी आपल्या मनात विचार करीत असत.</verse>
				<verse number="16">योहान त्या सर्वांना उत्तर देत असे, “मी तर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडायलाही मी पात्र नाही, तो येत आहे. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देइल.</verse>
				<verse number="17">आपले खळे अगदी स्वच्छ करायला व गहू आपल्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे. मात्र भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”</verse>
				<verse number="18">तसेच इतर अनेक प्रकारे लोकांना आवाहन करीत तो शुभवर्तमानाची घोषणा करीत असे.</verse>
				<verse number="19">मात्र त्याने राज्यकर्ता हेरोद ह्याला त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे</verse>
				<verse number="20">हेरोदने ह्या सर्वांहून अधिक मोठे दुष्कर्म केले; ते म्हणजे त्याने योहानला तुरुंगात कोंडून ठेवले.</verse>
				<verse number="21">तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले,</verse>
				<verse number="22">पवित्र आत्मा दृश्य रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”</verse>
				<verse number="23">येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफचा पुत्र असे समजत. योसेफचे पूर्वज अनुक्रमे पुढीलप्रमाणे:एली, मत्ताथ, लेवी, मल्खी, यन्नया, योसेफ, मत्तिथा, आमोस, नहूम, हेस्ली, नग्गय, महथा, मत्तिथा, शिमयी, योसेख, योदा, योहानान, रेश, जरुब्बाबेल, शल्तिएल, नेरी, मल्खी, अद्दी, कोसाम, एल्मदाम, एर, येशू, अलियेजर, योरीम, मत्ताथ, लेवी, शिमोन, यहुदा, योसेफ, योनाम, एल्याकीम, मलआ, मिन्ना, मत्ताथ, नाथान, दावीद, इशाय, ओबेद, बलाज, सल्मोन, नहशोन, अम्मीनादाब, आद्मीन, अर्णय, हेस्रोन, पेरेस, यहुदा, याकोब, इसहाक, अब्राहाम, तेरह, नाहोर, सरूग, रऊ, पेलेग, एबर, शेलह, केनान, अर्पक्षद, शेम, नोहा, लामेख, मथूशलह, हनोख, यारेद, महललेल, केनान, अनोश, सेथ आणि देवपुत्र आदाम.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले.</verse>
				<verse number="2">तेथे सैतानाने चाळीस दिवस त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसांत त्याने काही खाल्‍ले नाही म्हणून ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली.</verse>
				<verse number="3">सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.”</verse>
				<verse number="4">येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.”</verse>
				<verse number="5">त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली</verse>
				<verse number="6">आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो.</verse>
				<verse number="7">म्हणून तू मला नमन करशील, तर हे सर्व तुझे होईल.”</verse>
				<verse number="8">येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”</verse>
				<verse number="9">नंतर त्याने त्याला यरुशलेममध्ये नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की,</verse>
				<verse number="10">तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल</verse>
				<verse number="11">आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”</verse>
				<verse number="12">येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.”</verse>
				<verse number="13">येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला.</verse>
				<verse number="14">येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले.</verse>
				<verse number="15">तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देऊ लागला आणि सर्व जण त्याची प्रशंसा करू लागले.</verse>
				<verse number="16">ज्या नासरेथमध्ये तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला.</verse>
				<verse number="17">तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो उतारा काढला त्यात असे लिहिले होते:</verse>
				<verse number="18">प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी त्याने मला अभिषिक्त केले आहे. धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची मी घोषणा करावी, तसेच जे ठेचले जात आहेत त्यांची सुटका करावी व प्रभूच्या अनुग्रहाचे वर्ष आले आहे हे जगजाहीर करावे म्हणून मला पाठविण्यात आले आहे.</verse>
				<verse number="19"></verse>
				<verse number="20">मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला. सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली.</verse>
				<verse number="21">तो त्यांना म्हणू लागला, “हा धर्मशास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”</verse>
				<verse number="22">सर्व त्याची वाहवा करू लागले. जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी ते आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा मुलगा ना?”</verse>
				<verse number="23">त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःला बरे कर. ‘कफर्णहूम या ठिकाणी ज्या गोष्टी तू केल्या असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर.’”</verse>
				<verse number="24">पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, कोणताही संदेष्टा स्वतःच्या देशात स्वीकारला जात नाही.</verse>
				<verse number="25">परंतु सत्य हे आहे की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे पाऊस न पडता सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, त्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ विधवा होत्या,</verse>
				<verse number="26">तरी त्यांतील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते.</verse>
				<verse number="27">तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही बरा झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र बरा झाला.”</verse>
				<verse number="28">हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले.</verse>
				<verse number="29">त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते, त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले.</verse>
				<verse number="30">पण तो त्यांच्यामधून निघून गेला.</verse>
				<verse number="31">तो गालीलमधील कफर्णहूम गावी गेला. तेथे त्याने साबाथ दिवशी प्रबोधन केले.</verse>
				<verse number="32">त्याच्या ज्ञानावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.</verse>
				<verse number="33">अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला,</verse>
				<verse number="34">“आम्ही आमचे पाहून घेऊ! अरे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस!”</verse>
				<verse number="35">येशूने त्याला दटावले, “गप्प राहा व ह्याच्यातून निघून जा.” तेव्हा भूत त्या मनुष्याला त्यांच्यासमोर खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले.</verse>
				<verse number="36">सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने दुष्ट आत्म्यांना हुकूम सोडतो आणि ते निघून जातात!”</verse>
				<verse number="37">ह्या घटनेनंतर त्याची ख्याती त्या प्रदेशात सर्व ठिकाणी पसरत गेली.</verse>
				<verse number="38">तो सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने फणफणत होती. तिला बरे करावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.</verse>
				<verse number="39">तिच्या खाटेजवळ उभे राहून त्याने तापाला आदेश दिला व तिचा ताप निघाला. ती लगेच उठून त्यांची सेवा करू लागली.</verse>
				<verse number="40">ज्या सर्वांचे नातलग नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेले होते त्यांनी त्यांना सूर्यास्ताच्या वेळी येशूकडे आणले. त्याने त्यांच्यांतील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले.</verse>
				<verse number="41">“तू देवाचा पुत्र आहेस”, असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली, परंतु त्याने त्यांना दटावून बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे, हे त्यांना ठाऊक होते.</verse>
				<verse number="42">दिवस उगवल्यानंतर तेथून निघून तो एकांत ठिकाणी गेला. लोकसमुदाय त्याचा शोध घेत त्याच्याजवळ आले आणि आपणामधून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला आग्रह करू लागले.</verse>
				<verse number="43">परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर नगरांतही देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर केले पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठविण्यात आले आहे.”</verse>
				<verse number="44">म्हणून तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये प्रबोधन करीत फिरला.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता.</verse>
				<verse number="2">त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते.</verse>
				<verse number="3">त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो मचवा किनाऱ्यापासून थोडासा लोटावा,असे त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास प्रबोधन करू लागला.</verse>
				<verse number="4">आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.”</verse>
				<verse number="5">शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.”</verse>
				<verse number="6">त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली.</verse>
				<verse number="7">दुसऱ्या मचव्यात असलेल्या साथीदारांनी येऊन आपणांस साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. ते आल्यावर दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की, ते बुडू लागले.</verse>
				<verse number="8">परंतु हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून लांब जा, मी एक पापी मनुष्य आहे.”</verse>
				<verse number="9">त्यांनी धरलेल्या माशांचा थवा पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण आश्‍चर्यचकित झाले होते.</verse>
				<verse number="10">तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेसुद्धा आश्‍चर्यचकित झाले होते. येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”</verse>
				<verse number="11">मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, सर्व काही सोडून देऊन, ते त्याचे अनुयायी झाले.</verse>
				<verse number="12">एकदा येशू एका गावी असता तेथे कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून विनंती केली, “प्रभो, आपली इच्छा असली, तर मला बरे करायला आपण समर्थ आहात.”</verse>
				<verse number="13">तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तत्काळ त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.</verse>
				<verse number="14">त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेने नेमून दिल्याप्रमाणे बलिदान अर्पण कर.”</verse>
				<verse number="15">तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले. विशाल लोकसमुदाय त्याचे प्रबोधन ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमत असत.</verse>
				<verse number="16">मात्र तो एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करीत असे.</verse>
				<verse number="17">एके दिवशी तो बोध करीत असताना गालीलमधील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुशी व धर्मशास्त्राध्यापक तेथे बसले होते. रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशूकडे होते.</verse>
				<verse number="18">काही माणसांनी एका पक्षाघाती मनुष्याला खाटेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला.</verse>
				<verse number="19">परंतु गर्दीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला छपरावरून येशूच्यासमोर खाटेसकट खाली उतरवले.</verse>
				<verse number="20">त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “मित्रा, तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.”</verse>
				<verse number="21">तेव्हा शास्त्री व परुशी असा विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्‍वराशिवाय पापांची क्षमा करणारा हा कोण?”</verse>
				<verse number="22">येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असे विचार का करीत आहात?</verse>
				<verse number="23">‘तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे’ किंवा ‘उठून चाल’, ह्यातले कोणते म्हणणे सोपे आहे?</verse>
				<verse number="24">तथापि पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्याच्या पुत्राला आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून” - तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, - “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन घरी जा.”</verse>
				<verse number="25">तो लगेच त्यांच्यासमक्ष उठून ज्या खाटेवर तो पडून होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णन करीत आपल्या घरी गेला.</verse>
				<verse number="26">ते सर्व अगदी थक्क झाले. त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते विस्मित होऊन म्हणाले, आज आम्ही विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.</verse>
				<verse number="27">त्यानंतर येशू बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”</verse>
				<verse number="28">तो उठला व सर्व काही सोडून त्याच्यामागे गेला.</verse>
				<verse number="29">नंतर लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्या वेळी जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय तेथे जेवायला बसला होता.</verse>
				<verse number="30">काही परुशी व त्यांचे शास्त्री हे येशूच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता?”</verse>
				<verse number="31">येशूने उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.</verse>
				<verse number="32">मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”</verse>
				<verse number="33">नंतर त्यांनी त्याला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसेच परुश्यांचेही शिष्य करतात परंतु आपले शिष्य खातपीत असतात.”</verse>
				<verse number="34">येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय?</verse>
				<verse number="35">असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसांत ते उपवास करतील.”</verse>
				<verse number="36">येशूने त्यांना एक दाखलाही सांगितला:“कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावीत नाही. तसे केले तर नवीन फाडले जाते व नव्याचे ठिगळ जुन्याशी विसंगत दिसते.</verse>
				<verse number="37">तसेच नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षारस बुधले फोडील, द्राक्षारस सांडेल व बुधल्यांचा नाश होईल.</verse>
				<verse number="38">उलट, नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालणे आवश्यक असते.</verse>
				<verse number="39">तसेच जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही कारण जुना चांगला आहे, असे तो म्हणतो.”</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात असताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले,</verse>
				<verse number="2">तेव्हा काही परुश्यांनी विचारले, “साबाथ दिवशी जे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करता?”</verse>
				<verse number="3">येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले,</verse>
				<verse number="4">तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत, त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्या साथीदारांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”</verse>
				<verse number="5">नंतर येशूने म्हटले, “मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.”</verse>
				<verse number="6">दुसऱ्या एका साबाथ दिवशी तो सभास्थानात जाऊन शिकवीत असता तेथे उजवा हात वाळलेला एक माणूस होता.</verse>
				<verse number="7">तेव्हा काही शास्त्री व परुशी येशूवर दोष ठेवता यावा म्हणून तो साबाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहायला टपून राहिले.</verse>
				<verse number="8">त्याने त्यांचे विचार जाणले तरीही त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा,” तो उठून उभा राहिला.</verse>
				<verse number="9">येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, साबाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”</verse>
				<verse number="10">नंतर त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर,” त्याने तसे केले आणि त्याचा हात पूर्ववत बरा झाला.</verse>
				<verse number="11">हे पाहून त्यांच्या तळपायांची आग मस्तकाला गेली व येशूचे काय करावे, ह्याविषयी ते आपसात चर्चा करू लागले.</verse>
				<verse number="12">एकदा येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाकडे प्रार्थना करीत राहिला.</verse>
				<verse number="13">दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांतून पुढील बारा जणांना निवडून त्यांना प्रेषित असे संबोधनही दिले.</verse>
				<verse number="14">शिमोन (ह्याला त्याने पेत्रदेखील नाव दिले) व त्याचा भाऊ अंद्रिया तसेच याकोब, योहान, फिलिप, बर्थलमय,</verse>
				<verse number="15">मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन,</verse>
				<verse number="16">याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघात करणारा निघाला, तो यहुदा इस्कर्योत.</verse>
				<verse number="17">येशू प्रेषितांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती उभा होता. तसेच सर्व यहुदिया व यरुशलेम येथून आलेल्या आणि सोर व सिदोन येथील किनारपट्टीवरील लोकांचा विशाल समुदायसुद्धा तेथे उभा होता.</verse>
				<verse number="18">हे लोक त्याचा संदेश ऐकायला व रोग बरे करून घ्यायला आले होते. अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना त्याने बरे केले.</verse>
				<verse number="19">सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना रोगमुक्त करत होते.</verse>
				<verse number="20">नंतर येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीन जनहो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे.</verse>
				<verse number="21">अहो भुकेलेले जनहो, तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल.</verse>
				<verse number="22">मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. तुम्हांला वाळीत टाकतील. तुमची निंदा करतील आणि तुमच्या नावाला काळिमा फासतील. तेव्हा तुम्ही धन्य.</verse>
				<verse number="23">त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा कारण पाहा, स्वर्गात तुमचे पारितोषिक मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत.</verse>
				<verse number="24">परंतु तुम्हां धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला सुखसोयी मिळाल्या आहेत.</verse>
				<verse number="25">अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल.</verse>
				<verse number="26">जेव्हा सर्व लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांविषयी असेच बोलत असत.</verse>
				<verse number="27">परंतु तुम्हां ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा.</verse>
				<verse number="28">जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.</verse>
				<verse number="29">जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा कोट हिरावून घेतो त्याला तुझा शर्टदेखील घेऊन जाण्यास विरोध करू नकोस.</verse>
				<verse number="30">जो कोणी तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझे हिरावून घेतो, त्याच्याकडून ते परत मागू नकोस.</verse>
				<verse number="31">लोकांनी तुमच्याबरोबर जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही वर्तन करा.</verse>
				<verse number="32">जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? कारण पापी लोकही त्यांच्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात.</verse>
				<verse number="33">जे तुमचे बरे करतात, त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? पापी लोकही तसेच करतात.</verse>
				<verse number="34">ज्यांच्याकडून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले, तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही उसने देतात.</verse>
				<verse number="35">तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. त्यांचे बरे करा. परतफेडीची अपेक्षा न करता उसने द्या म्हणजे तुम्हांला महान पारितोषिक मिळेल आणि तुम्ही परमेश्वराची मुले व्हाल कारण कृतघ्न व वाईट लोकांनाही तो त्याचा चांगुलपणा दाखवतो.</verse>
				<verse number="36">जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्ही दयाळू व्हा.</verse>
				<verse number="37">तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुम्हांला क्षमा मिळेल.</verse>
				<verse number="38">द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही द्याल, त्याच मापाने तुम्हांला परत देण्यात येईल.</verse>
				<verse number="39">नंतर येशूने त्यांना दाखलादेखील दिला की, आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचखळग्यांत पडतील की नाही?</verse>
				<verse number="40">शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही. प्रशिक्षित झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.</verse>
				<verse number="41">तू स्वतःच्या डोळ्यातले मुसळ न पाहता, आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?</verse>
				<verse number="42">अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणतोस, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे?’ अरे ढोंग्या, प्रथम स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.</verse>
				<verse number="43">चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही. तसेच वाईट झाडाला चांगले फळ येत नाही.</verse>
				<verse number="44">कारण प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाही.</verse>
				<verse number="45">चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे, ते मुखावाटे निघणार.</verse>
				<verse number="46">तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो, ते का करत नाही?</verse>
				<verse number="47">जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो.</verse>
				<verse number="48">तो एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरीही तो लोंढा त्या घराला हालवू शकला नाही कारण ते मजबूत बांधले होते.</verse>
				<verse number="49">परंतु जो ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर पुराचा लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्याचा भीषण विनाश झाला!”</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">ही सर्व वचने लोकांना सांगून झाल्यावर येशू कफर्णहूम गावी गेला.</verse>
				<verse number="2">तेथे एका रोमन अधिकाऱ्याच्या मर्जीतला दास आजारी पडून मरणास टेकला होता.</verse>
				<verse number="3">त्याने येशूविषयी ऐकून यहुदी लोकांच्या काही वडील मंडळींना त्याच्याकडे पाठवले व विनंती केली, “आपण येऊन माझ्या दासाला वाचवा.”</verse>
				<verse number="4">त्यांनी येशूकडे येऊन कळकळीने विनंती केली, “आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे.</verse>
				<verse number="5">कारण आपल्या राष्ट्रावर तो प्रेम करतो आणि त्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.”</verse>
				<verse number="6">येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घराजवळ येताच रोमन अधिकाऱ्याने त्याच्याकडे त्याच्या मित्रांना पाठवून त्याला विनंती केली, “प्रभो, आपण तसदी घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही.</verse>
				<verse number="7">ह्यामुळे आपल्याकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानले नाही; आपण एक शब्द बोलला तरी माझा चाकर बरा होईल.</verse>
				<verse number="8">कारण मीदेखील अधिकारी असून माझ्या हाताखाली सैनिक आहेत. मी एकाला जा म्हटले तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तर तो येतो, माझ्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.”</verse>
				<verse number="9">हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलमध्येही आढळला नाही!”</verse>
				<verse number="10">आणि ज्यांना पाठविले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.</verse>
				<verse number="11">नंतर लवकरच येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याचे शिष्य व बरेच लोक त्याच्याबरोबर गेले.</verse>
				<verse number="12">तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला, तेव्हा तेथून एका मृत माणसाची अंत्ययात्रा जात होती. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. त्या नगरातले पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.</verse>
				<verse number="13">तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”</verse>
				<verse number="14">जवळ जाऊन त्याने शवपेटीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.”</verse>
				<verse number="15">तो मृत माणूस उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.</verse>
				<verse number="16">सर्वांना भय वाटले व ते देवाचा गौरव करत म्हणाले, “आमच्यामध्ये महान संदेष्टा उदयास आला आहे, देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली आहे.”</verse>
				<verse number="17">त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व भोवतालच्या सर्व प्रदेशांत पसरली.</verse>
				<verse number="18">ह्या सर्व गोष्टी त्याच्या शिष्यांनी योहानला सांगितल्या.</verse>
				<verse number="19">योहानने त्याच्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”</verse>
				<verse number="20">त्यांनी त्याच्याकडे येऊन विचारले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”</verse>
				<verse number="21">त्याच घटकेस त्याने रोग, पीडा व दुष्ट आत्मे ह्यांपासून अनेकांना मुक्‍त केले आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली.</verse>
				<verse number="22">त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा. आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मृत उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते.</verse>
				<verse number="23">जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य होय.”</verse>
				<verse number="24">योहानने पाठवलेले शिष्य गेल्यावर तो योहानविषयी लोकसमुदायाला सांगू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालवलेला बोरू काय?</verse>
				<verse number="25">तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोषाख घालणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात.</verse>
				<verse number="26">तर तुम्ही काय पाहायला गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, हो, संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.</verse>
				<verse number="27">‘पाहा, मी माझा संदेशहर तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तोच तो आहे.</verse>
				<verse number="28">मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही, तरीही देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”</verse>
				<verse number="29">जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचा संदेश ऐकून परमेश्‍वराचे समर्थन केले कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता.</verse>
				<verse number="30">परंतु परुशी व शास्त्री ह्यांनी त्यांच्यासंबंधी असलेली देवाची योजना फोल ठरवली कारण त्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता.</verse>
				<verse number="31">येशू पुढे म्हणाला, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?</verse>
				<verse number="32">जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत.’</verse>
				<verse number="33">बाप्तिस्मा देणारा योहान भाकर खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे.</verse>
				<verse number="34">मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!</verse>
				<verse number="35">परंतु सुज्ञता स्वीकारणारे त्या सुज्ञतेची सत्यता स्वतःच्या जीवनाद्वारे सिद्ध करतात.”</verse>
				<verse number="36">परुश्यातील एकाने येशूला आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. तो त्या परुश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला.</verse>
				<verse number="37">त्या गावात एक पापी स्त्री होती. तो परुश्याच्या घरात जेवायला बसला आहे, हे ऐकून ती अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली</verse>
				<verse number="38">आणि त्याच्या पायांजवळ रडत उभी राहिली व तिच्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने तिच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.</verse>
				<verse number="39">ज्या परुश्याने त्याला बोलाविले होते, त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता, तर आपल्याला स्पर्श करत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”</verse>
				<verse number="40">येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरुजी, बोला.”</verse>
				<verse number="41">“एका सावकाराचे दोन कर्जदार होते”, येशूने बोलायला सुरुवात केली. “एकाने पाचशे चांदीची नाणी तर दुसऱ्याने पन्नास चांदीची नाणी कर्ज घेतले होते.</verse>
				<verse number="42">कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांचे कर्ज माफ केले. तर त्यांच्यातील कोणता माणूस त्याच्यावर अधिक प्रीती करील?”</verse>
				<verse number="43">शिमोनने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर आहे तुझा निर्णय.”</verse>
				<verse number="44">तेव्हा येशूने त्या स्त्रीकडे वळून शिमोनला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो, तेव्हा तुम्ही मला पाय घुण्यासाठी पाणी दिले नाही. परंतु हिने तर आसवांनी माझे पाय भिजवून तिच्या केसांनी ते पुसले.</verse>
				<verse number="45">तुम्ही चुंबनाने माझे स्वागत केले नाही. परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही.</verse>
				<verse number="46">तुम्ही माझ्या मस्तकाला ऑलिव्ह तेल लावले नाही. परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले.</verse>
				<verse number="47">म्हणून मी तुम्हांला सांगतो, हिची पापे पुष्कळ असूनही त्यांची तिला क्षमा करण्यात आली आहे; कारण तिची प्रीती महान आहे. परंतु ज्याला थोडी क्षमा मिळाली आहे, तो थोडी प्रीती करतो.”</verse>
				<verse number="48">मग त्याने तिला म्हटले,”तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.”</verse>
				<verse number="49">तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?”</verse>
				<verse number="50">त्यानंतर त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">येशू प्रबोधन करीत व देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर करीत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. त्याच्याबरोबर बारा प्रेषित</verse>
				<verse number="2">आणि दुष्ट आत्मे व विकार ह्यांपासून मुक्‍त केलेल्या कित्येक स्त्रिया, म्हणजेच जिच्यातून सात भुते काढण्यात आली होती ती मग्दालिया म्हटलेली मरिया</verse>
				<verse number="3">आणि हेरोदचा कारभारी च्युजा ह्याची पत्नी योहान्ना, तसेच सुसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या साधनसंपत्तीने त्यांची सेवा करीत असत.</verse>
				<verse number="4">एकदा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व नगरोनगरीचे लोक त्याच्याजवळ आले असता येशू दाखला देऊन म्हणाला,</verse>
				<verse number="5">“पेरणारा बी पेरायला निघाला. तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले व आकाशातील पक्ष्यांनी खाऊन टाकले.</verse>
				<verse number="6">काही खडकाळ जमिनीवर पडले. ओलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले.</verse>
				<verse number="7">काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. काटेरी झुडुपांच्या वाढीमुळे त्यांची वाढ खुंटली.</verse>
				<verse number="8">काही चांगल्या जमिनीत पडले. ते उगवून शंभरपट पीक आले.” त्यांना हे सांगून झाल्यावर त्याने आवाहन केले, “ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे.”</verse>
				<verse number="9">त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?”</verse>
				<verse number="10">तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे. परंतु इतरांबरोबर मी दाखले देऊन बोललो ते अशासाठी की, ते पहात असता त्यांना दिसू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.</verse>
				<verse number="11">हा दाखला असा आहे:बी हे देवाचे वचन आहे.</verse>
				<verse number="12">वाटेवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात परंतु सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो आणि त्यांना विश्वास ठेवण्यापासून व तारणप्राप्ती करून घेण्यापासून वंचित करतो.</verse>
				<verse number="13">खडकाळ जमिनीवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात व आनंदाने वचन ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात पण कसोटीच्या वेळी बहकून जातात.</verse>
				<verse number="14">काटेरी झुडुपांमध्ये पडलेले बी म्हणजे जे ऐकतात पण संसाराच्या चिंता, धनदौलत व ऐहिक सुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व त्यांच्या जीवनात परिपक्व फळ दिसत नाही.</verse>
				<verse number="15">चांगल्या मातीत पडलेले बी म्हणजे जे वचन ऐकून ते सालस व शुद्ध अंतःकरणात धरून ठेवतात आणि फळ देईपर्यंत धीर धरतात.</verse>
				<verse number="16">दिवा लावून तो कोणी भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो.</verse>
				<verse number="17">उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व प्रकट होणार नाही असे काही गुप्त नाही.</verse>
				<verse number="18">म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, तरीही त्याला वाटते की, त्याच्याजवळ आहे, तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”</verse>
				<verse number="19">येशूची आई व त्याचे बंधू त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना.</verse>
				<verse number="20">त्याला सांगण्यात आले, “तुझी आई व तुझे बंधू तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत.”</verse>
				<verse number="21">त्याने त्या सर्वांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे बंधू आहेत.”</verse>
				<verse number="22">एकदा तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला,</verse>
				<verse number="23">ते मचवा हाकारून पुढे जात असता येशू झोपी गेला. सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले त्यामुळे ते धोक्यात होते.</verse>
				<verse number="24">ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरुवर्य, गुरुवर्य, आम्ही बुडत आहोत” तेव्हा त्याने उठून वारा व उसळलेल्या लाटा ह्यांना शांत होण्याचा हुकूम सोडला. त्यावेळी वारा व उसळलेल्या लाटा शांत होऊन सर्व निवांत झाले.</verse>
				<verse number="25">त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत व विस्मित होऊन एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारा व लाटा ह्यांनादेखील हा हुकूम सोडतो व ते त्याचे ऐकतात.”</verse>
				<verse number="26">येशू आणि त्याचे शिष्य गालील सरोवरापलीकडील गरसा प्रदेशात येऊन पोहचले.</verse>
				<verse number="27">तो जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भुतांनी पछाडले होते. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो दफन भूमीत राहत असे.</verse>
				<verse number="28">येशूला पाहून तो ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो मला छळू नकोस.”</verse>
				<verse number="29">कारण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याचा हुकूम सोडला होता. त्या भुताने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते. साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असता तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.</verse>
				<verse number="30">येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “सैन्य”, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती.</verse>
				<verse number="31">ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.”</verse>
				<verse number="32">तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरावर चरत होता, “त्यात आम्हांला जाऊ दे”, अशी त्यांनी त्याला विनंती केली. त्याने त्यांना जाऊ दिले.</verse>
				<verse number="33">भुते त्या माणसातून निघून डुकरांत शिरली आणि तो कळप सुसाट वेगाने धावत पळत कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला.</verse>
				<verse number="34">झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले.</verse>
				<verse number="35">जे झाले ते पाहायला लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती, तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला असा त्यांना आढळला. त्यांना भीती वाटली.</verse>
				<verse number="36">ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले.</verse>
				<verse number="37">तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी येशूला तेथून निघून जाण्याची विनंती केली कारण ते फार घाबरले होते. तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.</verse>
				<verse number="38">ज्या माणसातून भुते निघाली होती, तो त्याला विनंती करीत होता, “मला आपल्याजवळ राहू द्या.” परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले,</verse>
				<verse number="39">“आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली ते जाहीर कर.” त्यानंतर येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते, ते तो नगरभर सांगत गेला.</verse>
				<verse number="40">नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते.</verse>
				<verse number="41">तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.</verse>
				<verse number="42">कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता.</verse>
				<verse number="43">तेथे बारा वर्षे रक्‍तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री</verse>
				<verse number="44">त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या किनारीला शिवली आणि लगेच तिचा रक्‍तस्राव थांबला.</verse>
				<verse number="45">येशूने विचारले, “मला स्पर्श कोणी केला?” सर्व जण “मी नाही”, असे म्हणत असता पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोकसमुदाय तुम्हांला गर्दी करून घेरत आहे.”</verse>
				<verse number="46">येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्‍ती निघाली, हे मला समजले आहे.”</verse>
				<verse number="47">आपली कृती निदर्शनास आली आहे, हे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता येशूला स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे सर्व तिने लोकांपुढे निवेदन केले.</verse>
				<verse number="48">तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.”</verse>
				<verse number="49">तो बोलत आहे इतक्यात अधिकाऱ्याच्या घरून निरोप घेऊन आलेला माणूस याईरला म्हणाला, “तुमची मुलगी निधन पावली आहे, आता गुरुजींना तसदी देऊ नका.”</verse>
				<verse number="50">ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका, विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.”</verse>
				<verse number="51">त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही.</verse>
				<verse number="52">तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते. पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती निधन पावली नाही, झोपेत आहे.”</verse>
				<verse number="53">तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले.</verse>
				<verse number="54">त्याने तिच्या हाताला धरून मोठ्याने म्हटले, “मुली, ऊठ!”</verse>
				<verse number="55">तेव्हा ती जिवंत झाली व तत्काळ उठली. त्यानंतर तिला खायला द्यावे असे त्याने सांगितले.</verse>
				<verse number="56">तिचे आईवडील आश्‍चर्यचकित झाले, पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला.</verse>
				<verse number="2">देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बरे करायला पाठवताना</verse>
				<verse number="3">त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकर किंवा पैसे घेऊ नका. दोन दोन अंगरखे घेऊ नका.</verse>
				<verse number="4">ज्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा. तेथून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा.</verse>
				<verse number="5">जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.”</verse>
				<verse number="6">ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले.</verse>
				<verse number="7">त्या वेळी घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी राज्यकर्त्या हेरोदने ऐकले आणि तो फार संभ्रमात पडला; कारण योहान मेलेल्यातून उठला आहे, असे कित्येक लोक म्हणत होते.</verse>
				<verse number="8">आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते.</verse>
				<verse number="9">हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला असताना ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण असावा?” म्हणून त्याला भेटण्याची तो संधी शोधू लागला.</verse>
				<verse number="10">प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला.</verse>
				<verse number="11">हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले. त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता. ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.</verse>
				<verse number="12">दिवस उतरू लागला, तेव्हा बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकांना निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”</verse>
				<verse number="13">परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे ह्यांव्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही.”</verse>
				<verse number="14">तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांचे गट करून त्यांना बसवा.”</verse>
				<verse number="15">त्यांनी त्याप्रमाणे सर्वांना बसवले.</verse>
				<verse number="16">त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.</verse>
				<verse number="17">सर्व जण जेवून तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.</verse>
				<verse number="18">तो एकान्ती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”</verse>
				<verse number="19">त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा देणारा योहान, पण कित्येक म्हणतात, एलिया आणि आणखी काही लोक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांतील एखादा पुन्हा उठला आहे.”</verse>
				<verse number="20">त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून मानता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा मसिहा.”</verse>
				<verse number="21">हे कोणाला कळता कामा नये, असा त्याने त्यांना निक्षून आदेश दिला.</verse>
				<verse number="22">शिवाय त्याने त्यांना हेदेखील सांगितले की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, हे घडणे क्रमप्राप्त आहे.</verse>
				<verse number="23">त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझे अनुसरण करू पाहत असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व दररोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.</verse>
				<verse number="24">जो कोणी आपला जीव वाचवू पाहत असेल तो आपल्या जिवाला मुकेल. परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.</verse>
				<verse number="25">जर माणसाने सगळे जग कमावले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ?</verse>
				<verse number="26">ज्याला माझी व माझ्या वचनांची लाज वाटते, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.</verse>
				<verse number="27">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असणाऱ्यांत काही जण असे आहेत की, देवाचे राज्य पाहिल्याविना त्यांना मरण येणार नाही.”</verse>
				<verse number="28">ह्या निवेदनानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला.</verse>
				<verse number="29">तो प्रार्थना करीत असता त्याच्या चेहऱ्याचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र डोळे दिपून टाकण्याइतके पांढरेशुभ्र झाले</verse>
				<verse number="30">आणि काय आश्‍चर्य! अकस्मात मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत असता त्यांच्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="31">ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते.</verse>
				<verse number="32">पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते तरीही ते जागे राहिले होते म्हणून त्यांना येशूचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोघे पुरुष दिसले.</verse>
				<verse number="33">ते दोघे येशूपासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरुवर्य, आपण येथेच असावे हे बरे. आम्ही तीन तंबू तयार करतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” हे जे तो बोलला, त्याचे त्याला भान नव्हते.</verse>
				<verse number="34">तो हे बोलत असता एक ढग उतरून त्यांच्यावर छाया करू लागला. ते मेघात शिरले तेव्हा शिष्य भयभीत झाले.</verse>
				<verse number="35">मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका!”</verse>
				<verse number="36">ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला. मात्र शिष्य गप्प राहिले आणि जे काही त्यांनी पाहिले होते, त्यातले त्यांनी त्या दिवसांत कोणाला काहीच सांगितले नाही.</verse>
				<verse number="37">दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे तीन शिष्य त्या डोंगरावरून खाली आल्यावर पुष्कळ लोक त्याला येऊन भेटले.</verse>
				<verse number="38">तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे कृपादृष्टी वळवा. हा माझा एकुलता एक आहे.</verse>
				<verse number="39">हे बघा, एक आत्मा ह्याला धरतो तसा हा अचानक ओरडतो. तो ह्याला असा झटका देतो की, ह्याच्या तोंडाला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ क्लेश देतो व ह्याला सोडता सोडत नाही.</verse>
				<verse number="40">त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.”</verse>
				<verse number="41">येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व व़िकृत मनोवृत्तीच्या लोकांनो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू?” नंतर तो त्या माणसाला म्हणाला, “तुझ्या मुलाला इकडे आण.”</verse>
				<verse number="42">तो जवळ येत आहे, इतक्यात भुताने त्याला आपटले व मूर्च्छित अवस्थेत टाकून दिले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला निघून जाण्याचा हुकूम सोडला आणि मुलाला बरे करून त्याच्या वडिलांजवळ परत दिले.</verse>
				<verse number="43">अदेवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले! बयेशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्‍चर्य व्यक्त करीत असता, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,</verse>
				<verse number="44">“तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.”</verse>
				<verse number="45">परंतु हे वचन त्यांना समजले नाही. ते त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि ह्याविषयी त्याला विचारण्यास ते धजत नव्हते.</verse>
				<verse number="46">आपणांमध्ये मोठा कोण, ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला.</verse>
				<verse number="47">येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका लहान मुलाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले.</verse>
				<verse number="48">आणि त्यांना म्हटले, “जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. तुम्हां सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.”</verse>
				<verse number="49">योहानने म्हटले, “गुरुवर्य, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आपला अनुयायी नव्हता.”</verse>
				<verse number="50">येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका. जो तुम्हांला विरोध करत नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”</verse>
				<verse number="51">वर घेतले जाण्याचा त्याचा समय जवळ आला, तेव्हा येशूने यरुशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने आपले तोंड तिकडे वळवले.</verse>
				<verse number="52">त्याने आपणापुढे काही जण पाठवले. ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोनी लोकांच्या एका गावात गेले.</verse>
				<verse number="53">परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता.</verse>
				<verse number="54">हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आदेश द्यावा, अशी आपली इच्छा आहे काय?”</verse>
				<verse number="55">त्याने वळून त्यांना खडसावले.</verse>
				<verse number="56">नंतर येशू व त्याचे शिष्य दुसऱ्या गावास गेले.</verse>
				<verse number="57">ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.”</verse>
				<verse number="58">तो त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”</verse>
				<verse number="59">त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये”, परंतु तो म्हणाला, “प्रभो, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.”</verse>
				<verse number="60">तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”</verse>
				<verse number="61">आणखी एकाने म्हटले, “प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु प्रथम मला माझ्या कुटुंबीयांचा निरोप घेऊ द्या.”</verse>
				<verse number="62">येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता. तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले.</verse>
				<verse number="2">त्याने त्यांना म्हटले, “पीक उदंड आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत ह्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करा.</verse>
				<verse number="3">जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवीत आहे.</verse>
				<verse number="4">थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका.</verse>
				<verse number="5">ज्या घरात जाल तेथे ‘ह्या घरास शांती असो’, असे प्रथम म्हणा.</verse>
				<verse number="6">तेथे कोणी शांतिप्रिय असला, तर तुमची शांती त्याच्याठायी राहील, नसला तर तुमच्याकडे ती परत येईल.</verse>
				<verse number="7">त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामगाराला त्याचे वेतन मिळायला हवे.</verse>
				<verse number="8">कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले, तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा.</verse>
				<verse number="9">तेथे जे आजारी असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’</verse>
				<verse number="10">परंतु तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही, तर तेथील रस्त्यावर जाऊन असे म्हणा,</verse>
				<verse number="11">‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झटकून टाकतो. तथापि हे जाणून घ्या की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’</verse>
				<verse number="12">मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम नगराला परमेश्वर अधिक दया दाखवील.</verse>
				<verse number="13">हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथ्सैदा, तुझीदेखील केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्यशाली कृत्ये घडली ती सोर व सिदोन ह्यांत घडली असती, तर त्यांनी अगोदरच गोणपाट नेसून व राखेत बसून पश्‍चात्ताप केला असता व त्यांच्या पापांपासून परावृत्त झाल्याचे दाखवून दिले असते.</verse>
				<verse number="14">परंतु न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन या नगरांना परमेश्वर अधिक दया दाखवील.</verse>
				<verse number="15">हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय? नाही. तुला अधोलोकापर्यंत खाली फेकले जाईल.”</verse>
				<verse number="16">येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले, त्याचा अव्हेर करतो.”</verse>
				<verse number="17">काही काळानंतर ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभो, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”</verse>
				<verse number="18">त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला, हे मी पाहिले.</verse>
				<verse number="19">पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्‍तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हांला काहीही बाधणार नाही.</verse>
				<verse number="20">तथापि भुते तुम्हांला वश होतात, ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, यात धन्यता माना.”</verse>
				<verse number="21">त्याच घटकेस येशू पवित्र आत्म्यात उल्हसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण असेच घडावे, अशी तुझी इच्छा होती.</verse>
				<verse number="22">माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे, हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”</verse>
				<verse number="23">त्यानंतर शिष्यांकडे वळून तो त्यांना खाजगीत म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात, ते पाहणारे तुम्ही किती धन्य आहात!</verse>
				<verse number="24">मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात, ते पाहायची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली; तरी ते पाहू शकले नाहीत आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकायची त्यांनी इच्छा बाळगली; तरी त्यांना ते ऐकायला मिळाले नाही.”</verse>
				<verse number="25">एकदा पाहा, एक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरुवर्य, काय केल्याने मला शाश्वत जीवन हे वतन मिळेल?”</verse>
				<verse number="26">त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्याचा काय अर्थ लावतोस?”</verse>
				<verse number="27">त्याने उत्तर दिले, “तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”</verse>
				<verse number="28">त्याने त्याला म्हटले, “बरोबर आहे, हेच कर म्हणजे तू जगशील.”</verse>
				<verse number="29">परंतु आत्मसमर्थन करण्याच्या इच्छेने तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”</verse>
				<verse number="30">येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमहून यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहाण केली. त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.</verse>
				<verse number="31">एक याजक त्याच वाटेने जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला.</verse>
				<verse number="32">तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून पुढे गेला.</verse>
				<verse number="33">त्यानंतर एक शोमरोनी माणूस त्या वाटेने जात असता, तेथे आला आणि त्याला पाहून, त्याला त्याचा कळवळा आला.</verse>
				<verse number="34">त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली.</verse>
				<verse number="35">दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीची नाणी काढून उतारशाळेच्या व्यवस्थापकाला देऊन म्हटले, ‘ह्याला सांभाळा, ह्यापेक्षा जो काही अधिक खर्च होईल तो मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’</verse>
				<verse number="36">तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?”</verse>
				<verse number="37">तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”</verse>
				<verse number="38">येशू आणि त्याचे शिष्य पुढे जात असता तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले.</verse>
				<verse number="39">तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ त्याचे प्रबोधन ऐकत बसली होती.</verse>
				<verse number="40">मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”</verse>
				<verse number="41">प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस,</verse>
				<verse number="42">परंतु थोड्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मरियेने अधिक चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">एकदा येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने पूर्ण केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले, तसे आपणही आम्हांला शिकवा.”</verse>
				<verse number="2">तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो.</verse>
				<verse number="3">आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे</verse>
				<verse number="4">आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.”</verse>
				<verse number="5">पुढे येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन भाकरी उसन्या मागू लागतो,</verse>
				<verse number="6">‘माझा एक मित्र माझ्याकडे आला आहे व त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही’</verse>
				<verse number="7">आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला भाकरी देऊ शकत नाही.’</verse>
				<verse number="8">मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नसला तरी त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याची गरज भागवेल.</verse>
				<verse number="9">मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.</verse>
				<verse number="10">जो कोणी मागतो त्याला मिळते; जो कोणी शोधतो त्याला सापडते; जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते.</verse>
				<verse number="11">तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल?</verse>
				<verse number="12">किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?</verse>
				<verse number="13">तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती अधिक प्रमाणात पवित्र आत्मा देईल.”</verse>
				<verse number="14">एकदा येशू एक भूत काढत होता व ते मुके होते. भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="15">पण त्यांतील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बालजबूल ह्याच्या साहाय्याने हा भुते काढतो.”</verse>
				<verse number="16">दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गातले चिन्ह मागू लागले.</verse>
				<verse number="17">परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले कोणतेही राष्ट्र फार काळ टिकत नाही आणि कुटुंब आपसात भांडू लागले, तर तेही दुभंगते.</verse>
				<verse number="18">मग सैतानाच्या राज्यात फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता.</verse>
				<verse number="19">पण मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील.</verse>
				<verse number="20">परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर हे सिद्ध होते की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.</verse>
				<verse number="21">सशस्त्र व बलवान मनुष्य त्याच्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.</verse>
				<verse number="22">परंतु जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य येऊन त्याच्यावर ह्रा करतो व विजय मिळवतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती, ती तो घेतो आणि लूट म्हणून वाटून टाकतो.</verse>
				<verse number="23">जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे. जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो.</verse>
				<verse number="24">मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचे ठिकाण शोधत हिंडतो आणि ते मिळाले नाही म्हणजे म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’</verse>
				<verse number="25">तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते.</verse>
				<verse number="26">नंतर तो जाऊन आपणापेक्षा अधिक दुष्ट असे सात आत्मे बरोबर आणतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”</verse>
				<verse number="27">तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील एक स्त्री त्याला उच्च स्वरांत म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जिने स्तनपान देऊन तुला वाढवले ती धन्य!”</verse>
				<verse number="28">तथापि तो म्हणाला, “त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य.”</verse>
				<verse number="29">लोकसमुदाय एकत्र जमला तेव्हा येशू म्हणाला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्हाची अपेक्षा करते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दाखवले जाणार नाही.</verse>
				<verse number="30">जसा योना निनवेकरांना एक चिन्ह म्हणून देण्यात आला होता, तसा मनुष्याचा पुत्र आजच्या लोकांकरिता चिन्ह म्हणून देण्यात आलेला आहे.</verse>
				<verse number="31">दक्षिणेकडची राणी न्यायसमयी उठून आजच्या लोकांना दोषी ठरवील कारण शलमोनचे शहाणपण ऐकायला ती तिच्या दूरच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कुणीतरी येथे आहे.</verse>
				<verse number="32">निनवेचे लोक न्यायसमयी उभे राहून तुम्हांला दोषी ठरवतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कुणीतरी येथे आहे.</verse>
				<verse number="33">दिवा लावून तो लपवून ठेवला जात नाही किंवा धान्यमापाखाली ठेवला जात नाही तर आत येणाऱ्यांना उजेड मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.</verse>
				<verse number="34">तुझा डोळा तुझ्या शरीराचा दिवा आहे, तुझे डोळे निर्दोष असतात, तेव्हा तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते. तुझे डोळे सदोष असतात, तेव्हा तुझे शरीरही अंधकारमय असते.</verse>
				<verse number="35">म्हणून तुझ्यामधील प्रकाश हा अंधार तर नाही ना हे पाहा.</verse>
				<verse number="36">तुझे शरीर जर प्रकाशमय असेल म्हणजेच त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर सर्व काही उजळून निघेल - अगदी दिवा त्याच्या ज्योतीने तुला उजळून टाकतो तसा.”</verse>
				<verse number="37">येशूचे प्रबोधन संपल्यावर एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली. तो भोजनाला बसला असता</verse>
				<verse number="38">त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत, असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="39">परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता मात्र तुमचे अंतर्याम हावरेपणा व दुष्टपणा ह्यांनी बरबटलेले असते.</verse>
				<verse number="40">अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बाह्यांग निर्माण केले त्याने अंतरंगही केले नाही काय?</verse>
				<verse number="41">म्हणून जे तुमच्याजवळ आहे, त्याचा दानधर्म करा आणि पाहा, तुमच्याकरिता सर्वकाही शुद्ध होईल.</verse>
				<verse number="42">परंतु तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे पुदिना, कढीपत्ता व प्रत्येक प्रकारची वनस्पती ह्यांचा तुम्ही दशांश देता आणि न्याय व देवाची प्रीती यांच्याकडे मात्र कानाडोळा करता. न्याय व देवप्रीती ह्या गोष्टी आचरणात आणणे आवश्यक होते.</verse>
				<verse number="43">तुम्हां परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! सभास्थानांमध्ये मानाची आसने मिळवणे व बाजारात नमस्कार घेणे, हे तुम्हांला आवडते.</verse>
				<verse number="44">तुमची केवढी दुर्दशा होणार! ओळखू न येणाऱ्या थडग्यांसारखे तुम्ही आहात. त्यांच्यावरून माणसे नकळत चालत फिरत असतात.”</verse>
				<verse number="45">शास्त्र्यांपैकी एकाने त्याला म्हटले, “गुरुवर्य, तुम्ही असे बोलून आमचाही अपमान करता.”</verse>
				<verse number="46">तो म्हणाला, “तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही.</verse>
				<verse number="47">तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी ठार मारले!</verse>
				<verse number="48">अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार ठरता व तुमच्या पूर्वजांच्या कृत्यांना मान्यता देता; तुमच्या पूर्वजांनी तर संदेष्ट्यांना ठार मारले व तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता.</verse>
				<verse number="49">ह्यावरून देवाच्या शहाणपणाने स्पष्ट केले आहे, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यांतील कित्येकांना ते ठार मारतील व कित्येकांना छळतील.’</verse>
				<verse number="50">ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून सर्व संदेष्ट्यांचे रक्‍त,</verse>
				<verse number="51">म्हणजे हाबेलच्या रक्‍तापासून वेदी व मंदिर ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात करण्यात आला, त्याच्या रक्‍तापर्यंत जे रक्‍त सांडले गेले; त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जाईल. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जाईल.</verse>
				<verse number="52">तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ज्ञानाची किल्‍ली घेऊन गेलात, परंतु तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते, त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.”</verse>
				<verse number="53">येशू तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी त्याच्यावर दबाव आणीत पुष्कळ गोष्टींविषयी त्याला चिथवू लागले.</verse>
				<verse number="54">म्हणजेच त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात पकडावे म्हणून ते प्रयत्नशील होते.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">त्या वेळी येशूभोवती हजारो लोकांची इतकी गर्दी जमली होती की, तेथे चेंगराचेंगरी होऊ लागली. येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “परुश्यांचे खमीर म्हणजेच त्यांचा दांभिकपणा ह्याविषयी तुम्ही स्वतःला सांभाळा.</verse>
				<verse number="2">जे उघड होणार नाही, असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही, असे काही गुप्त नाही.</verse>
				<verse number="3">जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या बंद खोलीत कुजबुज करून सांगितले, ते छपरावरून घोषित केले जाईल.</verse>
				<verse number="4">माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका.</verse>
				<verse number="5">तुम्ही कोणाची भीती बाळगावी, हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो:वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याची भीती बाळगा.</verse>
				<verse number="6">पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही.</verse>
				<verse number="7">फार काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात!</verse>
				<verse number="8">मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो, त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील.</verse>
				<verse number="9">परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो, तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल.</verse>
				<verse number="10">जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल, त्याला क्षमा मिळेल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो, त्याला क्षमा मिळणार नाही.</verse>
				<verse number="11">जेव्हा तुम्हांला सभास्थाने, सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे, ह्याविषयी काळजी करू नका.</verse>
				<verse number="12">तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”</verse>
				<verse number="13">लोकसमुदायातील एकाने येशूला म्हटले, “गुरुवर्य, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”</verse>
				<verse number="14">तो त्याला म्हणाला, “गृहस्था, तुमचा न्याय करण्यासाठी किंवा वाटणी करण्यासाठी मला कोणी नेमले?”</verse>
				<verse number="15">आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली, तर ती त्याचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करील असे नाही.”</verse>
				<verse number="16">नंतर त्याने त्यांना पुढील दाखला सांगितला:“एका धनवान मनुष्याच्या जमिनीत खूप पीक आले.</verse>
				<verse number="17">त्याने मनातल्या मनात विचार केला, ‘मी काय करू? माझे उत्पन्‍न साठवायला माझ्याकडे पुरेशी जागा नाही.’</verse>
				<verse number="18">त्याने म्हटले, ‘मी असे करीन - मी माझी कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी माझे सर्व धान्य व माल साठवीन</verse>
				<verse number="19">आणि मग मी स्वतःला म्हणेन, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका भरपूर माल साठवलेला आहे. विसावा घे, खा, पी, मजा कर.’</verse>
				<verse number="20">परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू जमवून ठेवले आहे, ते कोणाचे होईल?’</verse>
				<verse number="21">जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो, परंतु देवाच्या दृष्टीने धनवान नाही त्याचे असेच आहे.”</verse>
				<verse number="22">त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, उदरनिर्वाहासाठी ज्या अन्नाची तुम्हांला गरज आहे, त्याची वा शरीरासाठी ज्या कपड्यांची तुम्हांला आवश्यकता आहे, त्यांची चिंता करत बसू नका.</verse>
				<verse number="23">अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत.</verse>
				<verse number="24">कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!</verse>
				<verse number="25">आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?</verse>
				<verse number="26">अशी ही अगदी छोटी गोष्टदेखील जर तुम्हांला जमत नाही, तर इतर गोष्टीविषयी का चिंता करत बसता?</verse>
				<verse number="27">रानफुले कशी वाढतात, ह्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता.</verse>
				<verse number="28">जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो, अल्पविश्वासी जनहो, तो किती विशेषकरून तुमची काळजी घेईल?</verse>
				<verse number="29">तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका.</verse>
				<verse number="30">जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="31">उलट, तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हांला मिळतील.</verse>
				<verse number="32">हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे.</verse>
				<verse number="33">जे तुमचे आहे, ते विकून दानधर्म करा. जीर्ण न होणाऱ्या थैल्यांमध्ये आपणासाठी स्वर्गात अक्षय धन साठवून ठेवा. तेथे चोर येत नाहीत व कसर लागत नाही.</verse>
				<verse number="34">अर्थात, जेथे तुमचे धन आहे, तेथे तुमचे मनही लागेल.</verse>
				<verse number="35">लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे.</verse>
				<verse number="36"></verse>
				<verse number="37">धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो की, तो आपली कंबर कसून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील.</verse>
				<verse number="38">तो मध्यरात्रीच्या सुमारास किंवा त्याहून उशीरा येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.</verse>
				<verse number="39">आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल, हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने आपले घर फोडू दिले नसते.</verse>
				<verse number="40">तुम्हीही तयार राहा कारण तुमची अपेक्षा नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”</verse>
				<verse number="41">पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?”</verse>
				<verse number="42">प्रभू म्हणाला, “आपल्या परिवारातील नोकरांना योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील, असा विश्वासू व विवेकी नोकर कोण?</verse>
				<verse number="43">त्याचा धनी येईल, तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.</verse>
				<verse number="44">मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.</verse>
				<verse number="45">मात्र आपला धनी येण्यास उशीर लागेल, असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांना व चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊनपिऊन मस्त होईल,</verse>
				<verse number="46">तर तो अपेक्षा करत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्या नोकराचा धनी येऊन त्याला कठोर शिक्षा करील आणि त्याची गणती अविश्वासू लोकांमध्ये करण्यात येईल.</verse>
				<verse number="47">आपल्या धन्याची इच्छा काय आहे, हे माहीत असता ज्या नोकराने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील.</verse>
				<verse number="48">परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली, त्याला कमी शिक्षा मिळेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे, त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्या स्वाधीन भरपूर केले आहे त्याच्याकडून अजूनही जास्त मागण्यात येईल.</verse>
				<verse number="49">मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते!</verse>
				<verse number="50">मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो पूर्ण होईपर्यंत मी तणावाखाली आहे!</verse>
				<verse number="51">मी पृथ्वीवर शांती प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, मी तर फूट पाडायला आलो आहे.</verse>
				<verse number="52">आत्तापासून एका कुटुंबातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल.</verse>
				<verse number="53">मुलांविरुद्ध वडील व वडिलांविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल.”</verse>
				<verse number="54">तो लोकसमुदायालाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, ‘पावसाची सर येणार’ आणि तसे घडते.</verse>
				<verse number="55">दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘कडाक्याची उष्णता होईल’ आणि तसे घडते.</verse>
				<verse number="56">अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही?</verse>
				<verse number="57">तसेच उचित काय आहे, हे तुमचे तुम्ही का ठरवत नाही?</verse>
				<verse number="58">जर तुझा वादी तुला न्यायालयात नेत असेल, तर वाटेतच त्याच्याशी समेट करायचा प्रयत्न कर, अन्यथा कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल. न्यायाधीश तुला अधिकाऱ्याच्या हाती देईल व तो तुला तुरुंगात टाकेल.</verse>
				<verse number="59">मी तुला सांगतो, अगदी पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तुझी तेथून मुळीच सुटका होणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">ज्या गालीलकरांचे रक्त पिलातने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला सांगितले.</verse>
				<verse number="2">त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांचा अशा प्रकारे अंत झाला ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते, असे तुम्हांला वाटते काय?</verse>
				<verse number="3">मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.</verse>
				<verse number="4">किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहमधील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हांला वाटते काय?</verse>
				<verse number="5">मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”</verse>
				<verse number="6">येशूने त्यांना हा दाखला सांगितला:“कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला परंतु त्याला काही आढळले नाही.</verse>
				<verse number="7">त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिराच्या झाडावर फळ पाहायला येत आहे परंतु मला काही फळ आढळत नाही म्हणून ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’</verse>
				<verse number="8">त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष ते राहू द्या, मी त्याच्या भोवती खणून खत घालीन.</verse>
				<verse number="9">त्यानंतर त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकू शकता.’”</verse>
				<verse number="10">येशू साबाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता.</verse>
				<verse number="11">तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते.</verse>
				<verse number="12">येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्‍त झाली आहेस.”</verse>
				<verse number="13">त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली.</verse>
				<verse number="14">येशूने साबाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “जेव्हा काम केले पाहिजे, असे सहा दिवस आहेत, तर त्या दिवसांत येऊन बरे व्हा. साबाथ दिवशी येऊ नका.”</verse>
				<verse number="15">परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव साबाथ दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना?</verse>
				<verse number="16">ही तर अब्राहामाची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. साबाथ दिवशी हिला या बंधनातून सोडविणे योग्य नव्हते काय?”</verse>
				<verse number="17">तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधक फजीत झाले आणि जी आश्‍चर्यकारक कृत्ये त्याच्याकडून होत होती, त्या सर्वांमुळे लोकसमुदायाला आनंद झाला.</verse>
				<verse number="18">ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ?</verse>
				<verse number="19">ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात लावला. मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांवर राहू लागले.”</verse>
				<verse number="20">तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ?</verse>
				<verse number="21">ते खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”</verse>
				<verse number="22">तो नगरोनगरी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमकडे जात होता,</verse>
				<verse number="23">तेव्हा एकाने त्याला विचारले, “प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?”</verse>
				<verse number="24">तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही.</verse>
				<verse number="25">घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोठावत म्हणू लागाल, ‘प्रभो, आमच्यासाठी दार उघड.’ तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही.’</verse>
				<verse number="26">तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुझ्यासमोर खाणेपिणे केले आणि तू आमच्या रस्त्यावर शिक्षण दिलेस.’</verse>
				<verse number="27">परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही. अहो, अधर्म करणाऱ्या सर्वांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’</verse>
				<verse number="28">तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.</verse>
				<verse number="29">त्या वेळी पूर्वेकडून व पश्चिमेकडून तसेच उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील</verse>
				<verse number="30">आणि पहा, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”</verse>
				<verse number="31">त्याच घटकेस कित्येक परुशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा कारण हेरोद तुम्हांला ठार मारायला पाहत आहे.”</verse>
				<verse number="32">त्याने त्यांना म्हटले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी माझे काम पुरे करीन.</verse>
				<verse number="33">तरीही मला आज, उद्या व परवा पुढे जात राहिले पाहिजे कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्यांचा नाश व्हावा, हे शक्य नाही.</verse>
				<verse number="34">यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगड मारणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्रित करते तसे तुझ्या मुलांबाळांना एकत्रित करण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तू मला तसे करू दिले नाहीस!</verse>
				<verse number="35">पाहा, तुमच्या प्रार्थनास्थळाची उपेक्षा होईल. मी तुम्हांला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य!’, असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">येशू एका साबाथ दिवशी परुश्यांतील एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. काही लोक त्याच्या पाळतीवर बसले होते.</verse>
				<verse number="2">तेव्हा पाय व हात सुजले होते असा एक माणूस त्याच्याकडे आला.</verse>
				<verse number="3">येशूने शास्त्र्यांना व परुश्यांना विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”</verse>
				<verse number="4">ते गप्प राहिले. येशूने त्या रुग्णाला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले.</verse>
				<verse number="5">नंतर येशू आजूबाजूच्या लोकांना म्हणाला, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला, तर तो त्याला साबाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?”</verse>
				<verse number="6">त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना.</verse>
				<verse number="7">आमंत्रित लोक मानाची आसने कशी निवडून घेत आहेत, हे पाहून येशू दाखला देऊन म्हणाला,</verse>
				<verse number="8">“कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले, तर मानाच्या आसनावर बसू नकोस. तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असण्याची शक्यता आहे.</verse>
				<verse number="9">ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’, त्या वेळी तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.</verse>
				<verse number="10">उलट, तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर बस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस.’ अशा प्रकारे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल;</verse>
				<verse number="11">कारण जो कोणी स्वतःला मोठा समजेल तो नमवला जाईल व जो स्वतः नम्र राहील, त्याचा सन्मान केला जाईल.”</verse>
				<verse number="12">त्यानंतर ज्याने त्याला आमंत्रण केले होते, त्यालादेखील येशू म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल, तेव्हा तुम्ही तुमचे मित्र, भाऊ, नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका कारण तेही कदाचित तुम्हांला आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.</verse>
				<verse number="13">परंतु तुम्ही मेजवानी द्याल, तेव्हा गरीब, लुळे, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण द्या</verse>
				<verse number="14">म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”</verse>
				<verse number="15">त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.”</verse>
				<verse number="16">त्याने त्याला म्हटले, “एका मनुष्याने संध्याकाळी जंगी मेजवानी द्यायचे ठरविले. पुष्कळांना आमंत्रण केले.</verse>
				<verse number="17">जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे’, असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले.</verse>
				<verse number="18">ते सगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’</verse>
				<verse number="19">दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’</verse>
				<verse number="20">आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’</verse>
				<verse number="21">त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वृत्त सांगितले. घरधन्याला राग आला व तो रागाने आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांवर व गल्ल्यांत जा; तेथील गरीब, व्यंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’</verse>
				<verse number="22">दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरीदेखील अजून जागा आहे.’</verse>
				<verse number="23">धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व वाटांवर जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल.</verse>
				<verse number="24">मी तुम्हांला सांगतो, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.’”</verse>
				<verse number="25">एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला,</verse>
				<verse number="26">“जो कोणी माझ्याकडे येतो पण आपले वडील, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांच्यापेक्षा आणि आपल्या स्वतःपेक्षाही माझ्यावर अधिक प्रीती करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.</verse>
				<verse number="27">जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही.</verse>
				<verse number="28">तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधायची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज घेऊन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही, हे पाहत नाही?</verse>
				<verse number="29">अन्यथा पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील,</verse>
				<verse number="30">‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’</verse>
				<verse number="31">अथवा असा कोण राजा आहे की, तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजारांचे सैन्य घेऊन माझ्यावर चाल करून येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?</verse>
				<verse number="32">जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील.</verse>
				<verse number="33">त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.</verse>
				<verse number="34">मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल?</verse>
				<verse number="35">ते जमिनीकरता किंवा खताकरता उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने हे ऐकावे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">एके दिवशी पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूचा संदेश ऐकण्यासाठी त्याच्याजवळ आले असता</verse>
				<verse number="2">परुशी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की, हा पापी लोकांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.</verse>
				<verse number="3">तेव्हा त्याने त्यांना हा दाखला सांगितला:</verse>
				<verse number="4">“तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध घेत नाही?</verse>
				<verse number="5">ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो.</verse>
				<verse number="6">घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’</verse>
				<verse number="7">त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही, अशा नव्याण्णव नीतिमान लोकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.</verse>
				<verse number="8">तसेच अशी कोण स्त्री आहे की, जिच्याजवळ दहा चांदीची नाणी असता त्यांतून एक हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत ती काळजीपूर्वक शोध घेत राहत नाही?</verse>
				<verse number="9">ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’</verse>
				<verse number="10">त्याचप्रमाणे, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद केला जातो, हे मी तुम्हांला सांगतो.”</verse>
				<verse number="11">नंतर येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते.</verse>
				<verse number="12">त्यांपैकी धाकटा वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा हिस्सा मला द्या.’ वडिलांनी त्यांच्यांत मालमत्तेची वाटणी केली.</verse>
				<verse number="13">फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला, तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली.</verse>
				<verse number="14">त्याने त्याच्याजवळ जे होते ते सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात भीषण दुष्काळ पडला. त्याला अडचण भासू लागली.</verse>
				<verse number="15">तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ काम मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले.</verse>
				<verse number="16">डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, अशी त्याला फार इच्छा होई. कारण त्याला कोणी काही देत नसे.</verse>
				<verse number="17">नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्‍नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे.</verse>
				<verse number="18">मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.</verse>
				<verse number="19">आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा.’</verse>
				<verse number="20">तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. त्यांना त्याचा कळवळा आला. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले.</verse>
				<verse number="21">मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी पात्र नाही.’</verse>
				<verse number="22">वडिलांनी दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,</verse>
				<verse number="23">पुष्ट वासरू आणून कापा, आपण आनंदोत्सव साजरा करू या;</verse>
				<verse number="24">कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ त्यानंतर ते आनंदोत्सव करू लागले.</verse>
				<verse number="25">तेव्हा त्याचा थोरला मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला. त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला.</verse>
				<verse number="26">त्याने एका चाकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’</verse>
				<verse number="27">त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’</verse>
				<verse number="28">हे ऐकल्यावर तो रागावला व आत जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले.</verse>
				<verse number="29">परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही.</verse>
				<verse number="30">मात्र ज्याने तुमची मालमत्ता वेश्यांबरोबर उधळून टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’</verse>
				<verse number="31">त्याने त्याला म्हटले, ‘मुला, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे.</verse>
				<verse number="32">तरीदेखील उत्सव आणि आनंद करणे आवश्यक आहे; कारण हा तुझा भाऊ निधन पावला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’”</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">नंतर येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: ‘एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक व्यवस्थापक होता. हा व्यवस्थापक तुमच्या संपत्तीचा दुरुपयोग करतो, असा आरोप त्याच्या मालकाजवळ करण्यात आला.</verse>
				<verse number="2">त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘मी तुझ्याविषयी हे काय ऐकतो आहे? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’</verse>
				<verse number="3">व्यवस्थापकाने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्याकडून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्यासाठी मला शक्‍ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते.</verse>
				<verse number="4">तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे, हे आत्ता मला कळते.’</verse>
				<verse number="5">त्याने आपल्या धन्याच्या कर्जदारांना बोलावले आणि पहिल्याला विचारले, ‘माझ्या धन्याकडून तू किती कर्ज घेतले आहे?’</verse>
				<verse number="6">तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्‍नास लिही.’</verse>
				<verse number="7">दुसऱ्याला म्हटले, ‘तू किती परतफेड करायची आहे?’ तो म्हणाला, ‘एक हजार पोती गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व आठशे पोती लिही.’</verse>
				<verse number="8">अप्रामाणिक व्यवस्थापकाने चतुराई दाखवली. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक त्यांच्या पिढीतल्या लोकांबरोबर व्यवहारात प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक चतुर असतात.</verse>
				<verse number="9">आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धन नाहीसे होईल तेव्हा शाश्वत निवासस्थानी तुमचे स्वागत व्हावे म्हणून तुम्ही आपणासाठी अनीतिकारक धनाने मित्र जोडा.</verse>
				<verse number="10">जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अप्रामाणिक आहे तो पुष्कळाविषयीही अप्रामाणिक आहे.</verse>
				<verse number="11">म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल?</verse>
				<verse number="12">तसेच जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे तुमचे स्वतःचे आहे, ते तुम्हांला कोण देईल?</verse>
				<verse number="13">कोणत्याही दासाला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येणार नाही.”</verse>
				<verse number="14">धनलोभी परुशी हे सर्व ऐकत होते व त्याला नाक मुरडत होते.</verse>
				<verse number="15">त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. माणसाला जे मौल्यवान वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.</verse>
				<verse number="16">योहानपर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे लेख अंमलात होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यात प्रवेश मिळविण्यासाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो.</verse>
				<verse number="17">परंतु नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे.</verse>
				<verse number="18">जो कोणी आपली पत्नी टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि पतीने टाकलेल्या स्त्रीबरोबर जो लग्न करतो, तो व्यभिचार करतो.</verse>
				<verse number="19">एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालून, दररोज थाटामाटाने चैन करत असे.</verse>
				<verse number="20">त्याच्या फाटकाजवळ फोडांनी भरलेल्या लाजर नावाच्या एका गरीब माणसाला ठेवण्यात आले होते.</verse>
				<verse number="21">त्या श्रीमंताच्या टेबलावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे, अशी त्याची इच्छा असे. तेथे कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असत.</verse>
				<verse number="22">पुढे असे झाले की, तो गरीब माणूस निधन पावला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मरण पावला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली.</verse>
				<verse number="23">तो अधोलोकात यातना भोगत असताना, त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.</verse>
				<verse number="24">तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहाम, लाजरने त्याच्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी म्हणून माझ्यावर दया करून त्याला माझ्याकडे पाठव, कारण ह्या ज्वालांत मी क्लेश भोगत आहे.’</verse>
				<verse number="25">परंतु अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू तुझ्या आयुष्यात तुझे सुख उपभोगलेस तसे लाजरने दुःख भोगले, ह्याची आठवण कर. परंतु आता त्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.</verse>
				<verse number="26">एवढेच नव्हे, तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी आहे.’</verse>
				<verse number="27">तो म्हणाला, ‘बापा, तर मग मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव.</verse>
				<verse number="28">तिथे मला पाच भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने जाऊन त्यांना सावध करावे.’</verse>
				<verse number="29">परंतु अब्राहामने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.’</verse>
				<verse number="30">तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहाम, ते पुरे आहे असे नाही, मात्र मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला, तर ते पश्चात्ताप करतील.’</verse>
				<verse number="31">तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील, तर मेलेल्यांमधूनसुद्धा कोणी उठला तरी त्यांची खातरी पटणार नाही.’”</verse>
			</chapter>
			<chapter number="17">
				<verse number="1">येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार!</verse>
				<verse number="2">त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे.</verse>
				<verse number="3">तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.</verse>
				<verse number="4">त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी तू त्याला क्षमा करायला हवी.”</verse>
				<verse number="5">प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”</verse>
				<verse number="6">प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीच्या झाडाला ‘तू मुळासकट उपटून समुद्रात लावले जा’, असे तुम्ही सांगताच ते तुमचे ऐकेल.</verse>
				<verse number="7">तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लवकर येऊन जेवायला बस?’</verse>
				<verse number="8">किंबहुना ‘माझे जेवण तयार कर. माझे खाणेपिणे होईपर्यंत कमरेभोवती बाह्यवस्त्र बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी’, असे तो त्याला म्हणणार नाही काय?</verse>
				<verse number="9">सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे आभार मानतो काय?</verse>
				<verse number="10">त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे’, असे म्हणा.”</verse>
				<verse number="11">येशू यरुशलेमकडे जात असता शोमरोन व गालीलच्या सरहद्दीवरून गेला.</verse>
				<verse number="12">तो एका गावात जात असता कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला दूरू न भेटले.</verse>
				<verse number="13">ते ओरडून म्हणाले, “अहो येशू, प्रभो, आमच्यावर दया करा.”</verse>
				<verse number="14">त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा.” त्यानंतर असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.</verse>
				<verse number="15">त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला.</verse>
				<verse number="16">येशूचे आभार मानून तो त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता.</verse>
				<verse number="17">येशूने म्हटले, “दहा जण शुद्ध झाले होते ना? इतर नऊ जण कुठे आहेत?</verse>
				<verse number="18">हा परका एकटाच देवाचा गौरव करायला परत आला, हे कसे काय?”</verse>
				<verse number="19">येशूने त्याला म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”</verse>
				<verse number="20">देवाचे राज्य केव्हा येईल, असे परुश्यांनी त्याला विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही.</verse>
				<verse number="21">‘पाहा, ते येथे आहे’ किंवा ‘ते तेथे आहे’ असे म्हणता येत नाही. पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”</verse>
				<verse number="22">पुढे त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा बाळगाल, पण तो दिवस तुम्हांला दिसणार नाही.</verse>
				<verse number="23">काही जण तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, तो येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका.</verse>
				<verse number="24">वीज जशी आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.</verse>
				<verse number="25">तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे, हे क्रमप्राप्त आहे.</verse>
				<verse number="26">नोहाच्या दिवसांत झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.</verse>
				<verse number="27">नोहा तारवात गेला आणि जलप्रलय येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न लावून देत होते.</verse>
				<verse number="28">तसेच ज्याप्रमाणे लोटच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल, म्हणजे ते लोक खातपीत होते, खरेदी करत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते.</verse>
				<verse number="29">परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला.</verse>
				<verse number="30">मनुष्याचा पुत्र प्रकट होईल, त्या दिवशी असेच होईल.</verse>
				<verse number="31">त्या दिवशी जो छपरावर असेल, त्याने आपले सामान नेण्याकरिता खाली घरात जाऊ नये. तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी घराकडे परत जायला निघू नये.</verse>
				<verse number="32">लोटच्या पत्नीची आठवण करा.</verse>
				<verse number="33">जो कोणी आपला जीव वाचवायचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल, तो आपला जीव वाचवील.</verse>
				<verse number="34">मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका खाटेवर दोघे असतील. एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल.</verse>
				<verse number="35">दोघी मिळून दळत असतील. एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.</verse>
				<verse number="36">[दोन पुरुष शेतात असतील. एक घेतला जाईल, दुसरा तेथेच ठेवला जाईल.]”</verse>
				<verse number="37">त्यांनी त्याला म्हटले, “प्रभो, कुठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे मढे तेथे गिधाडे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="18">
				<verse number="1">शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा:</verse>
				<verse number="2">‘एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे.</verse>
				<verse number="3">त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन आर्जवून विनंती करत असे, ‘माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’</verse>
				<verse number="4">काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही,</verse>
				<verse number="5">तरी ही विधवा मला भंडावून सोडते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन माझा जीव खाईल.’”</verse>
				<verse number="6">प्रभूने म्हटले, “दुष्ट न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.</verse>
				<verse number="7">तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?</verse>
				<verse number="8">मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”</verse>
				<verse number="9">आपण नीतिमान आहोत, असा स्वतःविषयी भरवसा बाळगून जे कित्येक जण इतर सर्वांना तुच्छ मानत होते; त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा:</verse>
				<verse number="10">‘एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करायला मंदिरात गेले.</verse>
				<verse number="11">परुश्याने एकटे निराळे उभे राहून मनातल्या मनात अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लोभी, अप्रामाणिक आणि व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.</verse>
				<verse number="12">मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश दान देतो.’</verse>
				<verse number="13">जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायलादेखील न धजता आपला ऊर बडवीत प्रार्थना करत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’</verse>
				<verse number="14">मी तुम्हांला सांगतो, त्या परुशी माणसापेक्षा हा जकातदार नीतिमान ठरून आपल्या घरी परतला. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्याला लीन केले जाईल आणि स्वतःला लीन करणाऱ्याला उंच केले जाईल.”</verse>
				<verse number="15">येशूने स्पर्श करावा म्हणून काही लोकांनी त्यांची तान्ही बाळेदेखील त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले.</verse>
				<verse number="16">तेव्हा येशूने बालकांना स्वतःजवळ बोलावून म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका. देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.</verse>
				<verse number="17">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात मुळीच प्रवेश होणार नाही.”</verse>
				<verse number="18">एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?”</verse>
				<verse number="19">येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही.</verse>
				<verse number="20">तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.”</verse>
				<verse number="21">तो म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.”</verse>
				<verse number="22">हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझे अनुकरण कर.”</verse>
				<verse number="23">पण हे ऐकून तो अतिशय खिन्‍न झाला कारण तो फार श्रीमंत होता.</verse>
				<verse number="24">त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!</verse>
				<verse number="25">श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”</verse>
				<verse number="26">ज्यांनी हे ऐकले त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”</verse>
				<verse number="27">त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.”</verse>
				<verse number="28">पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.”</verse>
				<verse number="29">येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,</verse>
				<verse number="30">त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात शाश्वत जीवन मिळेल.”</verse>
				<verse number="31">त्याने बारा शिष्यांना बाजूला घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण यरुशलेम येथे चाललो आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत.</verse>
				<verse number="32">त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल. त्याची कुचेष्टा व विटंबना होईल. त्याच्यावर थुंकतील.</verse>
				<verse number="33">त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.”</verse>
				<verse number="34">शिष्यांना मात्र ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही. खरे म्हणजे हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते म्हणून सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजल्या नव्हत्या.</verse>
				<verse number="35">येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता.</verse>
				<verse number="36">त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय चालले आहे?”</verse>
				<verse number="37">त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.”</verse>
				<verse number="38">तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”</verse>
				<verse number="39">त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”</verse>
				<verse number="40">तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले,</verse>
				<verse number="41">“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी मिळावी.”</verse>
				<verse number="42">येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”</verse>
				<verse number="43">तत्क्षणी त्याला दृष्टी मिळाली आणि तो देवाचा महिमा वर्णन करीत त्याच्यामागे चालू लागला. हे पाहून सर्व लोकांनी देवाचे स्तवन केले.</verse>
			</chapter>
			<chapter number="19">
				<verse number="1">येशूने यरीहो नगरात प्रवेश केला व तेथून तो पुढे जात होता.</verse>
				<verse number="2">तेथे पाहा, जक्कय नावाचा एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार होता व श्रीमंत होता.</verse>
				<verse number="3">येशू कोण आहे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना कारण तो ठेंगणा होता.</verse>
				<verse number="4">म्हणून पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी तो एका उंबराच्या झाडावर चढला कारण येशू त्या वाटेने जाणार होता.</verse>
				<verse number="5">येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”</verse>
				<verse number="6">त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.</verse>
				<verse number="7">हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.</verse>
				<verse number="8">जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभो, पाहा, माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मी गोरगरिबांना देईन व अन्यायाने मी कोणाचे काही घेतले असेल, तर ते चौपट परत करीन.”</verse>
				<verse number="9">येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.</verse>
				<verse number="10">मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला व तारायला आला आहे.”</verse>
				<verse number="11">लोक ह्या गोष्टी ऐकत असता येशूने त्यांना एक दाखला सांगितला. कारण तो यरुशलेमजवळ पोहोचला होता आणि देवाचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे, असे त्यांना वाटत होते.</verse>
				<verse number="12">तो म्हणाला, “आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने एक उमराव दूर देशी जायला निघाला.</verse>
				<verse number="13">जाण्यापूर्वी त्याने त्याच्या दहा दासांना बोलावले व त्यांना प्रत्येकी एकेक सोन्याची मोहर देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत हिच्या साहाय्याने व्यापार करा.’</verse>
				<verse number="14">त्याच्या नगरातले लोक त्याचा द्वेष करीत असत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग प्रतिनिधी पाठवून कळवले, ‘ह्याने आम्हांवर राज्य करावे, अशी आमची इच्छा नाही.’</verse>
				<verse number="15">तो राजा होऊन परत आल्यावर त्याच्या दासांनी व्यापारात काय काय मिळविले, हे पाहावे म्हणून त्याने त्यांना स्वतःकडे बोलावण्यास सांगितले.</verse>
				<verse number="16">पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’</verse>
				<verse number="17">त्याने त्याला म्हटले, ‘शाब्बास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर मी तुला अधिकार देईन.’</verse>
				<verse number="18">नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’</verse>
				<verse number="19">त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही मी पाच नगरांवर अधिकार देईन.’</verse>
				<verse number="20">त्यानंतर आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा तुमची मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती.</verse>
				<verse number="21">कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’</verse>
				<verse number="22">तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांत तुझा न्याय करतो. मी कठोर माणूस आहे, जे मी ठेवले नाही, ते घेतो व जे मी पेरले नाही, त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते ना?</verse>
				<verse number="23">मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’</verse>
				<verse number="24">त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’</verse>
				<verse number="25">ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’</verse>
				<verse number="26">‘मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ काहीच नाही, त्याचे जे आहे, तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल.</verse>
				<verse number="27">परंतु ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते, त्यांना येथे आणा व माझ्यासमोर ठार मारा.’”</verse>
				<verse number="28">ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता.</verse>
				<verse number="29">ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात त्याच्याजवळ असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले,</verse>
				<verse number="30">“तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे पोहोचताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू तुम्हांला बांधलेले आढळेल. ते सोडून आणा.</verse>
				<verse number="31">तुम्ही ते का सोडता, असे कोणी तुम्हांला विचारले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा.”</verse>
				<verse number="32">ज्यांना पाठवले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले.</verse>
				<verse number="33">ते शिंगरू सोडत असता त्याचा धनी त्यांना म्हणाला, “शिंगरू का सोडता?”</verse>
				<verse number="34">“प्रभूला ह्याची गरज आहे”, त्यांनी उत्तर दिले.</verse>
				<verse number="35">त्यांनी ते येशूकडे आणले. आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले.</verse>
				<verse number="36">तो पुढे जात असता लोक त्यांची वस्त्रे वाटेवर पसरीत गेले.</verse>
				<verse number="37">तो ऑलिव्ह डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य आणि लोकसमुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंदित होऊन उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,</verse>
				<verse number="38">“प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो! स्वर्गात शांती. आणि सर्वोच्च स्वर्गात प्रभूला गौरव.”</verse>
				<verse number="39">लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.”</verse>
				<verse number="40">त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, ते गप्प राहिले, तर धोंडे ओरडू लागतील.”</verse>
				<verse number="41">येशू नगरीजवळ आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्याकरिता विलाप करीत म्हणाला,</verse>
				<verse number="42">“जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आत्ता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.</verse>
				<verse number="43">पुढे तुला असे दिवस येणार आहेत की, त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील; तुझा चहूकडून कोंडमारा करतील.</verse>
				<verse number="44">तुला व तुझ्या लोकांना धुळीस मिळवतील. तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत कारण तुझ्यावर कृपादृष्टी वळवल्याचा समय तू ओळखला नाहीस.”</verse>
				<verse number="45">नंतर येशू मंदिरात गेला व तेथे जे विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला.</verse>
				<verse number="46">तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घराला प्रार्थनागृह म्हटले जाईल’, असा धर्मशास्त्रलेख आहे, परंतु त्याचा तुम्ही लुटारूंचा अड्डा केला आहे.”</verse>
				<verse number="47">तो मंदिरात दररोज प्रबोधन करीत असे. मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करायला पाहत होते.</verse>
				<verse number="48">परंतु काय करावे, हे त्यांना सुचेना कारण सर्व लोक त्याची शिकवण मन लावून ऐकत असत.</verse>
			</chapter>
			<chapter number="20">
				<verse number="1">एके दिवशी येशू मंदिरात शिकवण देत व शुभवर्तमान सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलजनांसह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले,</verse>
				<verse number="2">“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण, हे आम्हांला सांगा.”</verse>
				<verse number="3">त्याने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. त्याचे मला उत्तर द्या.</verse>
				<verse number="4">योहानचा बाप्तिस्मा स्वर्गीय होता किंवा मानवी होता?”</verse>
				<verse number="5">ते आपसात विचार करून म्हणाले, “स्वर्गीय असे म्हणावे तर हा म्हणेल, “तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’</verse>
				<verse number="6">आणि मानवी असे म्हणावे तर सर्व लोक आपल्यावर धोंडमार करतील कारण योहान संदेष्टा होता, अशी त्यांची खातरी पटलेली आहे.”</verse>
				<verse number="7">म्हणून त्यांनी उत्तर दिले, “तो कोणत्या प्रकारचा होता, हे आम्हांला ठाऊक नाही.”</verse>
				<verse number="8">नंतर येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो, हे मीसुद्धा तुम्हांला सांगणार नाही.”</verse>
				<verse number="9">येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला.</verse>
				<verse number="10">कुळांनी त्याला द्राक्षमळ्यातील त्याच्या हिश्शाची फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले. परंतु कुळांनी त्याला मारहाण करून रिकामे पाठवून दिले.</verse>
				<verse number="11">पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवले. त्यालादेखील त्यांनी मारहाण करून व त्याचा अपमान करून काही न देता पाठवून दिले.</verse>
				<verse number="12">त्याने तिसऱ्याला पाठवले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर हाकलून लावले.</verse>
				<verse number="13">शेवटी द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी माझ्या प्रिय पुत्राला पाठवतो. निदान ते त्याचा मान राखतील’,</verse>
				<verse number="14">परंतु कुळे त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाली, ‘हा तर वारस आहे, ह्याला आपण ठार मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’</verse>
				<verse number="15">त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील?”, येशूने विचारले.</verse>
				<verse number="16">“तो येऊन त्या कुळांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांकडे सोपवून देईल”, येशूनेच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हे ऐकून लोक म्हणाले, “असे न होवो.”</verse>
				<verse number="17">येशूने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर मग ‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे’, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, त्याचा अर्थ काय?</verse>
				<verse number="18">जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगा भुगा करून टाकील.”</verse>
				<verse number="19">शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकायच्या विचारात होते, कारण हा दाखला त्याने त्यांना उद्देशून सांगितला, हे ते समजले. पण त्यांना लोकांची भीती वाटली.</verse>
				<verse number="20">म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात पकडून रोमन राज्यपालांच्या अधिकाराखाली व सत्तेखाली आणावे म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग केलेले हेर त्याच्याकडे पाठवले.</verse>
				<verse number="21">त्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या बोलण्यात व शिकवणीत आपण पक्षपात करीत नसता. किंबहुना आपण देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता, हे आम्हांला माहीत आहे.</verse>
				<verse number="22">आम्ही कैसरला कर द्यावा, हे योग्य आहे की नाही?”</verse>
				<verse number="23">तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा.</verse>
				<verse number="24">ह्याच्यावरील मुद्रा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसरचा.”</verse>
				<verse number="25">त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.”</verse>
				<verse number="26">त्यांना त्याला लोकांसमक्ष त्याच्या बोलण्यात धरता येईना. त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.</verse>
				<verse number="27">पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले,</verse>
				<verse number="28">‘गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ त्याची पत्नी जिवंत असता निःसंतान निधन पावला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा.</verse>
				<verse number="29">एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला.</verse>
				<verse number="30">मग दुसऱ्याने तिच्याबरोबर विवाह केला व तिसऱ्यानेदेखील.</verse>
				<verse number="31">ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे निधन पावले.</verse>
				<verse number="32">शेवटी ती स्त्रीदेखील देवाघरी गेली.</verse>
				<verse number="33">तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल; ती तर त्या सातांचीही पत्नी झाली होती.”</verse>
				<verse number="34">येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात.</verse>
				<verse number="35">परंतु त्या युगासाठी व मेलेल्यांतून पुनरुत्थान प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील, ते लग्न करणार नाहीत व लग्न लावून देणार नाहीत.</verse>
				<verse number="36">खरे म्हणजे ते पुढे मरू शकत नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.</verse>
				<verse number="37">मोशेनेदेखील झुडुपांच्या गोष्टीत प्रभूला अब्राहामचा परमेश्वर, इसहाकचा परमेश्वर याकोबचा परमेश्वर असे म्हणून मेलेले उठवले जातात, हे दर्शविले आहे.</verse>
				<verse number="38">तो मृतांचा नव्हे, तर जिवंतांचा परमेश्वर आहे कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”</verse>
				<verse number="39">हे ऐकून शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरुजी, आपण ठीक बोललात.”</verse>
				<verse number="40">त्यानंतर ते त्याला आणखी काहीही विचारायला धजले नाहीत.</verse>
				<verse number="41">त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात?</verse>
				<verse number="42">कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो: प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले,</verse>
				<verse number="43">‘मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’</verse>
				<verse number="44">दावीद अशा प्रकारे त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?”</verse>
				<verse number="45">सर्व लोक ऐकत असता त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले,</verse>
				<verse number="46">“शास्त्री लोकांविषयी सावध असा, त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायची हौस असते. बाजारात नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवानीत सन्मानाच्या जागा त्यांना आवडतात.</verse>
				<verse number="47">ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”</verse>
			</chapter>
			<chapter number="21">
				<verse number="1">येशूने दृष्टी वर करून धनवानांना मंदिराच्या दानपेटीत दाने टाकताना पाहिले.</verse>
				<verse number="2">एका गरीब विधवेलाही तेथे दोन तांब्याची छोटी नाणी टाकताना त्याने पाहिले.</verse>
				<verse number="3">तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे.</verse>
				<verse number="4">कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर तिच्या गरीब अवस्थेत तिच्याकडे उपजीविकेसाठी जे काही होते, ते सर्व टाकले आहे.”</verse>
				<verse number="5">सुरेख दगडांनी व देवाला समर्पित केलेल्या भेटवस्तूंनी मंदिर कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत होते. येशू म्हणाला,</verse>
				<verse number="6">“असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही.”</verse>
				<verse number="7">तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, ह्या गोष्टी केव्हा घडतील? ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील, त्या काळाचे चिन्ह काय?”</verse>
				<verse number="8">तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका.</verse>
				<verse number="9">जेव्हा तुम्ही लढाया व बंड यांच्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण ह्या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे. तथापि एवढ्यात शेवट होत नाही.”</verse>
				<verse number="10">तो पुढे म्हणाला, “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.</verse>
				<verse number="11">मोठमोठे भूकंप होतील. जागोजागी साथी येतील व दुष्काळ पडतील. भयंकर उत्पात व आकाशात महान चिन्हे घडून येतील.</verse>
				<verse number="12">परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. तुमचा छळ करतील. तुम्हांला चौकशीसाठी सभास्थानांच्या स्वाधीन करतील. तुरुंगात डांबतील. माझ्या नावाकरिता राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे हजर करतील.</verse>
				<verse number="13">ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल.</verse>
				<verse number="14">त्या वेळी उत्तर कसे द्यावे, ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा.</verse>
				<verse number="15">मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की, तिला रोखण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.</verse>
				<verse number="16">आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील. तुमच्यांतील कित्येकांना ठार मारतील.</verse>
				<verse number="17">माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील.</verse>
				<verse number="18">तरीदेखील तुमच्या डोक्यावरचा एक केसही गळणार नाही.</verse>
				<verse number="19">टिकून राहा म्हणजे तुम्ही स्वतःचा बचाव कराल.</verse>
				<verse number="20">मात्र यरुशलेम नगरीस सैन्यांचा वेढा पडत आहे, असे तुम्ही पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे, असे समजा.</verse>
				<verse number="21">त्या समयी जे यहुदियात असतील, त्यांनी डोंगरात पळून जावे. जे यरुशलेममध्ये असतील, त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी नगराच्या आत येऊ नये.</verse>
				<verse number="22">धर्मशास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे न्यायनिवाड्याचे दिवस असतील.</verse>
				<verse number="23">त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर व अंगावर पाजणाऱ्या असतील, त्यांची केवढी दुर्दशा होणार! देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल.</verse>
				<verse number="24">काही तलवारीच्या धारेला बळी पडतील आणि इतरांना बंदिवान करून अन्य राष्ट्रांमध्ये नेण्यात येईल. परराष्ट्रीयांचे वर्चस्व संपुष्टात येईल. तोवर परराष्ट्रीय यरुशलेम नगरास पायांखाली तुडवतील.</verse>
				<verse number="25">त्या समयी सूर्य, चंद्र व तारे ह्यांत विलक्षण गोष्टी घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे गोंधळून जाऊन पेचात पडतील.</verse>
				<verse number="26">भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील शक्‍तिस्थाने डळमळतील.</verse>
				<verse number="27">त्या काळी मनुष्याचा पुत्र सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने मेघांत येताना लोकांच्या दृष्टीस पडेल.</verse>
				<verse number="28">ह्या घटनांचा आरंभ होऊ लागेल, तेव्हा न डगमगता उभे राहा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आलेला असेल.”</verse>
				<verse number="29">नंतर येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे ह्यांच्याकडे पहा.</verse>
				<verse number="30">त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे.</verse>
				<verse number="31">तसेच ह्या घडामोडी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की, देवाचे राज्य जवळ आले आहे.</verse>
				<verse number="32">मी निश्चितपणे सांगतो, ही पिढी नष्ट होण्यापूर्वी ह्या सर्व घटना घडतील.</verse>
				<verse number="33">आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत.</verse>
				<verse number="34">तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित चैनबाजी, दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला अकस्मात गाठील.</verse>
				<verse number="35">तो अवघ्या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल.</verse>
				<verse number="36">तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व घडामोडी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”</verse>
				<verse number="37">येशू दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात, तेथे राहात असे</verse>
				<verse number="38">आणि सर्व लोक त्याचे प्रबोधन ऐकण्यास भल्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत.</verse>
			</chapter>
			<chapter number="22">
				<verse number="1">त्या वेळी बेखमीर भाकरीचा सण, ज्याला ओलांडण सण म्हणतात, तो जवळ आला होता.</verse>
				<verse number="2">मुख्य याजक व शास्त्री हे येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी विचार करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.</verse>
				<verse number="3">त्यानंतर बारा प्रेषितांपैकी ज्याला इस्कर्योतदेखील म्हणत, त्या यहुदामध्ये सैतान शिरला.</verse>
				<verse number="4">तो मुख्य याजक व मंदिराच्या रक्षकांचे अधिकारी ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरून द्यावे, ह्याविषयी त्याने त्यांच्याशी मसलत केली</verse>
				<verse number="5">ते खूश होऊन त्यांनी त्याला पैसे देण्याचे कबूल केले.</verse>
				<verse number="6">त्याने होकार दिला आणि लोकांना कळणार नाही अशा वेळी त्यांच्या हाती येशूला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.</verse>
				<verse number="7">ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.</verse>
				<verse number="8">येशूने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”</verse>
				<verse number="9">त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?”</verse>
				<verse number="10">त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल, त्या घरात त्याच्यामागून जा</verse>
				<verse number="11">आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, “गुरूजींनी तुम्हांला विचारले आहे की, मला माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करता येईल, अशी खोली कोठे आहे?’</verse>
				<verse number="12">तो तुम्हांला वरच्या मजल्यावर सज्ज केलेली प्रशस्त खोली दाखवील. तेथे तयारी करा.”</verse>
				<verse number="13">ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. तेथे त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.</verse>
				<verse number="14">ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.</verse>
				<verse number="15">तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडण सणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे.</verse>
				<verse number="16">मी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात ह्या भोजनाची परिपूर्ती होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”</verse>
				<verse number="17">त्यानंतर प्याला घेऊन व देवाचे आभार मानून तो म्हणाला, “हा घ्या आणि तुमच्यांत वाटा.</verse>
				<verse number="18">मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य येईपर्यंत हा द्राक्षारस ह्यापुढे मी पिणार नाही.”</verse>
				<verse number="19">मग त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले व ती मोडली आणि ती त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पण केले आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”</verse>
				<verse number="20">त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्‍तात प्रस्थापित केलेला नवा करार आहे. हे रक्‍त तुमच्यासाठी ओतले आहे.</verse>
				<verse number="21">पण पाहा, मला दगा देणारा माझ्याबरोबर आहे आणि त्याचा हात टेबलावर आहे.</verse>
				<verse number="22">मनुष्याचा पुत्र अगोदरच ठरविण्यात आल्याप्रमाणे मृत्यू स्वीकारतो खरा परंतु जो त्याचा विश्वासघात करतो, त्याचा धिक्कार असो!”</verse>
				<verse number="23">तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे, तो कोण असावा, ह्याचा ते आपसात विचार करू लागले.</verse>
				<verse number="24">आपल्यामध्ये सर्वांत मोठा कोण मानला जावा, ह्याविषयी शिष्यांमध्ये वाद झाला.</verse>
				<verse number="25">त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्या प्रजेवर प्रभुत्व चालवितात आणि अधिकारी लोकांना उपकारकर्ते म्हटले जाते.</verse>
				<verse number="26">परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुमच्यामध्ये जो सर्वांत मोठा, तो सर्वांत धाकट्यासारखा व नेतृत्व करणारा हा सेवा करणाऱ्यासारखा असावा.</verse>
				<verse number="27">मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? अर्थात, भोजनास बसणारा. मी मात्र तुमच्यामध्ये सेवा करणारा असा आहे.</verse>
				<verse number="28">माझ्या सत्त्वपरीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्ही आहात.</verse>
				<verse number="29">माझ्या पित्याने जसा मला राजाधिकार दिला आहे, तसा मीही तुम्हांला देईन.</verse>
				<verse number="30">तुम्ही माझ्या राज्यात माझ्या टेबलावर खाल व प्याल आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय कराल.”</verse>
				<verse number="31">प्रभू पुढे म्हणाला, “शिमोन, शिमोन, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने परवानगी मिळवली आहे.</verse>
				<verse number="32">परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे. तू माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”</verse>
				<verse number="33">तो त्याला म्हणाला, “प्रभो, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे.”</verse>
				<verse number="34">तो म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे तीन वेळा तू नाकारशील, तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”</verse>
				<verse number="35">नंतर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी तुम्हांला थैली, झोळी व वहाणा घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”</verse>
				<verse number="36">येशू म्हणाला, “पण आता तर ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी. तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला कोट विकून ती विकत घ्यावी.</verse>
				<verse number="37">मी तुम्हांला सांगतो, तो गुन्हेगारांत गणलेला होता, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो माझ्या बाबतीत पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्याविषयी लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”</verse>
				<verse number="38">ते म्हणाले, “प्रभो, पाहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “पुरे.”</verse>
				<verse number="39">तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे ऑलिव्ह डोंगराकडे गेला. त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.</verse>
				<verse number="40">त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”</verse>
				<verse number="41">मग सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो त्यांच्यापासून दूर गेला, तेथे त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली:</verse>
				<verse number="42">‘हे पित्या, तुझी इच्छा असली, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”</verse>
				<verse number="43">[तेव्हा स्वर्गातील एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. त्याने येशूला शक्ती दिली.</verse>
				<verse number="44">त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्‍ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]</verse>
				<verse number="45">प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला, तेव्हा ते दुःखावेगाने झोपी गेलेले त्याला आढळले.</verse>
				<verse number="46">तो त्यांना म्हणाला, “झोपलात का? तुम्ही मोहात पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”</verse>
				<verse number="47">येशू बोलत असतानाच लोकसमुदाय आला. यहुदा नावाचा बारामधला एक जण त्याचे नेतृत्व करीत होता. तो येशूचे चुंबन घ्यायला त्याच्याजवळ आला.</verse>
				<verse number="48">येशू त्याला म्हणाला, “यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?”</verse>
				<verse number="49">त्याच्या सभोवती जे होते, ते आता काय होणार, हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभो, आम्ही तलवारी चालवू काय?”</verse>
				<verse number="50">त्यांच्यातील एकाने उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला.</verse>
				<verse number="51">परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.</verse>
				<verse number="52">जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडीलजन त्याच्यावर चालून आले होते, त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय?</verse>
				<verse number="53">मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे त्यावेळी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची घटका आहे, राज्य अंधाराचे आहे.”</verse>
				<verse number="54">त्यांनी येशूला पकडून उच्च याजकांच्या घरी नेले. पेत्र दुरून त्यांच्या मागोमाग चालू लागला.</verse>
				<verse number="55">ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, पेत्र त्यांच्यामध्ये जाऊन बसला.</verse>
				<verse number="56">एका दासीने त्याला विस्तवाजवळ बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हादेखील येशूबरोबर होता.”</verse>
				<verse number="57">पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.”</verse>
				<verse number="58">काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूसुद्धा त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “भल्या माणसा, मी त्यांच्यातला नाही.”</verse>
				<verse number="59">सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणू लागला, “खरोखर हादेखील येशूबरोबर होता कारण हासुद्धा गालीलकर आहे!”</verse>
				<verse number="60">परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला माहीत नाही.” असे तो बोलत आहे, इतक्यात कोंबडा आरवला.</verse>
				<verse number="61">प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली. आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले.</verse>
				<verse number="62">तो बाहेर जाऊन ओक्साबोक्शी रडला.</verse>
				<verse number="63">ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.</verse>
				<verse number="64">त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, “अरे संदेष्ट्या, सांग, तुला कोणी मारले?”</verse>
				<verse number="65">तसेच नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची अवहेलना केली.</verse>
				<verse number="66">उजाडल्यावर लोकांचे वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले. ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले,</verse>
				<verse number="67">“तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी जर तुम्हांला तसे सांगितले, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही</verse>
				<verse number="68">आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही.</verse>
				<verse number="69">तथापि ह्यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल.”</verse>
				<verse number="70">तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता, मी आहे.”</verse>
				<verse number="71">तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीची काय गरज? आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="23">
				<verse number="1">ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूला पिलातकडे नेले.</verse>
				<verse number="2">ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसरला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे, असे म्हणताना आम्हांला आढळला.”</verse>
				<verse number="3">पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.”</verse>
				<verse number="4">मुख्य याजकांना व लोकसमुदायाला पिलाताने म्हटले, “मला ह्या माणसात काही दोष आढळत नाही.”</verse>
				<verse number="5">परंतु हे ऐकून ते अधिकच उग्र आविर्भावाने म्हणाले, “ह्याने गालीलपासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देत लोकांना चिथवले आहे.”</verse>
				<verse number="6">हे ऐकून पिलातने हा मनुष्य गालीलकर आहे काय, असे विचारले,</verse>
				<verse number="7">तो हेरोदच्या अंमलातला आहे, असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदकडे पाठवले कारण तोही त्या दिवसांत यरुशलेममध्ये होता.</verse>
				<verse number="8">येशूला पाहून हेरोदला फार आनंद झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे, अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. येशूच्या हातून घडलेले एखादे चिन्ह पाहायला मिळेल, अशी त्याला आशा होती.</verse>
				<verse number="9">त्याने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही.</verse>
				<verse number="10">मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते.</verse>
				<verse number="11">हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत लांब झगा त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले.</verse>
				<verse number="12">त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते.</verse>
				<verse number="13">मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना पिलातने एकत्र बोलावून म्हटले,</verse>
				<verse number="14">“हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले. जो आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता, त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या माणसात काहीही दोष सापडत नाही.</verse>
				<verse number="15">हेरोदलाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे. ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही</verse>
				<verse number="16">म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.”</verse>
				<verse number="17">[त्या सणात त्यांच्याकरता तुरुंगातील एकाला सोडून देण्याची प्रथा होती.]</verse>
				<verse number="18">सर्वांनी ओरडत मागणी केली, “ह्याला घेऊन जा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”</verse>
				<verse number="19">बरब्बा हा शहरात झालेले बंड आणि खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता.</verse>
				<verse number="20">येशूला सोडावे, ह्या इच्छेने पिलातने पुन्हा त्यांच्यासमोर बोलणी केली.</verse>
				<verse number="21">परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले.</verse>
				<verse number="22">पिलात त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, “का बरे? त्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला देहान्ताची शिक्षा द्यावी असा कोणताही गुन्हा त्याने केलेला नाही, म्हणून ह्याला शिपायांकडून फटके मारून मी सोडून देतो.”</verse>
				<verse number="23">तरीही त्याला क्रुसावर खिळायला हवे, असा त्यांनी उच्च स्वरात ओरडून आग्रह धरला. शेवटी त्यांच्या ओरडण्याला यश आले.</verse>
				<verse number="24">त्यांच्या मागणीप्रमाणे व्हावे, असा पिलातने निकाल दिला.</verse>
				<verse number="25">नंतर बंड व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याच्यासाठी त्यांनी मागणी केली होती, त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या हवाली केले.</verse>
				<verse number="26">शिपाई येशूला घेऊन जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर माणूस गावातून शहराकडे जात होता. त्याला त्यांनी वेठीस धरून त्याच्यावर क्रूस लादला आणि त्याला तो येशूच्या मागे वाहण्यास लावले.</verse>
				<verse number="27">येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता.</verse>
				<verse number="28">येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा.</verse>
				<verse number="29">पाहा, असे दिवस येतील की, त्या वेळी लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुले प्रसवली नाहीत व ज्यांनी मुलांना स्तनपान केले नाही त्या स्त्रिया धन्य आहेत.’</verse>
				<verse number="30">त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’</verse>
				<verse number="31">ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल?”</verse>
				<verse number="32">येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले.</verse>
				<verse number="33">ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले.</verse>
				<verse number="34">[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.]</verse>
				<verse number="35">लोक पाहत उभे होते. अधिकारीही कुचेष्टा करीत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे.”</verse>
				<verse number="36">शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला,</verse>
				<verse number="37">“तू यहुदी लोकांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”</verse>
				<verse number="38">‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती.</verse>
				<verse number="39">क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करीत म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला व आम्हांला वाचव.”</verse>
				<verse number="40">परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?</verse>
				<verse number="41">आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अपराध केला नाही.”</verse>
				<verse number="42">तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.”</verse>
				<verse number="43">येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीने सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”</verse>
				<verse number="44">दुपारी सुमारे बाराची वेळ झाली आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला.</verse>
				<verse number="45">पवित्र स्थानातील पडदा मधोमध दुभंगला.</verse>
				<verse number="46">मग येशूने मोठ्याने आरोळी मारत म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो,” असे बोलून येशूने प्राण सोडला.</verse>
				<verse number="47">तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.”</verse>
				<verse number="48">बघण्याकरता जमलेले सर्व लोक जे काही घडले ते पाहून दुःखाने ऊर बडवीत परत गेले.</verse>
				<verse number="49">ज्या स्त्रिया येशूच्या मागे गालीलहून आल्या होत्या त्यांच्यासह येशूला व्यक्तिशः ओळखणारे सर्व जण हे पाहत दूर उभे राहिले होते.</verse>
				<verse number="50">तेथे यहुदियातील अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक सज्जन व प्रतिष्ठित मनुष्य होता. तो देवराज्याची प्रतीक्षा करीत होता. जरी तो न्यायसभेचा सदस्य होता, तरी त्याने यहुदी लोकांच्या निर्णयाला व कृत्याला दुजोरा दिला नव्हता.</verse>
				<verse number="51"></verse>
				<verse number="52">त्याने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह मागितला.</verse>
				<verse number="53">मग तो त्याने खाली काढून तागाच्या कापडात गुंडाळला व खडकात खोदलेल्या कबरीत ठेवला. ह्या कबरीत अद्याप कोणाला ठेवले नव्हते.</verse>
				<verse number="54">साबाथची तयारी करण्याचा तो दिवस होता आणि साबाथ सुरू होणार होता.</verse>
				<verse number="55">गालीलहून येशूबरोबर आलेल्या स्त्रियांनी योसेफच्या बरोबर जाऊन ती कबर पाहिली व येशूचा मृतदेह कसा ठेवला हेही पाहिले.</verse>
				<verse number="56">त्यानंतर त्यांनी घरी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे साबाथ दिवशी त्यांनी विश्रांती घेतली.</verse>
			</chapter>
			<chapter number="24">
				<verse number="1">आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या स्त्रिया कबरीजवळ आल्या,</verse>
				<verse number="2">तेव्हा कबरीबरून शिळा बाजूला केलेली आहे, असे त्यांना आढळले.</verse>
				<verse number="3">त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.</verse>
				<verse number="4">म्हणून त्या गोंधळून गेल्या. तेवढ्यात लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ अकस्मात उभे राहिले.</verse>
				<verse number="5">भयभीत होऊन त्या खाली बघत असता, ते पुरुष त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता?</verse>
				<verse number="6">तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले होते, ते आठवा.</verse>
				<verse number="7">ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी लोकांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला क्रुसावर चढवण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.”</verse>
				<verse number="8">तेव्हा त्या स्त्रियांना येशूच्या शब्दांची आठवण झाली.</verse>
				<verse number="9">कबरीजवळून त्या परत गेल्या व त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले.</verse>
				<verse number="10">त्या स्त्रिया मरिया मग्दालिया, योहान व याकोबची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या, त्यांनीही हे वृत्त प्रेषितांना सांगितले.</verse>
				<verse number="11">परंतु हे वृत्त त्यांना वायफळ बडबड वाटली व त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="12">मात्र पेत्र उठून कबरीकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या कापडाचे तुकडे दिसले. झालेल्या प्रकाराविषयी आश्चर्यचकित होऊन तो घरी गेला.</verse>
				<verse number="13">त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते.</verse>
				<verse number="14">घडलेल्या सर्व घटनांविषयी ते एकमेकांशी संभाषण करत होते.</verse>
				<verse number="15">ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला.</verse>
				<verse number="16">त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही.</verse>
				<verse number="17">येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले.</verse>
				<verse number="18">त्यांच्यातील क्लयपा नावाच्या एकाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेममध्ये घडलेल्या घटना ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?”</verse>
				<verse number="19">तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या नजरेत कृतीने व उक्‍तीने पराक्रमी संदेष्टा होता.</verse>
				<verse number="20">त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले.</verse>
				<verse number="21">इस्राएलची मुक्‍ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी होऊन आज तीन दिवस झाले.</verse>
				<verse number="22">आणखी आमच्यातील ज्या अनेक स्त्रिया भल्या पहाटेस कबरीकडे गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हांला थक्कच केले.</verse>
				<verse number="23">त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’</verse>
				<verse number="24">मग आमच्यापैकी काही जण कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले. मात्र त्यांना त्याचे शरीर दिसले नाही.”</verse>
				<verse number="25">मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात!</verse>
				<verse number="26">ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या वैभवात प्रवेश करावा, हे क्रमप्राप्त नव्हते काय?”</verse>
				<verse number="27">मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.</verse>
				<verse number="28">ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले.</verse>
				<verse number="29">परंतु ते त्याला विनंती करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तो त्यांच्याबरोबर वसती करायला आत गेला.</verse>
				<verse number="30">तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली.</verse>
				<verse number="31">तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला.</verse>
				<verse number="32">ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?”</verse>
				<verse number="33">त्याच घटकेस ते उठून यरुशलेम येथे परत गेले. तेथे अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले.</verse>
				<verse number="34">ते म्हणत होते की, प्रभू खरोखर उठला आहे व तो शिमोनच्या दृष्टीस पडला आहे.</verse>
				<verse number="35">ह्या दोघा शिष्यांनी वाटेतल्या घटना त्यांना सांगितल्या व येशूने भाकर मोडली, तेव्हा आपण प्रभूला कसे ओळखले, हे निवेदन केले.</verse>
				<verse number="36">ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.”</verse>
				<verse number="37">ते भयभीत झाले. आपण भूत पाहत आहोत, असे त्यांना वाटले.</verse>
				<verse number="38">त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात?</verse>
				<verse number="39">माझे हात व माझे पाय पाहा. मी स्वतः तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता, तसे भुताला नसते.”</verse>
				<verse number="40">असे बोलून त्याने त्यांना त्याचे हात व पाय दाखवले.</verse>
				<verse number="41">तरीही त्यांना विश्वास ठेवणे अवघड वाटत होते. मात्र ते हर्षभराने आश्चर्यचकित झाल्यामुळे येशूने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”</verse>
				<verse number="42">त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला.</verse>
				<verse number="43">तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्‍ला.</verse>
				<verse number="44">नंतर तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत:मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक होते.”</verse>
				<verse number="45">त्यांना धर्मशास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन जागृत केले.</verse>
				<verse number="46">त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे</verse>
				<verse number="47">आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.</verse>
				<verse number="48">तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात.</verse>
				<verse number="49">पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेले वरदान मी तुमच्याकडे पाठवतो. मात्र तुम्हांला स्वर्गीय सामर्थ्याचे वरदान प्राप्त होईपर्यंत ह्या शहरात राहा.”</verse>
				<verse number="50">त्यानंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला.</verse>
				<verse number="51">त्यांना आशीर्वाद देत असताना तो त्यांच्यापासून दूरदूर होत वर स्वर्गात घेतला गेला.</verse>
				<verse number="52">तेव्हा ते त्याची आराधना करून अतिशय आनंदाने यरुशलेमला परत गेले</verse>
				<verse number="53">व मंदिरात देवाला अविरत धन्यवाद देत राहिले.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="43">
			<chapter number="1">
				<verse number="1">प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.</verse>
				<verse number="2">तोच प्रारंभी देवासह होता.</verse>
				<verse number="3">सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीही झाले नाही.</verse>
				<verse number="4">त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते.</verse>
				<verse number="5">तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही.</verse>
				<verse number="6">देवाने एक मनुष्य पाठवला. त्याचे नाव योहान असे होते.</verse>
				<verse number="7">तो साक्षीकरता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.</verse>
				<verse number="8">तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता.</verse>
				<verse number="9">जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता.</verse>
				<verse number="10">तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.</verse>
				<verse number="11">तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.</verse>
				<verse number="12">मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.</verse>
				<verse number="13">त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला.</verse>
				<verse number="14">शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.</verse>
				<verse number="15">त्याच्याविषयी योहानने साक्ष दिली आणि आवेशाने म्हटले, “‘जो माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पुढचा आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हा आहे.”</verse>
				<verse number="16">त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.</verse>
				<verse number="17">नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.</verse>
				<verse number="18">देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.</verse>
				<verse number="19">यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना पाठवून योहानला विचारले, “आपण कोण आहात?” तेव्हा योहानने दिलेली ही साक्ष आहेः</verse>
				<verse number="20">त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, तर स्पष्ट म्हटले, “मी ख्रिस्त नाही.”</verse>
				<verse number="21">त्यांनी त्याला विचारले, “मग कोण? आपण एलिया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आम्ही ज्याची वाट पहात आहोत तो संदेष्टा आपण आहात काय?” त्यावर त्याने उत्तर दिले, “नाही.”</verse>
				<verse number="22">तेव्हा ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे आम्हांला सांगा. आपले स्वतःविषयी काय म्हणणे आहे?”</verse>
				<verse number="23">त्याने उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे “परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.”</verse>
				<verse number="24">ही माणसे परुशी लोकांनी पाठवली होती.</verse>
				<verse number="25">त्यांनी त्यानंतर योहानला विचारले, “आपण ख्रिस्त नाहीत, एलिया नाहीत व संदेष्टाही नाहीत, तर मग आपण बाप्तिस्मा का देता?”</verse>
				<verse number="26">योहानने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा देतो. परंतु ज्याला तुम्ही ओळखत नाही, असा एक तुमच्यात उभा आहे.</verse>
				<verse number="27">तो माझ्यानंतर येत आहे, त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.”</verse>
				<verse number="28">यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे योहान बाप्तिस्मा देत होता. तेथे ह्या गोष्टी घडल्या.</verse>
				<verse number="29">दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू!</verse>
				<verse number="30">“जो माझ्यानंतर येत आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हा आहे.</verse>
				<verse number="31">मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएली लोकांना त्याची ओळख व्हावी म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो आहे.”</verse>
				<verse number="32">योहानने अशी साक्ष दिली, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.</verse>
				<verse number="33">मी तर त्याला ओळखत नव्हतो परंतु ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा द्यायला पाठवले, त्याने मला सांगितले, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना तू पाहशील, तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा आहे.’</verse>
				<verse number="34">मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”</verse>
				<verse number="35">दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा होता</verse>
				<verse number="36">आणि येशूला बाजूने चालत जाताना पाहून तो म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!”</verse>
				<verse number="37">त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे गेले.</verse>
				<verse number="38">येशूने वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हटले, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी (म्हणजे गुरुवर्य), आपण कोठे राहता?”</verse>
				<verse number="39">तो त्यांना म्हणाला, “या आणि पाहा.” ती दुपारची वेळ होती. त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या बरोबर राहिले.</verse>
				<verse number="40">योहानचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.</verse>
				<verse number="41">त्याने त्याचा भाऊ शिमोन ह्याची लगेच भेट घेतली आणि त्याला सांगितले, “आम्हांला मसिहा (म्हणजे ख्रिस्त) भेटला आहे.”</verse>
				<verse number="42">नंतर अंद्रियाने शिमोनला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहत म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस, परंतु तुला केफा म्हणजेच पेत्र म्हणतील.”</verse>
				<verse number="43">दुसऱ्या दिवशी येशूने गालीलमध्ये जायचे ठरवले तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”</verse>
				<verse number="44">फिलिप हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथील होता.</verse>
				<verse number="45">फिलिपला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात व संदेष्ट्यांनीसुद्धा लिहिले आहे, तो म्हणजे योसेफचा मुलगा, नासरेथकर येशू आम्हांला भेटला आहे.”</verse>
				<verse number="46">नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी चांगले निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “ये आणि पाहा.”</verse>
				<verse number="47">नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, ह्याच्या मनात कपट नाही!”</verse>
				<verse number="48">नथनेलने येशूला विचारले, “आपण मला कसे काय ओळखता?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले.”</verse>
				<verse number="49">नथनेल त्याला म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.”</verse>
				<verse number="50">येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले, असे सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्यापेक्षा महान गोष्टी तू पाहशील.”</verse>
				<verse number="51">आणखी येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, स्वर्ग उघडलेला आणि देवदूतांना वर चढताना व मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">तिसऱ्या दिवशी गालीलमधील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.</verse>
				<verse number="2">येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते.</verse>
				<verse number="3">तेथे द्राक्षारस संपला असता येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”</verse>
				<verse number="4">येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”</verse>
				<verse number="5">त्याची आई नोकरांना म्हणाली, “तो तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”</verse>
				<verse number="6">यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण ठेवलेले होते. त्या प्रत्येकात सुमारे शंभर लिटर पाणी मावेल इतके ते मोठे होते.</verse>
				<verse number="7">येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले.</verse>
				<verse number="8">नंतर त्याने त्यांना सांगितले, “आता थोडे काढून भोजन-कारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.</verse>
				<verse number="9">द्राक्षारस बनलेले ते पाणी भोजन- कारभाऱ्याने जेव्हा चाखले (तो द्राक्षारस कुठला आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या नोकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजन-कारभारी वराला बोलावून म्हणाला,</verse>
				<verse number="10">“प्रत्येक मनुष्य प्रथम उत्तम दर्जाचा द्राक्षारस वाढतो आणि लोक द्राक्षारस यथेच्छ प्याले म्हणजे नंतर साधारण दर्जाचा वाढतो. तू तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”</verse>
				<verse number="11">येशूने गालीलमधील काना येथे आपले हे पहिले चिन्ह करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="12">त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफर्णहूम येथे गेले व तेथे ते काही दिवस राहिले.</verse>
				<verse number="13">यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमला गेला.</verse>
				<verse number="14">मंदिरात बैल, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैशाची देवघेव करणारे हे सारे बसलेले त्याला आढळले.</verse>
				<verse number="15">त्याने दोरांचा एक आसूड वळून बैल व मेंढरे ह्यांच्यासह सर्वांना मंदिरातून हाकलून लावले. सराफांचा खुर्दा फेकून दिला व चौरंग पालथे केले.</verse>
				<verse number="16">तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “ही येथून काढा. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”</verse>
				<verse number="17">तेव्हा त्याच्या शिष्यांना आठवले की, ‘तुझ्या घराविषयीचा आवेश, हे परमेश्वरा, मला झपाटून टाकील’, असा धर्मशास्त्रलेख आहे.</verse>
				<verse number="18">यहुद्यांनी त्याला प्रश्‍न विचारला, “हे तुम्ही करता तर आम्हांला कोणते चिन्ह दाखवता?”</verse>
				<verse number="19">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभारीन.”</verse>
				<verse number="20">ह्यावरून यहुदी म्हणाले, “हे मंदिर बांधायला सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”</verse>
				<verse number="21">तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता.</verse>
				<verse number="22">त्याने असे म्हटले होते, हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी धर्मशास्त्रावर व येशूच्या वचनावर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="23">ओलांडण सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता, ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="24">पण येशूला सर्वांचे ज्ञान असल्यामुळे त्याचा त्यांच्यावर भरवसा नव्हता.</verse>
				<verse number="25">मनुष्यांविषयी कोणी त्याला काही सांगण्याची जरुरी नव्हती कारण त्यांच्या अंतःकरणात काय आहे, हे त्याला ठाऊक होते.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">निकदेम नावाचा परुशी यहुदी लोकांचा एक अधिकारी होता.</verse>
				<verse number="2">तो एकदा रात्रीच्या वेळी येशूकडे येऊन म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाकडून आलेले गुरू आहात, हे आम्हांला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता, ती कोणालाही देव त्याच्या बरोबर असल्याशिवाय करता येणे शक्य नाही.”</verse>
				<verse number="3">येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.”</verse>
				<verse number="4">निकदेम त्याला म्हणाला, “वयात आलेला मनुष्य पुन्हा कसा जन्म घेऊ शकेल? त्याला दुसऱ्यांदा मातेच्या उदरात जाणे व जन्म घेणे शक्य आहे काय?”</verse>
				<verse number="5">येशूने उत्तर दिले, “मी तुला ठामपणे सांगतो, पाण्याने व आत्म्याने जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.</verse>
				<verse number="6">देहापासून जन्मलेला देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे.</verse>
				<verse number="7">तुला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नकोस.</verse>
				<verse number="8">वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो व कुठे जातो, हे तुम्हांला कळत नाही, जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे, त्याचे असेच आहे.”</verse>
				<verse number="9">निकदेमने त्याला विचारले, “हे कसे शक्य आहे?”</verse>
				<verse number="10">येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला हे समजत नाही काय?</verse>
				<verse number="11">मी तुम्हांला सत्य सांगतो, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो, परंतु तुम्ही आमची साक्ष मानत नाही.</verse>
				<verse number="12">मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या असताना तुम्ही विश्वास धरीत नाही, मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या तर विश्वास कसा धराल?</verse>
				<verse number="13">स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्याशिवाय कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.</verse>
				<verse number="14">जसा मोशेने अरण्यात सर्प वर उचलला होता, तसा मनुष्याचा पुत्रही वर उचलला गेला पाहिजे.</verse>
				<verse number="15">ह्यासाठी की, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला शाश्वत जीवन मिळावे;</verse>
				<verse number="16">कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला शाश्वत जीवन प्राप्त व्हावे.</verse>
				<verse number="17">देवाने त्याच्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.</verse>
				<verse number="18">जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याचा न्याय होत नाही, परंतु जो श्रद्धा ठेवत नाही, त्याचा न्याय होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर श्रद्धा ठेवली नाही.</verse>
				<verse number="19">न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे, परंतु माणसांना प्रकाशापेक्षा अंधार आवडला, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.</verse>
				<verse number="20">जो कोणी वाईट कृत्ये करतो, तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.</verse>
				<verse number="21">परंतु आपली कृत्ये देवाच्या आज्ञेनुसार केलेली आहेत, हे उघड व्हावे म्हणून जो सत्य आचरतो, तो प्रकाशाकडे येतो.”</verse>
				<verse number="22">ह्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात गेले. तेथे तो त्यांच्याबरोबर राहिला आणि तेथे त्याने लोकांना बाप्तिस्मा दिला.</verse>
				<verse number="23">योहानही शालिमजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा देत होता कारण तेथे पाणी मुबलक होते. लोक त्याच्याकडे येऊन बाप्तिस्मा घेत असत;</verse>
				<verse number="24">कारण योहानला तोपर्यंत तुरुंगात टाकले नव्हते.</verse>
				<verse number="25">एकदा योहानच्या शिष्यांचा एका यहुदी माणसाबरोबर शुद्धीकरणाच्या विधीविषयी वादविवाद झाला.</verse>
				<verse number="26">ते योहानकडे येऊन म्हणाले, “गुरुवर्य, पाहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो आता बाप्तिस्मा देतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जात आहेत!”</verse>
				<verse number="27">योहानने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिेल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.</verse>
				<verse number="28">‘मी ख्रिस्त नाही तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे’, असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्ही माझे साक्षी आहात.</verse>
				<verse number="29">वधू ज्याची आहे, तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, तो वराचा मित्र आहे. वराची वाणी ऐकून त्याला आनंद होतो. तशाच प्रकारे माझा आनंद पूर्ण झाला आहे.</verse>
				<verse number="30">त्याची वृद्धी व्हावी व माझी घट व्हावी, हे आवश्यक आहे.</verse>
				<verse number="31">जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे, जो पृथ्वीपासून आहे तो पृथ्वीचा आहे व तो ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर असतो.</verse>
				<verse number="32">जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे, त्याविषयी तो साक्ष देतो परंतु त्याची साक्ष कोणी मानत नाही.</verse>
				<verse number="33">मात्र ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्यवचनी आहे, ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.</verse>
				<verse number="34">ज्याला देवाने पाठवले आहे, तो देवाची वचने बोलतो; कारण तो त्याला आत्मा मोजमाप न करता देतो.</verse>
				<verse number="35">पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे.</verse>
				<verse number="36">जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे; जो पुत्रावर श्रद्धा ठेवत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहील.”</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">येशू योहानपेक्षा अधिक शिष्य मिळवून त्यांना बाप्तिस्मा देत आहे, हे परुश्यांच्या कानी गेले आहे, असे जेव्हा प्रभूला कळले,</verse>
				<verse number="2">(येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, पण त्याचे शिष्य देत असत.)</verse>
				<verse number="3">तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालीलमध्ये जायला निघाला.</verse>
				<verse number="4">त्याला शोमरोनमधून जावे लागले.</verse>
				<verse number="5">तो शोमरोनमधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते.</verse>
				<verse number="6">तेथे याकोबची विहीर होती. प्रवासाने दमलेला येशू त्या विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.</verse>
				<verse number="7">तेथे शोमरोनची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला दे.”</verse>
				<verse number="8">त्याचे शिष्य शिधासामग्री विकत घ्यायला नगरात गेले होते.</verse>
				<verse number="9">ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला मागता हे कसे?” (कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत.)</verse>
				<verse number="10">येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे वरदान म्हणजे काय, आणि ‘मला प्यायला दे’, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते, तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जीवनदायक पाणी दिले असते.”</verse>
				<verse number="11">ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवनदायक पाणी आपल्याजवळ कुठून येणार?</verse>
				<verse number="12">आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे ह्याच विहिरीचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण थोर आहात काय?”</verse>
				<verse number="13">येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल.</verse>
				<verse number="14">परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल, त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या ठायी शाश्‍वत जीवन देणाऱ्या पाण्याचा उसळता झरा होईल.”</verse>
				<verse number="15">ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, ते पाणी मला द्या म्हणजे मला तहान लागणार नाही व पाणी काढायला मला येथवर यावे लागणार नाही.”</verse>
				<verse number="16">तो तिला म्हणाला, “तू जाऊन तुझ्या पतीला बोलावून आण.”</verse>
				<verse number="17">ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “‘मला पती नाही’, हे तू खरे बोललीस,</verse>
				<verse number="18">तुला पाच पती होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो खरोखर तुझा पती नाही, हे तू खरे सांगितलेस!”</verse>
				<verse number="19">ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टा आहात, हे आता मला समजले.</verse>
				<verse number="20">आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे, ते स्थान यरुशलेम येथे आहे.”</verse>
				<verse number="21">येशू तिला म्हणाला, “बाई, अशी वेळ येत आहे की, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाहीत, हे माझे खरे मान.</verse>
				<verse number="22">तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता परंतु आम्हांला ठाऊक आहे, अशाची उपासना आम्ही करतो; कारण तारण यहुदी लोकांमधूनच आहे.</verse>
				<verse number="23">मात्र खरे उपासक आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण अशा उपासकांनी त्याची उपासना करावी, हे त्याला अभिप्रेत आहे.</verse>
				<verse number="24">देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व सत्याने केली पाहिजे.”</verse>
				<verse number="25">ती स्त्री त्याला म्हणाली, “ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो मसिहा येणार आहे आणि तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल, हे मला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="26">येशू तिला म्हणाला, “तुझ्याबरोबर बोलणारा मी, तो आहे.”</verse>
				<verse number="27">इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे, ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी ‘आपल्याला काय हवे आहे’ किंवा ‘आपण कशाकरता तिच्याशी बोलत आहात’ असे कोणीही विचारले नाही.</verse>
				<verse number="28">त्यानंतर ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली,</verse>
				<verse number="29">“चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?”</verse>
				<verse number="30">तेव्हा ते नगरातून निघून येशूकडे आले.</verse>
				<verse number="31">दरम्यान शिष्य त्याला विनंती करू लागले, “गुरुवर्य, जेवा.”</verse>
				<verse number="32">परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”</verse>
				<verse number="33">ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?”</verse>
				<verse number="34">येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने दिलेले कार्य पूर्ण करावे, हेच माझे अन्न आहे.</verse>
				<verse number="35">अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? परंतु मी तुम्हांला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा. पीक तयार आहे. कापणीची वेळ येऊन ठेपली आहे.</verse>
				<verse number="36">जो मनुष्य कापणी करतो, तो मजुरी मिळवतो व शाश्वत जीवनासाठी पीक साठवतो, ह्यासाठी की, पेरणारा व कापणारा हे दोघेही आनंदित व्हावेत.</verse>
				<verse number="37">एक पेरतो व दुसरा कापतो, अशी जी म्हण आहे, ती ह्या बाबतीत खरी आहे.</verse>
				<verse number="38">ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते, ते कापायला मी तुम्हांला पाठवले. दुसऱ्यांनी श्रम केले आहेत व तुम्हांला त्यांच्या श्रमात सहभाग मिळत आहे.”</verse>
				<verse number="39">“मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले”, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="40">शोमरोनी लोक त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्याकडे राहण्याची विनंती केली. तो तेथे दोन दिवस राहिला</verse>
				<verse number="41">आणि त्याच्या संदेशावरून आणखी किती तरी लोकांनी विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="42">ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरून आम्ही विश्वास ठेवतो असे नाही, तर आम्ही स्वतः ऐकले आहे व आम्हांला समजले आहे की, हा खरोखर जगाचा तारणारा आहे.”</verse>
				<verse number="43">तेथे दोन दिवस राहिल्यानंतर येशू तेथून गालीलमध्ये निघून गेला.</verse>
				<verse number="44">कारण येशूने स्वतः ठामपणे म्हटले होते, “संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.”</verse>
				<verse number="45">तो गालीलमध्ये आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले. यरुशलेममध्ये सणात त्याने जे काही केले होते, ते सर्व त्यांनी पाहिले होते कारण तेदेखील सणाला गेले होते.</verse>
				<verse number="46">नंतर तो गालीलमध्ये काना येथे पुन्हा आला. ह्याच गावी त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी एक अधिकारी होता, त्याचा मुलगा कफर्णहूम या ठिकाणी आजारी होता.</verse>
				<verse number="47">येशू यहुदियातून गालीलमध्ये आला आहे, हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली, “आपण येऊन मरणास टेकलेल्या माझ्या मुलाला बरे करावे.”</verse>
				<verse number="48">येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुत गोष्टी पाहिल्यावाचून विश्वास ठेवणार नाही.</verse>
				<verse number="49">तो अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभो, माझा मुलगा मरण्यापूर्वी माझ्याबरोबर येण्याची कृपा करा.”</verse>
				<verse number="50">येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे!” तो मनुष्य येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून निघून गेला.</verse>
				<verse number="51">तो घरी जात असता, त्याचे दास त्याला वाटेत भेटून म्हणाले, “तुमचा मुलगा वाचला आहे.”</verse>
				<verse number="52">त्याला कोणत्या घटकेला उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल दुपारी एक वाजता त्याचा ताप उतरला.”</verse>
				<verse number="53">ह्यावरून ज्या वेळी येशूने त्याला सांगितले होते की, ‘तुमचा मुलगा वाचला आहे’, त्याच वेळी हे झाले, हे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने येशूवर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="54">येशूने यहुदियातून गालीलमध्ये आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होते.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">ह्यानंतर यहुदी लोकांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमला गेला.</verse>
				<verse number="2">यरुशलेममध्ये मेंढरे नावाच्या फाटकाजवळ एक तलाव आहे. त्याला हिब्रू भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याला लागून पाच पडव्या आहेत.</verse>
				<verse number="3">[त्यांमध्ये रोगी, आंधळे, पांगळे आणि लुळे ह्यांचा मोठा समुदाय असे. ते पाणी ढवळण्याची वाट पाहत असत;</verse>
				<verse number="4">कारण देवदूत वेळोवेळी तलावात उतरून पाणी ढवळत असे आणि पाणी ढवळल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला, तरी तो बरा होत असे.]</verse>
				<verse number="5">तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक माणूस होता.</verse>
				<verse number="6">येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?”</verse>
				<verse number="7">त्या रुग्णाने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी ढवळते तेव्हा मला तलावात सोडायला माझा कोणी माणूस नसतो. मी जातो न जातो तोच दुसरा कोणी तरी माझ्या आधी उतरतो.”</verse>
				<verse number="8">येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.”</verse>
				<verse number="9">लगेच तो माणूस बरा झाला व त्याचे अंथरुण उचलून चालू लागला. हे घडले तो दिवस साबाथ होता.</verse>
				<verse number="10">ह्यावरून यहुदी लोक त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज साबाथ असल्यामुळे अंथरुण उचलणे तुझ्यासाठी कायद्याच्या विरुद्ध आहे.”</verse>
				<verse number="11">त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले, ‘तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.’”</verse>
				<verse number="12">त्यांनी त्याला विचारले, “‘तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग’, असे ज्याने तुला सांगितले, तो माणूस कोण आहे?”</verse>
				<verse number="13">तो कोण आहे, हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी गर्दी होती व येशू तेथून निघून गेला होता.</verse>
				<verse number="14">त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”</verse>
				<verse number="15">त्या माणसाने जाऊन यहुदी लोकांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”</verse>
				<verse number="16">त्यामुळे ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने साबाथ दिवशी हे काम केले होते.</verse>
				<verse number="17">परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अजून काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”</verse>
				<verse number="18">ह्यामुळे त्याला ठार मारावे म्हणून यहुदी लोक अधिकच प्रयत्न करू लागले; कारण तो साबाथ मोडत असे. इतकेच नव्हे, तर देवाला आपला पिता संबोधून स्वतःला देवासमान मानत असे.</verse>
				<verse number="19">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्याच्यावाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही; कारण जे काही पिता करतो, ते पुत्रही तसेच करतो;</verse>
				<verse number="20">कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तो ह्यापेक्षा मोठ्या गोष्टी त्याला दाखवील व तुम्ही थक्क व्हाल.</verse>
				<verse number="21">जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, तसा पुत्रही स्वतःच्या इच्छेनुसार मेलेल्यांना जिवंत करतो.</verse>
				<verse number="22">पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याने पुत्राकडे सोपवला आहे.</verse>
				<verse number="23">ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने त्याला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.</verse>
				<verse number="24">मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे.</verse>
				<verse number="25">मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.</verse>
				<verse number="26">ज्याप्रमाणे पित्याच्या ठायी जीवन आहे, त्याचप्रमाणे पित्याने त्याच्या पुत्राच्या ठायीदेखील जीवन दिले आहे.</verse>
				<verse number="27">त्याला न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. कारण तो मनुष्याचा पुत्र आहे.</verse>
				<verse number="28">आश्चर्य मानू नका कारण अशी वेळ येत आहे की, थडग्यांतील सर्व मृत लोक पुत्राची वाणी ऐकतील</verse>
				<verse number="29">आणि ते उठतील - ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी.</verse>
				<verse number="30">मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो, तसा मी न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले, त्याच्या इच्छेप्रमाणे करतो.</verse>
				<verse number="31">मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही.</verse>
				<verse number="32">माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे. जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे, हे मला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="33">तुम्ही योहानकडे माणसे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.</verse>
				<verse number="34">मात्र मी मानवी साक्ष स्वीकारत नाही. तरी पण तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.</verse>
				<verse number="35">योहान तेवत राहणारा व प्रकाश देणारा दीप होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करायला तयार झालात.</verse>
				<verse number="36">परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे, ती योहानच्या साक्षीपेक्षा अधिक प्रभावी आहे. जी कार्ये पूर्ण करायचे पित्याने माझ्यावर सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.</verse>
				<verse number="37">शिवाय ज्या पित्याने मला पाठवले, त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे दृश्य रूप पाहिले नाही.</verse>
				<verse number="38">तसेच त्याचे वचन तुम्ही आपल्यामध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवत नाही.</verse>
				<verse number="39">तुम्ही धर्मशास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हांला शाश्वत जीवन प्राप्त होईल, असे तुम्हांला वाटते. ते माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.</verse>
				<verse number="40">तरी पण शाश्वत जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही.</verse>
				<verse number="41">मी माणसांकडून प्रशंसा करून घेत नाही.</verse>
				<verse number="42">परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्यात परमेश्वराची प्रीती नाही.</verse>
				<verse number="43">मी माझ्या पित्याच्या अधिकाराने आलो आहे, पण माझा स्वीकार तुम्ही करत नाही, दुसरा कोणी स्वतःच्या अधिकाराने आला, तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल.</verse>
				<verse number="44">जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हांला श्रद्धा ठेवता येणे कसे शक्य आहे?</verse>
				<verse number="45">मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन, असे समजू नका. ज्याची तुम्ही आशा बाळगता, तो मोशे तुम्हांला दोष लावील.</verse>
				<verse number="46">तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता, तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.</verse>
				<verse number="47">परंतु जर तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा काय विश्वास ठेवाल?”</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">ह्यानंतर येशू गालीलच्या म्हणजे तिबिर्या सरोवराच्या पलीकडे गेला.</verse>
				<verse number="2">मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग गेला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे, ती त्यांनी पाहिली होती.</verse>
				<verse number="3">येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला.</verse>
				<verse number="4">यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता.</verse>
				<verse number="5">येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे लोकसमुदाय येत आहे असे पाहून, फिलिपला म्हणाला, “ह्यांना भोजन द्यायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?”</verse>
				<verse number="6">हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते.</verse>
				<verse number="7">फिलिपने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले, तरी चांदीची दोनशे नाणी देऊन आणलेल्या भाकरीदेखील पुरणार नाहीत.”</verse>
				<verse number="8">त्याच्या शिष्यांपैकी दुसरा एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला,</verse>
				<verse number="9">“येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासे आहेत. परंतु त्या इतक्या लोकांना कशा पुरणार?”</verse>
				<verse number="10">येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते म्हणून सर्व लोक बसले. तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते.</verse>
				<verse number="11">येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले.</verse>
				<verse number="12">ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.”</verse>
				<verse number="13">जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.</verse>
				<verse number="14">त्याने केलेले हे चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे, तो खरोखर हा होय.”</verse>
				<verse number="15">त्यानंतर लोक येऊन आपल्याला राजा करण्याकरता बळजबरीने धरून नेण्याच्या बेतात आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.</verse>
				<verse number="16">संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य सरोवराकडे गेले.</verse>
				<verse number="17">ते मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे कफर्णहूमला जाऊ लागले. अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता.</verse>
				<verse number="18">जोरदार वारा सुटून सरोवराचे पाणी खवळू लागले.</verse>
				<verse number="19">मचवा सुमारे पाच-सहा किलोमीटर वल्हवून नेल्यावर त्यांनी येशूला पाण्यावरून मचव्यापर्यंत चालत येताना पाहिले आणि त्यांचा थरकाप उडाला.</verse>
				<verse number="20">तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”</verse>
				<verse number="21">त्यांनी आपणहून त्याला मचव्यात घेण्याची इच्छा दर्शवली. परंतु त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा लवकरच किनाऱ्याला लागला.</verse>
				<verse number="22">दुसऱ्या दिवशी, सरोवराच्या दुसऱ्या बाजूला जमलेल्या लोकांच्या लक्षात आले की, ज्या मचव्यात त्याचे शिष्य चढले होते त्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता. येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यात चढला नव्हता, तर त्याचे शिष्य एकटे निघून गेले होते.</verse>
				<verse number="23">जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्‍ली होती, त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले.</verse>
				<verse number="24">तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत, असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्या लहान मचव्यांत बसून येशूचा शोध घेत कफर्णहूमला आले.</verse>
				<verse number="25">तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुवर्य, येथे कधी आलात?”</verse>
				<verse number="26">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता.</verse>
				<verse number="27">नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.”</verse>
				<verse number="28">ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “देवाची कार्ये आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?”</verse>
				<verse number="29">येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”</verse>
				<verse number="30">ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता?</verse>
				<verse number="31">आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला. असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली.’”</verse>
				<verse number="32">येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो.</verse>
				<verse number="33">कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तो परमेश्वराची भाकर आहे.”</verse>
				<verse number="34">ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.”</verse>
				<verse number="35">येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही.</verse>
				<verse number="36">परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हांला सांगितले.</verse>
				<verse number="37">ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही.</verse>
				<verse number="38">कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे</verse>
				<verse number="39">आणि ज्याने मला पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांतून मी कुणालाही गमावू नये, तर शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे.</verse>
				<verse number="40">जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.”</verse>
				<verse number="41">‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे’, असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.</verse>
				<verse number="42">ते म्हणाले, “हा योसेफचा मुलगा येशू आहे ना? ह्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तर मग ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’, असे हा कसे काय म्हणतो?”</verse>
				<verse number="43">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका.</verse>
				<verse number="44">ज्याने मला पाठवले, त्या पित्याने ओढून घेतल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि अशा माणसाला शेवटच्या दिवशी मी उठवीन.</verse>
				<verse number="45">संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो पित्याचे ऐकून शिकला आहे, तो माझ्याकडे येतो.</verse>
				<verse number="46">पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, मात्र जो देवाकडचा आहे त्याने पित्याला पाहिले आहे.</verse>
				<verse number="47">मी तुम्हांला ठामपणे सांगतो, जो विश्वास ठेवतो, त्याला शाश्वत जीवन मिळते.</verse>
				<verse number="48">मी स्वतः जीवनाची भाकर आहे.</verse>
				<verse number="49">तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला परंतु ते मरण पावले.</verse>
				<verse number="50">मात्र स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्‍ली, तर तो मरणार नाही.</verse>
				<verse number="51">स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी स्वतः आहे, ही भाकर जो कोणी खाईल, तो सर्व काळ जगेल, जी भाकर मी देईन, ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”</verse>
				<verse number="52">हे ऐकून यहुदी आपसात वाद घालू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?”</verse>
				<verse number="53">येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, तुम्ही जोवर मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्‍त पीत नाही, तोवर तुम्हांला जीवन मिळणार नाही.</verse>
				<verse number="54">जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला शाश्वत जीवन लाभले आहे आणि मी स्वतः त्याला शेवटच्या दिवशी उठवीन.</verse>
				<verse number="55">माझा देह खरे अन्न आहे व माझे रक्‍त खरे पेय आहे.</verse>
				<verse number="56">जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो.</verse>
				<verse number="57">जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो, तोही माझ्यामुळे जगेल.</verse>
				<verse number="58">स्वर्गातून उतरलेली भाकर ती हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्‍ली, तरी ते मरण पावले. हे मात्र तसे नाही. ही भाकर जो खातो, तो सर्वकाळ जगेल.”</verse>
				<verse number="59">कफर्णहूम येथील सभास्थानात शिकवण देत असताना त्याने ह्या गोष्टी सांगितल्या.</verse>
				<verse number="60">त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन फार कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?”</verse>
				<verse number="61">आपले शिष्य ह्याविषयी वितंडवाद करत आहेत, हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुमच्या मनात शंका दाटली आहे काय?</verse>
				<verse number="62">मग मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता, तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिले तर?</verse>
				<verse number="63">आत्मा जीवन देणारा आहे, देहाचा काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन आहेत.</verse>
				<verse number="64">तरी पण विश्वास ठेवत नाहीत, असे तुमच्यात कित्येक आहेत.” विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण, हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते.</verse>
				<verse number="65">पुढे तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हांला सांगितले की, पित्याने त्याला समर्थ केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”</verse>
				<verse number="66">ह्यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याकडे आले नाहीत.</verse>
				<verse number="67">म्हणूनच येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय?”</verse>
				<verse number="68">शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? शाश्वत जीवन देणारी वचने आपल्याजवळ आहेत.</verse>
				<verse number="69">आणि आता आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपणच आहात.”</verse>
				<verse number="70">येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यापैकी एक जण सैतान आहे.”</verse>
				<verse number="71">हे शिमोन इस्कर्योतचा मुलगा यहुदा ह्याच्याविषयी तो बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक होता व त्याचा विश्‍वासघात करणार होता.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">त्यानंतर येशू गालीलमध्ये फिरू लागला, यहुदी त्याला ठार मारायला पाहत होते म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही.</verse>
				<verse number="2">यहुदी लोकांचा मंडपांचा सण जवळ आला होता,</verse>
				<verse number="3">तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “तू जे कार्य करतोस, ते तुझ्या शिष्यांनीही पाहावे म्हणून तू येथून निघून यहुदियात जा.</verse>
				<verse number="4">जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो, तो गुप्तपणे काही करत नाही. तू हे कार्य करत आहेस, हे जगाला दाखव.”</verse>
				<verse number="5">त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.</verse>
				<verse number="6">येशू त्यांना म्हणाला, “माझी उचित वेळ अजून आली नाही, तुमची वेळ तर नेहमीच उचित असते.</verse>
				<verse number="7">जग तुमचा द्वेष करू शकत नाही, पण ते माझा द्वेष करते कारण त्याची कृत्ये वाईट आहेत, अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.</verse>
				<verse number="8">तुम्ही सणाला जा, मी ह्या सणाला जाणार नाही. कारण माझी उचित वेळ अजून आली नाही.”</verse>
				<verse number="9">असे त्यांना सांगून तो गालीलमध्ये राहिला.</verse>
				<verse number="10">परंतु त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही तेथे गेला, मात्र उघडपणे नव्हे तर गुप्तपणे गेला.</verse>
				<verse number="11">यहुदी त्या सणात त्याचा शोध घेत होते व म्हणत होते, “तो कुठे आहे?”</verse>
				<verse number="12">लोकसमुदायात त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे”, इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहे.”</verse>
				<verse number="13">परंतु यहुद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नव्हते.</verse>
				<verse number="14">सणाचे सुमारे अर्धे दिवस संपल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवण देऊ लागला.</verse>
				<verse number="15">ह्यावरून यहुदी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, “शिक्षण झाले नसताना ह्याला एवढे ज्ञान कसे मिळाले?”</verse>
				<verse number="16">त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे.</verse>
				<verse number="17">जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवाकडून आहे किंवा मी माझ्या स्वतःचे बोलतो, हे समजेल.</verse>
				<verse number="18">जो आपल्या स्वतःचे बोलतो तो स्वतःचा गौरव करू पाहतो. परंतु आपल्याला ज्याने पाठवले त्याचा गौरव जो करू पाहतो, तो प्रामाणिक आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.</verse>
				<verse number="19">मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”</verse>
				<verse number="20">लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”</verse>
				<verse number="21">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्यचकित झाला आहात.</verse>
				<verse number="22">मोशेने तुम्हांला सुंता करण्याचा आदेश दिला (जरी ती मोशेपासून नव्हे, तर पूर्वजांपासून सुरू झाली) व तुम्ही साबाथ दिवशी माणसाची सुंता करता.</verse>
				<verse number="23">मोशेचा नियम मोडला जाऊ नये ह्याकरता मनुष्याची सुंता जर साबाथ दिवशीदेखील केली जाते, तर मी साबाथ दिवशी एका मनुष्याला पूर्णपणे बरे केले म्हणून तुम्ही माझ्यावर रागावता काय?</verse>
				<verse number="24">बाह्यरूप पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”</verse>
				<verse number="25">हे ऐकून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला ते ठार मारायला पाहतात तो हाच ना?</verse>
				<verse number="26">पाहा, तो उघडपणे बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय?</verse>
				<verse number="27">हा कुठला आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला असेल हे कोणालाही माहीत असणार नाही.”</verse>
				<verse number="28">नंतर मंदिरात शिकवण देत असता येशूने आवर्जून म्हटले, “तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, हेही तुम्हांला ठाऊक आहे. तथापि मी आपण होऊन आलो नाही, पण ज्याने मला पाठवले तो सत्यस्वरूपी आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही.</verse>
				<verse number="29">मी मात्र त्याला ओळखतो कारण मी त्याच्याकडून आलो आहे व त्याने मला पाठवले आहे.”</verse>
				<verse number="30">ह्यामुळे ते त्याला धरायला पाहत होते, तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.</verse>
				<verse number="31">मात्र लोकसमुदायातील बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो अधिक चिन्हे करील काय?”</verse>
				<verse number="32">लोकसमुदाय येशूविषयी अशी कुजबुज करीत आहे, हे परुश्यांच्या कानावर गेले म्हणून त्यांनी व मुख्य याजकांनी त्याला अटक करण्याकरता काही अधिकारी पाठवले.</verse>
				<verse number="33">मग येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन व नंतर ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाईन.</verse>
				<verse number="34">तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”</verse>
				<verse number="35">ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, “हा असा कुठे जाणार आहे की, तो आपल्याला सापडणार नाही? ज्या ग्रीक शहरांत आपल्या लोकांची पांगापांग झालेली आहे, तेथे जाऊन हा ग्रीक लोकांना शिकवणार की काय?</verse>
				<verse number="36">‘तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?”</verse>
				<verse number="37">सणाच्या शेवटच्या महान दिवशी, येशूने उभे राहून जाहीर आवाहन केले, “ज्याला तहान लागली आहे, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.</verse>
				<verse number="38">जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जीवनदायक पाण्याच्या नद्या वाहतील.”</verse>
				<verse number="39">त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. पवित्र आत्मा त्या वेळेपर्यंत दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचा गौरव झालेला नव्हता.</verse>
				<verse number="40">लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणाले, “खरोखर हाच तो संदेष्टा आहे.”</verse>
				<verse number="41">इतर म्हणत होते, “हा ख्रिस्त आहे”, परंतु आणखी काही म्हणाले, “ख्रिस्त गालीलमधून येणार आहे का?</verse>
				<verse number="42">दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलहेममध्ये दावीद राहत होता. त्या नगरातून ख्रिस्त येणार, असे धर्मशास्त्रात सांगितले नाही काय?”</verse>
				<verse number="43">ह्यामुळे त्याच्यावरून लोकसमुदायात फूट पडली.</verse>
				<verse number="44">त्यांच्यातील काही लोक त्याला अटक करू पाहत होते तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.</verse>
				<verse number="45">मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडे अधिकारी परत आले. त्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”</verse>
				<verse number="46">अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”</verse>
				<verse number="47">त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसलात का?</verse>
				<verse number="48">अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का?</verse>
				<verse number="49">परंतु हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही म्हणून तो शापग्रस्त आहे.”</verse>
				<verse number="50">येशूकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला,</verse>
				<verse number="51">“एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व त्याने काय केले आहे, ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”</verse>
				<verse number="52">त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलमधले आहात काय? धर्मशास्त्राचा अभ्यास करून पाहा म्हणजे गालीलमधून कोणी संदेष्टा उदयास येणार नाही, हे तुम्हांला कळेल.”</verse>
				<verse number="53">[त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले.</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">येशू ऑलिव्ह डोंगरावर गेला.</verse>
				<verse number="2">भल्या पहाटेस तो पुन्हा मंदिरात गेला. तेव्हा लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.</verse>
				<verse number="3">व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्या वेळी त्याच्याकडे आणले. तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले,</verse>
				<verse number="4">“गुरुजी, ही स्त्री प्रत्यक्ष व्यभिचार करत असताना धरण्यात आली.</verse>
				<verse number="5">मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”</verse>
				<verse number="6">त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला.</verse>
				<verse number="7">ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.”</verse>
				<verse number="8">तो पुन्हा ओणवा होऊन जमिनीवर लिहू लागला.</verse>
				<verse number="9">हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती.</verse>
				<verse number="10">येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?”</verse>
				<verse number="11">ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”]</verse>
				<verse number="12">येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”</verse>
				<verse number="13">परुशी त्याला म्हणाले, “तुम्ही आता स्वतःविषयी साक्ष देत आहात, त्यामुळे तुमची साक्ष खरी नाही.”</verse>
				<verse number="14">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो व कुठे जातो, हे मला ठाऊक आहे. मी कुठून आलो व कुठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही.</verse>
				<verse number="15">तुम्ही मानवी मापदंड वापरून न्याय करता. मी कोणाचा न्याय करत नाही.</verse>
				<verse number="16">परंतु जर मी कोणाचा न्याय केला, तर माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर ज्याने मला पाठवले, तो पिता माझ्याबरोबर आहे.</verse>
				<verse number="17">तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी असते.</verse>
				<verse number="18">मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठवले, तोही माझ्याविषयी साक्ष देतो.”</verse>
				<verse number="19">ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “तुमचा पिता कुठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्याला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”</verse>
				<verse number="20">मंदिरात शिकवत असताना दानपेट्या ठेवण्याच्या खोलीत तो ही वचने बोलला. परंतु त्याला कोणी अटक केली नाही कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.</verse>
				<verse number="21">येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जाईन आणि तुम्ही मला शोधाल परंतु तुम्ही तुमच्या पापांत मराल. मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”</verse>
				<verse number="22">तेव्हा यहुदी अधिकारी म्हणाले, “‘मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, असे हा म्हणतो, ह्याअर्थी हा आत्महत्या तर करणार नाहीना?”</verse>
				<verse number="23">येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात परंतु मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात परंतु मी ह्या जगाचा नाही.</verse>
				<verse number="24">ह्यामुळे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही तुमच्या पापांत मराल कारण मी जो आहे, तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही तुमच्या पापांत मराल.”</verse>
				<verse number="25">त्यांनी त्याला विचारले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे.</verse>
				<verse number="26">मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे. ज्याने मला पाठवले तो सत्य आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्याच मी जगापुढे जाहीर करतो.”</verse>
				<verse number="27">तो आपल्याशी पित्याविषयी बोलत आहे, हे त्यांना समजले नाही.</verse>
				<verse number="28">म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, तेव्हा तुम्हांला कळेल की, मी तो आहे. मी स्वतःच्या अधिकाराने काही करत नाही. तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.</verse>
				<verse number="29">ज्याने मला पाठवले, तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही; कारण जे त्याला आवडते, ते मी नेहमी करतो.”</verse>
				<verse number="30">ह्या गोष्टी बोलत असताना पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="31">नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.</verse>
				<verse number="32">तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.”</verse>
				<verse number="33">त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो, तर ‘तुम्ही बंधमुक्त व्हाल’, असे कसे म्हणता?”</verse>
				<verse number="34">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो.</verse>
				<verse number="35">गुलाम घरात सदासर्वदा राहत नाही परंतु पुत्र सदासर्वदा राहतो.</verse>
				<verse number="36">म्हणून जर पुत्राने तुम्हांला बंधमुक्त केले, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.</verse>
				<verse number="37">तुम्ही अब्राहामचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीही तुमच्यात माझ्या वचनाला स्थान नाही म्हणून तुम्ही मला ठार मारायला पाहता.</verse>
				<verse number="38">माझ्या पित्याजवळ मी जे पाहिले आहे, त्याविषयी मी बोलतो, परंतु तुमच्या पित्याजवळ तुम्ही जे पाहिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही करता.”</verse>
				<verse number="39">त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खरोखर अब्राहामची मुले असता, तर तुम्ही अब्राहामने केली तशी कृत्ये केली असती.</verse>
				<verse number="40">मी देवाकडून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले तरीही मला तुम्ही आता ठार मारायला पाहता, अब्राहामने असे केले नाही!</verse>
				<verse number="41">तुम्ही तुमच्या बापाची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर स्वतः आमचा पिता आहे. आम्ही त्याची खरी मुले आहोत.”</verse>
				<verse number="42">येशूने त्यांना म्हटले, “परमेश्वर जर तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवाकडून आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्याने मला पाठवले आहे.</verse>
				<verse number="43">तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुम्हांला माझे वचन ऐकवत नाही.</verse>
				<verse number="44">तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे.</verse>
				<verse number="45">पण मी तुम्हांला खरे ते सांगतो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.</verse>
				<verse number="46">तुमच्यापैकी कोण मला पापांबद्दल दोषी ठरवू शकतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही?</verse>
				<verse number="47">जो देवाकडचा आहे तो देवाची वचने ऐकतो, परंतु तुम्ही देवाकडचे नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही?”</verse>
				<verse number="48">यहुदी लोकांनी येशूला विचारले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हांला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो, ते बरोबर आहे की नाही?”</verse>
				<verse number="49">येशूने उत्तर दिले, “मला भूत लागले नाही, तर मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही मात्र माझा अपमान करता.</verse>
				<verse number="50">मी स्वतःचा गौरव करू पाहत नाही. माझा गौरव करू पाहणारा व माझ्या बाजूने न्यायनिवाडा करणारा असा तो आहे.</verse>
				<verse number="51">मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, जो माझे वचन पाळील तो कधीही मरण पाहणार नाही.”</verse>
				<verse number="52">ते त्याला म्हणाले, “आता आम्हांला कळले की, तुम्हांला भूत लागले आहे. अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरीही तुम्ही म्हणता, ‘जर कोणी माझे वचन पाळील, तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.’</verse>
				<verse number="53">आमचा पिता अब्राहाम निधन पावला. त्याच्यापेक्षा तुम्ही थोर आहात काय? संदेष्टेही मरण पावले, तुम्ही स्वतःला कोण समजता?”</verse>
				<verse number="54">येशूने उत्तर दिले, “मी माझा स्वतःचा गौरव केला, तर त्याला काही अर्थ नाही. माझा गौरव करणारा माझा पिता आहे व त्याच्याविषयी ‘तो आमचा देव आहे’, असे तुम्ही म्हणता.</verse>
				<verse number="55">तरीही तुम्ही त्याला ओळखले नाही पण मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही, असे जर मी म्हणालो तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. परंतु मी त्याला खरोखर ओळखतो व त्याचे वचन पाळतो.</verse>
				<verse number="56">तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हसित झाला होता. त्याने तो पाहिला व त्याला हर्ष झाला.”</verse>
				<verse number="57">तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, “तुम्ही अजून पन्नास वर्षांचे झाला नाही आणि तुम्ही अब्राहामला पाहिले आहे काय?”</verse>
				<verse number="58">येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, अब्राहाम होता त्यापूर्वी मी आहे.”</verse>
				<verse number="59">ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले, परंतु येशू लपून राहिला व नंतर मंदिरातून निघून गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">रस्त्याने जात असता येशूने एका जन्मांध माणसाला पाहिले.</verse>
				<verse number="2">तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, कोणी पाप केले, ह्याने की ह्याच्या आईबापांनी, म्हणून हा असा आंधळा जन्मला?”</verse>
				<verse number="3">येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले म्हणून नव्हे, पण ह्याच्याठायी देवाचे कार्य दिसावे ह्यासाठी.</verse>
				<verse number="4">ज्याने मला पाठवले त्याची कामे मी दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. रात्र येणार आहे, मग कोणालाही काम करता येणार नाही.</verse>
				<verse number="5">मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”</verse>
				<verse number="6">असे बोलून तो जमिनीवर थुंकला. थुंकीने त्याने माती ओली केली व ती त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांना लावली</verse>
				<verse number="7">आणि त्याला म्हटले, “जा, शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यावर तुझा चेहरा धुऊन घे.” त्याने जाऊन त्याचा चेहरा धुतला. त्याला दिसू लागले व तो परत आला.</verse>
				<verse number="8">हे पाहून त्याचे शेजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही का?”</verse>
				<verse number="9">कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा दिसतो.” तेव्हा तो स्वतः म्हणाला, “मी तोच आहे.”</verse>
				<verse number="10">त्यांनी त्याला विचारले, “तुला कसे दिसू लागले?”</verse>
				<verse number="11">त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने माती ओली करून माझ्या डोळ्यांना लावली आणि मला सांगितले, ‘शिलोहवर जाऊन धुऊन घे.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”</verse>
				<verse number="12">त्यांनी त्याला विचारले, “तो कुठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही.”</verse>
				<verse number="13">जो पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी परुश्यांकडे नेले.</verse>
				<verse number="14">ज्या दिवशी येशूने माती ओली करून त्याचे डोळे उघडले तो साबाथ होता.</verse>
				<verse number="15">म्हणून परुश्यांनीदेखील त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी मिळाली?” तो त्यांना म्हणाला, “येशूने माझ्या डोळ्यांना ओली माती लावली, ती मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”</verse>
				<verse number="16">तेव्हा परुश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवाकडचा नाही कारण तो साबाथ पाळत नाही.” दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशी त्यांच्यामध्ये फूट पडली.</verse>
				<verse number="17">म्हणून पुन्हा त्यांनी त्या आंधळ्या माणसाला विचारले, “ज्याने तुला दृष्टी दिली त्याच्याविषयी तुला काय वाटते?” त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.”</verse>
				<verse number="18">यहुदी अधिकाऱ्यांनी त्या दृष्टी मिळालेल्या माणसाच्या आईबापांना बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा होता व आता त्याला दृष्टी मिळाली आहे, ह्यावर विश्‍वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="19">त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता, तो हाच का? मग आता त्याला दृष्टी कशी मिळाली?”</verse>
				<verse number="20">त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला, हे आम्हांला ठाऊक आहे,</verse>
				<verse number="21">मात्र आता त्याला दृष्टी कशी मिळाली, हे आम्हांला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले, हेदेखील आम्हांला ठाऊक नाही, त्याला विचारा. तो वयात आलेला आहे. तो स्वतःविषयी सांगेल.”</verse>
				<verse number="22">त्याच्या आईबापांना यहुदी अधिकाऱ्यांचे भय वाटत होते म्हणून ते असे म्हणाले; कारण हा ख्रिस्त आहे, असे जो कोणी जाहीर करील त्याला सभास्थानातून बहिष्कृत करावे, असे यहुदी अधिकाऱ्यांचे अगोदरच एकमत झाले होते.</verse>
				<verse number="23">ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, ‘तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.’</verse>
				<verse number="24">जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर. तो मनुष्य पापी आहे, हे आम्हांला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="25">त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की, मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते.”</verse>
				<verse number="26">त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? तुला दृष्टी कशी मिळाली?”</verse>
				<verse number="27">त्याने त्यांना उत्तर दिले, “नुकतेच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, तुम्ही पुन्हा ऐकायची इच्छा का धरता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता का?”</verse>
				<verse number="28">तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, “तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत.”</verse>
				<verse number="29">“देव मोशेबरोबर बोलला आहे, हे आम्हांला ठाऊक आहे, परंतु तो मनुष्य कुठला आहे हे आम्हांला ठाऊकदेखील नाही!”</verse>
				<verse number="30">त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, “हेच तर किती विचित्र आहे! तो कुठला आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही, पण त्याने तर माझे डोळे उघडले.</verse>
				<verse number="31">आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाची आराधना करतो व त्याच्या इच्छेप्रमाणे आचरण करतो, त्याचे तो ऐकतो.</verse>
				<verse number="32">जन्मांधाचे डोळे उघडल्याचे जगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते.</verse>
				<verse number="33">जर हा मनुष्य देवाकडचा नसता, तर ह्याला काही करता आले नसते.”</verse>
				<verse number="34">त्यांनी त्याला म्हटले, “तू पापात जन्मलास व पापात वाढलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला हाकलून लावले.</verse>
				<verse number="35">त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले, तेव्हा त्याने त्याला शोधून काढले व म्हटले, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस का?”</verse>
				<verse number="36">त्याने उत्तर दिले, “प्रभो, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”</verse>
				<verse number="37">येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तोच तुझ्याबरोबर आता बोलत आहे.”</verse>
				<verse number="38">तो म्हणाला, “प्रभो, मी विश्वास ठेवतो” आणि त्याने त्याची आराधना केली.</verse>
				<verse number="39">तेव्हा येशू म्हणाला, “मी ह्या जगात न्यायनिवाड्यासाठी आलो आहे, ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”</verse>
				<verse number="40">परुश्यांतील जे त्याच्याजवळ होते, त्यांनी हे ऐकून त्याला विचारले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”</verse>
				<verse number="41">येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्हांला दोषी ठरवण्यात आले नसते, परंतु तुम्हांला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">येशू म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो मेंढवाड्यात दारातून न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असतो.</verse>
				<verse number="2">जो दारातून आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ असतो.</verse>
				<verse number="3">त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो.</verse>
				<verse number="4">तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात कारण ती त्याची वाणी ओळखतात.</verse>
				<verse number="5">ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, उलट ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत.”</verse>
				<verse number="6">हा दाखला येशूने त्यांना सांगितला. परंतु येशू त्यांना जे सांगत होता, ते त्यांना समजले नाही.</verse>
				<verse number="7">म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी मेंढरांसाठी दार आहे.</verse>
				<verse number="8">जे माझ्या पूर्वी आले, ते सर्व चोर व लुटारू होते. त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही.</verse>
				<verse number="9">मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला कुरण सापडेल.</verse>
				<verse number="10">चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन व तेही परिपूर्ण जीवन मिळावे म्हणून आलो आहे.</verse>
				<verse number="11">मी चांगला मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.</verse>
				<verse number="12">जो मेंढपाळ नसेल व मोलकरी असेल, ज्याची स्वतःची मेंढरे नसतील, तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जाईल आणि मग लांडगा मेंढरांवर झडप घालून त्यांची दाणादाण उडवील.</verse>
				<verse number="13">मोलकरी पळून जाईल कारण तो मोलकरीच असतो आणि त्याला मेंढरांची काळजी नसते.</verse>
				<verse number="14">मी चांगला मेंढपाळ आहे. जसे पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी माझा प्राण देतो.</verse>
				<verse number="15"></verse>
				<verse number="16">ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी इतर मेंढरे आहेत. तीदेखील मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.</verse>
				<verse number="17">मी माझा प्राण देतो तो पुन्हा परत घेण्याकरता, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.</verse>
				<verse number="18">तो माझ्याकडून कोणी घेत नाही, तर मी स्वतःहून तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो पुन्हा परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्याकडून मिळाली आहे.”</verse>
				<verse number="19">ह्या शब्दांमुळे यहुदी अधिकाऱ्यांत पुन्हा फूट पडली.</verse>
				<verse number="20">त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे, त्याचे तुम्ही का ऐकता?”</verse>
				<verse number="21">इतर म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत. भुताला आंधळ्यांना दृष्टी देता येते काय?”</verse>
				<verse number="22">ते हिवाळ्याचे दिवस होते व यरुशलेममध्ये मंदिरसमर्पणाचा सोहळा साजरा केला जात होता.</verse>
				<verse number="23">मंदिरात शलमोनच्या देवडीत येशू फिरत होता.</verse>
				<verse number="24">लोकांनी त्याला घेरले व विचारले, “तुम्ही कुठपर्यंत आम्हांला संभ्रमात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल, तर आम्हांला उघडपणे सांगा.”</verse>
				<verse number="25">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो, ती माझ्याविषयी साक्ष देतात.</verse>
				<verse number="26">मात्र तुम्ही विश्वास ठेवणार नाही कारण मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.</verse>
				<verse number="27">माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.</verse>
				<verse number="28">मी त्यांना शाश्वत जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातांतून कोणी हिसकावून घेणार नाही.</verse>
				<verse number="29">माझ्या पित्याने मला जे दिले आहे ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातांतून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.</verse>
				<verse number="30">मी आणि पिता एक आहोत.”</verse>
				<verse number="31">तेव्हा यहुदी लोकांनी त्याला मारण्यासाठी पुन्हा दगड उचलले.</verse>
				<verse number="32">येशू त्यांना म्हणाला, “पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये मी तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यांकरता तुम्ही मला दगड मारत आहात?”</verse>
				<verse number="33">त्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हांला दगड मारत नाही, तर दुर्भाषणासाठी! कारण तुम्ही केवळ मानव असून स्वतःला देव म्हणवता.”</verse>
				<verse number="34">येशूने त्यांना म्हटले, ““तुम्ही देव आहात, असे मी म्हणतो’, हे तुमच्या धर्मशास्त्रात लिहिले नाही काय?</verse>
				<verse number="35">आणि ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि धर्मशास्त्रलेखाचा भंग होत नाही,</verse>
				<verse number="36">तर ज्याला पित्याने पवित्र कार्यासाठी निवडून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटले म्हणून तुम्ही दुर्भाषण करता असे म्हणता काय?</verse>
				<verse number="37">मी पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका.</verse>
				<verse number="38">परंतु जर मी ती करतो, तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी निदान त्या कृत्यांवर विश्वास ठेवा. या मागचा हेतू हा की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून व समजून घ्यावे.”</verse>
				<verse number="39">ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले परंतु तो त्यांच्या हातांतून सुटला.</verse>
				<verse number="40">तो पुन्हा यार्देन नदीच्या पलीकडे, योहान सुरुवातीला बाप्तिस्मा देत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला.</verse>
				<verse number="41">तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले व ते म्हणाले, “योहानने काही चिन्ह केले नाही खरे, परंतु योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”</verse>
				<verse number="42">तेथे अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">बेथानी ह्या गावी लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्यांचे हे गाव होते.</verse>
				<verse number="2">हा आजारी पडलेला लाजर ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेलाचा अभिषेक केला होता व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा भाऊ होता.</verse>
				<verse number="3">त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला, “प्रभो, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे.”</verse>
				<verse number="4">ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”</verse>
				<verse number="5">मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती.</verse>
				<verse number="6">तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला.</verse>
				<verse number="7">त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.”</verse>
				<verse number="8">शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, तेथील लोक अलीकडेच तुमच्यावर दगडमार करू पहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाणार का?”</verse>
				<verse number="9">येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो.</verse>
				<verse number="10">परंतु तो रात्री चालला तर त्याला ठेच लागते, कारण तेव्हा उजेड नसतो.”</verse>
				<verse number="11">हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.”</verse>
				<verse number="12">शिष्य त्याला म्हणाले, “प्रभो, त्याला झोप लागली असेल, तर त्याला बरे वाटेल.”</verse>
				<verse number="13">येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.</verse>
				<verse number="14">म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.”</verse>
				<verse number="15">तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी तेथे नव्हतो, ह्याचा मला आनंद वाटतो. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”</verse>
				<verse number="16">तेव्हा ज्याला दिदुम म्हणजे जुऴा म्हणत तो थोमा आपल्या जोडीदार शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ!”</verse>
				<verse number="17">येशू बेथानीला आला तेव्हा त्याला कळले की, लाजरला कबरीत ठेवून चार दिवस झाले होते.</verse>
				<verse number="18">बेथानी यरूशलेमपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते</verse>
				<verse number="19">आणि पुष्कळ यहुदी लोक मार्था व मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यासाठी तेथे आले होते.</verse>
				<verse number="20">येशू येत आहे, हे ऐकताच मार्था बाहेर जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली.</verse>
				<verse number="21">मार्था येशूला म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.</verse>
				<verse number="22">परंतु आतादेखील जे काही आपण देवाकडून मागाल, ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="23">येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”</verse>
				<verse number="24">मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="25">येशूने तिला म्हटले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल.</verse>
				<verse number="26">आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीही मरणार नाही, असा तुझा विश्‍वास आहे का?”</verse>
				<verse number="27">ती त्याला म्हणाली, “हो प्रभो, माझा विश्‍वास आहे की, जो जगात येणारा देवाचा पुत्र आहे तो ख्रिस्त तुम्ही आहात.”</verse>
				<verse number="28">असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहेत.”</verse>
				<verse number="29">हे ऐकताच ती लगेच उठून त्याच्याकडे गेली.</verse>
				<verse number="30">येशू अजून गावात आला नव्हता पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता.</verse>
				<verse number="31">जे लोक मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले आणि ती शोक करायला कबरीकडे जात आहे, असे समजून ते तिच्या मागे गेले.</verse>
				<verse number="32">येशू होता तेथे मरिया गेली आणि त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ आम्हांला सोडून गेला नसता.”</verse>
				<verse number="33">येशूने तिला व तिच्याबरोबर आलेल्या लोकांना रडताना पाहिले तेव्हा तो आत्म्यात कळवळला व व्याकूळ होऊन म्हणाला,</verse>
				<verse number="34">“तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभो, येऊन पाहा.”</verse>
				<verse number="35">येशू रडला.</verse>
				<verse number="36">हे पाहून लोक म्हणाले, “पाहा, ह्याची त्याच्यावर किती प्रीती होती!”</verse>
				<verse number="37">परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळता आले नसते काय?”</verse>
				<verse number="38">येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती.</verse>
				<verse number="39">येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.”</verse>
				<verse number="40">येशूने म्हटले, “तू विश्वास ठेवलास तर देवाचे वैभव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का?”</verse>
				<verse number="41">हे ऐकून त्यांनी शिळा बाजूला सारली. येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो.</verse>
				<verse number="42">मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी पण जे लोक सभोवती उभे आहेत त्यांचा तू मला पाठवले आहेस ह्यावर विश्वास बसावा, म्हणून मी हे बोललो.”</verse>
				<verse number="43">असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!”</verse>
				<verse number="44">तेव्हा मृत मनुष्य बाहेर आला. त्याचे हातपाय कापडाने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने लोकांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”</verse>
				<verse number="45">मरियेकडे आलेल्या यहुदी लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली.</verse>
				<verse number="46">परंतु काही लोकांनी परुश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते सांगितले.</verse>
				<verse number="47">तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवली आणि म्हटले, “आपण काय करणारआहोत? पाहा, तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करीत आहे!</verse>
				<verse number="48">आपण त्याला असेच सोडले, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले पवित्र स्थान व राष्ट्रही बळकावतील.”</verse>
				<verse number="49">त्यांच्यापैकी कयफा नावाचा एक मनुष्य जो त्या वर्षी उच्च याजक होता, त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही.</verse>
				<verse number="50">प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश टळावा, हे तुमच्या हिताचे आहे, हेदेखील तुमच्या लक्षात येत नाही का?”</verse>
				<verse number="51">खरे म्हणजे हे तो आपल्या मनातले बोलला नाही, तर त्या वर्षी तो उच्च याजक होता म्हणून त्याने भाकीत केले की, येशू राष्ट्राकरता मरणार होता</verse>
				<verse number="52">आणि केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांना जमवून एकत्र करावे ह्याकरता तो मरणार होता.</verse>
				<verse number="53">त्या दिवसापासून यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला ठार मारण्याचा आपसात बेत रचला.</verse>
				<verse number="54">म्हणूनच येशू तेव्हापासून यहुदियामध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरात गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला.</verse>
				<verse number="55">त्या वेळी यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक ओलांडण सणाच्या आधी आपल्याला शुद्ध करून घेण्यासाठी बाहेरगावाहून यरुशलेमला गेले.</verse>
				<verse number="56">ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे असताना एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? तो सणासाठी येणार नाही का?”</verse>
				<verse number="57">मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला अटक करण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कुठे आहे, हे कोणाला कळल्यास त्याने त्यांना खबर द्यावी.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">ओलांडण सणाच्या सहा दिवस आधी येशू बेथानीस आला. ज्या लाजरला येशूने मेलेल्यांतून उठवले होते, तो तेथे राहत होता.</verse>
				<verse number="2">म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी भोजन आयोजित केले. मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता.</verse>
				<verse number="3">मरियेने अर्धा लिटर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि स्वतःच्या केसांनी त्याचे चरण पुसले, तेव्हा त्या तेलाचा सुगंध घरभर दरवळला.</verse>
				<verse number="4">मात्र जो त्याचा विश्‍वासघात करणार होता, तो म्हणजे त्याच्या शिष्यांपैकी यहुदा इस्कर्योत म्हणाला,</verse>
				<verse number="5">“हे सुगंधी तेल तीनशे चांदीच्या नाण्यांना विकून ती रक्कम गरिबांना का दिली नाही?”</verse>
				<verse number="6">त्याला गरिबांविषयी कळवळा होता म्हणून तो हे म्हणाला असे नव्हे तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पैशाची थैली होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला.</verse>
				<verse number="7">परंतु येशूने म्हटले, “तिच्याजवळ जे आहे, ते तिला माझ्या अंत्यसंस्काराच्या दिवसासाठी ठेवू द्या.</verse>
				<verse number="8">कारण गरीब नेहमी तुमच्याबरोबर आहेत. परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असेन असे नाही.”</verse>
				<verse number="9">तो तेथे आहे, असे पुष्कळ यहुदी लोकांना कळले आणि केवळ येशूकरता नव्हे, तर ज्या लाजरला त्याने मेलेल्यांतून उठवले होते, त्याला पाहण्याकरता लोक तेथे आले.</verse>
				<verse number="10">म्हणून मुख्य याजकांनी लाजरलाही ठार मारण्याचा निश्चय केला;</verse>
				<verse number="11">कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून गेले आणि येशूवर विश्वास ठेवू लागले.</verse>
				<verse number="12">सणास आलेल्या पुष्कळ लोकांनी येशू यरुशलेममध्ये येत आहे, असे दुसऱ्या दिवशी ऐकले.</verse>
				<verse number="13">ते खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! देवाचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलचा राजा धन्य असो!”</verse>
				<verse number="14">येशूला शिंगरू मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला कारण धर्मशास्त्रलेख असा आहे:</verse>
				<verse number="15">हे सीयोनकन्ये, भिऊ नकोस. पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.</verse>
				<verse number="16">प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नाहीत. परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवले की, हे त्याच्याविषयी लिहिले होते आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याच्यासाठी हे केले.</verse>
				<verse number="17">येशूने लाजरला कबरीतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळी जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याबद्दल साक्ष दिली होती.</verse>
				<verse number="18">ह्यामुळेही लोक त्याला भेटायला गेले कारण त्याने हे चिन्ह केले होते, असे त्यांनी ऐकले.</verse>
				<verse number="19">परुशी एकमेकांना म्हणाले, “आपले काही चालत नाही, हे लक्षात घ्या. पाहा, सगळे जग त्याच्यामागे चालले आहे.”</verse>
				<verse number="20">सणात उपासना करायला आलेल्या लोकांपैकी काही ग्रीक होते.</verse>
				<verse number="21">त्यांनी गालीलमधील बेथसैदा येथील फिलिप ह्याच्याजवळ येऊन विनंती केली, “महाशय, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”</verse>
				<verse number="22">फिलिपने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप ह्यांनी येऊन येशूला सांगितले.</verse>
				<verse number="23">येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे.</verse>
				<verse number="24">मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.</verse>
				<verse number="25">जो आपल्या जिवावर प्रेम करतो, तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो, तो त्याला शाश्वत जीवनासाठी राखील.</verse>
				<verse number="26">जर कोणाला माझी सेवा करायची असेल, तर त्याने मला अनुसरणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो, त्याचा सन्मान माझा पिता करील.</verse>
				<verse number="27">आता माझा जीव व्याकूळ झाला आहे. मी काय बोलू? हे पित्या, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, असे म्हणू काय? परंतु या घटकेला सामोरे जाण्यासाठीच तर मी आलो आहे.</verse>
				<verse number="28">हे पित्या, तू स्वतःच्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली, “मी त्याचा गौरव केला आहे आणि पुन्हाही करीन.”</verse>
				<verse number="29">तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.”</verse>
				<verse number="30">परंतु येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी झाली आहे.</verse>
				<verse number="31">आता ह्या जगाचा न्याय होत आहे. आता ह्या जगाचा सत्ताधीश बाहेर फेकला जाईल.</verse>
				<verse number="32">मला पृथ्वीपासून उंच केले, तर मी सर्वांना माझ्याकडे ओढून घेईन.”</verse>
				<verse number="33">कोणत्या मरणाने आपण मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला.</verse>
				<verse number="34">लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील, असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे. तर मग मनुष्याच्या पुत्राला उंच केले गेले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”</verse>
				<verse number="35">येशूने त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश असेल, तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याकडे प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा. जो अंधकारात चालतो त्याला आपण कुठे जातो, हे कळत नाही.</verse>
				<verse number="36">तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असताना प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.</verse>
				<verse number="37">त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतानाही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="38">हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे, ते असे: प्रभो, आम्ही सांगितलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचे सामर्थ्य कोणाला प्रकट झाले आहे?</verse>
				<verse number="39">तसेच त्यांना विश्वास ठेवता आला नाही, कारण यशया आणखी म्हणाला:</verse>
				<verse number="40">त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, माझ्याकडे वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.</verse>
				<verse number="41">यशयाने येशूचे वैभव पाहिले म्हणून त्याच्याविषयी तो असे बोलला.</verse>
				<verse number="42">असे असूनही अधिकाऱ्यांपैकीदेखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तरी पण आपण सभास्थानातून बहिष्कृत होऊ नये म्हणून परुश्यांमुळे ते तसे उघडपणे कबूल करत नव्हते.</verse>
				<verse number="43">त्यांना देवाकडून मिळणाऱ्या प्रशंसेपेक्षा मनुष्यांकडून मिळणारी प्रशंसा अधिक प्रिय वाटत होती.</verse>
				<verse number="44">येशू आवर्जून म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो केवळ माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावरही ठेवतो,</verse>
				<verse number="45">जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठवले त्यालाही पाहतो.</verse>
				<verse number="46">जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याने अंधकारात राहू नये ह्यासाठी मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे.</verse>
				<verse number="47">जो माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही, त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.</verse>
				<verse number="48">जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा कोणी तरी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील.</verse>
				<verse number="49">कारण मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे</verse>
				<verse number="50">आणि त्याची आज्ञा शाश्वत जीवन आहे, हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">ओलांडण सणापूर्वी असे झाले की, ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आता आली आहे, हे येशूने ओळखले. ह्या जगातील आप्तजनांवर त्याची जी प्रीती होती ती त्याने शेवटपर्यंत केली.</verse>
				<verse number="2">शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याच्या मनात येशूचा विश्‍वासघात करावा, असा विचार सैतान आधीच घालून चुकला होता.</verse>
				<verse number="3">आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे व आपण देवाकडून आलो आहोत व देवाकडे जात आहोत हे जाणून</verse>
				<verse number="4">रात्रीचे भोजन होत असताना येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपले बाह्य वस्त्र काढले व एक टावेल घेऊन आपल्या कमरेला बांधला.</verse>
				<verse number="5">नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला.</verse>
				<verse number="6">तो पेत्राकडे आला, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय?”</verse>
				<verse number="7">येशूने त्याला उत्तर दिले, “मी जे करत आहे ते तुला आता कळणार नाही. ते तुला पुढे कळेल.”</verse>
				<verse number="8">पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्याबरोबर वाटा मिळणार नाही.”</verse>
				<verse number="9">पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, तसे असेल, तर माझे पायच नव्हे, तर हात व डोकेही धुवा.”</verse>
				<verse number="10">येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे, त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.”</verse>
				<verse number="11">आपला विश्‍वासघात करणारा कोण आहे, हे त्याला अगोदरच ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.’</verse>
				<verse number="12">त्यांचे पाय धुतल्यावर व आपले बाह्य वस्त्र चढवून पुन्हा खाली बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता काय केले, हे तुम्हांला समजले काय?</verse>
				<verse number="13">तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते योग्य आहे कारण मी तसा आहे.</verse>
				<verse number="14">प्रभू व गुरू असूनही मी तुमचे पाय धुतले. मग तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.</verse>
				<verse number="15">जसे मी तुमच्यासाठी केले, तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे.</verse>
				<verse number="16">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही.</verse>
				<verse number="17">जर ह्या गोष्टी तुम्हांला समजल्या, तर त्या केल्याने तुम्ही किती धन्य ठराल!</verse>
				<verse number="18">मी तुम्हां सर्वांविषयी बोलत नाही; जे मी निवडले, ते मला माहीत आहेत. तरी पण ‘जो माझी भाकर खातो, तोच माझ्यावर उलटतो’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.</verse>
				<verse number="19">जेव्हा हे घडेल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे म्हणून हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो.</verse>
				<verse number="20">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी ज्याला पाठवतो, त्याचा जो स्वीकार करतो तो माझाही स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो.”</verse>
				<verse number="21">असे बोलल्यावर येशू आत्म्यात विव्हळला व उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”</verse>
				<verse number="22">तो कोणाविषयी बोलत असावा, ह्या संभ्रमात शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.</verse>
				<verse number="23">ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता.</verse>
				<verse number="24">तो कोणाविषयी बोलतो, हे विचार, असे पेत्राने त्या शिष्याला खुणावून सांगितले.</verse>
				<verse number="25">तेव्हा तो येशूच्या उराशी टेकलेला होता तसाच येशूला म्हणाला, “प्रभो, तो कोण आहे?”</verse>
				<verse number="26">येशूने उत्तर दिले, “मी ज्याला भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.” त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याला दिला.</verse>
				<verse number="27">भाकरीचा तुकडा दिल्याबरोबर सैतान त्याच्यात शिरला. येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे, ते लवकर करून टाक.”</verse>
				<verse number="28">मात्र त्याने त्याला असे कशासाठी सांगितले, हे भोजनास बसलेल्यांतील इतर कोणाला समजले नाही.</verse>
				<verse number="29">यहुदाजवळ पैशाची थैली होती म्हणून सणासाठी जे आवश्यक आहे ते विकत घ्यावे, किंवा गरिबांना काहीतरी द्यावे, असे येशू सांगत आहे, असे काही शिष्यांना वाटले.</verse>
				<verse number="30">भाकरीचा तुकडा घेतल्यावर यहुदा लगेच बाहेर गेला. ती रात्रीची वेऴ होती.</verse>
				<verse number="31">यहुदा बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचे वैभव प्रकट झाले आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे</verse>
				<verse number="32">आणि जर त्याच्याद्वारे देवाचे वैभव प्रकट झाले आहे, तर देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील. तो त्याचा लवकरच गौरव करील.</verse>
				<verse number="33">मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन. तुम्ही मला शोधाल परंतु जसे मी यहुद्यांना सांगितले तसे तुम्हांलाही आता सांगतो, जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही,</verse>
				<verse number="34">मी तुम्हांला एक नवीन आज्ञा देतो:तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा.</verse>
				<verse number="35">तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”</verse>
				<verse number="36">पेत्राने येशूला विचारले, “प्रभो, आपण कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “मी जेथे जातो, तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील.”</verse>
				<verse number="37">पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, मला आपल्यामागे आता का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे.”</verse>
				<verse number="38">येशूने त्याला उत्तर दिले, “माझ्यासाठी तू स्वतःचा प्राण देशील काय? मी तुला खातरी पूर्वक सांगतो, तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा.</verse>
				<verse number="2">माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. असे जर नसते तर मी तुम्हांला तसे सांगितले असते.</verse>
				<verse number="3">जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे म्हणून मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हांला माझ्याजवळ नेईन.</verse>
				<verse number="4">मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="5">थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”</verse>
				<verse number="6">येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.</verse>
				<verse number="7">मी कोण आहे, हे ज्याअर्थी आता तुम्ही ओळखले आहे, त्याअर्थी तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखाल आणि आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”</verse>
				<verse number="8">फिलिप त्याला म्हणाला, “प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला तेवढे पुरे आहे.”</verse>
				<verse number="9">येशूने उत्तर दिले, “फिलिप, मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर असून तू मला अजूनही ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा, असे तू का म्हणतोस?</verse>
				<verse number="10">मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू ठेवत नाहीस का? जे काही मी तुम्हांला सांगतो, ते मी स्वतःचे सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो.</verse>
				<verse number="11">माझ्यावर विश्‍वास ठेवा. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्‍वास ठेवा.</verse>
				<verse number="12">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यांपेक्षाही मोठी कृत्ये करील, कारण मी पित्याकडे जात आहे.</verse>
				<verse number="13">तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल, ते पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून मी करीन.</verse>
				<verse number="14">तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल, ते मी करीन.</verse>
				<verse number="15">माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.</verse>
				<verse number="16">मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, हेतू हा की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे.</verse>
				<verse number="17">जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वसती करील.</verse>
				<verse number="18">मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे परत येईन.</verse>
				<verse number="19">आता थोडा वेळ आहे. मग ह्यापुढे जग मला पाहणार नाही. तुम्ही मात्र मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.</verse>
				<verse number="20">जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्हांला समजेल की, मी माझ्या पित्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आहात व मी तुमच्यामध्ये आहे.</verse>
				<verse number="21">ज्याने माझ्या आज्ञा स्वीकारल्या आहेत व जो त्या पाळतो, तो माझ्यावर प्रीती करतो आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याच्यासमोर प्रकट होईन.”</verse>
				<verse number="22">यहुदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभो, आपण स्वतः आमच्यासमोर प्रकट व्हाल आणि जगासमोर प्रकट होणार नाही हे कसे?”</verse>
				<verse number="23">येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील आणि त्याच्यावर माझा पिता प्रीती करील व आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वसती करू.</verse>
				<verse number="24">ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे.</verse>
				<verse number="25">मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.</verse>
				<verse number="26">ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या, त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.</verse>
				<verse number="27">मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका.</verse>
				<verse number="28">मी आता जातो आणि तुमच्याकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले, ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर मी पित्याकडे जात आहे, ह्याचा तुम्हांला आनंद होईल, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.</verse>
				<verse number="29">ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी मी तुम्हांला सांगितले आहे.</verse>
				<verse number="30">ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा सत्ताधीश येत आहे. पण त्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही.</verse>
				<verse number="31">परंतु जगाने हे ओळखावे की, मी पित्यावर प्रीती करतो, म्हणून पिता जशी मला आज्ञा देतो, तसे मी करतो. उठा, आपण येथून निघू या.”</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.</verse>
				<verse number="2">तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याने अधिक फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी करतो.</verse>
				<verse number="3">मी तुम्हांला जे वचन सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.</verse>
				<verse number="4">तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही.</verse>
				<verse number="5">मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हांला काही करता येणार नाही.</verse>
				<verse number="6">कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर वेलीपासून छाटलेल्या फाट्याप्रमाणे तो वाळून जातो; असे वाळलेले फाटे एकत्र करून अग्नीत टाकले जातात व तेथे ते जळून जातात.</verse>
				<verse number="7">तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिलीत, तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा; ते तुमच्यासाठी केले जाईल.</verse>
				<verse number="8">तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.</verse>
				<verse number="9">जसा पिता माझ्यावर प्रीती करतो, तसा मीही तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.</verse>
				<verse number="10">जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.</verse>
				<verse number="11">माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला हे सारे सांगितले आहे.</verse>
				<verse number="12">माझी ही आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा.</verse>
				<verse number="13">आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही.</verse>
				<verse number="14">तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात.</verse>
				<verse number="15">मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे.</verse>
				<verse number="16">तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे.</verse>
				<verse number="17">तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.</verse>
				<verse number="18">जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला, हे लक्षात ठेवा.</verse>
				<verse number="19">तुम्ही जगाचे असता, तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते.</verse>
				<verse number="20">दास धन्यापेक्षा थोर नाही, हे जे मी तुम्हांला सांगितले, त्या वचनाची आठवण ठेवा. जर त्यांनी माझा छळ केला तर ते तुमचाही करतील. जर त्यांनी माझे वचन पाळले, तर ते तुमचेही पाळतील,</verse>
				<verse number="21">परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.</verse>
				<verse number="22">मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो, तर त्यांच्याकडे पाप नसते. परंतु आता त्यांना त्यांच्या पापाबद्दलची सबब देता येणार नाही.</verse>
				<verse number="23">जो माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.</verse>
				<verse number="24">जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाहीत, ती मी त्यांच्यामध्ये केली नसती, तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी माझी कृत्ये पाहिली आहेत तरी ते माझा व माझ्या पित्याचाही द्वेष करतात.</verse>
				<verse number="25">‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’, हे जे वचन त्यांच्या धर्मशास्त्रात लिहिले आहे, ते पूर्ण व्हावे म्हणून हे होत आहे.</verse>
				<verse number="26">कैवारी, म्हणजे पित्याकडून निघणारा सत्याचा आत्मा, मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन. तो येईल तेव्हा माझ्याविषयी साक्ष देईल</verse>
				<verse number="27">आणि तुम्हीही माझ्याविषयी साक्ष द्याल, कारण तुम्ही अगदी प्रारंभापासून माझ्याबरोबर आहात.”</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">“तुम्ही श्रद्धा सोडून बहकू नये म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.</verse>
				<verse number="2">तुम्हांला सभास्थानातून बहिष्कृत करण्यात येईल. इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला तो देवाची सेवा करत आहे, असे वाटेल, अशी वेळ येत आहे.</verse>
				<verse number="3">लोकांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.</verse>
				<verse number="4">परंतु मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हांला आठवण होईल. ह्या गोष्टी मी आधीपासूनच तुम्हांला सांगितल्या नाहीत, कारण आतापर्यंत मी तुमच्याबरोबर होतो.</verse>
				<verse number="5">परंतु ज्याने मला तुमच्याकडे पाठवले त्याच्याकडे आता मी जात आहे. तरीही आपण कुठे जाता, असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारत नाही.</verse>
				<verse number="6">ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने जड झाले आहे.</verse>
				<verse number="7">तरीही मी तुम्हांला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. परंतु मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.</verse>
				<verse number="8">तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी पटवील.</verse>
				<verse number="9">पापाविषयी, कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत;</verse>
				<verse number="10">नीतिमत्वाविषयी, कारण मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही</verse>
				<verse number="11">आणि न्यायनिवाड्याविषयी, कारण ह्या जगाच्या सत्ताधीशाचा न्याय झाला आहे.</verse>
				<verse number="12">मला अजून तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत,</verse>
				<verse number="13">तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील.</verse>
				<verse number="14">तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे तेच तो तुम्हांला सांगेल.</verse>
				<verse number="15">जे काही पित्याचे आहे, ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हटले, जे माझे आहे, तेच तो तुम्हांला सांगेल.</verse>
				<verse number="16">थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”</verse>
				<verse number="17">हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “‘थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, कारण मी पित्याकडे जात आहे’, असे जे तो म्हणाला त्याचा अर्थ काय?”</verse>
				<verse number="18">ते विचारत होते, “‘थोडा वेळ’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो, हे आम्हांला समजत नाही.”</verse>
				<verse number="19">त्याला काही विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय?</verse>
				<verse number="20">मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल परंतु जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, परंतु तुमचे दुःख तुमचा आनंद होईल.</verse>
				<verse number="21">स्त्री प्रसूत होत असताना तिला वेदना होतात कारण तिची प्रसूतीची घटका जवळ आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर, जगात एक मानव जन्मला आहे म्हणून तिला जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या वेदनांची आठवण होत नाही.</verse>
				<verse number="22">ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.</verse>
				<verse number="23">त्या दिवशी तुम्ही माझ्याकडून काही मागणार नाही. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही पित्याजवळ माझ्या नावाने काही मागाल तर तो ते तुम्हांला देईल.</verse>
				<verse number="24">तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.</verse>
				<verse number="25">ह्या गोष्टी मी तुम्हांला अप्रत्यक्षपणे सांगितल्या आहेत. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर अप्रत्यक्षपणे बोलणार नाही, तर तुम्हांला पित्याविषयी उघडपणे सांगण्याची घटका जवळ येत आहे.</verse>
				<verse number="26">त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी पित्याजवळ तुमच्यासाठी विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही.</verse>
				<verse number="27">तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्याकडून आलो आहे, असा विश्वास तुम्ही बाळगला आहे म्हणून पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो.</verse>
				<verse number="28">मी पित्याकडून ह्या जगात आलो आहे व पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.”</verse>
				<verse number="29">त्याचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलता, अप्रत्यक्षपणे काही सांगत नाही.</verse>
				<verse number="30">आता आम्हांला समजले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपल्याला प्रश्न विचारावेत ह्याची गरज नाही, ह्यावरून आपण देवाकडून आला आहात, असा आम्ही विश्वास धरतो.”</verse>
				<verse number="31">येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय?</verse>
				<verse number="32">पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही कारण पिता माझ्याबरोबर आहे.</verse>
				<verse number="33">तुम्हांला माझ्या ठायी शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा. मी जगावर विजय मिळवला आहे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="17">
				<verse number="1">ह्या गोष्टी बोलल्यावर येशू आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू तुझ्या पुत्राचा गौरव कर.</verse>
				<verse number="2">तू त्याला जे दिले आहेत त्या सर्वांना त्याने शाश्वत जीवन द्यावे म्हणून तू सर्व मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहेस.</verse>
				<verse number="3">शाश्वत जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.</verse>
				<verse number="4">जे कार्य तू मला करायला दिलेस, ते पुरे करून मी तुझा पृथ्वीवर गौरव केला आहे.</verse>
				<verse number="5">हे माझ्या पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी तुझ्याबरोबर माझे जे वैभव होते, तेच वैभव तुझ्या उपस्थितीत मला आता दे.</verse>
				<verse number="6">जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस. त्यांनी तुझे वचन पाळले आहे.</verse>
				<verse number="7">आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस, ते सर्व तुझ्याकडून आले आहे.</verse>
				<verse number="8">जी वचने तू मला दिलीस, ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्याकडून आलो, हे ते ओळखतात आणि तू मला पाठवले आहेस, असा ते विश्वास ठेवतात.</verse>
				<verse number="9">त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत.</verse>
				<verse number="10">जे माझे आहेत ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे माझा गौरव झाला आहे.</verse>
				<verse number="11">ह्यापुढे मी जगात नाही परंतु ते मात्र ह्या जगात आहेत. आता मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून, तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे संरक्षण कर.</verse>
				<verse number="12">जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावाने मी त्यांचे संरक्षण केले. मी त्यांचा सांभाळ केला. ज्याचा विनाश अटळ आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामधील कोणीही हरवला नाही. धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.</verse>
				<verse number="13">आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी ह्या गोष्टी जगात बोलत आहे.</verse>
				<verse number="14">मी त्यांना तुझा संदेश कळवला आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.</verse>
				<verse number="15">तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो.</verse>
				<verse number="16">जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.</verse>
				<verse number="17">सत्यात तू त्यांना तुझ्याकरता समर्पित करून घे. तुझे वचन हेच सत्य आहे.</verse>
				<verse number="18">जसे तू मला जगात पाठवलेस तसेच मी त्यांना जगात पाठवले</verse>
				<verse number="19">आणि त्यांनीही तुझ्याकरता समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला तुझ्यापुढे समर्पित करतो.</verse>
				<verse number="20">मी केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांनी सांगितलेल्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करत आहे की,</verse>
				<verse number="21">त्या सर्वांनी एक व्हावे. पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे. म्हणजे तू मला पाठवले आहेस, असा विश्वास जगाने ठेवावा.</verse>
				<verse number="22">जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणून तू मला दिलेल्या वैभवात मी त्यांना सहभागी केले आहे.</verse>
				<verse number="23">त्यांनी पूर्णपणे एक व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आहेस आणि तू जशी माझ्यावर प्रीती करतोस तशी त्यांच्यावरही प्रीती करतोस.</verse>
				<verse number="24">जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस म्हणून हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे, तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे वैभव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे.</verse>
				<verse number="25">हे नीतिमान पित्या, जग तुला ओळखत नाही. मी तुला ओळखतो आणि तू मला पाठवलेस, हे त्यांना ठाऊक आहे.</verse>
				<verse number="26">मी तुझे नाव त्यांना सांगितले आहे आणि पुढेही सांगत राहीन. त्यामुळे, जी प्रीती तू माझ्यावर करतोस, ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि मीसुद्धा त्यांच्यामध्ये असावे.”</verse>
			</chapter>
			<chapter number="18">
				<verse number="1">ह्या प्रार्थनेनंतर येशू त्याच्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडील बागेत गेला.</verse>
				<verse number="2">ही जागा त्याचा विश्‍वासघात करणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती. कारण येशू त्याच्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे.</verse>
				<verse number="3">तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडच्या रक्षकांसह यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला.</verse>
				<verse number="4">त्याच्या बाबतीत घडणाऱ्या सर्व गोष्टी जाणून असल्यामुळे, येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?”</verse>
				<verse number="5">त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” त्याला धरून देणारा यहुदा इस्कर्योत त्यांच्याबरोबर तेथे उभा होता.</verse>
				<verse number="6">‘तो मी आहे’, असे येशूने म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले.</verse>
				<verse number="7">तेव्हा येशूने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”</verse>
				<verse number="8">येशू म्हणाला, “तो मी आहे, असे मी तुम्हांला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.”</verse>
				<verse number="9">‘तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही’, हे त्याचे वचन पूर्ण व्हावे, म्हणून तो हे बोलला.</verse>
				<verse number="10">शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून उच्च याजकांच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.</verse>
				<verse number="11">येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल. पित्याने जो दुःखाचा प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय?”</verse>
				<verse number="12">त्यानंतर सैनिकांची तुकडी, तिचे अधिकारी व यहुदी अधिकाऱ्यांनी पाठवलेले रक्षक ह्यांनी येशूला धरून बांधले.</verse>
				<verse number="13">त्यांनी त्याला प्रथम हन्‍नाकडे नेले. त्या वर्षी उच्च याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता.</verse>
				<verse number="14">एका मनुष्याने लोकांसाठी मरावे, हे हिताचे आहे, असा ह्याच कयफाने यहुदी लोकांना स्रा दिला होता.</verse>
				<verse number="15">शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे गेले. तो शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता म्हणून तो येशूबरोबर उच्च याजकांच्या वाड्यात गेला.</verse>
				<verse number="16">पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.</verse>
				<verse number="17">ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तू त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना?” त्याने म्हटले, “मी नाही.”</verse>
				<verse number="18">थंडी असल्यामुळे दास व रक्षक हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते. त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला.</verse>
				<verse number="19">उच्च याजकांनी येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले.</verse>
				<verse number="20">येशूने त्यांना उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी लोक जमतात तेथे मी नेहमी प्रबोधन केले आहे. गुप्तपणे काही बोललो नाही.</verse>
				<verse number="21">मला का विचारता? मी काय बोललो, हे ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="22">त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभ्या असलेल्या एका रक्षकाने येशूला चपराक मारून म्हटले, “तू उच्च याजकांना असा जबाब देतोस काय?”</verse>
				<verse number="23">येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट बोललो असलो, तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो, तर मला का मारतोस?”</verse>
				<verse number="24">तेव्हा हन्‍नाने त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे बांधलेलेच पाठवले.</verse>
				<verse number="25">शिमोन पेत्र अजूनही शेकत उभा राहिला होता. त्याच्याबरोबर शेकत उभ्या असलेल्या लोकांनी त्याला विचारले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” परंतु तो म्हणाला, “मी नाही.”</verse>
				<verse number="26">ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग उच्च याजकांच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”</verse>
				<verse number="27">पेत्राने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला!</verse>
				<verse number="28">दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले. त्यांना विटाळ होऊ नये व त्यांना ओलांडण सणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत.</verse>
				<verse number="29">पिलात स्वतः त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर कोणता आरोप ठेवता?”</verse>
				<verse number="30">त्यांनी त्याला उत्तर दिले, “हा गुन्हेगार नसता, तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”</verse>
				<verse number="31">पिलात त्यांना म्हणाला, “त्याला नेऊन तुम्हीच तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहुदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”</verse>
				<verse number="32">कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.</verse>
				<verse number="33">पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?”</verse>
				<verse number="34">येशूने उत्तर दिले, “आपण स्वतःहून हे म्हणता की, दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी हे सांगितले?”</verse>
				<verse number="35">पिलातने उत्तर दिले, “मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?”</verse>
				<verse number="36">येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते, तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.”</verse>
				<verse number="37">तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.”</verse>
				<verse number="38">पिलातने त्याला विचारले, “सत्य काय आहे?” नंतर तो पुन्हा बाहेर जाऊन यहुदी लोकांना म्हणाला, “मला ह्याच्यात काहीच दोष सापडत नाही.</verse>
				<verse number="39">पण ओलांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे तर मग मी तुमच्यासाठी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?”</verse>
				<verse number="40">तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.</verse>
			</chapter>
			<chapter number="19">
				<verse number="1">नंतर पिलातने येशूला नेले आणि फटके मारवले.</verse>
				<verse number="2">शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला व त्याला जांभळा झगा घातला.</verse>
				<verse number="3">ते त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या.</verse>
				<verse number="4">पिलातने पुन्हा बाहेर जाऊन लोकांना म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्यासमोर बाहेर आणतो.”</verse>
				<verse number="5">काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला, पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”</verse>
				<verse number="6">मुख्य याजक व मंदिराचे रक्षक त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन क्रुसावर खिळा कारण मला तो अपराधी वाटत नाही.”</verse>
				<verse number="7">यहुदी लोकांनी त्याला उत्तर दिले, “आमच्या कायद्यानुसार ह्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हायला हवी, कारण ह्याने स्वतः देवाचा पुत्र असल्याचा दावा केला आहे.”</verse>
				<verse number="8">हे बोलणे ऐकून पिलात अधिकच घाबरला.</verse>
				<verse number="9">पुन्हा सरकारवाड्यात जाऊन त्याने येशूला विचारले, “तू कुठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही.</verse>
				<verse number="10">पिलातने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला क्रुसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय?”</verse>
				<verse number="11">येशूने उत्तर दिले, “तुम्हांला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला तुमच्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक मोठे आहे.”</verse>
				<verse number="12">पिलातने हे ऐकले, तेव्हा तो येशूला सोडवण्याची खटपट करत राहिला. परंतु लोकसमुदाय आरडाओरड करून म्हणाला, “आपण ह्याला सोडले, तर आपण कैसरचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसरला विरोध करतो!”</verse>
				<verse number="13">हे शब्द ऐकून पिलातने येशूला बाहेर आणले आणि फरसबंदी नावाच्या जागी तो न्यायासनावर बसला. हिब्रू भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात.</verse>
				<verse number="14">तो ओलांडण सणाच्या तयारीचा दिवस होता व दुपारची वेळ झाली होती. पिलात लोकांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”</verse>
				<verse number="15">ते ओरडले, “त्याला ठार करा, ठार करा, त्याला क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला क्रुसावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरवाचून आमचा कोणी राजा नाही!”</verse>
				<verse number="16">त्यानंतर पिलातने येशूला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.</verse>
				<verse number="17">त्यांनी येशूला ताब्यात घेतले. तो त्याचा क्रूस स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला हिब्रू भाषेत गोलगोथा म्हणतात.</verse>
				<verse number="18">तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे क्रुसावर खिळले.</verse>
				<verse number="19">‘नासरेथकर येशू, यहुदी लोकांचा राजा’, असे एका पाटीवर लिहून ती पिलातने क्रुसावर लावली.</verse>
				<verse number="20">येशूला क्रुसावर खिळले ते स्थळ शहराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुदी लोकांनी ती पाटी वाचली. ती हिब्रू, लॅटिन व ग्रीक ह्या भाषांत लिहिली होती.</verse>
				<verse number="21">मुख्य याजक पिलातला म्हणाले, “‘यहुदी लोकांचा राजा’ असे लिहू नका, तर ‘मी यहुदी लोकांचा राजा आहे, असे त्याने म्हटले’, असे लिहा.”</verse>
				<verse number="22">पिलातने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.”</verse>
				<verse number="23">शिपायांनी येशूला क्रुसावर टांगल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी झगाही घेतला. त्या झग्याला शिवण नव्हती. तो वरपासून खालपर्यंत अखंड विणलेला होता.</verse>
				<verse number="24">म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल ते चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे ह्यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर चिठ्या टाकल्या’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले.</verse>
				<verse number="25">येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या.</verse>
				<verse number="26">येशूने त्याच्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!”</verse>
				<verse number="27">नंतर त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्यानंतर त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.</verse>
				<verse number="28">ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूने म्हटले, ‘मला तहान लागली आहे’.</verse>
				<verse number="29">तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झुडपाच्या फांदीवर ठेवून त्याच्या तोंडाला लावला.</verse>
				<verse number="30">आंब घेतल्यानंतर येशूने म्हटले, “पूर्ण झाले आहे” आणि मस्तक लववून त्याने प्राण सोडला.</verse>
				<verse number="31">तो साबाथच्या तयारीचा दिवस होता, साबाथ दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत, कारण तो साबाथ महापवित्र दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे, अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली.</verse>
				<verse number="32">म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर क्रुसावर चढवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले,</verse>
				<verse number="33">परंतु येशूजवळ आल्यावर तो आधीच मरण पावला आहे, असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.</verse>
				<verse number="34">तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्‍त व पाणी बाहेर निघाले.</verse>
				<verse number="35">तुम्हीही विश्वास ठेवावा म्हणून ज्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो, हे त्याला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="36">‘त्याचे हाड मोडले जाणार नाही’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या.</verse>
				<verse number="37">शिवाय दुसऱ्याही धर्मशास्त्रलेखात असे म्हटले आहे, ‘ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील.’</verse>
				<verse number="38">त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने पिलातला अशी विनंती केली की, त्याला येशूचे शरीर नेऊ द्यावे. यहुदी लोकांच्या भयामुळे तो येशूचा गुप्त शिष्य होता. पिलातने परवानगी दिल्यानंतर तो येशूचे शरीर घेऊन गेला.</verse>
				<verse number="39">येशूकडे पूर्वी एका रात्री आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे तीस किलो मिश्रण घेऊन तेथे आला.</verse>
				<verse number="40">त्या दोघांनी येशूचे शरीर घेऊन त्याला यहुदी लोकांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्ये लावली व ते कापडात गुंडाळले.</verse>
				<verse number="41">येशूला क्रुसावर खिळले होते, त्या ठिकाणी एक बाग होती. तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवलेले नव्हते.</verse>
				<verse number="42">तो यहुदी लोकांच्या साबाथच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले कारण ती कबर जवळ होती.</verse>
			</chapter>
			<chapter number="20">
				<verse number="1">आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरीजवळ गेली आणि कबरीवरून शिळा बाजूला सारलेली आहे, असे तिने पाहिले.</verse>
				<verse number="2">शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत जाऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कुठे ठेवले, हे आम्हांला ठाऊक नाही.”</verse>
				<verse number="3">पेत्र व तो दुसरा शिष्य कबरीकडे जायला निघाले.</verse>
				<verse number="4">ते दोघे धावत होते, मात्र तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा अधिक वेगाने धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला</verse>
				<verse number="5">आणि ओणवा होताच त्याला तागाचे कापड पडलेले दिसले, परंतु तो आत गेला नाही.</verse>
				<verse number="6">मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला.</verse>
				<verse number="7">तागाचे कापड व जो रुमाल येशूच्या डोक्याला होता तो तागाच्या कापडाजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे, असे त्याला दिसले.</verse>
				<verse number="8">तेव्हा जो दुसरा शिष्य प्रथम कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="9">‘त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक आहे’, हा धर्मशास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता.</verse>
				<verse number="10">त्यानंतर ते शिष्य आपल्या घरी परत गेले.</verse>
				<verse number="11">इकडे मरिया कबरीजवळ रडत उभी राहिली होती. रडतारडता तिने वाकून कबरीत पाहिले.</verse>
				<verse number="12">जेथे येशूचे शरीर ठेवले होते, तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व दुसरा पायथ्याशी बसलेले तिला दिसले.</verse>
				<verse number="13">त्यांनी तिला विचारले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले ते मला ठाऊक नाही!”</verse>
				<verse number="14">असे बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे, हे तिने ओळखले नाही.</verse>
				<verse number="15">येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे, असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस, तर त्याला कुठे ठेवलेस, हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”</verse>
				<verse number="16">येशूने तिला म्हटले, “मरिये!” ती वळून त्याला म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे हिब्रू भाषेत गुरुवर्य)</verse>
				<verse number="17">येशूने तिला म्हटले, “मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जात आहे.”</verse>
				<verse number="18">मरिया मग्दालिया गेली व तिने प्रभूला पाहिल्याचे व त्याने तिला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले.</verse>
				<verse number="19">त्याच दिवशी, म्हणजे रविवारी संध्याकाळी, यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद करून एकत्र जमलेल्या त्याच्या शिष्यांमध्ये येशू आला व मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!”</verse>
				<verse number="20">असे बोलून त्याने त्याचे हात व त्याची कूस त्यांना दाखवली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.</verse>
				<verse number="21">येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो. जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मीही तुम्हांला पाठवतो.”</verse>
				<verse number="22">असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.</verse>
				<verse number="23">ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्यांची क्षमा केली जाईल आणि ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करणार नाही त्यांची क्षमा केली जाणार नाही.”</verse>
				<verse number="24">येशू आला तेव्हा बारा जणांतील एक ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता.</verse>
				<verse number="25">म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांतील व्रण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी माझे बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत माझा हात घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”</verse>
				<verse number="26">मग एका आठवड्यानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा खोलीत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!”</verse>
				<verse number="27">नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा. तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन राहू नकोस तर विश्वास ठेवणारा हो.”</verse>
				<verse number="28">थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”</verse>
				<verse number="29">येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्यावाचून विश्वास ठेवतात ते धन्य!”</verse>
				<verse number="30">ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली.</verse>
				<verse number="31">परंतु हे जे लिहिले आहे ते अशाकरता की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्‍वासाद्वारे त्याच्या नावात तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="21">
				<verse number="1">ह्या घटनांनंतर येशूने पुन्हा एकदा तिबिर्या सरोवराजवळ शिष्यांसमोर स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले:</verse>
				<verse number="2">शिमोन पेत्र, ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा, गालीलमधील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व येशूचे दुसरे दोघे शिष्य हे एकत्र जमले होते.</verse>
				<verse number="3">शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना एकही मासा मिळाला नाही.</verse>
				<verse number="4">पहाट होत असता येशू सरोवराच्या काठावर उभा होता. तरी पण तो येशू आहे, हे शिष्यांनी ओळखले नव्हते.</verse>
				<verse number="5">येशूने त्यांना विचारले, “मुलांनो, तुमच्याकडे मासे नाहीत काय?” त्यांनी “नाही” असे त्याला उत्तर दिले.</verse>
				<verse number="6">त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडतील”, त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना.</verse>
				<verse number="7">ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, “हा तर प्रभू आहे.” ‘प्रभू आहे’, हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेशी गुंडाळला, कारण तो उघडा होता आणि त्याने पाण्यात उडी टाकली.</verse>
				<verse number="8">दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे शंभर मीटर अंतरावर होते.</verse>
				<verse number="9">किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी तसेच काही भाकरी पाहिल्या.</verse>
				<verse number="10">येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आताच धरलेले काही मासे आणा.”</verse>
				<verse number="11">शिमोन पेत्राने मचव्यावर चढून जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते. असे असतानाही जाळे फाटले नाही.</verse>
				<verse number="12">येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” तो प्रभू आहे, असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात, हे त्याला विचारायला शिष्यांतील कोणी धजला नाही.</verse>
				<verse number="13">येशूने येऊन भाकरी घेतल्या व त्यांना दिल्या, तसेच मासेही दिले.</verse>
				<verse number="14">येशू मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना त्याने दर्शन दिल्याची ही तिसरी वेळ होती.</verse>
				<verse number="15">त्यांनी न्याहरी केल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानच्या मुला शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.”</verse>
				<verse number="16">पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.”</verse>
				<verse number="17">तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” ‘तू माझ्यावर प्रेम करतोस काय?’, असा प्रश्न प्रभूने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभो, आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.”</verse>
				<verse number="18">मी तुला खातरीपूर्वक सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमरपट्टा बांधून तुझी इच्छा असेल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील, तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझा कमरपट्टा बांधून तुझी इच्छा नसेल, तेथे तुला नेईल.”</verse>
				<verse number="19">तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील, हे सुचवण्याकरता तो हे बोलला, आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”</verse>
				<verse number="20">पेत्र मागे वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला त्याने मागे येताना पाहिले. भोजनाच्या वेळेस जो त्याच्या उराशी टेकला असता म्हणाला होता, ‘प्रभो, तुला धरून देणारा तो कोण आहे?’</verse>
				<verse number="21">त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभो, ह्याचे काय?”</verse>
				<verse number="22">येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली, तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.”</verse>
				<verse number="23">ह्यावरून तो शिष्य मरणार नाही, असा समज बंधुवर्गामध्ये पसरला. तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, पण ‘मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय’, असे म्हटले होते.</verse>
				<verse number="24">जो ह्या घटनांविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. हे आम्हांला माहीत आहे.</verse>
				<verse number="25">येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व लिहून ठेवली तर त्यांची पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="44">
			<chapter number="1">
				<verse number="1">प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला.</verse>
				<verse number="2"></verse>
				<verse number="3">मरण सोसल्यानंतरही त्याने चाळीस दिवस त्यांना दर्शन देऊन अनेक ठोस पुराव्यांनिशी आपण जिवंत आहोत, हे दाखवले. त्यांनी त्याला पाहिले व त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितले.</verse>
				<verse number="4">ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आदेश दिला, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने दिलेल्या ज्या वचनाविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, त्याची वाट पाहा.</verse>
				<verse number="5">योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.”</verse>
				<verse number="6">प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?”</verse>
				<verse number="7">तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही.</verse>
				<verse number="8">परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.”</verse>
				<verse number="9">असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले.</verse>
				<verse number="10">तो जात असता, ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष अचानक त्यांच्याजवळ उभे राहिलेले पाहिले</verse>
				<verse number="11">आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.”</verse>
				<verse number="12">यरुशलेमपासून सुमारे एक किलोमिटर दूर असलेल्या ऑलिव्ह डोंगरावरून प्रेषित यरुशलेममध्ये परत आले</verse>
				<verse number="13">आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले.</verse>
				<verse number="14">हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र जमत असत.</verse>
				<verse number="15">काही दिवसांनंतर पेत्र सुमारे एकशे वीस श्रद्धावंतांच्या समुदायात उभा राहून म्हणाला,</verse>
				<verse number="16">“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले, ते पूर्ण होणे आवश्यक होते.</verse>
				<verse number="17">जो आपल्यामध्ये गणला जात होता आणि ज्याला आपल्या सेवाकार्यात सहभागी करण्यात आले होते.</verse>
				<verse number="18">त्याने त्याच्या दुष्टाईच्या मोबदल्यातून जे शेत विकत घेतले, त्यात तो पालथा पडल्याने त्याचे पोट मधोमध फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.</verse>
				<verse number="19">यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्वांना हे कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे.</verse>
				<verse number="20">स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे: त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो आणि त्याचे अधिकारपद दुसरा घेवो.</verse>
				<verse number="21">योहानच्या बाप्तिस्म्यानंतर ज्या दिवशी येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, तोपर्यंत</verse>
				<verse number="22">म्हणजे येशू आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या कालावधीत जी माणसे आपल्याबरोबर होती त्यांच्यांतून एकाने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून आमच्याबरोबर सहभागी व्हावे.”</verse>
				<verse number="23">तेव्हा बर्सबा म्हटलेला योसेफ ऊर्फ युस्त व मत्थिया ह्या दोघांची नावे सुचविण्यात आली.</verse>
				<verse number="24">मग त्यांनी अशी प्रार्थना केली: “सर्वांची हृदये जाणणाऱ्या हे प्रभो,</verse>
				<verse number="25">हे सेवकपद व प्रेषितपद सोडून त्याच्या स्वतःच्या नेमलेल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडलास ते दाखव.”</verse>
				<verse number="26">मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याची अकरा प्रेषितांत भर घालण्यात आली.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना,</verse>
				<verse number="2">अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले.</verse>
				<verse number="3">नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या.</verse>
				<verse number="4">ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.</verse>
				<verse number="5">त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते.</verse>
				<verse number="6">तो ध्वनी ऐकल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन भांबावून गेला कारण प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले.</verse>
				<verse number="7">ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना?</verse>
				<verse number="8">तर आपण प्रत्येक जण आपापली भाषा ऐकतो हे कसे?</verse>
				<verse number="9">आपण पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कप्पुदुकिया, पंत, आसिया,</verse>
				<verse number="10">फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेजवळील लिबुवा अशा विविध प्रदेशांतले आहोत. आपणांपैकी काही लोक मूळचे यहुदी व इतर काही धर्मांतरित यहुदी असे रोमन आहेत.</verse>
				<verse number="11">तसेच इतर काही लोक क्रेती व अरब आहेत. असे असतानाही आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”</verse>
				<verse number="12">ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना विचारू लागले, “हे काय असेल?”</verse>
				<verse number="13">परंतु दुसरे कित्येक चेष्टा करत म्हणाले, “हे नव्या द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”</verse>
				<verse number="14">पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून लोकसमुदायास आवेशाने म्हणाला, “अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्यांनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. त्याचा अर्थ समजून घ्या.</verse>
				<verse number="15">तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे,</verse>
				<verse number="16">उलट, योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते, ते हे आहे:</verse>
				<verse number="17">देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील,</verse>
				<verse number="18">आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील.</verse>
				<verse number="19">मी वर आकाशात चमत्कार व खाली पृथ्वीवर अद्भूत कृत्ये करीन. म्हणजेच मी रक्त, अग्नी व धुरासारखे धुके ही चिन्हे दाखवीन,</verse>
				<verse number="20">परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल,</verse>
				<verse number="21">आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’</verse>
				<verse number="22">अहो इस्राएली लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासरेथकर येशूच्याद्वारे देवाची जी महत्कृत्ये, चमत्कार व चिन्हे तुम्हांला पाहायला मिळाली त्यांवरून तो असा मनुष्य होता, त्याचा दैवी अधिकार स्वतः देवाने तुम्हांला सिद्ध करून दाखविला.</verse>
				<verse number="23">तो देवाच्या निश्चित योजनेनुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला पापी लोकांद्वारे क्रुसावर चढवून मारले,</verse>
				<verse number="24">परंतु त्याला देवाने मरणातून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या सत्तेखाली राहणे अशक्य होते.</verse>
				<verse number="25">दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे,</verse>
				<verse number="26">माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन,</verse>
				<verse number="27">कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.</verse>
				<verse number="28">जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील.</verse>
				<verse number="29">बंधुजनहो, आपल्या कुलाधिपती दावीदविषयी मी तुमच्याबरोबर उघडपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत इथे आपल्यामध्ये आहे.</verse>
				<verse number="30">तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला, ‘तुझ्या संतानांतील एकाला मी तुझ्या राजासनावर बसवीन.’</verse>
				<verse number="31">ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.’</verse>
				<verse number="32">ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत.</verse>
				<verse number="33">देवाच्या उजव्या हाताकडे त्याला उच्चस्थान देण्यात आले आहे, पित्याने वचन दिल्याप्रमाणे त्याला पवित्र आत्मा मिळाला असून तुम्ही जे पाहता व ऐकता तो त्याच दानाचा त्याने आमच्यावर केलेला वर्षाव आहे.</verse>
				<verse number="34">कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,</verse>
				<verse number="35">‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’</verse>
				<verse number="36">म्हणून इस्त्राएलच्या सर्व घराण्यांनी हे ठामपणे समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर चढवून मारलेत, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे संबोधले आहे!”</verse>
				<verse number="37">हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, तर आम्ही काय करावे?”</verse>
				<verse number="38">पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.</verse>
				<verse number="39">कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.”</verse>
				<verse number="40">आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!”</verse>
				<verse number="41">त्या वेळी त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला व त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.</verse>
				<verse number="42">ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत.</verse>
				<verse number="43">प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते.</verse>
				<verse number="44">विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते.</verse>
				<verse number="45">ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत.</verse>
				<verse number="46">ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.</verse>
				<verse number="47">देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">एके दिवशी पेत्र व योहान हे दुपारी तीनच्या प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले.</verse>
				<verse number="2">तेथे जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस होता. मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागता यावी म्हणून त्याला दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.</verse>
				<verse number="3">पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.</verse>
				<verse number="4">त्यांनी त्याला निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.”</verse>
				<verse number="5">त्यांच्याकडून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे पाहिले.</verse>
				<verse number="6">परंतु पेत्र म्हणाला, “सोने चांदी माझ्याजवळ नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग.”</verse>
				<verse number="7">त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले तेव्हा त्याच्या पायात व घोट्यात तत्काळ बळ आले,</verse>
				<verse number="8">तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि उड्या मारत व देवाची स्तुती करत तो त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.</verse>
				<verse number="9">सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले.</verse>
				<verse number="10">मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच, हे त्यांनी ओळखले, तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडले त्यावरून सर्वांना फार आश्चर्य व विस्मय वाटला.</verse>
				<verse number="11">पेत्र व योहान ह्यांच्या सहवासात तो असताना लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.</verse>
				<verse number="12">हे पाहून पेत्राने लोकांना विचारले, “अहो इस्राएली लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? आमच्याकडे निरखून का पाहता? आम्ही आमच्या शक्तीने किंवा धार्मिकतेने ह्याला चालावयास लावले, असे तुम्ही समजता काय?</verse>
				<verse number="13">अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने त्याचा सेवक येशू ह्याचा गौरव केला आहे. मात्र तुम्ही त्याला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले. पिलातने त्याला सोडून देण्याचे ठरवले असतानाही त्याच्यासमक्ष तुम्ही येशूला नाकारले.</verse>
				<verse number="14">तो पवित्र व नीतिमान होता परंतु त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी मनुष्य आम्हांला द्या अशी मागणी केली.</verse>
				<verse number="15">तुम्ही जीवनाच्या अधिपतीला ठार मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले, ह्याचे आम्ही साक्षीदार आहोत.</verse>
				<verse number="16">त्याच्याच नावावरील विश्वासामुळे व त्याच्याच नावाच्या सामर्थ्याने ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला सुदृढ केले आहे. त्याच्यावरील श्रद्धेने ह्याला तुम्हां सर्वांसमक्ष हे स्वास्थ्य प्राप्त झाले आहे.</verse>
				<verse number="17">बंधूंनो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले, ते अज्ञानामुळे केले, हे मी जाणून आहे.</verse>
				<verse number="18">ख्रिस्ताने दुःख सहन करावे, असे जे सर्व संदेष्ट्यांद्वारे देवाने पूर्वी सांगितले होते, ते त्याने अशा प्रकारे पूर्ण केले.</verse>
				<verse number="19">तुमची पापे माफ व्हावीत म्हणून पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे प्रभूच्या सहवासात तुम्हांलाही नवचैतन्य लाभेल</verse>
				<verse number="20">व तो तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त म्हणजेच येशू ह्याला पाठवील.</verse>
				<verse number="21">सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्याद्वारे सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे आवश्यक आहे.</verse>
				<verse number="22">मोशेनेही म्हटले आहे, प्रभू तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून पाठवील, तो जे काही तुम्हांला सांगेल, त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका.</verse>
				<verse number="23">जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचे लोकांतून समूळ उच्चाटन केले जाईल.</verse>
				<verse number="24">तसेच शमुवेलपासून जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी भाकित केले आहे.</verse>
				<verse number="25">तुम्ही संदेष्ट्यांची संतती आहात आणि देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या करारातही तुम्ही सहभागी आहात. देवाने अब्राहामला सांगितल्याप्रमाणे ‘तुझ्या संततीमधून पृथ्वीवरील सर्व लोकांना आशीर्वाद प्राप्त होईल’.</verse>
				<verse number="26">म्हणूनच देवाने त्याच्या सेवकाला पुनरुत्थित करून प्रथम तुमच्याकडे पाठविले, कारण त्याने तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून परावृत्त होण्यासाठी आशीर्वाद द्यावा.”</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले.</verse>
				<verse number="2">हे लोक संतप्त झाले होते कारण पेत्र व योहान लोकांना शिकवण देऊन, येशूद्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे, असे उघडपणे सांगत होते.</verse>
				<verse number="3">म्हणून त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवले.</verse>
				<verse number="4">वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली.</verse>
				<verse number="5">दुसऱ्या दिवशी यहुदी अधिकारी, वडीलजन व शास्त्री यरुशलेम नगरात एकत्र जमले.</verse>
				<verse number="6">त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली.</verse>
				<verse number="7">ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?”</verse>
				<verse number="8">तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो,</verse>
				<verse number="9">एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल,</verse>
				<verse number="10">तर तुम्हां सर्वांना व सर्व इस्राएली लोकांना हे समजायला हवे की, ज्याला तुम्ही क्रुसावर चढवून मारले व ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य पूर्णपणे बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे.</verse>
				<verse number="11">तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे.</verse>
				<verse number="12">तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”</verse>
				<verse number="13">पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले.</verse>
				<verse number="14">मात्र बऱ्या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना.</verse>
				<verse number="15">मग त्यांनी प्रेषितांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगून ते आपसात विचार करून म्हणाले,</verse>
				<verse number="16">“ह्या माणसांचे आपण काय करावे? त्यांच्याकडून खरोखर असामान्य चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमवासियांना कळून चुकले आहे आणि ते आपणाला नाकारता येत नाही.</verse>
				<verse number="17">परंतु ही गोष्ट लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद देऊ की, ह्यापुढे लोकांपैकी कोणाबरोबरही तुम्ही येशूच्या नावाने बोलू नये.”</verse>
				<verse number="18">त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.”</verse>
				<verse number="19">परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले, “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा.</verse>
				<verse number="20">कारण जे आम्ही पाहिले व ऐकले त्याविषयी न बोलणे, हे आम्हांला शक्य नाही.”</verse>
				<verse number="21">त्यांनी त्यांना पुन्हा अधिक कडक ताकीद देऊन सोडून दिले, त्यांना शिक्षा कशी करावी, हे लोकांच्या भयामुळे त्यांना सुचेना. घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते.</verse>
				<verse number="22">बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसाच्या बाबतीत घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.</verse>
				<verse number="23">पेत्र व योहान ह्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले. मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्व त्यांनी त्यांना कथन केले.</verse>
				<verse number="24">ते ऐकून श्रद्धावंत एकत्रितपणे देवाकडे प्रार्थना करीत म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यांत जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस.</verse>
				<verse number="25">आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले: राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?</verse>
				<verse number="26">प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले.</verse>
				<verse number="27">कारण ज्याला तू अभिषिक्‍त केलेस तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरुद्ध ह्या शहरात यहुदीतर लोक व इस्राएली लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे खरोखर एकत्र झाले आहेत.</verse>
				<verse number="28">जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे.</verse>
				<verse number="29">तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा</verse>
				<verse number="30">आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.”</verse>
				<verse number="31">त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.</verse>
				<verse number="32">विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते.</verse>
				<verse number="33">प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; त्या सर्वांवर परमेश्वराची मोठी कृपा होती.</verse>
				<verse number="34">त्यांच्यातील कोणालाही काही उणे नव्हते कारण जमिनीचे किंवा घराचे जेजे मालक होते, ते आपली मालमत्ता विकत आणि तिचे मोल आणून</verse>
				<verse number="35">प्रेषितांच्या स्वाधीन करत. त्यानंतर ज्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे ते प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.</verse>
				<verse number="36">कुप्र बेटावर जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषित त्याला बर्णबा म्हणजे उत्तेजनपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती.</verse>
				<verse number="37">ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली.</verse>
				<verse number="2">परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला.</verse>
				<verse number="3">पेत्र त्याला म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून तू तुझे मन सैतानाच्या ताब्यात का दिलेस?</verse>
				<verse number="4">विकण्यापूर्वी ती जमीन तुझी स्वतःची होती व विकल्यावर सर्व रक्‍कम तुझीच नव्हती काय? तर मग असे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.”</verse>
				<verse number="5">हे शब्द ऐकताच तो खाली पडला व मरण पावला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले.</verse>
				<verse number="6">नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले.</verse>
				<verse number="7">सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी आत आली तेव्हा जे घडले ते तिला ठाऊ क नव्हते.</verse>
				<verse number="8">पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.”</verse>
				<verse number="9">पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यात तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या पतीला पुरले ते एवढ्यातच परत येत आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील.”</verse>
				<verse number="10">ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले.</verse>
				<verse number="11">ह्यावरून सबंध ख्रिस्तमंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले.</verse>
				<verse number="12">प्रेषितांच्या हस्ते लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत कृत्ये घडत असत. ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत.</verse>
				<verse number="13">त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत.</verse>
				<verse number="14">प्रभूवर विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया त्यांना मिळत गेले.</verse>
				<verse number="15">इतके की, लोक रुग्णांना रस्त्यावर आणून खाटांवर आणि चटयांवर ठेवीत, ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी.</verse>
				<verse number="16">तसेच यरुशलेमच्या आसपासच्या नगरांतून लोकसमुदाय रुग्णांना व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत.</verse>
				<verse number="17">उच्च याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी सहकारी मत्सराने पेटून उठले.</verse>
				<verse number="18">त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात टाकले.</verse>
				<verse number="19">परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,</verse>
				<verse number="20">“जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.”</verse>
				<verse number="21">हे ऐकून दिवस उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन प्रबोधन करू लागले. इकडे उच्च याजक व त्याचे सहकारी ह्यांनी येऊन न्यायसभेला व यहुदी लोकांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलावले आणि प्रेषितांना आणावयास शिपायांना तुरुंगाकडे पाठवले.</verse>
				<verse number="22">पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले,</verse>
				<verse number="23">“तुरुंग व्यवस्थित कुलुपबंद असलेला आणि दरवाजापाशी पहारेकरी उभे असलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही.”</verse>
				<verse number="24">हे वृत्त ऐकून ह्याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी मंदिर रक्षकांचा अधिकारी व मुख्य याजक त्रस्त झाले.</verse>
				<verse number="25">इतक्यात कोणी तरी येऊन त्यांना असे सांगितले, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते, ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिकवण देत आहेत!”</verse>
				<verse number="26">तेव्हा अधिकाऱ्याने शिपायांसह जाऊन त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती न करता त्यांना आणले, कारण लोक आपल्याला दगड मारतील, अशी त्यांना भीती वाटत होती.</verse>
				<verse number="27">त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. उच्च याजकाने प्रेषितांना विचारले,</verse>
				<verse number="28">“ह्या नावाने शिकवण देऊ नका, असे आम्ही तुम्हांला बजावले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात!”</verse>
				<verse number="29">परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.</verse>
				<verse number="30">ज्या येशूला तुम्ही क्रुसावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले.</verse>
				<verse number="31">त्याने इस्राएलला पश्चात्ताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले.</verse>
				<verse number="32">ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षीदार आहोत आणि देवाने त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे, तोही साक्षीदार आहे.”</verse>
				<verse number="33">हे ऐकून न्यायसभेचे सदस्य संतापले आणि प्रेषितांना ठार मारण्याचा विचार करू लागले.</verse>
				<verse number="34">तेथे सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परुशी धर्मशास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले.</verse>
				<verse number="35">मग तो न्यायसभेला म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार, ह्याविषयी नीट विचार करा.</verse>
				<verse number="36">कारण काही दिवसांपूर्वी थुदासने पुढे येऊन ‘मी कोणीतरी आहे’ असा दावा केला. त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते दिसेनासे झाले.</verse>
				<verse number="37">त्याच्यामागून गालीलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसांत पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून त्याच्या बाजूला वळवले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते, त्या सर्वांची पांगापांग झाली.</verse>
				<verse number="38">म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या! ही योजना किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास ते लयास जाईल,</verse>
				<verse number="39">परंतु ते देवाचे असल्यास, तुम्हांला ते नाहीसे करता येणार नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधक ठराल!” न्यायसभेने गमलियेलचे सांगणे मान्य केले.</verse>
				<verse number="40">त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना चाबकाने फटके मारले आणि यापुढे येशूच्या नावाने बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.</verse>
				<verse number="41">ते तर येशूच्या नावासाठी आपल्याला अपमानास पात्र ठरविण्यात आले म्हणून न्यायसभेपुढून आनंदाने निघून गेले.</verse>
				<verse number="42">दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे, हे शुभवर्तमान घोषित करण्याचे त्यांनी चालू ठेवले.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">काही दिवसांनंतर श्रद्धावंतांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहुदी लोकांची स्थानिक हिब्रू लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या दानधर्म वाटणीत त्यांच्या मते त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.</verse>
				<verse number="2">तेव्हा बारा प्रेषितांनी श्रद्धावंतांना बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याकडे दुर्लक्ष करून पंक्‍तिसेवेकडे लक्ष पुरवावे, हे ठीक नाही.</verse>
				<verse number="3">तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात आदरणीय पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू.</verse>
				<verse number="4">म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”</verse>
				<verse number="5">हा विचार सर्व लोकांना पसंत पडला आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असलेल्या स्तेफनबरोबर फिलिप, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व अंत्युखिया येथील यहुदीमतानुसारी नीकलाव ह्यांची निवड केली.</verse>
				<verse number="6">त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर सादर केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.</verse>
				<verse number="7">अशा प्रकारे देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाटयाने वाढत गेली आणि याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्या श्रद्धेचा स्वीकार केला.</verse>
				<verse number="8">परमेश्वराची कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण झालेला स्तेफन लोकांत मोठे चमत्कार व चिन्हे करीत असे.</verse>
				<verse number="9">मात्र लिबिर्तिन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघातील लोकांच्या प्रार्थनामंदिरातील काही जण तसेच कुरेनेकर आणि आलेक्सांद्रिया येथील काही यहुदी लोक ह्यांनी त्याला विरोध केला. हे लोक व किलिकिया व आसिया या प्रदेशातील यहुदी लोक स्तेफनबरोबर वितंडवाद घालू लागले.</verse>
				<verse number="10">पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता, त्याला ते तोंड देऊ शकत नव्हते.</verse>
				<verse number="11">म्हणून त्यांनी काही लोकांना लाच देऊन ‘आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले’, असे म्हणण्यास सांगितले.</verse>
				<verse number="12">अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकांना आणि वडीलजनांना व शास्त्रीजनांना चिथविले. त्यांनी स्तेफनवर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले.</verse>
				<verse number="13">नंतर त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, “हा माणूस नेहमी ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलत असतो.</verse>
				<verse number="14">आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, नासरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला दिलेले परिपाठ बदलून टाकील.”</verse>
				<verse number="15">तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण स्तेफनकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख एखाद्या देवदूताच्या मुखासारखे दिसले.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">उच्च याजकांनी स्तेफनला विचारले, “ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय?”</verse>
				<verse number="2">त्याने उत्तर दिले, “बंधुजनहो व वडीलजनांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हा हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले,</verse>
				<verse number="3">‘आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात तू जा’.</verse>
				<verse number="4">म्हणून तो खासद्यांच्या देशातून निघून हारान येथे जाऊन राहिला. त्याचा पिता निधन पावल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.</verse>
				<verse number="5">त्यात देवाने त्याला वतन दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही. त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन मात्र देवाने त्याला दिले.</verse>
				<verse number="6">देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि तेथील लोक त्यांना दास करून चारशे वर्षे छळतील.</verse>
				<verse number="7">ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्या राष्ट्राचा मी न्याय करीन’, असे देवाने सांगितले आणि ‘त्यानंतर ते तेथून बाहेर पडतील व ह्या ठिकाणी माझी उपासना करतील.’</verse>
				<verse number="8">नंतर देवाने त्याला सुंतेचा विधी कराराचे चिन्ह म्हणून नेमून दिला, हा करार झाल्यानंतर अब्राहामला इसहाक झाला. त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली. मग इसहाकने याकोब ह्या त्याच्या मुलाची सुंता केली व याकोबने त्याच्या बारा पुत्रांची - जे कुलपती झाले - त्यांची सुंता केली.</verse>
				<verse number="9">याकोबच्या मुलांनी त्यांचा भाऊ योसेफ ह्याला मिसर देशात विकून टाकले पण त्याच्याबरोबर देव होता.</verse>
				<verse number="10">त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने सभ्यता व सुज्ञता यांनी संपन्न केले. त्यामुळे त्याने त्याला मिसर देशावर व राजघराण्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले.</verse>
				<verse number="11">मग मिसर व कनान या देशांत सर्वत्र दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले.</verse>
				<verse number="12">तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबने त्याच्या मुलांना म्हणजेच तुमच्या आमच्या पूर्वजांना पहिल्या सफरीवर पाठविले.</verse>
				<verse number="13">मग दुसऱ्या सफरीच्या वेळी योसेफने आपल्या भावांना ओळख दिली. त्यामुळे योसेफचे कूळ फारो राजाला कळले.</verse>
				<verse number="14">योसेफने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग - सर्व मिळून पंचाहत्तर माणसे - ह्यांना बोलावून घेतले.</verse>
				<verse number="15">ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो मरण पावला व आपले पूर्वजही तेथे मरण पावले.</verse>
				<verse number="16">त्यांना शखेम या स्थळी नेण्यात आले आणि जी कबर अब्राहामने तिथे हमोराच्या पुत्राकडून रोख रक्कम देऊन विकत घेतली होती, तीत त्यांना पुरले.</verse>
				<verse number="17">देवाने अब्राहामला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतशी त्या लोकांची मिसर देशातील संख्या वाढली.</verse>
				<verse number="18">योसेफची माहिती नसलेला दुसरा राजा मिसर मध्ये राज्य करु लागेपर्यंत असे चालले.</verse>
				<verse number="19">तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याने त्यांचे लहान मुलगे जगू नयेत म्हणून त्यांना टाकून देण्यास त्यांना भाग पाडले. अशा प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.</verse>
				<verse number="20">ह्याच राजाच्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तीन महिनेपर्यंत त्याचे पालनपोषण त्याच्या वडिलांच्या घरी झाले.</verse>
				<verse number="21">मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला मुलगा म्हणून त्याचे संगोपन केले.</verse>
				<verse number="22">मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला.</verse>
				<verse number="23">तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले.</verse>
				<verse number="24">मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला.</verse>
				<verse number="25">देव त्याच्या हाताने त्याच्या बांधवांची सुटका करणार आहे, हे त्यांना समजेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही.</verse>
				<verse number="26">दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’</verse>
				<verse number="27">तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?</verse>
				<verse number="28">काल तू मिसरी माणसाला ठार मारले, तसे मलाही मारावयाला पाहतोस काय?’</verse>
				<verse number="29">हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले.</verse>
				<verse number="30">त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.</verse>
				<verse number="31">हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे, हे पाहण्याकरता तो जवळ गेला. त्यावेळी प्रभूची वाणी झाली,</verse>
				<verse number="32">‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा, इसहाकचा व याकोबचा देव आहे.’ मोशे घाबरला व त्याला तिकडे पाहायचे धैर्य झाले नाही.</verse>
				<verse number="33">प्रभूने त्याला म्हटले, ‘तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.</verse>
				<verse number="34">मिसर देशातल्या माझ्या लोकांचे हाल मी खरोखर पाहिले आहते, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’</verse>
				<verse number="35">‘तुला सत्ताधिकारी व न्यायाधीश कोणी केले’, असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच, झुडपांत दर्शन झालेल्या देवदूताच्या साहाय्याने, देवाने सत्ताधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले.</verse>
				<verse number="36">त्याने मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले.</verse>
				<verse number="37">तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’</verse>
				<verse number="38">रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला.</verse>
				<verse number="39">परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून</verse>
				<verse number="40">ते अहरोनला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, ते आम्हांला माहीत नाही.’</verse>
				<verse number="41">त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातून घडलेल्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.</verse>
				<verse number="42">म्हणून देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील ताऱ्यांची पूजा करावयास सोडून दिले, ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे: हे इस्राएलच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात पशू कापून मला यज्ञात अर्पण केले काय?</verse>
				<verse number="43">मोलख दैवताचा मंडप व तुमचे मुख्य दैवत रेफान ह्याचा तारा ह्यांच्या प्रतिमा तुम्ही पुजण्याकरिता तयार केल्या म्हणून मी तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन.</verse>
				<verse number="44">परमेश्वर बोलला तेव्हा त्याने मोशेला आदेश दिला होता की, त्याने पाहिलेल्या नमुन्याप्रमाणे परमेश्वराच्या वसतीचा मंडप तयार करण्यात यावा. हा परमेश्वराच्या वसतीचा मंडप आपल्या पूर्वजांकडे होता.</verse>
				<verse number="45">नंतर जी राष्ट्रे देवाने आपल्या पूर्वजांच्या समोरून घालविली त्यांचा प्रदेश आपल्या पूर्वजांनी त्यांच्या ताब्यात घेतला, तेव्हा त्यांनी तो मंडप यहोशवाबरोबर त्या प्रदेशात आणला आणि दावीदच्या काळापर्यंत परंपरेने तसाच त्यांच्याकडे ठेवला.</verse>
				<verse number="46">दावीदवर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबच्या घराण्याच्या परमेश्वरासाठी वसतिस्थान तयार करता यावे म्हणून परमेश्वराकडे याचना केली.</verse>
				<verse number="47">परंतु शलमोनने परमेश्वरासाठी घर बांधले.</verse>
				<verse number="48">तथापि परमेश्वर हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे त्यानुसार:</verse>
				<verse number="49">परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या निवासाचे स्थान कोणते?</verse>
				<verse number="50">मीच माझ्या हातांनी ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’”</verse>
				<verse number="51">स्तेफन पुढे म्हणाला, “अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला नेहमी विरोध करता. जसे तुमचे पूर्वज, तसेच तुम्हीही.</verse>
				<verse number="52">ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान सेवकाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारले आणि आता तुम्ही प्रत्यक्ष त्याला धरून देणारे व ठार मारणारे निघाला आहात.</verse>
				<verse number="53">तुम्हांला देवदूतांच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.”</verse>
				<verse number="54">त्याचे हे भाषण न्यायसभेच्या सदस्यांच्या अंतःकरणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.</verse>
				<verse number="55">परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तेफनने आकाशाकडे पाहिले, तेव्हा देवाचे वैभव व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.</verse>
				<verse number="56">स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!”</verse>
				<verse number="57">ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.</verse>
				<verse number="58">ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते.</verse>
				<verse number="59">ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”</verse>
				<verse number="60">त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">शौलाला तर स्तेफनचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेम येथल्या मंडळींचा फार छळ झाला. प्रेषितांखेरीज इतर सर्वांची यहुदिया व शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली.</verse>
				<verse number="2">काही भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले, त्यांनी त्याच्यासाठी फार शोक केला.</verse>
				<verse number="3">इकडे शौल श्रद्धावंतांना हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे.</verse>
				<verse number="4">ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले.</verse>
				<verse number="5">फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली.</verse>
				<verse number="6">फिलिपचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लोकसमुदायाने बारकाईने लक्ष दिले.</verse>
				<verse number="7">ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळांतून अशुद्ध आत्मे किंचाळत निघून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली.</verse>
				<verse number="8">त्या नगरात आनंदीआनंद झाला.</verse>
				<verse number="9">त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा शिमोन नावाचा एक माणूस होता. आपण कोणी तरी मोठे आहोत, असे तो दाखवत असे.</verse>
				<verse number="10">लहानापासून थोरांपर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, ‘हा माणूस म्हणजे जिला देवाची महाशक्ती म्हणतात, तिचाच अवतार आहे.’</verse>
				<verse number="11">त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने विस्मित केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्यावर खिळले होते.</verse>
				<verse number="12">तरी पण देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयी फिलिप शुभवर्तमान घोषित करीत असता लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि अनेक स्त्रीपुरुषांचा बाप्तिस्मा झाला.</verse>
				<verse number="13">स्वतः शिमोननेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपच्या सहवासात राहिला. घडत असलेली चिन्हे व मोठे चमत्कार पाहून तो स्वतः आश्चर्यचकित झाला.</verse>
				<verse number="14">शोमरोन येथील लोकांनी देवाचे वचन स्वीकारले आहे, असे यरुशलेममधल्या प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले.</verse>
				<verse number="15">ते तेथे आल्यावर त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रेषितांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली.</verse>
				<verse number="16">कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता.</verse>
				<verse number="17">नंतर पेत्र व योहान ह्यांनी त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.</verse>
				<verse number="18">प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले,</verse>
				<verse number="19">“ज्या कोणावर मी माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.”</verse>
				<verse number="20">परंतु पेत्र त्याला म्हणाला, “पैसे देऊन देवाचे दान मिळवता येते, असा विचार केल्याबद्दल तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो.</verse>
				<verse number="21">आमच्या सेवाकार्यात तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही.</verse>
				<verse number="22">तुझ्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करून प्रभूला विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या विचारांची तुला क्षमा मिळेल.</verse>
				<verse number="23">तुझ्यात कटू मत्सरभावना आहे आणि तू पापाच्या बंधनात आहेस, असे मला दिसते.”</verse>
				<verse number="24">तेव्हा शिमोनने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये, अशी विनंती तुम्ही माझ्यासाठी प्रभूजवळ करा.”</verse>
				<verse number="25">तेथे त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन जाहीर केल्यावर ते यरुशलेम नगरास परत आले, येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांत शुभवर्तमान घोषित केले.</verse>
				<verse number="26">इकडे प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमपासून रानातून गाजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.”</verse>
				<verse number="27">तो उठला व निघाला आणि पाहा, हबशी राणीचा दरबारातील महत्त्वपूर्ण अधिकारी व खजिनदार असलेला एक हबशी षंढ यरुशलेमहून परत जात होता. तो उपासना करावयास गेला होता.</verse>
				<verse number="28">तो परत जाताना त्याच्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता.</verse>
				<verse number="29">तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.”</verse>
				<verse number="30">फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?”</verse>
				<verse number="31">त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले.</verse>
				<verse number="32">तो जो धर्मशास्त्रलेख वाचत होता तो असा: त्याला मेंढरासारखे वध करण्यासाठी नेले आणि जसे कोकरू लोकर कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.</verse>
				<verse number="33">त्याच्या दीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही, त्याच्या संततीविषयी कोणी काहीच सांगू शकणार नाही कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपवण्यात आले.</verse>
				<verse number="34">अधिकाऱ्याने फिलिपला म्हटले, ‘मी तुम्हांला विनंतिपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी?’</verse>
				<verse number="35">फिलिपने बोलावयास आरंभ केला व ह्या धर्मशास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीचे शुभवर्तमान त्याला सांगितले.</verse>
				<verse number="36">वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा तो अधिकारी म्हणाला, “पाहा, इथे तर पाणी आहे. मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”</verse>
				<verse number="37">फिलिपने म्हटले, “जर आपण आपल्या पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरत असाल, तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, असा मी विश्वास धरतो.”</verse>
				<verse number="38">त्याने रथ उभा करावयास सांगितले. फिलिप व अधिकारी दोघे पाण्यात उतरले. फिलिपने त्याला बाप्तिस्मा दिला.</verse>
				<verse number="39">ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपला घेऊन गेला, म्हणून तो त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीस पुन्हा पडला नाही, मग तो आपल्या वाटेने आनंदाने निघाला.</verse>
				<verse number="40">इकडे फिलिपच्या लक्षात आले की, आपण अजोत नगरात आहोत. पुढे कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने शुभवर्तमान घोषित केले.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते.</verse>
				<verse number="2">त्याने उच्च याजकाकडे जाऊन त्याच्याकडून दिमिष्कमधल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, प्रभुमार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेम येथे आणावे.</verse>
				<verse number="3">तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला.</verse>
				<verse number="4">तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?”</verse>
				<verse number="5">तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे,</verse>
				<verse number="6">ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.”</verse>
				<verse number="7">त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांना कोणी दिसले नाही.</verse>
				<verse number="8">शौल जमिनीवरून उठला, तेव्हा त्याने डोळे उघडले, परंतु त्याला काही दिसेना. त्यांनी त्याला हात धरून दिमिष्क नगरात नेले.</verse>
				<verse number="9">तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा होता व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.</verse>
				<verse number="10">इकडे दिमिष्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता, त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभो?”</verse>
				<verse number="11">प्रभू त्याला म्हणाला, “उठून सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्स येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध घे. पाहा, तो प्रार्थना करत आहे,</verse>
				<verse number="12">आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.”</verse>
				<verse number="13">हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे</verse>
				<verse number="14">आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.”</verse>
				<verse number="15">परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.</verse>
				<verse number="16">माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.”</verse>
				<verse number="17">हे ऐकून हनन्या निघाला आणि त्या विशिष्ट घरी गेला. शौलाच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, “भाऊ शौल, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने मला पाठवले आहे.”</verse>
				<verse number="18">त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला.</verse>
				<verse number="19">मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्क नगरात शिष्यांबरोबर काही दिवस राहिला.</verse>
				<verse number="20">त्याने प्रार्थनामंदिरात येशूविषयी घोषणा करावयास त्वरित सुरुवात केली की, तो देवाचा पुत्र आहे.</verse>
				<verse number="21">ऐकणारे सर्व विस्मित होऊन म्हणू लागले, “ह्या नावाची उपासना करणाऱ्यांची ज्याने यरुशलेममध्ये त्रेधा उडवली, तोच हा नव्हे काय आणि येशूची उपासना करणाऱ्यांना बांधून महायाजकांकडे न्यावे म्हणून हा येथे आला होता ना?”</verse>
				<verse number="22">पण शौलाला तर अधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि हाच ख्रिस्त आहे, असे सिद्ध करून तो दिमिष्क नगरात राहणाऱ्या यहुदी लोकांना निरुत्तर करू लागला.</verse>
				<verse number="23">असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला.</verse>
				<verse number="24">पण त्यांचा तो कट शौलाला समजला. यहुदी लोकांनी तर त्याला मारण्याकरिता वेशीवर रात्रंदिवस पाळत ठेवली होती.</verse>
				<verse number="25">परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व गावकूस फोडून त्याला पाटीतून खाली उतरवले.</verse>
				<verse number="26">शौल यरुशलेममध्ये आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा येशूचा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते.</verse>
				<verse number="27">तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कमध्ये त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्यांना सांगितले.</verse>
				<verse number="28">त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला.</verse>
				<verse number="29">तो ग्रीक भाषिक यहुदी लोकांबरोबरही चर्चा व वादविवाद करीत असे, म्हणून ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले.</verse>
				<verse number="30">बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरिया येथे नेले व पुढे तार्स येथे पाठवले.</verse>
				<verse number="31">अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या ठिकाणच्या ख्रिस्तमंडळ्यांना स्वस्थता मिळाली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती बळकट होत गेली आणि प्रभूविषयीच्या आदरभावनेत जगत असताना त्यांची वाढ होत गेली.</verse>
				<verse number="32">पेत्र सर्वत्र फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही तो गेला.</verse>
				<verse number="33">तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता.</verse>
				<verse number="34">त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तो तत्काळ उठला.</verse>
				<verse number="35">त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.</verse>
				<verse number="36">आणखी यापोमध्ये टबीथा (ग्रीक भाषेत दुर्कस म्हणजेच हरिणी) नावाची कोणी एक स्त्री होती. ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.</verse>
				<verse number="37">त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले.</verse>
				<verse number="38">लोद हे गाव यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे, असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे यायला उशीर करू नकोस.”</verse>
				<verse number="39">पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले, त्याच्यासभोवती सर्व विधवा जमा झाल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता, ती जे अंगरखे व जी वस्त्रे तयार करत असे ती त्यांनी रडत रडत त्याला दाखवली.</verse>
				<verse number="40">पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली मग शवाकडे वळून म्हटले, “टबीथा, ऊठ.” तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली.</verse>
				<verse number="41">त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले.</verse>
				<verse number="42">यापोमधील सर्वांना हा चमत्कार कळला आणि पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="43">त्यानंतर यापो येथील शिमोन नावाच्या एका चर्मकाराच्या घरी पेत्र बरेच दिवस राहिला.</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा एक पुरुष इटालियन नावाच्या पलटणीत अधिकारी होता.</verse>
				<verse number="2">तो धार्मिक होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, पुष्कळ दानधर्म करणारा व देवाचा नित्य धावा करणारा होता.</verse>
				<verse number="3">त्याने एकदा दुपारी तीनच्या सुमारास दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपल्याकडे देवाचा दूत येत असून, “कर्नेल्य”, अशी आपल्याला हाक मारत आहे.</verse>
				<verse number="4">तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?”, त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व दानधर्म हे देवापुढे आठवणीसाठी पोहचले आहेत व तो तुला उत्तर देणार आहे.</verse>
				<verse number="5">आता तू यापो येथे माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात.</verse>
				<verse number="6">तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.”</verse>
				<verse number="7">जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता, तो निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या घरच्या दोघा चाकरांना व त्याच्या व्यक्तिगत सेवेसाठी नेमलेल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले</verse>
				<verse number="8">आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती देऊन यापो या गावी पाठवले.</verse>
				<verse number="9">दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला,</verse>
				<verse number="10">त्याला भूक लागून काही खावेसे वाटले पण जेवणाची तयारी होत आहे, इतक्यात त्याला गाढ तंद्री लागली.</verse>
				<verse number="11">आकाश उघडले आहे व मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे, असा त्याने दृष्टान्त पाहिला.</verse>
				<verse number="12">त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पक्षी होते.</verse>
				<verse number="13">त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.”</verse>
				<verse number="14">परंतु पेत्र म्हणाला, “नको, प्रभो, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्‍ले नाही.”</verse>
				<verse number="15">दुसऱ्यांदा त्याला वाणी ऐकू आली, “देवाने जे शुद्ध केले आहे. ते तू निषिद्ध मानू नकोस.”</verse>
				<verse number="16">असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.</verse>
				<verse number="17">आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा, ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्यने पाठवलेली माणसे शिमोनचे घर शोधत त्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी राहिली,</verse>
				<verse number="18">त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?”</verse>
				<verse number="19">पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता पवित्र आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध घेत आहेत.</verse>
				<verse number="20">ऊठ, खाली जा आणि मनात काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे.”</verse>
				<verse number="21">पेत्र खाली येऊन त्या माणसांना म्हणाला, “पाहा, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो मी आहे. तुम्ही येथे कशाकरिता आला आहात?”</verse>
				<verse number="22">ते म्हणाले, “रोमन अधिकारी कर्नेल्य हा सद्‍गृहस्थ असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याला आदरणीय मानतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की, आपल्याला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”</verse>
				<verse number="23">पेत्राने त्यांना आत बोलावून त्यांना रात्रभर तेथे ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापो येथील बंधुजनांपैकी काही जण त्याच्याबरोबर गेले.</verse>
				<verse number="24">दुसऱ्या दिवशी तो कैसरिया येथे पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्याची वाट पाहत होता.</verse>
				<verse number="25">पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले.</verse>
				<verse number="26">पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभा राहा, मीही मनुष्यच आहे.”</verse>
				<verse number="27">मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले.</verse>
				<verse number="28">त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य लोकांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे येAजा करणे हे त्याच्या रीतिरिवाजांविरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये, असे देवाने मला सांगितले आहे.</verse>
				<verse number="29">म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी आढेवेढे न घेता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?”</verse>
				<verse number="30">कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या घरी प्रार्थना करत होतो. ही प्रार्थना करीत असताना तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यासमोर उभा राहून मला म्हणाला,</verse>
				<verse number="31">‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे.</verse>
				<verse number="32">तर यापो येथे कोणाला पाठवून पेत्र या नावाने राहणाऱ्या शिमोनाला बोलावून आण, तो समुद्रकिनारी शिमोन चर्मकाराच्या घरी पाहुणा आहे.’</verse>
				<verse number="33">म्हणून मी माणसांना आपल्याकडे तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपल्याला निर्देश देऊन सांगितले आहे, ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.”</verse>
				<verse number="34">पेत्राने बोलण्यास आरंभ केला:</verse>
				<verse number="35">‘देव पक्षपाती नाही, हे आता माझ्या पक्के ध्यानात आले आहे. प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.</verse>
				<verse number="36">येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="37">योहानने बाप्तिस्मा घोषित केल्यानंतर गालीलपासून प्रारंभ होऊन तो संदेश सर्व यहुदियामध्ये पसरला.</verse>
				<verse number="38">नासरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला कारण देव त्याच्याबरोबर होता.</verse>
				<verse number="39">त्याने यहुदी लोकांच्या देशात व यरुशलेम नगरात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी त्याला क्रुसावर चढवून मारले.</verse>
				<verse number="40">परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले.</verse>
				<verse number="41">पण ते प्रकटीकरण सर्व लोकांसमोर न करता जे साक्षीदार देवाने पूर्वी निवडले होते त्या आम्हांसमोर केले; तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही खाणेपिणे केले.</verse>
				<verse number="42">त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, लोकांना घोषणा करुन सांगा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.</verse>
				<verse number="43">त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.”</verse>
				<verse number="44">पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा उतरला.</verse>
				<verse number="45">यहुदीतरांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या व सुंता झालेल्या श्रद्धावंत लोकांना आश्चर्य वाटले;</verse>
				<verse number="46">कारण त्यांनी त्यांना अपरिचित भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले.</verse>
				<verse number="47">पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांना पाण्याने बाप्तिस्मा दिला जाऊ नये अशी कोण मनाई करेल?”</verse>
				<verse number="48">येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना बाप्तिस्मा दिला जावा, अशी त्याने आज्ञा केली. त्यांनी त्याला विनंती केली की, त्याने काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">प्रेषितांनी व यहुदिया प्रांतांत असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, यहुदीतरांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे.</verse>
				<verse number="2">पेत्र यरुशलेम येथे गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की,</verse>
				<verse number="3">“सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही भोजन घेतले.”</verse>
				<verse number="4">पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली:</verse>
				<verse number="5">“मी यापो नगरात प्रार्थना करत होतो, तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले व ते मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून आकाशांतून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले.</verse>
				<verse number="6">त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करत होतो तो पृथ्वीवरचे चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातले पक्षी माझ्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="7">मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्र, ऊठ, मारून खा.’</verse>
				<verse number="8">परंतु मी म्हणालो, ‘नको नको, प्रभो, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही.’</verse>
				<verse number="9">दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’</verse>
				<verse number="10">असे तीनदा झाले, नंतर सर्व काही पुन्हा आकाशात वर ओढले गेले.</verse>
				<verse number="11">इतक्यात ज्या घरात आम्ही होतो त्या घरापुढे कैसरियामधून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.</verse>
				<verse number="12">तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितले, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ ते सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही कर्नेल्यच्या घरी गेलो.</verse>
				<verse number="13">त्याने आम्हांला सांगितले, “मी माझ्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, ‘यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून आण.</verse>
				<verse number="14">ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल, अशा गोष्टी तो तुला सांगेल’.</verse>
				<verse number="15">मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर उतरला तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला.</verse>
				<verse number="16">तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की, ‘योहान पाण्याने बाप्तिस्मा देत असे हे खरे, परंतु तुम्हांला बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने दिला जाईल.’</verse>
				<verse number="17">जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणांस तसेच त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?”</verse>
				<verse number="18">हे ऐकून त्यांनी टीका करणे बंद केले आणि देवाचा गौरव करीत ते म्हणाले, “तर मग देवाने यहुदीतरांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”</verse>
				<verse number="19">स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते.</verse>
				<verse number="20">परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले.</verse>
				<verse number="21">त्या वेळी प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर होते आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळत होते.</verse>
				<verse number="22">त्यांच्याविषयीचे वृत्त यरुशलेममधील ख्रिस्तमंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.</verse>
				<verse number="23">तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.”</verse>
				<verse number="24">बर्णबा चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण प्रभूला मिळाले.</verse>
				<verse number="25">नतंर तो शौलाचा शोध करावयाला तार्स येथे गेला.</verse>
				<verse number="26">त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियाला आणले. त्याने तेथे वर्षभर ख्रिस्तमंडळीमध्ये मिसळून बऱ्याच लोकांना प्रबोधन केले. श्रद्धावंतांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.</verse>
				<verse number="27">त्या दिवसांत यरुशलेमहून अंत्युखियास काही संदेष्टे आले.</verse>
				<verse number="28">त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुचविले, “सर्व जगात भीषण दुष्काळ पडणार आहे.” (हा दुष्काळ क्लौद्य सम्राटाच्या राजवटीत झाला.)</verse>
				<verse number="29">हे ऐकून प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ति साहाय्य पाठवावे.</verse>
				<verse number="30">त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे त्यांचे दान त्यांनी बर्णबा व शौल ह्यांच्याद्वारे ख्रिस्तमंडळीच्या वडिलांकडे पाठवून दिले.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला.</verse>
				<verse number="2">योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले.</verse>
				<verse number="3">ते यहुदी लोकांना आवडले, असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.</verse>
				<verse number="4">त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे सादर करावे, असा त्याचा बेत होता.</verse>
				<verse number="5">ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती.</verse>
				<verse number="6">हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते.</verse>
				<verse number="7">अचानक, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या खांद्यावर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर उठ.” तत्क्षणी त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले.</verse>
				<verse number="8">देवदूत त्याला म्हणाला, “तयार हो व पायांत वाहाणा घाल.” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला झगा घालून माझ्यामागे ये.”</verse>
				<verse number="9">तो निघून त्याच्यामागे गेला. तरी देवदूताने जे केले ते खरोखर घडत आहे, यावर त्याचा विश्वास बसेना. आपण दृष्टान्त पाहत आहोत, असे त्याला वाटले.</verse>
				<verse number="10">नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते शहरात जाण्याऱ्या लोखंडी दरवाज्याजवळ आल्यावर तो त्यांच्यासाठी आपोआप उघडला गेला. ते बाहेर पडून पुढे एका रस्त्यावरून चालून गेले, तोच देवदूत पेत्रला सोडून गेला.</verse>
				<verse number="11">पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले आहे की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”</verse>
				<verse number="12">हे लक्षात आल्यावर तो योहान ऊर्फ मार्कची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते.</verse>
				<verse number="13">तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.</verse>
				<verse number="14">तिने पेत्राचा आवाज ओळखला आणि तिला इतका आनंद झाला की, दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सर्वांना सांगितले, “पेत्र दाराशी उभा आहे.”</verse>
				<verse number="15">त्यांनी तिला म्हटले, “तू वेडी आहेस”, तरीही तिने खातरीपूर्वक सांगितले, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे.”</verse>
				<verse number="16">पेत्र तसाच ठोठावत राहिला असता शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्याला पाहून ते थक्क झाले!</verse>
				<verse number="17">त्याने हाताने त्यांना खुणावून गप्प राहायला सुचवून आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले, हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले, “हे याकोबला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला.</verse>
				<verse number="18">दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली.</verse>
				<verse number="19">हेरोदने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर हेरोद यहुदियातून निघून कैसरियात जाऊन राहिला.</verse>
				<verse number="20">सोर व सिदोन येथील लोकांवर हेरोद रागावला होता म्हणून ते एक गट करून त्याच्याकडे आले व राजाच्या महालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली कारण त्यांच्या देशाला हेरोद राजाचा देश अन्नसामग्री पुरवीत असे.</verse>
				<verse number="21">नंतर एका नियुक्त दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला.</verse>
				<verse number="22">लोक ओरडत राहिले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.”</verse>
				<verse number="23">त्याने देवाला श्रेय दिले नाही म्हणून प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.</verse>
				<verse number="24">दरम्यानच्या काळात देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.</verse>
				<verse number="25">बर्णबा व शौल हे आपले सेवाकार्य पूर्ण करून योहान ऊर्फ मार्कला बरोबर घेऊन यरुशलेमहून परत निघाले.</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळीत बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, हेरोद राज्यपालाच्या सहवासात वाढलेला मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.</verse>
				<verse number="2">ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”</verse>
				<verse number="3">त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली व त्यांची रवानगी केली.</verse>
				<verse number="4">ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले.</verse>
				<verse number="5">ते सलमीना या ठिकाणी आल्यावर त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली. योहान ऊर्फ मार्क हा त्यांचा सेवक त्यांच्याबरोबर होता.</verse>
				<verse number="6">पुढे ते सबंध बेट चालून पफे या ठिकाणी गेल्यावर बर्येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला.</verse>
				<verse number="7">तो तेथील राज्यपाल सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान माणसाचा मित्र होता. ह्या राज्यपालाने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली,</verse>
				<verse number="8">परंतु अलीम (त्या नावाचा अर्थ जादूगार असा आहे) ह्याने त्यांना अडवून राज्यपालाला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला.</verse>
				<verse number="9">शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला,</verse>
				<verse number="10">“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?</verse>
				<verse number="11">आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील, व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आपणाला कोणीतरी हाताला धरून न्यावे म्हणून तो आजूबाजूला माणसाचा शोध घेऊ लागला.</verse>
				<verse number="12">जे झाले ते पाहून त्या राज्यपालाने प्रभूच्या संदेशाविषयी आश्चर्य व्यक्त करून विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="13">पौल व त्याचे सहकारी पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले. योहान ऊर्फ मार्क त्यांना सोडून यरुशलेम येथे परत गेला.</verse>
				<verse number="14">ते पिर्गा येथून निघून पिसिदियांतील अंत्युखियास पोहचले. साबाथ दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले.</verse>
				<verse number="15">नियमशास्त्राचे व संदेष्ट्याच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संदेश पाठवला, “बंधुजनहो, तमुच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”</verse>
				<verse number="16">पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका.</verse>
				<verse number="17">इस्राएली लोकांच्या ह्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी हाताने त्यांना तेथून काढले.</verse>
				<verse number="18">पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता, त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.</verse>
				<verse number="19">त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडे चारशे वर्षेपर्यंत वतन म्हणून दिली.</verse>
				<verse number="20">त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले.</verse>
				<verse number="21">मग त्यांनी राजा मागितला, तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना राजा म्हणून दिला.</verse>
				<verse number="22">नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’</verse>
				<verse number="23">ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने स्वतः दिलेल्या वचनानुसार इस्राएलला तारण्यासाठी येशू आला आहे.</verse>
				<verse number="24">त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती.</verse>
				<verse number="25">योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा काढावयासही मी पात्र नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे.’</verse>
				<verse number="26">अहो बंधुजनहो, अब्राहामच्या वंशांतील पुत्रांनो व देवाचे भय बाळगणाऱ्या यहुदीतरांनो, आपल्याला ह्या तारणाचे वर्तमान पाठवलेले आहे!</verse>
				<verse number="27">कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येशूला न ओळखता आणि दर साबाथ दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्यांनी संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण केले</verse>
				<verse number="28">आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली.</verse>
				<verse number="29">त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले.</verse>
				<verse number="30">पण देवाने त्याला मरणातून उठवले.</verse>
				<verse number="31">त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत.</verse>
				<verse number="32">आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते, त्याचे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो.</verse>
				<verse number="33">देवाने येशूला पुन्हा उठवून त्याचे वचन आपल्याकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रात असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.</verse>
				<verse number="34">शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे, दावीदला जे वचन दिले होते त्यानुसार मी तुम्हांला पवित्र व निश्चित असा आशीर्वाद देईन.</verse>
				<verse number="35">म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.</verse>
				<verse number="36">कारण दावीद त्याच्या स्वतःच्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून निधन पावला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याचा मृतदेह कुजला.</verse>
				<verse number="37">परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही.</verse>
				<verse number="38">म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असावे की, ह्याच्याद्वारे तुमच्या पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे.</verse>
				<verse number="39">ज्याविषयी मोशेच्या नियमशास्रानुसार तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.</verse>
				<verse number="40">म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर ओढवेल,</verse>
				<verse number="41">अहो उपहास करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी स्पष्टीकरण देऊन सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही.</verse>
				<verse number="42">पौल व बर्णबा बाहेर जात असता लोकांनी विनंती केली, “आम्हांला पुढल्या साबाथ दिवशी ह्याविषयी अधिक ऐकायला आवडेल.”</verse>
				<verse number="43">सभा संपल्यावर यहुदी लोकांमधील व परिवर्तित यहुदी मतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्याकरिता त्यांना प्रोत्साहन दिले.</verse>
				<verse number="44">पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले.</verse>
				<verse number="45">पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.</verse>
				<verse number="46">परंतु पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगणे अगत्याचे होते, तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांस शाश्वत जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्याअर्थी आम्ही यहुदीतरांकडे वळतो;</verse>
				<verse number="47">कारण प्रभूने आम्हांला अशी आज्ञा दिली आहे, मी तुला यहुदीतरांसाठी प्रकाश असे करून ठेवले आहे. ह्यासाठी की, सर्व जगाचे तारण व्हावे.”</verse>
				<verse number="48">हे ऐकून यहुदीतर आनंदित झाले, त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला आणि जितके शाश्वत जीवनासाठी निवडलेले होते, तितक्यांनी विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="49">प्रभूचे वचन त्या सर्व प्रदेशात पसरत गेले.</verse>
				<verse number="50">यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले.</verse>
				<verse number="51">प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले.</verse>
				<verse number="52">अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">इकुन्य येथे असे झाले की, यहुदी लोकांच्या सभास्थानात पौल व बर्णबा दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहुदी व ग्रीक ह्यांच्या विशाल लोकसमुदायाने विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="2">परंतु विरोधी यहुदी लोकांनी यहुदीतरांचे मन बंधुजनांविरुद्ध चिथवून कलुषित केले.</verse>
				<verse number="3">ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. प्रभूनेदेखील त्याच्या कृपेच्या वचनाचे समर्थन केले म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भूत कृत्ये होऊ दिली.</verse>
				<verse number="4">हे पाहून नगरातील लोकसमुदायात फूट पडली. काही जणांनी यहुदी लोकांची बाजू घेतली तर इतरांनी प्रेषितांची बाजू उचलून धरली.</verse>
				<verse number="5">त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता काही परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते.</verse>
				<verse number="6">हे ओळखून प्रेषित लुकवनिया येथील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व सभोवतालच्या प्रदेशांत पळून गेले.</verse>
				<verse number="7">आणि तेथे ते शुभवर्तमान घोषित करीत राहिले.</verse>
				<verse number="8">त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता.</verse>
				<verse number="9">तो पौलाचे बोलणे ऐकत बसला होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ, असा विश्वास आहे, असे पाहून</verse>
				<verse number="10">मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला.</verse>
				<verse number="11">पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत ओरडून बोलले, “देव माणसाच्या रूपाने आपल्यामध्ये उतरले आहेत.”</verse>
				<verse number="12">त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले.</verse>
				<verse number="13">नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते.</verse>
				<verse number="14">हे ऐकून बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून ओरडून म्हटले,</verse>
				<verse number="15">“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही मर्त्य माणसे आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले. त्या जिवंत देवाकडे वळावे, असे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो.</verse>
				<verse number="16">त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले.</verse>
				<verse number="17">त्याने त्याच्या सत्कृत्यांद्वारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सादर केले आहेत. तो आकाशातून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला देतो आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त करतो.”</verse>
				<verse number="18">असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.</verse>
				<verse number="19">पिसिदियामधील अंत्युखिया येथून व इकुन्य येथून कित्येक यहुदी आले, त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मरण पावला, असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.</verse>
				<verse number="20">पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात आला. दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे येथे गेला.</verse>
				<verse number="21">त्या नगरात शुभवर्तमान घोषित करून त्यांनी पुष्कळ शिष्य मिळवल्यावर लुस्त्र, इकुन्य व पिसिदियामधील अंत्युखिया या नगरांत ते परत आले.</verse>
				<verse number="22">शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.”</verse>
				<verse number="23">त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले.</verse>
				<verse number="24">ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले</verse>
				<verse number="25">आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.</verse>
				<verse number="26">तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते, त्याकरिता त्यांना येथूनच देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते.</verse>
				<verse number="27">तेथे पोहचल्यावर त्यांनी ख्रिस्तमंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि यहुदीतरांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले, हे सांगितले.</verse>
				<verse number="28">तेथे ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांस अशी शिकवण दिली, “मोशेने नेमून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”</verse>
				<verse number="2">तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी तीव्र मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेममधले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.</verse>
				<verse number="3">मग ख्रिस्तमंडळीने त्यांना निरोप दिल्यावर ते फेनिके व शोमरोन यांमधून गेले आणि यहुदीतर लोक देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.</verse>
				<verse number="4">नंतर ते यरुशलेमला पोहचल्यावर तेथील ख्रिस्तमंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्यांनी जे जे केले, ते त्यांनी सांगितले.</verse>
				<verse number="5">तरी पण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले की, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.</verse>
				<verse number="6">प्रेषित व वडीलवर्ग ह्या गोष्टींविषयी विचार करावयास जमले.</verse>
				<verse number="7">पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून शुभवर्तमान ऐकून यहुदीतरांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून देवाने तुमच्यामधून माझी निवड केली.</verse>
				<verse number="8">हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांस तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे.</verse>
				<verse number="9">त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.</verse>
				<verse number="10">असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?</verse>
				<verse number="11">तर मग जसे त्यांचे तसे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने झाले आहे, असा आपला विश्वास आहे.”</verse>
				<verse number="12">सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्याद्वारे देवाने यहुदीतरांमध्ये जे चमत्कार व अद्भूत गोष्टी केल्या त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.</verse>
				<verse number="13">त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका.</verse>
				<verse number="14">यहुदीतरांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनने सांगितले आहे आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो असा धर्मशास्त्रलेख आहे:</verse>
				<verse number="15"></verse>
				<verse number="16">ह्यानंतर मी परत येईन, व दावीदचे राज्य पुन्हा उभारीन; त्याची पडझड दुरुस्त करून त्याची पुनर्बांधणी करीन;</verse>
				<verse number="17">म्हणजे उर्वरित माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा;</verse>
				<verse number="18">हे जे त्याने युगादियुगाच्या सुरवातीपासून विदित केले आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.</verse>
				<verse number="19">म्हणून माझे तर मत असे आहे की, जे यहुदीतरांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये.</verse>
				<verse number="20">उलट त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा;</verse>
				<verse number="21">कारण प्राचीन काळापासून दर साबाथ दिवशी प्रार्थनास्थळी मोशेचे शब्द वाचून दाखवून त्यांची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”</verse>
				<verse number="22">पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील अत्यंत आदरणीय समजल्या जाणाऱ्या बर्शब्बा म्हटलेल्या यहुदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल, असे सर्व ख्रिस्तमंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले.</verse>
				<verse number="23">त्यांच्या हाती त्यांनी असे पत्र लिहून पाठवले: अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील यहुदीतरांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा नमस्कार.</verse>
				<verse number="24">आमच्यापैकी काहींनी जाऊन त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनात संदेह निर्माण करून तुम्हांला त्रास दिला, असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.</verse>
				<verse number="25">म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की,</verse>
				<verse number="26">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुमच्याकडे पाठवावीत.</verse>
				<verse number="27">ह्याकरता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः आम्ही इथे लिहिलेल्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील;</verse>
				<verse number="28">कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये, असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले:</verse>
				<verse number="29">त्या गोष्टी म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म हे तुम्ही वर्ज्य करावे, ह्यांपासून स्वतःला दूर ठेवाल तर तुमचे हित होईल. तुमचे कल्याण असो.</verse>
				<verse number="30">त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व श्रद्धावंतांना जमवून ते पत्र सादर केले.</verse>
				<verse number="31">त्यातला प्रोत्साहनात्मक संदेश वाचून त्यांना आनंद झाला.</verse>
				<verse number="32">यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी बराच वेळ बोलून बंधुजनांस धैर्य व शक्ती देणारा बोध केला.</verse>
				<verse number="33">ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते, त्यांच्याकडे बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले.</verse>
				<verse number="34">परंतु सीलाला तेथे आणखी राहावयास बरे वाटले.</verse>
				<verse number="35">पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व शुभवर्तमानाची घोषणा करीत अंत्युखियात राहिले.</verse>
				<verse number="36">काही दिवसानंतर पौलने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली, त्या त्या नगरांत पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत, ते पाहू या.”</verse>
				<verse number="37">बर्णबाची इच्छा होती की, योहान ऊर्फ मार्कलाही बरोबर घ्यावे.</verse>
				<verse number="38">परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही.</verse>
				<verse number="39">ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा योहान ऊर्फ मार्कला घेऊन तारवात बसून कुप्र येथे गेला.</verse>
				<verse number="40">पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या हाती सोपविल्यावर तो तेथून निघाला.</verse>
				<verse number="41">तो ख्रिस्तमंडळ्यांना स्थिर करीत सूरिया आणि किलिकिया या प्रदेशातून गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">पौल दर्बे व लुस्त्र येथे आला. तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. मात्र त्याचे वडील ग्रीक होते.</verse>
				<verse number="2">लुस्त्र व इकुन्य येथील बंधू त्याचा आदर करत होते.</verse>
				<verse number="3">त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती, त्या ठिकाणी जे यहुदी होते, त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप ग्रीक आहे, हे सर्वांना ठाऊक होते.</verse>
				<verse number="4">त्यांनी नगरांमधून जाताना यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन ह्यांनी जे ठराव केले होते, ते त्यांना पाळावयास सांगितले.</verse>
				<verse number="5">अशा प्रकारे ख्रिस्तमंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत गेली.</verse>
				<verse number="6">आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रदेशांतून गेले</verse>
				<verse number="7">आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही.</verse>
				<verse number="8">म्हणून ते मुसियाजवळून त्रोवस येथे गेले.</verse>
				<verse number="9">तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा एक माणूस उभा राहून त्याला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.”</verse>
				<verse number="10">त्याला असा दृष्टान्त झाल्यावर त्या लोकांना शुभवर्तमान सांगावयास देवाने आम्हांला बोलावले आहे, असे समजून आम्ही मासेदोनियात जाण्याचा निर्णय लगेच घेतला.</verse>
				<verse number="11">त्रोवस पासून हाकारून आम्ही सरळ समथ्राकेस येथे गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस नगरास पोहोचलो.</verse>
				<verse number="12">तेथून फिलिप्पै या ठिकाणी गेलो. ते मासेदोनिया ह्या प्रमुख जिल्ह्यातील शहर होते व तेथे रोमन लोकांची वसाहत होती. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.</verse>
				<verse number="13">तेथे साबाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले, तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.</verse>
				<verse number="14">तेथे लुदिया नावाची एक स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती व जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.</verse>
				<verse number="15">तिने व तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी खरोखर प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत असाल, तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहामुळे ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.</verse>
				<verse number="16">आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता एक तरुण दासी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती भविष्य वर्तवून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे.</verse>
				<verse number="17">ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन ओरडून म्हणत असे, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत! हे तुम्हांला तारणाच्या मार्गाविषयी सांगतात!”</verse>
				<verse number="18">असे ती पुष्कळ दिवस करीत असे. शेवटी पौलाला या गोष्टीचा वीट आल्यामुळे मागे वळून तो त्या पिशाच्चाला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला हुकूम करतो, तू हिच्यामधून निघून जा” आणि ते तत्काळ निघून गेले.</verse>
				<verse number="19">आपल्या मिळकतीची संधी गेली, असे पाहून तिच्या धन्याने पौल व सीला ह्यांना धरून चौकात अधिकाऱ्यांसमोर ओढून नेले.</verse>
				<verse number="20">त्यांनी त्यांना रोमन अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहुदी असून आमच्या शहराला फार त्रास देतात.</verse>
				<verse number="21">आम्हा रोमन लोकांना बेकायदेशीर वाटतात व आम्ही ज्या रूढी स्वीकारुन पाळू शकत नाही अशा हे शिकवत असतात.”</verse>
				<verse number="22">तेव्हा लोक त्यांच्यावर खवळले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना चाबकाने मारण्याचा आदेश दिला.</verse>
				<verse number="23">पुष्कळ मारहाण केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकून त्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.</verse>
				<verse number="24">त्याला असा हुकूम मिळाल्यावर तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले.</verse>
				<verse number="25">मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते.</verse>
				<verse number="26">तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या.</verse>
				<verse number="27">तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जागे होऊन जेव्हा तुरुंगाचे दरवाजे उघडे पाहिले, तेव्हा बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःचा घात करण्याच्या बेतात होता.</verse>
				<verse number="28">इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.”</verse>
				<verse number="29">दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला</verse>
				<verse number="30">आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?”</verse>
				<verse number="31">त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”</verse>
				<verse number="32">नंतर त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.</verse>
				<verse number="33">रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला.</verse>
				<verse number="34">त्यानंतर त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले. त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळींनी आपण आता देवावर श्रद्धा ठेवत आहोत म्हणून आनंदोत्सव केला.</verse>
				<verse number="35">दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकाऱ्यांनी शिपाई पाठवून तुरुंगाधिकाऱ्यास आदेश दिला, “त्या माणसांना सोडून दे.”</verse>
				<verse number="36">तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौलाला असे सांगितले, “तुम्हांला सोडावे म्हणून वरिष्ठांनी आदेश पाठवला आहे, तर आता शांतीने जा.”</verse>
				<verse number="37">परंतु पौल शिपायांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून तुरुंगात टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे पाठवतात काय? हे चालणार नाही, त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”</verse>
				<verse number="38">शिपायांनी हे अधिकाऱ्यांना सांगितले. ते रोमन नागरिक आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले.</verse>
				<verse number="39">म्हणून त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना बाहेर आणून शहर सोडून जाण्याची विनंती केली.</verse>
				<verse number="40">ते तुरुंगातून निघून लुदियाच्या घरी गेले. तेथे बंधुजनांना भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तिथूनच ते मार्गस्थ झाले.</verse>
			</chapter>
			<chapter number="17">
				<verse number="1">पौल व सीला अंफिपुली व अपुल्‍लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहुदी लोकांचे प्रार्थनामंदिर होते.</verse>
				<verse number="2">तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन साबाथ त्यांच्याबरोबर धर्मशास्त्राविषयी वादविवाद केला.</verse>
				<verse number="3">त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे, तोच तो ख्रिस्त आहे.”</verse>
				<verse number="4">तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले. तसेच ग्रीक लोकांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यांत प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.</verse>
				<verse number="5">परंतु यहुदी लोकांनी हेव्याने आपल्याबरोबर बाजारातले काही लोक घेऊन व घोळका जमवून शहरभर भय निर्माण केले. यासोन नावाच्या गृहस्थाच्या घरावर ह्रा करून पौल व सीला ह्यांना बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.</verse>
				<verse number="6">परंतु ते त्यांना मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलथापालथ केली, ते येथेही आले आहेत.</verse>
				<verse number="7">त्यांना यासोनने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व जण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे, असे म्हणतात.”</verse>
				<verse number="8">ह्या वक्तव्यामुळे लोक व शहराचे अधिकारी खवळले.</verse>
				<verse number="9">त्यानंतर त्यांनी यासोनचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.</verse>
				<verse number="10">बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुया येथे पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहुदी लोकांच्या प्रार्थनामंदिरात गेले.</verse>
				<verse number="11">तेथील लोक थेस्सलनीकामधल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते दररोज धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले.</verse>
				<verse number="12">ह्यावरून त्यांतील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रीपुरुषांनी विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="13">परंतु पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे, हे थेस्सलनीकातल्या यहुदी लोकांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांचे कान फुंकले.</verse>
				<verse number="14">त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्रकिनाऱ्याजवळ त्वरित पाठवले. मात्र सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.</verse>
				<verse number="15">पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले. सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितक्या लवकर यावे, असा पौलाचा आदेश घेऊन ते परत आले.</verse>
				<verse number="16">पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे, असे पाहून तो मनात खवळला.</verse>
				<verse number="17">ह्यामुळे तो प्रार्थनामंदिरात यहुदी लोक, यहुदीतर लोक आणि चौकात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज चर्चा करीत असे.</verse>
				<verse number="18">एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांपैकी कित्येक तत्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो.” कारण पौल येशू व पुनरुत्थान ह्यांविषयीच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत असे.</verse>
				<verse number="19">म्हणून त्यांनी त्याला धरून अरीयपगा परिषदेत नेऊन म्हटले, “तुम्ही देत असलेली ही नवी शिकवण काय आहे, हे आम्हांला समजावून सांगाल काय?</verse>
				<verse number="20">तुम्ही आम्हांला काही अपरिचित गोष्टी ऐकवीत आहात, त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे, अशी आमची इच्छा आहे.”</verse>
				<verse number="21">काहीतरी नवलाईच्या गोष्टी सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.</verse>
				<verse number="22">पौल सभेपुढे उभा राहून म्हणाला, “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व फार धार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्मिक आहात, असे मला दिसते;</verse>
				<verse number="23">कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता, ते मी तुम्हांला प्रकट करतो.</verse>
				<verse number="24">ज्या देवाने जग व त्यातले सर्व निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही.</verse>
				<verse number="25">त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.</verse>
				<verse number="26">त्याने एका माणसापासून माणसांचे सर्व वंश निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या पाठीवर राहावे, अशी व्यवस्था केली आहे. त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत.</verse>
				<verse number="27">अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावे. तरीही तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.</verse>
				<verse number="28">आपले जीवन, आपली हालचाल आणि आपले अस्तित्व त्याच्या ठायी आहे. जसे तुमच्या कवींपैकीही काहींनी म्हटले आहे, “आपण त्याचीच लेकरे आहोत.”</verse>
				<verse number="29">तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे, असे आपल्याला वाटता कामा नये.</verse>
				<verse number="30">अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा, अशी आज्ञा तो माणसांना करतो.</verse>
				<verse number="31">कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”</verse>
				<verse number="32">त्या वेळी मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. परंतु इतर काही जण म्हणाले, “ह्याविषयी पुन्हा कधीतरी तुमचे विचार ऐकायला आम्हांला आवडेल.”</verse>
				<verse number="33">इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला.</verse>
				<verse number="34">काही माणसांनी पौलाशी सहमत होऊन त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांत अरीयपगा परिषदेचा सभासद दिओनुस्य, दामारी नावाची स्त्री व इतर काही लोक होते.</verse>
			</chapter>
			<chapter number="18">
				<verse number="1">नंतर पौल अथेनै सोडून करिंथ येथे गेला.</verse>
				<verse number="2">तेव्हा पंथ येथील अक्‍विला नावाचा एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून जावे अशी सम्राट क्लौद्य ह्यांनी आज्ञा केल्यामुळे तो त्याची पत्नी प्रिस्किल्‍ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, पौल त्यांच्याकडे गेला.</verse>
				<verse number="3">त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.</verse>
				<verse number="4">पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे.</verse>
				<verse number="5">सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुदी लोकांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता.</verse>
				<verse number="6">परंतु ऐकणारे त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे तारण झाले नाही तर त्याचा दोष तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे, आत्तापासून मी यहुदीतरांकडे जाणार.”</verse>
				<verse number="7">मग तेथून निघून तो तीत युस्त नावाच्या देवभक्ताच्या घरी गेला. त्याचे घर सभास्थानाच्या जवळ होते.</verse>
				<verse number="8">तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने त्याच्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला. पुष्कळ करिंथकरांनी देखील देवाचे वचन ऐकून विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.</verse>
				<verse number="9">त्या रात्री प्रभूने पौलला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस, बोलत जा, तुझे सेवाकार्य मध्येच सोडून देऊ नकोस;</verse>
				<verse number="10">कारण मी तुझ्याबरोबर आहे. कोणी तुला अपाय करू शकणार नाही. ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.”</verse>
				<verse number="11">त्यामुळे तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला.</verse>
				<verse number="12">गल्‍लियो हा अखया प्रांताचा राज्यपाल असता, यहुदी लोकांनी एकजूट करून पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,</verse>
				<verse number="13">“हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाची आराधना करावयास चिथवतो.”</verse>
				<verse number="14">तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्‍लियोने यहुदी लोकांना म्हटले, “अहो यहुदी लोकांनो, हे प्रकरण दुष्ट गुन्हेगारीचे अथवा दुष्कृत्याचे असते, तर मला तुम्हांला समजून घेणे सयुक्तिक ठरले असते.</verse>
				<verse number="15">परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे म्हणून तुमचे तुम्हीच पाहून घ्या. अशा गोष्टींचा न्याय करणे मी नाकारतो!”</verse>
				<verse number="16">असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.</verse>
				<verse number="17">तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्‍लियोने ह्या गोष्टीची पर्वा केली नाही.</verse>
				<verse number="18">ह्यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशास गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ही दोघे गेली. पौलाचा नवस होता म्हणून त्याने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडन केले.</verse>
				<verse number="19">इफिस नगरात आल्यावर पौलाने प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांना तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन त्याने यहुदी लोकांबरोबर चर्चा केली.</verse>
				<verse number="20">त्याने आणखी काही दिवस राहावे, अशी विनंती लोक करत असताही, तो तेथे राहण्यास तयार झाला नाही.</verse>
				<verse number="21">उलट त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे मी पुन्हा येईन”, असे सांगून तो तारवात बसून इफिस येथून निघाला.</verse>
				<verse number="22">कैसरिया येथे पोहचल्यावर तो यरुशलेम येथे जाऊन ख्रिस्तमंडळीस भेटला व नंतर अंत्युखियास गेला.</verse>
				<verse number="23">तेथे काही दिवस राहून तो तेथून निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया व फ्रुगिया प्रदेशांतील सर्व शिष्यांना प्रोत्साहन देत फिरला.</verse>
				<verse number="24">आलेक्सांद्रिया येथे जन्मलेला अपुल्‍लो नावाचा महान वक्ता व धर्मशास्त्रपारंगत असलेला एक यहुदी मनुष्य इफिस येथे आला.</verse>
				<verse number="25">त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते. तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी उचित प्रकारे सांगून शिकवण देत असे, तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता.</verse>
				<verse number="26">तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.</verse>
				<verse number="27">नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी तेथल्या शिष्यांना लिहिले. तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी प्रभूच्या कृपेमुळे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले;</verse>
				<verse number="28">कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे धर्मशास्त्रामधून दाखवून तो अत्यंत प्रभावीपणे सर्वांसमक्ष यहुदी लोकांचे म्हणणे खोडून काढीत असे.</verse>
			</chapter>
			<chapter number="19">
				<verse number="1">अपुल्‍लो करिंथ येथे असताना पौल त्या विभागाच्या मधल्या मार्गे जाऊन इफिस येथे पोहचला, तेथे काही शिष्य त्याला आढळले.</verse>
				<verse number="2">त्यांना त्याने विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे, हेच आम्ही कधी ऐकले नाही.”</verse>
				<verse number="3">तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा.”</verse>
				<verse number="4">पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की, ‘माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.’”</verse>
				<verse number="5">हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला.</verse>
				<verse number="6">पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते अपरिचित भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.</verse>
				<verse number="7">ते सगळे सुमारे बारा पुरुष होते.</verse>
				<verse number="8">पौल सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने निर्भीडपणे संदेश देत गेला.</verse>
				<verse number="9">परंतु काही जण निगरगट्ट बनून श्रद्धा न ठेवता लोकांसमक्ष प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. पौलाने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नच्या सभागृहात तो दररोज वादविवाद करू लागला.</verse>
				<verse number="10">असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.</verse>
				<verse number="11">परमेश्वर पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडवीत होता.</verse>
				<verse number="12">त्याने वापरलेले रुमाल किंवा त्याच्या अंगावरचे कपडे रोग्यांकडे आणले तरीदेखील त्यांचे रोग दूर होत व दुष्ट आत्मे त्यांच्यांतून निघून जात असत.</verse>
				<verse number="13">काही भटके यहुदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांना प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची तुम्हांला शपथ घालतो.”</verse>
				<verse number="14">एक मुख्य यहुदी याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते.</verse>
				<verse number="15">त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात?”</verse>
				<verse number="16">ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून त्या सर्वांना हटविले आणि त्यांना इतका मार दिला की, ते घायाळ होऊन उघडे-नागडे त्या घरातून पळून गेले.</verse>
				<verse number="17">इफिस येथे राहणारे यहुदी व ग्रीक ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा वाढला.</verse>
				<verse number="18">विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली पापे उघडपणे पदरात घेतली.</verse>
				<verse number="19">जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत ती जाळून टाकली आणि त्यांच्या किंमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी झाली.</verse>
				<verse number="20">ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याने वचन पसरत जाऊन प्रबल झाले.</verse>
				<verse number="21">हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेम येथे जावे असे पौलाने आपल्या मनात ठरवून म्हटले, ‘तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.’</verse>
				<verse number="22">त्याची सेवा करणाऱ्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियात पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.</verse>
				<verse number="23">ह्या सुमारास प्रभूच्या मार्गाविषयी इफिस येथे बराच तणाव निर्माण झाला.</verse>
				<verse number="24">देमेत्रिय नावाचा एक सोनार अर्तमी देवीच्या मंदिराच्या रुप्याच्या प्रतिकृती करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे.</verse>
				<verse number="25">त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे.</verse>
				<verse number="26">तुम्ही पाहता व ऐकता की, हाताने केलेले देव हे देवच नाहीत, असे त्या पौलाने केवळ इफिस येथेच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात सांगून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितविले आहे.</verse>
				<verse number="27">ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते, तिचे मंदिर निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.”</verse>
				<verse number="28">हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!”</verse>
				<verse number="29">त्यामुळे शहरात गोंधळ उडाला आणि पौलाचे सहप्रवासी, मासेदोनियाचे गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने रंगभवनात धावत गेले.</verse>
				<verse number="30">तेव्हा गर्दीला सामोरे जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला तसे करू दिले नाही.</verse>
				<verse number="31">शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, “रंगभवनात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका.”</verse>
				<verse number="32">तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आरडाओरड होऊ लागली, लोकांचा एकच गोंधळ उडाला कारण आपण कशासाठी जमलो आहोत, हेदेखील बहुतेकांना कळले नाही.</verse>
				<verse number="33">यहुदी लोकांच्या गर्दीतून काही लोकांनी आलेक्सांद्राला प्रवृत्त करून पुढे केले, तेव्हा तो हाताने खुणावून लोकांपुढे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत होता.</verse>
				<verse number="34">परंतु तो यहुदी आहे, असे समजल्यावर सुमारे दोन तासपर्यंत “इफिसकरांची अर्तमी देवी महान आहे!” असा उद्घोष सर्वांनी सुरू ठेवला.</verse>
				<verse number="35">शेवटी नगराचा प्रशासक लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व स्वर्गातून पडलेली मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे कोणाला ठाऊक नाही?</verse>
				<verse number="36">ह्या गोष्टी निर्विवाद आहेत. तुम्ही शांत व्हा. काही अविचार करू नका.</verse>
				<verse number="37">जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत, ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत.</verse>
				<verse number="38">देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायालये उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत, त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात.</verse>
				<verse number="39">पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली, तर तिच्याबद्दल नागरिकांच्या रीतसर सभेत ठरवले जाईल.</verse>
				<verse number="40">ह्या दंग्याचे कारण काय, ह्याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणांवर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे.”</verse>
				<verse number="41">असे बोलून त्याने गर्दी पांगवली.</verse>
			</chapter>
			<chapter number="20">
				<verse number="1">नंतर गलबला शांत झाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला.</verse>
				<verse number="2">त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो अखया प्रांतात गेला.</verse>
				<verse number="3">तेथे तीन महिने राहिल्यावर तो तारवातून सूरिया देशात जाणार होता, पण यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला आहे, हे कळता त्याने मासेदोनियातूनच परत जाण्याचा बेत केला.</verse>
				<verse number="4">बिरुया येथला पुर्राचा मुलगा सोपत्र तसेच थेस्सलनीकर अरिस्तार्ख, सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य, आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले.</verse>
				<verse number="5">ते पुढे जाऊन त्रोवस येथे आमची वाट पाहत राहिले.</verse>
				<verse number="6">बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही एक आठवडा राहिलो.</verse>
				<verse number="7">आम्ही शनिवारी सायंकाळी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौलाने त्यांच्यापुढे भाषण केले. त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले, कारण तो दुसऱ्या दिवशी जाणार होता.</verse>
				<verse number="8">ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो, तेथे बरेच दिवे होते.</verse>
				<verse number="9">युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने त्याचे डोळे जड होऊ लागले. पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे युतुख झोपेच्या गुंगीत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला.</verse>
				<verse number="10">तेव्हा पौल खाली उतरला आणि स्वतःला त्याच्यावर झोकून देऊन त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका, हा अजून जिवंत आहे.”</verse>
				<verse number="11">त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर बोलत राहिला व नंतर तो तेथून निघून गेला.</verse>
				<verse number="12">त्या तरुणाला जिवंत घरी नेता आल्यामुळे त्यांना फार बरे वाटले.</verse>
				<verse number="13">आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्सा या ठिकाणी गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः भूमार्गे येणार होता.</verse>
				<verse number="14">तो अस्सा येथे आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेन येथे आलो.</verse>
				<verse number="15">तेथून तारवातून दुसऱ्या दिवशी आम्ही खिया येथे आलो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सामा बंदर गाठले, मग त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेत येथे आलो.</verse>
				<verse number="16">आपणाला आशिया प्रांतांमध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस येथे न थांबण्याचा पौलाने निश्चय केला होता कारण कसेही करून पेन्टेकॉस्टच्या सणात यरुशलेममध्ये असावे यासाठी तो घाई करत होता.</verse>
				<verse number="17">त्याने मिलेतहून इफिसला निरोप पाठवून ख्रिस्तमंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.</verse>
				<verse number="18">ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून माझा जीवनक्रम कसा होता,</verse>
				<verse number="19">म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="20">जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.</verse>
				<verse number="21">पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व ग्रीक ह्यांना मी साक्ष देत होतो.</verse>
				<verse number="22">आता मी अंतर्यामी पवित्र आत्म्यापुढे आज्ञाधारक होऊन यरुशलेमला जात आहे. तेथे माझे काय होईल, ते माहीत नाही.</verse>
				<verse number="23">केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे.</verse>
				<verse number="24">परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="25">मी तुमच्यामध्ये देवराज्याची घोषणा करत फिरलो, येथून पुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही, हे मला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="26">म्हणून आजच्या दिवशी मी आवर्जून सांगतो, जर तुमचे तारण झाले नाही तर त्याला मी जबाबदार नाही</verse>
				<verse number="27">कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.</verse>
				<verse number="28">म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.</verse>
				<verse number="29">मी गेल्यावर कळपाला दयामाया न दाखवणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे.</verse>
				<verse number="30">तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.</verse>
				<verse number="31">मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा.</verse>
				<verse number="32">आता मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो, तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन द्यावयास समर्थ आहे.</verse>
				<verse number="33">मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही.</verse>
				<verse number="34">माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्याच हातांनी मी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.</verse>
				<verse number="35">सर्व गोष्टींत मी कित्ता घालून दिला आहे. तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बलांना साहाय्य करावे आणि ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे’, असे जे शद्ब प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”</verse>
				<verse number="36">असे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली.</verse>
				<verse number="37">ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.</verse>
				<verse number="38">‘ह्यापुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही’, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. त्यानंतर त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचविले.</verse>
			</chapter>
			<chapter number="21">
				<verse number="1">आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून सरळ कोसा या ठिकाणी गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पातरा येथे गेलो.</verse>
				<verse number="2">नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो.</verse>
				<verse number="3">पुढे कुप्र दृष्टीस पडले, तेव्हा त्याच्या दक्षिणेकडे आम्ही सूरियाकडे जाऊन सोर येथे उतरलो कारण तेथे तारवातील माल उतरावयाचा होता.</verse>
				<verse number="4">तेथे शोध घेतल्यावर आम्हांला काही शिष्य भेटले म्हणून आम्ही त्या ठिकाणी सात दिवस राहिलो. त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेममध्ये पाऊल टाकू नका.”</verse>
				<verse number="5">परंतु सात दिवसांनंतर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला शहराबाहेर पोहचविले. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.</verse>
				<verse number="6">नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले.</verse>
				<verse number="7">आम्ही आमचा सोरपासूनचा जलप्रवास संपविला आणि प्‍तलमैस येथे येऊन व बंधुजनांस भेटून त्यांच्याजवळ एक दिवस राहिलो.</verse>
				<verse number="8">दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरिया येथे आलो आणि शुभवर्तमान प्रचारक फिलिप ह्याच्या घरी उतरलो, यरुशलेममध्ये ज्या सात लोकांना साहाय्यक म्हणून निवडले होते, त्यांच्यापैकी हा होता.</verse>
				<verse number="9">त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत.</verse>
				<verse number="10">तेथे आम्ही अनेक दिवस राहिलो असता अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला.</verse>
				<verse number="11">त्याने आमच्याकडे येऊन पौलाच्या कमरबंदाने स्वतःचे हातपाय बांधले व म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की, “हा कमरबंद ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेममध्ये यहुदी लोक ह्याप्रमाणे बांधून यहुदीतरांच्या हाती देतील.”</verse>
				<verse number="12">हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही “तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका”, अशी पौलाला गळ घातली.</verse>
				<verse number="13">पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचविता काय? मी नुसता तुरुंगात पडण्यासच नव्हे, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलममध्ये मरावयासदेखील तयार आहे.”</verse>
				<verse number="14">तो ऐकत नाही, हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो”, असे म्हणून आम्ही त्याचे मन वळवणे सोडून दिले.</verse>
				<verse number="15">त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेम येथे गेलो.</verse>
				<verse number="16">आमच्याबरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले, त्याच्या घरी आम्ही राहणार होतो.</verse>
				<verse number="17">यरुशलेममध्ये आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे स्वागत केले.</verse>
				<verse number="18">दुसऱ्या दिवशी पौल आमच्याबरोबर याकोबच्या घरी आला. सर्व वडीलजनही तेथे आले.</verse>
				<verse number="19">त्याने त्यांना भेटून त्याच्या सेवेद्वारे जी कार्ये देवाने यहुदीतरांमध्ये केली होती, त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.</verse>
				<verse number="20">ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहेत, असे हजारो लोक यहुदी लोकांमध्ये आहे. हे तुम्ही पाहातच आहात, ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत.</verse>
				<verse number="21">तुमच्याविषयी त्यांना असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही यहुदीतरांत राहणाऱ्या सर्व यहुदी लोकांना मोशेच्या नियमशास्राचा त्याग करावयास शिकवता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगता.</verse>
				<verse number="22">तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खातरीपूर्वक ऐकतील.</verse>
				<verse number="23">म्हणून आम्ही तुम्हांला सांगतो तसे करा, आमच्यात चौघे जण व्रतस्थ आहेत.</verse>
				<verse number="24">त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळविण्यात आले आहे, त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून योग्य प्रकारे वागता हे सर्वांस कळेल.</verse>
				<verse number="25">मात्र ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा यहुदीतरांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व लैंगिक अनैतिकता ह्यांपासून अलिप्त राहावे.”</verse>
				<verse number="26">तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन गेला व दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्याबरोबर शुद्धीकरणाचा विधी पार पाडला. नंतर मंदिरात जाऊन त्याने व्रताचे दिवस कधी संपतील याविषयी सूचना दिली कारण त्यानंतर तो त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण वाहणार होता.</verse>
				<verse number="27">ते सात दिवस पूर्ण होत आले तेव्हा आशिया प्रांतातल्या यहुदी लोकांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून</verse>
				<verse number="28">ओरडून म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, धावा हो धावा, आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो, तोच हा आहे. शिवाय ह्याने ग्रीक लोकांना मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळले आहे.”</verse>
				<verse number="29">त्याने इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती.</verse>
				<verse number="30">सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी उसळली. त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद करण्यात आले.</verse>
				<verse number="31">ते त्याला ठार मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराला बातमी कळली की, संबंध यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे.</verse>
				<verse number="32">शिपाई व रोमन अधिकारी ह्यांना घेऊन तो त्यांच्याकडे तत्काळ धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबविले.</verse>
				<verse number="33">सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला, मग हा कोण व ह्याने काय केले, असे तो विचारू लागला.</verse>
				<verse number="34">लोक निरनिराळी ओरड करू लागले. ह्या गलबल्यामुळे त्याला खातरी लायक असे काही कळेना म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला.</verse>
				<verse number="35">तो पायऱ्यांवर आला, तेव्हा लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले.</verse>
				<verse number="36">लोकांचा समुदाय मागे चालत, ‘त्याला ठार करा’, असे ओरडत होता.</verse>
				<verse number="37">पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला विनंती केली, “मला आपल्याबरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “तुला ग्रीक भाषा येते काय?</verse>
				<verse number="38">ज्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार सशस्त्र मारेकऱ्यांना रानात नेले, तोच मिसरी तू आहेस ना?”</verse>
				<verse number="39">पौलाने म्हटले, “मी यहुदी असून किलिकिया नगरातील तार्स ह्या महत्त्वपूर्ण ठिकाणचा राहणारा आहे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.”</verse>
				<verse number="40">त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले आणि अगदी शांत झाल्यावर हिब्रू भाषेत तो पुढीलप्रमाणे बोलला:</verse>
			</chapter>
			<chapter number="22">
				<verse number="1">“बंधुजनहो व वडीलजनांनो, मी आता तुमच्यासमोर माझी बाजू मांडत आहे.”</verse>
				<verse number="2">तो आपणाबरोबर हिब्रू भाषेत बोलत आहे, हे ऐकून ते अधिक शांत झाले. तो पुढे म्हणाला,</verse>
				<verse number="3">“मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकिया येथील तार्स नगरात झाला आणि मी ह्या यरुशलेम शहरात गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे काटेकोर शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.</verse>
				<verse number="4">पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला.</verse>
				<verse number="5">त्याविषयी उच्च याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्याकडून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्क ह्या ठिकाणी चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेममध्ये शासन करावयास आणावे.</verse>
				<verse number="6">जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला.</verse>
				<verse number="7">मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली.</verse>
				<verse number="8">मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’</verse>
				<verse number="9">माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.</verse>
				<verse number="10">मी म्हणालो, ‘प्रभो, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्क येथे जा, तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, ते सर्व तुला तेथे सांगण्यात येईल.’</verse>
				<verse number="11">त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले म्हणून माझ्या सहकाऱ्यांनी माझा हात धरून मला दिमिष्क येथे नेले.</verse>
				<verse number="12">हनन्या नावाचा एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.</verse>
				<verse number="13">तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले.</verse>
				<verse number="14">तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे, हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान सेवकाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी.</verse>
				<verse number="15">कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षीदार होशील.</verse>
				<verse number="16">तर आता उशीर का करतोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’</verse>
				<verse number="17">मी यरुशलेमला परत आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता मला दृष्टान्त घडला.</verse>
				<verse number="18">तेव्हा मी प्रभूला पाहिले, तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेममधून लवकर निघून जा कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’</verse>
				<verse number="19">मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी तुरुंगात टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे.</verse>
				<verse number="20">स्तेफन जेव्हा तुझा रक्तसाक्षी झाला, तेव्हा स्वतः मी जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो.’</verse>
				<verse number="21">तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’”</verse>
				<verse number="22">ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले, त्यानंतर ते ओरडून म्हणाले, “ह्याची वाट लावा, ह्याची जगण्याची लायकी नाही!”</verse>
				<verse number="23">ते ओेरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता</verse>
				<verse number="24">सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते, हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले.</verse>
				<verse number="25">परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”</verse>
				<verse number="26">हे ऐकून रोमन अधिकाऱ्याने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमन आहे.”</verse>
				<verse number="27">तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”</verse>
				<verse number="28">सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”</verse>
				<verse number="29">ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले, शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले, तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बेड्या ठोकल्या होत्या.</verse>
				<verse number="30">यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला होता, तो काय आहे, हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पौलाला बेड्यांतून मोकळे केले आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला तेथे आणून त्यांच्यापुढे उभे केले.</verse>
			</chapter>
			<chapter number="23">
				<verse number="1">पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी लावून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवापुढे उचित प्रकारे वागत आलो आहे, हे मी तुम्हांला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगतो.”</verse>
				<verse number="2">उच्च याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा आदेश दिला.</verse>
				<verse number="3">पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील, तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याचा आदेश देतोस काय?”</verse>
				<verse number="4">तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या उच्च याजकाची निंदा करतोस काय?”</verse>
				<verse number="5">पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा उच्च याजक आहे, हे मला ठाऊक नव्हते. तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नकोस, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”</verse>
				<verse number="6">त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये आवेशाने म्हणाला, “बंधुजनहो, मी स्वतः एक परुशी व परुश्यांचा पुत्र आहे, आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”</verse>
				<verse number="7">तो हे बोलत आहे तोच परुशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून फूट पडली.</verse>
				<verse number="8">कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात. परुशी तर ह्या गोष्टी मान्य करतात.</verse>
				<verse number="9">तेथे मोठी गडबड उडाली. जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही, कदाचित आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर खरोखर बोलला असेल!”</verse>
				<verse number="10">असे त्यांच्यांत कडाक्याचे भांडण चालले असता ते पौलाच्या चिंधड्या उडवतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.</verse>
				<verse number="11">त्या रात्री प्रभू पौलच्या पुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”</verse>
				<verse number="12">दिवस उगवल्यावर, काही यहुदी लोक एकजूट करून शपथ घेऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.”</verse>
				<verse number="13">हा कट रचणारे इसम चाळीसपेक्षा अधिक होते.</verse>
				<verse number="14">ते मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे जाऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडक शपथेने आम्ही स्वतःस बांधून घेतले आहे.</verse>
				<verse number="15">तर आता त्याच्याविषयी बारकाईने विचारपूस करावयाची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सरदाराला पटवून द्यावे, म्हणजे पौल जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार असू.”</verse>
				<verse number="16">ह्या कारस्थानाविषयी पौलाच्या भाच्याने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.</verse>
				<verse number="17">पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा. ह्याला त्यांना काही सांगावयाचे आहे.”</verse>
				<verse number="18">त्याने त्याला सहस्त्राधिपतीकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.”</verse>
				<verse number="19">सहस्त्राधिपतीने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”</verse>
				<verse number="20">तो म्हणाला, “यहुदी अधिकाऱ्यांनी असे संगनमत केले आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.</verse>
				<verse number="21">तर आपण त्यांचे ऐकू नका कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला ठार मारीपर्यंत ते खाणार पिणार नाहीत. आता ते तयार होऊन आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.”</verse>
				<verse number="22">“तू हे मला कळविले आहे, हे कोणाला सांगू नकोस”, असे त्या तरुणाला बजावून सहस्त्राधिपतीने त्याला निरोप दिला.</verse>
				<verse number="23">सहस्त्राधिपतीने त्याच्या दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरिया येथे जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी आज रात्री नऊ वाजता तयार ठेवा.</verse>
				<verse number="24">घोडे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सुरक्षित न्या.”</verse>
				<verse number="25">नंतर त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले -</verse>
				<verse number="26">महाराज फेलिक्स राज्यपाल ह्यांस, क्लौद्य लुसिया ह्याचा नमस्कार,</verse>
				<verse number="27">ह्या मनुष्याला यहुदी लोकांनी धरले होते आणि ते त्याचा घात करणार होते, इतक्यात हा रोमन आहे, असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन त्याला सोडवले.</verse>
				<verse number="28">ह्याच्यावर आरोप ठेवण्याचे काय कारण होते, हे समजून घेण्याच्या इच्छेने मी त्याला त्यांच्या न्यायसभेत नेले.</verse>
				<verse number="29">त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टीसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा तुरुंगवासाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला आढळले.</verse>
				<verse number="30">ह्या माणसाविरुद्ध कट रचण्यात आला आहे, अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे.</verse>
				<verse number="31">शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्रीच्या वेळी अंतिपत्रीस येथे नेले.</verse>
				<verse number="32">दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार तयार ठेवून ते गढीत परत आले.</verse>
				<verse number="33">कैसरियास गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलला त्याच्यापुढे उभे केले.</verse>
				<verse number="34">पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे, असे समजल्यावर</verse>
				<verse number="35">त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” नंतर त्याला हेरोदच्या वाड्यात देखरेखीखाली ठेवावे, असा त्याने हुकूम सोडला.</verse>
			</chapter>
			<chapter number="24">
				<verse number="1">पाच दिवसांनंतर उच्च याजक हनन्या, काही वडीलजन आणि तिर्तुल्‍ल नावाचा एक वकील ह्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी राज्यपालांपुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.</verse>
				<verse number="2">त्याला बोलावल्यावर तिर्तुल्‍ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो असा - “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत,</verse>
				<verse number="3">म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.</verse>
				<verse number="4">तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमची थोडक्यात मांडलेली बाजू ऐकावी.</verse>
				<verse number="5">हा माणूस म्हणजे एक पीडा आहे, असे आम्हांला आढळून आले आहे. जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड करणारा असून नासरेथकर पंथाचा तो पुढारी आहे.</verse>
				<verse number="6">ह्याने मंदिरही विटाळविण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.</verse>
				<verse number="7">पण लुसिया सहस्त्राधिपतीने येऊन, मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून सोडवून नेले</verse>
				<verse number="8">आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली. ह्याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”</verse>
				<verse number="9">ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहुदी लोकांनीही दुजोरा दिला.</verse>
				<verse number="10">राज्यपालांनी बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात, हे मला ठाऊक आहे म्हणून मी माझ्यासंबंधीच्या गोष्टींचे आनंदाने समर्थन करतो.</verse>
				<verse number="11">आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेममध्ये उपासना करावयास जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत</verse>
				<verse number="12">आणि मंदिरात, सभास्थानात किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजविताना मी त्यांना आढळलो नव्हतो.</verse>
				<verse number="13">ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आत्ता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे सिद्ध करता येत नाहीत,</verse>
				<verse number="14">तरीही मी आपणासमोर इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते चुकीचा मार्ग म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो</verse>
				<verse number="15">आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.</verse>
				<verse number="16">ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो.</verse>
				<verse number="17">मी काही वर्षांनी माझ्या स्वतःच्या लोकांना दानधर्म व त्यांच्यासाठी यज्ञार्पणे करण्यास आलो.</verse>
				<verse number="18">हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात होतो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते,</verse>
				<verse number="19">माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता.</verse>
				<verse number="20">किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता, माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते तरी ह्यांनी सांगावे.</verse>
				<verse number="21">ह्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे’, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा माझा अपराध असला तर असो.”</verse>
				<verse number="22">परंतु फेलिक्सला प्रभुमार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सहस्त्राधिपती येईल, तेव्हा मी तुमच्या खटल्याविषयी निर्णय देईन.”</verse>
				<verse number="23">त्याने शताधिपतीला हुकूम केला, “पौलाला पहाऱ्यात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.”</verse>
				<verse number="24">काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्‍ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले.</verse>
				<verse number="25">तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी पौल भाषण करत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, “सध्या जा. संधी सापडली म्हणजे तुला परत बोलावीन.”</verse>
				<verse number="26">शिवाय आपणास पौलाकडून पैसा मिळेल अशी आशाही त्याला होती म्हणून तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे.</verse>
				<verse number="27">पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्क्य फेस्त ह्याची नेमणूक झाली. तेव्हा यहुदी लोकांची मर्जी राखण्यासाठी फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="25">
				<verse number="1">फेस्त प्रांतात आल्यावर तीन दिवसांनी तो कैसरियातून यरुशलेम येथे गेला.</verse>
				<verse number="2">तेव्हा उच्च याजक व यहुदी लोकांमधील पुढारी ह्यांनी त्याच्याकडे पौल विरुद्ध फिर्याद नेली</verse>
				<verse number="3">आणि त्याला यरुशलेममध्ये बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे आग्रहाची विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.</verse>
				<verse number="4">फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरियात कैदेत आहे, मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे.</verse>
				<verse number="5">त्या माणसाचा काही अपराध असला, तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”</verse>
				<verse number="6">तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरियास गेला. दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलला आणण्याचा हुकूम केला.</verse>
				<verse number="7">तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले.</verse>
				<verse number="8">पौलाने प्रत्युत्तर केले, “मी यहुदी लोकांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”</verse>
				<verse number="9">मात्र यहुदी लोकांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलला म्हणाला, “यरुशलेममध्ये जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?”</verse>
				<verse number="10">पौलाने म्हटले, “कैसरच्या न्यायासनापुढे मी उभा आहे, येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुदी लोकांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता.</verse>
				<verse number="11">मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले, तर मी मरावयास तयार नाही असे नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत, त्यातला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसरजवळ न्याय मागतो.”</verse>
				<verse number="12">फेस्तने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसरजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरपुढे जाशील.”</verse>
				<verse number="13">काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली.</verse>
				<verse number="14">तेथे ती दोघे पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्तने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे.</verse>
				<verse number="15">मी यरुशलेमला गेलो होतो, तेव्हा त्याच्यावर यहुदी लोकांच्या मुख्य याजकांनी व वडीलजनांनी फिर्याद करून त्याला शिक्षा करावी अशी विनंती केली.</verse>
				<verse number="16">त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची संधी आरोपीला मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमन लोकांची रीत नाही.</verse>
				<verse number="17">म्हणून ते तेथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला.</verse>
				<verse number="18">वादी उभे असता ज्या दुष्ट गुन्ह्यांचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही.</verse>
				<verse number="19">केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी त्यांचा व पौलाचा वाद होता.</verse>
				<verse number="20">ह्याची चौकशी कशी चालवावी, हे मला समजेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, ‘यरुशलेम येथे जाऊन ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?’</verse>
				<verse number="21">परंतु बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसरकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”</verse>
				<verse number="22">अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे.” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल.”</verse>
				<verse number="23">दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्तने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले.</verse>
				<verse number="24">फेस्त म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा व उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना! ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुदी लोकांच्या सर्व समुदायाने यरुशलेम व येथेही मला अर्ज केला.</verse>
				<verse number="25">परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, असे मला कळून आले आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरवले.</verse>
				<verse number="26">ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही म्हणून तुमच्यापुढे व विशेषकरून हे राजा अग्रिप्पा, आपणापुढे ह्याला आणले आहे. अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे;</verse>
				<verse number="27">कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही.”</verse>
			</chapter>
			<chapter number="26">
				<verse number="1">अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले:</verse>
				<verse number="2">“महाराज अग्रिप्पा, यहुदी लोकांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात आणि यहुदी लोक ज्या गोष्टींविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात, त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करावयाचे आहे, ह्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि मी आपल्याला विनंती करतो की, माझे भाषण शांतपणे ऐकून घ्या.</verse>
				<verse number="3"></verse>
				<verse number="4">तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे.</verse>
				<verse number="5">ते पहिल्यापासून मला ओळखतात म्हणून त्यांची इच्छा असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कट्टरपंथाप्रमाणे मी परुशी होतो.</verse>
				<verse number="6">देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय व्हावा म्हणून मी आता उभा आहे.</verse>
				<verse number="7">ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश, देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, मी तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुदी लोकांनी आरोप ठेवला आहे.</verse>
				<verse number="8">देव मेलेल्यांना उठवतो हे तुमच्यापैकी कित्येकांना अविश्वसनीय का वाटावे?</verse>
				<verse number="9">मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात</verse>
				<verse number="10">आणि तसे मी यरुशलेममध्ये केलेसुद्धा. मी मुख्य याजकांकडून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात टाकले आणि त्यांचा वध होत असताना मी संमती दिली.</verse>
				<verse number="11">सभास्थानात वारंवार शासन करून मी त्यांना देवनिंदा करावयास लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांच्यावर अतिशय क्रोधाविष्ट होऊन परक्या शहरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.</verse>
				<verse number="12">हाच हेतू साध्य करण्याकरिता मुख्य याजकांकडून आदेश व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्ककडे जात होतो.</verse>
				<verse number="13">तेव्हा महाराज, वाटेवर मध्यान्हसमयी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.</verse>
				<verse number="14">आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात हिब्रू भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली, ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारून तू स्वतःलाच इजा करून घेतोस!’</verse>
				<verse number="15">मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस, तोच मी आहे.</verse>
				<verse number="16">तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा, मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षीदार असे तुला नेमावे.</verse>
				<verse number="17">इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन.</verse>
				<verse number="18">त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’</verse>
				<verse number="19">म्हणून महाराज, अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अवमान केला नाही</verse>
				<verse number="20">तर प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि नंतर अवघ्या यहुदियात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करीत फिरलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.</verse>
				<verse number="21">ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते.</verse>
				<verse number="22">तथापि देवाकडून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांना साक्ष देत आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यानी व मोशेने सांगितले त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही,</verse>
				<verse number="23">त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिला होऊन आमच्या लोकांना व यहुदीतरांनाही तारणाचा प्रकाश प्रकट करावा.”</verse>
				<verse number="24">ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त ओरडून म्हणाला, “पौल, तू वेडा आहेस! अतिशिक्षण मिळवल्यामुळे तुझे डोके फिरले आहे!”</verse>
				<verse number="25">पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी सत्याच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलत आहे.</verse>
				<verse number="26">ह्या गोष्टी महाराज अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत, त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे एखाद्या कोपऱ्यात घडलेले नाही.</verse>
				<verse number="27">महाराज अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="28">अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?”</verse>
				<verse number="29">पौल म्हणाला, “अल्पावधी किंवा दीर्घकाळ, कसेही असो केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी माझ्या बेड्यांखेरीज इतर बाबतीत माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”</verse>
				<verse number="30">त्यानंतर राजा, राज्यपाल, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले</verse>
				<verse number="31">आणि एकीकडे जाऊन आपापसात म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा तुरुंगवासास पात्र असे काही केले नाही.”</verse>
				<verse number="32">अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “ह्या माणसाने कैसरजवळ न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”</verse>
			</chapter>
			<chapter number="27">
				<verse number="1">आम्ही इटाली देशाला तारवातून जावे असे ठरल्यावर, पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा रोमन अधिकारी ह्याच्या ताब्यात देण्यात आले.</verse>
				<verse number="2">आम्ही आशिया प्रांताच्या किनाऱ्यावरील बंदरास जाणाऱ्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो, तेव्हा मासेदोनियाचा थेस्सलनीकातील रहिवासी अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.</verse>
				<verse number="3">दुसऱ्या दिवशी आम्ही सीदोन येथे पोहचलो. तेथे यूल्य पौलाबरोबर सौजन्याने वागला. त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.</verse>
				<verse number="4">आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्रच्या किनाऱ्यावरून गेलो.</verse>
				<verse number="5">किलिकिया व पंफुल्या ह्यांच्यासमोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुर्या बंदरास पोहचलो.</verse>
				<verse number="6">तेथे इटालीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू रोमन अधिकाऱ्याला मिळाले, त्यावर त्याने आम्हांला चढवले.</verse>
				<verse number="7">पुष्कळ दिवस हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना म्हणून आम्ही क्रेत बेटाच्या किनाऱ्यावरून सलमोनसमोर गेलो.</verse>
				<verse number="8">आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर या ठिकाणी आलो. त्याच्याजवळ लसया नगर होते.</verse>
				<verse number="9">फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपवासकाळ येऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे धोक्याचे होते म्हणून पौलाने त्यांना सुचवले,</verse>
				<verse number="10">“अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल, असे मला दिसते.”</verse>
				<verse number="11">सैन्याधिकाऱ्याने पौलाच्या म्हणण्यापेक्षा कप्‍तान व तारवाचा मालक ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले.</verse>
				<verse number="12">ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी तेथून निघावे आणि साधेल तर फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. क्रेतमधील ह्या बंदराचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशांकडे होते.</verse>
				<verse number="13">दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस जाईल, असे समजून ते तेथून नांगर उचलून क्रेतच्या बाजूने किनाऱ्याAकिनाऱ्याने गेले.</verse>
				<verse number="14">परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा त्या बेटाच्या बाजूने सुटला.</verse>
				<verse number="15">त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत जाऊ लागलो.</verse>
				<verse number="16">पुढे कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही महत्प्रयासाने होडी सुरक्षित करून घेतली.</verse>
				<verse number="17">ती वर घेतल्यावर त्यांनी दोरांनी तारू खालून आवळून बांधले. आपण सुर्ती किनाऱ्याच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले, मग तारू तसेच वाहवत गेले.</verse>
				<verse number="18">भन्नाट वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी तारवातील सामान फेकून देऊ लागले</verse>
				<verse number="19">आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार फेकून दिले.</verse>
				<verse number="20">पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत, तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला, त्यामुळे शेवटी आम्ही वाचण्याची आशा हळूहळू सोडून दिली.</verse>
				<verse number="21">त्यांना पुष्कळ दिवस उपवास घडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, खरेच, तुम्ही माझे ऐकावयाला हवे होते. क्रेत बेटावरून निघावयाचे नव्हते म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.</verse>
				<verse number="22">तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल;</verse>
				<verse number="23">कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,</verse>
				<verse number="24">‘पौल, भिऊ नकोस. तुला कैसरपुढे उभे राहिले पाहिजे आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत, ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’</verse>
				<verse number="25">म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरवसा आहे की, त्याने मला जसे कळविले, तसेच घडेल.</verse>
				<verse number="26">तथापि आपण एका बेटावर फेकले जाऊ.”</verse>
				<verse number="27">नंतर चौदाव्या रात्रीस भूमध्य समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की, आपण कोणत्या तरी किनाऱ्याजवळ येत आहोत.</verse>
				<verse number="28">त्यांनी बुडीद टाकले, तेव्हा पाणी चाळीस मीटर खोल आहे, असे आढळले. थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा तीस मीटर खोली आढळली.</verse>
				<verse number="29">आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू, असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले.</verse>
				<verse number="30">नांगर नाळीवरूनही टाकावे, असे निमित्त सांगून खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळावयास पाहत होते.</verse>
				<verse number="31">परंतु पौल रोमन अधिकाऱ्याला व शिपायांना म्हणाला, “हे खलाशी तारवात न राहिले, तर आपले रक्षण व्हावयाचे नाही.”</verse>
				<verse number="32">तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती जाऊ दिली.</verse>
				<verse number="33">दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, “आज चौदा दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात. तुम्ही काही खाल्‍ले नाही.</verse>
				<verse number="34">मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल, तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही.”</verse>
				<verse number="35">असे म्हणून त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला.</verse>
				<verse number="36">मग त्या सर्वाना धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्‍ले.</verse>
				<verse number="37">त्या तारवात आम्ही सर्व मिळून दोनशे शाहत्तर जण होतो.</verse>
				<verse number="38">जेवून तृप्त झाल्यावर तारू हलके करण्यासाठी त्यांनी सर्व गहू फेकून दिला.</verse>
				<verse number="39">दिवस उगवल्यावरही ते स्थळ कोणते, हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा विचार त्यांनी केला.</verse>
				<verse number="40">म्हणून नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले, त्याच वेळेस सुकाणूंची बंधने सैल केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून सपाटीची वाट धरली.</verse>
				<verse number="41">मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले, तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.</verse>
				<verse number="42">बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी मसलत शिपायांनी केली.</verse>
				<verse number="43">तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने रोमन अधिकारी त्यांच्या बेतास आडवा आला आणि त्याने हुकूम दिला, “ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनाऱ्यास जावे.</verse>
				<verse number="44">बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे.” ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनाऱ्यास पोहचले.</verse>
			</chapter>
			<chapter number="28">
				<verse number="1">असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे, असे आम्हांला समजले.</verse>
				<verse number="2">तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.</verse>
				<verse number="3">पौलने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला.</verse>
				<verse number="4">तो साप त्याच्या हाताला लटकलेला पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस खुनी आहे, हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देणार नाही.”</verse>
				<verse number="5">त्याने तर तो साप विस्तवात झटकून टाकला. पौलाला काही इजा झाली नाही.</verse>
				<verse number="6">त्याला सूज येईल अथवा तो एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते, पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही, असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, “हा कोणी देव आहे.”</verse>
				<verse number="7">तिकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे स्वागत करून आदराने आमचा पाहुणचार तीन दिवस केला.</verse>
				<verse number="8">तेव्हा असे झाले की, पुब्ल्यचा बाप तापाने व आंवरक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले.</verse>
				<verse number="9">हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले.</verse>
				<verse number="10">तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही जहाजाने जायला निघालो तेव्हा आमच्या गरजेच्या वस्तू त्यांनी जहाजावर भरल्या.</verse>
				<verse number="11">ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियातील दयस्कुरै (जुळी दैवते) ह्या नावाचे जे तारू हिवाळा घालविण्याकरता त्या बेटाजवळ थांबले होते, त्यात बसून आम्ही निघालो.</verse>
				<verse number="12">सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो.</verse>
				<verse number="13">तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोना ह्या ठिकाणी आलो. दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युल नगरास पोहचलो.</verse>
				<verse number="14">तेथे आम्हांला बंधुजन भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर सात दिवस राहावयाचे आम्हांला आमंत्रण दिले, अशा रितीने आम्ही रोम शहराजवळ आलो.</verse>
				<verse number="15">तेथले बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची बाजारपेठ व तीन उतारशाळा नावाच्या ठिकाणापर्यंत आम्हांला सामोरे आले, त्यांना पाहून पौलने देवाचे आभार मानले, त्याला बराच धीर आला.</verse>
				<verse number="16">आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.</verse>
				<verse number="17">तीन दिवसांनंतर पौलाने यहुदी लोकांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनहो, “मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या चालीरीतींविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेममध्ये बंदिवान करून रोमन लोकांच्या हाती देण्यात आले.</verse>
				<verse number="18">त्यांनी चौकशी केल्यावर मी मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केला नाही, हे कळल्यावर ते मला सोडू पाहत होते,</verse>
				<verse number="19">परंतु यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे कैसरजवळ न्याय मागणे मला भाग पडले, तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप ठेवायचा नाही.</verse>
				<verse number="20">ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर बोलावे म्हणून तुम्हांला बोलावले. इस्राएली लोकांनी ज्याची आशा बाळगली आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साखळीने बांधलेला आहे.”</verse>
				<verse number="21">त्यांनी त्याला म्हटले, “आपल्यासंबंधाने यहुदियातून आम्हांला काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणांविषयी काही प्रतिकूल वृत्तांत आणला नाही अथवा काही सांगितलेही नाही.</verse>
				<verse number="22">तरी आपले विचार काय आहेत, ते आपणांकडून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”</verse>
				<verse number="23">म्हणून त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या मुक्कामी आले. त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण करत होता.</verse>
				<verse number="24">त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="25">त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की,</verse>
				<verse number="26">ह्या लोकांकडे जाऊन सांग की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला आकलन होणार नाही.</verse>
				<verse number="27">कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांचे परिवर्तन होऊ नये आणि मी त्यांना बरे करू नये’.</verse>
				<verse number="28">म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.”</verse>
				<verse number="29">तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले.</verse>
				<verse number="30">पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.</verse>
				<verse number="31">तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="45">
			<chapter number="1">
				<verse number="1">ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून:</verse>
				<verse number="2">हे शुभवर्तमान देवाचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्याविषयी आहे. ह्या शुभवर्तमानाविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांद्वारे पूर्वीच अभिवचन दिले होते.</verse>
				<verse number="3">येशू देहाने दावीदच्या वंशात जन्मला</verse>
				<verse number="4">व दिव्य पावित्र्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा घोषित करण्यात आला.</verse>
				<verse number="5">त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.</verse>
				<verse number="6">ह्या लोकांमध्ये तुमच्या रोममधील श्रद्धावंतांचाही समावेश होतो कारण तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात.</verse>
				<verse number="7">म्हणून रोममधील तुम्हां श्रद्धावंतांना मी लिहीत आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने त्याची प्रजा होण्यासाठी तुम्हांला आमंत्रित केले आहे. त्या तुम्हांला देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती मिळो.</verse>
				<verse number="8">पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.</verse>
				<verse number="9">मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे.</verse>
				<verse number="10">देवाला माहीत आहे की, तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी माझ्या प्रार्थनेमध्ये सर्वदा अशी विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा.</verse>
				<verse number="11">तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे.</verse>
				<verse number="12">म्हणजे मी, तुमच्या व माझ्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांना, मला तुमच्यांकडून व तुम्हांला माझ्याकडून उत्तेजन प्राप्त व्हावे.</verse>
				<verse number="13">बंधुजनहो, इतर यहुदीतरांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली, तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आत्तापर्यंत मला अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही.</verse>
				<verse number="14">सुसंस्कृत आणि असंस्कृत, तसेच सुज्ञ व मूढ अशा सर्व लोकांचा मी ऋणी आहे.</verse>
				<verse number="15">म्हणून रोम शहरात राहणाऱ्या तुम्हांलाही शुभवर्तमान सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.</verse>
				<verse number="16">मला शुभवर्तमानाची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी, म्हणजेच प्रथम यहुदी व नंतर यहुदीतर माणसांसाठीदेखील, ते देवाचे तारणदायक सामर्थ्य आहे.</verse>
				<verse number="17">त्यात परमेश्वर स्वतःबरोबरचे माणसाचे संबंध कसे यथोचित करतो, ते दाखविले आहे. ते सुरुवातीपासून श्रद्धेने होत असते. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’</verse>
				<verse number="18">जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे.</verse>
				<verse number="19">परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, कारण देवाविषयी मिळविता येण्यासारखे ज्ञान त्यांना स्पष्ट दिसून येते; देवाने स्वतः ते त्यांना दाखवून दिले आहे.</verse>
				<verse number="20">सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये!</verse>
				<verse number="21">देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.</verse>
				<verse number="22">स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.</verse>
				<verse number="23">अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली.</verse>
				<verse number="24">ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. असे की, त्यांच्या देहाची त्यांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी.</verse>
				<verse number="25">त्यांनी देवाच्या सत्याची लबाडीबरोबर अदलाबदल केली आणि ज्याचा युगानुयुगे गौरव केला जावा त्या निर्माणकर्त्याऐवजी निर्मित गोष्टींची आराधना व सेवा केली.</verse>
				<verse number="26">ह्या कारणामुळे देवाने त्यांना लज्जास्पद दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनीसुद्धा शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.</verse>
				<verse number="27">तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून पुरुषांनी पुरुषांबरोबर आपसात अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या अनीतीचे योग्य प्रतिफळ स्वतःवर ओढवून घेतले;</verse>
				<verse number="28">कारण ज्याअर्थी देवाचे खरे ज्ञान लक्षात ठेवावयास ते नकार देतात, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले.</verse>
				<verse number="29">सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, द्वेष ह्यांनी ते भरलेले होते व हेवा, खून, कलह, फसवेगिरी व कपटकारस्थान, ह्यांच्या पुरेपूर आहारी गेलेले होते.</verse>
				<verse number="30">ते निंदक, देवाचा तिटकारा करणारे, दुसऱ्यांचा अपमान करणारे, उद्धट, गर्विष्ठ, कुकर्मकल्पक, आईवडिलांची अवज्ञा करणारे,</verse>
				<verse number="31">निर्बुद्ध, निष्ठाहीन, ममताहीन व निर्दय असे झाले.</verse>
				<verse number="32">जे ह्या रीतीने वागतात, ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे, तर त्या करणाऱ्यांना मान्यताही देतात.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">तर मग माझ्या मित्रा, दोष लावणारा तू कोणीही असलास, तरी तुला स्वतःला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.</verse>
				<verse number="2">अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="3">परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?</verse>
				<verse number="4">किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?</verse>
				<verse number="5">परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय?</verse>
				<verse number="6">‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.’</verse>
				<verse number="7">जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.</verse>
				<verse number="8">परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील.</verse>
				<verse number="9"></verse>
				<verse number="10">मात्र सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील.</verse>
				<verse number="11">कारण देव पक्षपाती नाही.</verse>
				<verse number="12">ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले, तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल.</verse>
				<verse number="13">नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात.</verse>
				<verse number="14">ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, असे यहुदीतर जेव्हा नियमशास्त्रात जे आहे, ते स्वभावतः करत असतात तेव्हा, त्यांच्याकडे नियमशास्त्र नसले तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत.</verse>
				<verse number="15">म्हणजे नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे, असे ते दाखवतात, शिवाय त्यांची सदसद्विवेकबुद्धीही साक्ष देते कारण त्यांचे मन त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवते.</verse>
				<verse number="16">मी घोषित करीत असलेल्या शुभवर्तमानानुसार असे होणार आहे. माणसांच्या गुप्त विचारांचा न्याय ज्या दिवशी देव येशू ख्रिस्ताद्वारे करील, त्या दिवशी हे उघड होईल.</verse>
				<verse number="17">आता ज्याअर्थी तू स्वतःला यहुदी म्हणवतोस आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस,</verse>
				<verse number="18">तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस</verse>
				<verse number="19">आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्याचा वाटाड्या, अंधारात असलेल्यांचा प्रकाश,</verse>
				<verse number="20">अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे,</verse>
				<verse number="21">त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?</verse>
				<verse number="22">व्यभिचार करू नये, असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?</verse>
				<verse number="23">नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उ्रंघनाने देवाचा अपमान करतोस काय?</verse>
				<verse number="24">‘तुमच्यामुळे यहुदीतरांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.</verse>
				<verse number="25">जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास, तर सुंतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.</verse>
				<verse number="26">तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार?</verse>
				<verse number="27">आणि तुझ्याकडे धर्मशास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील.</verse>
				<verse number="28">जो बाह्यस्वरूपाने यहुदी तो खरा यहुदी नव्हे आणि बाह्यस्वरूपाची सुंता ही खरी सुंता नव्हे.</verse>
				<verse number="29">किंबहुना जो अंतरी यहुदी तो खरा यहुदी होय. अंतःकरणाची सुंता ही खरी सुंता होय. अशी सुंता लेखी नियमशास्त्रानुसार नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे होत असते. अशा व्यक्तीची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">तर मग यहुदी असण्यात लाभ तो काय? अथवा सुंतेचे महत्त्व ते काय?</verse>
				<verse number="2">सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती.</verse>
				<verse number="3">काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?</verse>
				<verse number="4">कधीच नाही! प्रत्येक मनुष्य जरी खोटा ठरला तरीही देव खरा ठरेल! धर्मशास्त्रातही लिहिलेले आहे: तू आपल्या शद्बांत नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.</verse>
				<verse number="5">पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापन केले जाते, तर ह्याला आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहारानुसार बोलत आहे.)</verse>
				<verse number="6">कधीच नाही! असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करू शकेल?</verse>
				<verse number="7">परंतु माझ्या असत्यावरून देवाची सत्यता त्याच्या गौरवासाठी समृद्ध होत असल्याचे दिसून आले, तर एखाद्या पापी माणसाप्रमाणे मला शिक्षेस पात्र का ठरविण्यात यावे?</verse>
				<verse number="8">बरे ते घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो, असा कित्येक लोक आमच्यांवर निंदाजनक आरोप करतात. अशा लोकांना दोषी ठरविण्यात येईल व ते यथायोग्यच असेल.</verse>
				<verse number="9">तर मग काय? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहुदी व यहुदीतर हे सर्व पापाच्या प्रभावाखाली आले आहेत, हे मी अगोदरच दाखवून दिले आहे.</verse>
				<verse number="10">धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही.</verse>
				<verse number="11">सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही.</verse>
				<verse number="12">सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.</verse>
				<verse number="13">त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत, त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात. त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे.</verse>
				<verse number="14">त्यांचे तोंड शापाने व कटुतेने भरलेले आहे.</verse>
				<verse number="15">त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झाले आहेत.</verse>
				<verse number="16">विध्वंस व विपत्ती हा त्यांचा मार्ग आहे.</verse>
				<verse number="17">शांतीचा मार्ग त्यांनी ओळखून घेतला नाही.</verse>
				<verse number="18">देवाचे भय त्यांना ठाऊक नाही.</verse>
				<verse number="19">आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.</verse>
				<verse number="20">नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.</verse>
				<verse number="21">मात्र आता पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करण्याची देवाची पद्धत नियमशास्त्राविना अमलात आणली जात आहे आणि तिला नियमशास्त्राचा व संदेष्ट्यांचा दुजोरा आहे.</verse>
				<verse number="22">ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही,</verse>
				<verse number="23">कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत.</verse>
				<verse number="24">देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत.</verse>
				<verse number="25">त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.</verse>
				<verse number="26"></verse>
				<verse number="27">तर मग फुशारकीचे काय? तिला तर मुळीच वाव नाही. कोणत्या नियमाने? कृत्यांनी काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने.</verse>
				<verse number="28">कारण नियमशास्त्रातील कृत्यांवाचून मनुष्य विश्वासाने देवाबरोबरचे आपले संबंध यथोचित करू शकतो, असे आपण मानतो.</verse>
				<verse number="29">किंवा देव केवळ यहुदी लोकांचा आहे काय? तो यहुदीतरांचाही नव्हे काय? हो, आहे.</verse>
				<verse number="30">देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व सुंता न झालेल्यांना तशाच विश्वासाद्वारे नीतिमान ठरवील, तर तो यहुदीतरांचाही देव आहे.</verse>
				<verse number="31">तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्र रद्दबातल करतो काय? कधीच नाही! उलट आपण नियमशास्त्र उचलून धरतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने ऐहिक दृष्टीने काय कमावले असे म्हणावे?</verse>
				<verse number="2">अब्राहाम कृत्यांनी नीतिमान ठरला असला, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. परंतु देवासमोर नाही.</verse>
				<verse number="3">धर्मशास्त्र काय सांगते? ‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान असे गणण्यात आले’.</verse>
				<verse number="4">आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते.</verse>
				<verse number="5">अधार्मिकाला नीतिमान ठरवणाऱ्या देवावर जो विश्वास ठेवतो पण सकृत्ये करीत नाही, त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान गणण्यात येते.</verse>
				<verse number="6">ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो,</verse>
				<verse number="7">ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य!</verse>
				<verse number="8">ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!</verse>
				<verse number="9">तर मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरिता घोषित करण्यात आलेला आहे किंवा सुंता न झालेल्यांकरिताही आहे? आम्ही असे म्हणतो, “विश्वास हा अब्राहामसाठी नीतिमत्व असा गणण्यात आला होता”.</verse>
				<verse number="10">हे कधी झाले? त्याची सुंता झालेली असताना किंवा नसताना? सुंता झालेली असताना नव्हे, तर सुंता न झालेली असताना.</verse>
				<verse number="11">त्याला त्याच्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण त्याला मिळाली. म्हणून, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने पूर्वज व्हावे.</verse>
				<verse number="12">आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही पूर्वज व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पूर्वज अब्राहाम त्याची सुंता होण्यापूर्वी त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून ते चालतात म्हणून त्यांचाही त्याने बाप व्हावे.</verse>
				<verse number="13">तो जगाचा वारस होईल, हे अभिवचन अब्राहामला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासामुळे प्राप्त झाले.</verse>
				<verse number="14">नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास फोल ठरला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे.</verse>
				<verse number="15">कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही, तेथे उ्रंघन नाही.</verse>
				<verse number="16">ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे.</verse>
				<verse number="17">‘मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे’, असे अब्राहामविषयी धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे, त्याप्रमाणे तो देवासमक्ष आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याने जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करून अस्तित्वात आणतो, अशा देवावर विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="18">‘आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती होईल’, ह्या धर्मशास्त्रवचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही विश्वास ठेवला.</verse>
				<verse number="19">आपल्या शरीराची वयोवृद्ध अवस्था (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाची अक्षमता ह्या गोष्टी लक्षात घेऊनही तो विश्वासात दुर्बल झाला नाही.</verse>
				<verse number="20">परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने दृढ होऊन त्याने देवाचा गौरव केला.</verse>
				<verse number="21">देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती.</verse>
				<verse number="22">म्हणूनच ‘ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.’</verse>
				<verse number="23">‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे,</verse>
				<verse number="24">तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीदेखील ते लिहिलेले आहे, त्या आपणासाठीसुद्धा ते नीतिमत्व म्हणून गणले जाणार आहे.</verse>
				<verse number="25">तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती मिळालेली आहे.</verse>
				<verse number="2">आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्या कृपेत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या वैभवात सहभागी होण्याची आशा बाळगतो.</verse>
				<verse number="3">इतकेच नव्हे, तर संकटाचाही आपण अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,</verse>
				<verse number="4">धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते.</verse>
				<verse number="5">ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.</verse>
				<verse number="6">आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला.</verse>
				<verse number="7">नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील.</verse>
				<verse number="8">परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाही ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.</verse>
				<verse number="9">तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण किती अधिक प्रमाणात त्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत!.</verse>
				<verse number="10">आपण शत्रू असता देवाबरोवर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता, त्याच्या जीवनाने आपण किती अधिक प्रमाणात तारले जाणार आहोत!.</verse>
				<verse number="11">इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवामध्ये अभिमान बाळगतो.</verse>
				<verse number="12">एका माणसाद्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.</verse>
				<verse number="13">नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होते, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही.</verse>
				<verse number="14">तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उ्रंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही मरणाने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.</verse>
				<verse number="15">परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता फारच अधिक प्रमाणात विपुल झाली</verse>
				<verse number="16">आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. परंतु कृपादानामुळे सर्व निर्दोषी ठरवले जातात.</verse>
				<verse number="17">जर त्या एकाच माणसाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेच्या व नीतिमत्त्वाच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते कितीतरी अधिक प्रमाणात येशू ख्रिस्त या एका माणसाद्वारे जीवनात राज्य करतील.</verse>
				<verse number="18">तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे एका माणसाच्या नीतिमत्त्वाच्या कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.</verse>
				<verse number="19">जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे एका माणसाच्या आज्ञापालनाद्वारे पुष्कळ जण नीतिमान ठरविले जातील.</verse>
				<verse number="20">नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली.</verse>
				<verse number="21">तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?</verse>
				<verse number="2">मुळीच नाही! जे आपण पापाला मेलो ते ह्यापुढे त्यात कसे राहणार?</verse>
				<verse number="3">किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?</verse>
				<verse number="4">तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही उठून नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.</verse>
				<verse number="5">कारण आपण जर त्याच्या अशा मरणात त्याच्याशी जोडले गेलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानानेही निश्चितपणे त्याच्याशी जोडले जाऊ.</verse>
				<verse number="6">हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाची गुलामी पत्करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला;</verse>
				<verse number="7">कारण जो कोणी मरण पावतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरतो.</verse>
				<verse number="8">परंतु ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यामुळे त्याच्याबरोबर आपण जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे.</verse>
				<verse number="9">आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही</verse>
				<verse number="10">आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो.</verse>
				<verse number="11">तर मग तसे तुम्हीही स्वतःस ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना.</verse>
				<verse number="12">म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये.</verse>
				<verse number="13">तुम्ही यापुढे तुमचे अवयव दुष्टपणाची साधने म्हणून वापरू नका, परंतु तुमचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून देवाला अर्पण करा कारण तुम्हाला मरणातून जीवनाकडे आणण्यात आले आहे.</verse>
				<verse number="14">तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये.</verse>
				<verse number="15">तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही!</verse>
				<verse number="16">ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात,हे तुम्हांला ठाऊक नाही काय? ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात?</verse>
				<verse number="17">तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले</verse>
				<verse number="18">आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद!</verse>
				<verse number="19">तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जसे तुम्ही आपले अवयव अमंगळपण व स्वैराचार करण्याकरिता वापरले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला गुलाम म्हणून समर्पित करा.</verse>
				<verse number="20">तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वासंबंधाने बंधमुक्त होता.</verse>
				<verse number="21">तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त झाले? त्यांचा शेवट तर मरण आहे!</verse>
				<verse number="22">परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते.</verse>
				<verse number="23">पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">बंधुजनहो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यतच नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?</verse>
				<verse number="2">पती जिवंत आहे, तोपर्यत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते. पण पती मरण पावल्यावर तिची पतीच्या बंधनातून सुटका होते.</verse>
				<verse number="3">म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली, तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती कायद्याने त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असता व्यभिचारिणी होत नाही.</verse>
				<verse number="4">त्याप्रमाणे, बंधुजनहो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात, अशासाठी की, तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला, त्याचे व्हावे आणि देवाच्या सेवेत उपयुक्त ठरावे.</verse>
				<verse number="5">आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राद्वारे चेतविलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाचे फळ देण्यासाठी कार्य करत होत्या.</verse>
				<verse number="6">पण आता ज्याने आपण बद्ध होतो, त्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या धर्मशास्त्रलेखास धरून नव्हे तर पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या नवजीवनाने आपण सेवा करतो.</verse>
				<verse number="7">तर मग नियमशास्त्र म्हणजेच पाप असे आपण म्हणावे काय? मुळीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको, असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते.</verse>
				<verse number="8">परंतु पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्यायोगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे.</verse>
				<verse number="9">पूर्वी मी नियमशास्त्राविरहित जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो.</verse>
				<verse number="10">ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले.</verse>
				<verse number="11">कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले.</verse>
				<verse number="12">तर मग नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, न्याय्य व चांगली आहे.</verse>
				<verse number="13">म्हणजे जे चांगले आहे, त्याने मला मरण आणले काय? कदापि नाही! हे पापाने केले. पाप ते पापच दिसावे, म्हणून जे चांगले आहे, त्याच्या योगे पाप माझ्या मध्ये मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पापाचे खरे स्वरूप प्रकट व्हावे म्हणून असे झाले.</verse>
				<verse number="14">आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी मात्र मर्त्य मानव असून पापाला गुलाम म्हणून विकलेला आहे,</verse>
				<verse number="15">मी काय करतो, ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर ज्याचा मला द्वेष वाटतो ते करतो.</verse>
				<verse number="16">जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.</verse>
				<verse number="17">तर आता ह्यापुढे ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.</verse>
				<verse number="18">मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.</verse>
				<verse number="19">कारण जे चांगले करावेसे मला वाटते, ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही, असे जे वाईट, ते मी करतो.</verse>
				<verse number="20">आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.</verse>
				<verse number="21">सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो.</verse>
				<verse number="22">माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो.</verse>
				<verse number="23">परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.</verse>
				<verse number="24">किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?</verse>
				<verse number="25">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही.</verse>
				<verse number="2">कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.</verse>
				<verse number="3">देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली.</verse>
				<verse number="4">ह्यांत उद्देश हा की, जे आपण देहानुसार नव्हे तर पवित्र आत्म्यानुसार चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे.</verse>
				<verse number="5">जे देहानुसार आहेत, ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे पवित्र आत्म्यानुसार चालतात, ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात.</verse>
				<verse number="6">दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे.</verse>
				<verse number="7">देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही.</verse>
				<verse number="8">जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.</verse>
				<verse number="9">मात्र तुमच्यामध्ये देवाचा आत्मा जर वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही; आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही.</verse>
				<verse number="10">परंतु ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर पापामुळे शरीर जरी मेलेले असले, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे.</verse>
				<verse number="11">ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या त्याच्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.</verse>
				<verse number="12">तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, पण देहस्वभावाप्रमाणे जगावयाला आपण देहस्वभावाचे ऋणी नाहीत.</verse>
				<verse number="13">जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कृत्ये ठार मारलीत तर जगाल.</verse>
				<verse number="14">जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनुसार चालतात ते देवाचे पुत्र आहेत.</verse>
				<verse number="15">भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्यायोगे आपण “अब्बा, बापा!” अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.</verse>
				<verse number="16">तो आत्मा आपल्या आत्म्याबरोबर स्वतः साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत</verse>
				<verse number="17">आणि जर मुले तर वारस, म्हणजे देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर संयुक्त वारस आहोत; कारण आपण जर ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी झालो तर आपल्याला त्याच्या वैभवातदेखील सहभाग मिळेल.</verse>
				<verse number="18">आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो.</verse>
				<verse number="19">सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.</verse>
				<verse number="20">सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे.</verse>
				<verse number="21">सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवशाली मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.</verse>
				<verse number="22">आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे.</verse>
				<verse number="23">इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तक होण्याची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता, आपल्यामध्ये कण्हत आहोत.</verse>
				<verse number="24">आशेने आपले तारण झाले आहे. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील?</verse>
				<verse number="25">पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.</verse>
				<verse number="26">तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, हे आपल्याला ठाऊक नसते. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.</verse>
				<verse number="27">अंतर्याम पारखणाऱ्या देवाला त्या आत्म्याचा हेतू काय, हे ठाऊक आहे. पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो.</verse>
				<verse number="28">आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना देवाच्या कृतीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात;</verse>
				<verse number="29">कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले आहे.</verse>
				<verse number="30">त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.</verse>
				<verse number="31">तर मग ह्या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?</verse>
				<verse number="32">ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही देणार नाही काय?</verse>
				<verse number="33">देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.</verse>
				<verse number="34">तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे.</verse>
				<verse number="35">तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय?</verse>
				<verse number="36">धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते.</verse>
				<verse number="37">उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो!</verse>
				<verse number="38">कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, बले, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी,</verse>
				<verse number="39">उंची किंवा खोली, इतर कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की,</verse>
				<verse number="2">मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात.</verse>
				<verse number="3">कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे, हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.</verse>
				<verse number="4">ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी वैभव, करारमदार, नियमशास्त्र, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत.</verse>
				<verse number="5">महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून युगानुयुगे धन्य असा देव आहे. आमेन.</verse>
				<verse number="6">देवाचे वचन व्यर्थ झाले, असे मी म्हणत नाही, इस्राएल वंशांतले ते सर्व इस्राएली आहेत, असे नाही.</verse>
				<verse number="7">ते अब्राहामचे पुत्र आहेत म्हणून ती सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकच्याच वंशाला तुझे पुत्र मानले जाईल.</verse>
				<verse number="8">म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात;</verse>
				<verse number="9">कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.</verse>
				<verse number="10">इतकेच नव्हे, तर रिबकादेखील आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिली व तिच्या दोन मुलांविषयी</verse>
				<verse number="11">त्यांनी काही बरे-वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे जो कृत्यामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेनुसार होता, तो पूर्ण व्हावा</verse>
				<verse number="12">म्हणून तिला सांगण्यात आले की, मोठा मुलगा धाकट्याची सेवा करील.</verse>
				<verse number="13">त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, ‘मी याकोबवर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला.’</verse>
				<verse number="14">तर आपण काय म्हणावे? देवाकडून अन्याय होतो काय? मुळीच नाही!</verse>
				<verse number="15">कारण तो मोशेला म्हणतो, ‘ज्या कोणावर मला दया करावयाची आहे, त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करू इच्छितो त्याच्यावर मी करुणा करीन.’</verse>
				<verse number="16">ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे.</verse>
				<verse number="17">धर्मशास्त्रलेख इजिप्तच्या राजाला असे सांगतो, ‘मी तुला राजा केले आहे ते ह्यासाठी की, तुझ्याद्वारे मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.’</verse>
				<verse number="18">ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो.</verse>
				<verse number="19">ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?”</verse>
				<verse number="20">हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय?</verse>
				<verse number="21">किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय?</verse>
				<verse number="22">आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले</verse>
				<verse number="23">आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय?</verse>
				<verse number="24"></verse>
				<verse number="25">होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो: जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि जे राष्ट्र प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेन</verse>
				<verse number="26">आणि असे होईल की, तुम्ही माझे लोक नाही, असे जेथे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल.</verse>
				<verse number="27">यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो: जरी इस्राएली लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल;</verse>
				<verse number="28">कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील.</verse>
				<verse number="29">हे यशयाने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आहे: जर सेनाधीश प्रभूने आमच्यांसाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोम नगरासारखे झालो असतो व आमची अवस्था गमोर नगराप्रमाणे झाली असती.</verse>
				<verse number="30">तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.</verse>
				<verse number="31">परंतु इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या नियमशास्त्रामागे लागले होते तरी ते त्या नियमशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत.</verse>
				<verse number="32">का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले.</verse>
				<verse number="33">त्याप्रमाणे धर्मशास्त्रात लिहिले आहे: पाहा, सीयोनमध्ये मी अडथळ्याचा धोंडा, अडखळण्याचा खडक ठेवतो, लोक त्यावर पडतील. परंतु त्याच्यावर जो विश्वास ठेवील, तो फजित होणार नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">बंधुजनहो, माझ्या इस्राएली लोकांचे तारण व्हावे ही माझी मनीषा व देवाजवळ विनंती आहे.</verse>
				<verse number="2">मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.</verse>
				<verse number="3">त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापन करू पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही;</verse>
				<verse number="4">कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्ताने नियमशास्त्राची परिपूर्ती केली आहे.</verse>
				<verse number="5">मोशे नीतिमत्वाविषयी असे लिहितो, ‘जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरणात आणतो, तो त्यामुळे वाचेल.’</verse>
				<verse number="6">परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, ‘तू आपल्या मनात म्हणू नकोस की, ख्रिस्ताला खाली आणायला उर्ध्वलोकी कोण चढेल</verse>
				<verse number="7">किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणायला अधोलोकी कोण उतरेल?’.</verse>
				<verse number="8">तर ते नीतिमत्व काय म्हणते? ‘देवाचा शद्ब तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,’ आमच्या विश्वासाचा विषय असलेला तो शद्ब आम्ही जगजाहीर करीत आहोत, तो हाच,</verse>
				<verse number="9">कारण येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल.</verse>
				<verse number="10">जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो, तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो, त्याचे तारण होते;</verse>
				<verse number="11">कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही.’</verse>
				<verse number="12">यहुदी व ग्रीक ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात, त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे.</verse>
				<verse number="13">‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल.’</verse>
				<verse number="14">मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील?</verse>
				<verse number="15">घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे.</verse>
				<verse number="16">तथापि शुभवर्तमान सर्वांनी स्वीकारले आहे असे नाही. यशया म्हणतो, ‘प्रभो, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?’</verse>
				<verse number="17">ह्याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शद्बाद्वारे प्राप्त होतो.</verse>
				<verse number="18">पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते; कारण धर्मशास्त्रात म्हटले आहे: त्यांची वाणी सर्व पृथ्वीवर व त्यांचे शद्ब दिगंतरी पोहोचले.</verse>
				<verse number="19">पुन्हा मी विचारतो की, इस्राएलला कळले नव्हते काय? मोशे प्रथम उत्तर देतो: मी तथाकथित राष्ट्रायोगे तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्रायोगे मी तुम्हांला चीड आणीन.</verse>
				<verse number="20">यशया तर धिटाईने म्हणतो: ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो, जे माझ्याविषयी विचारत नव्हते त्यांना मी प्रकट झालो.</verse>
				<verse number="21">पण इस्राएलविषयी तो म्हणतो: आज्ञा मोडणाऱ्या व विरोध करणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी मी सारा दिवस माझे हात पुढे केले आहेत.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? मुळीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे.</verse>
				<verse number="2">ज्यांची त्याने सुरुवातीपासून निवड केली, त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत धर्मशास्त्र काय म्हणते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली:</verse>
				<verse number="3">‘हे प्रभो, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या. मी एकटाच राहिलो आहे, ते माझा प्राण घ्यायचा प्रयत्न करीत आहेत.’</verse>
				<verse number="4">परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ‘ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.’</verse>
				<verse number="5">तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे</verse>
				<verse number="6">आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही.</verse>
				<verse number="7">तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले.</verse>
				<verse number="8">धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे: देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले. आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत.</verse>
				<verse number="9">दावीददेखील म्हणतो: त्यांचे सण त्यांना फास व सापळा, अडखळण व शिक्षा असे होवोत.</verse>
				<verse number="10">त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत आणि तू त्यांना नेहमी वाकव.</verse>
				<verse number="11">तर मी विचारतो, यहुदी लोकांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? मुळीच नाही! तर त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधामुळे यहुदीतरांचे तारण झाले आहे.</verse>
				<verse number="12">आता त्यांचा अपराध हा जर जगासाठी आशीर्वाद आणि त्यांचा ऱ्हास हा जर यहुदीतरांसाठी आशीर्वाद ठरला आहे, तर त्या सर्वांचा समावेश झाल्यास तो आशीर्वाद किती तरी अधिक महान होईल!</verse>
				<verse number="13">यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो.</verse>
				<verse number="14">ह्यात माझा उद्देश असा आहे की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करावी व त्यांच्यांतील काहींना तारावे.</verse>
				<verse number="15">त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार आहे!</verse>
				<verse number="16">पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र.</verse>
				<verse number="17">अस्सल अशा ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू जंगली ऑलिव्ह झाडाच्या फांदीसारखा असता त्यांच्या जागी कलमरूपे जर लावला गेलास व अस्सल अशा कसदार ऑलिव्ह वृक्षाच्या मुळाचा भागीदार झालास,</verse>
				<verse number="18">तर ‘त्या फांद्यांहून मी मोठा आहे,’ अशी बढाई मारू नकोस. मारशील, तर हे लक्षात ठेव की, तू केवळ एक फांदी आहेस, तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.</verse>
				<verse number="19">परंतु तू म्हणशील, ‘माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.’</verse>
				<verse number="20">ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा.</verse>
				<verse number="21">जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुझा बचाव करील काय?</verse>
				<verse number="22">देवाची ममता व कठोरता पाहा, पतन झालेल्यांविषयी कठोरपणा आणि तुझ्यासाठी त्याची ममता. मात्र तू त्याच्या ममतेत राहशील तर, अन्यथा तूही छाटून टाकला जाशील.</verse>
				<verse number="23">तसेच ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम करण्यास देव समर्थ आहे.</verse>
				<verse number="24">जे मूळचे जंगली ऑलिव्ह झाड त्यांतून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून अस्सल ऑलिव्ह वृक्षात करण्यात आले. तर ह्या ज्या मूळच्या त्याच्याच फांद्या आहेत, त्यांचे कलम त्या अस्सल ऑलिव्ह वृक्षात किती सहजतेने करण्यात येईल?</verse>
				<verse number="25">बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, यहुदीतरांचा भरणा पूर्ण होईपर्यंत इस्राएली लोक तात्पुरते दुराग्रहाने श्रद्धेपासून दुरावले आहेत.</verse>
				<verse number="26">परंतु पुढे सर्व इस्त्राएली लोकांचे तारण होईल, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे: मुक्तिदाता सियोनमधून येईल, तो याकोबच्या वंशजांमधून सर्व दुष्टपणा दूर करील.</verse>
				<verse number="27">मी त्यांची पापे दूर करतो, तेव्हा त्यांच्याबरोबरचा माझा हा करार आहे.</verse>
				<verse number="28">शुभवर्तमानाचा स्वीकार न केल्यामुळे तुमच्यासाठी ते शत्रू आहेत. परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे ते देवाचे प्रियजन आहेत.</verse>
				<verse number="29">देवाला पस्तावा होत नाही आणि तो कृपादान व पाचारण काढून परत घेत नाही.</verse>
				<verse number="30">पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे.</verse>
				<verse number="31">त्याप्रमाणे तुमच्यावरील दयेमुळे त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे.</verse>
				<verse number="32">त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कैदेत ठेवले आहे.</verse>
				<verse number="33">अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!</verse>
				<verse number="34">धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? त्याचा स्रागार कोण झाला आहे?</verse>
				<verse number="35">त्याला प्रथम देऊन त्याच्याकडून फेड करून घेईल असा कोण आहे?</verse>
				<verse number="36">कारण सर्व काही त्याच्याकडून, त्याच्याचद्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ निर्माण करण्यात आले आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">बंधुजनहो, मी देवाच्या महान करुणेमुळे तुम्हांला आवाहन करतो की, तुम्ही आपली शरीरे सजीव, पवित्र व ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावीत, ही खरी उपासना आहे.</verse>
				<verse number="2">देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.</verse>
				<verse number="3">मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा.</verse>
				<verse number="4">जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत व त्या सर्व अवयवांची कामे निरनिराळी आहेत,</verse>
				<verse number="5">तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.</verse>
				<verse number="6">आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेनुसार आपल्याला विविध कृपादाने मिळाली आहेत. आपल्या विश्वासाच्या प्रमाणात संदेश देणाऱ्याने संदेश देण्यात,</verse>
				<verse number="7">सेवा करणाऱ्याने सेवा करण्यात, शिक्षण देणाऱ्याने शिक्षण देण्यात,</verse>
				<verse number="8">बोध करणाऱ्याने बोध करण्यात ही कृपादाने वापरावीत. देणाऱ्याने औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम दक्षतेने करावे व दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी.</verse>
				<verse number="9">प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा.</verse>
				<verse number="10">बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना,</verse>
				<verse number="11">श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा.</verse>
				<verse number="12">आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा.</verse>
				<verse number="13">पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.</verse>
				<verse number="14">तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका.</verse>
				<verse number="15">आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.</verse>
				<verse number="16">परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका.</verse>
				<verse number="17">वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा.</verse>
				<verse number="18">सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.</verse>
				<verse number="19">प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा धर्मशास्त्रलेख आहे: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, असे प्रभू म्हणतो.</verse>
				<verse number="20">उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील.</verse>
				<verse number="21">वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर चांगुलपणाने वाइटाला जिंक.</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत, ते देवाने नेमलेले आहेत.</verse>
				<verse number="2">म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेच्या आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील.</verse>
				<verse number="3">चांगल्या वागणुकीसाठी अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर गैरवागणुकीसाठी असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुला मान्यता मिळेल.</verse>
				<verse number="4">तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो अधिकार व्यर्थ धारण करत नाही तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्यांना शिक्षा करणारा असा तो देवाचा सेवक आहे.</verse>
				<verse number="5">शिक्षा करील म्हणून नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहणे अगत्याचे आहे.</verse>
				<verse number="6">म्हणूनच तर तुम्ही करही देता कारण जेव्हा अधिकारी सेवेत तत्पर असतात, तेव्हा ते देवाची सेवा करीत असतात.</verse>
				<verse number="7">ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.</verse>
				<verse number="8">एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. जो दुसऱ्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.</verse>
				<verse number="9">व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात सामावलेला आहे.</verse>
				<verse number="10">प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.</verse>
				<verse number="11">समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे.</verse>
				<verse number="12">रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.</verse>
				<verse number="13">दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत.</verse>
				<verse number="14">परंतु तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शस्रसामग्री धारण करा आणि देहवासना तृप्त करण्याची तरतूद करू नका.</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका.</verse>
				<verse number="2">एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बल शाकाहारी अन्न खातो.</verse>
				<verse number="3">जो सर्व काही खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये कारण देवाने त्याला जवळ केले आहे.</verse>
				<verse number="4">दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.</verse>
				<verse number="5">कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसांपेक्षा अधिक श्रेयस्कर मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी.</verse>
				<verse number="6">जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो; जो खातो तो प्रभूकरता खातो कारण तो देवाचे आभार मानतो आणि जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानतो.</verse>
				<verse number="7">आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही.</verse>
				<verse number="8">जर आपण जगतो, तर प्रभूकरता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.</verse>
				<verse number="9">ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे.</verse>
				<verse number="10">तर मग केवळ शाकाहार करणारा तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा सर्व काही खाणारा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.</verse>
				<verse number="11">धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: प्रभू म्हणतो, ‘ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघे टेकील व प्रत्येक जीभ मी देव आहे, हे कबूल करील.’</verse>
				<verse number="12">तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे.</verse>
				<verse number="13">म्हणून आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण होईल असे काही ठेवू नये.</verse>
				<verse number="14">मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही.</verse>
				<verse number="15">अन्नामुळे तुझ्या भावाला दुखवले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस.</verse>
				<verse number="16">तुम्हांला जे चांगले मिळाले आहे, त्याची निंदा होऊ देऊ नका;</verse>
				<verse number="17">कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे</verse>
				<verse number="18">आणि अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो, तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.</verse>
				<verse number="19">तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावयास हवे.</verse>
				<verse number="20">अन्नाकरता देवाचे कार्य नष्ट करू नकोस. सर्व प्रकारचे अन्न खाता येईल परंतु जो माणूस दुसऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा रीतीने खातो, तो चूक करतो.</verse>
				<verse number="21">मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे आणि ज्यामुळे तुझा भाऊ अडखळतो ते न करणे हे चांगले.</verse>
				<verse number="22">ह्या बाबतीत तुझ्यामध्ये जो विश्वास आहे, तो तू देवासमक्ष स्वत:साठी ठेव. आपणाला जे काही योग्य वाटते ते केल्यामुळे त्याविषयी ज्याच्या मनात दोषभावना निर्माण होत नाही तो धन्य!</verse>
				<verse number="23">पण शंका असूनही जो खातो तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाच्या आधारे होत नाही आणि जे काही विश्वासाच्या आधारे होत नाही, ते पाप आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.</verse>
				<verse number="2">आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.</verse>
				<verse number="3">ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.</verse>
				<verse number="4">जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी.</verse>
				<verse number="5">धीर व उत्तेजन देणारा देव ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे म्हणून तुम्हांला सक्षम करो.</verse>
				<verse number="6">त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा.</verse>
				<verse number="7">जसा ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा देवाच्या गौरवाकरिता स्वीकार करा;</verse>
				<verse number="8">कारण मी तुम्हांला सांगतो, परमेश्वर एकनिष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी व पूर्वजांस दिलेली अभिवचने पूर्ण करण्यासाठी ख्रिस्त यहुदी लोकांचा सेवक झाला.</verse>
				<verse number="9">तसेच यहुदीतरांनीदेखील देवाच्या दयेबद्दल त्याचा गौरव करावा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: यहुदीतरांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.</verse>
				<verse number="10">यहुदीतरांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा! धर्मशास्त्रात असे पुन्हा म्हटले आहे:</verse>
				<verse number="11">सर्व यहुदीतरांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याचे स्तवन करोत, धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे:</verse>
				<verse number="12">आणखी यशया पुन्हा म्हणतो, ‘इशायाचा वंशज उदयास येईल, तो यहुदीतरांवर अधिकार चालविण्याकरिता येईल, यहुदीतर त्याची आशा बाळगतील.’</verse>
				<verse number="13">आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.</verse>
				<verse number="14">बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खातरी झाली आहे.</verse>
				<verse number="15">परंतु मला देवापासून प्राप्त झालेल्या संधीमुळे मी तुम्हांला आठवण देऊन काहीशा धैर्याने लिहिले आहे.</verse>
				<verse number="16">ती संधी अशी की, मी यहुदीतरांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. देवाचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी एखाद्या याजकाप्रमाणे मी सेवा करतो अशासाठी की, यहुदीतरांनी पवित्र आत्म्याने पवित्र होऊन आपणास समर्पित करावे.</verse>
				<verse number="17">म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो.</verse>
				<verse number="18">यहुदीतरांनी आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साहाय्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले, ते ते तुम्हांला सांगण्याचे धाडस मी करतो. अशा प्रकारे यरुशलेमपासून इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पूर्णपणे घोषित केले आहे.</verse>
				<verse number="19"></verse>
				<verse number="20">दुसऱ्यांनी घातलेल्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नव्हे, तर</verse>
				<verse number="21">त्याच्याविषयी ज्या लोकांना कोणी सांगितले नाही ते पाहतील, ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले नाही ते समजतील, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे शुभवर्तमान सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती.</verse>
				<verse number="22">ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला.</verse>
				<verse number="23">परंतु आता ह्या प्रांतात माझे कार्य संपले असल्यामुळे आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा असल्यामुळे,</verse>
				<verse number="24">मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन. तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने मन काहीसे तृप्त झाल्यावर तुम्ही मला तिथे जायला साहाय्य कराल, अशी मी आशा धरतो.</verse>
				<verse number="25">सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे;</verse>
				<verse number="26">कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे.</verse>
				<verse number="27">हा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. परंतु वस्तुतः त्यांना मदत करणे त्यांचे कर्तव्य होते; कारण जर यहुदीतर त्यांच्या आध्यात्मिक आशीर्वादात सहभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्याचे बंधन त्यांच्यावर आहे.</verse>
				<verse number="28">हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन.</verse>
				<verse number="29">जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="30">बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की, माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर कळकळीने प्रार्थना करा.</verse>
				<verse number="31">ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे.</verse>
				<verse number="32">म्हणजे मी परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्या सहवासात ताजातवाना होईन.</verse>
				<verse number="33">शांतिदाता परमेश्वर तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">किंख्रियामधील ख्रिस्तमंडळीची दीक्षित सेविका, आपली बहीण फीबी हिची मी तुमच्याकडे शिफारस करतो.</verse>
				<verse number="2">तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल, त्या त्या कामात तिला साहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांना व मलाही साहाय्य करत आली आहे.</verse>
				<verse number="3">ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना शुभेच्छा द्या.</verse>
				<verse number="4">त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला, त्यांचे आभार केवळ मीच मानतो, असे नव्हे तर यहुदीतरांच्या सर्व ख्रिस्तमंडळ्याही मानतात.</verse>
				<verse number="5">जी ख्रिस्तमंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही माझा नमस्कार कळवा. माझा प्रिय अपैनत ह्याला शुभेच्छा. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे.</verse>
				<verse number="6">मरियेला शुभेच्छा, तिने तुमच्यामध्ये फार श्रम केले आहेत.</verse>
				<verse number="7">माझे नातेवाईक व सोबतीचे तुरुंगवासी अंद्रोनीक व युनिया ह्यांना शुभेच्छा कळवा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते.</verse>
				<verse number="8">प्रभूवरील निष्ठेने माझा प्रिय आंप्‍लियात ह्याला शुभेच्छा.</verse>
				<verse number="9">ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना शुभेच्छा.</verse>
				<verse number="10">ख्रिस्तामध्ये निष्ठावंत ठरलेला अपिल्लेस ह्याला शुभेच्छा. अरिस्तबूलच्या कुटुंबीयांना शुभेच्छा.</verse>
				<verse number="11">माझा यहुदी बंधू हेरोदियोन ह्याला शुभेच्छा. नार्किसाच्या कुटुंबातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना शुभेच्छा कळवा.</verse>
				<verse number="12">प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना शुभेच्छा सांगा. प्रिय पर्सिस हिला शुभेच्छा द्या. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत.</verse>
				<verse number="13">प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान असलेल्या त्याच्या आईलाही शुभेच्छा कळवा.</verse>
				<verse number="14">असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास व हर्मास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे ख्रिस्ती बंधू आहेत त्यांना शुभेच्छा.</verse>
				<verse number="15">फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना शुभेच्छा कळवा.</verse>
				<verse number="16">बंधुभावपूर्वक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या. सर्व ख्रिस्तमंडळ्या तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.</verse>
				<verse number="17">आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;</verse>
				<verse number="18">कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.</verse>
				<verse number="19">शुभवर्तमानावरील तुमच्या निष्ठेविषयी सर्वांना माहीत झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही सुज्ञ असावे आणि वाइटाविषयी निष्कपट असावे, अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="20">शांतिदाता देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.</verse>
				<verse number="21">माझा सहकारी तीमथ्य व माझे यहुदी बंधू लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला शुभेच्छा देतात.</verse>
				<verse number="22">हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये शुभेच्छा पाठवतो.</verse>
				<verse number="23">माझे व ख्रिस्तमंडळीतील सर्वांचे आतिथ्य करणारा गायस ह्याच्या तुम्हांला शुभेच्छा. नगराचा खजिनदार एरास्त व आमचा बंधू क्‍वर्त हे तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.</verse>
				<verse number="24">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.</verse>
				<verse number="25">आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे.</verse>
				<verse number="26">हे सत्य संदेष्ट्यांच्या लेखनाद्वारे उघड करण्यात आले आहे आणि सनातन देवाच्या आज्ञेने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना कळविण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवावा व आज्ञापालन करावे.</verse>
				<verse number="27">एकमेव ज्ञानी देवाचा येशू ख्रिस्ताद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="46">
			<chapter number="1">
				<verse number="1">करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यासाठी बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना,</verse>
				<verse number="2">देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:</verse>
				<verse number="3">देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला लाभो.</verse>
				<verse number="4">ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो;</verse>
				<verse number="5">कारण जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, अगदी बोलण्यात व ज्ञानातदेखील, संपन्न झालात.</verse>
				<verse number="6"></verse>
				<verse number="7">परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.</verse>
				<verse number="8">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच तुम्हांला शेवटपर्यत दृढ राखील.</verse>
				<verse number="9">ज्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याबरोबरच्या सहभागात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.</verse>
				<verse number="10">बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हां सर्वांचे बोलणे ऐक्याचे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये. तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले असावे.</verse>
				<verse number="11">कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत, असे मला “लोवेच्या कुटुंबातील काही माणसांकडून कळले आहे.</verse>
				<verse number="12">माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा”, “मी अपुल्लोसचा”, “मी पेत्राचा” आणि “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे”, असे म्हणतो.</verse>
				<verse number="13">ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी क्रुसावर चढवले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?</verse>
				<verse number="14">क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.</verse>
				<verse number="15">नाही तर, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने दिला गेला, असे कोणी म्हणावयाचा!</verse>
				<verse number="16">आणखी मी स्तेफनच्या घरच्यांनाही बाप्तिस्मा दिला. त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला बाप्तिस्मा दिला की नाही, हे माझ्या लक्षात नाही.</verse>
				<verse number="17">ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा देण्यास नव्हे तर शुभवर्तमान घोषित करायला पाठविले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून क्रुसाविषयी वाक्चातुर्याने सांगण्यास मला पाठवले नाही.</verse>
				<verse number="18">कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, अशा आपल्यासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे, कारण</verse>
				<verse number="19">‘मी ज्ञानवंतांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिवंतांची बुद्धी शून्यवत करीन’, असा धर्मशास्त्रलेख आहे.</verse>
				<verse number="20">तर मग ज्ञानी कोठे राहिले? धर्मशास्त्र कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे!</verse>
				<verse number="21">जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे.</verse>
				<verse number="22">यहुदी लोक चमत्कारांचा पुरावा मागतात व ग्रीक ज्ञानाचा शोध करतात,</verse>
				<verse number="23">परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा,</verse>
				<verse number="24">मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.</verse>
				<verse number="25">कारण देवाचा मूर्खपणा, माणसांच्या शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या शक्तीपेक्षा अधिक बळकट आहे.</verse>
				<verse number="26">तर बंधुजनहो, तुम्हांला झालेल्या पाचारणाचा विचार करा. तुमच्यामध्ये पुष्कळ जण जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे नाहीत.</verse>
				<verse number="27">तरी ज्ञानी लोकांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले आणि बलवानांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले</verse>
				<verse number="28">आणि जगातील ज्या क्षुल्लक, तिरस्करणीय व नगण्य गोष्टी देवाने ह्याच्यासाठी निवडल्या की, जे अस्तित्वात आहे ते त्याने शून्यवत करावे,</verse>
				<verse number="29">म्हणजे देवासमोर कोणीही बढाई मारू नये.</verse>
				<verse number="30">तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात.</verse>
				<verse number="31">म्हणजे ‘जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूविषयी तो बाळगावा’ ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">बंधुजनहो, मी तुमच्याकडे आलो, तो वक्‍तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला घोषित करण्यास आलो नाही;</verse>
				<verse number="2">कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर चढवलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काहीही जमेस धरू नये, असा मी ठाम निश्चय केला होता</verse>
				<verse number="3">आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व अतिकंपित अवस्थेत आलो.</verse>
				<verse number="4">तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित असावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर पवित्र आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.</verse>
				<verse number="5"></verse>
				<verse number="6">तथापि तुमच्यात जे अधिक ज्ञानी आहेत, त्यांना मी ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे किंवा ह्या युगाचे नष्ट होणारे जे अधिपती त्यांचेही नव्हे,</verse>
				<verse number="7">तर देवाचे गूढ व गुप्त ठेवलेले ज्ञान आम्ही सांगतो, जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या वैभवाकरिता नेमले होते.</verse>
				<verse number="8">ते ह्या युगातल्या अधिपतींतील कोणालाही कळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते, तर त्यांनी गौरवशाली प्रभूला क्रुसावर चढवले नसते.</verse>
				<verse number="9">धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व मानवी अंत:करणाला जे भिडले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध केले आहे,</verse>
				<verse number="10">परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो.</verse>
				<verse number="11">माणसाच्या अंतर्यामी वसणाऱ्या त्याच्या स्वतःच्या आत्म्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही.</verse>
				<verse number="12">आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले, ते आपण ओळखून घ्यावे.</verse>
				<verse number="13">तर मग आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.</verse>
				<verse number="14">जो आध्यात्मिक नाही तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकत नाहीत; कारण त्यांची पारख आध्यात्मिक दृष्टीने होते.</verse>
				<verse number="15">जो आध्यात्मिक आहे, तो सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.</verse>
				<verse number="16">धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला शिकवावे?’ परंतु आपल्याला तर ख्रिस्ताची मनोवृत्ती लाभली आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">बंधुजनहो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे, तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे ऐहिक लोकांबरोबर किंबहुना जसे ख्रिस्ती श्रद्धेतील बालकांबरोबर बोलावे तसे मला बोलावे लागते.</verse>
				<verse number="2">मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि अजूनही नाही.</verse>
				<verse number="3">तुम्ही अजूनही ऐहिक लोकांसारखे आहात. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी प्रवृत्तीने चालता की नाही?</verse>
				<verse number="4">कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे,” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसचा आहे”, तेव्हा तुम्ही दैहिकच आहात की नाही?</verse>
				<verse number="5">तर मग अपुल्लोस कोण, पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, असे ते सेवक आहेत. ते प्रभूने नेमून दिल्याप्रमाणे आपले कार्य करीत आहेत.</verse>
				<verse number="6">मी रोप लावले, अपुल्लोसने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.</verse>
				<verse number="7">त्यामुळे लावणारा आणि पाणी घालणारा महत्त्वाचा नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो महत्त्वाचा आहे.</verse>
				<verse number="8">लावणारा व पाणी घालणारा हे सारखेत आहेत, तरी देव प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे त्याची मजुरी देईल.</verse>
				<verse number="9">आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.</verse>
				<verse number="10">माझ्यावर झालेल्या देवाच्या कृपेच्या परिमाणाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधकाम करत आहे. मात्र त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत, ह्याविषयी प्रत्येक कामगाराने दक्षअसले पाहिजे.</verse>
				<verse number="11">येशू ख्रिस्त हा पाया आहे, त्याच्यावाचून दुसरा पाया नाही.</verse>
				<verse number="12">ह्या पायावर जो तो सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत किंवा पेंढा ह्यांनी ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे बांधकाम करतो आहे</verse>
				<verse number="13">आणि बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, ख्रिस्ताचा दिवस ते उघडकीस आणील, कारण तो दिवस अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे, ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.</verse>
				<verse number="14">त्या पायावर बांधलेले ज्याचे काम टिकेल त्याला पारितोषिक मिळेल.</verse>
				<verse number="15">ज्याचे काम जळून जाईल, त्याचे नुकसान होईल, तथापि तो स्वतः जणू काही अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल.</verse>
				<verse number="16">तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वसती करतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?</verse>
				<verse number="17">जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही ते मंदिर आहात.</verse>
				<verse number="18">कोणी स्वतःला फसवून घेऊ नये, ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत, असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे.</verse>
				<verse number="19">कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे; कारण ‘तो ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो’, असा धर्मशास्त्रलेख आहे</verse>
				<verse number="20">आणि ‘ज्ञानी लोकांचे विचार व्यर्थ आहेत, हे परमेश्वर जाणतो’, असा दुसरा धर्मशास्त्रलेख आहे.</verse>
				<verse number="21">म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्व काही तुमचे आहे.</verse>
				<verse number="22">पौल, अपुल्लोस व पेत्र; जग, जीवन व मरण; वर्तमानकाळाच्या गोष्टी व भविष्यकाळाच्या गोष्टी - सर्व काही तुमचे आहे.</verse>
				<verse number="23">आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाने आम्हांला मानावे.</verse>
				<verse number="2">कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.</verse>
				<verse number="3">आता तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला महत्त्व वाटत नाही. मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही.</verse>
				<verse number="4">माझी सदसद्विवेकबुद्धी शुद्ध असली, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.</verse>
				<verse number="5">म्हणून उचित समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची प्रशंसा करील.</verse>
				<verse number="6">बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी उदाहरणादाखल स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत. ह्यासाठी की, धर्मशास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आमच्याकडून शिकावा, म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा अभिमान बाळगणार नाही.</verse>
				<verse number="7">तुला इतरांपेक्षा श्रेष्ठ कोणी केले? जे तुला दिलेले नाही, असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अहंकार तू का बाळगतोस?</verse>
				<verse number="8">तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्ही जरी राजे झालो नसलो, तरी तुम्ही मात्र राजे झाला आहात काय? तुम्ही राजे बनलाच असता, तर ठीक झाले असते; कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.</verse>
				<verse number="9">मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना सर्वात शेवटच्या स्थानी जणू काही मरणदंडासाठी पुढे केले आहे. कारण आम्ही जगाला, देवदूतांना व माणसांना, जाहीर प्रदर्शन असे झालो आहोत!</verse>
				<verse number="10">आम्ही ख्रिस्ताकरिता मूर्ख, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत शहाणे, आम्ही अशक्त, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत सशक्त, आम्ही अप्रतिष्ठित परंतु तुम्ही प्रतिष्ठित असे आहात!</verse>
				<verse number="11">ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत. आम्हांला मारहाण होते, आम्हांला घरदार नाही.</verse>
				<verse number="12">आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो.</verse>
				<verse number="13">आमची निंदा होत असता आम्ही शुभेच्छा देतो, आम्ही जगाचा केरकचरा, अगदी खालच्या थरातला गाळ असे आजपर्यंत झालो आहोत.</verse>
				<verse number="14">तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो;</verse>
				<verse number="15">कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार प्रशिक्षक असले तरी पुष्कळ पालक नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूवरील निष्ठेमुळे शुभवर्तमानाच्या योगाने जन्म दिला आहे.</verse>
				<verse number="16">म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.</verse>
				<verse number="17">ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे. तो ख्रिस्ती जीवनामध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. जसे मी सर्वत्र प्रत्येक ख्रिस्तमंडळींत शिकवितो, त्याप्रमाणे तो ख्रिस्तामध्ये माझ्या जीवनशैलीची तुम्हांला आठवण करून देईल.</verse>
				<verse number="18">मी तुमच्याकडे येणार नाही, असे समजून कित्येक अहंकारी बनले आहेत.</verse>
				<verse number="19">जर प्रभूची इच्छा असली, तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा गर्विष्ठांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन;</verse>
				<verse number="20">कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे.</verse>
				<verse number="21">तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्य वृत्तीने यावे?</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की, जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही. म्हणजे तुमच्यामधील एकाचे स्वतःच्या सावत्र आईबरोबर अनैतिक संबंध आहेत!</verse>
				<verse number="2">तरीही तुम्ही अहंकार बाळगता! हे कर्म करणाऱ्याला आपणांतून घालवून देण्याइतका उद्वेग तुम्ही प्रकट केला नाही.</verse>
				<verse number="3">मी शरीराने गैरहजर असलो, तरी आत्म्याने हजर आहे आणि मी तर हजर असल्याप्रमाणे निर्णय करून चुकलो आहे.</verse>
				<verse number="4">तो असा की, तुम्ही एकत्र जमता तेव्हा मीसुद्धा मनाने तुमच्यात असतो. अशा प्रकारे अनीतीने वागणाऱ्याला त्याच्या देहाचा नाश व्हावा म्हणून प्रभू येशूच्या सामर्थ्याच्या बळावर सैतानाच्या स्वाधीन करावे, म्हणजे प्रभूच्या दिवशी त्याचा आत्मा तारला जावा.</verse>
				<verse number="5"></verse>
				<verse number="6">तुमचे हे बढाईखोर वर्तन बरे नव्हे. थोडेसे खमीर पिठाचा सगळा गोळा फुगविते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?</verse>
				<verse number="7">तर पापाचे जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही नवीन बेखमीर गोळ्यासारखे पूर्णपणे शुद्ध व्हावे. माझी खातरी आहे की, तुम्ही खरोखर तसेच आहात; कारण आपला ओलांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त, त्याचे अर्पण झाले आहे.</verse>
				<verse number="8">ह्यामुळे आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने म्हणजे अप्रामाणिकपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर प्रामाणिकपणा व सत्य ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा.</verse>
				<verse number="9">तुम्ही अनैतिक लैंगिक वर्तन करणाऱ्यांची संगत धरू नये, असे मी माझ्या पत्रात तुम्हांला लिहिले होते.</verse>
				<verse number="10">तथापि ह्या जगाचे अनैतिक, लोभी, लुटारू व मूर्तिपूजक ह्यांची संगत मूळीच धरू नये, असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल.</verse>
				<verse number="11">म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाडखोर, मद्यपी किंवा लुटारू असला तर त्याची संगत धरू नये. त्याच्या पंक्तीसही बसू नये.</verse>
				<verse number="12">जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा मला हक्व नाही.</verse>
				<verse number="13">जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? ‘त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या’, असे धर्मशास्त्र सांगते.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">तुमच्यापैकी कुणाचा दुसऱ्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमान न्यायाधीशांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय?</verse>
				<verse number="2">पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्‍लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय?</verse>
				<verse number="3">आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत, हे तुम्हाला ठाऊक आहे ना? तर मग सर्वसामान्य गोष्टींविषयी सांगणे नकोच.</verse>
				<verse number="4">तुम्हांला सर्वसामान्य प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा असतो, तेव्हा ख्रिस्तमंडळीत ज्यांना स्थान नाही त्यांना कसे नेमता?</verse>
				<verse number="5">तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावाचा निवाडा करता येईल, असा एकही सुज्ञ माणूस तुमच्यांमध्ये नाही की काय?</verse>
				<verse number="6">परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यापुढे करतो, हे कसे?</verse>
				<verse number="7">तुम्ही एकमेकांवर खटले भरता हे तुमच्या अपयशाचे लक्षण आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा झालेली फसवणूक का सोसून घेत नाही?</verse>
				<verse number="8">उलट तुम्ही स्वतः अन्याय व फसवणूक करता आणि तीही बंधुजनांची करता!</verse>
				<verse number="9">अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन,</verse>
				<verse number="10">चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर व लुटारू ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही</verse>
				<verse number="11">आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही आता तुमच्या पापांपासून शुद्ध झाला आहात; तुम्ही स्वतःचे समर्पण देवाला केले आहे; आपल्या प्रभू ख्रिस्ताने व आपल्या देवाच्या आत्म्याने तुमचे देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित केले आहेत.</verse>
				<verse number="12">ज्या गोष्टींची मला कायद्याने मुभा दिली आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हिताच्या असतीलच असे नाही. सर्व गोष्टींची मला मुभा आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.</verse>
				<verse number="13">अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, तरीही त्या दोहोंचाही अंत देव करील. शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.</verse>
				<verse number="14">देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.</verse>
				<verse number="15">तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते वेश्येचे अवयव करावेत काय? कधीच नाही!</verse>
				<verse number="16">जो वेश्येशी संबंध ठेवतो, तो तिच्याबरोबर एकशरीर होतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण ‘ती दोघे एकदेह होतील’, असे धर्मशास्त्र म्हणते.</verse>
				<verse number="17">परंतु जो प्रभूशी नाते जोडतो, तो आध्यात्मिकरीत्या त्याच्याशी एकरूप होतो.</verse>
				<verse number="18">जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो, ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरामध्ये पाप करतो.</verse>
				<verse number="19">तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही स्वतःचे मालक नाही. तर तुम्ही प्रभूचे आहात;</verse>
				<verse number="20">कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी मी उत्तर देत आहे. पुरुषाने स्त्रीला स्पर्श न क रणे बरे.</verse>
				<verse number="2">परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा.</verse>
				<verse number="3">पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे.</verse>
				<verse number="4">पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.</verse>
				<verse number="5">एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये.</verse>
				<verse number="6">मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो.</verse>
				<verse number="7">खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे.</verse>
				<verse number="8">आता जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, माझ्यासारखे एकटे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे.</verse>
				<verse number="9">तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे.</verse>
				<verse number="10">परंतु विवाहितांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये.</verse>
				<verse number="11">परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये.</verse>
				<verse number="12">इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये</verse>
				<verse number="13">आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये.</verse>
				<verse number="14">कारण पत्नीच्याद्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्याद्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर त्यांची मुलेबाळे अपवित्र असती. परंतु आता ती पवित्र आहेत.</verse>
				<verse number="15">तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो, अशा प्रसंगी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनी बांधील नाहीत. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे;</verse>
				<verse number="16">कारण पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? किंवा पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक?</verse>
				<verse number="17">ते काहीही असो, प्रत्येकाला प्रभूने नेमून दिलेले जीवन आणि प्रत्येकाला देवाने केलेले पाचारण ह्यानुसार त्याने चालावे. सर्व ख्रिस्तमंडळ्यांना मी हाच नियम घालून देतो.</verse>
				<verse number="18">सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंतेच्या खुणा काढून टाकू नयेत; कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये.</verse>
				<verse number="19">सुंता होणे किंवा सुंता न होणे ह्याला काही महत्त्व नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.</verse>
				<verse number="20">ज्याला ज्या स्थितीत पाचारण झाले असेल, त्याने त्याच स्थितीत राहावे.</verse>
				<verse number="21">तू गुलाम असता, तुला पाचारण झाले आहे काय? हरकत नाही, पण तुला स्वतंत्र होता येत असेल तर खुशाल स्वतंत्र हो;</verse>
				<verse number="22">कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले आहे, तो गुलामगिरीतून स्वतंत्र केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच स्वतंत्र असताना ज्याला पाचारण झाले आहे तो ख्रिस्ताचा दास आहे.</verse>
				<verse number="23">तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका.</verse>
				<verse number="24">बंधुजनहो, ज्या स्थितीत पाचारण झाले असेल त्या स्थितीतच प्रत्येकाने देवाच्या सहवासात राहावे.</verse>
				<verse number="25">कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या प्रभूने त्याच्या कृपेने मला विश्‍वासपात्र ठरवले आहे, तो मी आपले मत सांगतो.</verse>
				<verse number="26">सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत जो ज्या स्थितीत असेल, त्या स्थितीत त्याने राहावे, हे त्याला बरे.</verse>
				<verse number="27">तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस.</verse>
				<verse number="28">तथापि तू लग्न केलेस म्हणजे पाप केलेस, असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले, असेही होत नाही, मात्र अशांना ह्या जीवनात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत, अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="29">बंधुजनहो, मला हेच सांगायचे आहे की, नेमलेला काळ कमी करण्यात आला आहे म्हणून ह्यापुढे ज्याला पत्नी आहे, त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे राहावे.</verse>
				<verse number="30">जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे</verse>
				<verse number="31">आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे राहावे कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे.</verse>
				<verse number="32">तुम्ही निश्चिंत असावे, अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभू कसा संतुष्ट होईल, अशी चिंता करतो.</verse>
				<verse number="33">परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतुष्ट करावे, अशा भौतिक गोष्टींची चिंता करतो. ह्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते.</verse>
				<verse number="34">जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी काळजी करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे अशा सांसारिक गोष्टींविषयी उत्सुकता बाळगते.</verse>
				<verse number="35">तुमच्यावर बंधने आणण्यासाठी नव्हे तर तुमच्याकडून उत्तम आचरण घडावे व प्रभूची एकाग्रतेने सेवा व्हावी म्हणून मी हे तुमच्या हितासाठी सांगतो.</verse>
				<verse number="36">परंतु जर कोणाला असे वाटत असेल की, वाङ्निश्चय केलेल्या कुमारिकेबरोबर आपण अयोग्य प्रकारे वागतो आणि जर त्याच्या भावना अनावर होत असतील, तर त्याने लग्न करावे; तो पाप करत नाही.</verse>
				<verse number="37">तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला संयम आहे, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे आणि त्या कुमारिकेला तसेच राहू द्यावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो योग्य करतो.</verse>
				<verse number="38">जो त्या कुमारिकेबरोबर लग्न करतो तो योग्य करतो आणि जो लग्न करत नाही, तो अधिक योग्य करतो.</verse>
				<verse number="39">पती जिवंत आहे, तोपर्यंत पत्नी बांधील आहे. पती मरण पावल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ ख्रिस्ती माणसाबरोबर, लग्न करायला ती मोकळी आहे.</verse>
				<verse number="40">पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मलाही पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभते, असे मला वाटते.</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी तुम्ही जे लिहिले होते, त्याच्याकडे मी वळतो. आपल्या सर्वांना ज्ञान आहे, असे म्हटले जाते, हे खरे आहे. असे ज्ञान अहंकार निर्माण करते परंतु प्रीती प्रगती साधत असते.</verse>
				<verse number="2">जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते.</verse>
				<verse number="3">मात्र जो देवावर प्रीती करतो, त्याला देव ओळखतो.</verse>
				<verse number="4">मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, जे खरोखर अस्तित्वात नाही त्याचे प्रतिनिधित्व मूर्ती करीत असते आणि एकाखेरीज दुसरा देव नाही.</verse>
				<verse number="5">ज्यांना देव म्हणून मानतात अशी स्वर्गात किंवा पृथ्वीवर बरीच दैवते व बरेच प्रभू असतील,</verse>
				<verse number="6">तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याने सर्व काही निर्माण केले व आपण त्याच्यासाठी जगतो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले व आपण त्याच्या कृपेने जगतो.</verse>
				<verse number="7">तथापि हे ज्ञान सर्वांना असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेले खाद्य नैवेद्य म्हणून खातात, तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते.</verse>
				<verse number="8">देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही.</verse>
				<verse number="9">मात्र हे तुमचे स्वातंत्र्य दुर्बळास अडथळ्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.</verse>
				<verse number="10">जाणकार असलेल्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले व तो पाहणारा दुर्बल असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना?</verse>
				<verse number="11">ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, असा जो दुर्बल बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाने नाश होईल.</verse>
				<verse number="12">बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बल सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.</verse>
				<verse number="13">म्हणून अन्नामुळे माझा बंधू पापात पडत असेल, तर तो पापात पडू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? प्रभूमध्ये केलेल्या सेवाकार्याचे फळ मला तुमच्यामध्ये दिसत नाही काय?</verse>
				<verse number="2">जरी मी दुसऱ्या लोकांच्या दृष्टीने प्रेषित नसलो, तरी निदान तुमच्याकरिता तरी आहे; कारण प्रभूवरच्या निष्ठेत मी प्रेषित असल्याची तुम्ही पावती आहात.</verse>
				<verse number="3">माझ्यावर टीका करणाऱ्यांना माझे हेच उत्तर आहे.</verse>
				<verse number="4">आम्हांला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय?</verse>
				<verse number="5">इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व पेत्र ह्यांच्याप्रमाणे आम्हांला आमची ख्रिस्ती पत्नी प्रवासात बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?</verse>
				<verse number="6">अथवा कामधंदा करून उपजीविका करण्याचा हक्क केवळ मला व बर्णबाला नाही काय?</verse>
				<verse number="7">आपल्याच खर्चाने सैन्यात काम करतो, असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध पीत नाही, असा कोण आहे?</verse>
				<verse number="8">माणसाच्या रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांची मर्यादा घालून घेण्याची मला गरज नाही कारण नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय?</verse>
				<verse number="9">मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नको, तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की,</verse>
				<verse number="10">तो हे तुमच्याआमच्याकरता सांगतो? हो, हे तुमच्याआमच्याकरता लिहिले आहे, अशा अर्थाने की जो नांगरतो, त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी.</verse>
				<verse number="11">आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक वस्तूंची कापणी केली, तर त्यात काही मोठी गोष्ट आहे काय?</verse>
				<verse number="12">दुसरे लोक जर तुमच्या ह्या हक्‍कांचा उपभोग घेतात तर तो आम्ही अधिक प्रमाणात घेऊ नये काय? तथापि हा हक्क आम्ही बजावला नाही, एवढेच नव्हे तर ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला काही अडथळा होऊ नये म्हणून आम्ही सर्व काही सहन करतो.</verse>
				<verse number="13">मंदिरात सेवा करणारे मंदिरातल्या उत्पन्नावर आपली उपजीविका चालवतात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय?</verse>
				<verse number="14">त्याचप्रमाणे प्रभूची योजना आहे की, जे शुभवर्तमान सांगतात त्यांनी शुभवर्तमानावर आपली उपजीविका करावी.</verse>
				<verse number="15">मी तर ह्यांपैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला मिळावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही; कारण त्यापेक्षा मी मरावे हे बरे, हा रास्त स्वाभिमान कोणीही फोल ठरवणार नाही.</verse>
				<verse number="16">मी शुभवर्तमान घोषित करतो म्हणून मला फुशारकी मारण्याचे कारण नाही; कारण मला तसा आदेश देण्यात आला आहे. मी शुभवर्तमान घोषित केले नाही, तर माझा धिक्कार असो!</verse>
				<verse number="17">हे जर मी स्वेच्छेने करीत असेन, तर मला पारितोषिक मिळेल आणि स्वेच्छेने नसेल, तरी माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवली आहे व माझे कर्तव्य म्हणून मी ती पार पाडीत आहे.</verse>
				<verse number="18">तर मग माझे पारितोषिक काय? माझे पारितोषिक ते हेच की, शुभवर्तमान विनामूल्य सांगण्याची जी संधी मला मिळाली आहे, ती पार पाडताना मला जे काम करावे लागते त्याबाबतच्या माझ्या हक्कांचा मी दावा करत नाही.</verse>
				<verse number="19">कारण मी सर्वार्थाने स्वतंत्र असूनही, अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे.</verse>
				<verse number="20">यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांमध्ये यहुदी माणसासारखा राहतो; नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसताही, त्यांच्यासारखा झालो.</verse>
				<verse number="21">जे नियमशास्त्राच्या बाहेर आहेत त्यांना मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राच्या बाहेर असा झालो. मी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर मी ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होतो.</verse>
				<verse number="22">दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे.</verse>
				<verse number="23">मी शुभवर्तमानामुळे मिळणाऱ्या आशीर्वादात सहभागीदार व्हावे म्हणून, मी सर्व काही शुभवर्तमानाकरिता करतो.</verse>
				<verse number="24">शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण पारितोषिक एकालाच मिळते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग असे धावा की, तुम्हांला ते मिळेल.</verse>
				<verse number="25">स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो.</verse>
				<verse number="26">म्हणून मीही माझे लक्ष्य नजरेसमोर ठेवून धावतो; तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही,</verse>
				<verse number="27">मी दुसऱ्यांना शर्यतीसाठी बोलावताना कदाचित मी स्वतः मात्र त्या स्पर्धेसाठी अपात्र ठरेन म्हणून मी माझ्या शरीराला कष्ट देऊन त्याला ताब्यात ठेवतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">बंधुजनहो, आपले पूर्वज मेघाखाली होते आणि तांबड्या समुद्रातून ते सर्व पार गेले, ह्याची आपण आठवण ठेवावी, अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="2">मेघात व समुद्रात मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांना बाप्तिस्मा देण्यात आला.</verse>
				<verse number="3">त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले</verse>
				<verse number="4">आणि ते सर्व एकाच प्रकारचे आध्यात्मिक पाणी प्यायले कारण ते त्यांच्याबरोबर जात असलेल्या आध्यात्मिक खडकांतून पीत होते. तो खडक तर स्वतः ख्रिस्त होता.</verse>
				<verse number="5">तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला.</verse>
				<verse number="6">ह्या गोष्टी आपल्यासाठी उदाहरणादाखल घडल्या. अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.</verse>
				<verse number="7">त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. ‘लोक खायला प्यायला बसले, नंतर धुंद होऊन लैंगिक गैरवर्तन करायला उठले’, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.</verse>
				<verse number="8">त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले, म्हणून आपण जारकर्म करू नये.</verse>
				<verse number="9">त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सर्पदंशाने नाश पावले. म्हणून आपण त्यांच्यासारखी प्रभूची परीक्षा पाहू नये.</verse>
				<verse number="10">त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, म्हणून तशी कुरकुर आपण करू नये.</verse>
				<verse number="11">ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या व आपल्याला इशारा देण्यासाठी त्या लिहून ठेवण्यात आल्या आहेत कारण आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहचलो आहोत.</verse>
				<verse number="12">म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.</verse>
				<verse number="13">लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील.</verse>
				<verse number="14">म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.</verse>
				<verse number="15">तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा निर्णय तुम्हीच करा.</verse>
				<verse number="16">जो प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्तामधील सहभाग नाही काय? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीरामधील सहभागिता नाही काय?</verse>
				<verse number="17">भाकर एक असल्यामुळे, आपण जरी अनेक असलो तरी त्या एका भाकरीत सहभागी झाल्यामुळे, आपण एक शरीर असे आहोत.</verse>
				<verse number="18">जे जात्याच इस्राएली आहेत त्यांच्याकडे पाहा: यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार असतात ना?</verse>
				<verse number="19">तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य महत्त्वाचा की, मूर्ती महत्त्वाची?</verse>
				<verse number="20">तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही.</verse>
				<verse number="21">तुम्ही प्रभूचा प्याला व भुतांचा प्याला पिऊ शकत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भुतांच्या मेजावरचे तुम्ही खाऊ शकत नाही.</verse>
				<verse number="22">आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?</verse>
				<verse number="23">ज्या गोष्टींची मला कायद्याने मुभा दिली आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हिताच्या असतीलच असे नाही. सर्व गोष्टींची मला मुभा आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.</verse>
				<verse number="24">कोणीही स्वत:चे हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.</verse>
				<verse number="25">बाजारात खाटिक जे काही विकतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने तुम्ही खाऊ शकता;</verse>
				<verse number="26">कारण पवित्र शास्रात म्हटल्याप्रमाणे, पृथ्वी व तिच्यात जे काही भरले आहे, ते परमेश्वराचे आहे.</verse>
				<verse number="27">विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने स्वीकारा.</verse>
				<verse number="28">परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेकबुद्धीखातर तो स्वीकारू नका.</verse>
				<verse number="29">येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुमची नव्हे तर तुम्हांला आमंत्रण देणाऱ्याची. माझ्या स्वातंत्र्याचा निर्णय दुसऱ्याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा, असे एखादा विचारील.</verse>
				<verse number="30">मी आभारपूर्वक स्वीकारत असेन, तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याबद्दल माझ्यावर टीका का व्हावी?</verse>
				<verse number="31">तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता, ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.</verse>
				<verse number="32">यहुदी, ग्रीक व देवाची ख्रिस्तमंडळी ह्यांच्यापैकी कोणाच्याही मनात संदेह निर्माण करणारे होऊ नका,</verse>
				<verse number="33">तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.</verse>
				<verse number="2">तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला दिलेली शिकवण तुम्ही दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.</verse>
				<verse number="3">प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे असी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="4">जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करतो.</verse>
				<verse number="5">तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा म्हणजे आपल्या पुरुषाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.</verse>
				<verse number="6">स्त्री जर आपले मस्तक आच्छादीत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे, परंतु जर तिला मुंडण करणे लाजिरवाणे वाटते तर तिने आपले मस्तक आच्छादावे.</verse>
				<verse number="7">पुरुष म्हणजे देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्त्री ही पुरुषाचे वैभव आहे.</verse>
				<verse number="8">कारण पुरुष स्त्रीपासून निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली.</verse>
				<verse number="9">तसेच पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली.</verse>
				<verse number="10">ह्या कारणामुळे स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरता मस्तकावर आच्छादन धारण करावे.</verse>
				<verse number="11">मात्र प्रभूबरोबरच्या आपल्या जीवनात स्त्रीपुरुष परस्परांवर अवलंबून आहेत.</verse>
				<verse number="12">कारण जशी स्त्री पुरुषापासून, तसा पुरुष स्त्रीपासून आहे आणि सर्व काही देवाकडून आहे.</verse>
				<verse number="13">तुमचे तुम्हीच ठरवा. मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून सार्वजनिक उपासनेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय?</verse>
				<verse number="14">लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, हे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय?</verse>
				<verse number="15">स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे. कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत.</verse>
				<verse number="16">मात्र जर कोणी वितंडवादी असला तर माझे एवढेच म्हणणे आहे की, आपल्यात आणि देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांतही दुसरी कोणतीही रीत नाही.</verse>
				<verse number="17">आता पुढील आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही. प्रार्थनासभेत तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते;</verse>
				<verse number="18">कारण पहिल्या प्रथम तुम्ही ख्रिस्तमंडळी ह्या नात्याने एकत्र जमता, तेव्हा तुमच्यामध्ये दुही आहे असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो.</verse>
				<verse number="19">तुमच्यामध्ये दुही असावी कारण त्या दुहीमुळे खरे कोण आहेत हे उघड होईल.</verse>
				<verse number="20">ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता, तेव्हा तुम्ही प्रभुभोजनासाठी येत नाही.</verse>
				<verse number="21">कारण भोजनाच्या वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण इतरांपूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर दुसरा पिऊन मस्त होतो.</verse>
				<verse number="22">खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या ख्रिस्तमंडळीला धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता? याविषयी मी तुम्हांला काय म्हणावे, अशी तुमची अपेक्षा आहे? ह्याबद्दल मी तुमची वाहवा करू काय? नाही. मी तुमची वाहवा करीत नाही!</verse>
				<verse number="23">जे मला प्रभूकडून मिळाले, तेच मी तुम्हांला सांगितले आहे, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली.</verse>
				<verse number="24">आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा”.</verse>
				<verse number="25">त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्ताने प्रस्थापित झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”</verse>
				<verse number="26">म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.</verse>
				<verse number="27">म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्यासंबंधाने दोषी ठरेल.</verse>
				<verse number="28">म्हणून माणसाने प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे;</verse>
				<verse number="29">कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.</verse>
				<verse number="30">तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बल व आजारी आहेत आणि बरेच निधन पावले त्याचे कारण हेच.</verse>
				<verse number="31">आपण प्रथम आत्मपरीक्षण केले तर न्यायाचा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही.</verse>
				<verse number="32">परंतु प्रभू जेव्हा आपला न्याय करतो तेव्हा आपल्याला शिस्त लावली जाते आणि त्यामुळे जगाबरोबर आपल्याला दोषी ठरविण्यात येत नाही.</verse>
				<verse number="33">तर मग माझ्या बंधूंनो, तुम्ही प्रभुभोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांसाठी थांबा</verse>
				<verse number="34">आणि कोणी भुकेला असला, तर त्याने घरी खावे, म्हणजे तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.</verse>
				<verse number="2">तुम्ही यहुदीतर होता तेव्हा जसे वळण तुम्हांला लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या निर्जीव मूर्तींकडे बहकले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="3">म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही, “येशू शापभ्रष्ट आहे”, असे म्हणू शकत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू प्रभू आहे”, असे म्हणता येत नाही.</verse>
				<verse number="4">कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो.</verse>
				<verse number="5">सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते</verse>
				<verse number="6">आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे.</verse>
				<verse number="7">सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो.</verse>
				<verse number="8">एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाणी दिली जाते.</verse>
				<verse number="9">एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने,</verse>
				<verse number="10">अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात.</verse>
				<verse number="11">ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.</verse>
				<verse number="12">जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे.</verse>
				<verse number="13">त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत.</verse>
				<verse number="14">कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते.</verse>
				<verse number="15">जर पाय म्हणेल, “मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही.</verse>
				<verse number="16">जर कान म्हणेल, “मी डोळा नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही.</verse>
				<verse number="17">सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती?</verse>
				<verse number="18">देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे.</verse>
				<verse number="19">ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते?</verse>
				<verse number="20">तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक आहे.</verse>
				<verse number="21">डोळा हाताला म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”</verse>
				<verse number="22">उलट, शरीराचे जे अवयव कमजोर दिसतात त्यांच्याविना आपले चालू शकत नाही.</verse>
				<verse number="23">शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांची आपण खास काळजी घेतो आणि आपल्या कुरूप अंगांना महत्त्व देतो.</verse>
				<verse number="24">आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना विशेष महत्त्व मिळावे अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे.</verse>
				<verse number="25">म्हणून शरीरात फूट नाही, तर अवयव एकमेकांची सारखीच काळजी घेत असतात.</verse>
				<verse number="26">एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुखावतात किंवा एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सुखावतात.</verse>
				<verse number="27">तुम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचे शरीर असून एकेक जण त्याचे अवयव आहात.</verse>
				<verse number="28">देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक, नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत.</verse>
				<verse number="29">सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय?</verse>
				<verse number="30">आरोग्य देण्याचे कृपादान सगळ्यांनाच मिळाले आहे काय? सगळेच अपरिचित भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?</verse>
				<verse number="31">परंतु तुम्ही अधिक महान कृपादाने मिळवण्यासाठी झटा. मी मात्र तुम्हांला एक अधिक उत्कृष्ट मार्ग दाखवतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषा जरी बोलू शकलो आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.</verse>
				<verse number="2">संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे.</verse>
				<verse number="3">मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.</verse>
				<verse number="4">प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही,</verse>
				<verse number="5">ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही;</verse>
				<verse number="6">ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते.</verse>
				<verse number="7">प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते.</verse>
				<verse number="8">प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल;</verse>
				<verse number="9">कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि आपल्याला अंशतः संदेश देता येतो.</verse>
				<verse number="10">पण जे परिपूर्ण ते आल्यावर, अपूर्ण ते नष्ट होईल.</verse>
				<verse number="11">मी मूल होतो, तेव्हा माझे बोलणे, माझ्या भावना व माझे विचार मुलासारखे असायचे. आता प्रौढ झाल्यावर मी बालिशपणा सोडून दिला आहे.</verse>
				<verse number="12">ह्री आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते, ते अपूर्ण आहे. पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.</verse>
				<verse number="13">सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला देवाचा संदेश सांगता यावा अशी उत्कंठा बाळगा.</verse>
				<verse number="2">अपरिचित भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण तो काय बोलतो, हे कोणालाही समजत नाही; तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गूढ गोष्टी बोलतो.</verse>
				<verse number="3">संदेष्टा हा माणसांना उद्देशून साहाय्य, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.</verse>
				<verse number="4">अपरिचित भाषा बोलणारा स्वतःलाच साहाय्य करतो, संदेष्टा ख्रिस्तमंडळीला साहाय्य करतो.</verse>
				<verse number="5">तुम्ही सर्वांनी अपरिचित भाषा बोलाव्यात, अशी माझी इच्छा आहे. परंतु विशेषत: तुम्ही संदेश द्यावा, अशी माझी मनीषा आहे; कारण ख्रिस्तमंडळीच्या उन्नतीकरिता अपरिचित भाषांचा अर्थ सांगणारा नसेल, तर जो अपरिचित भाषा बोलतो, त्याच्यापेक्षा देवाचा संदेष्टा श्रेष्ठ आहे.</verse>
				<verse number="6">तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन अपरिचित भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?</verse>
				<verse number="7">पावा किंवा वीणा असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वाद्यांच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास, पाव्याचा नाद कोणता आणि वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल?</verse>
				<verse number="8">तसेच रणशिंग अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?</verse>
				<verse number="9">त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुमचे शब्द वाऱ्यावर वाहून जातील.</verse>
				<verse number="10">जगात अनेक भाषा आहेत, तरी एकही अर्थहीन नाही.</verse>
				<verse number="11">म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणाऱ्याला मी परका ठरेन आणि बोलणारा मला परका ठरेल.</verse>
				<verse number="12">ज्याअर्थी तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात त्याअर्थी ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी उपयुक्त अशी दाने विपुल प्रमाणात मिळावीत म्हणून तुम्ही प्रयत्न करा.</verse>
				<verse number="13">अपरिचित भाषा बोलणाऱ्याने आपल्याला त्यांचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.</verse>
				<verse number="14">जर मी अपरिचित भाषेत प्रार्थना केली, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा त्या प्रार्थनेत सहभाग नसतो.</verse>
				<verse number="15">तर मग मी काय करावे? मी आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही प्रार्थना करणार. मी आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार.</verse>
				<verse number="16">तू केवळ आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थनेत आभार प्रदर्शन केले, तर जो तुमच्यातला नाही, तो तुझ्या प्रार्थनेला आमेन कसा म्हणेल? कारण तू जे बोलतोस, ते त्याला समजत नाही.</verse>
				<verse number="17">तुझे आभार प्रदर्शन करणे चांगले असले, तरीही त्याने दुसऱ्याची उभारणी होत नाही.</verse>
				<verse number="18">तुमच्या सर्वांपेक्षा मी अपरिचित भाषा अधिक बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो.</verse>
				<verse number="19">तथापि ख्रिस्तमंडळीच्या उपासनेत अपरिचित भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी समजतील असे पाच शब्द बोलणे मला जास्त आवडते.</verse>
				<verse number="20">बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत लहान मुलांसारखे आणि समजूतदारपणात प्रौढांसारखे व्हा.</verse>
				<verse number="21">नियमशास्त्रात लिहिले आहे, ‘अपरिचित भाषा बोलणाऱ्या लोकांद्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत’, असे प्रभू म्हणतो.</verse>
				<verse number="22">म्हणून ह्या अपरिचित भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी एक चिन्ह आहेत. संदेश विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे.</verse>
				<verse number="23">सगळी ख्रिस्तमंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर अपरिचित भाषा बोलू लागले आणि बाहेरचे किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर “तुम्ही वेडे आहात”, असे ते म्हणणार नाहीत काय?</verse>
				<verse number="24">परंतु सर्वच जण देवाचा संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा बाहेरचा माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापांविषयी त्याची खातरी होते, तो जे काही ऐकतो त्या सर्वावरून त्याचा निर्णय होतो,</verse>
				<verse number="25">त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतील आणि तो लोटांगण घालून देवाला वंदन करील व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरच आहे, असे कबूल करील.</verse>
				<verse number="26">बंधुजनहो, तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी प्रबोधन करण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अपरिचित भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी असावे.</verse>
				<verse number="27">अपरिचित भाषा बोलायच्या असल्यास बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत, अधिक नसावेत. त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि दुसऱ्या एकाने अर्थ सांगावा.</verse>
				<verse number="28">परंतु अर्थ सांगणारा नसला तर अपरिचित भाषा बोलणाऱ्याने ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे.</verse>
				<verse number="29">संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा.</verse>
				<verse number="30">तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही संदेश प्रकट झाला, तर जो बोलत आहे त्याने गप्प राहावे.</verse>
				<verse number="31">सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल, अशा रीतीने तुम्हां सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल.</verse>
				<verse number="32">संदेश देण्याचे कृपादान संदेष्ट्याच्या स्वाधीन असते.</verse>
				<verse number="33">कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या प्रत्येक ख्रिस्तमंडळीत जशी रीत आहे,</verse>
				<verse number="34">त्यानुसार स्त्रियांनी ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज्ञापालन करावे.</verse>
				<verse number="35">त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली, तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने ख्रिस्तमंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.</verse>
				<verse number="36">देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडेच पोहोचले आहे काय?</verse>
				<verse number="37">कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे, असे त्याने समजावे.</verse>
				<verse number="38">कोणी तसे समजत नसल्यास तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका.</verse>
				<verse number="39">म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व अपरिचित भाषा बोलण्यास मज्जाव करू नका.</verse>
				<verse number="40">मात्र सर्व काही उचितपणे व व्यवस्थितपणे होऊ द्या.</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">बंधुजनहो, जे शुभवर्तमान मी तुम्हांला घोषित केले, ज्याचा तुम्ही स्वीकार केला, ज्याच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात,</verse>
				<verse number="2">ज्याच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, त्याच शुभवर्तमानाची मी तुम्हांला आठवण करून देतो. जो संदेश मी तुम्हांला घोषित केला, तो संदेश तुम्ही दृढ धरला असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.</verse>
				<verse number="3">मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला.</verse>
				<verse number="4">तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले.</verse>
				<verse number="5">तो प्रथम पेत्राला व नंतर बारा जणांना दिसला.</verse>
				<verse number="6">त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, परंतु काही निधन पावले आहेत.</verse>
				<verse number="7">त्यानंतर तो याकोबला व पुढे सर्व प्रेषितांना दिसला</verse>
				<verse number="8">आणि जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला.</verse>
				<verse number="9">कारण प्रेषितांत मी सर्वांत कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणवून घेण्यास मी पात्र नाही; कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.</verse>
				<verse number="10">तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले.</verse>
				<verse number="11">सारांश, मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला आहे.</verse>
				<verse number="12">आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत असताना मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?</verse>
				<verse number="13">जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त उठवला गेला नाही</verse>
				<verse number="14">आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ</verse>
				<verse number="15">आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षीदार ठरतो. कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवलेच जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठवले नाही.</verse>
				<verse number="16">मेलेले उठवले जात नसतील, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही</verse>
				<verse number="17">आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापांतच आहात.</verse>
				<verse number="18">तसेच येशूवर श्रद्धा ठेवणारे जे निधन पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे.</verse>
				<verse number="19">आपली ख्रिस्तावरील आशा केवळ ह्या जीवनासाठी उपयुक्त असेल आणि पुढे तिचा काहीच फायदा नसेल असे जर आपण समजत असाल, तर सबंध जगात आपल्यासारखे कीव करण्याजोगे आपणच!</verse>
				<verse number="20">परंतु वस्तुस्थिती ही आहे की, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे. जे मरण पावले आहेत त्यांतला तो प्रथम फळ आहे.</verse>
				<verse number="21">खरोखर ज्याअर्थी मरण मनुष्याद्वारे आहे त्याअर्थी मेलेल्यांचे पुनरुत्थान मनुष्याद्वारे आहे.</verse>
				<verse number="22">जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.</verse>
				<verse number="23">पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी.</verse>
				<verse number="24">नंतर शेवट होईल, त्यावेळी प्रत्येक अधिकार व प्रत्येक सामर्थ्यही तो नष्ट करील व राज्य देवपित्याच्या स्वाधीन करील;</verse>
				<verse number="25">कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे.</verse>
				<verse number="26">जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.</verse>
				<verse number="27">पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘देवाने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.’ परंतु सर्व अंकित केले आहे, असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही, हे उघड आहे.</verse>
				<verse number="28">त्याच्या अंकित सर्व काही झाले, असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की, देव सर्वांना सर्व काही होवो.</verse>
				<verse number="29">असे नसल्यास मेलेल्यांच्या वतीने जे बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत, तर त्यांच्या वतीने लोक बाप्तिस्मा का घेतात?</verse>
				<verse number="30">आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घातला असता?</verse>
				<verse number="31">बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो!</verse>
				<verse number="32">जर केवळ मानवी आकांक्षेनुसार इफिस येथे मी श्वापदांना झुंज दिली, तर त्यात मला काय मिळाले? मेलेले उठवले जात नाहीत, तर धर्मशास्त्रानुसार ‘चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपण मरणार.’</verse>
				<verse number="33">फसू नका; कुसंगतीने शील बिघडते,</verse>
				<verse number="34">नीतिमत्ता म्हणजे काय, ह्याबद्दल शुद्धीवर या आणि विवेकबुद्धीने वागा. पाप करू नका; कारण कित्येकांना देवाची ओळख नसते. तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी हे बोलतो.</verse>
				<verse number="35">आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?</verse>
				<verse number="36">हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही</verse>
				<verse number="37">आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल.</verse>
				<verse number="38">पण देव त्याला त्याच्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. प्रत्येक बीजाला देव त्याचे अंग देतो.</verse>
				<verse number="39">सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसाचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा.</verse>
				<verse number="40">तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे वैभव एक आणि पार्थिवांचे एक.</verse>
				<verse number="41">सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे; कारण ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात.</verse>
				<verse number="42">तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते.</verse>
				<verse number="43">जे विरूपतेत व अशक्तपणात पेरले जाते, ते सौंदर्ययुक्त शक्तिमान स्वरूपात उठवले जाते,</verse>
				<verse number="44">भौतिक शरीर म्हणून पुरले जाते, आध्यात्मिक शरीर म्हणून उठवले जाते. अर्थात भौतिक शरीर आहे म्हणून आध्यात्मिक शरीरही असायला हवे.</verse>
				<verse number="45">कारण असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी म्हणून निर्माण करण्यात आला’; परंतु शेवटचा आदाम जीवनदायक आत्मा झाला.</verse>
				<verse number="46">तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही. भौतिक ते प्रथम, मग आध्यात्मिक.</verse>
				<verse number="47">पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे.</verse>
				<verse number="48">जे ऐहिक आहेत, ते मातीचे आहेत आणि जे स्वर्गीय आहेत, ते जो स्वर्गातला आहे त्याच्यासारखे आहेत.</verse>
				<verse number="49">जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप आपण धारण करू.</verse>
				<verse number="50">बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि जे मर्त्य आहे त्याला अमरत्व मिळू शकत नाही.</verse>
				<verse number="51">ऐका, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही, मात्र आपण सर्व जण बदलून जाऊ.</verse>
				<verse number="52">क्षणात, निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, मेलेले ते अविनाशी स्वरूपात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.</verse>
				<verse number="53">जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे.</verse>
				<verse number="54">विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो पूर्ण होईल.</verse>
				<verse number="55">अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे?</verse>
				<verse number="56">मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.</verse>
				<verse number="57">परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजयी करतो त्याला धन्यवाद!</verse>
				<verse number="58">म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">आता पवित्र जनांसाठी निधी गोळा करण्याविषयी मी गलतीयातील ख्रिस्तमंडळ्यांना आदेश दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.</verse>
				<verse number="2">तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल, त्या मानाने आपणाजवळ प्रत्येक रविवारी द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की, मी येईन तेव्हा ते गोळा केले जाऊ नये.</verse>
				<verse number="3">मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही मान्यता द्याल त्यांना तुमचे दान यरुशलेम येथे पोहोचविण्याकरता मी पत्रे देऊन पाठवीन.</verse>
				<verse number="4">मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील.</verse>
				<verse number="5">मी मासेदोनियामधून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियामधून जाणार आहे.</verse>
				<verse number="6">कदाचित मी तुमच्याजवळ राहीन, कदाचित हिवाळाही घालवीन, अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे जाण्यासाठी तुम्ही मला साहाय्य करू शकाल.</verse>
				<verse number="7">तुम्हांला केवळ धावती भेट द्यावी, अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याबरोबर राहण्याविषयी आशा बाळगून आहे.</verse>
				<verse number="8">पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन;</verse>
				<verse number="9">कारण पुष्कळ विरोधक जरी असले, तरीही परिणामकारक अशा कार्यासाठी मला तेथे पुष्कळ वाव आहे.</verse>
				<verse number="10">तेथे तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ आपल्याच घरी असल्यासारखे राहावे, असे त्याचे आदरातिथ्य करा; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे.</verse>
				<verse number="11">कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे माझ्याकडे पाठवा. बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.</verse>
				<verse number="12">आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली. तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा नाही, मात्र पुढे संधी मिळेल, तेव्हा तो येईल.</verse>
				<verse number="13">सावध असा, विश्वासात स्थिर राहा, निर्भय बना, सशक्त व्हा.</verse>
				<verse number="14">तुम्ही जे काही करता, ते सर्व प्रीतीने करावे.</verse>
				<verse number="15">बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनच्या घराण्याची माहिती आहे. ते अखया येथील प्रथम फळ आहे आणि त्याने स्वतःला पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे.</verse>
				<verse number="16">अशा लोकांना आणि जो कोणी सेवाकार्यात साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो.</verse>
				<verse number="17">स्तेफन, फर्तूनात व आखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे. तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे.</verse>
				<verse number="18">त्यांनी जसा तुम्हांला हुरूप आणला होता, तसाच मलाही हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांची दखल घ्या.</verse>
				<verse number="19">आशियातल्या ख्रिस्तमंडळ्यांच्या तुम्हांला शुभेच्छा आहेत. अक्‍विला, प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती, तुम्हांला प्रभूमध्ये हार्दिक शुभेच्छा देत आहे.</verse>
				<verse number="20">सर्व बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. बंधुभावात्मक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या.</verse>
				<verse number="21">माझ्या, पौलाच्या स्वतःच्या, तुम्हांला शुभेच्छा - हे मी स्वतःच्या हाताने लिहीत आहे.</verse>
				<verse number="22">जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. आमच्या प्रभो, ये!</verse>
				<verse number="23">प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.</verse>
				<verse number="24">ख्रिस्तामध्ये माझी प्रीती तुम्हां सर्वांवर असो, आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="47">
			<chapter number="1">
				<verse number="1">देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून:करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस शुभेच्छा.</verse>
				<verse number="2">देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून तुम्हांला कृपा व शांती मिळो.</verse>
				<verse number="3">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, दयाघन पिता व सर्वप्रकारे सांत्वनकर्ता देव, ह्याचे आपण आभार मानू या.</verse>
				<verse number="4">तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो. आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. त्या सांत्वनाने आम्ही संकटग्रस्तांचे सांत्वन करण्यास समर्थ आहोत.</verse>
				<verse number="5">कारण जसे आम्ही ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखांत सहभागी होतो, तसे ख्रिस्ताद्वारे आम्हांला सांत्वनही पुष्कळ मिळते.</verse>
				<verse number="6">जर आमच्यावर संकट येते, ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि जर आम्हांला सांत्वन मिळते, तर ते तुमचे सांत्वन करता यावे म्हणून मिळते, म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सहन करतो, तीच दुःखे धीराने सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळावे.</verse>
				<verse number="7">तुमच्याविषयी आमची आशा अढळ आहे. आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही आमच्या दुःखात सहभागी आहात तसे प्रभूकडून आम्हांला मिळणाऱ्या सांत्वनातही सहभागी आहात.</verse>
				<verse number="8">बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. कारण तिथे आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो. इतके की, आम्ही जगण्याची आशा सोडून दिली.</verse>
				<verse number="9">खरे तर आम्ही मरणारच, असे आमचे मन आम्हांला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे घडले.</verse>
				<verse number="10">त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या जीवघेण्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवेल, अशी त्याच्यामध्ये आम्हांला आशा आहे.</verse>
				<verse number="11">तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करता त्याप्रमाणे जो आशीर्वाद पुष्कळ जणांच्या प्रार्थनेमुळे आम्हांला मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ लोक देवाचे आभार मानतील.</verse>
				<verse number="12">खरे तर आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या औदार्याने व प्रामाणिकपणाने वागलो.</verse>
				<verse number="13">जे तुम्ही वाचू शकता व समजू शकता त्यावाचून दुसरे काही आम्ही तुम्हांला लिहीत नाही. परंतु जरी तुम्ही आता आमची शिकवण अंशतः समजत असला, तरी आम्हांला आशा आहे की, तुम्हांला पूर्ण समज येईल. ज्यामुळे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी आम्हांला जसा तुमचा अभिमान वाटेल, तसा तुम्हांलाही आमचा अभिमान वाटेल.</verse>
				<verse number="14"></verse>
				<verse number="15">अशी खातरी बाळगून तुम्हांला दुप्पट कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे,</verse>
				<verse number="16">तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे आणि तुम्ही मला यहुदियाकडे जाण्यासाठी मदत करावी, असा माझा बेत होता.</verse>
				<verse number="17">तर असा बेत करताना मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय-नाही अशी धरसोड करता यावी म्हणून मी जी योजना करतो, ती स्वार्थी वृत्तीने करतो काय?</verse>
				<verse number="18">देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय-नाही असे द्विधावृत्तीचे नव्हते;</verse>
				<verse number="19">कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची जी घोषणा आमच्याकडून म्हणजे सिल्वान, तिमथ्य व माझ्याकडून, तुमच्यामध्ये झाली ती होय-नाही अशी नव्हती, तर त्याच्यामध्ये होय अशीच ठाम स्वरूपाची होती.</verse>
				<verse number="20">देवाची वचने कितीही असोत, ख्रिस्तामध्ये ती होकारार्थीच असतात. म्हणून आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याच्याद्वारे होकार देतो,</verse>
				<verse number="21">परंतु परमेश्वर आम्हांला तुमच्याबरोबर ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व त्याने आमच्यावर अभिषेक केला आहे.</verse>
				<verse number="22">त्याने आमच्यासाठी जे सर्व काही राखून ठेवले आहे, त्याची शाश्वती म्हणून आमच्या अंतःकरणात त्याने त्याचा आत्मा पाठवला आहे.</verse>
				<verse number="23">माझे अंतःकरण जाणणाऱ्या देवाला साक्षी ठेवून मी सांगतो की, तुम्हांला त्रासापासून वाचविण्याकरिता मी करिंथ येथे जाण्याचे टाळले.</verse>
				<verse number="24">कारण तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ उभे आहात. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नव्हे, तर आम्ही तुमच्या आनंदाकरिता तुम्हांला साहाय्य करीत आहोत.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">मी मनात निश्चय केला होता की, दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये.</verse>
				<verse number="2">जर मी तुम्हांला दुःख देऊ लागलो, तर मला आनंद कोण देणार? ज्यांना मी दुःखी केले होते तेच ना?</verse>
				<verse number="3">म्हणूनच मी तुम्हांला पहिले पत्र लिहिले होते, ज्यामुळे मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद होईल, त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हां सर्वांविषयी अशी खातरी आहे की, माझा आनंद तो तुमच्या सर्वांचा आनंद आहे.</verse>
				<verse number="4">मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हांला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विपुल प्रीती आहे, ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.</verse>
				<verse number="5">परंतु जर कोणी दुसऱ्याला दुःख दिले असेल, तर त्याने ते मलाच नाही, तर काही प्रमाणात तुमच्या सर्वांना दिले.</verse>
				<verse number="6">अशा मनुष्याला तुमच्यापैकी बहुतेकांनी दिली ती शिक्षा पुरे.</verse>
				<verse number="7">म्हणून आता तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, म्हणजे तो अतिदुःखात बुडून जाऊ नये.</verse>
				<verse number="8">म्हणून मी तुम्हांला आर्जवून सांगतो, त्याच्यावर तुमची प्रीती आहे, अशी त्याची पुन्हा खातरी करून द्या.</verse>
				<verse number="9">हे मी जे लिहिले होते त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही, हे मला पहायचे होते.</verse>
				<verse number="10">ज्या कोणाला तुम्ही क्षमा करता त्याला मीही क्षमा करतो. मी क्षमा केली असली, तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे.</verse>
				<verse number="11">यात हेतू हा की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.</verse>
				<verse number="12">असो, मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी त्रोवस येथे आल्यावर माझ्यासाठी प्रभूने दार उघडले.</verse>
				<verse number="13">परंतु माझा बंधू तीत हा मला भेटला नाही म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.</verse>
				<verse number="14">परंतु ख्रिस्ताच्या विजययात्रेत बंदिवान म्हणून सहभागी करणाऱ्या आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध पसरविणाऱ्या देवाला आम्ही धन्यवाद देतो!</verse>
				<verse number="15">कारण तारण होत असलेल्या आणि नाश होत असलेल्या अशा लोकांसाठी आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा सुगंध आहोत;</verse>
				<verse number="16">नाश होत असलेल्या लोकांसाठी मृत्यूचा मरणसूचक गंध आणि तारणप्राप्ती होत असलेल्या लोकांसाठी जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण सक्षम आहे?</verse>
				<verse number="17">पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">आम्ही पुन्हा स्वतःची वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रे पाहिजेत काय?</verse>
				<verse number="2">आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळावे व त्यांनी ते वाचावे, असे तुम्हीच आमचे पत्र आहात.</verse>
				<verse number="3">स्वतः ख्रिस्ताने हे पत्र लिहिले असून आमच्याद्वारे ते तुमच्याकडे पाठविण्यात आले. हे पत्र शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने दगडी पाट्यांवर नव्हे तर मानवी हृदयावर लिहिलेले आहे.</verse>
				<verse number="4">आम्हांला ख्रिस्ताद्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे म्हणून आम्ही असे म्हणतो.</verse>
				<verse number="5">आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची क्षमता देवाकडून आलेली आहे.</verse>
				<verse number="6">त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी सक्षम केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख ठार करतो, परंतु आत्मा जिवंत करतो.</verse>
				<verse number="7">ज्याचा लेख दगडांवर कोरलेला असून ज्याचा शेवट मृत्यूत होत असे, ते सेवाकार्य एवढे तेजस्वी होते की, मोशेच्या मुखावरचे तेज नाहीसे होत चालले असतानाही इस्राएली लोकांना जर त्याच्या मुखाकडे टक लावून पाहवेना,</verse>
				<verse number="8">तर आध्यात्मिक सेवाकार्य अधिक प्रमाणात तेजस्वी असणार नाही काय?</verse>
				<verse number="9">ज्या व्यवस्थेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती अधिक तेजोमय असणार!</verse>
				<verse number="10">इतकेच नव्हे, तर जे तेजस्वी होते ते ह्या अपरंपार तेजापुढे निस्तेज ठरले.</verse>
				<verse number="11">अल्पावधीसाठी असलेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत आहे, ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार नाही का?</verse>
				<verse number="12">आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो.</verse>
				<verse number="13">इस्राएली लोकांनी जे निष्प्रभ होत होत नाहीसे होत चालले होते, ते तेज पाहू नये म्हणून मोशेने आपल्या मुखावर आच्छादन घातले होते, तसे आम्ही करत नाही.</verse>
				<verse number="14">परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते.</verse>
				<verse number="15">आजदेखील जुना करार वाचून दाखविण्यात येतो, तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन असते.</verse>
				<verse number="16">परंतु पवित्र शास्त्रात मोशेविषयी म्हटल्याप्रमाणे ते दूर केले जाऊ शकते:’तो प्रभूकडे वळला, तेव्हा त्याचे आच्छादन दूर करण्यात आले.’</verse>
				<verse number="17">येथे प्रभू म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे, तेथे स्वातंत्र्य आहे.</verse>
				<verse number="18">मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण, आरशातून प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करतो आणि पवित्र आत्म्याकडून येत असलेले हे वैभव आपल्याला प्रभूबरोबर अधिकाधिक एकरूप करीत आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">आमच्यावर झालेल्या दयेनुसार हे सेवाकार्य आमच्याकडे सोपवण्यात आले आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.</verse>
				<verse number="2">आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत. आम्ही फसवेगिरी करत नाही; देवाच्या वचनाचा विपर्यास होऊ न देता सत्य जाहीर करून प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला देवासमक्ष आवाहन करतो;</verse>
				<verse number="3">कारण आमचे शुभवर्तमान आच्छादिलेले असल्यास ज्यांचा नाश होत आहे, त्यांच्यासाठी ते आच्छादिलेले आहे.</verse>
				<verse number="4">त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.</verse>
				<verse number="5">कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही. तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूसाठी आम्ही तुमचे सेवक आहोत, अशी घोषणा आम्ही करतो.</verse>
				<verse number="6">अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे देव म्हणाला त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या वैभवशाली ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पाडला आहे.</verse>
				<verse number="7">तरीही आमचा आध्यात्मिक खजिना मातीच्या भांड्यात आहे, सामर्थ्याचा कळस देवामध्ये आहे, आमच्याकडे नाही, हे दाखविले जावे.</verse>
				<verse number="8">आमच्यावर सर्व बाजूंनी संकटे आली, तरी आम्ही चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलो, तरी निराश झालो नाही.</verse>
				<verse number="9">आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही.</verse>
				<verse number="10">आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते.</verse>
				<verse number="11">येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे ह्यासाठी आमचे आयुष्य आम्ही येशूसाठी सदाचे मरणाच्या हाती सोपवलेले आहे.</verse>
				<verse number="12">याचा अर्थ असा की, आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करीत आहे.</verse>
				<verse number="13">‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ असा धर्मशास्त्रलेख आहे. त्याच श्रद्धामय वृत्तीने आम्हीदेखील विश्वास धरतो म्हणून बोलतो.</verse>
				<verse number="14">आम्हांला हे ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला मरणातून उठविले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवून, तुमच्याबरोबर त्याच्या समक्षतेत नेईल.</verse>
				<verse number="15">हे सर्व काही तुमच्याकरिता आहे आणि देवाची कृपा जशी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तशी ते देवाच्या गौरवासाठी अधिक आभारप्रदर्शनात्मक प्रार्थना करतील.</verse>
				<verse number="16">म्हणूनच आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसागणिक नवा होत आहे</verse>
				<verse number="17">आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.</verse>
				<verse number="18">आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी शाश्वत आहेत.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">आम्हांला ठाऊक आहे की, जरी आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी घर म्हणजेच आमचे शरीर मोडून टाकण्यात आले, तरी देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले घर नसून शाश्वत घर आहे.</verse>
				<verse number="2">ह्या घरात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूपी वस्त्र परिधान करण्यासाठी आतूर होतो.</verse>
				<verse number="3">आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो तर, आम्ही शरीराविना सापडणार नाही.</verse>
				<verse number="4">जे आम्ही ह्या मंडपात आहोत, ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो. आमच्या ऐहिक शरीराचा त्याग करावा अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर स्वर्गीय वस्त्र परिधान करावे अशी इच्छा आम्ही बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे, ते जीवनाच्यायोगे संजीवित व्हावे.</verse>
				<verse number="5">देवाने आम्हांला ह्याकरिताच सिद्ध केले आहे आणि त्याने त्याचा आत्मा हमी म्हणून दिला आहे.</verse>
				<verse number="6">ह्यामुळे आम्ही सर्वदा धैर्य धरतो, आणि हे लक्षात ठेवतो की, आम्ही शरीरात वसती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत;</verse>
				<verse number="7">कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.</verse>
				<verse number="8">आम्ही धैर्य धरतो आणि शरीराचा त्याग करून प्रभूबरोबर राहणे आम्ही पसंत करू..</verse>
				<verse number="9">आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे.</verse>
				<verse number="10">कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपात प्रकट व्हावे लागते. प्रत्येकाने देहाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे फळ त्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर मिळावे.</verse>
				<verse number="11">म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. परमेश्वर आम्हांला पूर्णपणे ओळखतो आणि तुमच्या अंतःकरणात तुम्ही मला चांगल्या प्रकारे जाणता, अशी आशा मी धरतो.</verse>
				<verse number="12">आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हांला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची पुन्हा संधी मिळावी म्हणून असे लिहितो ज्यामुळे जे चारित्र्याबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हांला उत्तर देता यावे.</verse>
				<verse number="13">आम्ही भ्रमिष्ट झालो असलो, तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो, तर ते तुमच्यासाठी.</verse>
				<verse number="14">ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. एक सर्वांसाठी मरण पावला याचा अर्थ असा की, सर्व त्याच्या मरणात सहभागी झाले आहेत.</verse>
				<verse number="15">तो सर्वांसाठी ह्याकरता मरण पावला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मरण पावला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.</verse>
				<verse number="16">तर मग आत्तापासून आम्ही कोणाचा मानवी मापदंडाने न्याय करीत नाही. जरी आम्ही ख्रिस्ताला एकेकाळी मानवी दृष्टीकोणातून ओळखले होते, तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.</verse>
				<verse number="17">जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल, तर तो नवी निर्मिती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, सर्व काही नवीन झाले आहे.</verse>
				<verse number="18">हे देवाचे कार्य आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेट घडवून आणण्याचे सेवाकार्य आमच्यावर सोपविले.</verse>
				<verse number="19">म्हणजे जगातील लोकांची पापे त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेट घडवून आणण्याचा संदेश सोपवून दिला आहे.</verse>
				<verse number="20">ज्याअर्थी परमेश्वर आमच्याद्वारे आवाहन करीत आहे, त्याअर्थी आम्ही राजदूत आहोत म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही परमेश्वराबरोबर समेट केलेले व्हा.</verse>
				<verse number="21">ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले कारण त्याच्यामुळे आपले देवाबरोबरचे संबंध यथोचित व्हावेत.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">आम्ही देवाबरोबर कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही केलेला त्याच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ जाऊ देऊ नका.</verse>
				<verse number="2">कारण तो म्हणतो: ‘योग्य समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले. पाहा, उचित समय आत्ताच आहे. पाहा, आता तारणाचा दिवस आहे!’</verse>
				<verse number="3">आम्ही करत असलेल्या सेवाकार्यात काही दोष दिसून येऊ नयेत म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत नाही.</verse>
				<verse number="4">उलट, सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, यातना, विपत्ती, पेचप्रसंग,</verse>
				<verse number="5">मार खाण्यात, तुरुंगवासात, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टात, निद्राहीनतेत, उपासमारीत</verse>
				<verse number="6">तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, धीराने, चांगुलपणात, पवित्र वृत्तीने, खऱ्या प्रीतीने,</verse>
				<verse number="7">सत्यसंभाषणाने, देवाच्या सामर्थ्याने आणि ह्रा व संरक्षण करणाऱ्या नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी,</verse>
				<verse number="8">मान, अपमान व अपकीर्तीने, आम्ही आमची पात्रता पटवून देतो. आम्हाला फसविणारे म्हणून गणण्यात येते तरी आम्ही खरे आहोत.</verse>
				<verse number="9">अज्ञात असलो तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असलो तरी पाहा, आम्ही जिवंत आहोत. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी ठार मारलेले नाही.</verse>
				<verse number="10">दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे, गरीब असलो तरी पुष्कळांना सधन करणारे. कफल्‍लक असलो, तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आमची पात्रता पटवून देतो.</verse>
				<verse number="11">अहो, करिंथकरांनो, तुमच्याबरोबर आम्ही अगदी प्रांजळपणे बोलत आहोत. आमचे अंतःकरण एकदम खुले आहे.</verse>
				<verse number="12">आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे.</verse>
				<verse number="13">तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी तुमची अंतःकरणे आमच्या अंतःकरणासारखी एकदम खुली करा.</verse>
				<verse number="14">तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची सहभागिता कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?</verse>
				<verse number="15">ख्रिस्ताची एकवाक्यता सैतानाशी कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?</verse>
				<verse number="16">देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत! स्वतः देवाने असे म्हटले आहे, मी त्यांच्यामध्ये निवास करून राहीन व त्यांच्यात फिरेन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.</verse>
				<verse number="17">म्हणून, त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करीन.</verse>
				<verse number="18">मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ या.</verse>
				<verse number="2">तुम्ही आमचा अंगिकार करा, आम्ही कोणावर अन्याय केला नाही. कोणाचे नुकसान केले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही.</verse>
				<verse number="3">तुम्हांला दोषी ठरविण्यासाठी मी हे म्हणत आहे, असे नाही; कारण मी पूर्वी सांगितले आहे, त्याप्रमाणे तुम्हांला आमच्या अंतःकरणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तर तुमच्याबरोबर व जगणार तर तेही तुमच्याबरोबर.</verse>
				<verse number="4">मी वारंवार तुमच्याविषयी बढाई मारतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. मी तुमच्याविषयी समाधानी आहे. आमच्यावर ओढवलेल्या दु:खात मी अतिशय आनंदित आहे.</verse>
				<verse number="5">आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला आराम मिळाला नाही, परंतु आम्ही चहूकडून त्रस्त होतो. बाहेरून वादावादी आतून भय.</verse>
				<verse number="6">तथापि निराश झालेल्यांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या आगमनाने आम्हांला आनंदित केले.</verse>
				<verse number="7">त्याच्या केवळ येण्यामुळे नव्हे, तर तुम्ही त्याला कसे प्रोत्साहन दिले ह्याविषयी ऐकून मला आनंद झाला. मला भेटण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात, तुम्हांला किती खेद वाटतो व माझे समर्थन करण्यासाठी तुम्ही कसे तयार आहात, हे सर्व आम्हांला सांगत असताना तुमच्याविषयी त्याला जो आनंद झाला ते पाहून माझा आनंद द्विगुणित झाला.</verse>
				<verse number="8">मी माझ्या पत्राने तुम्हांला दुःख दिले, ह्याबद्दल मला आता वाईट वाटत नाही. त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दुःख होईल असे मला दिसले असते, तर मला वाईट वाटले असते.</verse>
				<verse number="9">परंतु आता मी आनंदी आहे. तुम्हांला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले म्हणून. त्या दुःखाचा देवाने उपयोग करून घेतला म्हणून तुम्हांला काही इजा पोहोचली नाही.</verse>
				<verse number="10">देवाकडून आलेले दुःख तारणदायक पश्चात्तापास कारणीभूत होते त्याबद्दल खेद वाटत नाही! पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.</verse>
				<verse number="11">पाहा, देवाकडून आलेल्या तुमच्या दुःखाचा देवाने किती उपयोग करून घेतला: ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी केवढी उत्सुकता, केवढा आदर, केवढा प्रामाणिकपणा, केवढी उत्कंठा, केवढा आवेश व केवढी न्यायबुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.</verse>
				<verse number="12">म्हणजे मी तुम्हांला लिहिले, ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवीत असलेल्या आवेशाची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले.</verse>
				<verse number="13">ह्यामुळे आमचे समाधान झाले आहे आणि आम्हांलाच नव्हे, तर विशेषकरून तीतला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुमच्या सर्वांकडून त्याच्या मनाला उभारी मिळाली.</verse>
				<verse number="14">मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी जो अभिमान बाळगला त्याबाबतीत तुम्ही मला अपमानित होण्याची वेळ आणली नाही, आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी सत्याला स्मरून बोललो, त्याप्रमाणे तीतबरोबर बोलताना आम्ही जो अभिमान व्यक्त केला तो खरा ठरला.</verse>
				<verse number="15">आदरयुक्त भीतीने कंपित होऊन, त्याचे स्वागत करून आज्ञाधारकपणा तुम्ही सर्वांनी कसा दर्शविला, ह्याची तो आठवण करतो, म्हणून त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत आहे.</verse>
				<verse number="16">मला सर्व बाबतींत तुमची खातरी वाटते याचा किती हर्ष होत आहे म्हणून सांगू!</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">बंधूंनो, मासेदोनियातील ख्रिस्तमंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवू इच्छितो.</verse>
				<verse number="2">संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची उदंड उदारवृत्ती दिसून आली.</verse>
				<verse number="3">त्यांनी आपल्या ऐपतीनुसार व ऐपतीपलीकडेही आपण होऊन दान दिले, हे मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगू इच्छितो.</verse>
				<verse number="4">त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक विनंती केली की, यहुदियातील पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.</verse>
				<verse number="5">आम्हांला आशा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी प्रथम स्वतःचे समर्पण प्रभूला केले आणि देवाच्या इच्छेनुसार स्वतःस आमच्यासाठीदेखील वाहून घेतले.</verse>
				<verse number="6">ह्यावरून आम्ही तीतजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता, त्याप्रमाणे कृपेचे हे कार्य तुमच्यामध्ये पूर्णत्वास न्यावे.</verse>
				<verse number="7">विश्वास, भाषण, ज्ञान, आत्यंतिक उत्सुकता व आमची तुमच्यावरील प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे, अशी आमची इच्छा आहे.</verse>
				<verse number="8">मी तुमच्याकरिता आदेश देत नाही, तर दुसऱ्यांच्या कळकळीच्या तुलनेत तुमच्या प्रीतीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी मी हे सांगत आहे.</verse>
				<verse number="9">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.</verse>
				<verse number="10">तुम्ही गेल्या वर्षी जे कार्य सुरू केले आहे, ते आता पूर्ण करावे, हे तुमच्या हिताचे आहे, असे माझे मत आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला इतकेच नव्हे तर तशा प्रकारचे कार्य करण्याची इच्छा बाळगण्यातही तुम्ही अग्रेसर होता.</verse>
				<verse number="11">तर हे कार्य आता पूर्ण करा. ह्यासाठी की, जशी योजना करण्याची उत्सुकता तुम्हाला होती, तशी तुमच्या कुवतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी.</verse>
				<verse number="12">जर तुम्ही द्यायला उत्सुक असाल, तर देण्यासाठी तुमच्याजवळ जे आहे त्यानुसार, जे नाही त्यानुसार नव्हे, परमेश्वर तुमचे दान स्वीकारील.</verse>
				<verse number="13">दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही.</verse>
				<verse number="14">तर हे समानतेने व्हावे म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी समानता व्हावी.</verse>
				<verse number="15">‘ज्याने फार गोळा केले होते, त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते, त्याचे काही कमी भरले नाही,’ असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.</verse>
				<verse number="16">तुम्हांला साहाय्य करण्याच्या बाबतीत तीतच्या मनात तुमच्याविषयी माझ्यासारखीच उत्सुकता उत्पन्न करणाऱ्या देवाचे आभार मानू या.</verse>
				<verse number="17">कारण तीतने आमचे आवाहन तर मान्य केलेच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे यावयास निघाला.</verse>
				<verse number="18">त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे. शुभवर्तमान घोषित करण्यासंबंधी ख्रिस्तमंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.</verse>
				<verse number="19">केवळ इतकेच नव्हे तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची सदिच्छा दिसून यावी म्हणून आम्ही करीत असेलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी ख्रिस्तमंडळ्यांनी त्याची निवड करून त्याला नेमले आहे.</verse>
				<verse number="20">आम्ही उदारहस्ते करीत असलेल्या कार्यात आमचा हेतू असा आहे की, आम्हांला उदारहस्ते मिळालेल्या ह्या देणगीचा आम्ही कसा विनियोग करतो ह्या बाबतीत आमच्यावर कोणी ठपका ठेवू नये.</verse>
				<verse number="21">आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे योग्य, इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे उचित, ते करण्याची खबरदारी घेतो.</verse>
				<verse number="22">म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवीत आहोत. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.</verse>
				<verse number="23">तीतविषयी कोणी विचारील, तर तो माझा भागीदार व तुमच्या सेवेत माझा सहकारी आहे. त्यांच्याबरोबर येत असलेल्या आमच्या इतर बांधवांविषयी म्हणाल, तर ते ख्रिस्तमंडळ्यांचे प्रेषित, ख्रिस्ताचे वैभव असे आहेत.</verse>
				<verse number="24">म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या प्रीतीचे आणि तुमच्याविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण ख्रिस्तमंडळ्यांसमक्ष दाखवा.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">यहुदियामधील पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;</verse>
				<verse number="2">कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने सांगत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आहे आणि ह्या तुमच्या आवेशाने तेथील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.</verse>
				<verse number="3">तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवीत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले तसे तुम्ही तयार असावे.</verse>
				<verse number="4">नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही, असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आम्हांला किती शरम वाटू लागेल! आणि तुमच्या फजितीविषयी तर काही बोलायलाच नको!</verse>
				<verse number="5">म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी जाहीर केली होती, ती जमा करून तयार ठेवावी, म्हणून तुमच्याकडे माझ्या अगोदर येण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. मी येईन तेव्हा तुमची देणगी तयार असेल आणि हे निदर्शनास येईल की, तुमच्यांवर सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर स्वेच्छेने तुम्ही दान देत आहात.</verse>
				<verse number="6">हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो, तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो, तो मोठ्या प्रमाणात कापणी करील.</verse>
				<verse number="7">प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, नाखुशीने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.</verse>
				<verse number="8">सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हांला भरपूर प्रमाणात देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे.</verse>
				<verse number="9">तो चहूकडे वाटप करीत असतो, गरजवंतांना सढळ हस्ते देत असतो, त्याचे न्यायीपण युगानुयुगे अबाधित राहते, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.</verse>
				<verse number="10">जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खायला अन्न पुरवतो, तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे पीक वाढवील.</verse>
				<verse number="11">म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, आमच्याद्वारे मिळणाऱ्या तुमच्या औदार्यामुळे पुष्कळ लोक देवाला धन्यवाद देतील.</verse>
				<verse number="12">ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात, केवळ इतकेच नव्हे, तर तिच्याद्वारे देवाचे अधिकाधिक आभार मानले जातात.</verse>
				<verse number="13">ह्या तुमच्या सेवेमधून हे सिद्ध होते की, तुम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान पतकरण्याच्या बाबतीत निष्ठा दाखविल्यामुळे आणि त्यांना व सर्वांना दान देण्याचे औदार्य दाखविल्यामुळे देवाचा गौरव होतो.</verse>
				<verse number="14">तुमच्यावर देवाची अपार कृपा झाली आहे म्हणून ते तुमच्याकरिता मोठ्या आत्मीयतेने प्रार्थना करतात.</verse>
				<verse number="15">देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ या.</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">मी पौल तुमच्यासमोर असताना तुमच्याशी लीनपणे व सौम्यतेने वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कठोरपणे वागतो, असे म्हटले जाते. मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो.</verse>
				<verse number="2">माझे मागणे असे आहे: आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत, असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी मला कडकपणे बोलावेसे वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आणू नये.</verse>
				<verse number="3">कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.</verse>
				<verse number="4">आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत.</verse>
				<verse number="5">तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व अडसर पाडून टाकून प्रत्येक कल्पना बंदिस्त करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो</verse>
				<verse number="6">आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध असू.</verse>
				<verse number="7">तुम्ही बाह्य स्वरूप तेवढे पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत, असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल, तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत.</verse>
				<verse number="8">आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला आहे, ह्याविषयी मी काहीशी जास्तच प्रौढी मिरवली आहे, तरी मला संकोच वाटत नाही.</verse>
				<verse number="9">मी तुम्हांला पत्रांद्वारे भयभीत करून सोडतो, असे मला दाखवायचे नाही.</verse>
				<verse number="10">कुणी म्हणेल, पौलाची पत्रे गंभीर व कडक आहेत. परंतु तो प्रत्यक्ष आमच्याबरोबर असताना दुर्बल असतो व त्याचे भाषण तिरस्करणीय असते.</verse>
				<verse number="11">अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना जे काही पत्रात लिहितो तेच आम्ही जवळ असताना करीत असतो.</verse>
				<verse number="12">जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करतात व आपसांत एकमेकांशी तुलना करतात. हे सुबुद्धपणाचे नाही.</verse>
				<verse number="13">आम्ही प्रतिष्ठा मिरविली, तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला दिलेल्या सेवाकार्याच्या मर्यादेतच मिरवू. त्यात तुमच्यापर्यंत येऊन पोहचलेल्या आमच्या सेवाकार्याचा समावेश होतो.</verse>
				<verse number="14">ख्रिस्ताचे शुभवर्तमान घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा आम्ही ह्या मर्यादेचे उलंघन करीत नव्हतो कारण ती मर्यादा तुमच्यापर्यंत पोहोचत होती.</verse>
				<verse number="15">आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतसे आमच्या सेवाकार्याचे क्षेत्र तुमच्यामध्ये देवाने घालून दिलेल्या मर्यादेत अधिकाधिक वाढत जाईल, अशी आम्हांला आशा आहे.</verse>
				<verse number="16">त्यानंतर तुमच्यापलीकडच्या देशांत शुभवर्तमान घोषित करणे आम्हांला शक्य होईल आणि दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवण्याची आम्हांला गरज भासणार नाही.</verse>
				<verse number="17">परंतु असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी’.</verse>
				<verse number="18">आत्मप्रौढी करणाऱ्यांना मान्यता मिळत नाही, तर ज्यांची प्रभू शिफारस करतो, त्यांना मिळते.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, खरे म्हणजे ते तुम्ही करीतच आहात.</verse>
				<verse number="2">तुमच्याविषयीची माझी ईर्ष्या देवाच्या ईर्ष्येसारखी आहे. मी फक्त एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारिका म्हणून ख्रिस्ताला सादर करावे.</verse>
				<verse number="3">सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;</verse>
				<verse number="4">कारण तुम्ही आनंदाने असा माणूस खपवून घेता जो, आम्ही ज्याची घोषणा केली नाही, अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आत्म्यापेक्षा निराळा आत्मा तुम्ही स्वीकारता अथवा तुम्ही स्वीकारलेल्या शुभवर्तमानापेक्षा निराळे शुभवर्तमान स्वीकारता व सहजपणे तुम्ही त्याच्या आहारी जाता.</verse>
				<verse number="5">परमश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही, असे मी मानतो.</verse>
				<verse number="6">कदाचित मी भाषण करण्यात प्रवीण नसलो, तरी ज्ञानात कमी नाही, हे आम्ही तुम्हांला सर्वदा प्रत्येक परिस्थितीत दाखवून दिले आहे.</verse>
				<verse number="7">तुम्ही महान व्हावे म्हणून मी स्वतःला लीन करून देवाचे वचन विनामूल्य तुम्हाला सांगितले, हे मी पाप केले काय?</verse>
				<verse number="8">मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या ख्रिस्तमंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना जणू काही लुटले</verse>
				<verse number="9">आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी स्वतःला सांभाळले व सांभाळेन!</verse>
				<verse number="10">माझ्यातील ख्रिस्ताच्या सत्याला स्मरून मी सांगतो की, माझा हा अभिमान संपूर्ण अखया प्रांतात कुठेही नाकारला जाणार नाही.</verse>
				<verse number="11">मी तुमच्यावर प्रीती करीत आहे म्हणून मी हे बोलत आहे. देवाला ठाऊक आहे की, मी तुमच्यावर प्रीती करतो.</verse>
				<verse number="12">जे मी आत्ता करतो, ते मी करत राहीन, ज्यामुळे त्या दुसऱ्या प्रेषितांना आम्ही त्यांच्यासारखेच सेवाकार्य करतो अशी बढाई मारण्याची व असे बोलण्याची सबब मिळू नये.</verse>
				<verse number="13">हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.</verse>
				<verse number="14">ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो!</verse>
				<verse number="15">म्हणून त्याच्या हस्तकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती फार मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कृत्यांना साजेसा होईल.</verse>
				<verse number="16">मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल, तर निदान जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन.</verse>
				<verse number="17">अर्थात मी जे बोलतो, ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो.</verse>
				<verse number="18">देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.</verse>
				<verse number="19">तुम्ही सुज्ञ आहात म्हणून आनंदाने मूढाचे सहन करता!</verse>
				<verse number="20">कोणी तुमच्यावर सत्ता चालविली किंवा तुमचा गैरफायदा घेतला किंवा कोणी तुमच्याविरुद्ध डावपेच रचले किंवा तुम्हांला हीन लेखले किंवा कोणी तुमच्या थोबाडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.</verse>
				<verse number="21">ही गोष्ट मान्य करायला मला शरम वाटते की, अशा गोष्टी करायला आम्ही फारच भित्रे होतो!</verse>
				<verse number="22">ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे.</verse>
				<verse number="23">ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.</verse>
				<verse number="24">पाच वेळा मी यहुदी लोकांच्या हातून चाबकाचे एकोणचाळीस फटके खाल्ले.</verse>
				<verse number="25">तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली.</verse>
				<verse number="26">मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे;</verse>
				<verse number="27">श्रम व कष्ट, किती तरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, अन्नवस्र व निवारा याविना काढलेले दिवस ह्या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.</verse>
				<verse number="28">शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांविषयी चिंता, ही आहे.</verse>
				<verse number="29">एखादा दुर्बळ असला, तर मलाही दुर्बलता जाणवते आणि जर एखाद्याला पाप करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, तर मला क्लेश होत नाहीत काय?</verse>
				<verse number="30">जर मला प्रौढी मिरवणे भाग पडले तर मी माझ्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.</verse>
				<verse number="31">प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुगे कृपावंत आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.</verse>
				<verse number="32">मी दिमिष्क येथे होतो, तेव्हा अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता त्या नगरावर रक्षक नेमले होते.</verse>
				<verse number="33">परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">प्रौढी मिरवणे मला भाग पडते. तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मला झालेले प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण ह्यांच्याकडे मी आता वळतो.</verse>
				<verse number="2">एक ख्रिस्तामधील मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे सर्वोच्च स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. (हे प्रत्यक्ष घडले किंवा त्याला तसा दृष्टान्त झाला, हे मला ठाऊक नाही. केवळ देवाला ठाऊक आहे,)</verse>
				<verse number="3">त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले (हे प्रत्यक्ष घडले किंवा त्याला तसा दृष्टान्त झाला, हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे.) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.</verse>
				<verse number="4"></verse>
				<verse number="5">अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.</verse>
				<verse number="6">जरी मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली, तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन. तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये.</verse>
				<verse number="7">प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे सैतानाचा एक हस्तक माझ्यावर प्रहार करण्याकरिता ठेवण्यात आला होता.</verse>
				<verse number="8">हा माझ्यापासून काढला जावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली.</verse>
				<verse number="9">परंतु त्याने मला म्हटले, ‘माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस पोहचते.’ म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.</verse>
				<verse number="10">ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ, आपत्ती ह्यांत मला समाधान आहे; कारण जेव्हा मी अशक्त असतो, तेव्हाच मी सशक्त असतो.</verse>
				<verse number="11">मी मूढ बनलो. असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावयाची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या परमश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही हलक्या दर्जाचा नाही.</verse>
				<verse number="12">खऱ्या प्रेषिताची चिन्हे, अद्भूत कृत्ये व महत्कृत्ये तुमच्यामध्ये अत्यंतिक धीराने करून दाखविण्यात आली.</verse>
				<verse number="13">मी आपला आर्थिक भार तुमच्यावर लादला नाही, ही बाब सोडली तर इतर ख्रिस्तमंडळ्यांपेक्षा तुमची दुरावस्था झाली काय? माझ्या ह्या दुष्कृत्याबद्दल मला क्षमा करा!</verse>
				<verse number="14">पाहा, तिसऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे. मी तुमच्यावर भार टाकणार नाही, मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.</verse>
				<verse number="15">मी तुमच्या जिवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर फारच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?</verse>
				<verse number="16">तर मग तुम्ही हे मान्य कराल की, मी तुमच्यावर भार घातला नाही, परंतु एखादा म्हणेल मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला खोटारडेपणाने पकडले.</verse>
				<verse number="17">कसे? ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाद्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय?</verse>
				<verse number="18">मी तीताला तुमच्याकडे येण्याची विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बांधवाला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला, असे तुम्ही म्हणाल काय? आम्ही दोघे सारख्याच हेतूंनी कार्य करीत नव्हतो काय? सारख्याच पद्धतीने वागत नव्हतो काय?</verse>
				<verse number="19">कदाचित आम्ही स्वतःचे समर्थन करीत आहोत, असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल. नाही! आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताला अनुसरून बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उभारणीसाठी आहे.</verse>
				<verse number="20">मला भीती वाटते की, मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे, तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही, तसा मी तुम्हांला दिसून येईन. कदाचित भांडणतंटे, मत्सर, राग, स्वार्थी वृत्ती, निंदानालस्ती, गप्पाटप्पा, घमेंड व गैरवागणूक हे सारे मला आढळून येईल.</verse>
				<verse number="21">मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहावयास लावील आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण केलेल्या अनैतिक गोष्टींचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला अश्रू ढाळावे लागतील.</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक आरोप निश्‍चित करणे आवश्यक असते.’</verse>
				<verse number="2">ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी पुन्हा आलो तर दयामाया दाखवणार नाही.</verse>
				<verse number="3">ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे, ह्याचे प्रमाण तुम्हांला मिळेल. तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिशाली आहे;</verse>
				<verse number="4">कारण त्यास जरी दुर्बलतेत वधस्तंभावर चढविण्यात आले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्याप्रमाणे दुर्बल आहोत, परंतु तुमच्याबरोबरच्या आमच्या संबंधांत आम्ही त्याच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याने संपन्न आहोत.</verse>
				<verse number="5">तुम्ही विश्वास ठेवता किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा आणि तुमचे तुम्हीच ठरवा. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाही तर तुम्ही कसोटीस उतरणार नाही.</verse>
				<verse number="6">कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही, हे तुम्ही ओळखाल असा माझा भरवसा आहे.</verse>
				<verse number="7">आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले आहोत, हे सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे दिसलो तरीही तुम्ही चांगले करावे म्हणून.</verse>
				<verse number="8">सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.</verse>
				<verse number="9">जेव्हा आम्ही दुर्बळ असतो आणि तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्हांला आनंद वाटतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो.</verse>
				<verse number="10">ह्यामुळे मी दूर असताना हे लिहितो, ते अशासाठी की, जो अधिकार जमीनदोस्त करण्यासाठी नव्हे तर उभारणी करण्यासाठी प्रभूने मला दिला आहे, त्या अधिकाराप्रमाणे तुमच्याकडे आल्यावर मला कठोरपणाने वागावयास लागू नये.</verse>
				<verse number="11">बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.</verse>
				<verse number="12">बंधुभावाने पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना शुभेच्छा द्या.</verse>
				<verse number="13">सर्व पवित्र जन तुम्हांला शुभेच्छा देत आहेत.</verse>
				<verse number="14">प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हां सर्वांबरोबर राहो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="48">
			<chapter number="1">
				<verse number="1">मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला</verse>
				<verse number="2"></verse>
				<verse number="3">आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो.</verse>
				<verse number="4">आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.</verse>
				<verse number="5">परमेश्वराचा युगानुयुगे गौरव असो!</verse>
				<verse number="6">मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याला सोडून तुम्ही इतक्या लवकर अन्य शुभवर्तमानाकडे वळत आहात.</verse>
				<verse number="7">खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो.</verse>
				<verse number="8">परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो!</verse>
				<verse number="9">आम्ही अगोदर सांगितले, तसे आता पुन्हा सांगतो की, तुम्ही स्वीकारले त्यापेक्षा निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापित असो!</verse>
				<verse number="10">मी आता माणसाची मान्यता मिळवू पाहत आहे काय? मुळीच नाही! मला देवाची मान्यता हवी आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करू पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना खुश करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो.</verse>
				<verse number="11">बंधूंनो, मी तुम्हांला कळवू इच्छितो की, मी घोषित करीत असलेले शुभवर्तमान कुणा माणसाने सुरू केलेले नाही.</verse>
				<verse number="12">कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे.</verse>
				<verse number="13">यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या ख्रिस्तमंडळीचा निष्ठुरपणे छळ करत असे व तिचा विध्वंस करत असे.</verse>
				<verse number="14">माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी फार आवेशी असल्यामुळे माझ्या समाजातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीत मी अधिक प्रगती केली होती.</verse>
				<verse number="15">परंतु देवाने जन्मापूर्वीपासून माझी निवड केली व आपल्या कृपेने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. मी यहुदीतर लोकांमध्ये त्याच्या पुत्राच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी म्हणून जेव्हा त्याने मला त्याचा पुत्र प्रकट करून दाखवला, तेव्हा माणसांचा सल्‍ला न घेता</verse>
				<verse number="16"></verse>
				<verse number="17">आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिष्काला पुन्हा परत आलो.</verse>
				<verse number="18">तीन वर्षांनंतर मी यरुशलेम येथे पेत्राला भेटायला गेलो व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो.</verse>
				<verse number="19">प्रभूचा बंधू याकोब याच्याशिवाय प्रेषितांपैकी इतर कोणाची माझी भेट झाली नाही.</verse>
				<verse number="20">तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे, ते खोटे लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो.</verse>
				<verse number="21">नंतर सूरिया व किलिकिया ह्या ठिकाणी मी गेलो.</verse>
				<verse number="22">त्या वेळी ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील ख्रिस्तमंडळ्या मला व्यक्तिशः ओळखत नव्हत्या.</verse>
				<verse number="23">त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, पूर्वी हा मनुष्य आपला छळ करायचा आणि ज्या विश्वासाचा व प्रभूमार्गाचा तो विध्वंस करू पाहत होता, त्याच विश्वासाची व प्रभूमार्गाची तो आता घोषणा करू लागला आहे</verse>
				<verse number="24">आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचा गौरव केला.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो. मी माझ्याबरोबर तीतलाही घेतले होते.</verse>
				<verse number="2">मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या शुभवर्तमानाची मी यहुदीतर लोकांत घोषणा करत असतो, त्याविषयी तेथील नेत्यांना एक खासगी सभा घेऊन निवेदन केले. माझे भूतकालीन किंवा वर्तमानकालीन सेवाकार्य व्यर्थ ठरू नये, म्हणून मी हे केले.</verse>
				<verse number="3">माझा सहकारी तीत हा ग्रीक असता त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.</verse>
				<verse number="4">काहींची मात्र तशी इच्छा होती. हे लोक श्रद्धावंत असल्याचे ढोंग करीत होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते हेरून पाहण्यासाठी हे लोक गुप्तपणे आमच्या संघात सामील झाले होते. आम्ही पुन्हा गुलामगिरीत पडावे अशी त्यांची इच्छा होती.</verse>
				<verse number="5">शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याजवळ सुरक्षित राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही थारा दिला नाही.</verse>
				<verse number="6">परंतु जे कोणी नेते म्हणून मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही, देव पक्षपात करीत नाही) त्यांनी माझ्या शुभवर्तमानात काही भर घातली नाही.</verse>
				<verse number="7">उलट, ज्याप्रमाणे सुंता झालेल्या म्हणजेच यहुदी लोकांना शुभवर्तमान घोषित करण्याचे काम देवाने पेत्रावर सोपवले होते त्याचप्रमाणे सुंता न झालेल्या लोकांना म्हणजेच यहुदीतर लोकांना शुभवर्तमान सांगण्याचे काम देवाने माझ्याकडे सोपवले आहे, हे त्यांनी ओळखले</verse>
				<verse number="8">कारण जसे पेत्राला यहुदी लोकांकरिता प्रेषित म्हणून नेमण्यात आले होते, तसे देवाच्या सामर्थ्याने मला यहुदीतर लोकांसाठी प्रेषित म्हणून नेमण्यात आले होते.</verse>
				<verse number="9">मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे.</verse>
				<verse number="10">मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती आणि मला तीच गोष्ट करण्याची उत्कंठा होती.</verse>
				<verse number="11">पुढे पेत्र अंत्युखिया येथे आला तेव्हा तो खरोखर चुकत होता म्हणून मी त्याला उघडपणे विरोध केला.</verse>
				<verse number="12">कारण याकोबकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो यहुदीतर लोकांच्या पंक्तीत बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.</verse>
				<verse number="13">त्याच्याबरोबर बाकीच्या यहुदी लोकांनीदेखील डरपोकपणा दाखवला. हे पाहून बर्णबाही त्यांच्याकडे ओढला गेला.</verse>
				<verse number="14">शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे जेव्हा मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले, “तू यहुदी असताही यहुदीतर लोकांसारखा वागतोस, यहुदी लोकांसारखा वागत नाहीस, तर यहुदीतर लोकांनी यहुदी लोकांसारखे वागावे म्हणून तू त्यांना भाग पाडतोस, हे कसे?”</verse>
				<verse number="15">आम्ही जन्मतः यहुदी आहोत. ज्यांना पापी यहुदीतर लोक म्हटले जाते, असे आम्ही नाही.</verse>
				<verse number="16">तरीही मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करू शकत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते होत असते, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे, ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करावेत. नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यमात्रापैकी कोणीही हे करू शकत नाही.</verse>
				<verse number="17">ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविले जात असता, आम्हीही पापी असलेले आढळून आलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? मुळीच नाही.</verse>
				<verse number="18">नियमशास्त्राची जी व्यवस्था मी मोडून टाकली तीच मी पुन्हा उभारीत असलो, तर मी स्वतःला उ्रंघन करणारा ठरवतो.</verse>
				<verse number="19">कारण मी देवाकरिता जगावे म्हणून मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो.</verse>
				<verse number="20">मला ख्रिस्ताबरोबर क्रुसावर चढविण्यात आले आहे आणि त्यामुळे ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता देहामध्ये जे माझे जीवन आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता अर्पण केले.</verse>
				<verse number="21">देवाच्या कृपेला निरर्थक ठरविणे मला मान्य नाही; कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्याद्वारे मिळते, तर ख्रिस्ताचे मरण अनावश्यक ठरते!</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">अहो गलतीयातील बुध्दिहीन लोकांनो, क्रुसावर चढविलेल्या येशू ख्रिस्ताचे स्पष्ट वर्णन तुमच्यापुढे असता तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?</verse>
				<verse number="2">तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा शुभवर्तमान ऐकून त्यावर विश्वास ठेवल्यामुळे मिळाला, इतकेच मला तुमच्याकडून समजून घ्यावयाचे आहे.</verse>
				<verse number="3">तुम्ही इतके बुद्धिहीन कसे काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने सुरुवात केली असता आता स्वतःच्या शक्तीने पूर्ण करणार काय?</verse>
				<verse number="4">तुम्ही इतकी दुःखे सहन केली, हे व्यर्थ आहे काय?</verse>
				<verse number="5">जो तुम्हाला आत्मा पुरवितो व तुमच्यामध्ये चमत्कार करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याने करतो?</verse>
				<verse number="6">ज्याप्रमाणे अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमान असे गणण्यात आले, तसे हे आहे.</verse>
				<verse number="7">ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, विश्वास ठेवणारेच अब्राहामचे खरे वंशज आहेत.</verse>
				<verse number="8">‘देव यहुदीतर लोकांना विश्वासाने नातिमान ठरविणार,’ ह्या धर्मशास्त्रलेखातील भाकितामुळे अब्राहामला पूर्वीच हे शुभवर्तमान सांगण्यात आले होते की, ‘तुझ्यामध्ये यहुदीतर आणि सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील.’</verse>
				<verse number="9">म्हणून जे विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामप्रमाणे आशीर्वाद मिळतो.</verse>
				<verse number="10">नियमशास्त्रातील कृत्यांवर अवलंबून राहणारे जितके लोक आहेत, तितके सर्व शापित आहेत, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे, ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित आहे.’</verse>
				<verse number="11">नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल’, असा धर्मशास्त्रलेख आहे.</verse>
				<verse number="12">परंतु नियमशास्त्राचा विश्वासाशी संबंध नाही. उलट, धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘जो त्यातील कृत्ये आचरणात आणतो, तो त्यांच्या योगे जगेल.’</verse>
				<verse number="13">आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे.</verse>
				<verse number="14">ह्यात उद्देश हा की, अब्राहामला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये यहुदीतर लोकांना मिळावा, ज्यामुळे आपणाला विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.</verse>
				<verse number="15">बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो, माणसांनीदेखील कायम केलेले मृत्युपत्र कोणी एकटाच रद्द करू शकत नाही किंवा त्यात भर घालू शकत नाही.</verse>
				<verse number="16">अब्राहामला व त्याच्या संतानाला देवाने अभिवचने दिली. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने म्हणजे अनेक वचनी असे तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक म्हणजे ख्रिस्त.</verse>
				<verse number="17">मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच अब्राहामबरोबर करार केला व तो पाळण्याचे त्याने अभिवचन दिले. चारशे तीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे हा करार संपुष्टात येत नाही व अभिवचन रद्द होत नाही.</verse>
				<verse number="18">कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण देवाने मात्र ते अब्राहामला अभिवचनाद्वारे कृपादान म्हणून दिले आहे.</verse>
				<verse number="19">नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन देण्यात आले होते, त्या संतानाच्या आगमनापर्यंत नियमशास्त्र हे उ्रंघनाच्या संदर्भात देण्यात आले होते. ते एका मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांद्वारे देण्यात आले.</verse>
				<verse number="20">परंतु एका व्यक्तीचाच संबंध असल्यामुळे मध्यस्थाची गरज नव्हती आणि परमेश्वर एक आहे.</verse>
				<verse number="21">तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? मुळीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते, तर नियमशास्त्र पाळून सर्वांना नीतिमत्व प्राप्त करून घेता आले असते.</verse>
				<verse number="22">परंतु धर्मशास्त्रलेख असे म्हणतो की, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे अभिवचन मिळते ते देण्यात यावे.</verse>
				<verse number="23">पुढे येणाऱ्या विश्वासाची प्रकट होण्याची वेळ येण्यापूर्वी आपल्याला नियमशास्त्राने पापाच्या तुरुंगात कोंडून ठेवले होते.</verse>
				<verse number="24">म्हणजेच आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे रक्षक होते.</verse>
				<verse number="25">परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे त्या रक्षकाच्या अधीन नाही.</verse>
				<verse number="26">तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात.</verse>
				<verse number="27">तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला जणू परिधान केले आहे.</verse>
				<verse number="28">यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात.</verse>
				<verse number="29">तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारे वारस आहात.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत अल्पवयीन आहे, तोपर्यंत तो सर्वं मालमत्तेचा धनी असूनही तो व गुलाम यांच्यामध्ये काही फरक नसतो.</verse>
				<verse number="2">बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो.</verse>
				<verse number="3">त्याचप्रमाणे आपणही अल्पवयीन होतो, तेव्हा आपणदेखील ह्या विश्वातील सत्ताधिकारी आत्म्यांच्या गुलामगिरीत होतो.</verse>
				<verse number="4">परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.</verse>
				<verse number="5">ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.</verse>
				<verse number="6">तुम्ही पुत्र आहात, हे दर्शविण्यासाठी देवाने ‘पित्या, माझ्या पित्या’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे.</verse>
				<verse number="7">ह्यावरून तू आत्तापासून गुलाम नाहीस, तर पुत्र आहेस आणि म्हणूनच देवाने आपल्या लेकरांकरिता जे राखून ठेवले आहे, ते सर्व तो तुला देईल.</verse>
				<verse number="8">पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता आणि त्यामुळे जे वस्तुतः देव नाहीत, त्यांचे तुम्ही गुलाम होता.</verse>
				<verse number="9">परंतु आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बल व हीन दर्जाच्या दैवतांकडे पुन्हा कसे वळता? त्यांचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा का बाळगता?</verse>
				<verse number="10">विशिष्ट वार, महिने, सणाचे काळ व वर्षे हे तुम्ही पाळता.</verse>
				<verse number="11">तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.</verse>
				<verse number="12">बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही तसा मीही होतो, तुम्ही माझे काही वाईट केले नाही.</verse>
				<verse number="13">तुम्हांला शुभवर्तमान सांगण्याची पहिली संधी मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाली, हे तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="14">तुम्हांला अडचणीत टाकण्याइतकी माझी प्रकृती बिघडलेली असताना तुम्ही माझा धिक्वार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केला.</verse>
				<verse number="15">त्या वेळी तुम्हांला किती आनंद झाला होता! मग आता काय झाले? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे काढून ते मला दिले असते.</verse>
				<verse number="16">मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?</verse>
				<verse number="17">ते दुसरे लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला माझ्यापासून वेगळे ठेवू पाहतात.</verse>
				<verse number="18">तुम्हांला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची खटपट करावी हे चांगले आहे, मात्र ते चांगल्या हेतूने करायला हवे. हे सर्वदा खरे आहे आणि केवळ मी तुमच्यांजवळ आहे, तेव्हाच खरे आहे असे नाही.</verse>
				<verse number="19">माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसृतीवेदना होत आहेत.</verse>
				<verse number="20">ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते, तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी चिंताग्रस्त झालो आहे.</verse>
				<verse number="21">जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.</verse>
				<verse number="22">धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.</verse>
				<verse number="23">दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला देवाच्या वचनामुळे जन्मला.</verse>
				<verse number="24">ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत, त्या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार होत, एक स्त्री म्हणजे हागार. हिची मुले गुलामगिरीत जन्मला आली. सीनाय पर्वतावर केलेल्या कराराची ती प्रतिनिधी आहे.</verse>
				<verse number="25">हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचा निर्देश करते आणि ह्रीची यरुशलेम नगरी तिच्यासारखी आहे. ती आपल्या मुलांबाळासह गुलामगिरीत आहे.</verse>
				<verse number="26">परंतु स्वर्गीय यरुशलेम नगरी स्वतंत्र असून ती आपली माता आहे.</verse>
				<verse number="27">धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला कधीच प्रसूतिवेदना झाल्या नाहीत, ती तू आनंदाने आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा परित्यक्त अशा स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.</verse>
				<verse number="28">बंधुजनहो, इसहाकप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.</verse>
				<verse number="29">त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला आणि आत्ताही तसा होत आहे.</verse>
				<verse number="30">पण धर्मशास्रलेख काय म्हणतो? ‘त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणार नाही.’</verse>
				<verse number="31">म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्‍त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.</verse>
				<verse number="2">पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताची तुम्हांला काही गरज नाही.</verse>
				<verse number="3">सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा बजावून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे.</verse>
				<verse number="4">जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही देवाच्या कृपेला अंतरला आहात.</verse>
				<verse number="5">आम्ही मात्र विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नीतिमान ठरण्याची आशा बाळगून वाट पाहत आहोत.</verse>
				<verse number="6">कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.</verse>
				<verse number="7">तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले?</verse>
				<verse number="8">तुम्हांला पाचारण करणाऱ्याची ही बुद्धी नव्हे.</verse>
				<verse number="9">थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते, असे म्हटले जाते.</verse>
				<verse number="10">मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील.</verse>
				<verse number="11">बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता.</verse>
				<verse number="12">तुमच्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःचे खच्चीकरण करून घेतील तर बरे होईल.</verse>
				<verse number="13">बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा;</verse>
				<verse number="14">‘कारण जशी आपणावर, तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,’ या एका आज्ञेत सर्व नियम सामावलेले आहेत.</verse>
				<verse number="15">परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.</verse>
				<verse number="16">मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि देहवासना पूर्ण करू नका.</verse>
				<verse number="17">देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरूद्ध आहे, दोन्ही परस्परविरुध्द आहे आणि ह्यामुळे जे काही तुम्ही करू इच्छिता ते तुमच्या हातून घडू शकत नाही.</verse>
				<verse number="18">तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.</verse>
				<verse number="19">देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही: जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा,</verse>
				<verse number="20">मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, भांडणतंटे, फुटिरता, पक्षभेद,</verse>
				<verse number="21">हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते, तेच आता सांगतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.</verse>
				<verse number="22">परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा,</verse>
				<verse number="23">सौम्यता व आत्मनियंत्रण हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.</verse>
				<verse number="24">जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.</verse>
				<verse number="25">आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.</verse>
				<verse number="26">आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांविरुद्ध स्पर्धा करणारे व एकमेकांचा हेवा करणारे असू नये.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, ते तुम्ही अशा माणसाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. मात्र तुम्हीदेखील मोहात पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.</verse>
				<verse number="2">एकमेकांची ओझी वाहण्याकरिता हातभार लावा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.</verse>
				<verse number="3">आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.</verse>
				<verse number="4">प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वर्तनाचे परीक्षण करावे म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.</verse>
				<verse number="5">प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.</verse>
				<verse number="6">ज्याला ख्रिस्ती संदेशाचे शिक्षण दिले जात आहे, त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या गोष्टीत सहभागी करावे.</verse>
				<verse number="7">फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल.</verse>
				<verse number="8">जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावाकडून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्याकडून शाश्वत जीवन हे पीक मिळेल.</verse>
				<verse number="9">म्हणून चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.</verse>
				<verse number="10">तर मग आपणाला ज्याप्रमाणे संधी मिळेल, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः श्रद्धेमुळे जे आपल्या परिवाराचे सदस्य झाले आहेत, त्यांचे हित साधावे.</verse>
				<verse number="11">पाहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हांला लिहीत आहे!</verse>
				<verse number="12">जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या क्रुसामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.</verse>
				<verse number="13">सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तुमची सुंता व्हावी असा त्यांचा आग्रह अशासाठी असतो की, तुम्ही त्यांच्या शारीरिक विधीचे पालन केले, अशी त्यांना बढाई मारता यावी.</verse>
				<verse number="14">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या क्रुसाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; कारण त्याच्या क्रुसाद्वारे जगाने मला क्रुसावर खिळले आहे व मी जगाला क्रुसावर खिळले आहे.</verse>
				<verse number="15">सुंता करणे किंवा न करणे याला काही अर्थ नाही परंतु नवी उत्पत्ती हेच सर्व काही आहे.</verse>
				<verse number="16">जितके लोक ह्या नियमाने वागतील तितक्या लोकांना व देवाच्या इस्राएलला शांती व दया मिळो.</verse>
				<verse number="17">ह्यापुढे कोणी मला त्रास देऊ नये कारण माझ्या शरीरावर मी येशूच्या खुणा धारण केल्या आहेत.</verse>
				<verse number="18">बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो. आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="49">
			<chapter number="1">
				<verse number="1">येशूमधील जीवनात विश्वासू असणाऱ्या इफिस येथील पवित्र लोकांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून:</verse>
				<verse number="2">देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.</verse>
				<verse number="3">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे.</verse>
				<verse number="4">आपण प्रीतीत त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडून घेतले.</verse>
				<verse number="5">त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने निवडले आहे.</verse>
				<verse number="6">त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे.</verse>
				<verse number="7">त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्‍ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.</verse>
				<verse number="8">त्याचे सर्व शहाणपण व अंतर्ज्ञान ह्यांना अनुसरून त्याने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे.</verse>
				<verse number="9">स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.</verse>
				<verse number="10">ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील.</verse>
				<verse number="11">आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे ख्रिस्तावरील आपल्या निष्ठेमुळे त्याने आपल्याला त्याचे वारसदार म्हणून निवडले आहे.</verse>
				<verse number="12">सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या.</verse>
				<verse number="13">तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे.</verse>
				<verse number="14">हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!</verse>
				<verse number="15">प्रभू येशूमध्ये असलेला तुमचा विश्वास आणि सर्व पवित्र लोकांबद्दल तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून,</verse>
				<verse number="16">मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी माझ्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की,</verse>
				<verse number="17">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला त्याच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान व प्रकटीकरण देणारा पवित्र आत्मा द्यावा.</verse>
				<verse number="18">म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी</verse>
				<verse number="19">आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपल्याविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व या गोष्टी, तुम्ही त्याच्या सामर्थ्यशाली पराक्रमाच्या कृतीवरून जाणून घ्याव्यात.</verse>
				<verse number="20">देवाने हे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि आपल्या उजवीकडे स्वर्गीय जगतात बसविले.</verse>
				<verse number="21">तेथे तो सर्व स्वर्गीय राज्यकर्त्यांवर, अधिकाऱ्यांवर, सामर्थ्यावर व प्रभूंवर राज्य करतो. ह्रीच्या व भावी युगांतील सर्व अधिकारपदांपेक्षा उच्च अधिकारपद त्याला मिळाले आहे.</verse>
				<verse number="22">परमेश्वराने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्याने सर्वांचे मस्तक व्हावे म्हणून त्यास ख्रिस्तमंडळीसमोर सादर केले.</verse>
				<verse number="23">ही ख्रिस्तमंडळी शरीर असून जो सर्व काही सर्व ठिकाणी परिपूर्ण करतो त्याची ख्रिस्तमंडळी ती परिपूर्ती आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">तुम्ही आपले अपराध व आपली पापे ह्यांमुळे पूर्वी मृत झाला होता.</verse>
				<verse number="2">त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता.</verse>
				<verse number="3">खरे म्हणजे आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आम्हीदेखील आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे वागत क्रोधासाठी नेमलेले होतो.</verse>
				<verse number="4">परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे,</verse>
				<verse number="5">ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे</verse>
				<verse number="6">आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले.</verse>
				<verse number="7">ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले.</verse>
				<verse number="8">देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे.</verse>
				<verse number="9">कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.</verse>
				<verse number="10">आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.</verse>
				<verse number="11">ज्यांची शारीरिक सुंता झालेली आहे व जे स्वतःला सुंता झालेले असे म्हणवून घेत असत अशा यहुदी लोकांकडून तुम्ही पूर्वी जन्माने यहुदीतर लोक म्हणविले जात होता; म्हणजेच शरीराची सुंता न झालेले म्हणून ओळखले जात होता, हा तुमचा पूर्वेतिहास लक्षात आणा.</verse>
				<verse number="12">तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता.</verse>
				<verse number="13">परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्तायोगे जवळचे झाला आहात;</verse>
				<verse number="14">कारण तो आपली साक्षात शांती आहे, त्याने दोघांना एक केले आणि मधली भिंत पाडली.</verse>
				<verse number="15">त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले, हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, ह्यासाठी की, स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी,</verse>
				<verse number="16">व त्याच्या क्रुसावरील बलिदानाने दोघांतील वैर नाहीसे करून दोघांना एक शरीर करून दोघांचा देवाशी समेट करावा.</verse>
				<verse number="17">त्याने येऊन जे तुम्ही दूर होता, त्या तुम्हांला आणि जे जवळ होते त्या यहुदी लोकांनाही शांतीचे शुभवर्तमान सांगितले.</verse>
				<verse number="18">त्याच्याद्वारे आत्म्याच्यायोगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.</verse>
				<verse number="19">तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात.</verse>
				<verse number="20">प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्हीदेखील रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे.</verse>
				<verse number="21">त्याच्यामध्ये सबंध इमारत एकत्र जोडली जाते व ती प्रभूला समर्पित केलेले मंदिर बनते.</verse>
				<verse number="22">देवाने पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये वसती करावी म्हणून प्रभूमध्ये तुम्हीदेखील इतरांबरोबर एकत्र उभारले जात आहात.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">ह्या कारणामुळे तुमच्या यहुदीतर लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान झालेला मी पौल परमेश्वराकडे प्रार्थना करतो.</verse>
				<verse number="2">मला तुमच्यासाठी देवाची कृपा प्राप्त झाली. तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही निश्चितच ऐकले आहे.</verse>
				<verse number="3">म्हणजे प्रकटीकरणाद्वारे मला रहस्य कळविले गेले, त्याप्रमाणे मी जे वर थोडक्यात लिहिले आहे,</verse>
				<verse number="4">ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाले ते तुम्हांला समजेल.</verse>
				<verse number="5">ते रहस्य जसे आता आत्म्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखविले आहे, तसे ते इतर पिढ्यांना कळविण्यात आले नव्हते.</verse>
				<verse number="6">ते रहस्य हे की, यहुदीतर लोक ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, एकशरीर व अभिवचनाचे सहभागी आहेत.</verse>
				<verse number="7">देवाच्या सामर्थ्याच्या कृतीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले, त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो आहे.</verse>
				<verse number="8">सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे</verse>
				<verse number="9">व ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवामध्ये युगादिकालापासून गुप्त ठेवलेल्या रहस्याची व्यवस्था कशी होणार आहे, हे सर्वांना प्रकट करून दाखवावे.</verse>
				<verse number="10">ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.</verse>
				<verse number="11"></verse>
				<verse number="12">ख्रिस्तामध्ये श्रद्धेद्वारे आत्मविश्वासाने व खातरीने परमेश्वराच्या सहवासात प्रवेश मिळविण्याचे धैर्य आपल्याला मिळाले आहे.</verse>
				<verse number="13">म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत.</verse>
				<verse number="14">म्हणून स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबास ज्या पित्यावरून खरे नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की,</verse>
				<verse number="15"></verse>
				<verse number="16">त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीनुसार तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे.</verse>
				<verse number="17">ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वसती करावी. ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे व्हावे,</verse>
				<verse number="18">ज्यावरून त्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती;</verse>
				<verse number="19">हे तुम्ही सर्व पवित्र लोकांसह समजून घ्यावे व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावी, म्हणजेच तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.</verse>
				<verse number="20">आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांच्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने सिद्धीस न्यावयास जो समर्थ आहे,</verse>
				<verse number="21">त्याचा ख्रिस्तमंडळीमध्ये व ख्रिस्त येशूमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुगे गौरव होवो! आमेन.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">म्हणून प्रभूमध्ये बंदिवान असा मी तुम्हांला विनंती करून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला.</verse>
				<verse number="2">नेहमी नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या.</verse>
				<verse number="3">आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.</verse>
				<verse number="4">तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे.</verse>
				<verse number="5">प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच,</verse>
				<verse number="6">सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.</verse>
				<verse number="7">आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या कृपादानाच्या प्रमाणात विशिष्ट वरदान प्राप्त झाले आहे.</verse>
				<verse number="8">पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा पुष्कळांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या.</verse>
				<verse number="9">त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे?</verse>
				<verse number="10">म्हणून जो खाली उतरला त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले</verse>
				<verse number="11">आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले.</verse>
				<verse number="12">ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र लोकांना सेवाकार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे.</verse>
				<verse number="13">अशा प्रकारे देवाच्या पुत्रावरील विश्वासाने व त्यासंबंधी परिपूर्ण ज्ञानाने आपण प्रौढ होऊन एकीने जीवन जगू म्हणजे आपण सर्व ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहचू.</verse>
				<verse number="14">त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.</verse>
				<verse number="15">तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे.</verse>
				<verse number="16">ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव शरीराच्या प्रत्येक सांध्यायोगे होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या स्वभावानुसार कार्य करीत असता संपूर्ण शरीर प्रीतीमध्ये वाढत राहते.</verse>
				<verse number="17">प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये.</verse>
				<verse number="18">त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.</verse>
				<verse number="19">संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे.</verse>
				<verse number="20">तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही!</verse>
				<verse number="21">तुम्ही तर त्याच्याविषयी निश्‍चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले.</verse>
				<verse number="22">म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा.</verse>
				<verse number="23">तुम्ही नव्या मनोवृत्तीचा स्वीकार करा</verse>
				<verse number="24">आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा.</verse>
				<verse number="25">लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.</verse>
				<verse number="26">तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या.</verse>
				<verse number="27">सैतानाला वाव देऊ नका.</verse>
				<verse number="28">चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.</verse>
				<verse number="29">तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.</verse>
				<verse number="30">देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहां.</verse>
				<verse number="31">प्रत्येक प्रकारची कटुता, राग, क्रोध, गलबला व निंदानालस्ती सर्व प्रकारच्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करा.</verse>
				<verse number="32">उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.</verse>
				<verse number="2">ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.</verse>
				<verse number="3">पवित्र जनांमध्ये उचित ठरते त्याप्रमाणे लैंगिक अनैतिकता, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचा उल्लेखसुद्धा तुमच्यामधे केला जाऊ नये.</verse>
				<verse number="4">तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही तुमच्यामध्ये उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यांपेक्षा तुम्ही देवाचे आभार मानत राहा.</verse>
				<verse number="5">लैंगिक अनैतिकतेने वागणारा, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात मुळीच वारसा नाही, ह्याची खातरी बाळगा.</verse>
				<verse number="6">पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल.</verse>
				<verse number="7">म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका.</verse>
				<verse number="8">पूर्वी तुम्ही अंधकारमय होता पण आता तुम्ही प्रभूवरील निष्ठेमुळे प्रकाशात आला आहात; म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;</verse>
				<verse number="9">कारण ज्ञानाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नैतिकता व सत्यता ह्यांत दिसून येते.</verse>
				<verse number="10">प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या.</verse>
				<verse number="11">अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा.</verse>
				<verse number="12">त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे.</verse>
				<verse number="13">प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते.</verse>
				<verse number="14">कारण असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.</verse>
				<verse number="15">तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.</verse>
				<verse number="16">प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत.</verse>
				<verse number="17">तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे, हे समजून घ्या.</verse>
				<verse number="18">द्राक्षारसाने मस्त होऊ नका. कारण त्यात बेतालपणा आहे. उलट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा.</verse>
				<verse number="19">स्तोत्रे, भक्तिगीते व अध्यात्मिक गाणी तुमच्यामध्ये गात राहून तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूसाठी गायन-वादन करा.</verse>
				<verse number="20">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याला धन्यवाद देत जा.</verse>
				<verse number="21">ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा.</verse>
				<verse number="22">पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, तशा तुमच्या पतीच्या अधीन असा.</verse>
				<verse number="23">जसा ख्रिस्त हा ख्रिस्तमंडळीचे मस्तक आहे, तसा पती हा पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त हाच ख्रिस्तमंडळीचा म्हणजेच त्यांच्या शरीराचा तारणारा आहे.</verse>
				<verse number="24">म्हणून ख्रिस्तमंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत त्यांच्या पतीच्या अधीन असावे.</verse>
				<verse number="25">पतींनो, जशी ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीसाठी स्वतःचे समर्पण केले.</verse>
				<verse number="26">अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्‍तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे,</verse>
				<verse number="27">म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा.</verse>
				<verse number="28">अशा प्रकारे पतीने त्याची पत्नी त्याचेच शरीर आहे, असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवरच प्रीती करतो.</verse>
				<verse number="29">कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, अगदी ख्रिस्त ख्रिस्तमंडळीचे पालनपोषण करतो तसे;</verse>
				<verse number="30">कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत.</verse>
				<verse number="31">पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’</verse>
				<verse number="32">हे रहस्य महान आहे पण मी ख्रिस्त व ख्रिस्तमंडळी ह्यांच्याविषयी बोलत आहे.</verse>
				<verse number="33">तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">मुलांनो, प्रभूमध्ये तुमच्या आईबापांच्या आज्ञेत राहा; कारण हे योग्य आहे.</verse>
				<verse number="2">तुमचे वडील व आई ह्यांचा मान राखा, ह्यासाठी की, तुमचे कल्याण व्हावे व तुम्ही पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. अभिवचनाने युक्त अशी हीच पहिली आज्ञा आहे.</verse>
				<verse number="3"></verse>
				<verse number="4">बापांनो, आपल्या मुलांना राग येईल अशा प्रकारे वागवू नका, तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.</verse>
				<verse number="5">दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत, अशा प्रामाणिक भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत आपल्या जगातील धन्यांचे आज्ञापालन करीत जा.</verse>
				<verse number="6">केवळ त्यांना खुश करणाऱ्या तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा.</verse>
				<verse number="7">ही सेवा केवळ माणसांची नव्हे तर प्रभूची आहे, असे मानून ती उत्साहाने करा.</verse>
				<verse number="8">हे लक्षात ठेवा की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तो प्रभूच्या पारितोषिकास पात्र ठरतो.</verse>
				<verse number="9">मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या. तुमचा व त्यांचा मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही, या सत्याची आठवण ठेवा.</verse>
				<verse number="10">शेवटी, प्रभूवरील निष्ठेत, त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.</verse>
				<verse number="11">सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची सर्व शस्त्रसामग्री धारण करा;</verse>
				<verse number="12">कारण आपले युद्ध मानवी शक्तीबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर व अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे.</verse>
				<verse number="13">तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.</verse>
				<verse number="14">आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा,</verse>
				<verse number="15">शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा</verse>
				<verse number="16">आणि जिच्यायोगे त्या दुष्टांचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल नेहमी जवळ बाळगा.</verse>
				<verse number="17">तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन हाती घ्या.</verse>
				<verse number="18">परमेश्वराचे साहाय्य मागत ह्या सर्व गोष्टी प्रार्थना करून मागा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ह्याकरिता जागृत राहून चिकाटी बाळगा; सर्व पवित्र जनांसाठी सातत्याने धावा करा.</verse>
				<verse number="19">जेव्हा मी संदेश देण्यासाठी उभा राहीन, तेव्हा देवाने मला त्याचा संदेश द्यावा म्हणजे धैर्याने मला शुभवर्तमानाचे रहस्य लोकांना कळविता यावे, म्हणून माझ्यासाठीही प्रार्थना करा.</verse>
				<verse number="20">जरी मी ह्री तुरुंगात असलो, तरी मी शुभवर्तमानाचा राजदूत आहे. मी ज्या प्रकारे शुभवर्तमान घोषित करावयास हवे, त्याप्रकारे ते घोषित करण्यासाठी मला धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करा.</verse>
				<verse number="21">माझे कसे काय चालले आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून आपला प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक तुखिक तुम्हांला सर्व काही कळवील.</verse>
				<verse number="22">आमची खुशाली तुम्हांला कळावी व तुम्हांला उत्तेजन मिळावे ह्याकरिता मी त्याला तुमच्याकडे पाठविले आहे.</verse>
				<verse number="23">देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून आपल्या ख्रिस्ती बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो.</verse>
				<verse number="24">आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अमर प्रीती करतात, त्या सर्वांवर देवाची कृपा राहो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="50">
			<chapter number="1">
				<verse number="1">फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून:</verse>
				<verse number="2">देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला मिळो.</verse>
				<verse number="3">प्रत्येक वेळी मला जेव्हा तुमची आठवण येते, तेव्हा मी आपल्या देवाचे आभार मानतो.</verse>
				<verse number="4">पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारातील तुमच्या सहभागितेमुळे मी तसे करतो. तुम्हां सर्वांसाठी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस मी नेहमी आनंदाने विनंती करतो.</verse>
				<verse number="5"></verse>
				<verse number="6">ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.</verse>
				<verse number="7">तुमच्या अंतःकरणात मला तुम्ही स्थान दिले आहे! म्हणून मला तुमच्याविषयी जे वाटते ते योग्यच आहे. कारण माझ्या तुरुंगवासात व शुभवर्तमानाचे समर्थन करण्यात ते तसेच प्रस्थापित करण्यात तुम्ही माझ्याबरोबर कृपेचे भागीदार आहात.</verse>
				<verse number="8">माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.</verse>
				<verse number="9">माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.</verse>
				<verse number="10">जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे</verse>
				<verse number="11">आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे.</verse>
				<verse number="12">बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="13">म्हणजे कैसराच्या राजवाड्यातील सर्व सैनिकांना व इतर सर्व लोकांना माझा तुरुंगवास ख्रिस्तासंबंधाने आहे, हे समजले आहे.</verse>
				<verse number="14">माझ्या तुरुंगवासामुळे पुष्कळ बंधुजनांचा प्रभूवरील भरवसा वाढला असून देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास त्यांना धैर्य मिळत आहे.</verse>
				<verse number="15">कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात.</verse>
				<verse number="16">मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात.</verse>
				<verse number="17">मात्र इतर काही जण ख्रिस्ताची घोषणा प्रामाणिकपणे करीत नाहीत. तुरुंगवासात माझ्या यातना वाढाव्यातम्हणून ते स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन करीत आहेत.</verse>
				<verse number="18">मला काही फरक पडत नाही. अयोग्य हेतूने असो किंवा योग्य हेतूने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, ह्यात मी आनंद मानतो व मानत राहीन;</verse>
				<verse number="19">कारण तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साहाय्याने मला तुरुंगातून मुक्त होता येईल, हे मला ठाऊक आहे. माझी प्रबळ अपेक्षा व आशा ही आहे की, मी माझ्या जबाबदारीत उणा न पडता सर्व समयी आणि विशेषतः आता परिपूर्ण धैर्याने सर्वस्व पणास लावून जगण्याने अथवा मरण्याने ख्रिस्ताचा महिमा वाढवीत राहावे.</verse>
				<verse number="20"></verse>
				<verse number="21">मला तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे.</verse>
				<verse number="22">पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.</verse>
				<verse number="23">मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे.</verse>
				<verse number="24">मात्र मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे.</verse>
				<verse number="25">मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आणि श्रद्धेमधील तुमची प्रगती व आनंद वाढत जावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="26">जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन.</verse>
				<verse number="27">सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात.</verse>
				<verse number="28">विरोधकांना घाबरू नका; नेहमी धैर्य बाळगा. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते परमेश्वराने केले आहे.</verse>
				<verse number="29">कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.</verse>
				<verse number="30">कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत.</verse>
				<verse number="2">तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.</verse>
				<verse number="3">स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना.</verse>
				<verse number="4">तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा.</verse>
				<verse number="5">जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो:</verse>
				<verse number="6">तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही,</verse>
				<verse number="7">तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.</verse>
				<verse number="8">आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत.</verse>
				<verse number="9">ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले.</verse>
				<verse number="10">ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने वाकला जावा;</verse>
				<verse number="11">आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे.</verse>
				<verse number="12">प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा;</verse>
				<verse number="13">कारण इच्छा बाळगण्यासाठी व त्याच्या योजनेनुसार कार्य करण्यासाठी तुम्हांला सक्षम करण्याकरिता परमेश्वर तुमच्यामध्ये सतत कार्य करीत असतो.</verse>
				<verse number="14">जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा.</verse>
				<verse number="15">ह्यासाठी की, ह्या दुष्ट व विकृत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची मुले व्हावे. लोकांमध्ये जीवनाचे वचन सांगताना तुम्ही जगात आकाशातील ताऱ्यांसारखे दिसावे.</verse>
				<verse number="16">असे झाले, तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवशी कारण मिळेल.</verse>
				<verse number="17">तुमच्या विश्वासाचा यज्ञ अर्पिला जात असता जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुमच्या सर्वांना माझ्या आनंदात सहभागी करून घेतो.</verse>
				<verse number="18">त्याचप्रमाणे तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.</verse>
				<verse number="19">तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्यला मी तुमच्याकडे पाठवावे म्हणून मी प्रभूमध्ये आशा बाळगून आहे.</verse>
				<verse number="20">तुमच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करील असा त्याच्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणी नाही.</verse>
				<verse number="21">इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात,</verse>
				<verse number="22">तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे.</verse>
				<verse number="23">माझे काय होणार आहे, हे समजताच त्याला रवाना करता येईल, अशी मला आशा आहे.</verse>
				<verse number="24">तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन.</verse>
				<verse number="25">माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा निरोप्या तसेच माझ्या गरजेत माझा सेवक एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविणे मला आवश्यक वाटले;</verse>
				<verse number="26">तो आजारी आहे, हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याचे अंत:करण जड झाले व तुम्हांला भेटण्याची त्याला उत्कंठा लागली होती.</verse>
				<verse number="27">तो खरोखर अत्यवस्थ झाला होता, तथापि देवाने त्याच्यावर दया केली. ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.</verse>
				<verse number="28">मी त्याला पाठविण्याची त्वरा करीत आहे, तुम्ही त्याला पाहून आनंदित व्हावे व माझे दुःख हलके करावे.</verse>
				<verse number="29">त्याचे स्वागत प्रभूला स्मरून पूर्ण आनंदाने करा आणि त्याच्यासारख्या सर्वांचा सन्मान करा.</verse>
				<verse number="30">माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली, ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अगोदर लिहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मी कंटाळा करीत नाही, परंतु हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.</verse>
				<verse number="2">ह्या कुत्र्यांपासून सावध रहा, दुष्कर्म्यांपासून सावध रहा, केवळ शरीराला बाधा पोहचवणाऱ्यांपासून सावध रहा.</verse>
				<verse number="3">आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.</verse>
				<verse number="4">अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार.</verse>
				<verse number="5">मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे.</verse>
				<verse number="6">आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.</verse>
				<verse number="7">परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो.</verse>
				<verse number="8">इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा,</verse>
				<verse number="9">मी त्याच्यामध्ये आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे विश्वासावर आधारित व देवाकडून मिळणारे असे नीतिमत्त्व असावे.</verse>
				<verse number="10">माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे.</verse>
				<verse number="11">म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे.</verse>
				<verse number="12">एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे.</verse>
				<verse number="13">बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून,</verse>
				<verse number="14">स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्‍त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.</verse>
				<verse number="15">जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील.</verse>
				<verse number="16">तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या.</verse>
				<verse number="17">बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.</verse>
				<verse number="18">मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत.</verse>
				<verse number="19">पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.</verse>
				<verse number="20">आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.</verse>
				<verse number="21">ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे दैन्यावस्थेतील शरीर त्याच्या स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">प्रियजनहो, तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे; तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा.</verse>
				<verse number="2">मी युवदीयेला व संतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूमध्ये एकचित्त व्हा.</verse>
				<verse number="3">तसेच हे माझ्या विश्वासू सहकाऱ्या, मी तुलाही विनंती करतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे इतर सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले, त्यांना साहाय्य कर.</verse>
				<verse number="4">प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा.</verse>
				<verse number="5">तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे.</verse>
				<verse number="6">कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.</verse>
				<verse number="7">म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील.</verse>
				<verse number="8">बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.</verse>
				<verse number="9">माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.</verse>
				<verse number="10">मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती.</verse>
				<verse number="11">मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे.</verse>
				<verse number="12">दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो.</verse>
				<verse number="13">मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो.</verse>
				<verse number="14">तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले.</verse>
				<verse number="15">फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनो, तुम्हांला ठाऊक आहे की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही ख्रिस्तमंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही.</verse>
				<verse number="16">मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली.</verse>
				<verse number="17">मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.</verse>
				<verse number="18">माझ्याजवळ सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंधित समर्पण असून देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे.</verse>
				<verse number="19">माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.</verse>
				<verse number="20">आपल्या देवपित्याचा युगानुयुगे गौरव होवो. आमेन.</verse>
				<verse number="21">ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र व्यक्तीला शुभेच्छा द्या. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात.</verse>
				<verse number="22">सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात.</verse>
				<verse number="23">प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="51">
			<chapter number="1">
				<verse number="1">कलस्सै येथील पवित्र लोकांना म्हणजे ख्रिस्तामधील श्रद्धावंत बंधुजनांना देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:</verse>
				<verse number="2">देव आपला पिता तुम्हांला कृपा व शांती देवो.</verse>
				<verse number="3">जेव्हा आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करतो तेव्हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याला धन्यवाद देतो;</verse>
				<verse number="4">कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमचा विश्वास व सर्व पवित्र लोकांवरील तुमची प्रीती ह्यांविषयी ऐकले आहे.</verse>
				<verse number="5">जेव्हा खरा संदेश म्हणजेच शुभवर्तमान प्रथम तुमच्याकडे पोहोचले, तेव्हा ही आशा तुमच्यासाठी स्वर्गात सुरक्षित राखून ठेवण्यात आली आहे.</verse>
				<verse number="6">तुम्ही हे शुभवर्तमान ऐकले व खरेपणाने त्या दिवसापासून जसे तुमच्यामध्ये तसेच सर्व जगातही हे शुभवर्तमान फळ देत आहे व पसरत चालले आहे. तुम्ही देवाची कृपा सत्यस्वरूपात जाणून घेतली आहे.</verse>
				<verse number="7">आमचा प्रिय सहकारी दास, एपफ्रास हा आमच्या वतीने तुमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासू प्रसेवक असून त्याच्याकडून तुम्ही ही कृपा जाणून घेतली.</verse>
				<verse number="8">पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेल्या प्रीतीविषयी त्याने आम्हांला कळविले आहे.</verse>
				<verse number="9">म्हणूनच तुमच्याविषयी आम्ही ऐकले तेव्हापासून आम्ही सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत की, त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञान व आध्यात्मिक सुज्ञता व समज तुम्हांला प्राप्त होवो.</verse>
				<verse number="10">अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला प्रसन्न करण्याकरता त्याला शोभेल असे वागावे; म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाविषयीच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी.</verse>
				<verse number="11">त्याच्या गौरवशाली सामर्थ्याद्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या शक्तीने सशक्त व्हावे ज्यामुळे सर्व काही आनंदाने सहन करण्याकरिता तुम्हांला धीर व सोशिकपणा मिळावा</verse>
				<verse number="12">आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र लोकांसाठी राखून ठेवलेल्या वतनाचे भागीदार होण्यासाठी पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.</verse>
				<verse number="13">त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे.</verse>
				<verse number="14">त्या पुत्रामध्ये, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांबद्दल आपल्याला क्षमा मिळाली आहे.</verse>
				<verse number="15">येशू अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व निर्मितीत प्रथम जन्मलेला आहे;</verse>
				<verse number="16">कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी जे काही आहे; ते सर्व त्याच्याद्वारे निर्माण झाले. सर्व विश्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.</verse>
				<verse number="17">तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही एकत्रित राहते.</verse>
				<verse number="18">तो त्याच्या शरीराचे म्हणजे ख्रिस्तमंडळीचे मस्तक व उगमस्थान आहे. तो मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे;</verse>
				<verse number="19">कारण पित्याला हे आवडले की, त्याच्यामध्ये सर्व परिपूर्णता राहावी.</verse>
				<verse number="20">म्हणूनच पुत्राद्वारे साऱ्या गोष्टींचा त्याने स्वतःशी समेट घडवून आणला. त्याच्या क्रुसावरील रक्ताद्वारे शांती घडवून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे त्या सर्वांचा - मग ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो</verse>
				<verse number="21">आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता,</verse>
				<verse number="22">परंतु आता त्याने स्वतःच्या पुत्राच्या शारीरिक मरणाद्वारे तुमचा समेट केला आहे, ह्यासाठी की, त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे त्याच्या सहवासात आणावे.</verse>
				<verse number="23">अर्थात, विश्वासात स्थिर व अढळ राहून जे शुभवर्तमान तुम्ही ऐकले, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत ज्याची घोषणा झाली व ज्याचा मी पौल, प्रसेवक झालो आहे, त्याच्या आशेपासून तुम्ही ढळता कामा नये.</verse>
				<verse number="24">तुमच्यासाठी माझ्या दुःखांमध्ये मी आनंद मानतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे, ते मी माझ्या देहाने, त्याचे शरीर म्हणजे ख्रिस्तमंडळीसाठी भरून काढत आहे.</verse>
				<verse number="25">देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी ख्रिस्तमंडळींचा प्रसेवक झालो आहे.</verse>
				<verse number="26">जे रहस्य युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र लोकांकरता ते प्रकट झाले आहे. ते हे वचन होय.</verse>
				<verse number="27">हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.</verse>
				<verse number="28">ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक माणसाने परिपूर्ण झालेले असे आम्हांला सादर करता यावे म्हणून आम्ही सर्वांना ख्रिस्ताची घोषणा करतो, प्रत्येक माणसाला सावध करतो व प्रत्येक माणसाला सर्व प्रकारच्या ज्ञानाने सुशिक्षित करतो.</verse>
				<verse number="29">त्याची जी शक्ती माझ्यामध्ये जोमाने कार्य करत आहे, तिच्या आधारे हे सिद्ध करण्यासाठी मी झटून श्रम करीत आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी मला प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम करीत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="2">ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.</verse>
				<verse number="3">परमेश्वराच्या सुज्ञतेचा व ज्ञानाचा सर्व गुप्त खजिना स्वतः ख्रिस्तामध्ये दडलेला आहे.</verse>
				<verse number="4">लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून मी हे तुम्हांला सांगतो. जरी मी देहाने दूर असलो,</verse>
				<verse number="5">तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे आणि तुम्हांला ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये खंबीर स्थैर्याने एकत्र उभे असलेले पाहून मला आनंद होतो.</verse>
				<verse number="6">ज्याअर्थी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे त्याअर्थी तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करा.</verse>
				<verse number="7">त्याच्यामध्ये रुजलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर कृतज्ञता व्यक्त करणारे व्हा.</verse>
				<verse number="8">ख्रिस्ताकडून नव्हे तर मानवी परंपरांकडून व विश्वावर सत्ता चालविणाऱ्या आत्म्यांकडून येणाऱ्या मानवी शहाणपणाच्या निरर्थक भूलथापांनी तुम्हांला कोणी गुलामगिरीत टाकू नये म्हणून सावध राहा;</verse>
				<verse number="9">कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते</verse>
				<verse number="10">आणि त्याच्यामध्ये तुम्हांला परिपूर्ण जीवन देण्यात आले आहे. तो सर्व आध्यात्मिक सत्ता व अधिकार यांचा प्रमुख आहे.</verse>
				<verse number="11">ख्रिस्तामध्ये तुमची सुंतादेखील झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर दैहिक पापी स्वभावापासून तुमची मुक्तता केल्याने ख्रिस्ताकडून झाली आहे.</verse>
				<verse number="12">तुमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या सामर्थ्यशाली कृतीवरील विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात.</verse>
				<verse number="13">तुम्ही एके काळी आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेला होता. त्याने आपल्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करून आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले.</verse>
				<verse number="14">आपल्याविरुद्ध असलेली ऋणपत्रिका त्याने खोडली व त्याच्या क्रुसावर चढवून त्याने ती पूर्णपणे रद्द केली</verse>
				<verse number="15">आणि त्या क्रुसावर ख्रिस्ताने स्वतःला सत्ताधीशांपासून व अधिकाऱ्यांपासून मुक्त केले. त्याच्या जयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना बंदिवान म्हणून घेऊन जाताना त्याने त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.</verse>
				<verse number="16">तर मग खाण्यापिण्याविषयी, किंवा सण, किंवा नवचंद्रोत्सव किंवा साबाथ पाळण्याविषयी कोणाला तुमच्यासाठी नियम करू देऊ नका.</verse>
				<verse number="17">ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची केवळ छाया आहेत; ख्रिस्त हेच वास्तव आहे.</verse>
				<verse number="18">आपल्याला झालेल्या खास दृष्टान्तामुळे जो खोट्या नम्रतेचा व देवदूतांच्या उपासनेचा आग्रह धरीत असतो अशा माणसाला तुम्हांला दोषी ठरवू देऊ नका. असा मनुष्य विनाकारण मानवी विचारसरणीने गर्वाने फुगलेला असतो.</verse>
				<verse number="19">शरीराचे मस्तक असलेल्या ख्रिस्ताला त्याने सोडून दिलेले असते. ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सर्व शरीर सांधे व मज्जा यांच्यायोगे दृढ जोडले जाते व त्याची ईश्वरी इच्छेनुसार वाढ होत जाते.</verse>
				<verse number="20">तुम्ही ख्रिस्ताबरोबर मृत झाला आहात व विश्वाच्या सत्ताधिकारी आत्म्यांपासून तुमची मुक्तता करण्यात आली आहे. तर मग तुम्ही या जगाचे विधिनियम पाळत अशा प्रकारे जीवन का जगता?</verse>
				<verse number="21">म्हणजे, उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी ‘हात लावू नकोस, चाखू नकोस व दुसऱ्याला स्पर्श करू नकोस’ अशा प्रकारच्या माणसांच्या नियमांचे व शिकवणुकीचे तुम्ही पालन का करता?</verse>
				<verse number="22"></verse>
				<verse number="23">जी दिखाऊ सुज्ञता बळजबरीने केलेली देवदूतांची उपासना, खोटी नम्रता व देहदंडन यांच्यामधून व्यक्त होते त्या सुज्ञतेवर असे नियम आधारित असतात. परंतु देहस्वभावाच्या वासनेला प्रतिबंध करण्याची क्षमता त्यांच्यात नसते.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.</verse>
				<verse number="2">वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;</verse>
				<verse number="3">कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.</verse>
				<verse number="4">तुमचे खरे जीवन ख्रिस्त आहे आणि तो जेव्हा प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर वैभवाने प्रकट केले जाल!</verse>
				<verse number="5">तर मग पृथ्वीवरील तुमच्या दैहिक वासना म्हणजे लैंगिक अनैतिकता, अमंगळपणा, कामवासना, दुष्ट प्रवृत्ती व लोभम्हणजेच एक प्रकारची मूर्तिपूजा, ह्यांना मूठमाती द्या.</verse>
				<verse number="6">अशा गोष्टींमुळे देवाच्या आज्ञा न पाळणाऱ्यांवर देवाचा कोप होतो.</verse>
				<verse number="7">तुम्हीही पूर्वी अशा वासनांत जगत होता, तेव्हा त्यांची सत्ता तुमच्यावर चालत असे.</verse>
				<verse number="8">परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत.</verse>
				<verse number="9">एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या सवयींसह काढून टाकले आहे.</verse>
				<verse number="10">ज्याला त्याचा निर्माणकर्ता देव त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे सातत्याने नवीन करीत आहे, असा नवा मनुष्य तुम्ही धारण केला आहे. ज्यामुळे तुम्हांला त्याचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे.</verse>
				<verse number="11">परिणामी, ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, रानटी व स्कुथीपंथीय, गुलाम व स्वतंत्र असा भेद उरला नाही. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वांत आहे.</verse>
				<verse number="12">तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणा, चांगुलपणा, लीनता, सौम्यता व सहनशीलता हे सारे धारण करा.</verse>
				<verse number="13">एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करावयास हवी.</verse>
				<verse number="14">सर्वोच्च म्हणजे ह्या सर्वांना एकसूत्रित करून परिपूर्ण करणारी प्रीती धारण करा.</verse>
				<verse number="15">ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरता तुम्हांला एक शरीर म्हणून बोलावण्यात आले आहे, म्हणून तुम्ही कृतज्ञ असा.</verse>
				<verse number="16">ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा.</verse>
				<verse number="17">म्हणजेच शद्बात व कृतीत, जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देवपित्याचे आभार माना.</verse>
				<verse number="18">पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा.</verse>
				<verse number="19">पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा व त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका.</verse>
				<verse number="20">मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला आवडते.</verse>
				<verse number="21">बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना वैताग आणू नका, आणाल तर ती निराश होतील.</verse>
				<verse number="22">दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या पृथ्वीवरील धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोष देणाऱ्या नोकरांसारखे तोंडदेखलेपणाने हे करू नका, तर प्रभूविषयी तुम्हांला वाटणाऱ्या आदराने जिवेभावे करा.</verse>
				<verse number="23">जे काही तुम्ही करता, ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून मनापासून करा.</verse>
				<verse number="24">प्रभूकडून वतनरूप पारितोषिक तुम्हांला मिळेल, हे तुम्हांला माहीत आहे, कारण प्रभू ख्रिस्त तुमचा खरा धनी आहे</verse>
				<verse number="25">आणि अन्याय करणाऱ्याची त्याने केलेल्या अन्यायाबद्दल परतफेड केली जाईल; कारण देव पक्षपात करत नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">धन्यांनो, तुमचाही स्वर्गात धनी आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व उचितपणे वागा.</verse>
				<verse number="2">प्रार्थनेत तत्पर असा व प्रार्थना करताना आभार मानत दक्ष राहा.</verse>
				<verse number="3">ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी तुरुंगात आहे, त्याविषयीचा संदेश सांगावयास देवाने आम्हांला चांगली संधी द्यावी</verse>
				<verse number="4">व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा.</verse>
				<verse number="5">बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. प्रत्येक संधीचा पूरेपूर उपयोग करा.</verse>
				<verse number="6">तुमचे बोलणे सर्वदा सभ्य व मिठाने रुचकर केलेले असावे व प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजून घ्यावे.</verse>
				<verse number="7">आपला प्रिय बंधू तुखिक, प्रभूच्या कार्यातील विश्वासू प्रसेवक व माझ्या सोबतीचा सेवक हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हांला कळवील.</verse>
				<verse number="8">त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठी पाठविले आहे की, आमचे वृत्त त्याने तुम्हांला कळवावे व तुम्हांला आनंदित करावे.</verse>
				<verse number="9">त्याच्याबरोबर प्रिय व विश्वासू बंधू अनेसिम जो तुमच्यातला आहे, त्यालाही पाठविले आहे. ते येथील सर्व वृत्त तुम्हांला कळवतील.</verse>
				<verse number="10">माझ्याबरोबर तुरुंगात असलेला अरिस्तार्ख तुम्हांला शुभेच्छा देतो. तसेच बर्णबाचा भाऊबंद मार्क हादेखील तुम्हांला शुभेच्छा कळवतो. त्याच्याविषयी तुम्हांला निर्देश देण्यात आला आहे की, तो तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा.</verse>
				<verse number="11">युस्त उर्फ येशू हादेखील तुम्हांला शुभेच्छा पाठवत आहे. सुंता झालेल्यांपैकी फक्त हेच देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांचा मला फारच आधार आहे.</verse>
				<verse number="12">ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे.</verse>
				<verse number="13">तुमच्यासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, ह्याची मी साक्ष देतो.</verse>
				<verse number="14">आपले प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला शुभेच्छा देतात.</verse>
				<verse number="15">लावदिकीयातील बंधू तसेच नुंफा व तिच्या घरी जमणारी ख्रिस्तमंडळी ह्यांना शुभेच्छा सांगा.</verse>
				<verse number="16">हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील ख्रिस्तमंडळीतही वाचावयास मिळावे व लावदिकीयाकडील पत्र तुम्हीही वाचावे.</verse>
				<verse number="17">आर्खिप्पाला सांगा की, प्रभूच्या सेवाकार्यात जी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे, ती पार पाडण्याकडे त्याने लक्ष द्यावे.</verse>
				<verse number="18">मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="52">
			<chapter number="1">
				<verse number="1">देवपित्यामध्ये व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेली थेस्सलनीकाकरांची ख्रिस्तमंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून: तुम्हांला कृपा व शांती मिळो.</verse>
				<verse number="2">आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत तुम्हां सर्वांविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो;</verse>
				<verse number="3">कारण तुम्ही तुमची श्रद्धा कृतीत कशी उतरवीत आहात, तुमच्या प्रीतीमुळे तुम्ही कसे श्रम करीत आहात आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील तुमची आशा कशी स्थिर आहे, ह्यांचे आम्ही देवपित्यासमोर निरंतर स्मरण करतो.</verse>
				<verse number="4">आमच्या प्रिय बंधूंनो, देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने तुम्हांला त्याची प्रजा म्हणून निवडले आहे, हे आम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="5">आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="6">तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात.</verse>
				<verse number="7">अशाने मासेदोनिया व अखया येथील सर्व श्रद्धावंत ह्यांना तुम्ही आदर्श झालात.</verse>
				<verse number="8">मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही.</verse>
				<verse number="9">तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, याविषयी ते सर्व लोक बोलत आहेत. तसेच जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्याकरिता व</verse>
				<verse number="10">त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हांला स्वतःलाही माहीत आहे.</verse>
				<verse number="2">पूर्वी फिलिप्पै येथे आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, तीव्र विरोधाला तोंड देत असतानाही देवाचे शुभवर्तमान तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले, हे तुम्हांला माहीतच आहे.</verse>
				<verse number="3">आमचे आवाहन चुकीच्या शिकवणुकीवर किंवा अनुचित उद्दिष्टांवर आधारित नसून आम्ही कोणाची फसवणूक करू इच्छीत नाही.</verse>
				<verse number="4">उलट, शुभवर्तमान आमच्याकडे सोपवून देण्यास देवाने आम्हांला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ते त्याच्या इच्छेनुसार सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासाठी न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव ज्यामुळे प्रसन्न होईल, ते बोलतो.</verse>
				<verse number="5">आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे!</verse>
				<verse number="6">आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांकडून म्हणजे तुमच्याकडून किंवा दुसऱ्यांपासून सन्मान मिळविण्याची खटपट आम्ही करत नव्हतो.</verse>
				<verse number="7">तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.</verse>
				<verse number="8">आम्हांला तुमच्याविषयी जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या शुभवर्तमानाचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या गाढ प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.</verse>
				<verse number="9">बंधुंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुमच्यातील कुणावर आमचा भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा केली.</verse>
				<verse number="10">तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत आमची वर्तणूक शुद्ध, सात्विक व निर्दोष कशी होती, ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही साक्षी आहे.</verse>
				<verse number="11">तुम्हांला ठाऊक आहे की, बाप आपल्या मुलांना बोध करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आवर्जून विनंती करीत सांगत होतो की,</verse>
				<verse number="12">त्याच्या राज्यात व वैभवात तुम्हांला पाचारण करणाऱ्या देवाला शोभेल असे तुम्ही वागावे.</verse>
				<verse number="13">दुसऱ्या एका कारणासाठीदेखील आम्ही देवाचे निरंतर आभार मानतो. ते म्हणजे तुम्ही आमच्याकडून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे; कारण देव तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.</verse>
				<verse number="14">बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या ख्रिस्तमंडळ्या ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात म्हणजे त्यांनी यहुदी लोकांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीदेखील आपल्या देशबांधवांच्या हातून सहन केलीत.</verse>
				<verse number="15">यहुदी लोकांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही ठार मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालविले. ते देवाला जे प्रिय आहे, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधक झाले आहेत.</verse>
				<verse number="16">यहुदीतरांचे तारण व्हावे म्हणून आम्ही संदेश देतो, त्यालाही ते मनाई करतात. त्यांच्या पापांचा घडा भरला आहे. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे!</verse>
				<verse number="17">बंधुजनहो, आम्ही मनाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला दुःख होऊन तुम्हांला प्रत्यक्ष भेटण्याचा आम्ही फार उत्कंठेने प्रयत्न केला.</verse>
				<verse number="18">आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छा प्रकट केली. मी पौलाने एकदा नाही तर अनेकदा तशी इच्छा बाळगली. परंतु सैतानाने आम्हांला अडविले.</verse>
				<verse number="19">अर्थात, आपल्या प्रभू येशूच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आमची आशा, आनंद व अभिमानास्पद मुकुट आहात ना?</verse>
				<verse number="20">खरोखर तुम्ही आमचे वैभव व आमचा आनंद आहात.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">आमच्याने आणखी धीर धरवेना म्हणून अथेनैमध्येच एकटे मागे राहावे, असे आम्ही ठरविले.</verse>
				<verse number="2">ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी देवाचा सेवक, आपला बंधू तीमथ्य ह्याला आम्ही ह्यासाठी पाठविले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा.</verse>
				<verse number="3">तो असा की, ह्या छळात कोणीही विचलित होऊ नये; कारण हा छळ म्हणजे देवाच्या योजनेचाच एक भाग आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.</verse>
				<verse number="4">आम्ही तुमच्याजवळ होतो, तेव्हा तुम्हांला अगोदर सांगून ठेवले होते की, आपल्याला छळ सहन करावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे.</verse>
				<verse number="5">ह्यामुळे मलाही आणखी धीर धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याकरिता तीमथ्यला पाठविले. सैतानाने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ होतील अशी मला भीती वाटली.</verse>
				<verse number="6">आता तीमथ्यने तुमची भेट घेतल्यानंतर आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जशी तुम्हांला भेटायची आम्हांला उत्कंठा आहे, तशी तुम्हांलादेखील आम्हांला भेटायची उत्कंठा आहे आणि तुम्ही आमची नेहमी प्रेमाने आठवण करता, ह्याविषयीचे आनंददायक वृत्त आम्हांला कळविले.</verse>
				<verse number="7">ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आमच्या सर्व संकटांत व छळात तुमच्या विश्वासावरून प्रोत्साहन मिळाले;</verse>
				<verse number="8">कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असला, तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल.</verse>
				<verse number="9">तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत, त्याबद्दल तुमच्यासंबंधाने आम्ही त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.</verse>
				<verse number="10">आम्ही रात्रंदिवस अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला प्रत्यक्ष पाहावे आणि तुमच्या विश्वासातील उणिवा दूर कराव्यात.</verse>
				<verse number="11">देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो.</verse>
				<verse number="12">जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो.</verse>
				<verse number="13">अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;</verse>
				<verse number="2">कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत.</verse>
				<verse number="3">देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे.</verse>
				<verse number="4">तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे.</verse>
				<verse number="5">देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये.</verse>
				<verse number="6">कोणी ह्या गोष्टीचे उल्‍लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते.</verse>
				<verse number="7">देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे.</verse>
				<verse number="8">म्हणून जो कोणी ह्या शिकवणीचा अव्हेर करतो, तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.</verse>
				<verse number="9">बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे, ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर कशी प्रीती करावी, हे तुम्हांला देवाने शिकविले आहे.</verse>
				<verse number="10">अखिल मासेदोनियातील सर्व बंधुजनांवर तुम्ही प्रीती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी.</verse>
				<verse number="11">आम्ही तुम्हांला पूर्वी सांगितल्याप्रमाणे शांतीने जीवन जगणे, आपापल्या व्यवसायात मग्न असणे व स्वतः मेहनत करणे, हे तुमचे ध्येय असू द्या.</verse>
				<verse number="12">अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.</verse>
				<verse number="13">बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये.</verse>
				<verse number="14">येशू मरण पावला व पुन्हा उठला, असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूवर श्रद्धा ठेवून जे निधन पावले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.</verse>
				<verse number="15">आम्ही तुम्हांला आता जे काही शिकवीत आहोत, ती प्रभूची शिकवण आहे:प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत उरलेले ते आपण निधन पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.</verse>
				<verse number="16">आज्ञेचा ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून जे मेलेले आहेत, ते प्रथम उठतील.</verse>
				<verse number="17">नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.</verse>
				<verse number="18">म्हणून ह्या शब्दांनी एकमेकांना प्रोत्साहन द्या.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">बंधूंनो, ह्या गोष्टी घडण्याचा काळ व नियोजित समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही;</verse>
				<verse number="2">कारण तुम्हांला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसा प्रभूचा दिवस येईल.</verse>
				<verse number="3">शांती व सुरक्षितता आहे, असे ते म्हणतात, तेव्हा अकस्मात नाश ओढवेल! गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात प्रसूती वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा नाश होईल; त्यांचा निभाव लागणार नाही.</verse>
				<verse number="4">परंतु बंधुंजनहो, त्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठावे, असे तुम्ही अंधारात नाही.</verse>
				<verse number="5">तुम्ही सगळे प्रकाशाची आणि दिवसाची मुले आहात. आपण रात्रीचे किंवा अंधाराचे नाही.</verse>
				<verse number="6">म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे.</verse>
				<verse number="7">झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात</verse>
				<verse number="8">परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून आपण सावध असावे. आपण विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.</verse>
				<verse number="9">आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे.</verse>
				<verse number="10">प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोपलेले असलो, तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.</verse>
				<verse number="11">म्हणून ज्याप्रमाणे आता तुम्ही करीत आहात, त्याप्रमाणे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्या व एकमेकांची उभारणी करा.</verse>
				<verse number="12">बंधुंजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूवरील श्रद्धेपोटी तुमच्यावर अधिकार चालवितात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा;</verse>
				<verse number="13">त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा.</verse>
				<verse number="14">बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, आळशी लोकांना ताकीद द्या, जे अल्प धीराचे आहेत त्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.</verse>
				<verse number="15">कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा; सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.</verse>
				<verse number="16">सर्वदा आनंद करा.</verse>
				<verse number="17">निरंतर प्रार्थना करा.</verse>
				<verse number="18">सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.</verse>
				<verse number="19">पवित्र आत्म्याला विझवू नका.</verse>
				<verse number="20">संदेष्ट्यांच्या शद्बांचा तिरस्कार करू नका.</verse>
				<verse number="21">सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते घट्ट धरून ठेवा.</verse>
				<verse number="22">वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.</verse>
				<verse number="23">शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो.</verse>
				<verse number="24">तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करील.</verse>
				<verse number="25">बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.</verse>
				<verse number="26">पवित्र चुंबनाने सर्व श्रद्धावंतांना शुभेच्छा द्या.</verse>
				<verse number="27">मी तुम्हांला प्रभूच्या अधिकाराने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखविण्यात यावे.</verse>
				<verse number="28">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर राहो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="53">
			<chapter number="1">
				<verse number="1">देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यामध्ये असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या ख्रिस्तमंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून:</verse>
				<verse number="2">देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.</verse>
				<verse number="3">बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाचे आभार मानावयास हवेत आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुमच्या सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती वाढत आहे.</verse>
				<verse number="4">ह्यावरून तुम्ही सोसत असलेल्या तुमच्या सर्व छळांत व संकटांत तुम्ही जी चिकाटी व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांत आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो.</verse>
				<verse number="5">हा सर्व देवाच्या यथार्थ न्यायाचा पुरावा आहे. तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही पात्र ठरावे.</verse>
				<verse number="6">तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर संकटातून मुक्त करणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे.</verse>
				<verse number="7">प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल.</verse>
				<verse number="8">तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील.</verse>
				<verse number="9">त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या गौरवशाली सामर्थ्यापासून दूर करण्यात येऊन शाश्वत विनाश ही शिक्षा मिळेल.</verse>
				<verse number="10">त्या दिवशी आपल्या पवित्र लोकांकडून गौरव मिळविण्यासाठी आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी अचंबित व्हावे म्हणून तो येईल. तुम्हीही त्यात सहभागी व्हाल कारण आम्ही दिलेल्या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवला आहे.</verse>
				<verse number="11">ह्याकरिता आम्ही तुमच्यासाठी सर्वदा प्रार्थना करतो, म्हणजे जे जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हांला आमंत्रित केले आहे, त्यासाठी तो तुम्हांला पात्र करो व तुमचा प्रत्येक चांगला मनोदय व तुमचे श्रद्धेने केलेले कार्य त्याच्या सामर्थ्याने तो पूर्णत्वास नेवो.</verse>
				<verse number="12">अशा प्रकारे आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपल्या प्रभू येशूच्या नावाला तुमच्यामध्ये व तुम्हांला त्याच्यामध्ये गौरव मिळेल.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याचे व आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही आवाहन करतो की,</verse>
				<verse number="2">तुम्ही एकदम मनात गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, अशा विचाराने चिंताग्रस्त होऊ नका. कदाचित आमच्याकडून आलेल्या भविष्यवाणीतून, प्रबोधनातून किंवा पत्रातून आम्हीच असे म्हटले, असा विचार केला जात असावा.</verse>
				<verse number="3">कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल.</verse>
				<verse number="4">तो नाशाचा पुत्र, विरोधक असून तथाकथित प्रत्येक दैवत किंवा पूज्य म्हणून म्हणतात त्या वस्तूपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणजे ‘मी देव आहे’, असे स्वतःचे प्रदर्शन करीत तो देवाच्या मंदिरात जाऊन बसेल.</verse>
				<verse number="5">मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?</verse>
				<verse number="6">तरीही आता ह्या गोष्टीच्या आड काहीतरी येत आहे व ती गोष्ट कोणती, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणजेच तो नेमलेल्या समयी प्रकट होईल.</verse>
				<verse number="7">तो रहस्यमय अनाचार आत्ताच आपले कार्य करीत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मार्गामधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील.</verse>
				<verse number="8">मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.</verse>
				<verse number="9">त्या अनाचाऱ्याचे आगमन सैतानी कार्यात दिसून येते. तो सर्व सामर्थ्य, चिन्हे, खोटे चमत्कार</verse>
				<verse number="10">व ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुष्ट फसवेगिरीचा प्रयोग करील कारण त्यांनी तारणासाठी ज्या सत्याचे स्वागत करून आवड धरायला हवी होती, ते केले नाही.</verse>
				<verse number="11">ह्यामुळे त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य चालू राहील, असे देव करील.</verse>
				<verse number="12">ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना दोषी ठरवण्यात यावे, म्हणून असे होईल.</verse>
				<verse number="13">बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाचे नेहमी आभार मानावयास हवेत; कारण आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.</verse>
				<verse number="14">देवाने तुम्हांला आमच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.</verse>
				<verse number="15">तर मग बंधूंनो, तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे सत्य आम्ही तुम्हांला शिकविले त्यात स्थिर राहा व ते घट्ट धरून ठेवा.</verse>
				<verse number="16">आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वत: आणि ज्याने कृपेद्वारे आपल्यावर प्रीती करून आपल्याला शाश्‍वत प्रोत्साहन व चांगली आशा दिली तो देव आपला पिता,</verse>
				<verse number="17">प्रत्येक चांगल्या कृतीसाठी व उक्तीसाठी तुमची अंत:करणे प्रोत्साहित व बळकट करो.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा, ज्यामुळे तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या संदेशाचा त्वरेने प्रसार व्हावा व तो सन्मानाने स्वीकारला जावा.</verse>
				<verse number="2">दुष्ट व वाईट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वांमध्ये विश्वास आहे, असे नाही.</verse>
				<verse number="3">परंतु प्रभू विश्वसनीय आहे. तो तुम्हांला मजबूत करील व त्या दुष्टापासून तुमचे संरक्षण करील.</verse>
				<verse number="4">तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.</verse>
				<verse number="5">देवाच्या प्रीतीची व ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या सहनशीलतेची प्रभू तुम्हांला अधिक प्रगल्भ समज देवो.</verse>
				<verse number="6">बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे.</verse>
				<verse number="7">आमचे अनुकरण कोणत्या प्रकारे केले पाहिजे, हे स्वतः तुम्हांला ठाऊक आहे. आम्ही तुमच्यामध्ये असताना आळशीपणाने वागलो नाही,</verse>
				<verse number="8">कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.</verse>
				<verse number="9">तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा, म्हणून असे केले.</verse>
				<verse number="10">आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये.</verse>
				<verse number="11">तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत.</verse>
				<verse number="12">अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे.</verse>
				<verse number="13">बंधूंनो, तुम्ही मात्र सत्कृत्ये करताना थकून जाऊ नका.</verse>
				<verse number="14">ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका,</verse>
				<verse number="15">मात्र त्याला शत्रू मानू नका, तर त्याला बंधू मानून समज द्या.</verse>
				<verse number="16">शांतीचा उगम असलेला प्रभू स्वतः सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हां सर्वांबरोबर राहो.</verse>
				<verse number="17">मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा, ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.</verse>
				<verse number="18">आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="54">
			<chapter number="1">
				<verse number="1">देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आदेशानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, विश्वासातील माझे एकनिष्ठ लेकरू तीमथ्य ह्याला:</verse>
				<verse number="2">देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू तुम्हांला कृपा, दया व शांती देवो.</verse>
				<verse number="3">मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे</verse>
				<verse number="4">व अफवांना खतपाणी घालणाऱ्या दंतकथा व प्रदीर्घ वंशावळ्या ह्यामध्ये त्यांनी गुंतून राहू नये तर श्रद्धेने ईश्‍वरी योजना जाणून घेता येते, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे.</verse>
				<verse number="5">ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, निर्मळ सदसद्विवेकबुद्धीत व अस्सल विश्वासात उद्भवणारी प्रीती उत्तेजित व्हावी.</verse>
				<verse number="6">हे सोडून कित्येक लोक निरर्थक चर्चेकडे वळले आहेत.</verse>
				<verse number="7">ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी ठामपणे सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही.</verse>
				<verse number="8">नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील, तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे,</verse>
				<verse number="9">तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,</verse>
				<verse number="10">जारकर्मी, लैंगिक विपर्यास करणारे, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे व शिकवणीविरुद्ध वागणारे ह्यांच्यासाठी केलेले आहे.</verse>
				<verse number="11">धन्यवादित देवाच्या गौरवशाली शुभवर्तमानाला जी साजेशी आहे ती शिकवण आमच्याकडे सोपविण्यात आली आहे.</verse>
				<verse number="12">ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो.</verse>
				<verse number="13">जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली.</verse>
				<verse number="14">येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला.</verse>
				<verse number="15">ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी सर्वप्रथम आहे.</verse>
				<verse number="16">जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली.</verse>
				<verse number="17">शाश्वत राजा, अविनाशी आणि अदृश्य असा एकच देव ह्याचा सन्मान व गौरव युगानुयुगे होवो! आमेन.</verse>
				<verse number="18">माझ्या मुला तीमथ्य, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या भविष्यवाणीनुसार हा आदेश मी तुला देऊन ठेवतो की, तू त्या संदेशाद्वारेच श्रद्धेने व चांगल्या सदसद्विवेकबुद्धीने सुयुद्ध कर.</verse>
				<verse number="19">कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले,</verse>
				<verse number="20">त्यांत हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत. त्यांनी दुर्भाषण करण्याचे सोडून द्यावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">सर्वांत प्रथम मी असे आवाहन करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना व मध्यस्थी करावी आणि आभार मानावेत.</verse>
				<verse number="2">राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना करावी, ह्यासाठी की, पूर्ण भक्तीने व सदाचाराने आपण स्वस्थपणाचे व शांतीचे आयुष्यक्रमण करावे.</verse>
				<verse number="3">हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते.</verse>
				<verse number="4">त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे.</verse>
				<verse number="5">कारण देव एक आहे आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे.</verse>
				<verse number="6">त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे</verse>
				<verse number="7">आणि ह्याकरिता मला संदेशहर व प्रेषित आणि यहुदीतरांसाठी श्रद्धा व सत्याच्या बाबतीत शिक्षक नेमण्यात आले होते.</verse>
				<verse number="8">ख्रिस्तमंडळीमधल्या प्रत्येक उपासनेत पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="9">तसेच स्त्रियांनी सभ्यतेने व समंजसपणे उचित वेशभूषा करून भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला अलंकृत करावे. विचित्र केशभूषा, सोने, मोती व अतिमौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,</verse>
				<verse number="10">तर धार्मिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास अलंकृत करावे.</verse>
				<verse number="11">स्त्रियांनी शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे.</verse>
				<verse number="12">स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर अधिकार गाजविण्याची परवानगी मी देत नाही, तिने मौन बाळगून बसावे;</verse>
				<verse number="13">कारण प्रथम आदामची निर्मिती झाली, नंतर हव्वेची</verse>
				<verse number="14">आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.</verse>
				<verse number="15">तथापि विश्वास, प्रीती, पवित्रता व मर्यादा ह्यांत टिकून राहिल्यास बालकांना जन्म देण्यामुळे तिचे तारण होईल.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">कोणी ख्रिस्तमंडळ्यांमध्ये बिशप होऊ पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन सत्य आहे.</verse>
				<verse number="2">ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा.</verse>
				<verse number="3">तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा,</verse>
				<verse number="4">आपल्या कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा व आपल्या मुलांबाळांना आज्ञाधारकपणाचे व भीडमर्यादेचे वळण लावणारा असावा;</verse>
				<verse number="5">कारण ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळ्यांचा सांभाळ कसा करील?</verse>
				<verse number="6">त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्याला दोषी ठरवले जाऊ नये म्हणून तो श्रद्धेत परिपक्‍व असावा.</verse>
				<verse number="7">शिवाय त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये. त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांचे चांगले मत असावे,</verse>
				<verse number="8">तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत.</verse>
				<verse number="9">ते विश्वासाचे रहस्य निर्मळ सदसद्विवेकबुद्धीने राखणारे असावेत.</verse>
				<verse number="10">त्यांची अगोदर पारख व्हावी आणि ते निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी डीकन म्हणून सेवा करावी.</verse>
				<verse number="11">तसेच त्यांच्या पत्नीही गंभीर असाव्यात, निंदक नसाव्यात, शांतचित्त व विश्‍वासू असाव्यात.</verse>
				<verse number="12">ख्रिस्तमंडळीचा डीकन एका स्त्रीचा पती असावा. तो आपल्या मुलांबाळांची व कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा असावा.</verse>
				<verse number="13">जे डीकन म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करतात ते आपणासाठी चांगली योग्यता मिळवितात आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेविषयी ते धैर्याने बोलू शकतात.</verse>
				<verse number="14">तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून मी हे तुला लिहिले आहे.</verse>
				<verse number="15">तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी देवाची ख्रिस्तमंडळी आहे तीत म्हणजे देवाच्या जिवंत घराण्यात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.</verse>
				<verse number="16">आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.</verse>
				<verse number="2">ज्यांची सदसद्विवेकबुद्धी तप्‍त लोखंडाने डाग देऊन मारून टाकल्यासारखी झाली आहे, असे लबाड लोक ही खोटी शिकवणूक पसरवतात.</verse>
				<verse number="3">लग्न करावयाची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी कृतज्ञतेने ज्याचा उपभोग घ्यावयाचा, असे देवाने निर्माण केलेले खाद्य वर्ज्य करावे, असे सांगतील.</verse>
				<verse number="4">देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे; काहीही वर्ज्य मानू नये मात्र सर्व गोष्टींचा कृतज्ञतेने स्वीकार करावा;</verse>
				<verse number="5">कारण देवाचे वचन व प्रार्थना ह्यांनी ती पवित्र होते.</verse>
				<verse number="6">ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.</verse>
				<verse number="7">परंतु अमंगळ दंतकथांपासून व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि भक्तीविषयी प्रयत्नशील राहा.</verse>
				<verse number="8">शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते.</verse>
				<verse number="9">हे वचन खातरीलायक व पूर्णपणे स्वीकारण्याजोगे आहे.</verse>
				<verse number="10">आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत.</verse>
				<verse number="11">हे निर्देश त्यांना शिकव व त्यांनी पाळण्याचा आग्रह धर.</verse>
				<verse number="12">कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.</verse>
				<verse number="13">मी येईपर्यत पवित्र शास्त्राचे सार्वजनिक वाचन, बोध व धर्मशिक्षण ह्यांच्याकडे लक्ष दे.</verse>
				<verse number="14">तुझ्यावर वडीलजनांनी हात ठेऊन प्रार्थना केली, त्या वेळी संदेशाद्वारे मिळालेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.</verse>
				<verse number="15">तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्या अमलात आण.</verse>
				<verse number="16">स्वतःकडे व आपण देत असलेल्या धर्मशिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यात टिकून राहा. असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे तारण साधशील.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">ज्येष्ठ माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून त्याचा आदर कर.</verse>
				<verse number="2">युवकांना बंधूसमान मानून, वडीलधाऱ्या स्त्रियांस मातेसमान मानून व तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर.</verse>
				<verse number="3">ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.</verse>
				<verse number="4">कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरातल्या कुटुंबीयांबरोबर धार्मिकतेने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे; कारण हे देवाला आवडते.</verse>
				<verse number="5">जी विधवा खरोखरीची विधवा आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते.</verse>
				<verse number="6">परंतु जी विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.</verse>
				<verse number="7">त्यांनी दोषविरहित व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन कर.</verse>
				<verse number="8">परंतु जर कोणी व्यक्ती नातलगांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची देखभाल करत नसेल, तर तिने विश्वास नाकारला आहे. ती व्यक्ती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा वाईट आहे.</verse>
				<verse number="9">साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची विधवा असेल, तिचेच नाव विधवांच्या यादीत समाविष्ट करावे.</verse>
				<verse number="10">शिवाय तिचे एकदाच लग्न झालेले असावे व सत्कृत्यांसाठी, मुलाबाळांचा सांभाळ, पाहुणचार, पवित्र लोकांची नम्र सेवा, संकटग्रस्तांना साहाय्य ह्यासाठी ती नावाजलेली असावी.</verse>
				<verse number="11">परंतु तरुण विधवांची ह्या यादीत नोंद करू नये; कारण जेव्हा त्या कामुक होऊन लग्न करावयास पाहतात तेव्हा त्या ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतात</verse>
				<verse number="12">आणि आपल्या पहिल्या विश्‍वासाचा भंग केल्यामुळे त्या दोषी ठरतात.</verse>
				<verse number="13">शिवाय घरोघर फिरून त्या वेळ वाया घालवितात. इतकेच नव्हे, तर वटवट व लुडबूड करणाऱ्या होतात आणि बोलू नये ते बोलतात.</verse>
				<verse number="14">ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये;</verse>
				<verse number="15">कारण कित्येक विधवा बहकून सैतानामागे गेल्या आहेत.</verse>
				<verse number="16">मात्र जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात विधवा असल्या, तर त्या व्यक्तीने त्यांची देखभाल करावी, ख्रिस्तमंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये, म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची ख्रिस्तमंडळीला तरतूद करता येईल.</verse>
				<verse number="17">जे वडीलजन चांगल्या प्रकारे आपली सेवा करतात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात त्यांना दुप्पट सन्मान मिळावा;</verse>
				<verse number="18">कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘बैल मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नकोस आणि कामगाराला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.’</verse>
				<verse number="19">दोन किंवा तीन साक्षीदार असल्यावाचून कोणत्याही वडीलजनावरील आरोप स्वीकारू नकोस.</verse>
				<verse number="20">इतरांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.</verse>
				<verse number="21">देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात पूर्वग्रह न ठेवता हे आदेश पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.</verse>
				<verse number="22">प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करण्याकरिता प्रार्थना करण्यास उतावीळपणे कोणावर हात ठेवू नकोस. दुसऱ्यांच्या पापात तू सहभागी होऊ नकोस तर स्वतःला शुद्ध राख.</verse>
				<verse number="23">ह्यापुढे नुसते पाणीच पीत राहू नकोस, तर चांगल्या पचनक्रियेसाठी आणि आपल्या वारंवार होणाऱ्या आजारासाठी थोडा द्राक्षारस घे.</verse>
				<verse number="24">कित्येक माणसांची पापे उघड असून ती न्यायनिवाड्यासाठी त्यांच्या पुढे असतात परंतु इतर काहींचा न्यायनिवाडा नंतर होतो.</verse>
				<verse number="25">त्याचप्रमाणे काही चांगली कृत्येही उघड आहेत आणि जी तितकीशी उघड नाहीत, ती गुप्त राखली जाऊ शकत नाहीत.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">जे दास म्हणून जोखडाखाली आहेत, त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास पात्र आहेत, असे मानावे, ह्यासाठी की, देवाच्या नावाची व त्याच्या धर्मसत्याची कोणीही निंदा करणार नाही.</verse>
				<verse number="2">ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना ते बंधूसमान आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर त्यांचे अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो, ते त्यांना प्रिय असलेले विश्वास ठेवणारे आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.</verse>
				<verse number="3">जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही,</verse>
				<verse number="4">तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे विकृत झालेला आहे. ह्यामुळे हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय हे सारे उत्पन्न होते.</verse>
				<verse number="5">मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.</verse>
				<verse number="6">समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो.</verse>
				<verse number="7">आपण जगात काही आणले नाही आणि निश्‍चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही!</verse>
				<verse number="8">तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे.</verse>
				<verse number="9">परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात;</verse>
				<verse number="10">कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.</verse>
				<verse number="11">हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर.</verse>
				<verse number="12">श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.</verse>
				<verse number="13">सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,</verse>
				<verse number="14">आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हे आदेश निष्कलंकपणे व निर्दोषपणे पाळ.</verse>
				<verse number="15">जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही</verse>
				<verse number="16">आणि कोणी पाहू शकत नाही, तो प्रभू येशूचे प्रकट होणे यथाकाळी सिद्धीस नेईल, त्याला सन्मान व शाश्वत सामर्थ्य असो. आमेन.</verse>
				<verse number="17">प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.</verse>
				<verse number="18">चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे.</verse>
				<verse number="19">अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील.</verse>
				<verse number="20">हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ;</verse>
				<verse number="21">कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत. तुम्हांला कृपा मिळो. आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="55">
			<chapter number="1">
				<verse number="1">देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून,</verse>
				<verse number="2">माझे प्रिय लेकरू तीमथ्य ह्याला: देवपिता व आपला प्रभू ख्रिस्त येशू तुला कृपा, दया व शांती देवो.</verse>
				<verse number="3">मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.</verse>
				<verse number="4"></verse>
				<verse number="5">तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे.</verse>
				<verse number="6">मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर;</verse>
				<verse number="7">कारण देवाने आपल्याला भीतीचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे.</verse>
				<verse number="8">म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे.</verse>
				<verse number="9">त्याने आपल्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने आमंत्रित केले आहे. ही कृपा काळाच्या प्रारंभापूर्वी ख्रिस्त येशूद्वारे आपल्यावर करण्यात आली.</verse>
				<verse number="10">परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.</verse>
				<verse number="11">मला यहुदीतर लोकांसाठी प्रचारक, प्रेषित व शिक्षक म्हणून नेमले आहे.</verse>
				<verse number="12">ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे.</verse>
				<verse number="13">तू स्वतः अनुकरण करावे म्हणून जी सत्यवचने मी तुला शिकविली आहेत, ती दृढ धरून ठेव. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या श्रद्धेत व प्रीतीत टिकून राहा.</verse>
				<verse number="14">तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ.</verse>
				<verse number="15">जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत.</verse>
				<verse number="16">अनेसिफरच्या कुटुंबावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार मला आधार दिला आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची लाज वाटली नाही,</verse>
				<verse number="17">तर तो रोम शहरात आल्यावर त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला.</verse>
				<verse number="18">न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा.</verse>
				<verse number="2">पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील.</verse>
				<verse number="3">ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो.</verse>
				<verse number="4">जो युद्धात मग्न असतो तो स्वत: संसाराच्या कार्यात गुंतत नाही, ह्यासाठी की, सैन्याधिकाऱ्याला त्याला संतुष्ट करावयाचे असते.</verse>
				<verse number="5">धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही.</verse>
				<verse number="6">श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.</verse>
				<verse number="7">जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो.</verse>
				<verse number="8">माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव.</verse>
				<verse number="9">ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही.</verse>
				<verse number="10">निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो.</verse>
				<verse number="11">हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू.</verse>
				<verse number="12">जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील.</verse>
				<verse number="13">आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.</verse>
				<verse number="14">तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.</verse>
				<verse number="15">सत्याचे वचन दक्षतेने सांगणारा व स्वतःच्या सेवाकार्याची लाज न बाळगणारा असा देवाच्या पसंतीला उतरलेला कामगार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कर.</verse>
				<verse number="16">अमंगल व मूर्ख स्वरूपाच्या वादविवादापासून दूर राहा कारण असा वितंडवाद लोकांच्या अधार्मिकपणात भर घालतो.</verse>
				<verse number="17">अशी शिकवणूक कॅन्सरसारखी पसरते. हुमनाय व फिलेत ह्या दोघांनी अशी शिकवणूक दिलेली आहे.</verse>
				<verse number="18">ते सत्यापासून बहकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे, असे म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात.</verse>
				<verse number="19">तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे: ‘आपले जे आहेत त्यांना प्रभू ओळखतो’ आणि ‘जो कोणी मी प्रभूचा आहे, असे म्हणतो त्याने अनीतीपासून दूर राहावे’.</verse>
				<verse number="20">मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यांपैकी कित्येकांचा उपयोग विशेष प्रसंगी केला जातो व काहींचा सामान्य कार्यासाठी केला जातो.</verse>
				<verse number="21">जर कोणी दुष्टपणापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो सन्मानासाठी पवित्र केलेले, प्रभूला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामाकरिता तयार केलेले असे पात्र होईल.</verse>
				<verse number="22">तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध अंत:करणाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर यथोचित संबंध, विश्वास, प्रीती व शांती ह्यांचा पाठपुरावा कर.</verse>
				<verse number="23">मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="24">प्रभूच्या सेवकाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील,</verse>
				<verse number="25">विरोध करणाऱ्यांना नम्रतेने शिक्षण देणारा, असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल</verse>
				<verse number="26">आणि त्यानंतर सैतानाच्या पाशातून सुटून ते देवाच्या इच्छेस वश होण्याकरता भानावर येतील.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे लक्षात ठेव.</verse>
				<verse number="2">माणसे आत्मकेंद्रित, धनलोभी, बढाईखोर, अहंकारी, दुर्भाषण करणारी, आईबापांना न मानणारी, कृतघ्न, अपवित्र,</verse>
				<verse number="3">ममताहीन, क्षमा न करणारी, निंदक, असंयमी, उग”, चांगुलपणाचा द्वेष करणारी,</verse>
				<verse number="4">विश्वासघातकी, हेकेखोर, उद्धट, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,</verse>
				<verse number="5">आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा.</verse>
				<verse number="6">त्यांच्यापैकी काही लोक दुसऱ्यांच्या घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या,</verse>
				<verse number="7">सदा शिकत असूनही सत्याचे ज्ञान मिळवू न शकणाऱ्या भोळ्या स्त्रियांस वश करतात.</verse>
				<verse number="8">यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक विवेकभ्रष्ट व विश्वासासंबंधाने अपयशी ठरलेले आहेत,</verse>
				<verse number="9">परंतु हे लोक प्रगती करू शकणार नाहीत कारण जसे यान्नेस व यांब्रेस ह्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.</verse>
				<verse number="10">परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस.</verse>
				<verse number="11">अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या ठिकाणी माझ्या बाबतीत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तुला ठाऊक आहे. त्या सर्वांतून प्रभूने मला मुक्त केले.</verse>
				<verse number="12">ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल</verse>
				<verse number="13">परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील.</verse>
				<verse number="14">तू मात्र ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.</verse>
				<verse number="15">त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे.</verse>
				<verse number="16">प्रत्येक धर्मशास्त्रलेख परमेश्वरप्रेरित सत्य शिकविण्यासाठी, असत्याचे खंडण करण्यासाठी, दोष सुधारविण्यासाठी व सद्वर्तनाविषयी बोध करण्यासाठी उपयोगी आहे.</verse>
				<verse number="17">ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,</verse>
				<verse number="2">शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.</verse>
				<verse number="3">लोक सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे ऐकण्याची आवड धरणारे बनून आपणाभोवती शिक्षकांची गर्दी जमवतील,</verse>
				<verse number="4">ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व दंतकथांकडे वळतील, अशी वेळ येईल.</verse>
				<verse number="5">परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.</verse>
				<verse number="6">आता मी स्वतःचे बलिदान म्हणून अर्पण करावे, अशी वेळ येत आहे, माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे.</verse>
				<verse number="7">मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे.</verse>
				<verse number="8">आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.</verse>
				<verse number="9">तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये,</verse>
				<verse number="10">ऐहिक सुख प्रिय मानून देमास मला सोडून थेस्सलनीकाला गेला. क्रेस्केस गलतीयाला निघून गेला व तीत दालमतियाला गेला.</verse>
				<verse number="11">लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवाकार्यासाठी मला उपयोगी आहे.</verse>
				<verse number="12">तुखिक ह्याला मी इफिस येथे पाठविले आहे.</verse>
				<verse number="13">माझा झगा त्रोवस येथे कार्पजवळ राहिला आहे, तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण.</verse>
				<verse number="14">तांबट आलेक्सांद्र ह्याने मला पुष्कळ त्रास दिला. त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.</verse>
				<verse number="15">त्याच्याविषयी तूही जपून राहा; कारण त्याने आपल्या संदेशाला तीव्र विरोध केला होता.</verse>
				<verse number="16">माझ्या पहिल्या समर्थनाच्या वेळेस मला कोणीही आधार दिला नाही, तर सर्वांनी मला सोडले होते. त्याबद्दल परमेश्वराने त्यांचा हिशेब घेऊ नये.</verse>
				<verse number="17">परंतु प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व यहुदीतरांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला मृत्युदंडापासून वाचविले.</verse>
				<verse number="18">सर्व दुष्ट डावपेचांपासून प्रभू माझा बचाव करील व आपल्या स्वर्गीय राज्यात मला सुरक्षितपणे स्वीकारील. त्याला युगानुयुगे गौरव असो! आमेन.</verse>
				<verse number="19">प्रिस्का, अक्विला व अनेसिफरच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा सांग.</verse>
				<verse number="20">एरास्त करिंथमध्ये राहिला. त्रफिम आजारी झाला म्हणून मी त्याला मिलेत येथे ठेवून आलो.</verse>
				<verse number="21">होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात.</verse>
				<verse number="22">प्रभू तुमच्या आत्म्याबरोबर राहो. तुम्हांला देवाची कृपा मिळो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="56">
			<chapter number="1">
				<verse number="1">देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.</verse>
				<verse number="2">हे सत्य शाश्वत जीवनाच्या आशेवर आधारलेले असून सत्यवचनी परमेश्वराने काळाच्या प्रारंभापूर्वी ह्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले</verse>
				<verse number="3">आणि उचित समयी त्याच्या संदेशात ते त्याने प्रकट केले. हा संदेश माझ्याकडे सोपविण्यात आला होता व मी आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार तो जाहीर करीत आहे.</verse>
				<verse number="4">हे पत्र मी तीतला लिहिले आहे. ज्या श्रद्धेत आम्ही सहभागी झालो आहोत त्या श्रद्धेत तो माझा खराखुरा पुत्र आहे. देवपिता व आपला तारणारा येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.</verse>
				<verse number="5">मी तुला क्रे त येथे ह्यासाठी सोडून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला दिलेल्या आदेशानुसार तू प्रत्येक नगरात वडीलजन नेमावेत.</verse>
				<verse number="6">ज्याला नेमावयाचा तो निर्दोष असावा; तो एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्‍वास ठेवणारी असावीत व त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसावा, ती बंडखोर नसावीत.</verse>
				<verse number="7">ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा,</verse>
				<verse number="8">तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, सुज्ञ, नीतिमान, भक्तिमान, शिस्तप्रिय</verse>
				<verse number="9">आणि दिलेल्या शिक्षणानुसार विश्वसनीय वचनाला धरून राहणारा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व विरोधकांना निरुत्तर करावयासही समर्थ व्हावे.</verse>
				<verse number="10">पुष्कळ लोक निरर्थक बडबड करीत बंडखोरपणाने वागतात व काही लोकांना फसवितात. सुंता झालेल्या लोकांमधून धर्मांतरित झालेल्यांचा अशा लोकांमध्ये विशेषकरून समावेश आहे.</verse>
				<verse number="11">त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळविण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्यांच्या विश्वासाचा नाश करतात.</verse>
				<verse number="12">त्या लोकांतील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो की, क्रेत येथील लोक सदा लबाड, दुष्ट, पाशवी, आळशी व खादाड असतात.</verse>
				<verse number="13">ही साक्ष खरी आहे, म्हणून त्यांच्या पदरी स्पष्ट दोष घाल,</verse>
				<verse number="14">ह्यासाठी की, त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांचे आदेश ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे.</verse>
				<verse number="15">शुद्ध लोकांना सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही. त्यांचे मन व सदसद्विवेक बुद्धी ही विटाळलेली आहेत.</verse>
				<verse number="16">आपण देवाला ओळखतो असे ते जाहीर करतात परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते तिरस्करणीय व आज्ञाभंग करणारे असून प्रत्येक चांगल्या कामासाठी अपात्र आहेत.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">तू मात्र जे शिक्षणाला अनुसरून आहे, ते शिकव.</verse>
				<verse number="2">वयस्क पुरुषांनी नेमस्त, समजूतदार व मर्यादशील राहून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ राहावे.</verse>
				<verse number="3">तसेच वयस्क स्त्रियांनी चालचलणुकीत पवित्र स्त्रियांना शोभेल असे जगावे. त्या चहाडखोर व मद्यपानासक्‍त नसाव्यात; शिक्षण देणाऱ्या असाव्यात.</verse>
				<verse number="4">त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलांबाळांवर प्रेम करावे,</verse>
				<verse number="5">त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू व नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.</verse>
				<verse number="6">तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे, म्हणून त्यांना बोध कर.</verse>
				<verse number="7">सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे.</verse>
				<verse number="8">टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.</verse>
				<verse number="9">दासांनी आपल्या धन्यांच्या आज्ञेत राहावे, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये,</verse>
				<verse number="10">त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा त्यांना बोध कर.</verse>
				<verse number="11">सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की,</verse>
				<verse number="12">ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे.</verse>
				<verse number="13"></verse>
				<verse number="14">आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.</verse>
				<verse number="15">ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.</verse>
				<verse number="2">कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे;</verse>
				<verse number="3">कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.</verse>
				<verse number="4">जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला,</verse>
				<verse number="5">तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले.</verse>
				<verse number="6">देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे.</verse>
				<verse number="7">ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी.</verse>
				<verse number="8">हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत</verse>
				<verse number="9">परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत.</verse>
				<verse number="10">तट पाडणाऱ्या माणसाला निदान दोनदा इशारा दे आणि नंतर त्यांच्याशी संबंध ठेवू नको.</verse>
				<verse number="11">असला माणूस विकृत आहे, हे तुला ठाऊक आहे आणि त्याची पापे त्याचा न्यायनिवाडा करतात.</verse>
				<verse number="12">मी अर्तमला किंवा तुखिकला तुझ्याकडे पाठविल्यावर जमेल तितक्या लवकर तू माझ्याकडे निकपलिस येथे निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचे मी ठरविले आहे.</verse>
				<verse number="13">जेना वकील व अपुल्लो ह्यांना काही उणीव भासणार नाही अशा तयारीने शक्य तितक्या लवकर रवाना कर.</verse>
				<verse number="14">आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.</verse>
				<verse number="15">माझ्याबरोबर असलेले सर्व जण तुला शुभेच्छा कळवतात. आपल्या श्रद्धावंत स्नेह्यांना आमच्या शुभेच्छा कळव. तुम्हां सर्वांवर देवाची कृपा असो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="57">
			<chapter number="1">
				<verse number="1">आमचा प्रिय सहकारी फिलेमोन, तुझ्या घरात जमणारी ख्रिस्तमंडळी, आमची भगिनी अफ्फिया व आमचा सहसैनिक अर्खिप्प, तुम्हां सर्वांना</verse>
				<verse number="2">ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:</verse>
				<verse number="3">देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.</verse>
				<verse number="4">सर्व पवित्र लोकांवर असलेली तुझी प्रीती व प्रभू येशूवरील तुझा विश्वास ह्यांच्याविषयी ऐकून मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे आभार मानतो.</verse>
				<verse number="5"></verse>
				<verse number="6">मी प्रार्थना करतो की, श्रद्धेमधील तुझी सहभागिता परिणामकारक व्हावी व त्यामुळे जे चागले आपण ख्रिस्तासाठी करावे ते तुम्ही समजून घ्यावे.</verse>
				<verse number="7">तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व मला प्रोत्साहन मिळाले कारण हे बंधो, तू पवित्र लोकांची अंतःकरणे उल्लसित केली आहेत.</verse>
				<verse number="8">ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते.</verse>
				<verse number="9">परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे.</verse>
				<verse number="10">मी तुरुंगात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला तो माझा पुत्र अनेसिम ह्याच्याविषयी विनंती करतो.</verse>
				<verse number="11">तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, परंतु आता तुला व मलाही उपयोगी आहे.</verse>
				<verse number="12">मला प्राणप्रिय असलेल्या त्याला, मी तुझ्याकडे परत पाठविले आहे.</verse>
				<verse number="13">शुभवर्तमानामुळे मी तुरुंगात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.</verse>
				<verse number="14">पण तू मला साहाय्य करावे, हे मला तुझ्यावर लादायचे नाही, तर तू हे स्वेच्छेने करावे, अशी माझी इच्छा आहे.</verse>
				<verse number="15">कदाचित तो तुझ्यापासून थोडा वेळ वेगळा झाला, ते अशाकरिता असेल की, त्याने सदासर्वकाळ तुझे व्हावे.</verse>
				<verse number="16">त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो किती तरी प्रिय आहे आणि तुला एक दास म्हणून व प्रभूमध्ये एक बंधू म्हणून किती तरी अधिक प्रिय होईल.</verse>
				<verse number="17">म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर.</verse>
				<verse number="18">त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड.</verse>
				<verse number="19">हे मी, पौलाने स्वतः लिहिले आहे. मी तुझी परतफेड करीन. माझे तुझ्यावर किती उपकार आहेत, ह्याविषयी मी काही बोलत नाही.</verse>
				<verse number="20">हे बंधो, प्रभूसाठी माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्तामध्ये माझा बंधू म्हणून मला आनंदित कर!</verse>
				<verse number="21">तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की, मी जे सांगतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.</verse>
				<verse number="22">तसेच माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव; कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे माझे तुमच्याकडे परत येणे होईल, अशी मला आशा आहे.</verse>
				<verse number="23">ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास</verse>
				<verse number="24">आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला शुभेच्छा कळवतात.</verse>
				<verse number="25">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="58">
			<chapter number="1">
				<verse number="1">प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशाअंशानी व निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे बोलला.</verse>
				<verse number="2">परंतु ह्या शेवटच्या काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याच्याद्वारे विश्व निर्माण केले आणि त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले.</verse>
				<verse number="3">तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.</verse>
				<verse number="4">पुत्राला देवाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ केले आहे - अगदी त्यांच्या नावापेक्षा अधिक श्रेष्ठ नाव त्याला दिले आहे तसे.</verse>
				<verse number="5">कारण त्याने त्याच्या कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले? तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल.</verse>
				<verse number="6">परंतु तो प्रथम जन्मलेल्या पुत्राला जगात आणताना म्हणतो: देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.</verse>
				<verse number="7">मात्र देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वारे आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करतो.</verse>
				<verse number="8">परंतु पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगांचे आहे आणि तुझा राजदंड न्यायाचा राजदंड आहे.</verse>
				<verse number="9">तुला न्यायाची चाड आणि वाइटाचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ अशा आनंददायक तेलाचा अभिषेक तुला केला आहे.</verse>
				<verse number="10">तो असेही म्हणाला, हे प्रभो, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत;</verse>
				<verse number="11">ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी कपड्यांसारखी जीर्ण होतील;</verse>
				<verse number="12">तू त्यांस झग्यासारखे गुंडाळशील आणि ती कपड्यांप्रमाणे बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत.</verse>
				<verse number="13">देवाने त्याच्या कोणत्याही देवदूताविषयी कधी असे म्हटले? मी तुझ्या वैऱ्यांना तुझ्या पायांखाली ठेवेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.</verse>
				<verse number="14">तर मग देवदूत कोण आहेत? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले, ते सर्व परमेश्वराचे सेवक नाहीत काय?</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.</verse>
				<verse number="2">आपल्या पूर्वजांकरिता देवदूतांद्वारे सांगितलेले वचन जर खरे ठरले आणि प्रत्येक उ्रंघनाची व आज्ञाभंगाची यथान्याय्य शिक्षा मिळाली,</verse>
				<verse number="3">तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्या सर्वांना प्रमाण पटविले;</verse>
				<verse number="4">त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुत कृत्ये व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची वरदाने वाटून साक्ष दिली.</verse>
				<verse number="5">आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही.</verse>
				<verse number="6">उलट, पवित्र शास्त्रात कोणी एकाने साक्ष दिली आहे: मानव तो काय की, तू त्याची आठवण ठेवावी? अथवा मानवपुत्र तो काय की, तू त्याची काळजी घ्यावी?</verse>
				<verse number="7">तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे; तू त्याला वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू तुझ्या हाताच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे.</verse>
				<verse number="8">‘तू सर्व काही त्याच्या अधीन - त्याच्या पायांखाली - ठेवले आहे’, सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही; परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.</verse>
				<verse number="9">देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा अल्पावधीसाठी कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.</verse>
				<verse number="10">ज्याने सर्व काही निर्माण केले व जो सर्व काही अस्तित्वात टिकवून ठेवतो त्या परमेश्वराने पुष्कळ पुत्रांना त्याच्या वैभवात सहभागी करून घेताना त्यांच्या तारणाचा अग्रेसर येशूला दुःखसहनाच्याद्वारे परिपूर्ण केले, हे देवाच्या दृष्टीने उचितच झाले.</verse>
				<verse number="11">जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकाच पित्यापासून आहेत, ह्या कारणामुळे त्यांना बंधू म्हणावयाची येशूला लाज वाटत नाही.</verse>
				<verse number="12">तो परमेश्वराला म्हणतो, मी माझ्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती जाहीर करीन, त्यांच्या मेळाव्यात तुझे स्तवन करीन.</verse>
				<verse number="13">आणि पुन्हा तो म्हणतो, मी परमेश्वरावर भरवसा ठेवीन. तसेच तो पुढे म्हणतो, पाहा, देवाने मला दिलेल्या मुलांसह मी येथे हजर आहे.</verse>
				<verse number="14">ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही सर्व बाबतीत त्यांच्यासारखा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला त्याने स्वत:च्या मरणाने नेस्तनाबूद करावे</verse>
				<verse number="15">आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात होते, त्या सर्वांना मुक्त करावे.</verse>
				<verse number="16">कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्याला नव्हे तर पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अब्राहामच्या संतानाच्या साहाय्याला धावून येतो.</verse>
				<verse number="17">म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी विश्वसनीय व दयाळू प्रमुख याजक व्हावे.</verse>
				<verse number="18">ज्याअर्थी त्याने स्वतः कसोटीशी सामना करताना दुःख भोगले, त्याअर्थी ज्यांची कसोटी होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण जाहीर करीत असलेल्या श्रद्धेचा प्रमुख याजक येशू ह्याचा विचार करा.</verse>
				<verse number="2">जसा मोशे त्याच्या कार्यात देवाच्या घरात विश्वासू होता तसा येशूदेखील ज्याने त्याची निवड केली त्याच्याशी विश्वासू होता.</verse>
				<verse number="3">ज्याप्रमाणे घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू मोशेपेक्षा अधिक सन्मानाला पात्र आहे.</verse>
				<verse number="4">प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व काही बांधणारा देवच आहे.</verse>
				<verse number="5">जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी देवाच्या घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.</verse>
				<verse number="6">ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता. आपल्या आशेसंबंधी धैर्य व आत्मविश्वास यांमध्ये पारपर्यंत टिकून राहिल्यास आपण देवाचे घर आहोत.</verse>
				<verse number="7">ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,</verse>
				<verse number="8">तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी बंड पुकारले त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका.</verse>
				<verse number="9">परमेश्वर म्हणतो, तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी कृत्यें बघितली होती, तरी मला कसोटीला लावून माझी परीक्षा पाहिली.</verse>
				<verse number="10">त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत बहकलेल्या अंतःकरणाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग ओळखले नाहीत;</verse>
				<verse number="11">म्हणून मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो, जेथे मी त्यांना विसावा दिला असता, तेथे ते निश्चित पोहोचणार नाहीत.</verse>
				<verse number="12">बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके विश्वासहीन दुष्ट मन तुमच्यांत कोणाचेही असू नये म्हणून जपा.</verse>
				<verse number="13">उलट, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना रोज बोध करा, हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण अंत:करणाचे होऊ नये;</verse>
				<verse number="14">कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.</verse>
				<verse number="15">धमर्र्शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले, त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका.</verse>
				<verse number="16">देवाची वाणी ऐकून त्याच्याविरुद्ध बंड पुकारणारे लोक कोण होते? ज्यांना मोशेने मिसरमधून बाहेर काढले होते, तेच सर्व नव्हते काय?</verse>
				<verse number="17">चाळीस वर्षे देव कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय?</verse>
				<verse number="18">आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की, “तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही?</verse>
				<verse number="19">ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना तेथे प्रवेश करता आला नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">ज्या विसाव्याविषयी देव बोलला, त्याच्याविषयीचे अभिवचन त्याने आपल्याला देऊन ठेवलेले आहे; कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण काळजी घेऊ या;</verse>
				<verse number="2">कारण त्यांच्यासारखे आपल्यालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारले नाही.</verse>
				<verse number="3">मात्र आपण श्रद्धावंत लोक परमेश्वराने वचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करीत आहोत. हे त्याच्या शब्दाप्रमाणेच घडत आहे: मी माझ्या क्रोधाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. जरी जगाच्या निर्मितीनंतर त्याचे कार्य पूर्ण झाले होते, तरीही तो हे म्हणाला.</verse>
				<verse number="4">सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला.</verse>
				<verse number="5">आणि पुन्हा याचविषयी म्हटले आहे, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.</verse>
				<verse number="6">ज्यांना पूर्वी शुभवर्तमान सांगण्यात आले होते ते अवज्ञेमुळे त्या विसाव्याच्या ठिकाणी आले नाहीत; इतरांना मात्र तेथे पोहोचता येण्यासारखे आहे.</verse>
				<verse number="7">म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्याद्वारे म्हणतो, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका.</verse>
				<verse number="8">जर यहोशवाने त्यांना विसावा दिला असता, तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाविषयी तो बोलला नसता.</verse>
				<verse number="9">मात्र देवाच्या लोकांसाठी साबाथाचा विसावा राहिला आहे.</verse>
				<verse number="10">कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात येतो, तो जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला, तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतो.</verse>
				<verse number="11">म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्यापैकी कोणी अपयशी ठरू नये.</verse>
				<verse number="12">वास्तविक देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा धारदार असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा न्याय करणारे असे आहे;</verse>
				<verse number="13">त्याच्या दृष्टीला अदृश्य काहीच नाही, ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे, असे सृष्टीतील सर्व काही त्याच्या दृष्टीला उघड व प्रकट केलेले आहे आणि आपणा सर्वांना स्वतःविषयी त्याला हिशोब द्यावा लागणार आहे.</verse>
				<verse number="14">तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला देण्यात आलेला आहे, म्हणून आपण जी श्रद्धा स्वीकारली आहे ती दृढ धरून राहू या.</verse>
				<verse number="15">आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.</verse>
				<verse number="16">तर मग आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">प्रत्येक प्रमुख याजक माणसांमधून निवडलेला व देवविषयक गोष्टींबाबत माणसांकरिता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही अर्पण करावीत.</verse>
				<verse number="2">अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे</verse>
				<verse number="3">आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी, तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे.</verse>
				<verse number="4">प्रमुख याजकपदाचा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे, त्याला तो मिळतो.</verse>
				<verse number="5">प्रमुख याजक होण्यासाठी ख्रिस्तानेही स्वतःचा गौरव केला नाही. ज्याने त्याला नेमले त्याने त्याला म्हटले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.</verse>
				<verse number="6">त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.</verse>
				<verse number="7">आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ येशूने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि त्याच्या आदरपूर्वक अधीनतेमुळे ती ऐकण्यात आली;</verse>
				<verse number="8">तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्यामधून तो आज्ञाधारकपणा शिकला</verse>
				<verse number="9">आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला,</verse>
				<verse number="10">त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधिण्यात आले.</verse>
				<verse number="11">ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायाचे आहे, ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात.</verse>
				<verse number="12">वास्तविक एवढ्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होते, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही.</verse>
				<verse number="13">दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक असतो.</verse>
				<verse number="14">पण ज्यांना विवेकदृष्टीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">आपण ख्रिस्ती संदेशाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत प्रगती करण्याचा नेटाने प्रयत्न करू या. निरुपयोगी कृत्यांपासून परावृत्त होणे व देवावर श्रद्धा ठेवणे,</verse>
				<verse number="2">बाप्तिस्मे, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान व शाश्वत न्यायनिवाडा ह्या गोष्टींविषयीच्या शिक्षणाचा पाया आपण पुन्हा घालू नये.</verse>
				<verse number="3">आपण पुढे जाऊ या. परमेश्वर होऊ देईल तर हे आपण करू या.</verse>
				<verse number="4">कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले</verse>
				<verse number="5">आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली,</verse>
				<verse number="6">त्यांचे जर पतन झाले, तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने क्रुसावर खिळतात व त्याचा उघड-उघड अपमान करतात.</verse>
				<verse number="7">जी जमीन आपल्यावर वारंवार पडलेला पाऊस शोषून घेते व लागवड करणाऱ्याला उपयोगी असे पीक देते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो;</verse>
				<verse number="8">पण जी जमीन काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट अग्नीने होईल.</verse>
				<verse number="9">जरी आम्ही असे बोललो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या म्हणजे तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे.</verse>
				<verse number="10">तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती, हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.</verse>
				<verse number="11">आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने आपली आस्था शेवटपर्यंत टिकवून ठेवावी.</verse>
				<verse number="12">म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्यायोगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे ठरतात त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे व्हावे.</verse>
				<verse number="13">देवाने अब्राहामला वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी थोर नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले,</verse>
				<verse number="14">मी तुला निश्चित आशीर्वाद देईन व तुला निश्चित बहुगुणित करीन.</verse>
				<verse number="15">त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.</verse>
				<verse number="16">माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे.</verse>
				<verse number="17">म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देवाने शपथेद्वारे हमी दिली,</verse>
				<verse number="18">ह्यासाठी की, आपणापुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करून घेण्याकरिता आपण देवाचा आश्रय घेतला असल्यामुळे आपल्याला ह्या दोन गोष्टींमुळे उत्तेजन मिळावे:अभिवचन आणि शपथ ह्या दोन गोष्टी न बदलणाऱ्या असून त्यांच्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.</verse>
				<verse number="19">आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे.</verse>
				<verse number="20">तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगांचा प्रमुख याजक झालेला येशू आपल्या अगोदर आपल्याकरिता आत गेला आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">हा मलकीसदेक शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता; अब्राहाम जेव्हा राजांना पराभूत करून परत आला, तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला</verse>
				<verse number="2">व अब्राहामने ह्याला सर्व लुटीचा दशमांश दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता;</verse>
				<verse number="3">त्याचे मातापिता, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो शाश्वत याजक राहतो.</verse>
				<verse number="4">तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या.</verse>
				<verse number="5">लेवीच्या संतानांपैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांकडून, म्हणजे अब्राहामच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांकडून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे;</verse>
				<verse number="6">परंतु मलकीसदेक त्यांच्या वंशातला नव्हता. त्याने अब्राहामकडून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती, त्याला त्याने आशीर्वाद दिला.</verse>
				<verse number="7">श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो, हे निर्विवाद आहे.</verse>
				<verse number="8">याजकांच्या बाजूने पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु मलकीसदेकच्या बाजूने पाहिले तर, अमर आहे असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे त्याला मिळाले;</verse>
				<verse number="9">तसेच दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामच्याद्वारे दशमांश दिला, असे म्हणता येईल,</verse>
				<verse number="10">कारण त्याचा पूर्वज अब्राहाम ह्याला मलकीसदेक भेटला त्या वेळेस लेवी अब्राहाममध्ये बीजरूपाने होता.</verse>
				<verse number="11">लेवीय याजकपणाच्या आधारे इस्राएली लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले. जर ह्या याजकांची कृत्ये परिपूर्ण असती, तर अहरोनच्या संप्रदायाला सोडून मलकीसदेकच्या संप्रदायानुसार निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा ह्याची आवश्यकता उरली नसती.</verse>
				<verse number="12">कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते.</verse>
				<verse number="13">ज्याच्याविषयी हे सांगितले आहे, तो आपला प्रभू निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते.</verse>
				<verse number="14">कारण आपला प्रभू हा यहुदा वंशांतून उद्भवला हे सर्वपरिचित आहे आणि याजकांविषयी बोलताना मोशेने ह्या वंशाचा उल्लेख केला नाही.</verse>
				<verse number="15">मानवी नियम निर्बंधांनी नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते.</verse>
				<verse number="16"></verse>
				<verse number="17">त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगे याजक असशील.</verse>
				<verse number="18">पूर्वीचा नियम कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे रद्द झाला आहे,</verse>
				<verse number="19">कारण मोशेच्या नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही आणि ज्या आशेद्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे;</verse>
				<verse number="20">शिवाय येशूविषयी देवाची शपथ आहे.</verse>
				<verse number="21">इतर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण येशूविषयी ‘तू युगानुयुगे याजक असशील’, अशी शपथ प्रभूने वाहिली आणि ती तो बदलणार नाही, असे सांगितले. त्याच्या त्या शपथेने येशू हा याजक झाला.</verse>
				<verse number="22">ह्या फरकामुळे तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.</verse>
				<verse number="23">दुसरा फरक म्हणजे इतर पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे;</verse>
				<verse number="24">पण येशू युगानुयुगे राहणारा असल्यामुळे, ह्याचे याजकपण अढळ आहे.</verse>
				<verse number="25">ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.</verse>
				<verse number="26">असाच आपला प्रमुख याजक असणे योग्य होते; तो भक्तिमान, निर्दोष, शुद्ध व पापी जनांपासून वेगळा असताना आकाशांच्या पलीकडे त्याचा गौरव करण्यात आला.</verse>
				<verse number="27">त्याला इतर प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी रोज यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केले, तेव्हा ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.</verse>
				<verse number="28">नियमशास्र दुर्बल अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून दिलेले वचन युगानुयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राची नेमणूक करते.</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवशाली सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला मिळाला आहे.</verse>
				<verse number="2">तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने उभारलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे.</verse>
				<verse number="3">प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे.</verse>
				<verse number="4">तो पृथ्वीवर असता, तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत;</verse>
				<verse number="5">‘पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी बाळग’, ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता, तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे यहुदी लोकांचे याजकही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात.</verse>
				<verse number="6">परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, तो अधिक चांगल्या अभिवचनाने स्थापन झालेला असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ याजकीय सेवाकार्य येशूला मिळाले आहे.</verse>
				<verse number="7">तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा आवश्यक नसता.</verse>
				<verse number="8">परंतु लोकांना दोष लावून परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;</verse>
				<verse number="9">मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.</verse>
				<verse number="10">परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील;</verse>
				<verse number="11">तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे कोणीही आपल्या सहनागरिकाला सांगणार नाही आणि कुणालाही आपल्या बंधूला शिकवावे लागणार नाही; कारण त्यांतील लहानापासून थोरापर्यंत, सर्व मला ओळखतील;</verse>
				<verse number="12">मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच आठवणार नाही.</verse>
				<verse number="13">त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते लवकरच नाहीसे होईल.</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते.</verse>
				<verse number="2">पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दीपस्तंभ, टेबल व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्र स्थान म्हटले आहे;</verse>
				<verse number="3">दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता;</verse>
				<verse number="4">त्यात सोन्याचे धुपाटणे व चहूबाजूंनी सोन्याने मढविलेली कराराची पेटी होती; ह्या पेटीत मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, पालवी फुटलेली अहरोनची काठी व कराराच्या दोन पाट्या होत्या</verse>
				<verse number="5">तेजस्वी करूबिम दयासन आच्छादीत होते; परंतु याविषयी सविस्तर बोलण्याची ही वेळ नाही.</verse>
				<verse number="6">ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केली असता याजक धार्मिक विधी करण्यास पहिल्या मंडपात नियमितपणे जात असत;</verse>
				<verse number="7">परंतु दुसऱ्यांत प्रमुख याजक वर्षांतून एकदा एकटाच जात असे तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या नकळत केलेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असत, ते घेतल्याशिवाय जात नसे.</verse>
				<verse number="8">ह्यावरून पवित्र आत्मा दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे, तोपर्यंत परमपवित्र स्थानाचा मार्ग प्रकट झाला नाही.</verse>
				<verse number="9">तो मंडप वर्तमानकाळासाठी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करावयास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात.</verse>
				<verse number="10">खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांच्यासह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत. ते नवीन व्यवस्था प्रस्थापित होईपर्यंत लावून दिले आहेत.</verse>
				<verse number="11">ख्रिस्त हा उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक म्हणून आला व जो मंडप हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व परिपूर्ण मंडपातून</verse>
				<verse number="12">आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने शाश्वत मुक्ती सिद्ध केली.</verse>
				<verse number="13">बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतकी पवित्र करतात,</verse>
				<verse number="14">तर सार्वकालिक आत्म्याच्यायोगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या उपासनेसाठी निरुपयोगी विधींपासून किती अधिक प्रमाणात शुद्ध करील?</verse>
				<verse number="15">ह्याच कारणाकरिता ख्रिस्त नव्या कराराचा मध्यस्थ आहे त्यामुळे पाचारण झालेल्यांना शाश्वत वारशाचे अभिवचन मिळावे. हे शक्य आहे कारण पहिल्या कराराखाली झालेल्या उ्रंघनापासून खंडणी भरून मुक्ती मिळावी म्हणून एक मृत्यू झालेला आहे.</verse>
				<verse number="16">मृत्युपत्र असले की, मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे.</verse>
				<verse number="17">मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्रकर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात येणार नाही.</verse>
				<verse number="18">म्हणून पहिल्या कराराचीही स्थापना रक्तावाचून झाली नाही.</verse>
				<verse number="19">नियमशास्त्रानुसार सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर, एजोब वनस्पतीची डहाळी व त्यांबरोबर वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन नियमशास्त्राच्या ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले:</verse>
				<verse number="20">“तुम्ही पाळावा म्हणून परमेश्वराने जो करार केला, त्यासंबंधीचे हे रक्त आहे’,</verse>
				<verse number="21">तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले.</verse>
				<verse number="22">नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा मिळत नाही.</verse>
				<verse number="23">स्वर्गातील गोष्टींच्या प्रतिकृती अशा प्रकारे शुद्ध होणे आवश्यक होते; परंतु प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून अधिक चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्यक होते.</verse>
				<verse number="24">खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान; ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला</verse>
				<verse number="25">आणि जसे प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन पवित्र स्थानात जातात, तसे ख्रिस्ताला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;</verse>
				<verse number="26">तसे असते, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो युगांच्या समाप्तीस एकदाच आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.</verse>
				<verse number="27">ज्याअर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,</verse>
				<verse number="28">त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून नियमशास्र प्रतिवर्षी अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी देवाजवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.</verse>
				<verse number="2">ते समर्थ असते, तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापांची जाणीव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय?</verse>
				<verse number="3">परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांचे स्मरण होत आहे;</verse>
				<verse number="4">कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.</verse>
				<verse number="5">परिणामत: जगात येताना ख्रिस्त देवाला म्हणाला, यज्ञ व अर्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले;</verse>
				<verse number="6">वेदीवर संपूर्ण प्राणी जाळल्याने व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष होत नव्हता.</verse>
				<verse number="7">ह्यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.</verse>
				<verse number="8">वर उल्लेखिल्याप्रमाणे तो प्रथम म्हणाला, ‘यज्ञ, अर्पणे, होमार्पणे व पापांबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष होत नव्हता’; (नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण करण्यात येतात ती ही);</verse>
				<verse number="9">आणि मग तो म्हणाला, ‘पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे’. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो.</verse>
				<verse number="10">त्या देवाच्या इच्छेनुसार आपण येशू ख्रिस्ताने एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.</verse>
				<verse number="11">पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो;</verse>
				<verse number="12">परंतु पापांबद्दल शाश्‍वत असा एकच यज्ञ अर्पण करून येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे</verse>
				<verse number="13">आणि तेव्हापासून त्याचे वैरी त्याचे पादासन होईपर्यंत तो वाट पाहत आहे.</verse>
				<verse number="14">म्हणजेच पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाकरिता परिपूर्ण केले आहे.</verse>
				<verse number="15">पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो:</verse>
				<verse number="16">परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा: मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन, ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.</verse>
				<verse number="17">त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे मुळीच लक्षात ठेवणार नाही.</verse>
				<verse number="18">तर मग ज्याअर्थी त्यांना क्षमा झाली त्याअर्थी त्यांच्या पापांबद्दल अर्पण नाही.</verse>
				<verse number="19">म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्‍वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे.</verse>
				<verse number="20"></verse>
				<verse number="21">आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे;</verse>
				<verse number="22">म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ.</verse>
				<verse number="23">आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा जाहीर करून दृढ बाळगू या; कारण ज्याने वचन दिले, तो विश्वासू आहे.</verse>
				<verse number="24">आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या.</verse>
				<verse number="25">आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा;</verse>
				<verse number="26">कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले, तर ह्यापुढे पापांबद्दल यज्ञ होणार नाही;</verse>
				<verse number="27">न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल.</verse>
				<verse number="28">मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला, तर त्याला क्षमा न होता दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.</verse>
				<verse number="29">तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, ज्यामुळे तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठोर दंडास पात्र ठरेल?</verse>
				<verse number="30">‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, आणखी, ‘परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील’, असे कोणी म्हटले हे आपल्याला माहीत आहे.</verse>
				<verse number="31">जिवंत परमेश्वराच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.</verse>
				<verse number="32">पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला.</verse>
				<verse number="33">कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली.</verse>
				<verse number="34">बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.</verse>
				<verse number="35">म्हणून आपला आत्मविश्‍वास सोडू नका, त्याचे फळ मोठे आहे.</verse>
				<verse number="36">तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनांनुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हांला सहनशक्तीची आवश्यकता आहे.</verse>
				<verse number="37">कारण धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;</verse>
				<verse number="38">माझे नीतिमान लोक विश्वासाने जगतील; जर कोणी माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.</verse>
				<verse number="39">ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; उलट, आत्म्याच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.</verse>
				<verse number="2">विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले.</verse>
				<verse number="3">विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की, जे दिसते ते अदृश्य वस्तूपासून झाले.</verse>
				<verse number="4">विश्वासाने हाबेलने काइनपेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला, त्यावरून तो नीतिमान आहे, अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने त्याची दाने स्वीकारून दिली आणि तो निधन पावला असला, तरी त्याच्या विश्वासाद्वारे तो अजूनपर्यंत बोलत आहे.</verse>
				<verse number="5">हनोखला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला प्रसन्न करीत असे;</verse>
				<verse number="6">विश्वासावाचून परमेश्वराला प्रसन्न करणे अशक्य आहे; देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास बाळगला पाहिजे की, देव आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो पारितोषिक देणारा आहे.</verse>
				<verse number="7">जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली व तिच्याप्रमाणे त्याने आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वतनदार झाला.</verse>
				<verse number="8">अब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला; आणि आपण कोठे जातो, हे ठाऊक नसताही तो निघाला.</verse>
				<verse number="9">परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती;</verse>
				<verse number="10">कारण दृढ पाया असलेल्या, देवाने योजिलेल्या व बांधलेल्या नगराची अब्राहाम वाट पाहत होता.</verse>
				<verse number="11">वयोमर्यादेपलीकडे असताही त्याला बाप होण्याची क्षमता मिळाली व सारालादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण त्याने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले.</verse>
				<verse number="12">अब्राहाम जणू काही निर्जीव झालेला असतानाही ह्या एकापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली.</verse>
				<verse number="13">हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले.</verse>
				<verse number="14">असे म्हणणारे स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात.</verse>
				<verse number="15">ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, तर त्यांना परत जाण्याची संधी होती;</verse>
				<verse number="16">पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगत होते; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.</verse>
				<verse number="17">अब्राहामने आपली कसोटी पाहिली जात असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले; अब्राहामला वचन देण्यात आले होते तरीही तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला तयार होता;</verse>
				<verse number="18">परमेश्वराने त्याला असे सांगितले होते, ‘इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील’;</verse>
				<verse number="19">तेव्हा मेलेल्यांतून उठवावयासदेखील देव समर्थ आहे, हे अब्राहामने मानले आणि लाक्षणिक अर्थाने त्या स्थितीतून तो त्याला परत मिळाला.</verse>
				<verse number="20">इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला.</verse>
				<verse number="21">याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली.</verse>
				<verse number="22">योसेफने मरतेवेळेस इस्राएलच्या संतानाच्या निर्गमनाचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी निर्देश दिले.</verse>
				<verse number="23">मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले; कारण ते मूल गोंडस आहे, असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.</verse>
				<verse number="24">मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले;</verse>
				<verse number="25">पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले;</verse>
				<verse number="26">ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती.</verse>
				<verse number="27">त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.</verse>
				<verse number="28">त्याने वल्हांडण सण व रक्त लावणे हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना स्पर्श करू नये.</verse>
				<verse number="29">तांबड्या समुद्रातून ते विश्वासाने जणू कोरड्या भूमीवरून जावे त्याप्रमाणे पार गेले; मिसरमधील लोक तसेच प्रयत्न करीत असता बुडून गेले.</verse>
				<verse number="30">इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले.</verse>
				<verse number="31">राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्‍वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही.</verse>
				<verse number="32">आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो, तर वेळ पुरणार नाही.</verse>
				<verse number="33">त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली,</verse>
				<verse number="34">अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली.</verse>
				<verse number="35">स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या.</verse>
				<verse number="36">काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला;</verse>
				<verse number="37">त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते;</verse>
				<verse number="38">त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत.</verse>
				<verse number="39">ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही;</verse>
				<verse number="40">कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे.</verse>
				<verse number="2">आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.</verse>
				<verse number="3">तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.</verse>
				<verse number="4">तुम्ही पापाशी झगडत असता तुमचे रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही;</verse>
				<verse number="5">तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिस्तीचा अनादर करू नकोस किंवा त्याच्याकडून तुला शिक्षा होत असता खचू नकोस</verse>
				<verse number="6">कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो पुत्र म्हणून स्वीकारतो त्या प्रत्येकाला शिक्षा करतो.</verse>
				<verse number="7">शिस्तीसाठी तुम्ही अडचणी सहन करीत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे?</verse>
				<verse number="8">जी शिक्षा सर्वांना मिळालेली आहे ती शिक्षा स्वीकारावयास तुम्ही जर तयार नसाल, तर तुम्ही खरे पुत्र नव्हे, तर अनौरस संतती आहात.</verse>
				<verse number="9">शिवाय शिक्षा करणाऱ्या आपल्या मानवी पित्याचा आपण आदर राखतो, तर मग आपण जो आत्म्याचा पिता आहे, त्याच्या अधिक प्रमाणात अधीन होऊन जिवंत राहू नये काय?</verse>
				<verse number="10">आपला मानवी पिता त्याला योग्य वाटेल तशी थोडे दिवस शिक्षा करत होता; पण देव जी शिक्षा करतो, ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो.</verse>
				<verse number="11">कोणतीही शिक्षा त्यावेळी खेदाची वाटते, आनंदाची वाटत नाही; परंतु ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.</verse>
				<verse number="12">तर मग लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा</verse>
				<verse number="13">आणि सरळ मार्गावर चालत राहा, ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.</verse>
				<verse number="14">सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा;</verse>
				<verse number="15">देवाच्या कृपेकडे पाठ फिरवू नका. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कटुतेचे मूळ अंकुरित झाल्यावर उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावसारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या.</verse>
				<verse number="16"></verse>
				<verse number="17">तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असताही त्याला नकार मिळाला. त्याने जरी अश्रू ढाळून पश्चात्ताप करायची संधी शोधली, तरी ती त्याला मिळाली नाही.</verse>
				<verse number="18">प्रज्वलित पर्वत, अंधकार, घोर नैराश्य, वादळ,</verse>
				<verse number="19">कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्या इंद्रियगोचर गोष्टींकडे इस्राएली लोक आले होते, ह्याकडे तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, देवाचे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये;</verse>
				<verse number="20">कारण पशूदेखील त्या पर्वताला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे, ही आज्ञा त्यांना असह्य झाली;</verse>
				<verse number="21">ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ‘मी फारच भयभीत व कंपित झालो आहे!’</verse>
				<verse number="22">पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, अगणित देवदूतांबरोबर उत्सव करणारा,</verse>
				<verse number="23">स्वर्गातील प्रथम जन्मलेल्यांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,</verse>
				<verse number="24">नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि ज्या रक्ताचे अभिवचन हाबेलच्या रक्ताच्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहे, ते शिंपडलेले रक्त ह्यांच्याजवळ आला आहात.</verse>
				<verse number="25">जो बोलत आहे, त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर संदेश सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत आणि स्वर्गातून बोलणाऱ्याकडे आपण पाठ फिरवली, तर आपला निभाव कसा लागेल?</verse>
				<verse number="26">त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हालविली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे म्हणते की, ‘आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपित करीन.’</verse>
				<verse number="27">आणखी एकदा ह्याचा अर्थ असा होतो की, निर्मित वस्तू विचलित होतील व काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की, अचल वस्तू टिकून राहाव्यात.</verse>
				<verse number="28">म्हणून अविचल राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण कृतज्ञ राहू या, म्हणजे देव प्रसन्न होइल अशी त्याची आराधना आदरयुक्त भयाने करता येईल.</verse>
				<verse number="29">आपला देव खरोखर भस्म करणारा अग्नी आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">ख्रिस्ती बंधुभगिनी म्हणून प्रीतीत टिकून राहा.</verse>
				<verse number="2">आदरातिथ्याचा विसर पडू देऊ नका; त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे.</verse>
				<verse number="3">तुरुंगात पडलेल्यांबरोबर तुम्ही तुरुंगात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहात म्हणून पीडितांची आठवण ठेवा.</verse>
				<verse number="4">लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.</verse>
				<verse number="5">तुम्ही द्रव्यलोभापासून अलिप्त राहा; जे तुमच्याजवळ आहे तेवढ्यावर तृप्त रहा; कारण परमेश्वराने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही’.</verse>
				<verse number="6">म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या, प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?</verse>
				<verse number="7">पूर्वी जे तुमचे आधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.</verse>
				<verse number="8">येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुगे सारखाच आहे.</verse>
				<verse number="9">विविध आणि विचित्र प्रकारच्या शिकवणुकींनी बहकून जाऊ नका; अन्नविषयक नियमांनी नव्हे कारण हे नियम जे पाळतात त्यांना त्यांचा काही लाभ होत नाही. कृपेच्या सामर्थ्याने अंतःकरण मजबूत करणे हितावह आहे.</verse>
				<verse number="10">मंडपात आराधना करणाऱ्या यहुदी याजकांना वेदीवर अर्पण केलेले अन्न खाण्याचा अधिकार नाही.</verse>
				<verse number="11">यहुदी प्रमुख याजक आपल्या पापांबद्दल क्षमा मिळावी म्हणून पशूंचे रक्त पवित्र स्थानात घेऊन जातात परंतु त्या पशूंची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात.</verse>
				<verse number="12">म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून नगराच्या प्रवेशद्वाराबाहेर मरण सोसले,</verse>
				<verse number="13">तर आता आपण त्याबद्दल विटंबना सोशीत छावणीबाहेर त्याच्याजवळ जाऊ या.</verse>
				<verse number="14">कारण आपल्याकरिता येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.</verse>
				<verse number="15">ज्या ओठांनी आपण त्याचा देव म्हणून स्वीकार करतो, त्या ओठांचे फळ म्हणून आपण स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करू या.</verse>
				<verse number="16">चांगले करण्यास व एकमेकांना साहाय्य करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.</verse>
				<verse number="17">तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे, हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, दुःखी मनाने नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.</verse>
				<verse number="18">आमच्यासाठी प्रार्थना करा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ आहे, अशी आमची खातरी आहे.</verse>
				<verse number="19">मी शक्य तेवढ्या लवकर तुमच्याकडे यावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा, अशी मी तुम्हांला आवर्जून विनंती करीत आहे.</verse>
				<verse number="20">आता ज्या शांतिदात्या देवाने शाश्वत कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यांतून उठविले,</verse>
				<verse number="21">तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.</verse>
				<verse number="22">बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.</verse>
				<verse number="23">आपला बंधू तीमथ्य ह्याची तुरुंगातून सुटका झाली आहे, हे मी तुम्हांला कळवू इच्छितो. तो लवकर आला, तर मी तुमच्या भेटीस येईन तेव्हा त्याला बरोबर आणीन.</verse>
				<verse number="24">तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र लोकांना आमच्या शुभेच्छा सांगा. इटलीतील बंधूंजन तुम्हांला शुभेच्छा देतात.</verse>
				<verse number="25">तुम्हां सर्वांवर देवाची कृपा राहो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="59">
			<chapter number="1">
				<verse number="1">बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा.</verse>
				<verse number="2">माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना;</verse>
				<verse number="3">कारण तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो.</verse>
				<verse number="4">धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न पडता तुम्ही प्रगल्भ व पूर्ण व्हावे.</verse>
				<verse number="5">परंतु जर तुमच्यापैकी कोणी सुज्ञतेत उणा असेल, तर त्याने ती देवाजवळ मागावी म्हणजे ती त्याला मिळेल कारण तो सर्वांना आनंदाने व उदारपणाने देतो.</verse>
				<verse number="6">मात्र मागणाऱ्याने काही शंका न धरता विश्वासाने मागावे कारण शंका धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंचबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.</verse>
				<verse number="7">असा माणूस द्विधा मनःस्थितीचा असून आपल्या सर्व मार्गांत चंचल असतो. आपणाला प्रभूकडून काही मिळेल, असे त्याने समजू नये.</verse>
				<verse number="8"></verse>
				<verse number="9">प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा</verse>
				<verse number="10">आणि प्रभूने आपल्याला दीन अवस्थेकडे आणले ह्याचा आनंद धनवानाने मानावा कारण धनवान गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल.</verse>
				<verse number="11">सूर्य प्रखर तेजाने उगवला व त्याने गवत कोमेजविले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगात मस्त असताना कोमेजून जाईल.</verse>
				<verse number="12">जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल.</verse>
				<verse number="13">कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात पाडले’, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाइटाचा मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही.</verse>
				<verse number="14">परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो.</verse>
				<verse number="15">मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते.</verse>
				<verse number="16">माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका.</verse>
				<verse number="17">दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते.</verse>
				<verse number="18">आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला.</verse>
				<verse number="19">माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा.</verse>
				<verse number="20">कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही.</verse>
				<verse number="21">म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे तुमच्या अंतःकरणात असलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.</verse>
				<verse number="22">वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.</verse>
				<verse number="23">जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात स्वतःलापाहणाऱ्या माणसासारखा आहे.</verse>
				<verse number="24">तो स्वतःला आरशात पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो, हे लगेच विसरून जातो.</verse>
				<verse number="25">परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून त्यांचे पालन करण्यात टिकून राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात देवाचा आशीर्वाद मिळतो.</verse>
				<verse number="26">आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.</verse>
				<verse number="27">देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत कैवार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, हे आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही केवळ बाह्य रूप पाहून वागू नका.</verse>
				<verse number="2">सोन्याची अंगठी घालून व भपकेबाज कपडे परिधान करून एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि अस्वच्छ कपडे घातलेला एक गरीब माणूस आला असता</verse>
				<verse number="3">तुम्ही भपकेबाज कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पायांशी बस.”</verse>
				<verse number="4">तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही?</verse>
				<verse number="5">माझ्या प्रिय बंधूनो, ऐका, ऐहिक दृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले, त्याचे वारस होण्यासाठी त्याने निवडले आहे की नाही?</verse>
				<verse number="6">पण तुम्ही गरिबांचा अपमान करता. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही?</verse>
				<verse number="7">जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही?</verse>
				<verse number="8">म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता.</verse>
				<verse number="9">परंतु जर तुम्ही बाह्यरूप पाहून वागत असाल तर पाप करता आणि उ्रंघन करणारे म्हणून नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.</verse>
				<verse number="10">जो कोणी एका नियमाविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी दोषी होतो;</verse>
				<verse number="11">कारण ‘व्यभिचार करू नको’ असे ज्याने सांगितले त्यानेच, ‘खून करू नको’, हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उ्रंघणारा झाला आहेस.</verse>
				<verse number="12">स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा;</verse>
				<verse number="13">कारण ज्याने दया केली नाही, त्याचा न्याय परमेश्वर दयेवाचून करील; परंतु दया न्यायावर विजय मिळवते.</verse>
				<verse number="14">माझ्या बंधूंनो, मी विश्वास ठेवतो, असे कोणी म्हणत असून तो कृती करीत नाही, तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याचे तारण करायला समर्थ आहे काय?</verse>
				<verse number="15">भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे</verse>
				<verse number="16">आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, ‘सुखी राहा, कपड्यालत्याकडे व खाण्यापिण्याकडे लक्ष द्या’, पण जीवनावश्यक गोष्टी त्यांना तुम्ही देत नाही, तर त्याचा काय फायदा?</verse>
				<verse number="17">म्हणजेच विश्वासाला अनुसरून जर कृती केली नाही, तर तो जात्या निर्जीव आहे.</verse>
				<verse number="18">कोणी म्हणेल, एका माणसाकडे विश्वास आहे आणि दुसरा मनुष्य कृती करतो. माझे उत्तर असे आहे, कोणताही मनुष्य कृतीविना विश्वास कसा ठेवू शकतो, हे मला दाखवा. मी माझा विश्वास माझ्या कृतीद्वारे तुम्हांला दाखवीन.</verse>
				<verse number="19">देव एकच आहे, असा विश्वास तू धरतोस ना? छान! भुतेही विश्वास धरतात व थरथर कापतात.</verse>
				<verse number="20">अरे बुद्धिहीन मनुष्या, कृतीवाचून विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावून द्यावयास हवे काय?</verse>
				<verse number="21">आपला बाप अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्यात तो कृतींनी नीतिमान ठरला नव्हता काय?</verse>
				<verse number="22">त्याचा विश्वास त्याच्या कृतींत कार्य करत होता, आणि कृतींनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसत नाही काय?</verse>
				<verse number="23">‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण झाला.</verse>
				<verse number="24">तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर कृतींनी माणूस नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता.</verse>
				<verse number="25">तसेच, राहाब वेश्या हिनेदेखील इस्राएली जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने निघून जाण्यास मदत केली, ह्यात ती कृतीने नीतिमान ठरली नाही काय?</verse>
				<verse number="26">तर मग जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही कृतींवाचून निर्जीव आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे.</verse>
				<verse number="2">आपण सगळेच अनेकदा चुका करतो. मात्र कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.</verse>
				<verse number="3">घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याला आपण हवे तसे फिरवतो.</verse>
				<verse number="4">किंवा तारू पाहा, ते एवढे मोठे असते व प्रचंड वाऱ्याने लोटले जात असते, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे तो अगदी लहानशा सुकाणूने ते फिरवतो.</verse>
				<verse number="5">जिभेचे तसेच आहे:जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते!</verse>
				<verse number="6">जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते.</verse>
				<verse number="7">श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या सर्वांना मनुष्य वश करू शकतो व शकला आहे</verse>
				<verse number="8">परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे.</verse>
				<verse number="9">आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो.</verse>
				<verse number="10">एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत!</verse>
				<verse number="11">झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?</verse>
				<verse number="12">माझ्या बंधूंनो, अंजिराला ऑलिव्ह फळे किंवा द्राक्षवेलीला अंजीर येऊ शकत नाहीत; तसेच खाऱ्या पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी निघणे शक्य नाही.</verse>
				<verse number="13">तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत.</verse>
				<verse number="14">पण तुमच्या मनात कटु मत्सर व स्वार्थी महत्त्वकांक्षा आहे तर सुज्ञतेचा ताठा मिरवून सत्याविरुद्ध पाप करू नका.</verse>
				<verse number="15">ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे.</verse>
				<verse number="16">जेथे मत्सर व स्वार्थी वृत्ती आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक प्रकारचे कुकर्म आहे.</verse>
				<verse number="17">परंतु वरून येणारी सुज्ञता ही मुळात शुद्ध असते. शिवाय ती शांतिप्रिय, सौम्य व स्नेहवर्धक असते; ती करुणायुक्त असून तिला सत्कृत्यांचे पीक येते; ती पक्षपात व ढोंगबाजी यांपासून अलिप्त असते</verse>
				<verse number="18">आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">तुमच्यामध्ये भांडणतंटे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही?</verse>
				<verse number="2">तुम्ही इच्छा धरता, तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही घात करायला तयार होता. हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही म्हणून तुम्ही भांडणतंटे करता. तुम्ही देवाकडे मागत नाही, म्हणून तुम्हांला मिळत नाही</verse>
				<verse number="3">आणि जेव्हा तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही, तेव्हा तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता मागता.</verse>
				<verse number="4">अहो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो.</verse>
				<verse number="5">‘जो आत्मा आपल्यामध्ये वसती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते’, हा धर्मशास्त्रलेख व्यर्थ आहे, असे तुम्हांला वाटते काय?</verse>
				<verse number="6">देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते. म्हणून धर्मशास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो’.</verse>
				<verse number="7">म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.</verse>
				<verse number="8">देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात स्वच्छ करा, अहो, ढोंगी लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.</verse>
				<verse number="9">दुःख धरा, रडा व शोक करा; तुमच्या हसण्याचे रडण्यात व तुमच्या आनंदाचे खिन्नतेत परिवर्तन होवो!</verse>
				<verse number="10">प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.</verse>
				<verse number="11">बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूंविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस, तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस.</verse>
				<verse number="12">नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरविणारा तू कोण?</verse>
				<verse number="13">अहो! तुम्ही जे म्हणता, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू’,</verse>
				<verse number="14">त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते.</verse>
				<verse number="15">उलट तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूची इच्छा असेल, तर आपण जगू व अमुक-अमुक करू’.</verse>
				<verse number="16">परंतु आता तुम्ही उर्मटपणाने फुशारकी मारता आणि अशी फुशारकी दुष्ट आहे.</verse>
				<verse number="17">चांगले करणे कळत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">अहो धनवानांनो, माझे ऐका! जे क्लेश तुम्हांला होणार आहेत, त्याविषयी रडून आकांत करा.</verse>
				<verse number="2">तुमचे धन भ्रष्ट आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे.</verse>
				<verse number="3">तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यावर गंज चढला आहे. त्यांचा तो गंज तुमच्याविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. ह्या शेवटच्या दिवसांत तुम्ही धन साठविले आहे.</verse>
				<verse number="4">पाहा, ज्या कामगारांनी तुमच्या शेतांची कापणी केली त्यांची तुम्ही न दिलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सर्वसमर्थ प्रभूच्या कानी गेला आहे.</verse>
				<verse number="5">तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, कत्तलीच्या दिवसासाठी तुम्ही स्वतःला धष्टपुष्ट केले आहे.</verse>
				<verse number="6">निर्दोष लोकांना तुम्ही दोषी ठरविले, त्यांचा घात केला. ते तुम्हांला विरोध करत नाहीत.</verse>
				<verse number="7">अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता, त्याला पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.</verse>
				<verse number="8">तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे.</verse>
				<verse number="9">बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे.</verse>
				<verse number="10">बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले, त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा आदर्श ठेवा.</verse>
				<verse number="11">पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही ईयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता, तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्हांला दिसून आले.</verse>
				<verse number="12">माझ्या बंधूंनो, सर्वात मुख्य म्हणजे शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला होय म्हणावयाचे तर होय म्हणा, नाही म्हणावयाचे तर नाही म्हणा.</verse>
				<verse number="13">तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.</verse>
				<verse number="14">तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने चर्चंच्या वडील जनांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला ऑलिव्ह तेल लावावे व त्याच्यावर ओणवे होऊन प्रार्थना करावी.</verse>
				<verse number="15">श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल.</verse>
				<verse number="16">तर मग तुम्ही आरोग्यसंपन्न व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.</verse>
				<verse number="17">एलीया आपल्यासारखा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी जिवेभावे प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही.</verse>
				<verse number="18">पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले.</verse>
				<verse number="19">माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी परत फिरविले,</verse>
				<verse number="20">तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गावरून जो परत फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व अनेक पापांबद्दल क्षमा मिळवील, हे लक्षात ठेवा.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="60">
			<chapter number="1">
				<verse number="1">येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्या प्रांतांत हद्दपार केलेल्या, देवाच्या निवडलेल्या लोकांना:</verse>
				<verse number="2">देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.</verse>
				<verse number="3">आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते.</verse>
				<verse number="4">म्हणूनच आपण स्वर्गातील अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्याची प्रतीक्षा करतो.</verse>
				<verse number="5">तुम्हांला तारणासाठी श्रद्धेद्वारे देवाच्या सामर्थ्याने सुरक्षित राखण्यात आले आहे. हे तारण शेवटच्या काळी प्रकट होणार आहे.</verse>
				<verse number="6">जरी तुम्हांला आत्ता काही काळ निरनिराळ्या कठीण प्रसंगांमुळे दुःख सहन करणे भाग पडत असले, तरी ह्याविषयी तुम्ही उ्रास करा.</verse>
				<verse number="7">ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची पारख अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे त्याचे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांत पर्यवसान व्हावे.</verse>
				<verse number="8">त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण, ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उ्रास करता.</verse>
				<verse number="9"></verse>
				<verse number="10">ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.</verse>
				<verse number="11">त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी यांविषयी भाकीत केले तेव्हा त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्याविषयी ते शोध करीत होते.</verse>
				<verse number="12">त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हांला शुभवर्तमान सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी पाहण्याची उत्कंठा देवदूतांनादेखील आहे.</verse>
				<verse number="13">म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.</verse>
				<verse number="14">तुम्ही आज्ञाधारक मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका.</verse>
				<verse number="15">उलट, तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचारणात पवित्र व्हा.</verse>
				<verse number="16">असा धर्मशास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’</verse>
				<verse number="17">जो तोंडदेखला न्याय करीत नाही, तर ज्याच्यात्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात त्याचा आदर राखा.</verse>
				<verse number="18">कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,</verse>
				<verse number="19">तर निष्कलंक व निर्दोष कोकरू जो ख्रिस्त ह्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात.</verse>
				<verse number="20">ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.</verse>
				<verse number="21">तुम्ही त्याच्याद्वारे विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.</verse>
				<verse number="22">प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.</verse>
				<verse number="23">कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सजीव व टिकणाऱ्या शब्दाद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात.</verse>
				<verse number="24">पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते.</verse>
				<verse number="25">परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते. शुभवर्तमानाचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले, ते हेच होय.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">तर मग सर्व दुष्टपणा, सर्व खोटारडेपणा, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून,</verse>
				<verse number="2">प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नव्याने जन्मलेल्या बालकासारखे निरश्या दुधाची इच्छा धरा.</verse>
				<verse number="3"></verse>
				<verse number="4">माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो सजीव दगड त्याच्याजवळ येत असता,</verse>
				<verse number="5">तुम्हीही स्वतः सजीव दगडासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहात, ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.</verse>
				<verse number="6">असा धर्मशास्त्रलेख आहे: पाहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनमध्ये बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची फजिती होणार नाही.</verse>
				<verse number="7">म्हणून तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला.</verse>
				<verse number="8">तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती.</verse>
				<verse number="9">पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत.</verse>
				<verse number="10">तुम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पूर्वी तुमच्यावर दया झाली नव्हती, आता तर दया झाली आहे.</verse>
				<verse number="11">प्रियजनहो, जे तुम्ही ह्या जगात परके व निराश्रित आहात, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा.</verse>
				<verse number="12">यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.</verse>
				<verse number="13">प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन राहा.</verse>
				<verse number="14">अधिकारी, हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा.</verse>
				<verse number="15">देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाचे अज्ञान दूर करावे.</verse>
				<verse number="16">दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा.</verse>
				<verse number="17">सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.</verse>
				<verse number="18">घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण आदरभावाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे कोणी चांगले व समंजस आहेत केवळ त्यांच्याच नव्हे, तर जे कठोर आहेत त्यांच्याही अधीन असा.</verse>
				<verse number="19">जर कोणी अन्याय सोसताना परमेश्वराचे स्मरण ठेवून दुःख सहन करत असेल, तर देव त्याला आशीर्वाद देईल.</verse>
				<verse number="20">चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे, हे देवाच्या दृष्टीने आशीर्वादपात्र आहे.</verse>
				<verse number="21">ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे.</verse>
				<verse number="22">त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात असत्य आढळले नाही.</verse>
				<verse number="23">त्याचा अपमान होत असता, त्याने उलट अपमान केला नाही, दुःख भोगत असता, त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यावर भिस्त ठेवली.</verse>
				<verse number="24">त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही क्रुसावर वाहिली, ह्यासाठी की, आपण पाप करणे सोडून देऊन सदाचरणासाठी जगावे. त्याच्या जखमांनी तुम्ही निरोगी झाला आहात.</verse>
				<verse number="25">तुम्ही बहकलेल्या मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या आत्म्याचा मेंढपाळ व संरक्षक ह्यांच्याकडे तुम्हांला परत आणण्यात आले आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">स्त्रियांनो, तुम्हीही पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की, त्यांच्यापैकी कोणी देवाचे वचन स्वीकारीत नसतील, तर तुमचे आदरयुक्त शुद्ध वर्तन पाहून ते आपल्या पत्नीच्या वर्तनाने श्रद्धावान होतील; तुम्हांला एक शब्दही उच्चारावा लागणार नाही.</verse>
				<verse number="2"></verse>
				<verse number="3">तुमचे सौंदर्य केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाख करणे असे बाहेरून दिसणारे नसावे,</verse>
				<verse number="4">उलट तुमचे सौंदर्य आंतरिक स्वरूपाचे म्हणजे कालातीत सौम्य व शांत वृत्ती निर्माण करणारे असावे. हे देवाच्या दृष्टीने अतिमूल्यवान असते.</verse>
				<verse number="5">कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही पतीच्या अधीन राहून आपले अंतरिक सौंदर्य जोपासत असत.</verse>
				<verse number="6">ज्याप्रमाणे सारा अब्राहामची पत्नी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, त्याप्रमाणे तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही गोष्टीचे भय न बाळगल्यास, तुम्ही तिची मुले आहात.</verse>
				<verse number="7">पतींनो, तुम्हीही पत्नींबरोबर त्या अधिक नाजुक आहेत म्हणून सुज्ञतेने वागा, कारण तुमच्याबरोबर त्यादेखील देवाने दिलेली जीवनाची देणगी स्वीकारतील, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.</verse>
				<verse number="8">शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम जपणारे, कनवाळू व नम्र वृत्तीचे व्हा.</verse>
				<verse number="9">वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.</verse>
				<verse number="10">कारण, जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावेत, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व खोटारडेपणापासून आपले ओठ आवरावे.</verse>
				<verse number="11">त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.</verse>
				<verse number="12">कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. मात्र वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते.</verse>
				<verse number="13">तुम्ही चांगले करण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्हांला कोण इजा करणार?</verse>
				<verse number="14">परंतु नीतिमत्वामुळे तुम्हांला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. कुणाला भिऊ नका व चिंता करू नका.</verse>
				<verse number="15">ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना आणि तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व सौजन्यपूर्वक द्या.</verse>
				<verse number="16">तुमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ असू द्या म्हणजे तुमच्याविरुद्ध बोलणे चाललेले असता ख्रिस्तावरील तुमच्या एकनिष्ठेमुळे तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना लज्जित व्हावे लागेल.</verse>
				<verse number="17">चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.</verse>
				<verse number="18">आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.</verse>
				<verse number="19">त्या आत्मिक अवस्थेत जाऊन त्याने बंदिवान आत्म्यांना घोषणा केली.</verse>
				<verse number="20">हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता, त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले होते.</verse>
				<verse number="21">त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मल धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराला दिलेले वचन असा आहे.</verse>
				<verse number="22">येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश यांच्यावर तो सत्ता चालवितो.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">ख्रिस्ताने दैहिक दुःख सोसले. तुम्हीही तीच मनोवृत्ती धारण करा, कारण जो दैहिक दुःख सहन करतो, तो पापाकडे पाठ फिरवतो!</verse>
				<verse number="2">म्हणून तुम्ही आपले ऐहिक आयुष्य मानवी वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.</verse>
				<verse number="3">कारण यहुदीतर लोकांना आवडणारी कृत्ये करण्यात, म्हणजे स्वैराचार, कामासक्ती, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व बेकायदेशीर मूर्तिपूजा ह्यांत जो काळ गेला तितका पुरे.</verse>
				<verse number="4">तुम्ही त्यांच्या बेतालपणात सामील होत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमच्याविरुद्ध दुर्भाषण करतात.</verse>
				<verse number="5">परंतु जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे, त्या न्यायाधीशाला त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे.</verse>
				<verse number="6">म्हणूनच शुभवर्तमान मृतांनाही सांगण्यात आले होते, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवासमोर जगावे.</verse>
				<verse number="7">सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.</verse>
				<verse number="8">मुख्यतः एकमेकांवर आस्थेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते.</verse>
				<verse number="9">कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.</verse>
				<verse number="10">प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रणाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.</verse>
				<verse number="11">शुभवर्तमान सांगणाऱ्याने देवाचा संदेश सांगावा. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत या भावनेने करावी, ह्यासाठी की, सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव व्हावा. गौरव व पराक्रम ही युगानुयुगे त्याची आहेत. आमेन.</verse>
				<verse number="12">प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांला द्यावी लागली आहे तिच्यामुळे आपल्याला काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.</verse>
				<verse number="13">उलट, ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्याअर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे वैभव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्‍लास व आनंद कराल.</verse>
				<verse number="14">ख्रिस्ताच्या नावाकरिता तुमचा अपमान होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवशाली आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन विसावला आहे.</verse>
				<verse number="15">मात्र खून करणारा, चोर, गुन्हेगार किंवा खोडसाळ म्हणूनदेखील कोणी दुःख भोगू नये.</verse>
				<verse number="16">ख्रिस्ती म्हणून कोणाला दुःख सहन करावे लागत असेल, तर त्याला त्याची लाज वाटू नये, तर त्याने आपण हे नाव धारण करतो म्हणून देवाचा गौरव करावा.</verse>
				<verse number="17">देवाच्या प्रजेपासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे, तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या शुभवर्तमानाचा अवमान करणाऱ्याबरोबर त्याचा शेवट कसा होईल?</verse>
				<verse number="18">पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, नीतिमान माणसाचे तारण होणे जर अवघड असते, तर भक्तिहीन व पापी लोकांची अवस्था काय होईल?</verse>
				<verse number="19">म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत स्वतःला विश्‍वसनीय निर्माणकर्त्याच्या स्वाधीन करावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो:</verse>
				<verse number="2">तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर सेवावृत्तीने करा.</verse>
				<verse number="3">तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर सत्ता चालवणारे असे नव्हे, तर कळपापुढे आदर्श निर्माण करा.</verse>
				<verse number="4">म्हणजे जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला वैभवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.</verse>
				<verse number="5">तसेच तरुणांनो, वडीलजनांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंध बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीन लोकांवर कृपा करतो.</verse>
				<verse number="6">देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हांला उच्च स्थान देईल.</verse>
				<verse number="7">त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.</verse>
				<verse number="8">सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे.</verse>
				<verse number="9">त्याच्याविरुद्ध दृढ विश्वासाने असे उभे राहा, कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.</verse>
				<verse number="10">आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.</verse>
				<verse number="11">त्याच्या सामर्थ्याचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.</verse>
				<verse number="12">माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.</verse>
				<verse number="13">बाबेलमधील तुमच्यासारखी निवडलेली ख्रिस्तमंडळी तसेच माझा मुलगा मार्क तुम्हांला शुभेच्छा पाठवीत आहेत.</verse>
				<verse number="14">बंधुप्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना वंदन करा. सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींना शांतीचे वरदान मिळो.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="61">
			<chapter number="1">
				<verse number="1">येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,</verse>
				<verse number="2">देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.</verse>
				<verse number="3">ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.</verse>
				<verse number="4">त्याच्या योगे मूल्यवान व अतिमहान अशी अभिवचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.</verse>
				<verse number="5">ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,</verse>
				<verse number="6">ज्ञानात आत्मनियंत्रणाची, आत्मनियंत्रणात धीराची, धीरात धार्मिकतेची,</verse>
				<verse number="7">धार्मिकतेत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.</verse>
				<verse number="8">कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात तुम्ही सक्रिय व फलद्रूप व्हाल.</verse>
				<verse number="9">ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, दूरदृष्टी नसलेला आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे.</verse>
				<verse number="10">तर मग बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे कधीही पतन होणार नाही</verse>
				<verse number="11">आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल.</verse>
				<verse number="12">ह्या कारणासाठी जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात</verse>
				<verse number="13">तरी मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हांला त्याची आठवण देऊन जागृत ठेवणे, हे मला उचित वाटते.</verse>
				<verse number="14">मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला हे जग लवकरच सोडावे लागणार आहे</verse>
				<verse number="15">आणि माझ्या निधनानंतरही ह्या गोष्टीची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य ती व्यवस्था करीन.</verse>
				<verse number="16">चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यासबंधाने तुम्हांला कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहिले आहे.</verse>
				<verse number="17">त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा सर्वोच्च गौरवशाली देवाकडून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र आहे, तो मला परमप्रिय आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे!’</verse>
				<verse number="18">त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.</verse>
				<verse number="19">म्हणून आम्हांला अधिक खात्री वाटते की, संदेष्ट्यांचे वचन जे आमच्याजवळ आहे, ते काळोखात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल, तर बरे होईल.</verse>
				<verse number="20">प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही परमेश्वरप्रेरित संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही.</verse>
				<verse number="21">कारण परमेश्वरप्रेरित संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश सांगितला आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">पूर्वीच्या काळी खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक निर्माण होतील, ते विध्वंसक, असत्य मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले, त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील.</verse>
				<verse number="2">तसेच त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील, आणि त्यांच्या वर्तनामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.</verse>
				<verse number="3">ते लोभ धरून बनावट गोष्टी तुम्हांला सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही!</verse>
				<verse number="4">ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारात जखडून ठेवले आहे.</verse>
				<verse number="5">त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेशहर नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.</verse>
				<verse number="6">पुढे येणाऱ्या अभक्तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली</verse>
				<verse number="7">आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली.</verse>
				<verse number="8">तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता, तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.</verse>
				<verse number="9">भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.</verse>
				<verse number="10">विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या मागे लागणारे व देवाचा अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हे खोटे धर्मशिक्षक उद्धट, स्वच्छंदी आणि थोरांची निंदानालस्ती करण्यास न भिणारे असे आहेत.</verse>
				<verse number="11">सामर्थ्याने व अधिकाराने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांस दोषी ठरवीत नाहीत.</verse>
				<verse number="12">पण हे लोक स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. उपजत प्रवृत्तीनुसार वागल्यामुळे पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत, त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.</verse>
				<verse number="13">अनीतीचे वेतन म्हणजे क्लेश, त्यांच्या पदरी पडतील. दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.</verse>
				<verse number="14">शीलभ्रष्ट स्त्रियांशिवाय त्यांना दुसरे काही पाहायला आवडत नाही. पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत!</verse>
				<verse number="15">ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत.</verse>
				<verse number="16">त्याच्या उ्रंघनाबद्दल त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.</verse>
				<verse number="17">हे लोक कोरड्या झऱ्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड अंधार राखलेला आहे.</verse>
				<verse number="18">भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.</verse>
				<verse number="19">हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः मात्र भ्रष्टतेचे दास असतात कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो, त्याचा तो दासही बनतो.</verse>
				<verse number="20">प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.</verse>
				<verse number="21">नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते.</verse>
				<verse number="22">‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व ‘अंग धुतल्यानंतर चिखलात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशा ज्या म्हणी आहेत त्यांच्यासारखी त्यांची गत झालेली असते.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहिले आहे. ह्या दोन्ही पत्रांमध्ये मी तुम्हांला ह्या गोष्टींची आठवण देऊन तुमच्या मनामध्ये निर्मळ विचार जागृत करीत आहे.</verse>
				<verse number="2">ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू आणि तारणारा ह्याने प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.</verse>
				<verse number="3">सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील,</verse>
				<verse number="4">“त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निधन पावले, तरी सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे!”</verse>
				<verse number="5">ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश व पृथ्वी ही निर्माण झाली. पृथ्वी पाण्यातून व पाण्याच्या योगे घडविली गेली.</verse>
				<verse number="6">तेव्हाच्या जगाचा पुराच्या पाण्याने नाश झाला.</verse>
				<verse number="7">पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच देवाच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहेत.</verse>
				<verse number="8">परंतु प्रियजनहो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका! प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.</verse>
				<verse number="9">कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे.</verse>
				<verse number="10">मात्र चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश कर्कश नाद करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी उघडकीस येतील.</verse>
				<verse number="11">ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे.</verse>
				<verse number="12">त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील.</verse>
				<verse number="13">परंतु ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची देवाच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.</verse>
				<verse number="14">म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्याच्याबरोबर शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.</verse>
				<verse number="15">आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे.</verse>
				<verse number="16">त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात, तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.</verse>
				<verse number="17">परंतु प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा.</verse>
				<verse number="18">आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="62">
			<chapter number="1">
				<verse number="1">जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, होय, जे आम्ही पाहिले आहे व ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही लिहीत आहोत.</verse>
				<verse number="2">हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो.</verse>
				<verse number="3">जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हांला ह्यासाठी कळवितो की, तुम्हीही आमच्यात सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे.</verse>
				<verse number="4">आपला आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही लिहितो.</verse>
				<verse number="5">जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आहे, तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही.</verse>
				<verse number="6">त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही.</verse>
				<verse number="7">पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते.</verse>
				<verse number="8">आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही.</verse>
				<verse number="9">मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.</verse>
				<verse number="10">आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण देवाला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिमान असा येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आहे</verse>
				<verse number="2">आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते; केवळ आपल्याच पापांची नव्हे तर सर्व जगाच्याही पापांची क्षमा मिळते.</verse>
				<verse number="3">आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला खातरीने कळून येते की, आपण त्याला ओळखतो.</verse>
				<verse number="4">“मी त्याला ओळखतो”, असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्यामध्ये सत्य नाही.</verse>
				<verse number="5">जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याशी एकनिष्ठ आहोत.</verse>
				<verse number="6">“मी त्याच्याशी एकनिष्ठ राहतो”, असे म्हणणाऱ्याने येशू ख्रिस्त जसा चालला, तसे स्वतःही चालले पाहिजे.</verse>
				<verse number="7">प्रियजनहो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले, ते ती जुनी आज्ञा होय.</verse>
				<verse number="8">तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती ख्रिस्ताच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशी आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता उजळत आहे.</verse>
				<verse number="9">“मी प्रकाशात आहे”, असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे.</verse>
				<verse number="10">आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि तो कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना पापास प्रवृत्त करत नाही.</verse>
				<verse number="11">पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे, अंधारात चालतो आणि तो कोठे चालला आहे, हे त्याचे त्यालाच कळत नाही, कारण अंधाराने त्याच्या डोळ्यांवर अंधत्व आणलेले आहे.</verse>
				<verse number="12">मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची क्षमा झाली आहे.</verse>
				<verse number="13">वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे.</verse>
				<verse number="14">मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात, तुमच्यामध्ये देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.</verse>
				<verse number="15">जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो, तर त्याच्यामध्ये पित्याची प्रीती नाही.</verse>
				<verse number="16">जगात जे सर्व आहे, ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व श्रीमंतीचा अहंकार ह्या गोष्टी पित्याकडून नाहीत, तर जगाच्या आहेत.</verse>
				<verse number="17">जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. मात्र देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा सर्व काळ जगतो.</verse>
				<verse number="18">माझ्या मुलांनो, ही शेवटची घटका आहे! ख्रिस्तविरोधक येणार, असे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत आणि ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटची घटका आहे.</verse>
				<verse number="19">जरी आपल्यातूनच ते निघून गेले कारण ते आपले नव्हते. ते आपले असते, तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नव्हता, हे प्रकट व्हावे म्हणून ते निघून गेले.</verse>
				<verse number="20">ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्ही सत्य जाणता.</verse>
				<verse number="21">तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे, असे नाही. तुम्हांला ते कळते म्हणून आणि सत्यात कोणतीही लबाडी नसते म्हणून हे लिहिले आहे.</verse>
				<verse number="22">येशू हा ख्रिस्त आहे, हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.</verse>
				<verse number="23">जो कोणी पुत्राला नाकारतो, त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पितादेखील लाभला आहे.</verse>
				<verse number="24">जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले, ते तुमच्या अंतःकरणात राखून ठेवा. ते जर तुमच्यामध्ये राखून ठेवले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.</verse>
				<verse number="25">जे अभिवचन ख्रिस्ताने स्वतः आपल्याला दिले आहे, ते शाश्वत जीवन होय.</verse>
				<verse number="26">तुम्हांला बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे.</verse>
				<verse number="27">तुमच्याविषयी म्हणावयाचे तर ख्रिस्ताकडून तुमचा जो अभिषेक झाला, त्यामुळे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, म्हणून तुम्हांला कोणीही शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक सत्य आहे, खोटा नाही. पवित्र आत्मा तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.</verse>
				<verse number="28">तर आता मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, ह्यासाठी की तो प्रकट होईल, तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापुढून लाजेने माघार घ्यावी लागू नये.</verse>
				<verse number="29">तो नीतिमान आहे, हे जर तुम्हांला माहीत आहे, तर मग जो कोणी नीतीने चालतो, तो त्याच्यापासून जन्मलेला आहे, हेही तुम्हांला माहीत झाले असावे.</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही.</verse>
				<verse number="2">प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल.</verse>
				<verse number="3">जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो.</verse>
				<verse number="4">जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे.</verse>
				<verse number="5">तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही.</verse>
				<verse number="6">जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, तो पाप करत नाही, जो कोणी पाप करतो, त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही.</verse>
				<verse number="7">मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये! जसा तो नीतिमान आहे, तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.</verse>
				<verse number="8">पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.</verse>
				<verse number="9">जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे.</verse>
				<verse number="10">ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.</verse>
				<verse number="11">जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी.</verse>
				<verse number="12">काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची कृत्ये नीतीची होती.</verse>
				<verse number="13">बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका.</verse>
				<verse number="14">आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपणास कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही, तो मरणात राहतो.</verse>
				<verse number="15">जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकामध्ये शाश्वत जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे.</verse>
				<verse number="16">ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे.</verse>
				<verse number="17">स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार?</verse>
				<verse number="18">मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी.</verse>
				<verse number="19">आपण सत्याचे आहोत, हे ह्यावरून आपल्याला कळून येईल आणि अशा प्रकारे आपण त्याच्यासमोर आत्मविश्वास बाळगू. जर आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, तर आपल्याला ठाऊक आहे की,</verse>
				<verse number="20">आपल्या मनापेक्षा देव थोर आहे व त्याला सर्व काही कळते.</verse>
				<verse number="21">प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवीत नसेल, तर देवासमोर येण्याचे आपण धैर्य बाळगतो.</verse>
				<verse number="22">आपण जे काही मागतो, ते त्याच्याकडून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते, ते करतो.</verse>
				<verse number="23">त्याची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी.</verse>
				<verse number="24">त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहतो व तो त्या माणसामध्ये राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्यामध्ये राहतो.</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत.</verse>
				<verse number="2">देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: जो आत्मा कबूल करतो की, येशू ख्रिस्त मानव म्हणून आला तो देवाकडचा आहे.</verse>
				<verse number="3">जो आत्मा येशू मानव म्हणून आला हे कबूल करत नाही, तो देवाकडचा नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार आहे, हे तुम्ही ऐकले आहे आणि तो आत्ता जगात आलाच आहे.</verse>
				<verse number="4">मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि खोट्या संदेष्ट्यांवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण तुमच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जो जगात आहे, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.</verse>
				<verse number="5">ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते.</verse>
				<verse number="6">परंतु आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व असत्याचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.</verse>
				<verse number="7">प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून येते. जो कोणी प्रीती करतो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो.</verse>
				<verse number="8">जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.</verse>
				<verse number="9">देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली.</verse>
				<verse number="10">प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.</verse>
				<verse number="11">प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली, तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.</verse>
				<verse number="12">देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर आपल्यामध्ये देव राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली आहे.</verse>
				<verse number="13">आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःचा आत्मा आपणास दिला आहे.</verse>
				<verse number="14">आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे.</verse>
				<verse number="15">येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो, त्याच्यामध्ये देव राहतो व तो देवामध्ये राहतो.</verse>
				<verse number="16">देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.</verse>
				<verse number="17">न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्यामध्ये धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण ह्या जगात आपले जीवन हे ख्रिस्ताचेच जीवन आहे.</verse>
				<verse number="18">प्रीतीमध्ये भीती नसते, इतकेच नव्हे तर परिपूर्ण प्रीती भीती घालवून टाकते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीने परिपूर्ण झालेला नाही.</verse>
				<verse number="19">प्रथम देवाने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.</verse>
				<verse number="20">“मी देवावर प्रीती करतो”, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.</verse>
				<verse number="21">जो देवावर प्रीती करतो, त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो, तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.</verse>
				<verse number="2">आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो.</verse>
				<verse number="3">देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा फार कठीण नाहीत.</verse>
				<verse number="4">जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावरील जय म्हणजेच आपली श्रद्धा.</verse>
				<verse number="5">येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो ठेवतो, त्याच्यावाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे?</verse>
				<verse number="6">जो पाण्याने व रक्ताने आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त, केवळ पाण्याने नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.</verse>
				<verse number="7">साक्ष देणारे तिघे आहेत: आत्मा, पाणी व रक्त.</verse>
				<verse number="8">ह्या तिघांची साक्ष एकच आहे.</verse>
				<verse number="9">आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. देवाने आपल्या पुत्राविषयी दिली, तीच ही त्याची साक्ष आहे.</verse>
				<verse number="10">जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या मध्येच साक्ष आहे. ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे, तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.</verse>
				<verse number="11">ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला शाश्वत जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे.</verse>
				<verse number="12">ज्याला तो पुत्र लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.</verse>
				<verse number="13">देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला शाश्वत जीवन लाभले आहे, हे तुम्हांला कळावे म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे.</verse>
				<verse number="14">त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जो आत्मविश्वास वाटतो तो ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले, तर तो आपले ऐकतो.</verse>
				<verse number="15">आपण जे काही मागतो, ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून जे आपण त्याच्याजवळ मागतो, ते तो आपल्याला देतो, हेही आपल्याला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="16">ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करणाऱ्याला ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे, असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.</verse>
				<verse number="17">सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही, असेही पाप आहे.</verse>
				<verse number="18">जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, त्याला देवपुत्र ख्रिस्त सुरक्षित ठेवतो आणि सैतान त्याला उपद्रव करू शकत नाही.</verse>
				<verse number="19">सगळे जग त्या दुष्टाला वश झालेले असले, तरीही आपण देवापासून आहोत, हे आपल्याला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="20">आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे, त्या परमेश्वराला ओळखण्याची समज त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबरच्या ऐक्यात आपण जीवन जगत आहोत. हाच खरा देव आहे आणि हेच खरे शाश्वत जीवन आहे.</verse>
				<verse number="21">माझ्या मुलांनो, तुम्ही स्वतःला खोट्या दैवतांपासून दूर राखा.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="63">
			<chapter number="1">
				<verse number="1">वडीलजनांकडून निवडलेली महिला व तिची मुले ह्यांना: मी तुमच्यावर खरोखर प्रीती करतो व केवळ मीच नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे, ते सर्वच करतात.</verse>
				<verse number="2">कारण सत्य आपल्यामध्ये आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील.</verse>
				<verse number="3">देवपित्याकडून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडून सत्यात व प्रीतीत आपल्याला कृपा, दया व शांती मिळो.</verse>
				<verse number="4">आपल्याला पित्याकडून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.</verse>
				<verse number="5">बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच लिहितो.</verse>
				<verse number="6">प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे, तसे तुम्ही प्रीतीने चालावे.</verse>
				<verse number="7">फसवणूक करणारी, म्हणजेच येशू ख्रिस्त मानव म्हणून आला हे मान्य न करणारी, पुष्कळ माणसे जगात वावरत आहेत. असा मनुष्य फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधी आहे.</verse>
				<verse number="8">आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण पारितोषिक तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या.</verse>
				<verse number="9">ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ह्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे.</verse>
				<verse number="10">म्हणून हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करू नका; त्याचे क्षेमकुशलदेखील विचारू नका.</verse>
				<verse number="11">कारण जो त्याचे स्वागत करतो, तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.</verse>
				<verse number="12">मी तुम्हांला पुष्कळ लिहिणार होतो परंतु ते कागद व शाई ह्यानी लिहावेसे वाटत नाही, तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल, अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.</verse>
				<verse number="13">तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला शुभेच्छा पाठवीत आहेत.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="64">
			<chapter number="1">
				<verse number="1">प्रिय गायस, तुझ्यावर खरी प्रीती करणारा, वडीलजनांपैकी एक तुला हे पत्र लिहीत आहे.</verse>
				<verse number="2">प्रिय मित्रा, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे सर्व बाबतीत तुझे चांगले चालावे व तुला आरोग्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो.</verse>
				<verse number="3">तू नेहमी सत्याने चालतोस म्हणून तू सत्याशी निष्ठावंत आहेस, अशी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, तेव्हा मला अत्यानंद झाला.</verse>
				<verse number="4">माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.</verse>
				<verse number="5">प्रिय मित्रा, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस.</verse>
				<verse number="6">त्यांनी ख्रिस्तमंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी येथे साक्ष दिली आहे. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना पुढची वाटचाल करण्यास साहाय्य कर.</verse>
				<verse number="7">कारण ते यहुदीतर लोकांपासून काहीच न घेता ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी बाहेर पडले आहेत.</verse>
				<verse number="8">म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या सेवाकार्यात त्यांचे सहकारी होऊ.</verse>
				<verse number="9">मी ख्रिस्तमंडळीला छोटेसे पत्र लिहिले परंतु ख्रिस्तमंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष देत नाही.</verse>
				<verse number="10">ह्यामुळे जर मी आलो तर तो जी कृत्ये करतो, त्याकडे लक्ष वेधीन. तो आम्हांला त्रासदायक होतील अशा मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो. तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो करू देत नाही व ख्रिस्तमंडळीतून बाहेर घालवून देतो.</verse>
				<verse number="11">प्रिय मित्रा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवाला आवडतो; वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.</verse>
				<verse number="12">देमेत्रियविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे, हे तुला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="13">मला पुष्कळ लिहावयाचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही.</verse>
				<verse number="14">मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू.</verse>
				<verse number="15">तुला शांती लाभो. मित्रमंडळी तुला शुभेच्छा पाठवीत आहे. आपल्या सर्व मित्रमंडळीला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा कळव.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="65">
			<chapter number="1">
				<verse number="1">देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली असलेले व देवाने आमंत्रित केलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबचा बंधू यहूदा ह्याच्याकडून:</verse>
				<verse number="2">दया, शांती व प्रीती ही तुम्हांला विपुल मिळोत.</verse>
				<verse number="3">प्रियजनहो, आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हांला लिहिण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत असताना तुम्हांला श्रद्धेच्या लढाईत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता लिहिण्याची मला आवश्यकता वाटली. ही श्रद्धा देवाने निर्णायक स्वरूपात पवित्र जनांच्या हवाली केली आहे.</verse>
				<verse number="4">कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.</verse>
				<verse number="5">प्रभूने इजिप्त देशातून आपल्या लोकांना मुक्त केले परंतु नंतर जे विश्वासहीन झाले, त्यांचा त्याने नाश केला, हे तुम्हांला ठाऊक आहेच. तरीही मी तुम्हांला त्याची आठवण करून देऊ इच्छितो.</verse>
				<verse number="6">ज्या देवदूतांनी आपल्या अधिकारपदाची मर्यादा न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे.</verse>
				<verse number="7">सदोम, गमोरा आणि सभोवतालची नगरे येथील लोक त्या देवदूतांसारखे वागले आणि त्यांनी विकृत, अनैतिक, लैंगिक वर्तन केले. सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली ही नगरे स्पष्ट इशारा म्हणून सर्वांच्या पुढे ठेवली आहेत.</verse>
				<verse number="8">हे दृष्टान्त पाहणारे लोक स्वतःचे शरीर अशुद्ध करतात, अधिकाराचा अव्हेर करतात आणि उच्च स्थानी असलेल्या गौरवशाली थोरांचा उपमर्द करतात.</verse>
				<verse number="9">आद्य देवदूत मीखाएलदेखील असा वागला नाही. जेव्हा त्याने मोशेच्या शरीराविषयी सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याचा उपमर्द करण्यास तो धजला नाही, तर ‘प्रभू तुझी कानउघाडणी करो’, एवढेच तो म्हणाला.</verse>
				<verse number="10">तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात.</verse>
				<verse number="11">त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला.</verse>
				<verse number="12">ते तुमच्याबरोबर निर्लज्ज मद्यपानोत्सव करतात, तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात घाणेरड्या स्थळांसारखे आहेत, ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात. ते वाऱ्याने वाहून नेलेल्या निर्जल मेघांसारखे, हेमंत ऋतूतील फलहीन, पूर्णपणे मेलेल्या व समूळ उपटलेल्या झाडांसारखे आहेत.</verse>
				<verse number="13">हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.</verse>
				<verse number="14">आदामपासून सहावा वंशज हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला की,</verse>
				<verse number="15">पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि अधार्मिक लोकांनी अभक्तीने केलेल्या सर्व दुष्ट कृत्यांवरून आणि जे सर्व भयंकर शब्द अधार्मिक पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितले त्यावरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या हजारो पवित्र देवदूतांसह येईल.</verse>
				<verse number="16">हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.</verse>
				<verse number="17">परंतु प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा.</verse>
				<verse number="18">ते तुम्हांला असे सांगत असत की, शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.</verse>
				<verse number="19">ती फूट पाडणारी, देहवासनांनी प्रभावित, ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही, अशी आहेत.</verse>
				<verse number="20">प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या परमपवित्र श्रद्धेवर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा,</verse>
				<verse number="21">शाश्वत जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा आणि आपल्याला देवाच्या प्रीतीमध्ये राखा.</verse>
				<verse number="22">जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा,</verse>
				<verse number="23">इतरांना अग्नीतून ओढून काढा व त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र पापवासनेने डागाळलेली त्यांची वस्त्रे तुच्छ माना.</verse>
				<verse number="24">तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या वैभवशाली सान्निध्यात निर्दोष असे उ्रासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,</verse>
				<verse number="25">त्या आपल्या उद्धारक अशा एकमेव देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे वैभव, ऐश्वर्य, सामर्थ्य व अधिकार ही युगारंभापूर्वी, आत्ता व युगानुयुगे असोत! आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
		<book number="66">
			<chapter number="1">
				<verse number="1">येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण:ज्या गोष्टी लवकरच जरूर घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्याने आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहान ह्याला हे कळविले.</verse>
				<verse number="2">योहानने जे जे पाहिले आहे, ते सर्व सांगितले आहे. देवाकडून मिळालेला संदेश व येशू ख्रिस्ताने उघड करून दाखविलेले सत्य यांविषयीचा हा योहानचा वृत्तान्त आहे.</verse>
				<verse number="3">ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे.</verse>
				<verse number="4">योहानकडून आशिया प्रांतातील सात ख्रिस्तमंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार त्याच्याकडून; त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्याकडून</verse>
				<verse number="5">आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे</verse>
				<verse number="6">आणि ज्याने आपल्याला आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजकांचे राज्य असे तयार केले आहे, त्या येशू ख्रिस्ताला वैभव व सामर्थ्य युगानुयुगे असोत, आमेन.</verse>
				<verse number="7">पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.</verse>
				<verse number="8">जो आहे, जो होता व जो येणार आहे, जो सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहे तो म्हणतो, “मी आदी व अंत आहे.”</verse>
				<verse number="9">देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते.</verse>
				<verse number="10">प्रभूच्या दिवशी मी पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आलो, तेव्हा मला कर्ण्याच्या नादासारखी जोरदार वाणी ऐकू आली.</verse>
				<verse number="11">ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.”</verse>
				<verse number="12">माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची, हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया</verse>
				<verse number="13">आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला.</verse>
				<verse number="14">त्याचे केस पांढऱ्या लोकरीसमान किंवा बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते.</verse>
				<verse number="15">त्याचे पाय जणू काही भट्टीतून विशुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्याची वाणी गर्जना करणाऱ्या धबधब्यासारखी होती.</verse>
				<verse number="16">त्याने त्याच्या उजव्या हातात सात तारे धरले होते, आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याचा चेहरा मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतका तेजस्वी होता.</verse>
				<verse number="17">मी त्याला पाहिले, तेव्हा मी त्याच्या पायाजवळ मृतप्राय अवस्थेत पडलो. त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस! जो पहिला व शेवटचा आणि जो जिवंत आहे तो मी आहे!</verse>
				<verse number="18">मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.</verse>
				<verse number="19">म्हणून जे तू पाहिले म्हणजेच जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव.</verse>
				<verse number="20">जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहतोस त्यांचे आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे:ते सात तारे हे सात ख्रिस्तमंडळ्यांचे दूत आहेत आणि सात समया ह्या सात ख्रिस्तमंडळ्या आहेत.”</verse>
			</chapter>
			<chapter number="2">
				<verse number="1">इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो -</verse>
				<verse number="2">तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले.</verse>
				<verse number="3">तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आहे आणि तू खचून गेला नाहीस.</verse>
				<verse number="4">परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे.</verse>
				<verse number="5">तू कुठून पतन पावला आहेस, ह्याचा विचार कर व पश्चात्ताप करून पहिल्याप्रमाणे वागू लाग. तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.</verse>
				<verse number="6">तरीही तुझा एक चांगला गुण म्हणजे माझ्याप्रमाणे तूदेखील निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस.</verse>
				<verse number="7">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.</verse>
				<verse number="8">स्मुर्णा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो पहिला व शेवटचा, जो मरण पावला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो -</verse>
				<verse number="9">तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे.</verse>
				<verse number="10">तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुगांत टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हांला हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.</verse>
				<verse number="11">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही.</verse>
				<verse number="12">पर्गम येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो -</verse>
				<verse number="13">सैतानाचे आसन आहे, तेथे तू राहतोस हे मला ठाऊक आहे. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. जेथे सैतान राहतो, तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा तुमच्यामध्ये ठार मारला गेला, त्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.</verse>
				<verse number="14">तथापि तुला काही गोष्टींविषयी दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. त्या ह्या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाक ह्याला इस्राएली लोकांना मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व अनैतिक लैंगिक कृत्ये करणे, ही पापे करण्यासाठी प्रवृत्त केले.</verse>
				<verse number="15">तसेच निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुमच्यामध्ये आहेत.</verse>
				<verse number="16">म्हणून पश्चात्ताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याविरूद्ध लढेन.</verse>
				<verse number="17">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही माहीत होणार नाही.</verse>
				<verse number="18">थुवतीरा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चकचकीत सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो -</verse>
				<verse number="19">तुझी कृत्ये, तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुझ्या पहिल्या कार्यापेक्षा आता तुझे कार्य अधिक आहे, हे मला माहीत आहे.</verse>
				<verse number="20">परंतु तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे, कारण ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेश देणारी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.</verse>
				<verse number="21">तिने पश्चात्ताप करावा म्हणून मी तिला वेळ दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही.</verse>
				<verse number="22">पाहा, मी तिला अंथरुणाला खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांना, तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चात्ताप न केल्यास भीषण संकटात पाडीन.</verse>
				<verse number="23">मी तिच्या अनुयायांना ठार मारीन, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणे ह्यांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.</verse>
				<verse number="24">थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, तुम्हांला सैतानाच्या तथाकथित गहन गोष्टी माहीत नाहीत. मी तुम्हांला सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही.</verse>
				<verse number="25">एवढेच करा की, जे तुम्हांला मिळाले आहे, ते मी येईपर्यंत दृढ धरून ठेवा.</verse>
				<verse number="26">जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्याला माझ्या पित्याकडून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन</verse>
				<verse number="27">आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात, तसा तो लोहदंडाने त्याच्यावर अधिकार गाजवील.</verse>
				<verse number="28">मी त्याला प्रभाततारादेखील देईन.</verse>
				<verse number="29">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे!</verse>
			</chapter>
			<chapter number="3">
				<verse number="1">सार्दीस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस!</verse>
				<verse number="2">जागृत हो, जे मरणाच्या पंथास लागले आहे, ते सावरून धर कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.</verse>
				<verse number="3">म्हणून तू जे ऐकले व स्वीकारले ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चात्ताप कर कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हेदेखील तुला कळणार नाही.</verse>
				<verse number="4">मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत, अशी थोडी माणसे सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण तशी त्यांची योग्यता आहे.</verse>
				<verse number="5">जे विजय मिळवतील त्यांना अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करायला मिळतील. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे मुळीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर मी त्यांचा जाहीरपणे स्वीकार करीन.</verse>
				<verse number="6">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!</verse>
				<verse number="7">फिलदेल्फिया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दावीदची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कुणाला बंद करता येत नाही आणि ज्याने बंद केल्यावर कुणाला उघडता येत नाही, तो असे म्हणतो -</verse>
				<verse number="8">तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तुला शक्‍ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकत नाही!</verse>
				<verse number="9">ऐक! जे सैतानाच्या समुदायात असून आपणाला यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते तुझ्या पायांजवळ येऊन तुझी आराधना करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे, हे त्यांना कळून चुकेल, असे मी करीन.</verse>
				<verse number="10">धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.</verse>
				<verse number="11">मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव.</verse>
				<verse number="12">जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहीन.</verse>
				<verse number="13">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!</verse>
				<verse number="14">लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षीदार जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो -</verse>
				<verse number="15">तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते!</verse>
				<verse number="16">पण तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस किंवा थंड नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे!</verse>
				<verse number="17">मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही, असे तू म्हणतोस, परंतु तू किती निकृष्ठ व तिरस्करणीय आहेस, हे तुला माहीत नाही! तू गरीब, आंधळा व उघडानागडा आहेस.</verse>
				<verse number="18">म्हणून मी तुला स्रा देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू शुद्ध सोने माझ्याकडून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.</verse>
				<verse number="19">जितक्यांवर मी प्रेम करतो, तितक्यांचा निषेध करून मी त्यांना शिक्षा करतो. म्हणून तत्पर राहा आणि पश्चात्ताप कर.</verse>
				<verse number="20">ऐक! मी दाराशी उभा आहे व ठोठावत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे जाईन व त्याच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तो जेवील.</verse>
				<verse number="21">मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या राजासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन.</verse>
				<verse number="22">पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!</verse>
			</chapter>
			<chapter number="4">
				<verse number="1">ह्यानंतर मी पाहिले तो काय आश्चर्य! स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.”</verse>
				<verse number="2">लगेच पवित्र आत्म्याने माझा ताबा घेतला. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता.</verse>
				<verse number="3">त्याचे मुख सूर्यकांत व सादा रत्नांसारखे चमकत होते. राजासनाभोवती सर्वत्र पाचूच्या रंगासारखे मेघधनुष्य होते.</verse>
				<verse number="4">राजासनाभोवती आणखी चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.</verse>
				<verse number="5">राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत.</verse>
				<verse number="6">तसेच राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजासनाभोवती चार बाजूंस चार प्राणी होते. त्यांना पुढे व मागे अंगभर डोळे होते.</verse>
				<verse number="7">पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता.</verse>
				<verse number="8">त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. “सर्वसमर्थ प्रभू देव पवित्र, पवित्र, पवित्र आहे. तो होता, तो आहे व तो येणार आहे”, असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत.</verse>
				<verse number="9">राजासनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याला जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व आभार व्यक्त करणारी गाणी गातात,</verse>
				<verse number="10">तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याची आराधना करतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,</verse>
				<verse number="11">“प्रभो, आमच्या देवा! गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू पात्र आहेस कारण तू सर्वांना निर्माण केले व तुझ्या इच्छेने त्यांना अस्तित्व आणि जीवन मिळाले.”</verse>
			</chapter>
			<chapter number="5">
				<verse number="1">जो राजासनावर बसलेला होता, त्याच्या उजव्या हातात दोन्ही बाजूस लिहिलेली व सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली.</verse>
				<verse number="2">“गुंडाळीवरचे शिक्के फोडून, ती उघडावयास कोण पात्र आहे”, असे मोठ्याने पुकारणारा एक सामर्थ्यशाली देवदूत मी पाहिला.</verse>
				<verse number="3">परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता.</verse>
				<verse number="4">ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी शोकाकुल झालो.</verse>
				<verse number="5">तेव्हा वडीलजनांच्या मंडळापैकी एक जण मला म्हणाला, “शोक करू नको, पाहा, यहुदाच्या वंशाचा सिंह, दावीदचे मूळ ह्याने जय मिळवला आहे म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास समर्थ ठरला आहे.”</verse>
				<verse number="6">तेव्हा राजासनाभोवती चार प्राणी व वडीलजनांमध्ये वध करण्यात आल्यासारखे दिसत होते, असे कोकरू उभे राहिलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत.</verse>
				<verse number="7">त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.</verse>
				<verse number="8">त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत.</verse>
				<verse number="9">ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत</verse>
				<verse number="10">आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.”</verse>
				<verse number="11">तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली.</verse>
				<verse number="12">ते उच्च स्वरात गात होते, “वधलेले कोकरू सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान, गौरव व धन्यवाद हे स्वीकारण्यास पात्र आहे!”</verse>
				<verse number="13">स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रामध्ये जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे गाताना ऐकले, “राजासनावर बसलेल्याला व कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुगे असो!”</verse>
				<verse number="14">तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि वडीलजनांनी लोटांगण घालून आराधना केली.</verse>
			</chapter>
			<chapter number="6">
				<verse number="1">त्यानंतर कोकराने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये!” असे म्हणाला, ते मी ऐकले.</verse>
				<verse number="2">मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. त्यानंतर त्याला मुकुट देण्यात आला. तो विजयी योद्धा म्हणून विजयावर विजय मिळवण्यास निघाला.</verse>
				<verse number="3">नंतर त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले.</verse>
				<verse number="4">त्या वेळी दुसरा घोडा निघाला. तो तांबूस रंगाचा होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवर युद्ध करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला महान तलवार देण्यात आली होती.</verse>
				<verse number="5">मग त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते.</verse>
				<verse number="6">त्या वेळी जणू काही चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: “दिवसाची मजुरी किलोभर गहू आणि दिवसाची मजुरी तीन किलो जव. मात्र ऑलिव्ह तेल व द्राक्षरस ह्यांची नासाडी करू नकोस.”</verse>
				<verse number="7">नंतर कोकराने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले.</verse>
				<verse number="8">मग मी पाहिले, तो फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर तलवारीने, दुष्काळाने, रोगराईने व पृथ्वीवरील हिंस्र श्वापदांकडून माणसांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला.</verse>
				<verse number="9">त्यानंतर कोकराने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे वधलेल्या लोकांचे होते.</verse>
				<verse number="10">ते जोरात ओरडून म्हणाले, “हे सार्वभौम प्रभो, तू पवित्र व सत्य आहेस. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचा न्यायनिवाडा तू कोठपर्यंत करणार नाहीस आणि त्यांचा आमच्या रक्ताबद्दल सूड घेणार नाहीस?”</verse>
				<verse number="11">तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले, “तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे ठार मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.”</verse>
				<verse number="12">कोकराने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा भीषण स्वरूपाचा भूकंप झाला. सूर्य केसांच्या गोणपाटासारखा काळा झाला व पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.</verse>
				<verse number="13">अंजिराचे झाड वादळी वाऱ्यात सापडले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात, तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले.</verse>
				<verse number="14">एखादी गुंडाळी गुंडाळावी तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि प्रत्येक डोंगर व बेट आपापल्या ठिकाणांवरून ढळले.</verse>
				<verse number="15">तेव्हा पृथ्वीवरील राजे, राज्यकर्ते व सैन्याधिकारी, श्रीमंत व प्रभावशाली लोक, इतर सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहांत व डोंगरांतील खडकांखाली लपली</verse>
				<verse number="16">आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टिपुढून व कोकराच्या क्रोधापासून आम्हांला लपवा.</verse>
				<verse number="17">कारण त्यांच्या क्रोधाचा भयंकर दिवस आला आहे, त्याच्यापुढे कोणाच्याने टिकाव धरवेल?”</verse>
			</chapter>
			<chapter number="7">
				<verse number="1">ह्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत होते.</verse>
				<verse number="2">मी आणखी एक देवदूत पूर्व दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो ओरडून म्हणाला,</verse>
				<verse number="3">“आमच्या देवाचे जे दास आहेत, त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.”</verse>
				<verse number="4">ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.</verse>
				<verse number="5">प्रत्येक वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. इस्त्राएली लोकांचे बारा वंश पुढीलप्रमाणे: यहुदा, रऊबेन, गाद, आशेर, नफताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इस्साखार, जबुलून, योसेफ व बन्यामीन.</verse>
				<verse number="6"></verse>
				<verse number="7"></verse>
				<verse number="8"></verse>
				<verse number="9">ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="10">ते उच्च स्वराने म्हणत होते, “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडे व कोकराकडे तारण आहे.”</verse>
				<verse number="11">तेव्हा राजासन, वडीलजन व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले,</verse>
				<verse number="12">“आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!”</verse>
				<verse number="13">तेव्हा वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?”</verse>
				<verse number="14">मी त्याला म्हटले, “महाशय, हे तुम्हांला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या छळणुकीला सामोरे जाऊन येथे आले आहेत, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.</verse>
				<verse number="15">ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्याबरोबर वसती करील.</verse>
				<verse number="16">ते ह्यापुढे भुकेले व तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही भस्मसात करणारी उष्णता बाधणार नाही.</verse>
				<verse number="17">कारण राजासनाच्या मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”</verse>
			</chapter>
			<chapter number="8">
				<verse number="1">कोकराने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले.</verse>
				<verse number="2">तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले होते.</verse>
				<verse number="3">आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धूपपात्र होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धुपारती करण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.</verse>
				<verse number="4">देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला.</verse>
				<verse number="5">तेव्हा देवदूताने धूपपात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूकंप झाला.</verse>
				<verse number="6">मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजविण्यास सिद्ध झाले.</verse>
				<verse number="7">पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि एक तृतीयांश पृथ्वी जळून गेली. एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.</verse>
				<verse number="8">दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले.</verse>
				<verse number="9">समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले व एक तृतीयांश तारवांचा नाश झाला.</verse>
				<verse number="10">मग तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला विशाल तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला.</verse>
				<verse number="11">(त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते.</verse>
				<verse number="12">त्यानंतर चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यामुळे त्यांच्या प्रकाशाचे एक तृतीयांश तेज कमी झाले आणि एक तृतीयांश दिवसाचा तसेच एक तृतीयांश रात्रीचाही प्रकाश नाहीसा झाला.</verse>
				<verse number="13">मी पाहिले तेव्हा एक गरूड अंतराळात उंच उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, “इतर तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, तेव्हा त्यांच्या कर्ण्यांच्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर किती अनर्थ, अनर्थ, अनर्थ ओढवणार आहे!”</verse>
			</chapter>
			<chapter number="9">
				<verse number="1">नंतर पाचव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली देण्यात आली होती.</verse>
				<verse number="2">त्या ताऱ्याने अथांग विवर उघडला, तेव्हा त्यातून अवाढव्य भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या विवरातल्या धुराने सूर्य व अंतराळही अंधकारमय झाले.</verse>
				<verse number="3">त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली होती.</verse>
				<verse number="4">त्यांना असे सांगण्यात आले होते की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.</verse>
				<verse number="5">त्यांना ठार मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते. ती पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती.</verse>
				<verse number="6">त्या दिवसांत माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मरण येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.</verse>
				<verse number="7">त्या टोळांचे रूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काही तरी दिसत होते. त्यांचे चेहरे माणसांसारखे होते.</verse>
				<verse number="8">त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहांच्या दातांसारखे होते.</verse>
				<verse number="9">त्यांची उरस्त्राणे लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती. त्यांच्या पंखांचा आवाज युद्धातील अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.</verse>
				<verse number="10">त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपट्यांत होती.</verse>
				<verse number="11">अथांग विवराचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. हिब्रू भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि ग्रीक भाषेतले त्याचे नाव अप्रूओन आहे.</verse>
				<verse number="12">पहिला अनर्थ होऊन गेला आहे. पाहा, ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत.</verse>
				<verse number="13">नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांतून झालेली एक वाणी मी ऐकली.</verse>
				<verse number="14">कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.</verse>
				<verse number="15">तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे ठार मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.</verse>
				<verse number="16">घोडदळाची संख्या वीस कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली.</verse>
				<verse number="17">त्या दृष्टान्तात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक हे सारे निघत होते.</verse>
				<verse number="18">त्यांच्या तोंडांतून निघणारे अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे ठार मारली गेली.</verse>
				<verse number="19">कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते उपद्रव करतात.</verse>
				<verse number="20">त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही</verse>
				<verse number="21">आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, लैंगिक अनैतिकता व चोऱ्या यांच्याबद्दलही पश्चाताप केला नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="10">
				<verse number="1">मी आणखी एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित होता व त्याच्या डोक्याभोवती मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.</verse>
				<verse number="2">त्याच्या हाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला.</verse>
				<verse number="3">सिंहगर्जनेप्रमाणे तो ओरडला, तेव्हा सात मेघगर्जनांचा निनाद ऐकू आला.</verse>
				<verse number="4">त्या सात मेघगर्जनांचा अर्थ मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांचा अर्थ तू गुप्त ठेव, तो लिहू नकोस.”</verse>
				<verse number="5">ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला</verse>
				<verse number="6">आणि जो युगानुयुगे जिंवत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे, भूमी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, “आणखी वेळ लागणार नाही.</verse>
				<verse number="7">परंतु सातवा देवदूत कर्णा वाजवील तेव्हा देवाने आपले संदेष्टे सेवक ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्याची गुप्त योजना पूर्ण होईल.”</verse>
				<verse number="8">स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.”</verse>
				<verse number="9">तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन “ती लहानशी गुंडाळी मला दे”, असे म्हटले. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट बिघडवेल परंतु तुझ्या तोंडाला मधासारखी गोड लागेल.”</verse>
				<verse number="10">तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहानशी गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी ती खाल्ल्यावर माझ्या पोटात बिघाड झाला.</verse>
				<verse number="11">तेव्हा मला सांगण्यात आले की, अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे ह्यांना तू पुन्हा देवाचा संदेश दिला पाहिजे.</verse>
			</chapter>
			<chapter number="11">
				<verse number="1">नंतर काठीसारखी एक मोजपट्टी मला देण्यात आली व सांगण्यात आले, “जा, देवाचे मंदिर, वेदी ह्यांचे माप घे आणि तिथे उपासना करणाऱ्यांची गणती कर.</verse>
				<verse number="2">मात्र मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस. कारण ते यहुदीतर लोकांना दिले आहे. ते लोक बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवतील.</verse>
				<verse number="3">मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.”</verse>
				<verse number="4">पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे दोन ऑलिव्ह वृक्ष व दोन समया हे ते साक्षीदार आहेत.</verse>
				<verse number="5">त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांस खाऊन टाकतो. कोणी त्यांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ह्याचप्रमाणे ठार मारण्यात येईल.</verse>
				<verse number="6">त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा आणि वाटेल तितक्यांदा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचा त्यांना अधिकार आहे.</verse>
				<verse number="7">त्यांनी साक्ष देण्याचे काम पूर्ण केल्यावर अथांग विवरातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून ठार मारील.</verse>
				<verse number="8">जिथे त्यांच्या प्रभूला क्रुसावर चढविण्यात आले होते त्या महान नगराच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. ह्या नगराला प्रतीकात्मक रीत्या सदोम किंवा इजिप्त म्हटलेले आहे.</verse>
				<verse number="9">सर्व लोक, वंश, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरीत ठेवू देणार नाहीत.</verse>
				<verse number="10">त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उ्रास करतील व एकमेकांस भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस पीडा दिली होती.</verse>
				<verse number="11">पुढे साडेतीन दिवसांनंतर जीवनदायक आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला.</verse>
				<verse number="12">तेव्हा स्वर्गातून निघालेली उच्च वाणी त्यांनी त्यांच्याबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले.</verse>
				<verse number="13">त्याच घटकेस भीषण भूकंप झाला. तेव्हा त्या शहराच्या दहाव्या भागाचा विध्वंस झाला. भूकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गातील देवाचा गौरव केला.</verse>
				<verse number="14">दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. परंतु पाहा, तिसरा अनर्थ लवकरच होणार आहे!</verse>
				<verse number="15">सातव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा स्वर्गात जोरदार आवाज ऐकू आले. ते म्हणाले, “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुगे राज्य करील!”</verse>
				<verse number="16">तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले चोवीस वडीलजन लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले,</verse>
				<verse number="17">“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तू आहेस व होतास, तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि अधिकार हाती घेतला आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.</verse>
				<verse number="18">राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली आहेत, कारण तुझ्या क्रोधाची वेळ आली आहे. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास, संदेष्टे, तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करण्याऱ्यांचा विध्वंस करण्याची वेळ आली आहे!”</verse>
				<verse number="19">देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराची पेटी दृष्टीस पडली, त्यानंतर विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले, भूकंप झाला व गारांची महावृष्टीही झाली.</verse>
			</chapter>
			<chapter number="12">
				<verse number="1">नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.</verse>
				<verse number="2">ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती.</verse>
				<verse number="3">स्वर्गात दुसरे एक रहस्यमय दृश्य दिसले ते हे: पाहा, एक मोठा तांबूस अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते.</verse>
				<verse number="4">त्याच्या शेपटीने त्याने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढले व ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला.</verse>
				<verse number="5">सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे हिसकावून नेण्यात आले.</verse>
				<verse number="6">ती स्त्री रानात पळून गेली. त्या ठिकाणी तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची एक जागा होती.</verse>
				<verse number="7">मग स्वर्गात युद्ध सुरू झाले, मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले.</verse>
				<verse number="8">त्या वेळी अजगर व त्याचे दूत यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे स्थानही उरले नाही.</verse>
				<verse number="9">तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.</verse>
				<verse number="10">नंतर मी स्वर्गात उच्च वाणी ऐकली, तिने जाहीर केले, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार प्रगट झाली आहेत! कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली फेकण्यात आला आहे.</verse>
				<verse number="11">कोकराच्या रक्तामुळे व त्यांनी दिलेल्या सत्याच्या साक्षीमुळे तसेच त्यांच्यावर मरावयाची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही म्हणून आमच्या बंधूंना त्याच्यावर मात करता आली.</verse>
				<verse number="12">म्हणून स्वर्गांनो व त्यांत राहणाऱ्यांनो, आनंद करा!. भूमी व समुद्र ह्यांच्यावर अनर्थ ओढवला आहे, आपला काळ थोडा आहे, हे ओळखून सैतान अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”</verse>
				<verse number="13">आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत, असे पाहून अजगराने पुत्र प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला.</verse>
				<verse number="14">त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते. तेथे अजगराच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहत असताना साडे तीन वर्षे तिचे पोषण केले जाणार होते.</verse>
				<verse number="15">मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून पाण्याचा प्रवाह सोडला.</verse>
				<verse number="16">परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले, तिने तोंड उघडून अजगराने त्याच्या तोंडातून सोडलेले पाणी गिळून टाकले.</verse>
				<verse number="17">तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते, त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला.</verse>
				<verse number="18">तिथे तो समुद्रकिनारी उभा राहिला.</verse>
			</chapter>
			<chapter number="13">
				<verse number="1">नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले, त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.</verse>
				<verse number="2">जे श्वापद मी पाहिले, ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व विपुल अधिकार दिला.</verse>
				<verse number="3">त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याची प्राणघातक जखम बरी झाली होती. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य व्यक्त करत त्या श्वापदामागून गेली.</verse>
				<verse number="4">अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून सर्वांनी अजगराची आराधना केली, त्यांनी श्वापदाची आराधना करताना म्हटले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?”</verse>
				<verse number="5">देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता.</verse>
				<verse number="6">त्याने देवनिंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास सुरुवात केली.</verse>
				<verse number="7">पवित्र लोकांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. सर्व वंश, लोक, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.</verse>
				<verse number="8">जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.</verse>
				<verse number="9">ज्या कोणाला कान आहेत, त्याने ऐकावे.</verse>
				<verse number="10">कैदेत नेणारा कैदेत जातो, जो तलवारीने ठार मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे म्हणून पवित्र लोकांना धीर व विश्वास मिळतो.</verse>
				<verse number="11">नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकराच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते.</verse>
				<verse number="12">ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाची प्राणघातक जखम बरी झाली होती, त्याची पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी आराधना करावी, असे ते दडपण आणते.</verse>
				<verse number="13">ह्या दुसऱ्या श्वापदाने मोठेमोठे चमत्कार केले. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील त्याने केले.</verse>
				<verse number="14">जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.</verse>
				<verse number="15">पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे.</verse>
				<verse number="16">लहानथोर, गरीब व श्रीमंत, स्वतंत्र व दास ह्या सर्वानी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी</verse>
				<verse number="17">आणि ज्याच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे दडपण त्याने सर्व लोकांवर आणले.</verse>
				<verse number="18">येथे सुज्ञतेचे काम आहे, ज्याला समज आहे, त्याने श्वापदाच्या संख्येचा अर्थ शोधून काढावा कारण संख्या माणसाच्या नावाचा बोध करते. त्याची संख्या सहाशे सहासष्ट आहे.</verse>
			</chapter>
			<chapter number="14">
				<verse number="1">नंतर कोकरू सीयोन डोंगरावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. त्याचे व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक त्याच्याबरोबर होते.</verse>
				<verse number="2">अनेक जलप्रवाहांच्या निनादासारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. जी वाणी मी ऐकली, ती जणू काही वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती.</verse>
				<verse number="3">ते एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक राजासन, चार प्राणी व वडीलजन ह्यांच्यासमोर एक नवे गीत गात होते. ते गीत ह्यांच्याशिवाय कोणीही शिकू शकले नाहीत. पृथ्वीवरील सर्व लोकांपैकी ह्यांचेच तारण झाले आहे.</verse>
				<verse number="4">स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.</verse>
				<verse number="5">त्यांच्या तोंडांत असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत.</verse>
				<verse number="6">नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळात उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे सर्व राष्ट्रे, वंश, भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगावयास शाश्वत शुभवर्तमान होते.</verse>
				<verse number="7">तो उच्च स्वरात म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याची आराधना करा.”</verse>
				<verse number="8">त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “तिचे पतन झाले! महान बाबेलचे पतन झाले! तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना प्यायला लावला.”</verse>
				<verse number="9">त्याच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,</verse>
				<verse number="10">तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात भरपूर प्रमाणात ओतलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि हे करणाऱ्यांना पवित्र देवदूतांसमक्ष व कोकरांसमक्ष अग्नी व गंधक ह्यापासून पीडा होईल.</verse>
				<verse number="11">त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुगे वर येतो आणि जे श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतात, आणि जे कोणी त्याच्या नावाची खूण धारण करतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.</verse>
				<verse number="12">म्हणूनच देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा केली जाते.”</verse>
				<verse number="13">तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल कारण त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात.”</verse>
				<verse number="14">नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता.</verse>
				<verse number="15">त्यानंतर आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसला होता, त्याला उच्च स्वरात म्हणाला, “तू आपला विळा चालवून कापणी कर कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक तयार आहे.”</verse>
				<verse number="16">त्यानंतर मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.</verse>
				<verse number="17">मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.</verse>
				<verse number="18">ज्याला अग्नीवर अधिकार आहे, असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला. त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, “तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून घे. तिची द्राक्षे पिकली आहेत!”</verse>
				<verse number="19">तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.</verse>
				<verse number="20">ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहू लागले, त्याचा प्रवाह सुमारे दोन मीटर खोल असून तो सुमारे तीनशे किलोमिटर वाहत गेला.</verse>
			</chapter>
			<chapter number="15">
				<verse number="1">त्यानंतर मी अत्यंत रहस्यमय, थक्क करणारे व भव्य असे दुसरे एक दृश्य स्वर्गात पाहिले. सात साथीचे रोग आणणारे सात देवदूत दृष्टीस पडले. ते रोग शेवटचे होते, कारण देवाच्या क्रोधाची ती अंतिम अभिव्यक्ती होती.</verse>
				<verse number="2">मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाने दिलेल्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.</verse>
				<verse number="3">ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत.</verse>
				<verse number="4">हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? तूच एकमेव पवित्र आहेस. सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुझी आराधना करतील, कारण तुझी न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”</verse>
				<verse number="5">नंतर मी पाहिले, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीच्या मंडपामध्ये असलेले स्वर्गातील मंदिर उघडले</verse>
				<verse number="6">आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवर सोन्याचे पट्टे बांधलेले असे, सात पीडा घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले.</verse>
				<verse number="7">त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुगे जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या.</verse>
				<verse number="8">तेव्हा देवाचे वैभव व सामर्थ्य ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.</verse>
			</chapter>
			<chapter number="16">
				<verse number="1">पुढे मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या सात देवदूतांना म्हणाली जा, “देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता!”</verse>
				<verse number="2">पहिल्या देवदूताने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना दुर्गंधी येणारे व वेदनादायक फोड आले.</verse>
				<verse number="3">नंतर दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा समुद्र मृत माणसाच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणीमात्र मरून गेले.</verse>
				<verse number="4">तदनंतर तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले.</verse>
				<verse number="5">तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “जो तू आहेस व होतास, तो तू पवित्र आहेस! तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायी आहेस!</verse>
				<verse number="6">त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!”</verse>
				<verse number="7">नंतर मी वेदीला असे उत्तर देताना ऐकले, “होय, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझे निर्णय सत्य व न्याय्य आहेत.”</verse>
				<verse number="8">त्यानंतर चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपून टाकण्याची मुभा देण्यात आली.</verse>
				<verse number="9">माणसे कडक उष्णतेने करपून गेली, तेव्हा त्या विपत्तीवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची माणसांनी निंदा केली परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही की देवाचा गौरव केला नाही.</verse>
				<verse number="10">पाचव्या देवदूताने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनांमुळे त्यांच्या जिभा चावल्या.</verse>
				<verse number="11">त्यांच्या वेदनांमुळे व फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली परंतु आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप केला नाही.</verse>
				<verse number="12">सहाव्या देवदूताने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा पूर्वेकडून येणाऱ्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून त्या महानदीचे पाणी आटून गेले.</verse>
				<verse number="13">नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या, श्वापदाच्या व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडांतून निघताना मी पाहिले.</verse>
				<verse number="14">ते चमत्कार करणारे मृतांचे आत्मे आहेत, ते सर्वसमर्थ देवाच्या त्या महान दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात.</verse>
				<verse number="15">“पाहा, जसा चोर येतो, तसा मी येईन! आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे सांभाळतो तो धन्य!”</verse>
				<verse number="16">नंतर हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्रित केले.</verse>
				<verse number="17">त्यानंतर सातव्या देवदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा उच्च वाणी मंदिरातील राजासनापासून निघाली, ती म्हणाली: “झाले!”</verse>
				<verse number="18">तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका भयाण भूकंप झाला की, पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका भयंकर भूकंप कधी झाला नव्हता!</verse>
				<verse number="19">मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त करण्यात आली. महान बाबेल नगरीचे देवाने स्मरण केले व तिला त्याचा त्वेषयुक्त, क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला.</verse>
				<verse number="20">प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि सर्व डोंगरही दिसेनासे झाले.</verse>
				<verse number="21">प्रत्येकी सुमारे पन्नास किलो वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या विपत्तीमुळे लोकांनी देवाला शिव्याशाप दिले, कारण त्या गारांची विपत्ती अतिभयंकर होती.</verse>
			</chapter>
			<chapter number="17">
				<verse number="1">त्यानंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन मला म्हणाला, “इकडे ये, कुप्रसिद्ध वेश्येचा म्हणजेच अनेक नद्यांजवळ वसलेल्या महान नगरीचा न्यायनिवाडा होणार आहे, तो मी तुला दाखवितो.”</verse>
				<verse number="2">तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले.</verse>
				<verse number="3">मग मी आत्म्याने प्रभावित झालो असताना, त्याने मला रानात नेले, तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.</verse>
				<verse number="4">ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती. आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.</verse>
				<verse number="5">तिच्या कपाळावर “महान बाबेल, वेश्यांची व पृथ्वीवरील विकृतीची आई”, हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.</verse>
				<verse number="6">ती स्त्री पवित्र लोकांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले.</verse>
				<verse number="7">देवदूताने मला विचारले, “तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद ह्यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो.</verse>
				<verse number="8">जे श्वापद तू पाहिले, ते अस्तित्वात होते परंतु आता नाही. ते अथांग विवरातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, ते श्वापद पूर्वी होते, आता नाही तरीही पुन्हा अवतरले, असे पाहून आश्चर्य वाटेल.</verse>
				<verse number="9">येथे सुज्ञता व समज यांची गरज आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत. त्यांवर ती स्त्री बसते. ती डोकी म्हणजे सात राजेदेखील आहेत,</verse>
				<verse number="10">त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक जिवंत आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर थोडाच वेळराहील.</verse>
				<verse number="11">जे श्वापद पूर्वी होते आणि आता नाही, तेच आठवे आहे. परंतु ते ह्या सातांचे आहे आणि त्याचा नाश होणार आहे.</verse>
				<verse number="12">जी दहा शिंगे तू पाहिलीस ती म्हणजे दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही. परंतु त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजाचा अधिकार दिला जाईल.</verse>
				<verse number="13">त्यांचे सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देण्यात त्यांच्यात ऐक्य आहे.</verse>
				<verse number="14">ते कोकराबरोबर लढतील, परंतु कोकरू त्यांना जिंकील, कारण कोकरू प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे आहेत ते कोकराच्या बरोबर आहेत.”</verse>
				<verse number="15">तो देवदूत मला आणखी म्हणाला, “जेथे वेश्या बसली आहे, तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस ते लोक, समुदाय, राष्ट्रे व भाषा बोलणारे असे आहेत.</verse>
				<verse number="16">जी दहा शिंगे तू पाहिलीस ती व श्वापद वेश्येचा द्वेष करतील व तिला एकाकी व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.</verse>
				<verse number="17">त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.</verse>
				<verse number="18">जी स्त्री तू पाहिलीस ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय.”</verse>
			</chapter>
			<chapter number="18">
				<verse number="1">त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या तेजाने पृथ्वी उजळून निघाली.</verse>
				<verse number="2">तो जोरदार वाणीने म्हणाला, “पडली! महान बाबेल पडली. ती भुतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे.</verse>
				<verse number="3">कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अमर्याद विषयभोगाने धनवान झाले.”</verse>
				<verse number="4">मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील कोणतीही विपत्ती ओढवू नये म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.</verse>
				<verse number="5">कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली आहे आणि तिच्या अनीतीची देवाने दखल घेतली आहे.</verse>
				<verse number="6">जसे तिने दिले, तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्याल्यात जितके ओतले, त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता.</verse>
				<verse number="7">ज्या परिमाणाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या परिमाणाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही. मी दुःख पाहणारच नाही!’</verse>
				<verse number="8">ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे रोगराई, शोक व दुष्काळ एका दिवशीच येतील आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल. कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभू देव सामर्थ्यवान आहे.”</verse>
				<verse number="9">पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला, ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा ते तिच्याकरता ऊर बडवून शोक करतील.</verse>
				<verse number="10">तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचे त्यांना भय वाटते म्हणून ते दूर उभे राहतील आणि म्हणतील, ‘किती भयंकर! किती किळसवाणे! अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती! एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.’</verse>
				<verse number="11">पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही.</verse>
				<verse number="12">सोने, रूपे, मौल्यवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अत्यंत मौल्यवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषणाची पात्रे.</verse>
				<verse number="13">दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, ऑलिव्ह तेल, पीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मानवी जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही.</verse>
				<verse number="14">व्यापारी तिला म्हणतात, ‘ज्या चांगल्या गोष्टी मिळवण्याची तुला उत्कंठा लागली होती त्या नष्ट झाल्या आहेत. तुझी धनदौलत व विलासाची साधने नाहीशी झाली आहेत व ती पुढे कोणाला मिळणार नाहीत!’</verse>
				<verse number="15">तिच्या साहाय्याने धनवान झालेले व्यापारी रडत व शोक करीत, तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील.</verse>
				<verse number="16">आणि म्हणतील, ‘अरेरे, ह्या महान नगरीची दशा किती भयंकर व किती किळसवाणी झाली आहे! तागाची तलमवस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!’</verse>
				<verse number="17">एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली. सर्व तांडेल, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व जण, खलाशी व समुद्रावर जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर उभे राहिले</verse>
				<verse number="18">आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करीत म्हणाले, “ह्या महान नगरीसारखी दुसरी नगरी नव्हती!”</verse>
				<verse number="19">त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, “अरेरे, किती भयंकर ही दुर्दशा! जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबतांचे सगळे मालक श्रीमंत झाले ती महान नगरी! तिची एका घटकेत राख झाली!</verse>
				<verse number="20">हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्या विनाशाविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला न्याय मिळवून दिला आहे!”</verse>
				<verse number="21">नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, “अशीच ती महान नगरी बाबेल, हिंसक रीतीने टाकली जाईल व ह्यापुढे कधीही सापडणार नाही.</verse>
				<verse number="22">वीणा, पावा व कर्णा वाजविणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणार नाही. कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणार नाही आणि जात्याचा आवाज ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही.</verse>
				<verse number="23">दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!”</verse>
				<verse number="24">बाबेलला शिक्षा करण्यात आली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र लोकांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.</verse>
			</chapter>
			<chapter number="19">
				<verse number="1">ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जणू एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “देवाचा गौरव असो! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत!”</verse>
				<verse number="2">कारण त्याचे न्याय सत्याचे व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायविवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.</verse>
				<verse number="3">ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!”</verse>
				<verse number="4">तेव्हा ते चोवीस वडीलजन व ते चार प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! हालेलूया!”</verse>
				<verse number="5">इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”</verse>
				<verse number="6">तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला, त्याने घोषणा केली, “हालेलूया! कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव ह्याने राजाधिकार हाती घेतला आहे.”</verse>
				<verse number="7">आपण आनंद करू व उ्रास करू व त्याचा गौरव करू कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजविले आहे,</verse>
				<verse number="8">तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे, ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.</verse>
				<verse number="9">तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”</verse>
				<verse number="10">तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.”</verse>
				<verse number="11">त्यानंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो न्यायबुद्धीने न्यायनिवाडा करतो व लढतो.</verse>
				<verse number="12">त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ रत्नजडित मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते. ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही.</verse>
				<verse number="13">रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते.</verse>
				<verse number="14">स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून स्वच्छ पांढरी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.</verse>
				<verse number="15">त्याने राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघाली. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवील.</verse>
				<verse number="16">त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ हे नाव लिहिलेले होते.</verse>
				<verse number="17">नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, देवाच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!</verse>
				<verse number="18">राजांचे, सैन्याधिकाऱ्यांचे व सैनिकांचे, घोड्यांचे व त्यांवरील स्वारांचे, तसेच स्वतंत्र व दास, लहान आणि मोठ्या अशा सर्व लोकांचे मांस खावयास या!”</verse>
				<verse number="19">तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये हे सारे घोड्यावर बसलेल्या स्वाराविरूद्ध व त्याच्या सैन्यांविरूद्ध लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली.</verse>
				<verse number="20">मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चमत्कार करून ठकविले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले.</verse>
				<verse number="21">त्यांची सैन्ये घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारली गेली आणि त्यांच्या मांसाने सर्व पक्षी तृप्त झाले.</verse>
			</chapter>
			<chapter number="20">
				<verse number="1">नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली होती व त्याच्या हाती एक वजनी साखळदंड होता.</verse>
				<verse number="2">त्याने दियाबल व सैतान म्हटलेला प्राचीन साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग विवरात टाकून दिले.</verse>
				<verse number="3">ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे.</verse>
				<verse number="4">नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना केली नव्हती आणि आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर त्याची खूण धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यानी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.</verse>
				<verse number="5">मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हे मृतांचे पहिले पुनरुत्थान.</verse>
				<verse number="6">पहिल्या पुनरुत्थानात समाविष्ट असलेले धन्य व आशीर्वादित आहेत. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालत नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.</verse>
				<verse number="7">ती हजार वर्षे पूर्ण झाल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल.</verse>
				<verse number="8">आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यांतील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांना लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी आहे.</verse>
				<verse number="9">त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र फिरून पवित्र जनांची छावणी व देवाला प्रिय असलेले नगर वेढले, परंतु स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना भस्म केले.</verse>
				<verse number="10">नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.</verse>
				<verse number="11">नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या समोरून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले आणि ते पुन्हा दिसले नाहीत.</verse>
				<verse number="12">मग मृत लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी गुंडाळ्या उघडल्या गेल्या, तेव्हा आणखी एक गुंडाळी उघडली गेली. ती जिवंत लोकांची होती. त्या गुंडाळ्यांमध्ये जे लिहिले होते त्यानुसार मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.</verse>
				<verse number="13">त्यानंतर समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर टाकले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्या हाती असलेल्या मृतांना बाहेर सोडले. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.</verse>
				<verse number="14">तेव्हा मृत्यू व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.</verse>
				<verse number="15">ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.</verse>
			</chapter>
			<chapter number="21">
				<verse number="1">नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.</verse>
				<verse number="2">तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजेच पवित्र नगरी, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.</verse>
				<verse number="3">मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल.</verse>
				<verse number="4">तो त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नसेल. शोक, रडणे व वेदनाही नसेल. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”</verse>
				<verse number="5">तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, “पहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो!” तो मला असेही म्हणाला, “लिही, कारण ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत.”</verse>
				<verse number="6">तो पुढे म्हणाला, “झाले! मी पहिला व शेवटचा, प्रारंभ व अंत आहे. मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी विनामूल्य देईन.</verse>
				<verse number="7">जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.</verse>
				<verse number="8">परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”</verse>
				<verse number="9">नंतर शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत आला व म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.”</verse>
				<verse number="10">तेव्हा मी आत्म्याने प्रभावित झालो. त्याने मला अतिशय उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली.</verse>
				<verse number="11">ती दिव्य तेजाने चकाकत होती. ती अत्यंत मौल्यवान रत्नासारखी दिसत होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या सूर्यकांत खड्यासारखी वाटत होती.</verse>
				<verse number="12">तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्राएलाच्या संतानाच्या बारा वंशांची होती.</verse>
				<verse number="13">पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन, दक्षिणेकडे तीन व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.</verse>
				<verse number="14">नगरीच्या तटाच्या पायासाठी शिला वापरल्या होत्या. त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.</verse>
				<verse number="15">जो माझ्याबरोबर बोलत होता त्या देवदूताजवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याची काठी होती.</verse>
				<verse number="16">ती नगरी चौरस होती. म्हणजेच तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला दोन हजार चारशे किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.</verse>
				<verse number="17">मग त्याने त्या नगरीच्या तटाचेदेखील माप घेतले. ते उंचीला साठ मीटर भरले. देवदूताच्या हाती असलेल्या प्रमाणभूत काठीने हे मोजमाप घेण्यात आले.</verse>
				<verse number="18">तिचा तट सूर्यकांत रत्नाचा होता आणि नगरी नितळ काचेसारख्या शुद्ध सोन्याची होती.</verse>
				<verse number="19">नगरीच्या तटाच्या पायाच्या शिला वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांनी शृंगारलेल्या होत्या. पहिली शिला सूर्यकांत, दुसरी नीलमणी, तिसरी गोदंत, चौथी पाचू,</verse>
				<verse number="20">पाचवी गोमेद, सहावी सादा, सातवी स्वर्णमणी, आठवी वैदूर्य, नववी पुष्कराज, दहावी सोनलसणी, अकरावी धूम्रकांत व बारावी चंद्रकांत अशा रत्नांच्या होत्या.</verse>
				<verse number="21">बारा वेशी बारा मोत्यांच्या बनवलेल्या होत्या. एकेक वेस एकेक स्वतंत्र मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचा होता.</verse>
				<verse number="22">त्या नगरीत माझ्या पाहण्यात मंदिर आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरू हेच तिचे मंदिर होय.</verse>
				<verse number="23">नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि कोकरू हेच तिचा दीप.</verse>
				<verse number="24">राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील.</verse>
				<verse number="25">तिच्या वेशी दिवसा बंद होणार नाहीत, रात्र तर तेथे नाहीच.</verse>
				<verse number="26">राष्ट्रांचे वैभव व संपत्ती तिच्यात आणतील.</verse>
				<verse number="27">मात्र त्या नगरीत कोणत्याही निषिद्ध गोष्टी, अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणार नाही. ज्यांची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच ह्या नगरीत प्रवेश करतील.</verse>
			</chapter>
			<chapter number="22">
				<verse number="1">नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली.</verse>
				<verse number="2">नदीच्या दोन्ही बाजूंस वर्षातून बारा वेळा फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.</verse>
				<verse number="3">तिथे काहीही शापग्रस्त असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची उपासना करतील.</verse>
				<verse number="4">ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल.</verse>
				<verse number="5">तिथे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज भासणार नाही, कारण प्रभू देव त्यांचा प्रकाश असेल आणि ते युगानुयुगे राज्य करतील.</verse>
				<verse number="6">नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.”</verse>
				<verse number="7">येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!”</verse>
				<verse number="8">हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो.</verse>
				<verse number="9">परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!”</verse>
				<verse number="10">पुढे तो म्हणाला, “ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण हे सर्व घडण्याची वेळ जवळ आली आहे.</verse>
				<verse number="11">दुराचारी माणूस दुराचार करो. गलिच्छ मनुष्य गलिच्छ राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. सदाचारी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”</verse>
				<verse number="12">येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास मी वेतन घेऊन येईन.</verse>
				<verse number="13">मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटचा, आदी व अंत आहे.”</verse>
				<verse number="14">आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य!</verse>
				<verse number="15">विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.</verse>
				<verse number="16">तुमच्यासाठी ह्या गोष्टींविषयी घोषणा करण्याकरिता मी स्वतः येशूने माझ्या दूताला ख्रिस्तमंडळ्यांकडे पाठवले आहे. मी दावीदच्या घराण्याचे मूळ व वंशज आहे. मी तेजस्वी प्रभाततारा आहे.</verse>
				<verse number="17">पवित्र आत्मा व वधू हेही म्हणतात, “ये.” हे ऐकणारा प्रत्येक जणदेखील म्हणो, “ये” आणि जो तहानलेला आहे व ज्याला हवे आहे त्याने यावे व जीवनाचे पाणी दान म्हणून स्वीकारावे.</verse>
				<verse number="18">ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी योहान इशारा देऊन सांगतो की, जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील.</verse>
				<verse number="19">तसेच जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.</verse>
				<verse number="20">ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.” आमेन. ये, प्रभू येशू, ये!</verse>
				<verse number="21">प्रभू येशूची कृपा सर्वांबरोबर असो. आमेन.</verse>
			</chapter>
		</book>
	</testament>
</bible>